Tuesday, December 31, 2013

देव - ४

जन्मत: कुठलंही मूल आईवर अवलंबून असतं.
जवळच्या कुटूंबियांवर अवलंबून असतं.
मानवी पिल्लाचं परावलंबन तर बराच काळ चालू असतं.

ज्यांच्यावर विसंबावं अशीच ही वडीलधारी माणसं असतात, माझ्यासाठी होती.
मोठी माणसं जे करतात ते आपल्या भल्यासाठीच यावर विश्वास, पूर्णच विश्वास!
ते जर म्हणताहेत देव असतो तर असणारच, शंकाच नाही.
जर देवाला सकाळ संध्याकाळ नमस्कार करायचा असतो तर केला पाहिजे.
वडीलधार्‍यांना नमस्कार करावा तर करावा.
छोटं सुरक्षित जग!

आणि कधीतरी अचानक कुणीतरी आपलं मोठं माणूस सांगतं की सगळीचं मोठी माणसं विश्वास ठेवावा अशी नसतात, ती आपल्या भल्याचाच विचार करतील असं नाही.
मग कृष्णार्पणमस्तू !

ही छोट्या सुरक्षित जगाला तडा जावा अशी कदाचित पहिली घटना असेल.
या क्षणी काय झालं असेल त्या छोट्या जीवाचं!
ती बावरलेली छोटी मुलगी माझ्यासमोर उभी राहते आहे.
ती कदाचित तिच्या एकटेपणाची सुरूवात होती.
कदाचित कुठला मार्ग निवडायचा हे ठरवणारा तो पहिला क्षण असेल.
सुरूवातीला त्या छोटुकलीला वाटलं की बरं झालं कोण आपला कोण परका ते कळलं...
पण त्याचवेळी कुठेतरी मनात असणार की अशी परकी माणसं ओळखायची तरी कशी?
कोण आपलं, कोण परकं? कोण हितचिंतक, कोण शत्रु?
मला सावधपणे पावलं टाकायला हवीत.

प्रत्येकाच्या आयुष्यात येणार्‍या अशा क्षणानंतर मग मोठं होता होता कधीतरी लोकांची देवावर विसंबायला सुरूवात होत असणार.
जो कायम आपलं हितच चिंतणार आहे असा खात्रीचा कोण? तर देव!
जो खात्रीने सोबत करणार आहे, असा कोण तर देव!
ज्याच्याशी काहीही मोकळेपणानं बोलता येईल, असा कोण? तर देव!
जो मदतीला धावणार आहे, असा कोण? तर देव!
मित्र, सखा, मार्गदर्शक, सर्वकाही देव!

कबीराचे विणतो शेले कौसल्येचा राम बाई

माझे जनीला नाही कोणी म्हणून देव घाली पाणी

देव सगळ्यांचा आहे पण माझा माझा एकटीचा/एकट्याचाही आहे.

अशा देवाची कल्पना किती लोभस आहे.

********

Sunday, December 15, 2013

देव - ३

" समलिंगी संबंध " ठेवणे हा कायद्याने गुन्हा आहे. हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निराशाजनक आहे.
त्यावर कधीतरी लिहिन.

******

देव -- क्रमश: -----

लहानपणी आईचं असं असे की सगळी कर्मकांडं केली पाहिजेत, त्या मानाने बाबांचं जरा कमी होतं. म्हणजे आम्ही कुठल्या मंदिरात गेलो तर बाबा आत आलेच नाहीत, बाहेरच थांबले असं झालेलं आहे. किंवा पुजेतही हे चालेल ते चालेल, ते चालवून घेऊ असं त्यांचं असायचं. पण तेही देवाचं सगळंच करायचे आणि करतात.

 जे काही आणि जितकं काही आमच्या गावाकडे करतात त्यापेक्षा आईचं करणं बरंच कमी आणि सुटसुटीत आहे. पण आहे.

 माझ्या एका आत्याच्या अंगात यायचं. देव काही असा अंगात येत नाही याबाबत दोघांचंही एकमत होतं. हे काहीतरी ढोंग आहे किंवा मानसिक गरज आहे असंच त्यांनाही वाटायचं. ते जाहीरपणे आत्यांसमोर कधी बोलले नाहीत.
 या आत्याने एकदा अंगात देवी आलेली असताना कुठलातरी एक जप लाखवेळा दोघांना करायला सांगितला, त्याने माझी मावशी/ काकू बरी होणार असं होतं. तो जप दोघांनीही केला. मी विचारलं, "याने काही मावशी बरी होणार नाही हे माहित असूनही तुम्ही का करताय?"
 त्यावर आईचं उत्तर होतं, " देवाचं नाव घेतलेलं काही वाया जात नाही. आणि समजा पोचलं पुण्य मावशीपर्य़ंत , झाली बरी तर हवंच आहे, "
आणखी एक असंही होतं की कोणी का असे ना जमण्यातलं काहीतरी मावशीसाठी करायला सांगितलं तर करायचं नाही हे तिला पटण्यातलं नव्हतं.

 आपल्या आईवडिलांची देवाबद्दलची काय मतं आहेत, याचा आपल्या देवाविषयीच्या मतांवर प्रभाव असतो का?
मला वाटतं, निश्चितच असतो. सुरूवातीच्या दिवसांत तरी असतोच असतो. आपण कधीतरी सुटे होऊन विचार करून आपली मतं बनवायला लागलो की परीस्थिती बदलते. माझा भाऊ विश्वास  हा तितकाच धार्मिक, अस्तिक राहिलेला आहे, मी मात्र बदलत गेले.

  मिलिन्दबरोबर राहिल्याने बदल सहज होत गेले.

प्रत्येक घराची काहीतरी रित असते, काही श्रद्धा असतात. देव विषयक काहीतरी भूमिका असते.
आमच्या घरात देवावर, धर्मावर पूर्णच विश्वास! (शिवाय आपण उच्चवर्णीय असल्याचा अभिमान!)
आणखी एक आमच्या घराचं वैशिष्ट्य होतं, इथे कुठल्याही विषयावर खुली चर्चा होऊ शकत असे.
म्हणजे तुमचं ऎकलं जाईल आणि कृती होईलच असं नाही पण बोलण्यावर बंदी नव्हती.
याबाबतीत माझे त्यांच्याशी पराकोटीचे वाद होत.

मला असं वाटतंय वेगळेपण माझ्यात सुरूवातीपासूनच होतं / असावं.
तिसरीपासून मी शारदा मंदीरमधे जायला लागले, बसने जावं/ यावं लागे. आम्ही सगळी मुलं जाता येता जेव्हढी मंदिरं लागत त्या त्या देवांना हात जोडून नमस्कार करत असू. ( बसमधे उभं असताना दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा म्हणजे एक कसरत असे, मजा यायची :) ) सुपारी मारूती, हिंगुलांबिका ठीकच आहे पण मी  गांधी भवनातील गांधीच्या पुतळ्याला, बुद्ध आणि आंबेडकरांच्या पुतळ्यालाही नमस्कार करायचे, हे उद्याचे देवच आहेत, म्हणायचे.

 देवाला नमस्कार का करायचा?
नमस्कार करताना म्हणायचं असायचं ते " जय बाप्पा, सुखी ठेवा"
आपल्याला त्याने सुखी ठेवावं ही इच्छा! आणि ते त्याच्या हातात आहे असंही!

*******

या नमस्कार करण्यावरून एक आठवलं.... एक थोडा शहाणा होण्याचा क्षण.
अगदी लहानपणी आईने की मावशीने कोणी सांगितलं होतं कुणास ठाऊक, आपण मोठ्या माणसांना नमस्कार करतो, ती आशीर्वाद देतात, पण सगळी मोठी माणसं आपलं चांगलंच चिंतत असतील असं नाही, म्हणून अशा मोठ्यांना नमस्कार करताना म्हणायचं "कृष्णार्पणमस्तू". म्हणजे नमस्कार कृष्णार्पण केला की बदल्यात त्यांनी जे इच्छिलं असेल ते ही होतं कृष्णार्पण!*******
(क्रमश:)


Saturday, November 30, 2013

देव - २

’ तरूण तेजपाल प्रकरण आणि  आरूषी तलवार खून खटल्याचा निकाल ’ या दोनही घटनांबद्दल आपण इतकं वाचत आहोत, त्यात इथे वेगळं सांगू असं काही नाही.
 त्याबद्दल वाईट वा्टतं आहे,
इभ्रत खूनाबद्दल आधी लिहिलेलं.
तेजपाल प्रकरण चीड आणणारं आहे.

*******

देव -- क्रमश: -----

देवाशी संबंधीतच आपले सगळे सणवार आहेत. ते सगळेच उत्साहाने साजरे केले जात. आई किती दमत असे हे आज जाणवतंय, पण तेव्हा काय किंवा आत्ता काय आईला त्यात समाधान होतं/आहे.

मी कधी स्वत: उत्साहानं पूजा केलीय असं आठवत नाही. एकदा कधीतरी, तिसरी/ चौथीत म्हणालेले तर आईने नाराजीनेच करू दिलेली, (विश्वासला मात्र मनापासून, ) आणि मला पूजा करण्यात काहीही मजा आली नव्हती. पूजा संपली तर हुश्श!

हरितालिका वगैरे मी सहावी सातवीपासून करायला लागले असेन, माझ्या वर्गातल्या मुली तिसरी पासूनच उपास/ पूजा करीत. आई म्हणायची अजून लहान आहेस. हरितालिकेचा उपास करतोय म्हणजे भारी! आणि आता मी त्या सगळ्या मुलींपैकी एक झाले होते ते वेगळंच. आई म्हणालेली नुसता उपास कर, मी जरा खट्टूच झालेले. पत्री गोळा कर, फुलं आण यात मला भलताच उत्साह! नंतर नंतर तो संपत गेला.
( मजा म्हणजे पाच सहा वर्षांपूर्वीपर्यंत हा उपास मी करीत असे, कथा वगैरे सोडून देऊ, मला वाटे तुलनेने (:)) आपला नवरा किती चांगला आहे, तर कृतज्ञता! ....... )

 "आपलं आपलं सगळं करायला आपल्याला वेळ आहे देवासाठी थोडा वेळ काढायचा म्हंटलं की तुमच्याकडे वेळ नाही,  थोडी देवाची आठवण ठेवावी." असंच आईचं म्हणणं असे/आहे. अजूनही " साधा संध्याकाळी देवासमोर दिवा लावायचा... बरं दिवा नाही तर निदान एक उदबत्ती लावयची म्हंटलं तर कसं लक्षात राहात नाही?" असंच ती आजही म्हणते. आतूनच देवाबद्दल काही वाटत नाही, हे तिला कळूच शकत नाही. आणि समजा असेलच "तो" तर असा कर्मकांडात अडकलेला असेल का?
 
 देवासंबंधी प्रश्न विचारायला मी कधी बरं सुरूवात केली?

 जी काय माहिती मिळत होती ती मी कालानुसार लावून घ्यायला सुरूवात केली असणार. म्हणजे सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलीयुग .... वेदांची, पुराणांची रचना, नीतिनियम वगैरे.... म्हणजे सत्ययुगात रामाचं एकपत्नीव्रत आणि द्वापारयुगात कृष्णाला सोळा सहस्त्र बायका, द्रौपदीला पाच पती.... बदलते नियम असं काहीतरी लक्षात येत गेलं.

 रामायण मुख्यत: ठसवलं जायचं ते रावणाच्या पराभवापर्यंतच, पुढचं उत्तररामायण बरचं पुढे कळलं, कदाचित ’कुमार दोघे एक वयाचे, सजीव पुतळे रघूरायाचे " या गाण्याने कुतूहल वाटून, प्रश्न पडले नाहीत.
किंवा कृष्णकथेत सुद्धा प्रश्न पडले नाहीत, आपल्यापर्यंत पोचतं ते देवांच्या बाजूनेच पोचतं.
पहिल्यांदा बहुदा प्रश्न पडायला लागले ते पाप आणि पुण्य, स्वर्ग आणि नरक या बाबतीत.
भागवतात एक कथा आहे, कोण तो एक राजा आयुष्यभर पाप करत राहिला पण मरताना त्याने ’नारायण’ असं , खरंतर आपल्या मुलाचं, नाव घेतलं, त्यामुळे स्वर्गात गेला. ही कथा काही मला पटली नाही.
 यावर मी बराच वाद घातल्याचं आठवतंय, आयुष्यभर चुकीचं वागूनही केवळ मरताना देवाचं नाव तोंडी आली की झालं! हा काही न्याय नाही!
( देवाची नावं मुलांना ठेवण्याचं हे ही एक कारण आहे.)

 मग वाटायला लागलेलं की स्वर्गात किंवा नरकात पाठवण्यात काहीतरी गडबड आहे.

 कधीतरी लक्षात आलं की रूढींमधे मुलींना आणि मुलग्यांना वेगळं वागवलं जातंय. दिवाळीतली न्हाणी बायकांनी एक दिवस आधी उरकून घ्यायची, पुरूषांची मात्र नरकचतुर्दशीला, थाटात!

 सहावी, सातवी, आठवीत कधीतरी अशी प्रश्नांना सुरूवात झाली असेल.

(क्रमश:)

*******

Saturday, November 16, 2013

देव - १

मी एका धार्मिक, परंपरा पाळणार्‍या अशा घरात जन्मले.
आमच्याकडे रोज आई देवाची पूजा करायची. सोवळ्यात नाही पण धूतवस्त्रात.
आमच्या छोट्या घरात देवघर भिंतीला लावलेलं होतं.
सकाळी मी उठायच्या आधी आईची पूजा झालेली असायची.
संध्याकाळी आई देवापाशी दिवा लावायची.
मी आणि माझा भाऊ संध्याकाळच्या प्रार्थना, स्तोत्रे म्हणायचो.
घरात पंचांग असायचंच, चांगला/ वाईट दिवस पाहिला जायचा.
बहुतेक सगळे सणवार साजरे केले जायचे.

आधी देवाला नेवेद्य, नविन कपडे आणले की आधी देवापुढे ठेवले जायचे.
कुंकू लावून आधी देवाला नमस्कार मग घरातील मोठ्यांना अशी पद्धत होती.
आई रोज गाईसाठी पोळी/ नेवेद्य काढायची, रोज चिमण्यांना तांदूळ घालायची,
देवासमोर, दारात रांगोळी असे.

तर असं होतं की देव आहेच.
रामायण , महाभारतातल्या गोष्टी लहानपणीच ऎकलेल्या होत्या.
तेव्हा काही चांगली किर्तने ऎकलेली आहेत.
तिसरी, चौथीत असताना शाळेतून आल्यावर भागवत ऎकायला गेल्याचं आठवतंय.

तिसरीत जेव्हा सगळे स्वातंत्र्यलढ्यातले नेते इतिहासात होते तेव्हा हे देव नाहीत का? असा प्रश्न विचारला होता.
उत्तर मिळालं देव फार फार वर्षांपूर्वी होऊन गेले.
म्हणजे अजून फार फार वर्षांनी गांधी/ नेहरू/ टिळक हे ही देव होतील, असाच विचार करून थांबले होते.

