Friday, December 31, 2010

सासू - सून - मुलगा / नवरा

पूर्वी लग्ने होत ती दोन घरांना जोडण्यासाठी, मुलगी कशी आहे, यापेक्षा तिचे घर कसे आहे हेच पाहिले जात असे. दुसरे कारण घरात कामाला एक माणूस आणणे, त्यामुळे शारीरिकदृष्ट्या अव्यंग हवी, इतकी माफक अपेक्षा असे. दिसायला चांगली असली तर छानच, पण तो काही महत्वाचा निकष नसे.
 त्यामुळे घरात येणार्‍या सुनेची कर्तव्ये केवळ नवर्‍यापुरती मर्यादित नसत, तर घरांप्रती, म्हणजे सासू-सासरे-दीर-जावा-नणंदा अशा सगळ्यांसाठी असत. नवरा एकटा शहरात नोकरीसाठी असला तरी सासू-सासर्‍यांसाठी गा्वात राहणार्‍या कितीक सुना दिसून येत. सासू-सासर्‍यांचं करतोय, धाकट्या दिरांनणंदांचं करतोय म्हणजे म्हणजे परक्या कुणाचं करतोय अशी भावना नसे.
 शहरांमधे नवनव्या नोकर्‍या तयार होऊ लागल्या, कारखाने, उद्योगधंदे वाढले, खेड्यातल्या घरांच्या शाखा शहरात आल्या, तशी ही एकत्र कुटूंबपद्धती जाऊन त्याजागी विभक्त कुटूंबपद्धती आली. पण पूर्णत: विभक्त नव्हे, दिरांची, नातेवाईकांची मुले शिक्षणासाठी या विभक्त कुटूंबातून असत, भावना ही की सोय म्हणून हे शहरातले घर आहे पण मूळत: त्या घराचा हिस्साच आहे.
 हळूहळू पूर्णत: विभक्त कुटूंबे आली. आता तर मुलगा आणि वडील एकाच गावात वेगवेगळ्या घरात राहात असलेले आपण पाहतो.

या प्रत्येक कुटूंबपद्धतीचे आपापले फायदे-तोटे आहेत.

तर आता सुनांची कर्तव्ये बदलली आहेत. सून घरात मुलासाठी, त्याच्या पसंतीने, त्याला साजेलशी आणली जाते. सुनेची कर्तव्ये आता बहुतांशी बायको म्हणून, आई म्हणूनच आहेत. सुनेच्या डोक्यातही हे पक्के होत जात आहे, की नवरा, मुले तेव्हढी आपली. सासू सासर्‍यांचं करणं भाग आहे, इतरांचं मी केलं तर ते जास्तीचं तो काही माझ्या कर्तव्याचा भाग नाही.
 आपले नवरे आणि आपणही अशा विभक्त कुटूंबात वाढलो आहोत. अर्थातच नवर्‍याची आई नवर्‍यात खूप गुंतलेली आहे. त्याला वाढवण्यात तिचा बर्‍यापैकी सहभाग होता. आता तिच्या आपल्या मुलाकडून काही मागण्या असणे स्वाभाविक आहे.
इतक्या वर्षांनी मुलाच्या राज्यात तिला काही अधिकार मिळाले आहेत आणि ती वापरते आहे.
.......
जसजशी समाजरचना बदलत जाते, कुटूंबपद्धती बदलत जाते, तसतशी नाती बदलतात. आपल्या नवर्‍याकडून काय नि सासूकडून काय, ज्या अपेक्षा असतात त्या समाज ठरवत असतो, निरपेक्षपणे आपण काहीही ठरवत नाही....
हा प्रकाश डोक्यात पडला नां, की हताश व्हायला होतं.
.........
घरात आलेली सून तर मुलासाठीच आलेली आहे, ती आपल्या नवर्‍यावर म्हणजेच सासूच्या मुलावर प्रेम करत असते, दोघीही त्याच्यावर प्रेम करत असतात म्हणजे काय तर मालकीहक्क दाखवत असतात.
 हा नवरा/ मुलगा काय करत असतो? बहुतेकदा तो काहीही करत नाही, किंवा काहीच करत नाही.. प्रेम वगैरे .. मर्यादा असतात माणसांच्या ...पुरूष असण्याच्या... स्त्री असण्याच्या..
 ही सासू आहे नां! ती आयुष्यभर आपल्या नवर्‍याला, मुलांना धरून बसली आहे. समाजाने, तिच्यासाठी हेच काम नेमून दिलेलं होतं. तिने स्वत:ची वाढच करून घेतलेली नाही, (हे मी शिक्षणाच्या संदर्भात बोलत नसून नातेसंबंधांच्या संदर्भात म्हणत आहे.)
 उदा. मुलासाठी आटापीटा करून एखादा पदार्थ करणे....’ यातच माझ्या जीवनाचे सौख्य़ सामावले आहे’.... अगं बाई, हे असं नाही गं! माणसाची गरज केवळ खाणे एवढीच नसते.
 आपण मुलासाठी / नवर्‍यासाठी जे असं करतो ते मिरवण्याची गरज का भासते? कारण त्यावेगळं काही भरीव आयुष्यात नसतंच ना!
....
सगळ्या सासवांकडेच बोट दाखवण्यात अर्थ नाही. काही घरात सूनवास असतो
......

आपणतरी सासवांसारखे होणे टाळू या. कुठली गोष्ट किती मोठी करायची हे आपल्यावर अवलंबून असते. स्वयंपाकघरातले वाद टाळू या. ती फार महत्वाची बाब आहे असं आपण समजायचंच नाही.
 नातेसंबंधांचा विकास करू या. एकट्या नवर्‍यावर अवलंबून राहणे सोडून देऊ.
आई-मुलगा आणि नवरा-बायको या नात्यांमधे आईमुलाचे नाते खोलवर पोचणारे असू शकते पण नवरा-बायकोचे नाते हे अधिक मिती असणारे, सर्वांगांनी फुलू शकणारे असे आहे. ( आपण ते फुलवत नाही, हे सोडून द्या.) हे सासवांनी स्वीकारायला हवे.
....
वादामधे मुलग्याने/नवर्‍याने मधे पडावे अशी दोन्ही बाजूंची इच्छा असते. कुठल्याही असल्या घरगुती वादांमधे न्याय देणे ही फार अवघड गोष्ट असते. सामोपचाराने पुढे जात राहणं याला काही पर्याय नसतो. कटूता टाळावी.
मुलगे किंवा त्यांचे वडील या पुरूषांनी परीस्थिती सुधारावी म्हणून काहीच प्रयत्न केले नाहीत तर ती चिघळत जाते. बरेच वाद हे घटनेवर पुरूष काय प्रतिक्रिया देतात यावरून घडतात. (घरातले सत्ताधारी तेच असतात ना?)
 ....
घराचे मनस्वास्थ्य सांभाळणं हे माझ्यामते सगळ्यात महत्वाचं आहे. त्यासाठी काही गोष्टी सोडून देऊ, काही कानाआड करू, काहींसाठी ठाम राहू पण घर हसतं/ बोलतं/ प्रसन्न असायला हवं. आपल्या घरात छोटी मुलं आहेत, त्यांचं बालपण टिकवायला हवं.

Monday, November 29, 2010

कमावणं

नीरज, आनंद, धन्यवाद!

कमावणं म्हणजे नोकरीच आणि ती ही निरर्थकच असा विचार का करावा? आवडीच्या गोष्टींतून अर्थार्जन का करू नये?
मान्य! (सगळ्यांना ते शक्य नसते तरी मान्य!)
मी जी नोकरी करत होते ती तशी निरर्थकच होती, कुणी सांगावं मी ती करत राहिलेही असते. मी त्यासंदर्भात लिहिले आहे.

 "कामाची विभागणी" हे तत्व महत्वाचं आहे.
मान्य़!
घरात येणार्‍या कमाईवर सगळ्यांचा हक्क आहे असे मानूया. मग काय करशील? समज प्रत्येकाच्या नावे त्याच्या/ तिच्या खात्यात ठरलेली रक्कम जमा केली, त्या पैशांवर त्या व्यक्तीचा हक्क, बरोबर आहे? म्हणजे ते पैसे ती व्यक्ती हवे तसे खर्च करू शकेल. (हे ही शक्य नसतं)
 मग तर माझी समस्या सुटलीच नां! मी सध्या जे काम करते त्याचेच पैसे मला मिळायला लागले तर आर्थिक परावलंबन नाही (रूखरूख नाही)
तू ज्या वाटेने विचार करतो आहेस त्यासाठी मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. पण हा एक सापळा आहे, नीरज. घर सांभाळून मला पैसे मिळायला लागले तर मी घराबाहेर कशासाठी पडायचं?
 घरकामाला वेतन अशी चळवळ युरोपात झाली होती. काही देशांमधे तसे कायदेही झाले (कदाचित स्वित्झर्लंड किंवा स्वीडन) काही नवरे नियमितपणे घरकामाचा पगार आपल्या बायकांना देत असत. या आकृतिबंधामुळे असं झालं की त्या बायकांचं घरकाम पक्कं झालं, त्या घराशी बांधल्या गेल्या. जर त्या घरकामाचा पगार घेत आहेत तर घरकामात नवर्‍याच्या मदतीची अपेक्षाच नको. घरकाम हे तेच ते, कंटाळवाणे, कौशल्याची नाही तर वेळेची मागणी करणारे आहे. (मुलांकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे लागते अशी कितीशी वर्षे असतात?) एकदा संसार मांडला आहे म्हणजे कुणालातरी घरकाम करावे लागणारच आहे, म्हणजे मदतनीसांचे साह्य घेऊन का असेना, त्यात अडकून राहावेच लागते. मग कौशल्याची, कस लागेल अशी, त्यांची वाढ होईल अशी, कामे त्यांच्या वाट्याला येतच नाहीत. व्यक्ती म्हणून त्यांचा विकास थांबवला जातो.
 घरातल्या जास्तीत जास्त कामांसाठी बाईला मदत मिळायला हवी. छोट्या विभक्त कुटूंबांमुळे स्त्रीचा श्वास मोकळा झाला आहे पण तिच्यावरच्या घरातल्या जबाबदार्‍या वाढल्या आहेत, तात्पुरती तिची जबाबदारी उचलू शकेल असं कुणी नाही. ’घर मी चालवते/ माझ्यामुळे चालते’ च्या मुखवट्यामुळे कुठल्या कुठल्या प्रगतीच्या वाटा बंद कराव्या लागतात याची बाईला जाणीव नाही. पर्यायी व्यवस्था काय असावी? कुटूंबव्यवस्था कशी असावी? कम्यून असावीत का ? निकड निर्माण झाली की समाज उत्तरे शोधेलच.(बहुदा)
 आता तर स्त्रियांवर इतका दबाव आहे (९० च्या उदारीकरणानंतर झालेले बदल....... यावर कधीतरी लिहिन.), तिने शिकलेलं असायला हवं, कुठल्यातरी कलेत पारंगत असायला हवं, चांगलं दिसायला हवं, घर व्यवस्थित ठेवायला हवं, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवं, नोकरी करायला हवी, घराबाहेरची कामे यायला हवीत....... ही यादी वाढती आहे.


