Thursday, September 26, 2013

स्त्री हीच स्त्रीची शत्रू?? किती खरं.. किती खोटं..

"स्त्री हीच स्त्रीची खरी शत्रू असते" असं वाक्य आपल्याला नेहमी ऐकायला मिळत... कधीकधी ते खंर आहे असं वाटायलादेखील लागतं. सासू-सून, जावा-जावा, नणंद-भावजय यांच्यात अगदी निखळ मैत्रीचे/ सुखद नाते अगदी अभावानेच आढळून येते.

का बंर असेल असं?? स्त्रिया ह्या काय जन्मजात हेवेदावे आणि मत्सराच्या मुर्त्या असतात का??

आणि खूप विचार केल्यावर कळले.. याची मुळे सुद्धा आपल्या पुरुषप्रधान संस्कृतीतच दडलेली आहेत.

१) सासू-सून:

सासूने जनरली मागच्या पिढीतली असल्याने आत्ताच्या पिढीपेक्षा जास्त सहन केलेले असते. पुरुषप्रधान सत्ता घरात कडक शिस्तीची असेल तर तिने आयुष्यभर दुय्यम स्थान अनुभवलेले असते. ना तिच्या विचारांची किंमत केली जात ना ती दिवसभर करत असलेल्या कामांची.. त्यामुळे वैतागलेल्या आणि काही अंशी पिचलेल्या अश्या बाईच्या मुलाचे जेव्हा लग्न होते तेव्हा समाज तिच्या हातात सून नावाचे एक सोफ्ट टार्गेट देतो. आयुष्यभर कुणाचे ना कुणाचे बॉसिंग सहन केलेल्या या बाईच्या हातात तिचे ऐकेल (रादर जिला तिचे ऐकावेच लागेल), असं एक(मेव) माणूस मिळत (हो.. एकमेवच.. बाईची सासू झाली म्हणून पुरुषप्रधान संस्कृतीत वाढलेले पुरुष तिच्या मताला ह्या वयातही मान देतातच असं नाही.. त्यांना मुळी सवयच नसते ना तशी).  थोडक्यात सांगायचे तर पुरुष प्रधान संस्कृती मध्ये, आपल्याला हक्क प्रस्थापित करण्यासाठी स्त्री सोडून अजून तरी घरातल्या स्त्रीला इतर कोणावर वचक ठेवता येत नाही आणि मग ती सुनेवर सत्ता चालवायला लागते.. तिला आपल्या मनाप्रमाणे वागवू पाहते.. तिच्याकडून तिच्या सासूने जबरदस्तीने करून घेतलेली सेवा/ मानपान हे ती विसरली नसते (ते विसरणे शक्यच नसते.. पूर्वीच्या काळी मुलींची लहान वयात लग्न होत असत..आणि अश्या वयात त्यांच्या सासूकडून त्यांचा झालेला छळ हा त्यांच्या कोवळ्या मनावर मोठाच आघात होता.. त्यामुळे तो आयुष्यभर लक्षात राहिलेला असतो). तीही तसेच करून घ्यायचा प्रयत्न करते. नव्या पिढीच्या सुनेला हे विचार पटत नाहीत. आणि (आताच्या पिढीच्या) तिच्या शिक्षणामुळे आणि आर्थिक स्वातंत्र्यामुळे तिला जे पटत नाही ते ती मुळीच करत नाही. मग अर्थातच भांडण/ वादावादी होते आणि मग दोघी एकमेकींच्या शत्रू बनतात.