एक कोटी वेळा रामनामाचा जप केला की आपण बोलू ते खरं होतं असं ऎकलेलं.
रोज कितीवेळा रामनामाचा जप करता येणं शक्य आहे?
मग कोटीवेळा म्हणून व्हायचं तर किती वर्षे लागतील, याचा एकदा हिशोब केलेला आठवतो आहे.

चिरंजीव असणारा हनुमान, अश्वथामा कुठे कुठे भटकत असतील, असं वाटायचं.

कोणत्याही माणसाचे पाय अधर असतील तर तो देव, इतकं सोपं होतं.
कधीतरी इरेला पडून कुणाचे पाय अधर आहेत हे पाहात बसलेले आठवतंय.
प्रत्येकाचे जमिनीला टेकलेले. देव बराच दुर्मिळ आहे! परीक्षेला जाण्याआधी आवर्जून देवाला नमस्कार केला जायचा.
’पेपर सोपा निघू दे’ असं मनात म्हणतही असू, बहुदा.

देव या मूर्तीत आहे का? देव म्हणजे काय असेल? असा लहानपणी कधी विचार केलेला नव्हता.
देव आहे, संतांना मदत करणारा, कुठे कुठे , वेगवेगळी रूपे घेऊन अजूनही लोकांना मदत करीत असेल, असं होतं.
काहीही मोठ्यांनी सांगितलं की स्वीकारायचं असंच, देवाला जोडूनच, स्वर्ग - नरक, पाप-पुण्य ते सगळंच स्वीकारलेलं होतं.

(क्रमश:)

Thursday, October 31, 2013

दिवाळीच्या शुभेच्छा!


माझ्या लहानपणीच्या ज्या दिवाळीच्या आठवणी आहेत त्या मजेच्या, सुखदायक अशाच आहेत. आम्ही दिवाळीची किती वाट पाहात असू आणि दिवाळी संपली की किती उदास वाटत असे ते आठवतंय.
आता जाणवतं. सगळे सणवार बायकांना किती दमवणारे आहेत.
दिवाळी म्हंटलं की फराळाचे पदार्थ आठवतात. ते सगळे आई घरीच करी.


पुरूषांना तेल लावून द्यायचं बायकांनीच,
रांगोळ्या काढायच्या बायकांनीच,
चारीठाव पक्वांनासहीत स्वैपाक करायचा तोही बायकांनीच,
घराची सजावट, पणत्या लावणं करायचं ते बायकांनीच
नंतर नटायचं तेही बायकांनीच

यावेळेस जरा वेगळा विचार करू या.
कामांकडे एक संधी म्हणून पाहू या.

म्हणजे रांगोळी काढायला मजा येतेच ना?
कामांमुळे वेगवेगळ्या कलांची ओळख होते.
ताण कमी करायला याचा उपयोग होऊ शकतो.

बरीचशी तीच तीच निर्रथक कामे करायला लागल्याने बाईमधे एक चिवटपणा येत जातो.
रिकाम्या वेळेचं काय करू? याचा फार मोठा प्रश्न तिच्यासमोर उभा राहात नाही.

दागिने, कपडे, सजावटीच्या वस्तू यात मन घातल्याने, त्यापलीकडच्या मूलभूत प्रश्नांना त्या हात घालत नाहीत,
त्यामुळे तिथली तीव्र निराशा, एकाकीपण यांची त्यांना ओळखही होत नाही..
अज्ञानात सुख!
(पुरूषही फार पलीकडचा विचार करत असतील, असे नाही..)

बायकांसमोरची कामे, ही नियम पोटनियमासहीत समोर असतात.
"आपल्या घरी असं असतं."
त्यांनी विचार करावा, ही अपेक्षा नसते.
विचार करण्यामुळे जे झगडे करावे लागतात ते टळतात.

मध्यमवर्गीय बायका दुय्यम पण एक सुखाचं जीवन जगू शकतात.
ज्या तसं जगतात त्यांना तसं जगू द्यावं.

तुम्हांला शक्य झालं तर तुम्हीही बघा.

जर स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांच्याशिवाय जगणं शक्य नसेल तर
तुमचा मार्ग खडतर आहे.

 शुभेच्छा!
Tuesday, October 15, 2013

"बाईपणाची ... ओझी." च्या निमित्ताने

http://asvvad.blogspot.in/2013/09/blog-post.html

>>यातील कोणती ओझी सर्वात जड, असह्य होणारी, सर्वव्यापी अशी सांगता येतील? कोणती ओझी झुगारणं तुलनेने सोपं आहे?
जी ओझी व्यक्तिवर अवलंबून असतात ती झुगारणं तुलनेनं सोपं असतं, जरी ती अवघड असली तरी.
जी ओझी इतरांनी लादलेली असतात ती झुगारणं अवघड.

~~~~~~~~
आपण बाईपण विसरलो तरी
बाकीचे विसरत नाहीत.
बाकीच्यांना वगळून
आपल्याला जगता येत नाही.
आपल्या वागण्याचे
अर्थ लावणारे ते असतात.
आपण कितीही मुक्‍त असलो
तरी चौकटी आखणारे ते असतात.
सगळं कसं नियमबद्ध
ते करु शकतात.
अपवाद म्हणून का असेना
आपल्याला नियमात बसवतात.
नुसते आपण बदलून उपयोग नसतो,
बाकीचे बदलावे लागतात.
~~~~~~

जी वावरतानाची छोटी छोटी ओझी आहेत ती प्रथम झुगारली पाहिजेत, ती तुलनेनं सोपी आहेत. त्याला होणारा विरोधही दुर्लक्ष करण्याजोगा असू शकतो, असेलच असं नाही. पण काच हळु हळू सैलावत नेला पाहिजे, प्रत्येकीच्या घरची परीस्थिती कशी आहे त्यावर ते अवलंबून आहे. म्हणजे कुणाकडे कुठलेही कपडे घालण्यावर बंधन नसेल पण मंगळसूत्र घातलंच पाहिजे. कुणाकडे मंगळसूत्र घाल की न घाल पण अंगभर कपडे हवेत, असं असेल.
 प्रश्न असा आहे की तिने काय घालायचं काय नाही, हे तुम्ही ( समाज, बाजारपेठ... कोणीही) ठरवू नका, तिचं तिला ठरवू देत. मग ओझं नाही. घरातले किंवा समाज ते ठरवायला लागला की ते ओझं.
 मला असं वाटतं की चालण्या, बोलण्या, वागण्याचे नियम मी बर्‍यापैकी धुडकावलेले आहेत.
समाजाचं कसं असतं ना, की तो तुम्हांला सामावून घ्यायलाच बसलेला असतो, इकडून नाहीतर तिकडून विळखा घालायला तयार. तुमचा अपवाद करून पण तुम्हांला समाजात बसवणारच. आणि व्यक्तिलाही समाजाचे दोर कुठे कापायचे असतात?
 म्हणजे माझ्या बाबतीत कसं होतं की काही थोडेसे नियम पाळले नाही तरी लग्न केलं, संसार करते आहे, मुलांसाठी नोकरी सोडून घरी बसले आहे... त्यामुळे मी तर अगदी फिट्ट बसते चौकटीत!
 आणि त्याहुनही महत्त्वाचं म्हणजे तिच्या नवर्‍याला चालतंय ना? मग आपल्याला काय करायचंय?
नवर्‍याचा विरोध पत्करून मला कुठे कधी झेंडे फडकवायची वेळच आलेली नाही.
"नवर्‍याला चालतंय ना! त्याला सांभाळून हवं ते करू देत."  लोक जेव्हा असा निष्कर्ष काढून मोकळे होतात, तेव्हा काहीही करता येत नाही.

"आदर्श बायको असण्याचं ओझं, नवराबायकोचं कित्ती छान चाललेलं आहे, हे दाखवण्याचं ओझं" हेसुद्धा मी बर्‍यापैकी झुगारलेलं आहे.
आपण कितीही खरं आणि स्पष्ट बोलायला गेलो ना तरी लोक हवा तसा अर्थ काढतात, मी म्हणते की ’ माझं आणि माझ्या नवर्‍याचं फार काही छान चाललेलं नाही, खरं आमचं अगदी उत्तम चालू शकतं पण नवरा काही प्रयत्नच करत नाही.’ लोक अर्थ काढतात वा! याचं तर मस्तच चाललंय. उगाच विनम्रता! आपल्याला काही करता येत नाही. आणि उघड्या डोळ्यांनी आजूबाजूचे कितीक संसार पाहिल्यावर, त्या नवरा बायकोंनी नात्याचं काय भयंकर करून ठेवलं आहे हे पाहिल्यावर आमच्यात मैत्री आहे ही पुष्कळच कमाई आहे , हे लक्षात येतं.