Wednesday, November 24, 2010

कमावतं असणं आणि नसणं

तुम्ही जर एकत्र कुटुंबात रहात असाल अथवा पुरुष प्रधान घरात असाल तर तुम्ही कमावतं असणं आणि नसणं यावर तुमचं घरातलं स्थान निश्चितच अवलंबून असते असं मला नक्की वाटतं. काही एका रकमेच्या पुढील खर्च त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्तीने घ्यायचा व त्यानंतर तो प्रस्ताव पटला तर तो मान्य करायचा यात त्या स्त्रीची स्वत:ची गरज, आवडनिवड,तिला काय वाटते हे मतच धरले जात नाही. आणि याचा आपण कमावते नाहीत याची एक बोचणी मनाला लागून रहाते. पिढ्यानपिढ्या हे असेच चालू राहील्याने या प्रवाहाविरुद्ध वागण्याला कोणीच पुढं येत नाही. आणि मग यात जी कमावती नसते तीची मात्र फरफट होत रहाते.आणि अगदी फालतू गोष्टींसाठी सतत कुटुंबातील कोणा न कोणा तरी व्यक्तीपुढे पैशांसाठी हात पसरावा लागतो.तर मोठे खर्च तर लांबच. यासगळ्यातून आपण आपल्याच माणसांचा आपल्यावर विश्वास नाही ही भावना सतत मनामध्ये घेऊन एक प्रकारची लाचारी आपल्या पदरात येते.मी कमावत नाही म्हणजे मी माझ्या कुटुंबासाठी काही एक स्वत:च्या चार गोष्टींचा त्याग करून घर संभाळते आहे. हे समोरच्याला सांगण्याचीही तिला गरज वाटत नाही. कारण समोरचा त्याच्या प्रत्येक कृतीतून तिला हे सतत दर्शवत असतो की तू काय जगावेगळं करतेस? आपल्या घरासाठीच करते. आणि हे केलेच पाहीजे.अशी त्या घरातील प्रत्येकाच्या वागणुकीतून तिला हे दिसत असते. आणि सतत ती आपल्या सेवेला आहे असे गृहीतच धरले जाते.का विश्वासाने एखादी ठराविक रक्कम तिच्या हाती सोपवली जात नाही. आणि ज्या अर्थी असे होत नाही त्या अर्थी तिने असे सतत तुमच्या पुढे पैशासाठी हात पसरलेले तुम्हाला चालतात. आणि कुठतरी आपण तिच्यापेक्षा श्रेष्ठ,कर्तृत्ववान अशी अहंकारी भावना त्या पुरुषाच्या मनात असते हे नक्की.आणि अश्यामुळेच एकाच घरातील कमावती आणि न कमावती अश्या दोन स्त्रीयांच्यात त्या घरातील इतरांचे वागणे हे वेगवेगळे असते. आणि घरातील माणसे जर असा भेदभाव करणारी असतील तर समाजातील इतरांचे काय म्हणावे.

Sunday, November 21, 2010

कमावतं असणं / नसणं

तुमचे स्थान हे तुम्ही कमावतं असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे असे तुम्हाला वाटते का?
कमावतं असण्या-नसण्यावर आपलं घरातलं स्थान अवलंबून नसतं.आणि ते तसं असूही नये.
MSc ला होते, तेव्हा मला कमावतं होण्याची घाईच झालेली होती. रिझल्ट लागण्याआधीच नोकरी मिळाली आणि माझ्या माझ्या आर्थिक जबाबदार्‍या मी उचलू लागले. लग्न ठरलं तेव्हा मी लग्नाच्या बाबतीत फ़ारसा काही वेगळा विचार केला नाही - म्हणजे कोर्टमॅरेज वगैरे. पण आपल्या लग्नातल्या खर्चाचा थोडातरी वाटा आपल्याला उचलता यायलाच हवा हे मात्र माझ्या डोक्यात पक्कं होतं. लग्नानंतर काही काळ आणि वेदात्मनच्या जन्मानंतर काही काळ मी कमावती नव्हते. खरंतर घरातलें सगळे आर्थिक व्यवहार मीच बघत होते. घरातले आर्थिक किंवा इतरही निर्णय आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय घेत नव्हतो. माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ होता. मोकळा वेळ कसा घालवायचा याचीही मला कधी चिंता पडली नाही. रोजच्या जबाबदार्‍या सांभाळून माझे कधी आवडीचे, कधी आवश्यक, कधी अनावश्यकही उद्योग चालूच असत. घरी असल्यामुळे बरेचदा आपण गृहीत धरले जात आहोत हे जाणवत असे, पण त्याबद्दल फ़ारसं काही वाटून घेतलं नाही. थोडंफ़ार हे होणार हे मीही गृहित धरलेलंच होतं. पण तरीही आपण कमावत नाही म्हणून मी अस्वस्थच असे. जगदीशचा कधीच आग्रह नव्हता मी कमावतं असावं असा. किंवा तो कधी घरातल्या खर्चांबद्दल मला विचारतही नसे/ नाही. पण आपण कमावत नाही म्हणून अस्वस्थ रहाणं हा माझ्याच स्वभावाचा भाग होता. आर्थिक बाजूचाही शक्य तेवढा वाटा तरी आपल्याला उचलायलाच हवा आणि ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्यात आपण काहीतरी करत रहायला हवं या उद्देशाने मी पुन्हा घर, मुलं आणि नोकरी या सगळ्या डगरींवर हात ठेवता येईल असं काम पाहिलं. यासाठी घरी बसून कमावतं रहाण्याचेही पर्याय होतेच. पण नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर आपलं म्हणून एक वेगळं वर्तुळ तयार होतं, घरापासून थोडा काळ दूर रहाणं चांगलंच असतं - अशा सगळ्या कारणांमुळे मी कमावतं असणं आणि त्यासाठी काही काळ घराबाहेर असणंच स्वीकारलं. त्यामुळे माझ्या बाबतीत तरी कमावतं असण्याचा आणि घरातल्या स्थानाचा काही संबंध नाही.

कमावतं असण्याचे फ़ायदे-तोटे :
याबद्दल विद्याने लिहिलं आहेच.
कमावतं असताना मिळणारं कामाचं appreciation ही आणखी एक जमेची बाजू. घरी असताना ते जवळजवळ नसतंच.
मागे विद्याने लिहिलं होतं तसं, मी कमावत नव्हते त्या काळात मला स्वतःसाठी काही खर्च करताना प्रशस्त वाटत नसे. अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक अशा चाळण्या लावून मी स्वतःसाठी वस्तू खरेदी करत असे. आताही त्या चाळण्या असतातच, पण चाळणीची छिद्रं जरा मोठी. यालाही बाकी कारण काहीच नाही. स्वभावातल्या गाठी एवढंच.
आपण घर सांभाळत असतो तेव्हा सगळ्यांकडूनच गृहित मात्र धरले जातो. असं होणं हे थोडंफ़ार स्वाभाविक आहे असं म्हणलं तरी त्रास होतोच.

बाहेरील व्यक्ती तुमच्या कमावतं असण्या/नसण्याकडे कसं बघतात? त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम :
बाहेरील व्यक्तींच्या प्रतिक्रिया सगळ्याच प्रकारच्या असतात. म्हणजे घरी असताना - बरं झालं घरी आहेस ते- मुलांना वेळ देता येतो. (किंवा अगदी टोक म्हणजे, बाई घरी असली की घराला घरपण असतं!) किंवा बायकांचं हे असंच - मुलं झाली की करियर वगैरे गुंडाळूनच ठेवावं लागतं. आणि बाहेर पडल्यावर - बरं झालं पुन्हा नोकरी धरलीस ते. मुलंही लवकर सुटी होतात. वगैरे वगैरे.
मला वाटतं, बघेनात का कसेही. आपली उद्दिष्टं स्पष्ट असली आणि आपण त्यांच्याशी प्रामाणिक असलो की पुरे आहे.
पण नेहमीच बाहेरच्यांना इतकं सहजपणे कानाआड नाही करता येत. कधीतरी कुणीतरी जिव्हारी लागणारं काही बोलून जातं. मग ते बोल मागे टाकण्यासाठी स्वतःशीच झगडणं- स्वतःला समजावणं आणि त्याची बोच कमी करत रहाणं.

Friday, October 15, 2010

कमावतं / न कमावतं असणं

तुमचे  स्थान हे तुम्ही कमावतं असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे असे तुम्हाला वाटते का?

दीपा, घरातले स्थान हे कमावतं असण्या नसण्यावर अवलंबून असते, समाजातले स्थान अवलंबून असते.

