Tuesday, April 30, 2013

मुलीचं घर -- ३

यापूर्वीचं

http://asvvad.blogspot.in/2013/03/blog-post_31.html

पुढे


मुलींना वाढवलं असं जातं की नवर्‍याचं घर हेच तिचं घर. माहेरी ती वाढते ती उपरी म्हणूनच, कधीतरी हक्काच्या घरी जायची ती तात्पुरती इथे आहे, असंच.  हे मनात बिंबलेलं असताना तिलाही आई वडील जर तिच्या सासरघरी कधी आले तर ते पाहुणे असंच वाटत असतं.

 ही जी काय पुरूषसत्ताक पद्धत आहे, पुरूषाच्या घरच्या परंपरा चालवणारी, लग्न झाल्यावर मुलीने सासरी राहायला जायचं, तिची कर्तव्य ठरवणारी, ही काही नैसर्गिक रित नाही, ती एक समाजरचना आहे. ती सर्वाना मान्य करायला लागते.

 माझी एक मैत्रिण होती, त्या पाच बहीणी, ही सगळ्यात मोठी, इंजिनीअरींग च्या पहिल्या वर्षाला आम्ही असताना ती एकदा आम्हांला म्हणाली की ’शनिवारी कॉलेज झाल्यावर माझ्याकडे या, माझ्या भावाला बघायला या.’  ....... आम्ही गेलो. पाच बहीणींवरचा तो चिमुकला भाऊ, दोन महिन्यांचा असेल. दुपट्यांत गुंडाळलेला... आई बाळांतीण... कानाला बांधून... बाकी घर मुलीच सांभाळताहेत. आईच्या आणि मुलींच्या डोळ्यात भावाचं अपार कौतुक! ...... ते बाळ झोपलेलं.... गोडंच होतं.... मला तिथे अस्वस्थ व्हायला लागलं.......
 संततीनियमनाची साधने रूढ असताना, दोनच मुलं हवीत वगैरे प्रचार असतानाची ही गोष्ट आहे. आमच्या आणि आजूबाजूच्या कितीक घरांमधे तेव्हा दोन किंवा तीन इतकीच मुलं ( अपत्ये ) दिसायची.
आई - बाबांना मुलगाच का हवा असेल? आपण मुली त्यांना पुर्‍या पडत नाही याचं दु:ख मनात मैत्रिणीला होत नसेल का? होत असूनही तिला आनंद झाल्याचं दाखवायला लागत असेल का? की खरंच मनातून आनंद झाला असेल?
 खरंच आनंद झाला असण्याची शक्यता जास्त आहे. नाहीतर आम्हां मैत्रिणींना आवर्जून बोलावण्याचं काय कारण? तिचा उत्साह, आनंद दिसत होता. तेव्हा माझ्या मनातलं मी तिच्याशी बोलू शकले नाही.
 आपल्या आई वडीलांच्या दृष्टीने आपण दुय्यम आहोत, हे कसं स्वीकारलं असेल तिने? हे कसं स्वीकारत असतील मुली? कशा आनंदात सहभागी होत असतील?
  अशा मुली मोठ्या झाल्यावर त्यांना आपल्या आई बाबांना आपण म्हातारपणी सांभाळायला हवं हे आपलं कर्तव्य आहे, असं नाहीच वाटणार!
 अशीही बरीच घरं असतील, जी माझ्या मैत्रिणीसारखी होती पण ते आई बाबा दोन, तीन मुलींवर थांबले, मुलगा नाही झाला म्हणून आयुष्यभर खंतावत बसले.  अशा घरातल्या मुली काय म्हणणार?  " आई-बाबा, मी मुलगा असते तर तुम्हांला सांभाळलं असतं. " हा त्यांचा ढोंगीपणा नाही आहे. तसंच आहे ते आतून आलेलं!

 माझ्या पाहण्यात एक कुटूंब आहे, दोन मुली असणारं, छान, सुखी, मुली हवं ते शिकताहेत,  त्यातल्या बाबांना जेव्हा विचारलं की तुमच्या कुटूंबातील खोलवरची दु:खं कुठली आहेत? तर एक दु:ख असं होतं की मुलगा नाही,  मुलींना भाऊ नाही याचं मुलींनांही खूप वाईट वाटतं... असं लिहिलेलं! मी हादरलेच! वरवर सुखी दिसणार्‍या कुटूंबात असं आहे?
 या समाजाने लादलेल्या अपेक्षा आहेत. कधी कळेल त्यांना?

.......

या पार्श्वभूमीवर मला माझ्या त्या वहीनीचं कौतुकच वाटतं. आदर वाटतो यासाठी की तीही या अशाच विचारसरणीच्या घरात वाढलेली आहे. तिचे खरं विचारही बदलले नाहीत. .... या सार्‍यांपलीकडॆ एक माणुसकी असते, ती तिने सांभाळली, आपल्या आतल्या आवाजाला ओ दिला.  ती निगरगट्ट होऊ शकली असती पण झाली नाही. सगळ्या जोखडात बांधलेली असताना एक शहाणपणाचा आणि माणुसकीचा झरा तिने वाहता ठेवला.

......

2 comments:

 1. वहीनीबद्दल तुला आदर का वाटतो, ते कळलं. तिचं वागणं तिच्या विचारातून आलेलं आहे की प्रेम, माणुसकीतून याचा नीट उलगडा झाला नव्हता, म्हणून मी प्रश्न विचारलेला. समाजाच्या अपेक्षांचं दडपण असूनही माणुसकी सोडली नाही, करावंसं वाटतंय त्यानुसार वागण्याचं धैर्य दाखवलं हे कौतुकास्पद आहे.

  पण या लेखाचा संदर्भ तो नाही ना. विचारात बदल व्हायला हवा आहे. आई-वडिलांच्या मुलाशी असलेल्या नात्याचे सर्व पैलू मुलीशी असलेल्या नात्यातही असायला हवेत, या विचारातून कृती झाली तर अधिक हवी आहे. शहाणपणाचा झरा असं तू वेगळ्या अर्थाने म्हटलं आहेस. पण विचारात स्पष्टता आली तर मी त्याला शहाणपणाचा झरा म्हणेन.

  ReplyDelete
  Replies
  1. शहाणपण म्हणजे केवळ वैचारीक नाही, उलट आतून येणारं असंच ते!
   ’आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायचा’ याचीही नोंद घ्यायला हवीच ना? कितीकजणी तेही करत नाहीत.
   ’काय व्हायला हवं’ च्या मार्गावरचा हा एक थांबा असू शकतो.
   >>विचारात बदल व्हायला हवा आहे. आई-वडिलांच्या मुलाशी असलेल्या नात्याचे सर्व पैलू मुलीशी असलेल्या नात्यातही असायला हवेत, या विचारातून कृती झाली तर अधिक हवी आहे.
   हो. पण कृती तर हवीच आहे.

   Delete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...