 माझ्यासाठी तरी खोलवर आणि सर्वव्यापी असणारं ओझं हे बलात्काराच्या भीतीचं ओझं आहे.
ते झुगारून द्यायला जमलेलं नाही.

~~~~~~~

>>> आणखी एक ओझं म्हणजे यशस्वी नवर्‍याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
थोडं समजलं, अधिक स्पष्ट करता येईल?
काय स्पष्ट करायचं? यशस्वीच असं नाही नवर्‍याबरोबर केवळ त्याची बायको म्हणून पार्टीला जाणं,  हेमंत जोगळेकरांच्या कवितेत आलं आहे तसं,
http://kavitanchagaon.blogspot.in/2013/10/blog-post.html
मला कधी नटून थटून जावं लागलेलं नाही, म्हणजे मिरवायची बाहुली म्हणून मी कधीच गेलेले नाही,
तरीही तिथे माझी ओळख केवळ अमक्याची बायको हीच असते, तिथे आलेल्या सगळ्या बायकांचीही अशीच असते,
नवर्‍याच्या मागे मागे हसत फिरायचं किंवा बायकांच्या घोळक्यात शिरायचं, अति औपचारिक बोलायचं.
नको होतं.
तिथे असणार्‍या इतर बायकांना ते काचत असेलच याची मला खात्री नाही.
मुळात मुलींना वाढवलं जातं तेच अशा बाहुल्या व्हायला.
मग नटून थटून मिरवणं, हा एक बहुमानच वाटायला लागतो/ वाटत असावा.
...... आपल्याला काहीच करता येत नाही.

*******

पियू,
तू लिहिलेले सगळे मुद्दे खरे आहेत.
अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी लढण्यात किती एनर्जी जाते.
काय करणार?
आपल्याला जर निमूट सहन करायला जमणार नसेल तर तक्रार करत/ विरोध नोंदवत राहिलं पाहिजे.
खूप दमायला झालं तर काही दिवस विश्रांती घ्यायची, त्यांच्या मनासारखं वागायचं.
घरी काय आणि दारी काय माणसं हीच आहेत!
तरी आपल्या पूर्वीच्या पिढीतल्या बायकांपेक्षा आपलं खूप बरं चाललंय.

*******

>>>> प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.

>>अगदी खरं आहे. निमशहरी गावात, खेड्यात विवाहितेलाही हे ओझं असतं.

हो. विशेषत: एकटा पुरूष आणि एकटी बाई भेटले तर नैतिकतेचं काय होईल? म्हणून सारा समाज त्यांच्यावर डोळे ठेवून असतो. उघडपणे कुठल्याही बाईला नवर्‍याव्यतिरीक्त कुठल्याही (भाऊ, वडील या नात्याचे पुरूष वगळता) पुरूषाला एकट्याने, एकट्याला सहज, गप्पा मारायला वगैरे भेटणं ( आणि उलटही, म्हणजे कुठल्याही पुरूषाला , कुठल्याही बाईला भेटणं) ही जवळपास अशक्य गोष्ट आहे.
 निमशहरी गावात किंवा खेड्यात तर अशक्यच आहे.

 *******
Monday, September 30, 2013

द लंच बॉक्स

मला हा चित्रपट खूप आवडला.

ही एका मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी आहे.
शाळेत जाणारी एक मुलगी, ऑफीसला जाणारा एक नवरा, वर राहणार्‍या देशपांडे काकू, आजारी वडील, आई आणि परीक्षेतील अपयशाने आत्महत्या केलेला भाऊ.
 नवर्‍याला आपलंसं करण्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्याच्या खटपटीत ती.... इला.
तिला नवर्‍याची जवळीक खरोखर हवी आहे का? माहीत नाही.
पण नवर्‍याची मर्जी पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात ..... ती.
जी कुणीही असू शकते.
नवरादेखील ऑफीस आणि काम यात पिचलेला.
नवर्‍याचं कुठे काही अफेअर तर नसेल? ती साशंक! असेल किंवा नसेलही.
पण तिच्या डोक्याला खुराक!

मुंबई
तोच पाऊस, तीच गर्दी, तेच डबे, तीच ने आण, तेच तेच ..... घडत काहीच नाहीये.
दुबारा बारीश शुरू हो सकती है!

गेली बारा की पंधरा वर्षे देशपांडे काकू, आधी कोमात गेलेल्या आणि आता दिवसा छताला टांगलेल्या फिरत्या ओरीयंट फॅन कडे बघत असणार्‍या नवर्‍याची देखभाल करताहेत.

खाली वर राहणार्‍या शेजारणींचं चांगलं सख्य आहे.

खाली वर सुरू असलेल्या संसारातही साम्य आहे का काही?
इलाचा नवराही दिवसा चाकोरीच्या फॅनमधे अडकलेला तर नाही?

काहीच न घडणारे कदाचित खुपसे दिवस!

आणि एक दिवस कधी न घडणारी चूक डबेवाल्यांकडून होते.
इलाने नवर्‍यासाठी तयार केलेला डबा कुणा साजन फर्नांडीस नावाच्या विक्षिप्त समजल्या जाणार्‍या अकौंटंटच्या टेबलावर जातो.
त्याची बायको वारलेली मागेच.
तोही स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला जाण्याचं ठरवत असलेला.
अनपेक्षित चवदार जेवणाने तो सुखावतो.

डब्यातून चिठ्ठ्यांची देवाण घेवाण सुरू होते.

अजूनही तेच ते, वेगवेगळ्या भाज्या तयार करणं, डबा भरणं, डबेवाल्याने नेणं, पोचवणं, परत आणणं.
पण आता मनं बदलली आहेत.
तेच तेच असलं तरी त्यात प्रेम मिसळलंय, उत्कंठा आहे, वाट पाहणं आहे.
साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळालंय.

रोजचं चाकोरीतलं जगणं आपण टाळू शकत नाही, आजू बाजूची परीस्थिती बदलू शकत नाही.
प्रेम, आस्था, आपुलकी, शेअरींग याने जगणं बदलून जातं.

कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार होतो.

तोही बदलतो. केवळ शेखमुळे नाही तर नव्या मैत्रिणीमुळे, कधीतरी शेखच्या घरी जाऊन येतो, त्याच्या चुका दुरूस्त करत बसतो. गल्लीतल्या मुलांशी दोस्ती होते.

चित्रपटभर दोघांची भेट अशी होत नाही.

ती एकदाच इराण्याच्या हॉटेलमधे त्याची वाट पाहात थांबते,
एकट्या बाईसाठी असं वाट पाहात थांबणं किती साहसाचं आहे!
(तिचा नवरा कुठेही गेला तरी देशपांडे काकू विचारणार नाहीत पण दुपारभर ही नव्हती तर त्यांच्या चौकशा सुरू.)

चित्रपटाच्या शेवटी तो तिच्याकडे यायला निघतो.
कदाचित भेटेल कदाचित नाही.
दोघे मिळून भूतानला जातील?
कोण जाणे, नाहीच बहुदा.

सगळ्यांनी कामं छान केलेली आहेत. इरफान खान, नवाजुद्दिन सिद्दिकी आणि निम्रत कौर.
संथ, छोट्या छोट्या प्रतिक्रिया टिपणारा सिनेमा आहे.
भारती आचरेकरने नुसत्या आवाजाने देशपांडे काकूंचं व्यक्तिमत्व उभं केलं आहे.

पाहायलाच हवा असा चित्रपट आहे. चुकवू नका.

दिवाळीअंकातल्या एखाद्या जमून आलेल्या गोष्टीसारखा आहे.

Thursday, September 26, 2013

स्त्री हीच स्त्रीची शत्रू?? किती खरं.. किती खोटं..

"स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते" असं वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळत... कधीकधी ते खंर आहे असं वाटायलादेखील लागतं. सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजय यांच्यात अगदी निखळ मैत्रीचे/ सुखद नाते अगदी अभावानेच आढळून येते.

का बंर असेल असं?? स्त्रिया ह्या काय जन्मजात हेवेदावे आणि मत्सराच्या मुर्त्या असतात का??

आणि खूप विचार केल्यावर कळले.. याची मुळे सुद्धा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतच दडलेली आहेत.

१) सासू-सून:

सासूने जनरली मागच्या पिढीतली असल्याने आत्ताच्या पिढीपेक्षा जास्त सहन केलेले असते. पुरुषप्रधान सत्ता घरात कडक शिस्तीची असेल तर तिने आयुष्यभर दुय्यम स्थान अनुभवलेले असते. ना तिच्या विचारांची किंमत केली जात ना ती दिवसभर करत असलेल्या कामांची.. त्यामुळे वैतागलेल्या आणि काही अंशी पिचलेल्या अश्या बाईच्या मुलाचे जेव्हा लग्न होते तेव्हा समाज तिच्या हातात सून नावाचे एक सोफ्ट टार्गेट देतो. आयुष्यभर कुणाचे ना कुणाचे बॉसिंग सहन केलेल्या या बाईच्या हातात तिचे ऐकेल (रादर जिला तिचे ऐकावेच लागेल), असं एक(मेव) माणूस मिळत (हो.. एकमेवच.. बाईची सासू झाली म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेले पुरुष तिच्या मताला ह्या वयातही मान देतातच असं नाही.. त्यांना मुळी सवयच नसते ना तशी).  थोडक्यात सांगायचे तर पुरुष प्रधान संस्कृती मध्ये, आपल्याला हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्री सोडून अजून तरी घरातल्या स्त्रीला इतर कोणावर वचक ठेवता येत नाही आणि मग ती सुनेवर सत्ता चालवायला लागते.. तिला आपल्या मनाप्रमाणे वागवू पाहते.. तिच्याकडून तिच्या सासूने जबरदस्तीने करून घेतलेली सेवा/ मानपान हे ती विसरली नसते (ते विसरणे शक्यच नसते.. पूर्वीच्या काळी मुलींची लहान वयात लग्न होत असत..आणि अश्या वयात त्यांच्या सासूकडून त्यांचा झालेला छळ हा त्यांच्या कोवळ्या मनावर मोठाच आघात होता.. त्यामुळे तो आयुष्यभर लक्षात राहिलेला असतो). तीही तसेच करून घ्यायचा प्रयत्न करते. नव्या पिढीच्या सुनेला हे विचार पटत नाहीत. आणि (आताच्या पिढीच्या) तिच्या शिक्षणामुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिला जे पटत नाही ते ती मुळीच करत नाही. मग अर्थातच भांडण/ वादावादी होते आणि मग दोघी एकमेकींच्या शत्रू बनतात.

२) जावा-जावा:

यांच्यातील वादाची कारणे घरातले पुरुष कोणाला (जरातरी) मान देतात किंवा घरच्या मोठ्या निर्णयात (बायकांसाठी मोठा निर्णय म्हणजे लग्नात कुणाला काय आणि किती आहेर करायचा इत्यादी) कुणाचे मत विचारात घेतात ह्या स्थानासाठी झगडा हे होय. हे झाले एकत्र कुटुंब पद्धतीत.. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीतसुद्धा सासू-सासरे कॉमन असतात. त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे वागणाऱ्या एकीला एक आणि स्वत:च्या मताला महत्व देणारया.. (थोडक्यात जराश्या आधुनिक) अश्या सुनेला वेगळी वागणूक दिली कि उगीचच एकीच्या मनात दुसरीविषयी क्लीमिष तयार होते. काही वेळेला नवरेच उगाचच "वहिनी बघ कशी घरासाठी राबत असते.. तिची सर तुला येणारेका?" अशी काडी सारून देतात.. आणि मग भडका उडतो.

३) नणंद-भावजय:

ह्या केस मध्ये आपल्यावर प्रेम करणारा भाऊ/ बाबा आता घरात नवीन आलेल्या मुलीला हे प्रेम/ तो मान (हा मान म्हणजे फार काही नसतो.. फार तर ती पडद्यांचे किंवा घराला मारायचे रंग ठरवते) मिळतो आहे हे घरातून आता गेलेल्या मुलीला पटत नाही. माहेरचे आपले स्थान अबाधित ठेवायसाठी ती उगाचच माहेरच्या गोष्टीत ढवळा-ढवळ करत राहते. आणि सुनेला याचा राग येतो. त्यातच "दुरून डोंगर साजरे" या न्यायाने घरातल्या मुलीला आपली सासू आपला खूप छळ करते आणि आपली आई मात्र आपल्या वहिनीचे खूप लाड करते आहे असा काहीतरी समज होतो. काही वेळेला हे प्रकरण "वहिनी माझ्या आईचं नीट करत नाही.. तिला हवा-नको तो मान देत नाही" इथपर्यंत विचारांची मजल जाते.. आणि मग मत्सर आणि शत्रुत्व..

अर्थात हे चित्र आता बदलते आहे. आपल्या सासूने आपला छळ केला म्हणून आपणही आपल्या सुनेचा छळ करायचा हि प्रवृत्ती सगळीकडेच असेल असं नाही. काहीवेळा अगदी क्वचित का होईना पण आपण जे सोसले ते आपल्या सुनेला भोगायला लागू नये अशीही इच्छा दिसते. पण क्वचितच.. कारण पुरुषसत्ताक सिस्टीम हि स्त्रीला 'कधी ना कधी आपणही एक दिवस सासू होऊ आणि ह्या संसाराच्या रगाड्यातून सुटका होईल' ह्या आशेच्या गाजरावरच जगवत असते.. ती तरी सहजपणे आपलं सासूपण कशी बर विसरेन??

तरीदेखील पूर्वीच्या परंपरांप्रमाणे हा काही विशिष्ठ नात्यांमधली तेढ आणि दुस्वास पण अजूनही खालच्या पिढीत कुठेतरी झिरपतो आहे याची अजूनही अध्येमध्ये जाणीव होते.
आपण कितीही मैत्रीचे नाते निर्माण करायचे म्हटले तरी काही नात्यांच्या बाबतीत समाज आपल्याला तसं करू देत नाही.. मला आठवतंय.. लग्नानंतर सुरुवातीला माझी सासू मला फार काम करू द्यायची नाही. घरच्या लाडक्या मुलीसारखी मी घरभर बागडत असायची नुसती.. तेव्हा अनेकांनी येऊन "सुनेला फार डोक्यावर बसवून घेऊ नका ह..नंतर डोक्यावर मिरया वाटायची" असे सल्ले अगदी माझ्यासमोर दिलेले आहेत". म्हणजेच स्त्रियांनी शत्रुत्वाच्या चक्रातून एखाद्या नात्याची सुटका करू पाहिली.. तरी समाजाला ते बघवत नाही.. अमुक नात्यातल्या माणसांनी एकमेकांशी अमुक पद्धतीने वागले पाहिजे हे सुद्धा समाजच ठरवू पाहतो.. हा असला कसला समाजाचा जाच/ कसली जबरदस्ती??

कधीकधी विचार केला तर वाटते.. "फोडा आणि राज्य करा" ह्या तत्वाला अनुसरूनच पुरुषप्रधान समाज मुद्दाम स्त्रियांमध्ये वादाची बीजे पेरतो. कारण घरातल्या स्त्रिया एक झाल्या , तर त्यांच्यावर सत्ता गाजवणे घरच्याच काय.. कोणत्याच पुरुषाला शक्य नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे. स्त्रियांमध्ये असुरक्षितता बिंबवण्यामागे ह्या समाजाचा मोठाच हात आहे.

म्हणूनच आपल्या आईत, वहिनीत, बहिणीत आणि बायकोत, चांगले संबंध निर्माण व्हावेत, चांगले संबंध असतील तर ते टिकावेत, त्यांच्या संवादात आणि नात्यात शक्य तितका मोकळेपणा यावा यासाठी प्रयत्न करणारा पुरुष मला नेहमी आदरास पात्र वाटत आला आहे. अश्या पुरुषांना स्वत:च्या सत्तेपेक्षा घरातला आनंद आणि शांती जास्त महत्वाची वाटते असे माझे मत आहे.