घरातले स्थान म्हणजे तुला काय अपेक्षित आहे?
घरात एक अधिकारांची आणि जबाबदार्‍यांची उतरंड असते, सगळ्यात वरचे स्थान घरातल्या कर्त्या पुरूषाचे असते, त्याखालोखाल त्याच्या बायकोचे मग मुले.... निर्णय घेण्याचे काम हा पुरूष करत असतो. आर्थिक बाबतीतले, मुलांच्या बाबतीतले ( किती हवी.), तू लिहीलेस तसे घर, गाडी याबाबतीतले...... आपण ज्या स्तरात आहोत, त्या स्तरात हे सगळे निर्णय पुरूष एकतर्फी घेत असतील असं मला वाटत नाही. शेवटचा शब्द पुरूषाचा असेल पण दोघांच्या विचारानेच ठरत असणार.
  आमच्या घरात हे निर्णय कुणी एकतर्फी घेतले नाहीत. सर्वत्र मधील घर घेतले तेंव्हा मी ओरंगाबादला होते आणि मी ते पाहिलेलेही नव्हते पण मिलिन्द माझ्याशी फोनवर बोलला होता, असेही ते घर तात्पुरते आहे, हे आम्हांला माहित होते, आम्ही चर्चा वगैरे काही केली नाही. सध्याचे घर घेताना मात्र माझ्याच खूप अटी होत्या आणि मीच घरे बघत होते. आम्ही दोघांनी बसून बजेट किती आणि घर केव्हढे, कुठल्या परीसरात असं नक्की केलेलं होतं. मिलिन्दच्या फारशा अटी नसल्यामुळे त्याला दहा घरांमधलं एक पसंत पडलं असतं, मी शंभरेक घरे पाहिली असतील, त्यातील निवडक मिलिन्दने पाहिली (मी मागे लागले म्हणून) जाहिराती पाहणे, एजंटांना फोन करणे, प्रत्यक्षात घर पाहणे, बोलणी करणे हे सारं मीच करत असे, अर्थात रोजचं रोज मिलिन्दला सांगत असे. पुढेही अंतर्गत संरचनेच्या कामात मी बुडालेली होते, तेव्हा तर दोन-तीन महिने मिलिन्द सिडनीला होता, चार-सहा महिन्यांच्या सुहृदला घेऊन मी हे काम पाहात होते. सर्वत्रचं घर विकतानाही मिलिन्द येईल त्या किमतीला शेजार्‍यांना घर द्यायला तयार होता, मला घर घेताना एकूणच या व्यवहारांची माहीती झाल्यामुळे मी त्याला थांबवले नंतर जरा बर्‍या किमतीला आम्ही ते विकले. या सगळ्या कामांच्या वेळी मी कमावत नाही म्हणून तसा काही फरक पडला नाही, मलाच मी कमावत असते तर ओढाताण कमी झाली असती, संसार दोघांचा असताना एकट्यानेच त्याने का सगळे करायचे, या विचारांचा त्रास झाला.
  गाडीचे म्हणशील तर मला त्यातले काही कळत नाही, गाडी कितीशी वापरली जाते? सोय म्हणून छोटी असली तरी चालणार आहे इतकंच मला कळतं. पण म्हणून मिलिन्द मला त्यातलं सांगत नाही असं होत नाही.
  याशिवाय गुंतवणूक वगैरे यातलं काही मला कळत नाही. माझी वहिनी हे सगळं पाहते, बर्‍यापैकी कमावतेदेखील, मला खरोखरच हे जमण्यातलं आहे असं आतून वाटत नाही. शेअर्स वगैरे तर जाऊदे पण बॅंकेच्या व्यवहारातलं देखील मला काही कळत नाही, ATM सुरू झाले , माझी फारच सोय झाली. मी मिलिन्द सांगेल तिथे नुसत्या सह्या करत असते, हे काही बरोबर नाही, हे व्यवहार समजून घ्यायला हवेत, ते मी करत नाही. मी कमावत असते तरी मी हे केले नसते, सध्या मिलिन्द कमावतो मग तो बघेल त्याच्या पैशांचे काय करायचे ते!, असे मनाच्या कोपर्‍यात असते हे खरेच आहे, मी जर सगळे आर्थिक व्यवहार सांभाळायचे असे ठरवले तर मिलिन्द आनंदाने ते माझ्याकडे देईल, तसे तो म्हणतोही, मलाच हे नको आहे.मला ते जमणारे नाही.
-------
२) तुम्ही कमवते असण्या/नसण्याचे फायदे तोटे...............
कमावते नसण्याचे फायदे---- कमावण्यासाठी बरेचदा नावडीचे काम करत वेळ घालवावा लागतो, ते मला करावं लागत नाही.
                       अर्थातच आवडीचे अनेक उद्योग करायला वेळ मिळतो.
                        मुलांजवळ राहायला मिळतं, त्यांच्याकडून शिकायला मिळतं. मुलांबरोबर मजा येते.
                        नोकरीतले ताण नाहीत.
कमावते नसण्याचे तोटे----- आर्थिक परावलंबन,
  ------                        
  बाहेरील व्यक्ती तुमच्याकडे कोणत्या दृष्टीने बघतात. याचा तुमच्यावर होणारा परीणाम........
  
 लोकांचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन कौतुक + कीव  असा असतो. एवढी शिकली, चांगली नोकरी करत होती आणि मुलांसाठी घरी बसली, वा!  किंवा कसं ना बायकांना कितीही शिकल्या तरी घर/ मुलं काही सुटत नाहीत वगैरे.
 मुलांसाठी नोकरी सोडली हे काही पूर्णपणे खरं नाही. माझी नोकरी जनरेशन मधे होती, पुण्यात बदली होणे शक्य नव्हते, आम्हांला दोन घरे करायची नव्हती. मी नाशिकला आणि मिलिन्दनेही नोकरी बदलून नाशिकला यायचे असा एक  पर्याय उपलब्ध होता पण दोघांनांही पुणे सोडायचे नव्हते, मला नोकरी सोडण्याशिवाय पर्याय नव्हता, पुण्यात बदली झाली असती तर मुलांना पाळणाघरात ठेवत कदाचित मी करत राहिलेही असते. मुले शाळेत जाईतो मुलांकडे कोणीतरी पूर्णवेळ लक्ष दिले पाहिजे असेही आमचे नक्की होते, माझे नोकरी सोडणे ही केवळ तात्पुरती व्यवस्था होती, ती लांबत गेली आता तर मी काही उद्योग (कमावण्याचा) करीन की नाही कोण जाणे. आमच्या संसाराला माझ्या कमावण्याची काही गरजच नाही. :(
  मी जर पुरूष असते तर घरी बसण्याचा मी त्रास करून घेतला नसता. (अवचटांसारखा), पण बाई असल्यामुळे लोक मला गृहित धरतात, मिलिन्द घरी राहिला असता तर ती त्याची निवड ठरली असती.
 लोकांच्या अशा पाहण्याचा मला कधीकधी त्रास होतो मग मी वस्तुस्थिती काय आहे, हे सांगण्याचा प्रयत्न करते, लोकांना ते ऎकून घ्यायचं नसतं, त्यांची मते पक्की असतात. हल्ली मी ते ही करत नाही, कधीकधी त्यांच्या म्हणण्यात तथ्य असतं.
 माझ्या घरी बसण्याने ”घर/मुले हीच बाईची प्राथमिक आणि नैसर्गीक जबाबदारी आहे” हे अधोरेखित होतं, चुकीचे संदेश नातेवाईकांमधे/ आजूबाजूच्यांकडे जातात. .............. याचं मला वाईट वाटतं.
---------

आपण निदान स्वत:पुरते पैसे कमावलेच पाहिजेत. तेवढं घरकाम मी करत असेनच. माझा आर्थिक भार मी नक्कीच मिलिन्दवर टाकत नाही. शिवाय मुलांसाठी वेळ देते, नातेवाईकांसाठी वेळ देते. घर भावनीकदृष्ट्या बांधते, आमच्या घरात, घरातल्यांनाच नाही तर येणारांना मोकळेपणा आणि आपुलकी जाणवावी याची काळजी घेते. नातेवाईकांशी, आप्तांशी (परराष्ट्रधोरण) समाधानकारक पातळीवर संबंध ठेवते. त्यांच्या अडी-अडचणींसाठी उपलब्ध असते. समाजाच्या एका कुटूंबाकडून ज्या ज्या मागण्या असतात त्या पुर्‍या करते. अर्थात हे सगळंच मी एकटी करते असं नाही, मिलिन्दही असतोच, (माझ्या उत्साहाला आवर घालण्याचं महत्त्वाचं काम त्याच्याकडेच आहे.) घर जे बांधत आणलं आहे ते दोघांनी मिळूनच, पण मी माझा वेळ त्यासाठी दिला आहे. ( या मुद्द्यावर मिलिन्दला कधीकधी मी emotionally blackmail  करते.)
 कमावणं तर महत्वाचं आहेच पण त्याहीपेक्षा आपल्यावरचं समाजऋण फेडायचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे. आपण जे उभे असतो ते आधीच्या पिढ्यांच्या खांद्यावरच ना? लेखनकलेचा शोध लावणार्‍यांची मी ऋ्णी आहे, (नाहीतर मी काय केलं असतं?), वेगवेगळ्या कलांमधे जे काम करून ठेवलंय त्यांचं माझ्यावर ऋण आहे, वेदनाशामक औषधांचा आणि विशेषत: गर्भनिरोधनाच्या साधनांचा शोध लावणार्‍यांची मी ऋणी आहे, स्त्रियांना प्रतिष्ठा मिळावी म्हणून ज्यांनी ज्यांनी काम केलं त्यांची मी ऋणी आहे. हे ऋण थोडंफार फेडण्याचा प्रयत्न मी/ प्रत्येकानेच केला पाहिजे.

_____

दीपा, माझ्ं घरातल्ं स्थान माझ्या कमावतं असण्या नसण्यावर अवलंबून नाही.
पण माझ्या मनातलं माझं स्थान विचारशील तर आहे.
कधी कधी मी वैतागते, माझी चिड्चिड होते, मला सगळ्यांचा कंटाळा येतो, मी विचार करते नोकरीत तरी काय? मी निर्रथक कामे करीत राहिलेच असते ना? केवळ महिन्याला पैसे मिळत राहिले असते.
 त्यापेक्षा गेल्या काही वर्षांमधे किती आवडीच्या गोष्टी मला करून पाहता आल्या, शिकता आल्या , शिकत राहण्याइतकं आनंदाचं दुसरं काही नाही, नोकरीत हा आनंद मी गमावलाच असता.
 हे सगळं मी करू शकतेय ते मिलिन्द पुरेसं कमावतोय म्हणून....
पण तो नसता नां पुरेसा कमावत तरी मला आवडलंच असतं.