२) जावा-जावा:

यांच्यातील वादाची कारणे घरातले पुरुष कोणाला (जरातरी) मान देतात किंवा घरच्या मोठ्या निर्णयात (बायकांसाठी मोठा निर्णय म्हणजे लग्नात कुणाला काय आणि किती आहेर करायचा इत्यादी) कुणाचे मत विचारात घेतात ह्या स्थानासाठी झगडा हे होय. हे झाले एकत्र कुटुंब पद्धतीत.. पण आता विभक्त कुटुंब पद्धतीतसुद्धा सासू-सासरे कॉमन असतात. त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे वागणाऱ्या एकीला एक आणि स्वत:च्या मताला महत्व देणारया.. (थोडक्यात जराश्या आधुनिक) अश्या सुनेला वेगळी वागणूक दिली कि उगीचच एकीच्या मनात दुसरीविषयी क्लीमिष तयार होते. काही वेळेला नवरेच उगाचच "वहिनी बघ कशी घरासाठी राबत असते.. तिची सर तुला येणारेका?" अशी काडी सारून देतात.. आणि मग भडका उडतो.

३) नणंद-भावजय:

ह्या केस मध्ये आपल्यावर प्रेम करणारा भाऊ/ बाबा आता घरात नवीन आलेल्या मुलीला हे प्रेम/ तो मान (हा मान म्हणजे फार काही नसतो.. फार तर ती पडद्यांचे किंवा घराला मारायचे रंग ठरवते) मिळतो आहे हे घरातून आता गेलेल्या मुलीला पटत नाही. माहेरचे आपले स्थान अबाधित ठेवायसाठी ती उगाचच माहेरच्या गोष्टीत ढवळा-ढवळ करत राहते. आणि सुनेला याचा राग येतो. त्यातच "दुरून डोंगर साजरे" या न्यायाने घरातल्या मुलीला आपली सासू आपला खूप छळ करते आणि आपली आई मात्र आपल्या वहिनीचे खूप लाड करते आहे असा काहीतरी समज होतो. काही वेळेला हे प्रकरण "वहिनी माझ्या आईचं नीट करत नाही.. तिला हवा-नको तो मान देत नाही" इथपर्यंत विचारांची मजल जाते.. आणि मग मत्सर आणि शत्रुत्व..

अर्थात हे चित्र आता बदलते आहे. आपल्या सासूने आपला छळ केला म्हणून आपणही आपल्या सुनेचा छळ करायचा हि प्रवृत्ती सगळीकडेच असेल असं नाही. काहीवेळा अगदी क्वचित का होईना पण आपण जे सोसले ते आपल्या सुनेला भोगायला लागू नये अशीही इच्छा दिसते. पण क्वचितच.. कारण पुरुषसत्ताक सिस्टीम हि स्त्रीला 'कधी ना कधी आपणही एक दिवस सासू होऊ आणि ह्या संसाराच्या रगाड्यातून सुटका होईल' ह्या आशेच्या गाजरावरच जगवत असते.. ती तरी सहजपणे आपलं सासूपण कशी बर विसरेन??

तरीदेखील पूर्वीच्या परंपरांप्रमाणे हा काही विशिष्ठ नात्यांमधली तेढ आणि दुस्वास पण अजूनही खालच्या पिढीत कुठेतरी झिरपतो आहे याची अजूनही अध्येमध्ये जाणीव होते.
आपण कितीही मैत्रीचे नाते निर्माण करायचे म्हटले तरी काही नात्यांच्या बाबतीत समाज आपल्याला तसं करू देत नाही.. मला आठवतंय.. लग्नानंतर सुरुवातीला माझी सासू मला फार काम करू द्यायची नाही. घरच्या लाडक्या मुलीसारखी मी घरभर बागडत असायची नुसती.. तेव्हा अनेकांनी येऊन "सुनेला फार डोक्यावर बसवून घेऊ नका ह..नंतर डोक्यावर मिरया वाटायची" असे सल्ले अगदी माझ्यासमोर दिलेले आहेत". म्हणजेच स्त्रियांनी शत्रुत्वाच्या चक्रातून एखाद्या नात्याची सुटका करू पाहिली.. तरी समाजाला ते बघवत नाही.. अमुक नात्यातल्या माणसांनी एकमेकांशी अमुक पद्धतीने वागले पाहिजे हे सुद्धा समाजच ठरवू पाहतो.. हा असला कसला समाजाचा जाच/ कसली जबरदस्ती??