Sunday, September 15, 2013

बाईपणाची ... ओझी...बाई असणं विसरता येत नाही.
म्हणजे बाई असणं मला नाकारायचं नाही, ते मला नकोसं आहे असं नाही.
माझ्या पुरूषाबरोबर माझ्या बाई असण्याचं काय करायचं ते मी बघून घेईन.
इतर पुरूषांच्या किंवा बायकांच्या किंवा मिश्रगटात मला सहज मोकळेपणाने , माणूस म्हणून वागायचे तर ते शक्य होत नाही.
माझी अपेक्षा अशी आहे की निदान काही वेळा ते विसरता यावं आणि आणि इतर वेळी नाही विसरता आलं तरी त्याचं ओझं होऊ नये.

हे बाई असणं विसरता येत नाही, त्याचं ओझं होतं याचे कितीक प्रसंग मला सांगता येतील.
खूप बायकांसाठी ही ओझी नसतीलही, बायकांनी कसं वागायचं हे मुरवलेलंच असतं ना आपल्यात.

नीटनेटकं बसायचं. आवरून बसायचं. घरातल्या मानाच्या जागा पुरूषांसाठी सोडून बसायचं, माझी आई जेवायला बसताना कायम अर्धी मांडी घालून बसते. म्हणजे एका पायाची आडवी घडी आणि एका पायाची उभी. बायकांनी कमी जागा व्यापायची. लहानपणी मी सगळ्यांच्या नकला करायचे तेव्हा मला कळलं. मी तिच्या मागेच लागले, तू छान मांडी घालूनच जेवायला बसायचंस तर गंमत म्हणजे तिला जमेना. नीट जेवता येईना. अवघडल्यासारखं झालं.
 बायकांनी आपले आतले कपडे दिसत नाहीयेत ना याची काळजी घेत राहायचं. ते वाळत घालायचे ते सुद्धा कुठेतरी लपवून.
पूर्वी नीट डोक्यावरून पदर, मग नीट खांद्यावरून, मग ओढणी व्यवस्थित घ्यायची, हुश्श! आता ते संपलंय, निदान शहरांमधून, शहरातल्या आम्ही वावरतो त्या स्तरामधून.
 पाळी सुरू असेल तर कपड्यांवर किंचितही डाग पडू नये याची काळजी घेत राहायचं. मला कधी कधी वाटतं की क्वचित कधी पडला डाग तर पडू दे की. काही वाटून घ्यायचं नाही. घामाने ओले झालेले कपडे दिसतात. चिखलाने माखले तर थोडा वेळ, घरी परतेपर्यंत चालवूनच घेतो ना. डाग पडण्याचा इतका ताण असतो, मग गडद रंगाचे कपडे घालायचे, ओढणीचे ड्रेस घालायचे.
 आणि माफक हसायचं, गडगडाटी हसू वगैरे बायकांसाठी नाही. पूर्वीतर तोंडावर हात ठेवून हसायचं, हातामागे दडून. मनमोकळं हवं तेवढं हसायचं नाही. नाजूक चालायचं. मान खाली घालून वगैरे
एकूण आत्मविश्वासाचं आणि आत्मसन्मानाचं खच्चीकरण.
 आधी पुरूषांनी जेवायचं मग बायकांनी जेवायचं.
पूर्वीतर पुरूषांनी बाहेरच्या खोलीत थांबायचं, बायकांनी स्वैपाकघरात जायचं.
कुठेही गेलेला असलात तरी वेळेत परतायचं.
काही काम नसताना गावभर हिंडायचं नाही.
बायकांनी चालण्या, बोलण्या, राहण्या, वागण्याचे इतके नियम आहेत ना, त्या म्हणजे कायम डोंबारणीसारख्या दोरीवरून कसरत करत चालत असतात.
 आपण सराईतपणे वातावरणाच्या दाबाचं ओझं घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर वावरावं, तसं पिढ्यान पिढ्यांच्या संकेतांचं ओझं घेऊन बायका जगत असतात. त्यांना त्याचा पत्ताच नसतो.

बायकांना जी नेमून दिलेली कामं आहेत ती अतिशय कंटाळवाणी आहेत. घर सांभाळणं. हे अतिशय किचकट, वेळखाऊ, तेच तेच असं काम आहे.
 त्यामुळे होतंय काय की घर व्यवस्थित ठेवणं ही बायकांची जबाबदारी आहे. त्याचं ओझं होतं.
घर सजवणं, त्याची मांडणी हे सर्जनशील काम आहे पण धूळ पुसत बसणं, चादरीच्या सुरकुत्या काढत बसणं कंटाळवाणं आहे,
बायकांना त्याचा ताण येतो.

 आणि स्वैपाकघर सांभाळणं, मला त्याची अजिबात आवड नाही.

घरचं, परंपरेनं आलेलं देवाधर्माचं करत राहणं. तेही एक ओझंच असतं.

बायका जेव्हा जमतात, विशेषत: समारंभांमधे तेव्हा दिसणं, कपडे, दागिने यावर बोलत बसतात, तिथे वेळ काढणं अवघड होतं. कदाचित याला ओझं म्हणता येणार नाही.

 हल्ली ना , दात सरळ, रांगेत असले पाहिजेत चं एक ओझं मुलींवर, कदाचित मुलांवरही आहे.

 बायकांवर आणखी एक ओझं म्हणजे त्यांचं वजन नियंत्रणात ठेवणं.
सध्या उच्चमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय स्त्रियांना त्यांच्या वजनाचं फारच पडलेलं आहे.
आरोग्याचं कारण आहेच, पण त्यापलिकडेही दिसण्याचं कारण आहेच.
मला जाड असायचं नाही. मिलिन्द म्हणतो, तू पण हे ओझं बाळगतेस.
असेलही.

 आणखी एक ओझं म्हणजे
यशस्वी नवर्‍याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
अगदी ओझं नाही पण अवघडलेपण आहेच.

हो, आदर्श बायको असण्याचं ओझं, आपला नवरा कसा परीपूर्ण आहे हे दाखवण्याचं ओझं, नवराबायकोचं कित्ती छान चाललेलं आहे, हे दाखवण्याचं ओझं,
 नवराबायको मधली वादळं कुणाशीतरी बोलावीत, तर असं अक्षरश: कुणीच नसतं कितीक बायकांना (पुरूषांनांही) , जेव्हा भांडणं आप्तांना कळायला लागतात तेव्हा वेळ निघून गेली आहे अशीच शक्यता असते.

 सार्वजनिक ठिकाणी बायकांसाठी बाथरूम्सची सोय नसते, पुरेशी नाही. त्यामुळे बाहेर पडल्यावर नैसर्गिक धर्मासाठी कुठे जावंच लागू नये याची मुली लहानपणापासून सवय करतात. कार्यालयांमधेही पुरेशी सोय आणि स्वच्छता असतेच असं नाही. त्यामुळे पुरेसं पाणी न पिणार्‍या बायका आहेत. युरीन इन्फेक्शन, आणि संबंधित विकारांचं मूळ बरेचदा या व्यवस्थेत आढळतं.
 आम्ही इंजिनीअरींगला असताना तास सगळे मेन बिल्डींगमधे पण एकुलती एक लेडीज रूम मागच्या इमारतीत असल्याने आम्हांला तिकडे जावे लागायचे. त्यातही व्यवस्था अशी होती की लेडीज रूमबाहेर जिन्याजवळ टॉयलेटस मग १२-१५ मुली आणि ४०० मुलं असं प्रमाण असणार्‍या आमच्या कॉलेजात जाणार्‍या येणार्‍या सगळ्यांना कळणार की आम्ही तिकडे जातोय. कोणी नाही पाहून आम्ही जायचो आणि यायचो.  कोणीही असो, आपल्याला जायचंय तर जावू हे करण्यासाठी आम्हांला वेळ लागलेला, धैर्य गोळा करावं लागलेलं. त्यानंतर मग आम्ही मुलींनी आम्हांला मेन बिल्डींगमधे एक लेडीज रूम किंवा किमान एक टॉयलेट हवं आहे ची मागणी केली होती.
 तर बाथरूमला जाऊन येण्याचा एक कार्यक्रम आणि तो कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं.

आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे, याचं ओझं बायकांवर असतं.

प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.

 कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना? या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं.

******

Saturday, August 31, 2013

सहन होत नाही. ३

अजूनही लिहायला जमेल की नाही, कोण जाणे.
ही चारच ओळींची घटना आहे, आतबाहेर हादरवून टाकणारी.
पहिल्यांदा तर रडूच यायला लागलं, आवाज करून , आक्रोश करून, गळा काढून मोठ्याने रडावं असंच झालेलं.
रडतही होते कितीतरी वेळ.

लेखात लिहिल्याप्रमाणे, माकडीणीची गोष्ट, पहिल्यांदा चीड आली ती आईचीच.
स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आईने पोटच्या पोरीचा बळी द्यावा? तो ही असा?
मग हळूहळू लक्षात आलं जीव घेणारा तर बापच होता ना?

बाप किती राक्षस असला तरी तो राक्षस असू शकतो हे मनात कुठेतरी स्विकारलेलं आहे की काय?
आई? ती त्यागमूर्तीच?
ती धारणा चुकीचीच आहे इथे आईसुद्धा राक्षसीण झालेली आहे.
बायकांना कुठलंही झुकतं माप द्यायला नको. त्याही तेवढ्याच क्रूर आणि स्वार्थी असतात.

मग वाटायला लागलं त्या बाईनं काय सुखासूखी लेकीला पुढं केलं असेल का?
काय असेल परिस्थिती?
नवर्‍याला सोडून देऊन ही बाई मुलीबरोबर का दुसरीकडे कुठे जाऊन राहिली नसेल?

आणखी विचार केल्यावर वाटलं, तो बाप म्हणविणारा राक्षस, नाही बायको, नाही मुलगी तर वेश्येकडे गेला असता.
त्या वेश्येच्या जीवाची काहीच किंमत नाही का?

साधं कंडोम वापरला पाहिजे, ही सक्ती बायको करू शकली नाही? का?

यात कितीतरी बाबी आहेत,
निषिद्ध मानले गेलेले बाप-मुलगी संबंध,
बाललैंगिक अत्याचार,
एडस
माणुसकीला काळं फासणारं , आईने लेकीला पुढे करणं.

.
.
.
.
मन:स्वास्थ्य हिरावून घेणारी घटना आहे.
अजूनही आतल्या आत रडायला येतं आहे.
.
.
.
.

Thursday, August 15, 2013

सहन होत नाही. २

सहन होत नाही.

.
.
पंधरा दिवस झाले अजूनही त्यातून बाहेर येऊन लिहायला जमेल याची खात्री नाही.
.
.
हे वाचत असताना, आठवताना, एकदम माझ्या मनात त्या मुलीचे डोळेच येतात, कसे दिसत असतील ते? काय म्हणत असतील ते? खोलवरचे दु:ख , भीती, फसवणूक...... तिच्या डोळ्यात पाहण्याची माझ्यात हिंमत नाही.
.
.
हे अजाण छोट्या मुली,
तुझ्या जन्मदात्यांना, शेजार्‍यांना, नातेवाईकांना, या समाजाला ... कुणालाही माफ करू नकोस!
.
.
तू या जगात आहेस की नाही..... मला माहित नाही.
.
.
तू जन्मलीस, तेव्हा मुलगी म्हणून तुझ्या जन्माचा आनंद झाला असेल की दु:ख कोण जाणे,
हळू हळू तुझी नजर स्थिर झाली असेल, मान बसली असेल, कधीतरी गुंडाळून ठेवलेलं असताना तू हातपाय नाचवले असशील,
छपराच्या छिद्रातून येणारा उन्हाचा कवडसा हाताने पकडायचा खेळ तू खेळली असशील,
तेव्हाचा तुझ्या डोळ्यातला आनंद, ती लकाकी परत तुझ्या डोळ्यात दिसावी यासाठीची कुठलीही जादू मला येत नाही गं!
.
.
काय घडतं आहे, त्याचे कुठलेही अर्थ तुला कळत नसणार! काय पुढे वाढून ठेवलंय? काहीही कळत नसणार......
बाळे, अशा राक्षसांच्या पोटी जन्म घ्यायचं का ठरवलंस?
.
.
माणूसकी, वात्सल्य, माया, ममता, संस्कृती...... सगळ्यांसमोर तू भलंमोठ्ठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहेस.
माणूस की जनावर?
.
.
तू रडली असशील, घाबरली असशील, ओरडली असशील की मूक......
तुला पोटाशी धरणारं कोणी होतं का गं?
.
.
.
.

Saturday, August 3, 2013

ओझं म्हणजे काय?ओझं म्हणजे काय? चौकटीतील बंधन? टाळता न येणारी जबाबदारी? का हे सर्वच आणि अजून काही? मला वाटतं ओझं म्हणजे दडपण. मी जेव्हा दुसर्‍याच कुणाच्या, मग ती व्यक्ती असो वा समाज, दडपणाखाली एखादी गोष्ट करतो तेव्हा त्या गोष्टीचे ओझे होऊन बसते माझ्यासाठी.

मी काही चौकटीत वाढलो. काळानुसार, वयानुसार, कुवतीनुसार काही चौकटी बदलल्या; ज्या मला पटल्या त्या मी स्वीकारल्या; ज्या नाही पटल्या त्या मोडायचा (माझ्या परीने) प्रयत्न केला. 

लहान असताना मला हातावर मेंदी काढून घ्यायला आवडायची; पण शाळेत मित्रांचा गट जमण्याच्या वयात आलो आणि हातावर मेंदी परत उमटलीच नाही. साधं कविता आवडणं, गांधी-विनोबा ह्यांच्याबद्दल आदर बाळगणे अशा गोष्टी ह्या कुचेष्टांचा विषय ठरू शकतो ह्याचा अनुभव घेतला.  ‘फक्त मुलांच्या‘ शाळेत शिकताना नाटकात आनंदीबाईंचे काम केल्यामुळे किती हेटाळणी होऊ शकते ह्याची कल्पना करणं बर्‍याच जणांना अवघड जाईल. किशोरवयातील शालेय वर्षात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचे खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो असे आता जाणवते.
पुरूषाने रफ-टफ, माचो असलं पाहीजे ह्या ठाम समजुतीपायी पुरूषच एखाद्या पुरूषाची प्रचंड मनहानी करू शकतात. आता मेंदी काढावीशी वाटली तर मी जरूर ती हातावर उघडपणे मिरवीन. पण इतक्या वर्षानंतर आता मेंदी काढून घ्यावी ही इच्छाच राहिली नाही.

मी जसा जन्माला आलो त्या जातीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या काही रूढी, परंपरा होत्या ज्या मी पाळणे अपेक्षित होते. जेव्हापासून कळत्या, किंवा कमवत्या, वयात आलो तेव्हापासून ज्या रूढी मला पटल्या नाहीत त्या मी पाळत नाही...प्रसंगी इतरांचा रोष पत्करून. मी नास्तिक मनुष्य आहे. धार्मिक परंपरा पटत नसताना पाळणे मला मान्य नाही. साधं घरातल्या इतरांबरोबर उपवास पाळणे ह्या गोष्टीचंपण ओझं बनू शकतं (जर तुम्हाला ते पदार्थ आवडत नसतील तर ;-)). मग प्रश्न येतो तो हा की ‘मी उपवास पाळत नाही‘ म्हणजे मी काही विशेष करतोय का ‘मी आवडत नसतानाही उपवास पाळतो आईला छान वाटावं म्हणून‘ म्हणजे मी काही विशेष करतोय? इतरांच्या प्रेमाचं, काळजीचं पण कधी कधी ओझंच होऊन बसतं...

अजून एक ओझं पुरूषांना जाणवतं ते ‘कर्ता‘ असण्याचं. माझ्या मते मी हे ओझं पण झुगारून दिले आहे निदान काही काळापुरते तरी.