--------

एक महत्त्वाचं राहिलंच. कुठलेही घर हे आर्थिकदृष्ट्या एकखांबी तंबू असू नये. त्यासाठी दोघांनीही कमावणे गरजेचे आहे. असंही जोवर दोघंही कमावत नाहीत/ बरोबरीने कमावत नाहीत तोपर्यन्त घरात पूर्णपणे समानता शक्य नसते.

---------

Thursday, September 30, 2010

व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने, पुन्हा एकदा----

इंटरनेटच्या आभासी जगातून वास्तव जगाशी जुळवून न घेता येणं हा याचा विषय आहे असं म्हणता येईल. जे खरोखरच चॅटींग करतात त्यांच्यासाठी हा जिव्हाळ्याचा असेलही. आता संपर्काची माध्यमे इतकी सहज हाताशी आहेत. मोबाईल, sms, मेल, चॅटींग तरी खरेच संवाद होतो का? की ही माध्यमे प्रत्यक्ष संवादाची गरज संपवतात? अशी मानसीकता असेल तर ’एकमेकांजवळ न बोलता नुसतं असणं’ हे कसं अनुभवता येणार?
चाळीशीच्या आसपास असलेल्या या अविवाहितांना लग्नही करायचे आहे. आपल्या लग्नव्यवस्थेत ज्या अनेक त्रुटी आहेत त्यातल्या, लैंगिक अनुरूपता आणि रोजच्या जगण्यातली, सवयींमधली अनुरूपता पाहिली जात नाही, या दोन त्रुटी हे नाटक समोर आणते.
 भक्ती आणि माधव यांनी घातलेले व्हाईट लिली आणि नाईट रायडरचे मुखवटे हे खरोखरच मुखवटे आहेत का? का ती त्यांना हवीशी अशी स्वत:ची रूपं आहेत?
 या नाटकाचा जीव फारसा नाही, कदाचित सुदर्शन वरचे हे नाटक नाट्यगृहात आणायचे ठरवल्यावर वाढवले असेल, ते दिसूनही येते.  ही दोघं लिव्ह इन रिलेशनशिपचा पर्याय का स्वीकारत नाहीत ते मला कळले नाही. लग्न म्हणजे काय? कशासाठी करायचं? याबद्दल दोघांनीही काही विचार केला आहे असे दिसले नाही. दोघांमधे शारीरिक आकर्षणही नाही, जे काही काळ दोघांना एकत्र ठेवू शकले असते, आणि प्रेम? प्रेमामुळे तुम्ही जोडीदाराच्या डोळ्यांनीही जग पाहायला शिकता,  तेही नाही. लग्न केलंच पाहिजे असंही खरं म्हणजे काही नाही. त्या पर्यायाचाही विचार नाही.
 लग्नासाठी जोडीदार शोधताना काय बघायचं याचा विचार नाही. नाटकातलं वास्तव स्वीकारलं तरी, नाटक तर्कसुसंगत मार्गाने पुढे जात नाही. तुम्ही लग्नाआधी लैंगिक अनुरूपता आहे की नाही हे पाहण्याचा जर पर्याय स्वीकारता/ तेवढे पुढारलेले आहात  तर ’लग्न ही आयुष्यभर टिकवलीच पाहिजे अशी गोष्ट आहे” हे कसं धरून ठेवता?
 चॅटींगचीच सवय असल्यामुळे एकमेकांजवळ येतानाचं अवघडलेपण ही कल्पनेतली गोष्ट वाटते आणि असलंच तर ते तात्पुरतं असणार आहे त्यात अधोरेखित करण्याजोगं काय आहे?
 राहता राहिली रोजच्या जगण्यातली/ सवयींमधली अनुरूपता. ती इतकी महत्वाची गोष्ट आहे? गेल्या लेखात मी लिहिलं होतं तसं हे आहे. भांडणाची ही वरवरची कारणं आहेत, खरा सल वेगळाच असतो. वैफल्य आहे, निराशा आहे, अपेक्षाभंग आहे ती वाफ अशी कुठूनतरी बाहेर पडते. पंखा हवा की नको यावर उपाय शोधता येतो पण जोडीदारच नकोसा झाला तर त्यावर काही उपाय नाही. (असतील पण सोपे नाहीत.)
 लग्न म्हणजे तडजोड करावीच लागते. कुणीही लैला-मजनू जरी संसारात पडले की भांडणे होणारच आहेत, भांडण हा शब्द खुपत असेल तर आपण मतभेद म्हणू या. जर कोणी आमची भांडणे होतच नाहीत असा दावा करत असेल तर एकतर ते खोटं बोलताहेत किंवा त्या दोघांमधलं नातं समानतेचं नाही गुरू- शिष्याचं आहे असं मी म्हणेन. आदर्श लग्न हे एक मिथक आहे. आदर्श जोडीदार खास तुमच्यासाठीच बनवला गेलेला कुठेही नाही हे एकदा लक्षात घ्या. मानवी पद्धतीने लग्नाकडे पाहा मग आहे हाच जोडीदार किती चांगला आहे हे शोधता येईल. तोही आणि आपणही साधी माणसं आहोत हे मान्य केल्यावर त्यालाही आणि स्वत:लाही चुकण्याची संधी देता येईल.
 स्त्रीवादाच्या दृष्टीकोनातून या नाटकाकडे पाहिलं तर, हे नाटक पुरूष हा स्त्रिला अनुरूप असावा,( असेल तो तिने स्विकारावा ऎवजी) हे मांडतं आणि स्त्रिच्या लैंगिक इच्छांचा उच्चार करतं पण त्यापलीकडे माधव आणि भक्ती ही दोघंही पारंपारिक पुरुष आणि स्त्री या साच्यातलेच आहेत.
 हे नाटक पाहावं - हसावं - विसरून जावं या प्रकारातलंच  होतं. तरी पाहायलाच हवं असंही होतं.

********

 आपल्या सवयी जुळतात की नाही हे ती दोघं तपासत असतानाच्या गमती भारी होत्या पण मला त्यात कुठेही आमचे प्रतिबिंब दिसले नाही. जिथे कुठे जावं तिथून आपलं फारच जुळतं असेच निष्कर्ष काढून घरी यावं लागत आहे. आम्ही लग्न करायचं ठरवलं तेव्हा मिलिन्दचा एक मित्र म्हणाला होता, ’ तुम्ही दोघेही आळशी, अव्यवस्थित, दोघेही पुस्तक घेऊन बसाल, तुमचं घर चालायचं कसं?’  याची आठवण झाली. फार जुळणं ही सुद्धा काही फार चांगली गोष्ट नाही :)
 एकमेकांच्या काही सवयींचा खरेच त्रास होतो. म्हणजे मला व्हायचा /होतो. ( मिलिन्दला अर्थातच होत नाही, बोलून दाखवण्याइतका होत नाही. ) पण त्या गोष्टी सोडून द्यायच्या ना! मी ’संत’ नसल्यामुळे स्वत:ला वैतागायची सवलत देते, मनावर घेत नाही.
 बालमानसशास्त्राप्रमाणे, मुलाशी बोलताना त्याला, तुझं हे वागणं/ ही कृती मला आवडली नाही पण तू मला आवडतोसच असं सांगायचं असतं ना! असंच नवर्‍यालाही सांगता आलं पाहिजे :)