कधीकधी विचार केला तर वाटते.. "फोडा आणि राज्य करा" ह्या तत्वाला अनुसरूनच पुरुषप्रधान समाज मुद्दाम स्त्रियांमध्ये वादाची बीजे पेरतो. कारण घरातल्या स्त्रिया एक झाल्या , तर त्यांच्यावर सत्ता गाजवणे घरच्याच काय.. कोणत्याच पुरुषाला शक्य नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे. स्त्रियांमध्ये असुरक्षितता बिंबवण्यामागे ह्या समाजाचा मोठाच हात आहे.

म्हणूनच आपल्या आईत, वहिनीत, बहिणीत आणि बायकोत, चांगले संबंध निर्माण व्हावेत, चांगले संबंध असतील तर ते टिकावेत, त्यांच्या संवादात आणि नात्यात शक्य तितका मोकळेपणा यावा यासाठी प्रयत्न करणारा पुरुष मला नेहमी आदरास पात्र वाटत आला आहे. अश्या पुरुषांना स्वत:च्या सत्तेपेक्षा घरातला आनंद आणि शांती जास्त महत्वाची वाटते असे माझे मत आहे.

5 comments:

  1. किती काळ आपण पुरुषप्रधान संस्कृतीला दोष देत बसायचं? याच समाजाची स्त्रीही एक घटक आहे आणि ती ही जबाबदार आहेच. कारण आपल्या जीवनाच्या केंद्रस्थानी ती पुरुषाला ठेवते/मानते. वडील, नवरा, मुलगा... तिचं आयुष्य त्यांच्याभोवतीच फ़िरत असतं. माझ्यामते स्त्रियांनी ही मानसिकता बदलायला हवी. खरंतर दोन स्त्रियांमधे चांगले संबंध निर्माण होण्यास पुरुष कशाला मधे हवा? हा बदल एकदम होणार नाही हे मान्य आहे, पण त्यादृष्टीने विचार तर करायला हवा.
    दुसरं म्हणजे हे हेवेदावे, मत्सर वगैरे फ़क्‍त स्त्रियांनाच लागू का? दोन पुरुषांमधेही ह्या भावना असूच शकतील की.

    ReplyDelete
    Replies
    1. आशा: बाईला आयुष्यात कधीच 'स्वतःचे' हक्काचे घर मिळू शकत नाही , हा पुरुषप्रधान कुटुम्बपद्धतीचा बायकांवरचा सगळ्यात मोठा अन्याय आहे असे मला वाटते. घराचा मालक हा नेहमीच पुरुष असतो आणि घरातल्या ज्या बाईचे कर्ता पुरुष ऐकत असेल ती त्या घराची मालकीण. त्यामुळे साहजिकच एका बाईला घरातली दुसरी बाई ही नेहमीच प्रतिस्पर्धी वाटत असते. मग ती सून असो, सासू असो वा सवत.

      लहानपणी आई मुलीला सांगते की हे तुझे घर नाही. लग्न झाले की नवर्‍याचे घर तुझे. तिथे गेलीस की तुझे मत चालव . लग्न झाल्यावर सासू सांगते की 'आमच्या' घरात तूला असेच वागावे लागेल. म्हातारे झाल्यावर सून ऐकवते , की तुम्ही आमच्या सोयीप्रमाणे अ‍ॅडजस्ट केले पाहिजे.

      या सगळ्यातून बायकांच्या मनात खोलवर कुठेतरी असुरक्षिततेची भावना असते. हे घर माझे आहे , पण घरातले माझे 'स्थान' काय , आणि ते इअतरांसाठी कीती महत्वाचे हा प्रश्न नेहमीच असतो.

      बाईच्या वागण्यात जरा वर खाली झाले , मानसिक आजार् , दुर्धर शारिरीक आजार असे काही तिच्या वाट्याला आले तर रहात्या घरातून तिची सहज हकालपट्टी होऊ शकते. पुरुषांच्या तुलनेत बायकांचे बेघर होण्याचे प्रमाण नक्कीच जास्त आहे.