आणि हो. काही ‘आधुनिक ओझी‘ आहेतच: चांगला बाबा होण्याचं ओझं. चांगला जोडीदार होण्याचं ओझं. स्त्री-पुरूष समानतेतला चांगला पुरूष, चांगला मित्र होण्याचं ओझं. ही ओझी अशासाठी की ‘चांगला‘ असण्याची व्याख्या हे कोणी इतर ठरवतात आणि त्याप्रमाणे निवाडा केला जातो. हे दुसर्‍यांच्या अपेक्षांना पुरून उरण्याचं ओझं फारच त्रासदायक. पण हे ओझं लिंगनिरपेक्ष असावं.

शेवटी मला मनापासून पटलेलं एक वाक्य जे ओझं झुगारण्याच्याबाबतीत लागू पडतं असं मला वाटतं :
Be true to yourself. You will stop caring what others think of you when you will realize how rarely they actually do.

- सचिन

Friday, August 2, 2013

ओझं

मी माझ्यापुरता लावलेला अर्थ असा आहे..
माझ्या अस्तित्वावर,आचार,विचार,उच्चारांवर प्रभाव असणारे असे घटक की ज्यांची निवड मी केलेली नाही.
असं काहीच माझ्याबाबतीत नाही आणि (म्हणून) माझ्यावर कोणतंच ओझं नाही असं म्हणणं अशक्यच आहे.
तर ही ओझी मला काचतात का ?
कधीकधी काचतातही पण एकूणात विचार केला तर सध्याच्या समाजरचनेत माझ्यावरची ओझी लाभदायीच आहेत.
मी माझ्या ओझ्यांबद्दल काही तक्रार करणं म्हणजे खरोखरीच शोषित/वंचित असे जे समाजगट/व्यक्ती आहेत त्यांच्या ओझ्यांची चेष्टा केल्यासारखं आहे असं मला वाटतं.
मी पुरुष म्हणून जन्माला आलो, ब्राह्मण जातीत जन्माला आलो, सरासरीच्या वरची बुद्‍धिमत्ता आहे, आर्थिक परिस्थिती चांगली होती/उत्तम आहे वगैरे वगैरे.
कोणतेही निकष लावून उतरंड मांडली तर मी त्यात privileged elite या गटात असणार आहे. माझ्या काही विशेषाधिकारांचे थोडेफार आनुषंगिक तोटे नक्कीच आहेत...


"The best years of your life are the ones in which you decide your problems are your own.You do not blame them on your mother, the ecology, or the president. You realize that you control your own destiny."
Albert Ellis-- मिलिन्द

Wednesday, July 31, 2013

सहन होत नाही.

http://www.loksatta.com/chaturang-news/jagruti-seva-sanstha-158879/

२७ जुलै च्या चतुरंग पुरवणीत जयश्री काळे यांचा लेख आहे. त्यांच्या जागृती या संस्थेसंबंधी हा लेख आहे.
त्यात त्यांनी त्यांना आलेल्या एका अनुभवबद्दल लिहिलंय.

>>एका घटनेनं आम्ही बरेच दिवस बेचैन होतो. एक अकरा वर्षांची मुलगी एचआयव्ही पॉझिटिव्ह आहे हे लक्षात आलं. वडील एड्सनी गेले होते तेव्हा आई पॉझिटिव्ह असणार. तिलादेखील मुलीबरोबर औषधोपचार करावे म्हणून बोलावलं तर ती निरोगी! खोदून खोदून चौकशी केली तर कळलं आई स्वत:ला वाचवायला रात्री दारू पिऊन नवरा आला की मुलीला त्याच्यापुढे उभी करत असे! माकडिणीच्या गोष्टीची आठवण झाली!

***********

Monday, July 15, 2013

कौतुक -- १

एक मैत्रिण बर्‍याच दिवसांनी भेटली. गप्पा मारता मारता सहज म्हणाली, " .... घरी मावंदं केलं तर अडीचशे माणसांचा स्वैपाक मी एकटीने केला."
मी अवाक झाले. " का? " तर म्हणाली " हे म्हणाले होते, आचारी लाव. मी करायचा ठरवला आणि केला."
आदल्या दिवशी मुगाचा शिरा करून ठेवला. दुसर्‍या दिवशी फक्त पोळ्यांना बाई लावली. दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, भात..... आक्काने भाजी चिरून दिली. अजून कोणी थोडीफार मदत केलीही असेल पण फोडण्या/ तिखट/ मीठ...... अंदाज... सगळं हिनेच केलं.
म्हणजे नवरा मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक आहे. तिच्या डोळ्यासमोर तिने आचार्‍याला हजार माणसांचा स्वैपाक करताना पाहिले असेल........ तरीही!
 प्रत्येकाची एक मर्यादा असते. मी २५ माणसांचा स्वैपाक एकटी करू शकते, अगदी वेळच पडली तर ५० - ६० त्यापुढे नाहीच.
हिला का करावा वाटला असेल? काय असेल त्यामागे?
कौतुक? कौतुक हवंसं वाटलं असेल?
हं पैसे जरासे वाचले असतील, पण त्यासाठी असेल असं नाही वाटत.
(किंवा हे करणं म्हणजे विसावा असेल, रोजच्या संसारातून मोकळीक.. कोण जाणे. )

कौतुक ही माणसासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे.
अगदी मूलभूत गरजांपैकी एक!

प्रत्येक व्यक्तीने आपली एक स्वप्रतिमा घडवलेली असते. शक्यतो ती व्यक्ती आपल्या प्रतिमेला धरून वागत असते.
म्हणजे एखादीने ठरवलं/ तिने तिची प्रतिमा जर अशी घडवलेली असेल की ’मला चार माणसांपेक्षा जास्त लोकांचा स्वैपाक जमतच नाही.’
तर तिला तो जमणारच नाही.

आणि असं असतं की म्हणजे मला वाटतं की माणसाला कौतुक कशाचं हवं असतं तर, त्याच्या स्वप्रतिमेला धरून असेल ते!
म्हणजे मैत्रिणीला २५० माणसांचा स्वैपाक एकटीने केला याचं कौतूक करून घ्यायला खूप आवडलं असेल....
तर दुसरीला कोणी म्हणालं की चार माणसांच्यावर कोणी जेवायला असलं की ही घरी करायच्या फंदात पडतच नाही. तर ते कौतुकच वाटू शकेल.

मला असं म्हणायचंय  ’कष्ट हे गौण असतात किंवा असू शकतात.”

प्रश्न असा आहे की बाईला आपली स्वप्रतिमा घडवताना किंवा खरं तर स्वप्रतिमा घडवण्याची कितपत मोकळीक असते?

"आदर्श" हे समाज घडवत असतो. ते समाजातल्या निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरांत वेगवेगळे असतात.
त्यातले चाकोरीची मोडतोड न करणारे आदर्श स्वीकारले जातात. स्वप्रतिमेवर अर्थातच या आदर्शांचा पगडा असतो.

स्वैपाक करता येण्याचं मूलभूत कौशल्य बाईला आलं पाहिजे असं समजलं जातं. त्यात काहीच्या काही वर जाणार्‍या बाईचं कौतुक होणारच. पण या माझ्या मैत्रिणीला जर म्हंटलं की एकटी प्रवास कर. तर तिला ते जमणार नाही. एकटीने प्रवास करून स्वत:चं कौतुक करून घ्यावं असं तिच्या मनातही येणार नाही.

म्हणजे " २५० माणसांचा स्वैपाक एकटीने करून पाहायचा" हे आव्हान घ्यावसं वाटलं तर घेऊ नये असं नाही.
समजा चाकोरी निवडायची सक्तीच आहे तर आहे त्या चाकोरीतही आव्हानं घ्यावीशी वाटणारच ना!

माझ्या कशाकशाचं कौतुक करा आणि कशाचं नको... हे बाईला ओळखता यायला हवं.
मला सगळंच येईल... च्या मागे जाऊन स्वत:ची फरफट करून घ्यायला नको.

(बाईला बाई म्हणून वाढवणं / घडवणं.. लिंगभाव हा असा सगळ्याच्या मुळाशी आहेच!)

 मुळात जर आदर्श हे लिंगनिरपेक्ष होऊ शकले तर हवं आहे.

बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे ती बदलायची असेल तर आदर्श बदलले पाहिजेत म्हणजे कौतुकासाठी म्हणून काही करायच्या कितीतरी वाटा तिला मोकळ्या होतील.

Sunday, June 30, 2013

कोबाल्ट ब्ल्यूआम्ही कोलकत्याला गेलो होतो तेव्हा ठाकूरबाडी, टागोरांचं घर पाहायला गेलो होतो. "आत गेल्यावर अगदी शांतता हवी, खाली अंगणात फिरता येणार नाही" असं आम्हांला सांगितलं गेलं कारण आत एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं.
 तरूण टागोर दिवाणखान्यात बसून एक कुठलंसं बंगाली गाणं ऎकत असलेले. सूर वाड्यात मिसळून गेलेले. ..... वाड्यात टागोर वावरत असावेत असं वातावरण तयार झालेलं......
 मग कळलं. ऋतूपर्ण घोष रविन्द्रनाथ टागोरांवर एक चरीत्रपट करतोय. त्याचा रेनकोट मला आवडलेला. मग वरच्या गॅलरीतून कोणीतरी सांगितलं म्हणून अंगणात उभ्या असलेल्या त्या माणसाकडे नीट पाहिलं. काळा गॉगल... मोठ्या काळ्या मण्यांची माळ गळ्यात!.......
 ऋतूपर्ण घोष गेले ही बातमी वाचल्यावर ते आठवलं.
आणि मग ऋतूपर्ण बद्दल बरंच काय काय लिहून येत होतं, ते काहीही माहीत नव्हतं.
स्वत:ची लैंगिकता ओळखणं आणि ती स्वीकारणं आणि ती मिरवणं यासाठी त्याला किती झगडावं लागलं.
 ............

मागे एकदा मिलिन्दच्या अमेरिकेतील भावाने त्याच्या तिथल्या बॉसच्या या प्रवासाबद्दल एक लेख लिहिला होता ते आठवलं. आणि एका मोठ्या हॉस्पीटलचा मुख्य तो, ती झाल्यावर ते घरच्यांनी , मुलीने आणि हॉस्पीटलमधे सगळ्यांनी किती शहाणपणाने घेतलं.
..............

वंदनाताई एका पुस्तकाबद्दल बोलताना सांगत होत्या... लैंगिकतेची विभागणी नुसती बाई, पुरूष किंवा गे, लेस्बियन, अशी नाही करता येत. समाजाने ती सोयीसाठी ले्बलं दिलेली आहेत. माणसांच्या लैंगिकतेच्या वेगवेगळ्या शेडस असतात. प्रत्येकाला झगडायला लागत असणार!
............

आणखी एक आठवलं..... त्याबद्दल वाईट वाटतं. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी एका परजातीच्या मुलाच्या प्रेमात पडलेली, लहान वयात लग्न करून बसलेली, मैत्रिण पूर्णच खचलेली.. मी सांगत होते , यातलं चांगलं पाहा.... ती काहीही ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी तिला म्हणाले, " अगं , "मुलाबरोबरच" लग्नं केलंय ना? एवढं काय  " ............  मला आत्ता त्याबद्दल खूपच वाईट वाटतंय. मी ते माझे शब्द मागे घेतेय.
..............

 एका परीचितांकडे गेले होते. तिथे त्यांच्या ओळखीच्या बाई सांगत होत्या. माझ्या भोवती बागडणारी माझी मुलगी, मोठी झाली, ती कधीतरी मला पत्र लिहून आपल्या लैंगिकतेविषयी कळवते, सुरूवातीला मला धक्का बसला मग मी तिला लिहिलं, " तरीही तू माझी मुलगी आहेस आणि राहणार आहेस."
...............
 कोबाल्ट ब्ल्यू वाचताना तो झगडा जरा कळू शकला.
...............

चित्रा पालेकरांनी मुलीबद्दल लिहिलेलं. सुरूवातीला खूप अवघड गेलं. मी विचार करत होते, "वर्गात पहीली येणारी माझी मुलगी, अत्यंत हुशार, गुणी, प्रामाणिक अशी माझी मुलगी जेव्हा तिच्या लैंगिकतेबद्दल सांगते तेव्हा बदलली का? नाही. ती जितकी छान आहे तितकंच तिला आतून जे वाटतंय ते छान आहे. "
..............

नवरा-बायको आणि एक किंवा दोन मुलं असंच कुटूंब केन्द्रस्थानी ठेवून समाजाची रचना केलेली आहे ती बदलायला हवी.

एकाच वेळी आपल्याकडे लैंगिक गरज ही बिन महत्त्वाची, क्षूद्र, पापकारक वगैरे आहे आणि त्याच वेळी समाज तुमच्या लैंगिकतेवर कडक पहारा ठेवून आहे. समाजात रूढ असणार्‍या कित्येक चालीरीतींच्या, नियमांच्या मुळाशी गेलं तर हेच दिसून येईल.
................

कसे आहोत आपण समाज म्हणून? का नाही सगळ्यांच्या लैंगिकता स्वीकारू शकत? का नाही सगळ्यांना सामावून घेत? का चाकोरीत बसवू पाहतो प्रत्येकालाच! माणसांनी मोकळेपणाने श्वास घ्यावा असं का नाही वाटत आपल्याला? परस्परसंमतीनं दोन माणसांनी बंद दाराआड काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचं ते नातं समाज म्हणून आपण सहज स्वीकारूया.
.............

Thursday, June 20, 2013

थोडेसे मनातले....

काल आईशी बराच वेळ स्काईप वरती बोलत होते, बोलत होते म्हणजे कुरकुर करत होते, की  मी कशी कंटाळले आहे,डिप्रेशन आले आहे वगैरे वगैरे. आईसाठी ते नेहमीचे झाले आहे आता, कारण डिसेंबर मध्ये थंडी सुरु झाली तशी माझी कुरकुर पण सुरु झाली. आई चिडून पटकन म्हणाली, मग कशाला गेलीस एवढ्या लांब? तुलाच हौस होती. चटकन डोळ्यात पाणी आले. वाटले खरच का एवढी हौस होती मला इथे यायची? विचार केल्यावर जाणवले मुळीच नाही.अमेरिका बघावीशी वाटायची पण आई वडिलांना सोडून दूर वगैरे राहायची मुळीच इच्छा नव्हती. पण लग्नानंतर ६ महिन्यात एवढी चांगली संधी आली होती तर ती सोडावीशी ही वाटली नाही.तरी अमरेंद्र ने १० वेळा विचारले होते नक्की जायचेय ना?मी बिनधास्त पणे  म्हणाले होय जाऊयात.पुढचे परिणाम काय होणार आहेत ह्याची तेव्हा कल्पना नव्हती.. कदाचित त्याला होती......!
              अमेरिकेत पहिले महिने अर्थातच मस्त जातात, मस्त फिरायचे, नवीन नवीन ठिकाणी जायचे, खायचे प्यायचे, मजा करायची. अर्थात मी हे पुण्यात पण करायचे, पण शेवटी अमेरिका ना,वेगळेच असते. पहिले २-४ महिने ह्या मधेच जातात, mall मध्ये shopping करणे, AC shops मध्ये भाजी घेणे, हे सगळे वेगळे अनुभव असतात ना त्यामुळे दिवस निघून जातात.पण ५ ६ महिन्यांनी त्या गोष्टींचा पण कंटाळा यायला लागतो.पहिल्यांदा घराची सगळी कामे करायला जी मजा  येत होती ती कामे करणे bore होतं . काय सारखी सारखी भांडी घासायची,घर आवरायचे?"स्वयंपाक करायचा कंटाळा येतोय फार" माझे रोजचे कुरकुरणे सुरु झाले. मग पुन्हा एक ट्रीप व्हायची आणि सगळे नॉर्मल व्हायचे.कधी कधी वाटते ही ह्याचीच तर आयडिया नव्हतीना मला boredom मधून बाहेर काढायची? म्हणजे बायकोला फिरवून आणले की बायको at least २ महिने शांत होईल.कदाचित त्याला ही trick त्याच्याच एका  मित्राने सांगितली असेल कारण अशा phase मध्ये असणारी मी फक्त एकटी नव्हते.