**********
        

Wednesday, September 15, 2010

भांडण - १

मिलिन्दच्या कंपनीच्या डायरेक्टरने दिलेली पार्टी होती. त्यासाठी आम्ही गेलो होतो. कशावरून तरी आमचं भांडण झालेलं होतं. त्यामुळे कार्यक्रमाच्या इथे मी उसनं हसू आणून (सहजपणे) वावरत होते. नुकतंच आमचं लग्न झालेलं होतं, मिलिन्दच्या सहकार्‍यांना आणि सहकारीणींना त्याची बायको पाहायची उत्सुकता होती. मिलिन्दच्या बॉसच्या बॉसच्या बॉसलाही मला भेटायचं होतं. माझा हात अगदी हातात धरून ते मला म्हणाले,” तू किती लकी आहेस, तुला माहित आहे का? तुझा नवरा किती चांगला आहे......” मी पुन्हा हसले. हो + खरं की काय? असं. आता त्याच्या कौतुकाचं मला अजीर्ण होत आलेलं. कार्यक्रमानंतर आम्ही बाहेर पडलो आणि मी पुन्हा भांडणाचं चॅनेल लावलं. लकी?? ह्याला कधी कोणी म्हणत नाही लकी! मीच कायम लकी? मी म्हणाले, ” तू कितीही चांगला असलास तरी नवरा म्हणून कसा आहेस हे जगात मी एकटीच सांगू शकते, ते इतरांनी ठरवायचं कारण नाही.” मिलिन्द म्हणाला,” तू सोडून दे. ते त्यांचं मत आहे.” ..... भांडणातली महत्वाची गोष्ट आहे सोडून देणे. ही शिकायला मी खूप वेळ घेतला.
 वाद घालायला, भांडायला मला आवडतं. पण समोरचा नीट तर्कसुसंगत बाजू मांडत असेल तरच! नाहीतर लोक इतक्या उड्या मारतात इकडून तिकडे, स्वत:च्या बाजूच्या विरोधातले मुद्दे मांडतात आणि तसे ते आहेत हे ही त्यांच्या गावी नसतं. पूर्वी मी वैतागायचे, त्यांच्या बोलण्याचा काय अर्थ होतो, हे सांगू पाहायचे. आता सोडून देते.
 भांडणातली दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ’भांडण म्हणजे गणित नाही, जे सोडवता येईलच आणि त्याचं काहीतरी उत्तर असेलच असं नाही.’ तरीही भांडायची एक तर्कशुद्ध रीत आहे.
 माझी एक मैत्रिण आधी पुण्यात होती, नंतर मुंबईला गेली. तिचे अधून मधून फोन येतात. एकदा नवर्‍याशी भांडण झालं, पुन्हा मूळ पदावर येण्याऎवजी बिनसतच चाललं. आधी आणखी एक सांगते, तिचं लग्न झालं आणि सुरूवातीच्या दिवसांतच ती सासरच्या, नवर्‍याच्या काही साध्या तक्रारी माहेरी आई-बाबांना सांगायला लागली तेव्हा ते म्हणाले,’ तुझं लग्न करून दिलं, आमचा संबंध संपला, आता हे आम्हांला सांगायचं नाही, तुझं तू बघायचं’ .... ती अस्वस्थ होती. मी सगळं फोनवरून ऎकत होते. तेव्हा मी नुकतंच समाजशास्त्रावरचं एक पुस्तक वाचलेलं होतं. त्या पद्धतीने बोलून पाहा असं मी सुचवलं. १) दोघेही रागात/ चिडलेले असताना काही बोलायचं नाही. आधी एक वेळ ठरवून घ्या आणि शांतपणे त्या वेळी या विषयावर बोला. २) फक्त याच विषयावर बोला, जुन्या घटना उकरून काढू नका, या निमित्ताने जुने हिशोब चुकते करणे, असे करू नका. ३) विरोधासाठी विरोध नको, समोरच्याचे योग्य म्हणणे, आपल्या चुका, मान्य करा. ४) समोरच्याचे म्हणणे पूर्ण्पणे ऎकून घ्या. आणखीही दोन-चार मुद्दे असतील, मी हे स्मरणातून लिहिले आहेत...... खरोखरच त्यांचं भांडण मिटलं. जणू काही जादू करून हे मुद्दे मी तिला काढून दिले! मी तिला म्हणाले, ”हे पुस्तकातलं आहे, तुझ्या निमित्ताने ते काम करतं हे सिद्ध झालं.” मागे दीपाने साठ्यांचं एक मेल फॉरवर्ड केलेलं, त्यातही असंच काहीसं होतं. अशा पद्धती पुस्तकांमधून कुठे कुठे असतातच, आपण त्या वापरतो का हा प्रश्न आहे.
 ही रीत जर दोन्ही बाजूंना भांडण मिटवायचं असेल तर उपयोगी पडते.
बरेचदा भांडणाची कारणं वरकरणी दिसतात ती नसतातच. सल कुठे आहे हे आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे. नाहीतर भांडणे दिशाहीन होत जातात. अबोला हे काही कुठल्या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. भांडण ही तर नात्यातल्या जिवंतपणाची खूण आहे.

********

आम्ही जेव्हा लष्कराच्या भाकरी भाजत असतो, म्हणजे घराबाहेरच्या मुद्द्यांवर मतभेद (कसला भारी शब्द आलाय ना? वरती सुचलाच नाही!) असतात तेव्हा व्यवस्थित वाद घालतो/ भांडतो. घरगुती प्रश्नांवरची आमची भांडणे एकतर्फी असतात. मिलिन्दला काही प्रश्नच नसतात आणि मला तर प्रश्नच पडत राहतात. थोड्या वेळाने मी भिंतीशीच भांडतेय असा ऎकणार्‍याचा समज होईल. पण संतपुरूषांची (आदरार्थी बहुवचन) एक तर समाधी लागते, असाही त्यांना काही फरक पडत नाही. ते कधीही रागावत नाहीत/ चिडत नाहीत/ त्यांचा स्वरसुद्धा चढा लागत नाही. भांडून झाल्यावर (एकतर्फी) मलाच काय आपण संतमहात्म्याशी भांडतो असं होऊन जातं....... तर सांगायचा मुद्दा हा की भांडणावरचा रामबाण उपाय म्हणजे शांत बसा. आमच्या घरी हे सिद्ध झालेलं आहे.

******

Monday, August 30, 2010

काळजी

आमच्या घरी बाबांनी माझी कधी काळजी केली नाही. आई करत असे, पण बाबा करत नसत त्यामुळे घराला तसं वळण नव्हतं. यावेळेच्या आत घरी पाहिजे असंही काही नव्हतं. पण थेट नसलं तरी मर्यादांची अदृश्य परीघं असतातच की! ती माझ्या समजुतीप्रमाणे मी कधी ओलांडली नाहीत. म्हणजे घराने मर्यादेची रेघ ओढलेली नव्हती इतकंच. इतकंच कसं? आजूबाजूच्या घरांशी तुलना करता किंवा न करताही हे खूपच होतं.
 मिलिन्दकडे त्याचे बाबा काळजी करतात, सुरूवातीला मला ते छान वाटलं (आईचं काळजी करणं तसं कधी वाटलं नाही, हं!) पण नंतर नंतर लक्षात येत गेलं, कोणीतरी आपली काळजी करणं म्हणजे पायातल्या बेड्याच असतात.
 काळजी करणं म्हणजे आपल्यावर ’अविश्वास दाखवणं’ असतं, आपल्या क्षमतेबाबत शंका घेणं असतं. (म्हणजे या हेतूने कोणी काळजी करतं असं नाही.) काही वेळा काळजी करणं म्हणजे व्यवस्थेवरचा अविश्वास असतो, समाजावरचा अविश्वास असतो. म्हणजे मी खूप चांगली/ व्यवस्थित गाडी चालवीत असेन पण म्हणून मला अपघात होण्याची शक्यता मावळत नाही तर इतर सगळ्यांनीही नीट गाडी चालवली पाहिजे. बर्‍यापैकी लोक बर्‍यापैकी गाडी चालवतात असा विश्वास पाहिजे, आलाच प्रसंग तर मी तो निभावून नेऊ शकेन याबाबत खात्री पाहिजे. मधेच ट्रॅफिकजाम होऊ शकतो, कोणी भेटू शकतं, अशा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे जर मला यायला उशीर व्हायला लागला तर काळजी वाटणार नाही.  प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे असतात, त्यातून तो घडत जातो. त्यामुळे काळजी वाटणं कमी जास्त प्रमाणात असू शकतं, आपण हे ही समजून घेतलं पाहिजे.
 मिलिन्द माझी कधी काळजी करत नाही. ( कधी कधी मला वाटतं याने माझी जरा काळजी करावी.) मलाही त्याची कधी काळजी वाटत नाही.  मिलिन्द मुंबईला होता तेंव्हा त्याचा मित्र ज्याची बायको आणि मुलगा पुण्यात राहात असे, रोज रात्री तासभर फोन करून इथलं घर चालवत असे, म्हणजे मुलाचा अभ्यास, शाळा, खोड्या, इतर प्रश्न. मिलिन्दने हे केलं नाही. मला एकटीला सारं सांभाळता येणार नाही असं त्याला कधी वाटलं नाही. (आता तर या गोष्टीचा तो गैरफायदा घेतो की काय असं मला वाटतं) असं काळजी न करण्यामुळे आपण स्वतंत्र, सुटे होत जातो. आपल्या क्षमता कमाल मर्यादेपर्यन्त वापरू शकतो. आत्मविश्वास वाढतो. एकूणच जगण्याचा दर्जा उंचावतो.
 तर मुख्य मुद्दा असा की काळजीच्या बेड्या काढून फेकल्या पाहिजेत. काळजी म्हणजे प्रेम नाही हे लक्षात घेतलं पाहिजे (जरी त्याची सीमारेषा अंधुक असली तरी) कुठल्याही प्रेमाने तुमचा विकास थांबवायला नको. तुम्हांला परावलंबी बनवायला नको.

**************

हल्ली या वर्षादीडवर्षात मीही काळजी करणारी झाले आहे की काय अशी मला शंका येते आहे. मग मी विचार करायला लागले. मला, कुणाला उशीर झाला तर, अपघातांची, आजारपणाची, मरणाची काळजी वाटत नाही. मला माणसांच्या आत्मसन्मानाची काळजी वाटते, ती दुखावली गेली तरची काळजी वाटते, उरातले खोल घाव सांभाळत ती कशी जगतील याची काळजी वाटते, मनासारखं जगायला न मिळणार्‍यांची काळजी वाटते, संवेदनशील माणसांची संवेदनशीलता आपल्या समाजात जपली जाईल ना? याची काळजी वाटते, विचार न करता जगणारांची काळजी वाटते.......... या सगळ्या काळज्यांचही काय करायचं ते वेळ काढून एकदा ठरवायला पाहिजे.