      त्यातल्या त्यात अता उच्च वर्गातून तरी बहुतेक बायांना हक्काचे घर, आणि घरात मानाचे स्थान मिळू लागल्याने पुर्वी कटूपणा असलेल्या नात्यात गोडवा दिसू लागलाय. तरीसुद्धा बायकांकडे अजुनाही service provider चा रोल असतो.

      जरा विचार करा, जर हे उलट असते तर पुरुष असे सासर्‍याशी जमवून घेवू शकले असते?

      Delete
  2. कौटुंबिक सत्तेच्या उतरंडीत बाईचे स्थान पुरूषाखाली असते. बायकांमधे सासूला वरचढ आणि सूनेला तिच्या खालचे. खूप वर्षे सून म्हणून वावरल्यानंतर ती सासू होते आणि अर्थातच सूनेला जसं वागवतात हे तिने पाहिलेले, अनुभवलेले असते, तसं वागवते.
    पुरूषसत्ताक व्यवस्था ही शोषणावर आधारीत आहे. शोषण होत राहिले तर ती टिकून राहणार.
    इतक्या वर्षांनी मिळालेली थोडीफार सत्ता सासू वापरू पाहते. सत्ता वापरायची तर सूनेला बरोबरीचे स्थान कसे मिळणार? मी वरचढ आहे हे दाखवून द्यायचं म्हणजे निर्णय मी घेणार, मी ठरवणार असं ते असतं.
    जोवर सून आपली पायरी ओळखून असायची तोवर सासूची सत्ता ही मान्य केलेली अशी होती. आजकालच्या सूना अर्थातच हे मान्य करणार नाहीत. मग एकीचे निर्णय दुसरीने का मान्य करायचे? असं ते होतं.
    काही वेळा सासवांना छळणार्‍या सूनाही आहेत.
    दोघींमधे शत्रुत्व असण्याचे कारण सासूचा मुलगा आणि सूनेचा नवरा...... हा जो पुरूष असतो..... तो दोघींच्याही प्रेमाचा. त्याच्यावर हक्क दाखवण्याची स्पर्धा सुरू होते.
    आपल्या नवर्‍याला सासूने जन्म दिला आहे आणि वाढवून मोठे केले आहे हे सूनेने आणि आपल्या मुलाला सूनेचीच खरी सोबत असू शकणार आहे हे सासूने समजून घ्यायला हवे.
    हा मुलगा कम नवरा ... बायको आणि आई यांचं नातं सुधारावं म्हणून काहीही करायला जात नाही, बरेचदा त्याने न्याय द्यावा अशी दोघींची इच्छा असते. किंवा हा मनुष्यस्वभाव असेल की दोघींनांही त्याने तीच कशी महत्वाची आहे हे जाहीर करायला हवं असतं.
    आई आणि बायको त्याला वेगवेगळ्या प्रकारे समृद्ध करत असतात, हे त्याने समजून घेणं आणि समजून देणं गरजेचं असतं.

    आई-मुलीत काय मतभेद नसतात? कुठल्याही दोन माणसांचं पूर्णपणे पटेल कसं? पण ते असे पृष्ठभागावर येत नाहीत.

    कुठल्याही उतरंडीत व्यक्तीला आहे त्यापेक्षा वरचं स्थान हवं असतं.
    जावा जावांचंही तेच, सत्ता माझ्याकडे हवी, मान मला मिळायला हवा.
    नणंद भावजयीच्या नात्यातही तेच, मुलीने लग्न झालं म्हणून माहेर संपवूनच टाकावं, तिथे पाहुण्यासारखंच राहावं, हे मला पटतच नाही. तिची आतड्याची माणसे त्या घरात आहेत, तिचं बालपण तिथे गेलेलं आहे. भावाच्या घरात जाऊ देत पण आई-बाबांच्या घरात तिच्याकडे हक्क असावेत, जबाबदारी असावी आणि तिही दुसर्‍या घरात सून आहे, तिला माहेर असलंच पाहिजे.