              आम्ही जिथे राहतो ती एका गुजराथी माणसाची बिल्डिंग आहे, त्यामुळे अर्थातच इथे भारतीय लोक जास्ती आहेत. आम्ही DHL च्या project साठी येथे आलो. DHL ऑफिस ५ mins वर आहे त्यामुळे ह्याच्या ऑफिस मधली सगळी जण एकाच बिल्डिंग मध्ये राहतात.आमच्या बिल्डिंग मधले वातावरण अगदी घरगुती आहे,एकमेकांकडे येणे जाणे,नवीन पदार्थांचे testing कायमच चालू असते.आम्ही सगळ्याजणी H4 VISA वाल्या आहोत.म्हणजेच आम्ही आमच्या navaryanchya dependent आहोत.Dependent म्हणजे अमेरिकन govt  च्या मते काहीही न करू शकणाऱ्या व प्रत्येक गोष्टीसाठी नवऱ्यावर depend असणाऱ्या.पहिल्यांदा ऐकायला विचित्र नाही वाटले कारण आम्ही सगळ्याच सेम होतो ना.पण हळू हळू त्याचा मतीतअर्थ जाणवला,खरच आम्ही dependent आहोत इथे.
              आम्ही सगळ्या मैत्रिणी दुपारी टी पार्टी करतो,गप्पा मारतो,दोघी जणींना छोटी मुले आहेत त्यामुळे छान वेळ जातो.गप्पांचा विषय बऱ्याच वेळा त्यांची मुलेच असायचा मला आधी आधी चांगले वाटायचे पण नंतर कंटाळा यायला लागला रोज रोज काय तोच विषय.त्यांना पूस्तकांमध्ये किंवा इतर गोष्टींमध्ये इंटरेस्ट नव्हता. मग मी बोअर व्हायचे,त्यांना कायम विचारायचे तुम्ही माझा आधी २ वर्ष इथे राहून काय केले तर त्या म्हणायच्या काहीच नाही,मी हसायचे म्हणायचे म्हणजे काय?काहीच नाही म्हणजे काय हे आता मला इथे २ वर्ष राहिल्यावर कळले.आता जरी मला कुणी विचारले कि मी २ वर्ष राहून काय केले तर माझे पण हेच उत्तर असेल "काहीच नाही".
             माझ्या ह्याच group मध्ये एक मैत्रीण आहे ती electronic engineer आहे आणि जेव्हा ती इथे आली तेव्हा ती मोठ्या software co.मध्ये काम करत होती.लग्न झाले तेव्हा ती तिच्या नवऱ्यापेक्षा जास्त कमवीत होती,तिला विचारले नौकरी सोडून इकडे यायला वाईट नाही का ग वाटले तर मला म्हणली ,"वाटले थोडेसे,खरं तर मला लंडन ला onsite वर जायचा chance  होता पण ह्याला पण US ला यायचे होते ना म्हणून सोडून दिली नौकरी,शेवटी कुणाला तरी compromise करायचेच होते ना ग..." खद्कन हसले तिला काही कळलेच नाही sorry म्हणून उठून गेले आणि घरी येउन विचार करू लागले मी कोणत्या काळात आहे,१९४० का १९७०?तिनेच एके दिवशी सगळ्यांना जेवायला बोलावले,काय मस्त स्वैपाक केला होता मी म्हणले कसं ग जमते तुला सगळे तिकडे एवढा जॉब करून पण kitchen queen कशी काय तू मी तर फारच ढ आहे तुझापुढे.तर मला म्हणाली, "अग लग्नापूर्वी मला पोळ्या पण येत नव्हत्या पण लग्नानंतर इथे आले आणि सगळं जमु लागले" मी म्हणाले कसा काय,तर म्हणाली "आता किचनच माझे लाइफ आहे म्हणून तर ५ वर्ष राहू शकले नाहीतर किती कंटाळा आला असता,तुला पण होईल सवय १-२ वर्षात तू पण माझा सारखी होशील".माझा पोटात मोठा गोळाच आला,हिच्यासारखे म्हणजे २४ तासामधले ८ तास स्वयंपाक time pass म्हणून करायचा?माझी स्वैपाक करायला कधीच ना नाहीये पण वेळ जात नाही म्हणून दिवस त्यात घालवणे पटणार नाही.घरी गेल्यावर विचार केला मी खरच तिच्यासारखी झाले तर म्हणजे मी मीच नाही राहणार.हे योग्य आहे का अयोग्य मला कळत नव्हते तेव्हा पण आणि अजून पण.पण एक मात्र खरं होतं की मला मीच हवी होते.....!
            ६ महिन्यानंतर २ महिन्यांसाठी भारतात जाऊन आले,काय मस्त वाटत होते तेव्हा परत यायची इच्छाच नव्हती पण काय करायचे एवढा चांगला chance मिळतोय तर का सोडायचा?"शेवटी कुणाला तरी  compromise करायचेच होते ना".बघा म्हणजे मी पण असाच विचार केला आणि नंतर स्वतःच justification देत बसले कि स्वतःच्याच नवऱ्यासाठी करतेय ना मग काय त्यात?पण यावेळेला ठरवले वेळ वाया जाऊ द्यायचा नाही,आल्या आल्या दोघांनीही ४ व्हिलरचा लायसन्स काढला,library जॉईन केली ती पण मराठी पुस्तकांची,म्हणले आता काय वेळ जायला प्रोब्लेम नाही.येताना सगळ्यांनी सांगितले होते कि काहीतरी शिक निवांत बसू नकोस,courses ची inquiry सुरु केली, Atlanta च्या बऱ्याच universities ची माहिती काढली पण एकही university मध्ये माझा लायक course  नव्हता.इथल्या लोकांचे म्हणणे तुम्ही graduation पासून शिका व त्यासाठी entrance द्या. १-२ वर्षाचे courses  करणे शक्य नव्हते कारण आम्ही ३ महिन्यांच्या contract वर होतो. हे contract दर ३ महिन्यांनी वाढायचे पण प्रत्येक वेळेला वाढेलच असेही काही नव्हते,त्यामुळे इथे सलग ६ महिने राहू ह्याची assurity  नव्हती.तेव्हा शिक्षणाचा प्रश्न मागे पडला.आता घरात बसूनच काही तरी करायचे,मग २ ३ trip झाल्या  San Francisco मध्ये १ लग्न attend केले,जीवाचे new york करून आले,अमेरिकेतले fall colors पण पाहून आले तोपर्यंत सगळे मस्त चालले होते,मात्र थंडी सुरु झाली आणि सगळे बिनसले.ट्रिप्स बंद झाल्या आणि मी पुन्हा घर कोंबडी झाले.....
           खरं तर अमेरिकेत राहायचे म्हणजे नवऱ्यावर depend राहायचे,सगळ्याच बाबतीत ,कुठेही जायचे म्हणल्यावर त्याला घेऊन जायचे,मी तर सुरुवातीला parlor ला पण त्याला घेऊन जायचे,माहित नाही का भीती वाटायची एकटे एकटे जायची,कुठे तरी असे जाणवायचे कि मी माझ्या देशात नाहीये.कुणी काय बोलले तर मला इंग्लिश बोलता नाही आले तर,आता हे आठवून हसू येते पण तेव्हा असेच होत होते.अमरेंद्र मला dollars द्यायचा म्हणजे कुठे हि मला काही आवडले तर पटकन घेता यावे किवा मी कुठे एकटी गेले तर असावेत म्हणून,पण माझा मैत्रिणी अशा आहेत कि त्या मला म्हणतात कशाला आपण पैसे ठेवायचे स्वतः जवळ कुठेही गेलो तरी नवरा असतोच कि बरोबर त्यालाच मागायचे,एक मैत्रीण तर मला म्हणाली 'आमचे हे' मला पैसे ठेऊ देत नाहीत स्वतःजवळ,म्हणतात तू हरवशील.मला तर रागच आला म्हणले पैसे हरवायला काय ती १० वर्षाची आहे का?आणि जर तीच कधी कुठे हरवली तर ती काय करणार?तुला कसा contact करणार?घरी कशी येणार?पण एकदा accept केले न कि आपण dependent  आहोत कि मग स्वतःचे डोके पण वापरायचे नाही त्यासाठी पण नवऱ्यावर dependent राहायचे.तेच मी जेव्हा भारतातून आलेल्या माझा जावेला घेऊन एकटी atlanta फिरले तेव्हा ३ ४ दिवस का होईना मी पहिल्यांदाच INDEPENDENT झाले.आम्ही दोघीच इथल्या marta म्हणजेच लोकल ट्रेन ने फिरलो तेव्हा मला कशाचीच भीती वाटली नाही,अमरेंद्र ने माझ्यावर तिला सोपवले आणि मी माझी जवाबदारी समर्थपणे पार पाडली असे आता म्हणायला काहीच हरकत नाही.याचा अर्थ आम्हाला इथे कुणी बांधून ठेवले नाहीये पण आम्हाला हे बंधन आता आवडायला लागले आहे.नवऱ्यावर depend राहणे हि आमची गरज बनलीये.
          अमेरिकेत माझ्या बऱ्याच मैत्रिणी H 4 VISA वर आहेत,त्यातल्या बर्याच जणींना मुले झाली आहेत,त्यांना विचारले कि तुम्ही दिवसभर काय करता?तर म्हणतात मला तर बाई वेळच मिळत नाही इथे मला एकटीला मुलांचे सगळे बघावे लागते त्यामुळे ट्रीप वगैरे करायला सुद्धा वेळ नाहीये.कुठेच बाहेर जाता येत नाही,सगळीकडे जाताना पहिल्यांदा बाळाचा विचार करावा लागतो.मग मी म्हणाले करमते का ग इथे?तर म्हणतात ठीक आहे इथे,निवांत कुणी विचारायला नाही.privacy पण मिळते ना,मग मी म्हणाले अगं पण तुझा काय तुला दिवसभर बाळाला सांभाळून,घराची कामे करून कंटाळा येत नाही का तर म्हणते अगं savings किती होतात अमेरिकेत,मग करायचे थोडेसे मुलांच्या भविष्यासाठी compromise.मी तर ऐकतच बसले,केवढी careeristic मुलगी होती हि एकदम काय झाले हिला?मला म्हणाली तू पण chance घेऊन टाक इथे बाळ झाले तर अमेरिकन सिटीझन होईल,आणि तुझा वेळ पण जाईल.म्हणजे माझा वेळ जाण्यासाठी तिने मला एकदम नामी उपाय सांगितला होता.म्हणजे मला अमेरिकेत राहायचे असेल तर एक तर स्वैपाक घरात वेळ घालवणे किवा अगदीच कंटाळा येत असेल तर मुल होऊ देणे असे २ ३ च पर्याय माझ्या मैत्रिणींनी सुचवले.
          या सगळ्यान वरती माझा एका H 4 वाल्याच मैत्रिणीने मारलेली comment मला कायमच लक्षात राहिली,एक दिवशी ती बोलता बोलता मला म्हणाली,"पूजा आपण म्हणजे शिकली सवरलेली घर कामाची बाईच आहोत कि ग  इथे".तेव्हा खूप हसलो आम्ही दोघीजणी,फोन ठेवल्यावर भरूनच आलं दोघीनाही,तिने २ मिनिटात पुन्हा फोन केला व म्हणाली यासाठी नव्हतो ना ग आलो आपण इथे....!मग का आलो होतो आपण इथे माहित नाही.facebook वर खूप जुन्या मैत्रिणी भेटतात,मी अमेरिकेत आहे म्हणल्यावर कित्ती कौतुक वाटते त्यांना म्हणतात लक्की आहेस बाई आम्हाला बघ किती मरमर करावी लागते इथे.मी विचार करते मी त्यांच्या जागेवर असते तरी हेच म्हणले असते ना.पण आता मला त्यांना सांगावेसे वाटते तुम्ही ज्या गोष्टी बद्दल तुम्हाला कौतुक वाटते त्याचा प्रचंड कंटाळा आलाय मला आणि तुम्ही ज्या गोष्टी साठी कुरकुर करताय त्यसाठी तुमची असूया वाटते मला.या परिस्थितीत एकाच म्हण आठवते "Other side of the grass is always greener".
          मध्ये माझा एका मैत्रिणीने सांगितले कि,H 4 VISA असणाऱ्या मुलींने blog लिहायला सुरुवात केलीये,त्यावर त्यांनी त्यांना येणारे प्रोब्लेम्स लिहिले आहेत आणि त्यावरचे solutions पण लिहिले आहेत.तो ब्लोग वाचता वाचता मला अजून १ माहिती मिळाली ती म्हणजे अश्याच एका मुलीने अमेरिकेत असणाऱ्या dependent साठी facebook वर १ कम्यूनिटी तयार केली आहे,त्या कम्युनिटी चे नाव आहे 'H 4 VISA,a Curse'.या community वर माझासारखेच २००० जण मेम्बर्स होते,मी पण ती community जोइन केली.त्यामध्ये dependents न येणारे प्रोब्लेम्स व इतर मेम्बेर्स ने दिलेल्या प्रतिक्रिया होत्या तसेच त्यांनी सुचवलेले उपाय हि होते.याचा अर्थ माझासारख्या २००० जणींना H 4 VISA शाप वाटतो सगळच अजब आहे ना?पण सगळ्यांची मते वाचल्यावर हेच जाणवले कि सगळ्यांचे almost प्रोब्लेम्स एक सारखे आहेत,सर्वांनाच इथे राहायचा कंटाळा येतो पण राहावे लागते.        
         पण एवढ्या सगळ्या वाईट किवा नकारात्मक गोष्टींचा विचार झाल्यावर सकारात्मक गोष्टी पण बोलल्या गेल्याच पाहिजेत.अर्थातच एवड्या प्रगत देशात राहिले त्याचा मला खूप आनंद आहे.इथले रस्ते,इथल्या बिल्डींग्स पहिल्या कि कसले भारी वाटते .एवढे स्वच्छ आणि मोठे रस्ते पाहिल्यावर दुसऱ्या जगात आल्यासारखे वाटते.इथले मॉल खूप मोठे आणि अत्याधुनिक आहेत.मी अमेरिकेत आल्यामुळेच sears towerchya १०३ ऱ्या मजल्यावर जाऊ शकले,फक्त tv आणि movies मध्ये पाहिलेली Los angeles,San Francisco,Chicago,New york ,hollywood सारखी शहरे बघू शकले.निळ्या -हिरव्या रंगाचा समुद्र पहिल्यांदाच पाहायला मिळाला,मिठासारख्या पांढऱ्याशुभ्र रंगाच्या वाळूमध्ये खेळता आले,NASA  सारख्या ठिकाणी जाता आले,US Open ची tennis tournament बघता आली,अशा आणि अनेक गोष्टी पहिल्यांदाच बघायला आणि करायला मिळाल्या,.स्वप्नवत वाटणाऱ्या अनेक गोष्टी खऱ्या झाल्या ते अमेरिकेत आल्यामुळेच ना!त्यामुळे इथे आल्यामुळे मी असमाधानी आहे का तर नाही नक्कीच नाही.इथे प्रत्येक गोष्ट खूप perfect आहे अगदी चित्र काढल्यासारखी,corrections विचार करून पण काढू शकणार नाहीत.पण एवढ्या परफेक्शनचा पण कंटाळा येतो न कधीतरी थोडेसे इमपरफेक्शन पण हवे ना,नाहीतर तुम्ही तुमचे depression, frustration कशावर काढणार?अमरिकेत आल्यापासून शाहरुख चा स्वदेस ५०-६० वेळा तरी पहिला,इकडे यायच्या आधीही बघितला होताच,पण इकडे आल्यावर तो पटला अगदी १००% पटला आणि आवडला. 

           या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यावर conclusion असे काहीच निघाले नाही,मात्र काही गोष्टींचे realization मात्र झाले,कि अमेरिकेत माझासारख्या मुलीना dependent म्हणून राहायचे असेल तर बऱ्याच गोष्टींमध्ये adjustment करावी लागते.H 4 VISA वर आल्यामुळे आम्हाला अमेरिकेत नौकरी करता येत नाही,contract वर अमेरिकेत आल्यामुळे शिक्षणाचे options खूप कमी असतात,गाडी चालवता येत नसेल तर स्वतःहून कुठेही जाता येत नाही कारण इथली transport service तितकीशी चांगली नाही,तेव्हा बऱ्याच जणींना घरी बसण्याशिवाय पर्याय नसतो.काही जणी voluntarily शाळेमध्ये किवा पब्लिक लायब्ररी मध्ये काम करतात पण बर्याच जणींना लहान मुलांमुळे बाहेर पडणे जमत नाही.