***********

Sunday, August 15, 2010

स्वीकार


"सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार"
हे फारच अवघड आहे.
होय.
आपण स्वत:ला बदलत आणतो. ते स्वत:ला पटलेल्या कारणांसाठीच असं नाही. काही वेळा इलाजच नसतो म्हणूनही. दोघांना जर एकत्र राहायचं असेल तर (गुण्यागोविंदाने वगैरे) तर बदलावं लागतंच दोघांनाही, कमी जास्त प्रमाणात. अशावेळी आपण खंत करीत बसतो, बदलण्याची, न बदलण्याची, बदलावं लागलं याची. स्वीकारात कसं आहे, खंत नाही. ही खंत जर टाळता आली तर किती श्रम कमी होतील. एक व्यावहारीक कारण हे की बदलाची वाट तरी किती दिवस पाहायची? ( दुसरं ते संतपदाला पोचणं आहेच.)
 आणि हे सगळे विचारच, मला हे जमतच असं नाही. पण विचारांच्या पातळीवर जरी स्वीकार करता आला तरी खूपच मजल मारली असे म्हणता येईल. (तेही मला जमलेलं आहे असं नाही.) कळणं आणि वळणं याच्यात अंतर राहतंच, कळून घेण्याचा प्रयत्न तरी केला पाहिजे.
 कुठल्याही दोन य आणि क्ष माणसांचं जास्तीत जास्त किती पटू शकतं? (दोघांचही स्वातंत्र्य आणि समानता टिकवून) दोन वेगवेगळी माणसे आहेत, वेगवेगळे अनुभव आहेत, वेगवेगळे विचार आहेत तर पूर्णपणे पटणार नाहीच. फक्त या दोन य आणि क्ष मधे प्रेम आहे . पण प्रेम ब्लॅकमेलींगसाठी वापरू नये. (प्रेमाने स्वत:हून काम केलं तर ठीकच आहे.)
 अश्विनी, तू नेहेमी म्हणतेस तसं आपण तरी बर्‍यापैकी विचार करूनच एकमेकांना निवडलेलं असतं. अशावेळी मूलभूत बाबींमधे मतभेद असायची शक्यता कमी आहे. (तसं असेल तर वेगळा विचार करायला हवा.) आणि असंही आपली घरं कुठे विचारांवर चाललेली असतात?
समज ”स्त्री-पुरूष समानतेचं आपण आपल्या घरात काय करायचं ठरवलं आहे?” काहीही नाही. म्हणजे विचारपूर्वक काहीही नाही. जसे प्रश्न पुढ्यात येतील तसतसे तेव्हढ्यापुरते काय ते आपण ठरवतो. दूरवरचा काही मूलगामी विचार केलेला आहे का? नाही. अशा परीस्थितीत किमान पातळीवर कुणाशीही पटायला हरकत नाही. तसं होत नाही कारण छोट्या छोट्या गोष्टींमधे आपण गुंतूवून घेतो, असं करणं म्हणजेच संसार करणं,  अशी आपली समजूत आहे.
 जर विचार करायला लागलो तर स्वीकार सोपा होईल. मी कुरकुरत असते ’ मिलिन्द नेहेमी वाचत असतो.’ हे एक पोकळ विधान आहे. नेहेमी म्हणजे काय? त्याचा दिवसभरातला किती वेळ त्याच्या कामात जातो? तो घरी किती वेळ असतो? त्यातला किती वेळ तो वाचत असतो? गणित करून काय ते शोधून काढायला हवं. हीसुद्धा स्पष्टता हवी की वेळ त्याचा आहे, त्यावर त्याचा हक्क आहे, त्याच्या वेळेचं काय करायचं हे त्याने ठरवायचं. कदाचित असं लक्षात येईल की त्याच्याकडे वेळेचीच कमतरता आहे. असं का आहे? समजा त्याने कमी वेळ काम करायचं ठरवलं तर तशी सोय उपलब्ध आहे का? आमच्या गरजा काय आहेत, हे तरी आम्ही नीट ठरवलं आहे का? हे सगळंच असं भुसभूशीत असताना ’ मिलिन्द नेहेमी वाचत असतो ’ असं म्हणण्याला अर्थ नाही. म्हणून प्रश्नाच्या मूळापर्यन्त जाऊन नीट काय ते शोधून काढलं पाहिजे म्हणजे स्वीकारायला सोपं जातं.
 अर्थात प्रत्यक्षात सगळं इतकं काही सोपं नसतं, खूप गुंते असतात. शिवाय भावना, जिव्हाळा, प्रेम हे मधेमधे येणारच. माझ्यासाठी म्हणून, स्वत:हून काही सुचणं हे ही असतंच. त्यामुळे मला वाटतं निदान विचार तरी करत राहिलं पाहिजे, म्हणजे कधीतरी "सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार" च्या मुक्कामाला पोचता येईल.

**********

चतुरंग पुरवणीत ज्योती कानिटकरांचा एक लेख आला होता. त्यात त्यांनी मॅस्लोच्या गरजांच्या पिरॅमिड दोघांचं किती जमतं/ जमू शकतं यासाठी वापरला आहे.
मॅस्लोनी मानवाच्या या गरजांची वर्गवारी केली आणि ती उतरंडीच्या स्वरूपात मांडली ती अशी..



* बौद्धिक गरजा
* उत्तमता
* स्वत्व
* स्वाभिमान
* प्रेम-सहवास
* भावनिक गरजा
* सुरक्षिततेच्या गरजा
* अन्न, वस्त्र, निवारा- शारीरिक गरजा.
या उतरंडीतील सर्वात तळातल्या गरजा या शारीरिक गरजा आहेत. त्या प्रत्येक माणसाला असतातच. त्या पूर्ण करण्यासाठी सर्वानाच धडपडावं लागतं. या मूलभूत गरजा आहेत. मनुष्य या गरजा पूर्ण करण्यासाठी धडपडतो. त्या सहजपणे पूर्ण होऊ लागल्या की, त्याचं लक्ष वरच्या पायरीकडे जातं. खालून दुसरी पायरी सुरक्षिततेची, यात आर्थिक, सामाजिक, शारीरिक अशा सर्वच प्रकारच्या सुरक्षितता अभिप्रेत आहेत. याही गरजा पूर्ण झाल्या की माणसाचं लक्ष त्या वरच्या म्हणजे भावनिक गरजांकडे वेधलं जातं. त्यानंतर मग बौद्धिक गरजा आणि या सर्वाच्या वर ‘उत्तमतेच्या’ गरजा.
याचा अर्थ असा नाही की, अन्न-वस्त्र मिळेपर्यंत मनुष्याला प्रेमाची गरजच भासत नाही. परंतु शारीरिक गरजांची पूर्तता होईपर्यंत इतर गरजा तितक्या प्रकर्षांने महत्त्वाच्या ठरत नसतात. समाजातील बरीच माणसं पहिल्या तीन गरजांतच आनंदी असतात.
 प्रत्येक पुरुष आणि स्त्रीच्या स्वत:च्या गरजा असतात. त्या आपण या उतरंडीवर मापू शकतो. या गरजा घेऊनच ती व्यक्ती नात्यात प्रवेश करते. बहुतेक वेळेला व्यक्तीला अशाच जोडीदाराचा शोध असतो, जो तिच्यासारखाच असतो. म्हणजेच पुरुष आणि स्त्री अशाच जोडीदाराच्या शोधात असतात, ज्यांच्या ‘गरजा’ स्वत:सारख्याच असतात.  व्यक्ती स्वत:च्या गरजांनुसारच आपल्या जोडीदाराकडून अपेक्षा करते.
 समज कमी जास्त असेल तर नात्यात प्रश्न निर्माण होतात तसे गरजा वेगवेगळ्या पातळीवरच्या असतील तरी प्रश्न निर्माण होत असणार. कदाचित जोडीदाराकडून जास्त अपेक्षाही ठेवल्या जात असतील.
 आपला जोडीदार आपल्यापेक्षा वेगळ्या पातळीवरचा आहे, हे लक्षात घेतल्यावर स्वीकार सोपा जाईल.

**************

Saturday, July 31, 2010

बंधन

वैवाहिक (सह)जीवन यशस्वी होणं, हे वय लहान-मोठं असण्यावर अवलंबून नसावं. ती सोय आहे, ते नातं आयुष्यभरासाठीचं आहे त्यामुळे दोघांनी मरेपर्यन्त एकमेकांना साथ देण्याची शक्यता वाढते इतकंच. कुठल्याही नातेसंबंधांचा आलेख हा दोघांच्या मॅच्युरीटीवर अवलंबून असतो.खरं आहे. समज कितीही असो पण दोघांची समजेची पातळी सारखी असेल तर बरं पडतं. समज ही अशी गोष्ट आहे की वय वाढलं म्हणून वाढेलच असं नाही. दुसर्‍याला कायम समजून घेत राहणं ही सोपी गोष्ट नाही. समज सारखी असल्याने परस्पर सुसंवाद शक्य होऊ शकतो.
 मला तरी मी बोललेलं समोरच्याला कळणं / निदान कळणं गरजेचं वाटतं. विचार वगैरे जुळणं पुढच्या गोष्टी. माझ्या आणि मिलिन्दच्या बाबतीत आम्ही बोललेलं एकमेकांना (विचारांच्या पातळीवर) कळू शकतं ही गोष्ट मला फार समाधानाची वाटते. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्या मर्यांदांसह एकमेकांचा स्वीकार! मिलिन्दला ही गोष्ट सहज जमली. मी मात्र कितीक वर्षे त्याच्यात छोटे मोठे बदल व्हावेत यासाठी प्रयत्न करत राहिले. त्याच्यात काही बदल झाले नाहीत, मी त्या गोष्टी स्वीकारण्याची माझी पात्रता वाढवण्यासाठी ही वर्षे खर्ची घातली. मिलिन्दला सुरूवातीपासूनच माझ्यात काहीही बदल अपेक्षीत नव्हते. याचा अर्थ माझ्यात उणीवा नाहीत किंवा नव्हत्या असं नाही तर त्यांच्यासह स्वीकार असं होतं. आपण एखादं माणूस कसं असेल याचा अदांज करतो, त्याने तसंच असावं असा आग्रह धरतो, पण ते माणूस काही तुमच्या कल्पनेतलं नाही, प्रत्यक्षात आहे. काही बाबतीत हे प्रत्यक्षातलं माणूस कल्पनेतल्या माणसापेक्षा कितीतरी छान असतं. हा साक्षात्कार व्हायला माझी किती वर्षे गेली. बरेचदा मी धडपडत, ठेचकाळत जे शिकते, ते मिलिन्दने सहजपणे आधीच आत्मसात केलेलं असतं. पण माझा लांबचा प्रवास झाल्याने माझ्या खात्यावर अधिक शहाणपण जमा होतं, एव्हढं खरं.
 नवरा-बायकोचं नातंच असं आहे ना? रोजचा सारखा संबंध येणारं, इतक्या जवळून सारखं पाहिल्याने त्या माणसाचं तटस्थपणे काही मूल्यमापन करणं अशक्य होतं. मी तर म्ह्णते नवरा बायको एकमेकांबद्दलचा किमान आदर शिल्लक ठेवू शकले तरी खूप आहे.
 या नात्यात समानता राखणे ही कसरतीची गोष्ट आहे. बरेच संसार हे कोणाच्या तरी/ दोघांपैकी एकाच्या शोषणावर उभे असतात. संसार या चौकटीचीच ही गरज आहे की काय वाटण्याइतके हे सार्वत्रिक आहे.
 एकमेकांसाठी वेळ काढणे आणि बोलत राहणे याही खूप महत्वाच्या गोष्टी आहेत. आमच्या घरात माझ्या बाजूने मी हे करत आले. मिलिन्दला याची तितकीशी गरज वाटली नाही किंवा या बाबतीतल्या आमच्या गरजांच्या पातळ्या वेगळ्या आहेत.
 नवरा-बायकोच्या नात्याचं बंधन किंवा ओझं होऊ नये. त्यासाठी दोघांनीही सगळ्या बाजूंनी फुलतं राहणं गरजेचं आहे.