    समाजाचं दडपण आहेच, मान्य करायला हवं.

    >>"फोडा आणि राज्य करा" ह्या तत्वाला अनुसरूनच पुरुषप्रधान समाज मुद्दाम स्त्रियांमध्ये वादाची बीजे पेरतो. कारण घरातल्या स्त्रिया एक झाल्या , तर त्यांच्यावर सत्ता गाजवणे घरच्याच काय.. कोणत्याच पुरुषाला शक्य नाही याची त्यांना स्पष्ट कल्पना आहे
    खरं आहे. :)
    पण घरातली प्रत्येक स्त्री ही वेगवेगळ्या पुरूषाशी वेगवेगळ्या प्रकारे बांधलेली असते.
    तिची बांधिलकी ठरवून दिलेली आहे.
    असा गट होणे शक्य नाही. तो होत नाही असाच अनुभव आहे. जर झाला तरी तो पुरूषांविरूद्ध उभा राहात नाही.

    >>म्हणूनच आपल्या आईत, वहिनीत, बहिणीत आणि बायकोत, चांगले संबंध निर्माण व्हावेत, चांगले संबंध असतील तर ते टिकावेत, त्यांच्या संवादात आणि नात्यात शक्य तितका मोकळेपणा यावा यासाठी प्रयत्न करणारा पुरुष मला नेहमी आदरास पात्र वाटत आला आहे. अश्या पुरुषांना स्वत:च्या सत्तेपेक्षा घरातला आनंद आणि शांती जास्त महत्वाची वाटते असे माझे मत आहे.
    अनुमोदन!

    बायकांमधे अशी परिस्थिती आहे म्हणून पुरूष अगदी सद्गुणाचे पुतळे असंही नाही.
    ’भाऊबंदकी’ हा भाषेत स्थिरावलेला शब्द आहे.
    भाऊ भाऊ, वडील - मुलगा, कोर्टात जाऊन लढल्याची किती उदाहरणे असतील.
    भावाभावात तेढ आ्ली म्हणून नीट खेळीमेळीत असणार्‍या जावांना एकमेकींशी अबोला धरावा लागतो.
    हेवेदावे आणि मत्सर यात पुरूष कुठेही कमी नाहीत.

    ही परिस्थिती बदलायची असेल तर आशा म्हणते तसं आपल्या आयुष्याच्या केंद्रस्थानी पुरूषाला ठेवणं बंद केलं पाहिजे.
    "माझ्या आयुष्याच्या केंद्रस्थानी मी आहे", हे पाहिलं पाहिजे.

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्यात आणि आपल्या घरातल्या दुसर्‍या बाईमध्ये होणार्‍या वादाला पुरुषप्रधान कुटुंबपद्धती कारणीभूत आहे हे लक्षात आले की निम्मे वाद कमी होतात. दोन्ही बायकांच्या हे वेळीच लक्षात आले तर त्या एक होऊन ह्या सिस्टीमचे दुष्परीणाम (उदा. घरातले पुरुष आळशी असणे, त्यांनी घरकामात काडीची मदत न करणे, घरातल्या बाईच्या कामांची जाणीवसुद्धा न ठेवणे) कमी करू शकतात.

      पुरुष मुद्दाम असं म्हणुन आपली जबाबदारी का झटकतात याचे उत्तर मी शेवटून दुसर्‍या परीच्छेदात लिहिले आहे.

      Delete
    2. हेवेदावे आणि मत्सर यात पुरूष कुठेही कमी नाहीत.

      >> आई-मुलगी, बहीण-बहीण या नात्यांमध्ये पुरुषप्रधान कुटुंबपद्धतीमुळे येणारी ही एक्स्ट्रॉची गुंतागुंत नसते. म्हणुन लेखात त्यांचा समावेष केलेला नाही. मुलगा-बाप, भाऊ-भाऊ यांच्यात ज्या कारणाने वाद/ भांडणे होऊ शकतात तेवढी पॉसिबिलिटी जनरली सगळ्याच नात्यांमध्ये असतेच.

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...