          तेव्हा मला पण आता असे म्हणावेसे वाटते कि "कुणालातरी compromise करावेच लागते".

..... पूजा

Friday, June 14, 2013

बायकांचे स्नानगृह

इतक्यात काही आवरत असताना ’गमभन’ चं कॅलेंडर सापडलं. त्यावर मुलांना चित्र काढण्यासाठी कोरी जागा सोडलेली असते. मुक्ताने तिसरीत असताना काय काय काढलंय पाहात होते. एका चित्रापाशी थबकले. तिने "बायकांचे स्नानगृह" काढलेले. .........
 हे चित्र दोन महिने आमच्या भिंतीवर लटकत होते..... मी विसरून गेलेले. हसायला आलं.
तिसरीतल्या मुलीने जितक्या सहजपणे काढावे तितक्या सहजपणे मुक्ताने ते काढलेले.
दोन तीन बायका आंघोळ करताहेत, केस बांधलेले, कपडे बाजूला, पाणी... वगैरे वगैरे......
त्यावर्षी आम्ही मनालीला गेलो होतो.
मग मणीकरणला गेलो होतो.
तिथे गरम पाण्याची कुंडे आहेत.
पुरूषांची आणि बायकांची स्नानाची व्यवस्था वेगवेगळी आहे.
बायकांच्या इथे कुंडाभोवती भिंती बांधलेल्या आहेत, वर छत आहे.
ती आणि मी, बायकांच्या गरम पाण्याच्या कुंडाच्या इथे गेलो तर, क्वचित एक चार- दोन बायका होत्या. बहुदा गावातल्या किंवा आसपासच्या पहाडी भागातल्या. त्या तिथे निसंकोच स्नान करत होत्या, तिकडे कुणी पुरूष फिरकायची अजिबात शक्यता नव्हती. मला त्यांचे कौतुक वाटले, मुक्ता त्यांच्याकडे डोळे विस्फारून पाहात असलेली. आणि कदाचित माझ्याकडेही... मी तिथेही कपडे घालून पाण्यात उतरलेली....
 तिच्यासाठी बाईचं शरीर पाहण्याचा तो पहिलाच प्रसंग असेल. तिच्या कितीतरी प्रश्नांना उत्तरे मिळत असणार. मलाही वाटून गेलेलं , बरं झालं कुतूहल शमलं असेल, विचारले काही प्रश्न तर बघू.
 तिने काही विचारलं नाही.
आणि नंतर हे चित्र!...............
सहजपणे काढलेलं........
मग मीही सहजपणे ते भिंतीवर लावलेलं........

आज मला जाणवतंय.....
कपड्यांची किती बंधनं निदान आपल्या संस्कृतीत, बायकांवर आहेत!
कपड्यांविनाचा मोकळेपणा त्या अनुभवूच शकत नाहीत!

Wednesday, May 15, 2013

बायकांच्या मनातल्या गोष्टी


माणसांच्या प्रतिक्रियांमधे, वागण्यात किती आणि कुठला भाग स्वभावाचा आहे कुठला घडवण्याचा आहे हे स्पष्टपणे सांगता येईलच असं नाही.

कुठल्याही परीस्थितीत माणूस स्वत्व टिकवण्याचा प्रयत्न करत असणार...... बहुदा.

प्रत्येकच बाईचा एक कुठला कुठला प्रांत असेल तिथे ती स्वाभिमानाने उभी राहात असेल.

क्वचित कोणी त्या प्रांताबद्दल हळवी होऊन बोलताना आपण मन लावून ऎकलं तर कळतं..... इथे ही उभी आहे.... ताठ मानेने.... लवलेली नाही.

एक मैत्रिण एकदा चारचाकी गाडी शिकण्याविषयी म्हणाली होती, " आत्मविश्वास वाढवला पाहिजे, खरं आहे...... पण हा( नवरा) त्याच्या गाडीला फार जपतो....... जाऊ दे. ..... मी कधीतरी माझ्या पैशातून गाडी घेईन मग चालवीन...... याची गाडी नकोच. "

एका मैत्रिणीला काही कामासाठी चार-सहा वेळा माहेरी जावं लागलं. दहा-बारा तासांचा रेल्वेचा प्रवास... फार दगदग होत होती, नवरा म्हणाला, " विमानाने जा पुढल्या वेळी " .... मैत्रिण हे सांगत होती, पुढे म्हणाली, " माझा पगार काही एवढा नाही की विमानाने प्रवास करू. आता सहा महिन्यात प्रमोशन होईल. पगारही वाढेल. मग बघू. येईन कधीतरी विमानाने. "

  तुम्हांला वाचून कदाचित हट्टीपणा, दुराग्रह वाटेल, तसं नाही.
इथे त्या स्वत:च्या बाजूने उभ्या आहेत, आत्मसन्मान जपू पाहताहेत.

परावलंबी...... मानसीक, भावनिक, आर्थिक परावलंबन! ....... अशा बायका..... पण त्यातल्या कदाचित काही बायका नक्कीच आब सांभाळून असतात.
 नवर्‍याने दागिने घ्यावेत, साडी घ्यावी, कुठल्या कुठल्या निमित्ताने, म्हणून हट्ट करणार्‍या बायका असतीलच/ आहेतच.... कदाचित बहुसंख्येने... पण हे काहीही न मागणार्‍या बायकाही असतात.
 नवर्‍याने काही काही पैशांनी मिळू शकणारं आठवणीने घेऊन दिलं म्हणजेच प्रेम, असंच आहे ना समाजात!
 देण्याघेण्यातली सहजता जाऊन तिथे अपेक्षा/ आग्रह आला तर तो व्यवहारच!
नवर्‍याला ’मला गळ्यातलं हवं’ आणि "हीच साडी हवी" वगैरे मागणार्‍या बायकांच्या धीटपणाचं मला कौतुक वाटतं, मला तुझा वेळ दे म्हणण्याचं धैर्य माझ्यात नाही.
  आपल्याला नवर्‍याने काही काही  वस्तुरूप भॆटी दिल्या पाहिजेत, ही अपेक्षा म्हणजे दोघांमधलं नातं समानतेचं नाही.

अशा बायकांच्या स्वाभिमानाचं क्षेत्र कदाचित वेगळं असेल. कुठेतरी त्या न झुकता उभ्या असतीलच. त्याशिवाय इतकं लांब आयुष्य तरून जाणं कसं शक्य आहे?

 कळत - नकळत, जाणीवपूर्वक, अजाणता प्रत्येक बाई / प्रत्येक माणूसच मनातल्या मनात आपल्या भावना, इच्छा - आकांक्षा, गरजा, हळव्या जागा यांचं एक वर्गीकरण करत असणार! कुठे तो ढोबळ असेल, कुठे टोकदार, संवेदनशील!

  कधीतरी क्वचित बायका मनातल्या गोष्टी बोलत असतात, त्या कान देऊन ऎकल्या पाहिजेत. ......

माणसांच्या प्रतिक्रियांमधे, वागण्यात किती आणि कुठला भाग स्वभावाचा आहे कुठला घडवण्याचा आहे हे स्पष्टपणे सांगता येईलच असं नाही.

कुठल्याही परीस्थितीत माणूस स्वत्व टिकवण्याचा प्रयत्न करत असणार...... बहुदा.

प्रत्येकच बाईचा एक कुठला कुठला प्रांत असेल तिथे ती स्वाभिमानाने उभी राहात असेल.

क्वचित कोणी त्या प्रांताबद्दल हळवी होऊन बोलताना आपण मन लावून ऎकलं तर कळतं..... इथे ही उभी आहे.... ताठ मानेने.... लवलेली नाही.

*******


Tuesday, April 30, 2013

मुलीचं घर -- ३

यापूर्वीचं

http://asvvad.blogspot.in/2013/03/blog-post_31.html

पुढे


मुलींना वाढवलं असं जातं की नवर्‍याचं घर हेच तिचं घर. माहेरी ती वाढते ती उपरी म्हणूनच, कधीतरी हक्काच्या घरी जायची ती तात्पुरती इथे आहे, असंच.  हे मनात बिंबलेलं असताना तिलाही आई वडील जर तिच्या सासरघरी कधी आले तर ते पाहुणे असंच वाटत असतं.

 ही जी काय पुरूषसत्ताक पद्धत आहे, पुरूषाच्या घरच्या परंपरा चालवणारी, लग्न झाल्यावर मुलीने सासरी राहायला जायचं, तिची कर्तव्य ठरवणारी, ही काही नैसर्गिक रित नाही, ती एक समाजरचना आहे. ती सर्वाना मान्य करायला लागते.

 माझी एक मैत्रिण होती, त्या पाच बहीणी, ही सगळ्यात मोठी, इंजिनीअरींग च्या पहिल्या वर्षाला आम्ही असताना ती एकदा आम्हांला म्हणाली की ’शनिवारी कॉलेज झाल्यावर माझ्याकडे या, माझ्या भावाला बघायला या.’  ....... आम्ही गेलो. पाच बहीणींवरचा तो चिमुकला भाऊ, दोन महिन्यांचा असेल. दुपट्यांत गुंडाळलेला... आई बाळांतीण... कानाला बांधून... बाकी घर मुलीच सांभाळताहेत. आईच्या आणि मुलींच्या डोळ्यात भावाचं अपार कौतुक! ...... ते बाळ झोपलेलं.... गोडंच होतं.... मला तिथे अस्वस्थ व्हायला लागलं.......
 संततीनियमनाची साधने रूढ असताना, दोनच मुलं हवीत वगैरे प्रचार असतानाची ही गोष्ट आहे. आमच्या आणि आजूबाजूच्या कितीक घरांमधे तेव्हा दोन किंवा तीन इतकीच मुलं ( अपत्ये ) दिसायची.
आई - बाबांना मुलगाच का हवा असेल? आपण मुली त्यांना पुर्‍या पडत नाही याचं दु:ख मनात मैत्रिणीला होत नसेल का? होत असूनही तिला आनंद झाल्याचं दाखवायला लागत असेल का? की खरंच मनातून आनंद झाला असेल?
 खरंच आनंद झाला असण्याची शक्यता जास्त आहे. नाहीतर आम्हां मैत्रिणींना आवर्जून बोलावण्याचं काय कारण? तिचा उत्साह, आनंद दिसत होता. तेव्हा माझ्या मनातलं मी तिच्याशी बोलू शकले नाही.
 आपल्या आई वडीलांच्या दृष्टीने आपण दुय्यम आहोत, हे कसं स्वीकारलं असेल तिने? हे कसं स्वीकारत असतील मुली? कशा आनंदात सहभागी होत असतील?
  अशा मुली मोठ्या झाल्यावर त्यांना आपल्या आई बाबांना आपण म्हातारपणी सांभाळायला हवं हे आपलं कर्तव्य आहे, असं नाहीच वाटणार!
 अशीही बरीच घरं असतील, जी माझ्या मैत्रिणीसारखी होती पण ते आई बाबा दोन, तीन मुलींवर थांबले, मुलगा नाही झाला म्हणून आयुष्यभर खंतावत बसले.  अशा घरातल्या मुली काय म्हणणार?  " आई-बाबा, मी मुलगा असते तर तुम्हांला सांभाळलं असतं. " हा त्यांचा ढोंगीपणा नाही आहे. तसंच आहे ते आतून आलेलं!

 माझ्या पाहण्यात एक कुटूंब आहे, दोन मुली असणारं, छान, सुखी, मुली हवं ते शिकताहेत,  त्यातल्या बाबांना जेव्हा विचारलं की तुमच्या कुटूंबातील खोलवरची दु:खं कुठली आहेत? तर एक दु:ख असं होतं की मुलगा नाही,  मुलींना भाऊ नाही याचं मुलींनांही खूप वाईट वाटतं... असं लिहिलेलं! मी हादरलेच! वरवर सुखी दिसणार्‍या कुटूंबात असं आहे?
 या समाजाने लादलेल्या अपेक्षा आहेत. कधी कळेल त्यांना?

.......

या पार्श्वभूमीवर मला माझ्या त्या वहीनीचं कौतुकच वाटतं. आदर वाटतो यासाठी की तीही या अशाच विचारसरणीच्या घरात वाढलेली आहे. तिचे खरं विचारही बदलले नाहीत. .... या सार्‍यांपलीकडॆ एक माणुसकी असते, ती तिने सांभाळली, आपल्या आतल्या आवाजाला ओ दिला.  ती निगरगट्ट होऊ शकली असती पण झाली नाही. सगळ्या जोखडात बांधलेली असताना एक शहाणपणाचा आणि माणुसकीचा झरा तिने वाहता ठेवला.

......

Monday, April 15, 2013

मर्द


फरहान अख्तरने मर्द   MARD -- Men Against Rape and Discrimination असं कॅम्पेन सुरू केलं आहे.
मर्द असणं म्हणजे काय? हे सांगायला सुरूवात करणं स्वागतार्ह आहे.

यावरची जावेद अख्तर यांची कविता खूपच छान आहे.
जितेंद्र जोशींनी रूपांतर करताना कवितेचा गाभा बदलला आहे. आणि तीच टिपीकल, प्रेमळ पुरूषसत्तेची भूमिका घेतली आहे. अशा प्रेमळ पुरूषांच्या साथीतही बाईची घुसमट होते. असे पुरूष बाईवर खूप प्रेम करतात पण तिला वाढू देत नाहीत. जोशींनी स्त्रीला देवहार्‍यात बसवले आहे आणि पुरूषाला तिच्या संरक्षकाची भूमिका दिली आहे.

आईचा राखतो मान
आदर बहीणीचा
मुलीचा आणिक गृहिणीचा
तयाचा आम्हां आहे अभिमान

नका पुन्हा देव्हार्‍यात बसवू.

स्त्री म्हणजे कोमल छाया...

नको पुन्हा..... खरंच नको.

रक्षण करतो बाईचे

पुन्हा नव्या जगातही तिचे रक्षण करायला लागणारच आहे?

स्त्री जननी, स्त्री भगिनी , भार्या....
एवढंच!

या वर्तुळाबाहेरच्या स्त्रीचं काय?
आई, बहीण, मुलगी किंवा गृहिणी हीच बाईची ओळख आहे? त्याशिवायची विखुरलेली बाई आहे, मैत्रिण आहे, कार्यालयातली सहकारी आहे, कर्तबगार वरीष्ठ आहे, भाजीवाली आहे, कामवाली आहे.. ......
 कदाचित वेश्या आहे, तिला आपण वर्तुळाबाहेर का ठेवायचं? तिच्याही इच्छेचा आदर केला पाहिजे. तिचा अभिमान नाही वाटणार म्हणून ती बाई नाहीच का? वर्तुळाच्या बाहेरच्या स्त्रियांशी कसंही वागायला पुरूष मोकळेच का?

नवी चौकट नवं कोंडणं........

जितेंद्र जोशींच्या हेतूबद्दल मला किंचितही शंका नाही. पण बाईला बरोबरीने वागवणारा पुरूष हवा आहे. तिच्या आत्मसन्मानाची जाणीव असणारा पुरूष हवा आहे.

पुरूष म्हणजे माणूस
पौरूष म्हणजे निव्वळ माणूसपण
मर्द म्हणजेही माणूस
मर्दानगी म्हणजे निव्वळ माणूसपण
हे मर्दा, तू बाईशी केवळ माणसासारखं वाग.
आणि दुसर्‍या पुरूषाशीही केवळ माणसासारखं वाग.
बाईला देव्हार्‍यात बसवून तिची पूजा करू नकोस,
वा तिला कस्पटासमान समजून तिला पायदळी तुडवू नकोस
ती माणूस आहे, हे विसरू नकोस,
माणसाचे सगळे अधिकार तिला आहेत,
ती नाही म्हणू शकणार आहे,
ती एकटी फिरेल, रात्री अपरात्री,
स्वत:ला आवडतील असे कपडे घालेल,
तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे,
आणि मनावर देखील,
हे तुला पचवायला अवघड जाईल,
पण ते स्वीकारण्यात तुझं पौरूष आहे,
सत्ता गाजवण्यात काही मर्दानगी नाही,
ती आहे बरोबरीने वागवण्यात,
बळजबरी करण्यात कसलं आलंय पौरूष?
ते आहे प्रेमाने आपलंस करण्यात,
नसेल तिचं प्रेम तुझ्यावर तर
ते स्वीकारणं ही मर्दानगी आहे.
अरेरावी करणं, अनादर करणं,
म्हणजे तुझ्यातलं पुरूषपण नाही
बाई ही जिंकण्याची वस्तू नाही
बाईला पुरूषाच्या आधाराने जगायला लागू नये.
बाईला सुरक्षित ठेवणं म्हणजे पुरूषार्थ नाही
बाईला वाढू दे मोकळेपणाने
आणि तू वाढतोस तितक्याच मोकळेपणाने
हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही
दोघांचं मिळून आहे.
हे जाणणार्‍या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!