Monday, July 19, 2010

ना उम्र का हो बंधन....

वडिलांच्या वयाच्या पुरुषाशी नायिकेचे फ़सवून लग्न लावले जाते आणि मग त्याविरूध्द ती बंड पुकारते. जरठ-बाला(कुमारी) विवाहाची समस्या मांडणार्‍या प्रभातच्या ‘कुंकु’ चित्रपटाने किंवा देवलांच्या ‘संगीत शारदा' नाटकाने या अनिष्ट विवाहप्रथेला छेद देणारा विचार त्यावेळेस मांडला. खरचं किती अन्यायी प्रथा होती ती! त्या मुलीचे कोमल भावविश्व कसे करपून जात असेल अशा लग्नाने.

हे झाले त्याकाळातले; आजच्या काळात देखील, आपल्यापेक्षा १५-२० वर्षांनी मोठया असणा-या पुरूषावर प्रेम करणा-या/लग्न करणा-या(स्वखुषीने) स्त्रिया देखील आहेतच की! वयातील अंतर एवढे जास्त म्हणजे विचारांमधे दरी निर्माण होत नसेल? एकमेकांना समजून घेणे कस शक्य होत असेल? कदाचित नातेसंबंध सांभाळण्याची प्रगल्भता/क्षमता असेल त्यांच्यात.

लग्न करताना, पुरुषापेक्षा स्त्री वयाने लहान असावी असा एक सामाजिक नियमच (का निसर्गनियम?) ठरून गेला आहे. स्त्री ने तिच्यापेक्षा अधिक कर्तृत्ववान असणा-या, तिच्यापेक्षा मनाने खंबीर, उंचीनेही 'मोठा' असणा-या पुरुषाशीच लग्न करावे अशी सर्वसाधारण धारणा असते. मधे वाचनात आले होते की पुरुषाने स्त्रीपेक्षा वयाने मोठं असावं याचे कारण दोघांच्या मानसिकतेतील फ़रक! पुरुषापेक्षा स्त्रीत जास्त प्रमाणात असणारी सहनशीलता, तिची नैसर्गिक शारीरिक जडणघडण वगैरे. असेल ही कदाचित काही प्रमाणात ह्यात तथ्य, पण म्हणून असा नियम होऊ शकत नाही.

समाजाच्या ह्या चौकटीबाहेर जाण्याचा जरा कोणी प्रयत्न केला की तो चर्चेचा विषय होतो. नर्मदा बचाव आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी अहमदाबादला निघाले होते. माझ्या बरोबर तेव्हा कुसुम कर्णिक होत्या. त्यांच्याबरोबर गप्पा मारताना समजले की त्यांचा नवरा(आनंद कपूर) त्यांच्यापेक्षा १५-१६ वर्षांनी लहान आहे. मला त्यावेळेस जरा नवलच(खरतरं विचित्रच) वाटले होते. अशी उदाहरणे त्याआधी बघितली/ऐकली होती (सचिन तेंडुलकर, काही सिनेनट), पण त्यांचे सामाजिक वर्तुळ वेगळे आहे, त्यामुळे चालत असेल असे वेगळे काहीतरी असे वाटायचे. पण आजकाल अगदी आपल्या आजूबाजूला सुध्दा अशी जोडपी असतात. माझ्या एका मावसभावाने पण त्याच्यापेक्षा ५-६ वर्षांनी मोठया असलेल्या मुलीशी लग्न केले आहे. त्याला तिच्यातले काय भावले असेल किंवा तिला त्याच्याशी लग्न का करावेसे वाटले असेल असे प्रश्न नाही पडले मला. कारण ही आवड-निवड पूर्णत: खाजगी गोष्ट आहे. त्याचे स्पष्टीकरण देता येत नाही किंवा देण्याची काही गरजही नाही. पण असे सामाजिक परंपरेला छेद देणारे विवाह ‘प्रेम विवाहच’ असतात; रीतसर ठरवून केलेल्या लग्नात, वयाने जाऊ देत पण शिक्षण, नोकरी, उंची, सामाजिक दर्जा ह्यापैकी कशातही मुलीपेक्षा कमी असलेला मुलगा निवडणे असे उदाहरण विरळाच!

वैवाहिक (सह)जीवन यशस्वी होणं, हे वय लहान-मोठं असण्यावर अवलंबून असतं का? स्त्रीचं वय पुरुषापेक्षा जास्त असल्यास त्यांच्या नातेसंबंधावर परिणाम होतो की नाही? हे ठरवणं अवघड आहे. परस्परांच्या संमतीने निवड झालेली असेल, तर खरतरं सहजीवनात काही प्रॉब्लेम येऊ नयेत. पण कधीकधी वयातील हा फ़रक काही वर्षांनंतर टोचतही असेल. अर्थात हे दोघांच्या मॅच्युरिटीवर, परस्परांवरील विश्वासावर अवलंबून असते असे मला वाटते.

Thursday, July 15, 2010

बाई

’बाई’ किंवा ’बायका’ असे शब्द मी पूर्वी कधी वापरत नसे. ते मला आवडायचे नाहीत. मी कायम स्त्री, महिला असेच शब्द वापरायचे. तेच बायकांसाठी सन्मानदर्शक शब्द आहेत असे मला वाटे.


चांगल्या शिकल्या सवरल्या बाईला ’बाई’ काय म्हणायचे! ती स्त्री. बाईपण ओलांडून माणूसपणाकडे गेलेली.

हे सगळं करत असताना मी बायकांची प्रतवारी करत आहे हे माझ्या लक्षात येत नसे. मी स्त्री आणि माझ्याकडे काम करणार्‍या मावशी म्हणजे कामवाली बाई. स्त्री आणि बाई असे शब्द वापरताना बायकांची आर्थिक, सामाजिक उतरंड मी पक्की करत असे.

जेव्हा माझा स्त्रियांचा रितसर अभ्यास सुरू झाला तेव्हा समाजात स्त्रियांचे कसे वेगवेगळे गट पाडले गेलेले आहेत, हे मी शिकले. त्याही पलीकडे शरिरविक्रय करणार्‍या स्त्रिया, वेश्या किंवा सेक्स वर्कर्स तर माझ्या दृष्टीने जगात अस्तित्वातच नव्हत्या. त्यामागचे राजकारण मी शिकले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्त्रीवाद्यांचे त्यावरचे विचार आम्हांला अभ्यासायला होते. आणि ’डोळे उघडावेत’ तसे माझे झाले. मी कितीही माझ्या स्वातंत्र्याचा विचार करत असले तरी ते सारे विचार चौकटीतले होते. माझ्या विचार करण्याच्या मर्यादा मला कळल्या. पुटं गळून पडावीत तसे झाले.

जर मला स्त्रियांचा विचार करायचा असेल तर फक्त मध्यमवर्गातल्या, उच्चवर्णातल्या स्त्रियांचा विचार करून चालणार नाही. निदान विचारांच्या पातळीवरतरी माझ्या कुवतीप्रमाणे मी सगळ्या स्त्रियांना सामावून घ्यायला पाहिजे. हे कधीतरी मला कळलं

मग जगातल्या सगळ्या बायकांशी नातं सांगणारा ’बाई’ हा शब्दच मला जवळचा वाटू लागला.

त्यानंतर मी प्रामुख्याने मी ’बाई’ हाच शब्द वापरायला सुरूवात केली.

Monday, June 28, 2010

मैत्री

एखादी स्त्री जेव्हा मैत्री करते तेव्हा ती ज्या व्यक्तीशी मैत्री करते, त्या व्यक्तीचं स्त्री किंवा पुरुष असणं हे त्या मैत्रीच्या आड येऊ शकता का?
हो. आपल्या समाजात, आपल्या काळात तरी अशी परीस्थिती आहे.
”एखादी स्त्री जेव्हा मैत्री करते” म्हणजे आपण कोणी मैत्री करायला जातो असं मला वाटत नाही, ती होते. हे म्हणजे ठरवून लग्न करू तसं नाही. मैत्रीचं हेच तर वेगळेपण आहे, केलीच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही.

१. स्त्री-पुरुष मैत्री निखळ असू शकते का?
मला माहीत नाही. पण असावी असा अंदाज आहे.
पण निखळ म्हणजे काय?
निखळ असण्या नसण्याची सीमारेषा कोणती आहे?
मिलिन्दची आणि माझी मैत्री निखळच होती. कधीतरी मिलिन्दने माझ्याशी लग्न करायचं ठरवलं, म्ह्णजे माझ्या बाजूने मैत्री निखळ आणि मिलिन्दच्या बाजूने नाही, असंच ना? मीही त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं त्यानंतरच्या आमच्या मैत्रीला काय म्हणूया?
निखळ म्हणजे मैत्री करायची पण प्रेमात पडायचं नाही. या दोन्ही ठरवून करायच्या गोष्टी नाहीत.
मिलिन्द माझा चांगला मित्र होता पण जिवलग मित्र नव्हता, उलट प्रेमात पडल्यावर जिवलग झाला.
मलाही स्त्री-पुरूषाची निखळ मैत्री का असू नये असंच वाटायचं, मिलिन्दने मला विचारल्यावर मला वाईटच वाटले होते, निखळ मैत्रीचा एक आदर्श आम्ही उभा करू शकलो असतो. अशा काहीतरी माझ्या कल्पना होत्या. म्हणजे मी त्याचा विचार करत होते, काळजी करत होते, काही प्रमाणात हक्क दाखवत होते, अभ्यास सोडून त्याने आणून दिलेली पुस्तके वाचत होते पण या कशालाही प्रेम म्हणायची माझी तयारी नव्हती. म्हणजे एक लेबल दिलं की ते प्रेम झालं का? त्यापूर्वी नव्हतं का? असूनही जर आपल्याला कळलं नाही तर काय ?