********

जावेद अख्तर यांची कविता  जितेंद्र जोशींचा पोवाडा / कविता इथे ऎकता येईल.
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=nbZj9YX_IBs

*********

Sunday, March 31, 2013

मुलीचं घर -- २


यापूर्वीचं

http://asvvad.blogspot.in/2012/10/blog-post_31.html

पुढे

>> याची मुळं शोधत गेलो तर "मुलीने लग्नानंतर मुलाच्या(!) घरी जायचं" या आणि एकूणच पुरुषप्रधान समाजाने ठसवलेल्या सर्व नियमांत असेल ना.
हो.

>> जावयाचे घर जसं मुलीचं व्हायला लागलं तसं मुलाचं घर सुनेचं व्हायला लागलं..
आता काहींच्या बाबतीत सुनेपेक्षा मुलीच्या घरात जास्त मोकळेपणा जाणवतो असं होत असेल.
हो.

>> आजकालच्या घरांमध्ये,खूपदा मुलीच्या आई वडिलांचा,सहभाग जास्त असतो.ते परके पण वगेरे वगेरे फक्त बोलण्या पुरेसे असते.
असेल काही घरांमधे.

>> माझ्या घरापासून पायी ५ मिनिटावर राहणार्या माझ्या चुलत बहिणीकडे आई बाबा नेहमी येतात.. पण मुंबईहून पुण्यात येऊनही इकडे सक्ख्या मुलीकडे थांबत नाहीत..
असंही आहे.

 कुठल्याही समाजात म्हणजे समाज रचनेत काही ठळक जबाबदार्‍या आणि कर्तव्ये यांच्या नीट रेषा आखलेल्या असल्या तर बरं पडत असणार.
 आपली पुरूषप्रधान व्यवस्था असल्याने आई वडीलांची जबाबदारी मुलावर, वडीलांची इस्टेट परंपरेने मुलाकडे/ मुलांकडे येणार.
 मरताना पाणी द्यायला मुलगा हवा, मेल्यानंतर अग्नी द्यायला मुलगा हवा.
 या व्यवस्थेत मुलगा असणं / होणं हे आवश्यकच होतं. नाहीतर दत्तक घ्यायचे, पण मुलगा हवाच.

 मुलगा असण्याच्या अट्ठहासापायी मुलींचे गर्भ पाडणं, सर्रास सुरू झालं. कारण आता दोन-तीनापेक्षा अधिक मुलं परवडण्यासारखी नाहीत हे पटलेलं, आणि मुलं हवं की नको, यासाठी संततिनियमनाची साधनं सहज उपलब्ध झालेली.
 पण विज्ञान पुढे गेलं म्हणून लगेच मानसीकता थोडीच बदलते?
 समाजात दाखवायला तरी मुलाचंच घर हक्काचं!
सहज मुलीकडॆ राहणारे किंवा मुली सहज माहेरीच राहताहेत आणि जावाई सासरी राहतोय अशी उदाहरणे विरळच आहेत.
 ज्यांना एक किंवा दोन मुलीच आहेत त्यांनी काय करायचं? असे आईवडील, अगदी परावलंबी होईपर्यंत मुलीकडे सहसा येत नाहीत.

 पूर्वीच्या एकत्र कुटूंबपद्धतीत नसला मुलगा तर पुतणे पाहायचे , वडीलोपार्जित घर असायचं, घराला माणसं लागायचीच. त्या घरातही स्वत:चा मुलगा नसेल तर आश्रितासरखं राहावं लागत असेलही. पण घर आणि माणसं तर असायचीच.
 मी कुठल्याही कुटूंबपद्धतीचा इथे पुरस्कार करत नाही आहे.
आताच्या विभक्त कुटूंबपद्धतीत, जेव्हा मुलीला इस्टेटीतही हक्क मिळतो आहे आणि बर्‍यापैकी समानतेनी वाढवलं जातं आहे, तर आईवडीलांनी मुलीकडे राहण्याचा संकोच वाटून घेऊ नये.
 लगतच्या भविष्यात ते दिसायला लागेल असं मला वाटतं.
मुलींनीही आपली आईवडीलांबाबतची कर्तव्ये सासरघरी स्पष्ट केलेली असली पाहिजेत.
 एकदा मुलगीसुद्धा म्हातारपणीची काठी आहे, आधार आहे, हे मनात बिंबलं, समाजात दिसायला लागलं की ”मुलगाच हवा’ चा हट्ट कमी होईल.

*********

 माझी एक वहीनी आहे, अगदी पुरूषप्रधान समाजाची कडीच, तिची आई गावी एकटी राहायची, मुलाचं सुनेचं आईशी पटायचं नाही, मुलगा तर आईचं तोंड पाहायलाही तयार नाही, आई आजारी पडली, एकटी राहणं शक्य नव्हतं, ही माझी वहीनी आईला आपल्या घरी घेऊन आली. आणि नंतर शेवटपर्यंत ठेवून घेतलं. भावानीच हे करायला पाहिजे, नाही तो करत, तर काय करायचं? म्हातारीलाही वाटे काय हे मुलीकडे राहण्याचे दिवस आले.
 पण वहीनी्ने आईला वार्‍यावर सोडलं नाही. मला तिच्याबद्दल आदर वाटतो.

*********
 पुढे

Friday, March 15, 2013

कसं सांगू?


मुक्ताला नाचाच्य़ा वर्गाला सोडायला गेले होते. एका बंगल्यांच्या सोसायटीतला हॉल! जरा लवकरच गेलेलो, अजून कोणी मुली आल्या नव्हत्या, ताई आल्या नव्हत्या. हॉलचं दार किलकिलं. बाकी आजूबाजूला कोणी नाही, रस्ता सुनसान. संध्याकाळी पावणेसहाची वेळ असेल. मला पुढे कामं होती. " जाऊ का गं? " तर " जा " म्हणाली.
 येतीलच मुली एवढ्यात असा विचार करून निघाले. "मुली येईपर्य़ंत बाहेर बाकावरच बसून राहा."
मग वाटत राहिलं, एवढं काय कामाचं? अगदी कोणी नव्हतं, सोबत थांबायला हवं होतं. नंतर वाटलं असू देत, एवढं तरी काय?

   रात्री बोलणं चाललेलं.. एकदम मला ते आठवलं. " आल्या का मैत्रिणी लगेच?"
" दहा मिनिटांनी आल्या असतील."
" तोवर बाहेरच थांबलीस ना? "
" नाही. आत जाऊन घुंगरू बांधले. एक काका हॉल झाडत होते."
" ते एकटेच आत होते?"
" हो. आमच्या ओळखीचे आहेत ते. "
ओळखीचे म्हणजे कधी कधी हॉल झाडताना पाहिलेले.
एकूण परिस्थिती माझ्या लक्षात आली, आजूबाजूला कोणी नाही, एकटा हॉल, आणि नेहेमी साफसफाई करणारा कुणीतरी माणूस...
मी शक्यतो आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले, " तुला मुली येईपर्य़ंत बाहेर बाकावरच बसायला सांगितलं होतं ना?"
" अगं, घुंगरू बांधायला वेळ लागतो. बाहेर बसण्यापेक्षा ते कामं झालं ना?"

मला कळलं, मला जे वाटतंय ते काहीच हिला कळत नाहीये. भीतीची एक लहर माझ्या अंगातून गेली....
ही तशीच....
माझी भीती मला ट्रान्सफर करायची नव्हती, तिने घाबरू नये हे ही समजत होतं.
पण राहवेना. कसं सांगू?
जगाबद्दलचा अविश्वास तिच्या मनात तयार व्हायला नको आहे.
तो बिचारा माणूस चांगला असेलही, होताच.
पण काळजी घ्यायला तर शिकवायला हवंच आहे ना?
आईने मला सांगितलं तेच मी सांगणार आहे का?
तोच पाया आहे? स्त्रियांचं जग आणि पुरूषांचं जग यांच्यातल्या नात्याचा?
आईचं किती बरोबरच होतं असं वाटायला लागलं.
आईने दिलेल्या चष्म्यातून पुरूषांकडे पाहायचं मी नाकारलं, पण सावध तर राहिलेच. काळजी तर घेतच आले.
पवित्र-अपवित्र, नैतिक-अनैतिक जाऊ दे, माझ्या किंवा कुठल्याही बाईच्या इच्छेविरूद्ध कुठल्याही पुरूषाने तिला स्पर्श करायलाच नको.

कदाचित आईने थेट सांगितलं, तेच मी वळसे घेऊन सांगितलं.
तिला जवळ घेतलं आणि म्हणाले,
" अगं तो माणूस तिथे एकटाच, तू एकटीच, मला भीती वाटली. त्याने कुठे अंगाला हात लावला असता, आणखी काही केलं असतं.
ओळखीचा असो अगर अनोळखी असो, कुठल्याही पुरूषाने तुला नको तिथे हात लावला किंवा काही केलं तर काय करशील?
एकतर तिथून पळत आधी बाहेर यायचं, आणि ओरडायचं मोठ्यांदा, चालवून घ्यायचंच नाही. प्रतिकार करायचा. कोणीतरी मदतीला येतंच.
आणि तो कोणीही पुरूष असला ओळखीचा अगर अनोळखी, तरी मला सांगायचं. त्याचं काय करायचं ते मी पाहीन."

एकदम उंचीने वाढलेल्या, निरागस असणार्‍या माझ्या मुलीची काळजीच वाटायला लागली.

गौरी देशपांड्यांच्या एका कादंबरीतील वाक्यं आठवली......
... माझ्यावर बलात्कार झाला तर मी तो एक अपघात समजेन, त्यातून बाहेर येईन. पण माझ्या मुलीकडे कोणी पाहिलं ना तर त्याचा मी खून करीन.

निसंशय! मला हेच वाटून गेलं.
Wednesday, March 13, 2013

बाईपणाची ओझीओझी म्हणजे नक्की काय?

मला वाटतं, मनाला पटणाऱ्या, पेलणाऱ्या अपेक्षा असल्या (इतरांकडून आपल्यासाठी) की त्यांचं ओझं होतं. मग या अपेक्षांना रूढी, रिती-रिवाज, सामाजिक, आर्थिक अशी कुठलीही पार्श्वभूमी असू शकते.
 'बाईपणाच ओझं' यात मग एक स्त्री म्हणून जन्माला येणं ही अजून एक पार्श्वभूमी add होते. आणि या सर्वांचा परिपाक असलेल्या अपेक्षा प्रत्येक स्त्रीला सामोऱ्या येतात.
            व्यक्तीपरत्वे ही ओझी बदलू शकतात किंबहुना एकाच व्यक्तीच्या संदर्भातही काळाप्रमाणे, कुठल्या गोष्टी ओझी या सदरात मोडत आहेत यात बदल होऊ शकतो.
यातल्या काही गोष्टी काहीजणींना सहज जमणाऱ्या, आवडणाऱ्या असल्या तर त्यांचं ओझं वाटत नाही. पण प्रत्येक स्त्रीला तसंच  वाटेल असं नाही. उदा. कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं.
कधी कधी असं पण होतं कि आधी आवडत असतं पण मध्येच कधी नाही केलं तर इतरांकडून विचारणा होते आणि मग त्या गोष्टीचं ओझं वाटायला लागतं. माझ्या एका मारवाडी मैत्रिणीच उदाहरण देते. ती पुण्यात एका software कंपनीत आहे. इथे ती आणि नवरा दोघच रहातात. लग्न झाल्यावर अगदी हौसेने नवीन साड्या, त्याच्याबरोबर सगळ्या matching गोष्टी, हातभार लाल-पांढऱ्या बांगड्या(तिचा नवरा यूपी चा आहे) अशी खरेदी केली. सुरुवातीला नवीन साडी नेसली कि नटून फोटो काढून मला दाखवायची. पुण्यात रहाताना अगदी इथल्या मुलींसारखी जीन्स-टी शर्ट मध्ये असते. पण जेव्हा सासरी जाते तेव्हा तिथे त्याच नव्या साड्या नेसून सगळे दागिने घालून, घुंघट काढून रहायला लागतं. तिथे त्याचा तिला त्रास होतो. तिथे तिने तसंच रहायला हवं या अपेक्षेचं तिला ओझं होतंय. खरंतर साडी नेसून नटण ही तिची आवडती गोष्ट आहे तरीही.
सामाजिक ओझी बरीच आहेत. पाळी चालू असताना मंदिरात जाणे हे पाळीशी संबधित एकाप्रकारचं ओझं आहे. जे मी लग्न झाल्यावर झुगारून दिलंय. सासरी मला कुणीच या गोष्टीवरून काही बोललं नाही. उलट असं काही पाळायची गरज नाही हेच सांगितलं. पण पाळीशी संबंधित इतकी ओझी असतात समाजात वावरताना. आपली पाळी सुरु आहे हे कुणाला कळू द्यायचं नाही. उघडपणे सांगायचं नाही. पॅड बदलायचं असेल तर ते लपवून बाथरूममध्ये घेऊन जायचं. खूप वेळ जर एका जागी बसायला लागलं तर उठल्यावर मागे डाग तर नाही पडलेला याची काळजी करणं. फक्त बायकाच जवळ असल्या तर यावर बोलणं होतं, एकमेकींना मदत होते. पण पुरुष कधी बोलतात का की आज माझ्या बायकोची पाळी चालू आहे. तिला त्रास होतोय वगैरे. जवळपास जर ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो? का ओझं आहे आपल्यावर या गोष्टींचं आणि तेच ओझं आपण आपल्या मुलीना पण देतोय. निदान आपण तरी आपल्या मुलाशी, वडिलांनी आपल्या मुलीशी पाळीबद्दल बोलताना अडखळू नये असं मला वाटतं.
घराबद्दल बोलायचं झालं तर बराचशा अपेक्षा या आपण जबाबदाऱ्या म्हणून घेतो. आणि मग त्यांच ओझं वाटायला लागलं तरी ते जबाबदारीच्या लेबलाखाली झाकायचा प्रयत्न करतो. यात आपण म्हणजे स्वतः आणि घरचे सुद्धा. उदा. स्वयंपाक करणं, मुलाचं बघणं, घर आवरणं, पाहुणे-रावळे बघणं...वगैरे पण हि उदाहरणं इथेच थांबत नाहीत 
आता पूर्वीसारखं घरातली कामं बायकांची आणि बाहेरची पुरूषांची असं नाहीये. बाई पण बाहेर काम करत असल्याने तिची कामं पण वाढली आहेत. आणि मग स्वतःला prove करायला बऱ्याच गोष्टींची जबाबदारी ती घेते किंवा तिच्यावर येते. इथे परत जबाबदारी आणि अपेक्षेची गल्लत आहेच. आणि मग यातून येणारं ओझं आहे.
व्यवसायाच्या ठिकाणी काहीजणींना पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण कमी नाही हे दाखवून द्यायला लागतं. बरेचदा संधी मिळूनही पुढे जाता येत नाही. मला आठवतंय, माझी आई बँकेत होती. तिथे तिला ऑफिसर म्हणून प्रमोशन मिळणार होतं पण मग मुंबईतून बाहेर जावं लागणार होतंआईने नको म्हणून सांगितलं. क्लार्क म्हणूनच शेवटी रिटायर झाली.
आता बऱ्याच अंशी हे ओझं कमी झालेलं दिसतं. नवराही बायकोला अशा बाबतीत बहुधा पाठींबा देताना दिसतो. व्यवसायाच्या ठिकाणी पुरुष सहकारी कसे असतील, तिथे एक स्त्री म्हणून कसं वागायचं याचं ओझं असतचरात्री उशिरा बाहेर असणं याचं ओझं पुण्यात तरी बरंच कमी वाटतं मुंबईपेक्षा
अजून बरीच ओझी आहेत सामाजिक संकेत झालेली. उदाएकत्र कार्यक्रमाला स्त्रियांनी डावीकडच्या बाजूला बसणे. खाली बसणे. घरी पाहुणे आलेले असताना बायकांनी पुरुष आणि मुलांनंतर जेवणे आणि आवरून ठेवणे, स्वतःच्या कपड्याचं कायम भान ठेवणं(कुठून काही दिसत तर नाहीये ना, साडीचा पदर जागेवरच आहे ना) वगैरे वगैरे....

     ही सगळी ओझी आहेत असं सांगताना पुरुषांवर काहीच ओझं नसेल असं गृहीत धरलेलं नाही. पण त्यांच्यावरच ओझं समजून त्याच्याशी तुलना करून बायकांची ओझी मांडली आहेत असंही नाही. समाजाकडून आलेलं ओझं यात 'समाज' म्हणजे स्त्रिया आणि पुरुष एकत्र असा विचार आहे.

     आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीत अजून बदल दिसतील
पण ही ओझी झुगारून देताना त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना याकडे पण लक्ष द्यायला हवे आहे.

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...