या विषयावर लिहायचा मला काहीही अधिकार नाही. माझा एक चांगला मित्र होता, तो जिवलग होण्याच्या वाटेवर मी त्याच्या प्रेमात पडले.

दुसरं असं की प्रत्येकात स्त्री-पुरूष आकर्षणाचे आदिम तंतू असणारच, ते आपल्याला नातेसंबंधातही दिसतात. सासरा-सून, सासू-जावाई असे. मानवी संस्कृतीने आजवरच्या वाटचालीत बहीण-भाऊ, वडील-मुलगी असे काही निखळ नातेसंबंधही निर्माण केलेले आहेतच ना? मग त्यावर विसंबून असे म्हणूया की स्त्री-पुरुष मैत्री निखळ असू शकते. निखळ असण्या नसण्यापेक्षा मैत्री ही किमती गोष्ट आहे.


( इथे एव्हढ्च लक्षात ठेवू या की ही चर्चा सगळेच भिन्नलिंगी असतात असं गृहित धरून होते आहे. आपण समलैंगीकांच अस्तित्व विसरायला नको, त्या परीस्थितीत ’निखळ’ चं काय करायचं)


२. जिवलग मैत्रीण कि जिवलग मित्र ?

जिवलग मैत्रीण असो की मित्र , ही खूप हेवा करण्याजोगी गोष्ट आहे. मलातरी जिवलग या शब्दाच्या जवळपास जावू शकणार्‍या मैत्रीणीच आहेत. वेगवेगळ्या मैत्रीणींशी माझं वेगवेगळ्या तारांवर जुळतं. प्रत्येक माणसाला अनेक पैलू असतात, त्यातले जे आपल्याशी जुळतात त्या बाजूने मैत्री सुरू होते. मला माणसांमधे रस असल्याने, एकूणच त्यांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत माझी किमान पातळीवरची मैत्री कुणाशीही होऊ शकते. कुठलाही माणूस फूली मारण्यासारखा नसतो.

मैत्री्णी सहज होऊ शकतात, तितक्या सहज मित्र होऊ शकत नाहीत. आता परीस्थिती बदलल्यासारखी वाटते.

जिवलग मित्र असण्याचा एक फायदा आहे की नवर्‍याला किंवा इतर पुरूषांना समजून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. एक स्त्री म्हणून मला जे कधीच कळू शकणार नाही, ते त्याच्या नजरेने पाहता येऊ शकतं, जाण वाढू शकते, जग समजून घ्यायला मदत होऊ शकते. अनुभवाचं वर्तूळ वाढवता येऊ शकतं. हे जग शेवटी स्त्री-पुरूषांचं मिळूनच बनलं आहे ना!

(यावर सोपा उपाय म्हणजे नवर्‍याशी मैत्री करता आली तर पहा, तिथे काही धोका नाही. )

३. समाजाचा स्त्री-पुरुष मैत्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा त्या मैत्रीच्या आड येतो का?

हो,आणि समाजाचाच नाही तर आपल्या स्वत:चादेखील. समाज म्हणजेदेखील आपणच ना?
माझ्या ओळखीच्या मुलांपैकी कोणी माझ्याशी जर फार चांगला वागायला किंवा बोलायला लागला तर मी त्याच्याबरोबरचे बोलणे हळू हळू संपवत आणत असे. खरं याची गरज नव्हती पण मला वाटे गैरसमज नकोत. आपणसुद्धा समाजाचा भाग असतो, काही गोष्टी भिनलेल्या असतात. त्यातून प्रयत्नानेच बाहेर पडावे लागते.

मैत्री आहे तर आहे, ती जर स्त्री पुरूषांमधली असली तर ती निखळ आहे हे त्या दोघांना दाखवत बसावं लागतं, इतकं सगळं सांभाळत मग ती मैत्री हवी कशाला?

धर्मापुरीकर काका किती मोठे आहेत. नात्यानेही ते माझे दूरचे काका आहेत.पण त्यांची माझी ओळख आत्ताच झाली. आमची काही मैत्री नाही, ते अधून मधून फोन करतात. त्यांच्या कथांसंबंधी बोलतात, दरवेळी न चुकता मिलिन्दची चौकशी करतात. मी सुद्धा काकूंची विचारपूस करायचे, खरं याची काय गरज आहे? मी काकूंची चौकशी करणं सोडून दिलं. कुठल्याही वयाचे स्त्री-पुरूष काही नातं बांधू पाहात असतील तर समाज त्यांच्यामधे असतोच असतो. समाजाचं काय करायचं ते त्या दोघांनी ठरवायचं.

४. लग्नाआधी असलेला मित्र हा लग्नानंतरही तेवढाच जवळचा वाटतो/राहतो का?

नव्हता मला कोणी मित्र. म्हणजे ओळखीचे बरेच होते पण मित्र म्हणावा असा कुणी नव्हता. कदाचित माझ्या व्याखेत मित्र ही कुणालाही सहज लागू करू अशी उपाधी नसेल.

लहानपणी आम्ही वाड्यात राहायचो तेंव्हा सगळे मुलगे आणि मी एकटीच मुलगी असे होते. नातेवाईकांमधेही माझ्या वयाच्या एका मामेबहीणी व्यतिरिक्त बाकी सगळे सहासात भाऊच आहेत. दहावी पर्यन्त मी मुलींच्या शाळेत शिकले असले तरी नंतर वर्गात मुलगेच अधिक असे होते.

त्यामुळे मुलांमधे सहज वावरायची सवय मला होती. सहज मी कुणाशीही गप्पा मारू शकते, पण ते कुणी माझे मित्र नव्हते, मी त्या कुणाशीही मनातलं बोलायला गेले नाही. ती माझ्या वर्गातली मुलं होती, शेजारची मुलं होती, मैत्रीणींचे भाऊ होते, भावाचे मित्र होते, चुलत-मावस भाऊ होते, ते सगळे तसेच राहीले त्यातला कुणीही मित्र झाला नाही. होऊ शकले असते त्यांना मी थांबवलं. (मैत्री ठरवून करता येत नसली तरी ठरवून थांबवता येते.)

लग्नाआधी जर कुणी मित्र असेल तर लग्नानंतरही तो तेव्हढाच जवळचा राहायला हरकत नसावी. फक्त नवरा त्याच्यापेक्षा जवळचा होऊन बसतो त्यामुळे मित्र दूर गेला, किंवा मित्राला आपण दूर गेलो असे वाटणे शक्य आहे.

आपल्याकडे नवरा हाच सगळ्यात जवळचा मित्र असण्याची सक्ती आहे, प्रत्येकीच्या बाबतीत ते कसे शक्य असेल? नात्यांच्या मर्यादा आणि शक्तीस्थानं यांच्याकडे सरळ, स्वच्छ नजरेने पाहणं आपण शिकायला हवं आहे.

५. वयानुसार स्त्री/पुरुष मैत्रीच्या नात्यात झालेला बदल.

लग्न झाल्यावर, त्यातही मुलं जरा मोठी झाल्यावर आपण Danger Zone मधून बाहेर पडलो आहोत असं वाटतं, पुरूषांशी वागताना मोकळेपणा वाटू शकतो. लोकांच्याही केवळ स्त्री म्हणून पाहण्याच्या नजरेत बदल होतो. संसारात स्थिर झाल्यावर समजदारी वाढणे, नातेसंबंधांची जाण येणे असं होतं. (प्रत्येकाच्याच बाबतीत होतं असं नाही.)

६. स्त्री-पुरुष मैत्रीबाबत आलेले चांगले/वाईट अनुभव.

अनुभव नाहीत. मी ज्याला मैत्री म्हणते तशी मैत्री माझी कोणाशीही (पुरूषांशी) नाही, ( एक मिलिन्दशी आहे पण ती निखळ नाही. :) )

मैत्री का हवी असते माणसाला?

वाटेवर सोबत हवी म्हणून...सांगावसं वाटतं काय काय म्हणून...समोरच्याला समजून घ्यायचं असतं म्हणून...आपल्याला कु्णीतरी समजून घ्यावं म्हणून...शोधायचं असतं काय काय म्हणून.. लावलेले शोध कुणापुढेतरी ठेवावेसे वाटतात म्हणून...खात्री हवी असते सोबत असण्याची म्हणून...आधाराला हवं असतं कुणीतरी म्हणून...आधार व्हावसं वाटतं कुणाचातरी म्हणून...सुखदु:ख कळावं कुणालातरी म्हणून... ज्याला कळेल अशा कुणाशीतरी गाभ्यातलं बोलता यावं म्हणून.... सगळ्या संसाराच्या धकाधकीत विश्रांतीला हवं ना कुणीतरी.

पण यासाठी मित्रच का? मैत्रीणी आहेत की! आणि त्या पुरेशा आहेत.

(सगळ्यात छान म्हणजे स्वत:शी मैत्री करणं, स्वत:ला ओळखणं, स्वत:ला शोधणं)

सगळ्या मुली/ बायका मला मराठी पुस्तकांसारख्या वाटतात. मला त्यांना वाचता येतं, त्या मला कळतात. सगळे मुलगे/पुरूष मला इंग्रजी पुस्तकांसारखे वाटतात, वाचले तरी कळले आहेत याची खात्री वाटत नाही. मग वाचावेसेही वाटत नाहीत. तरी ती पुस्तके वाचली पाहिजेत, कळली पाहिजेत असंही वाटत राहतं.

Tuesday, June 15, 2010

चरे

आम्ही कन्याकुमारीला गेलो होतो. संध्याकाळी समुद्रावर. तिथे बरीच गर्दी होती. तरीही आम्ही आपापल्या परीने मजा करत होतो. मुक्ता आणि सुहृद तर सुटलेच होते. मीही आजूबाजूचे आवाज कानाआड करण्याचा प्रयत्न करत होते. तिथल्या एखाद्या खडकावर बसून काही आठवावं....भूमातेच्या चरणतला तुज धुतां .... शक्य नव्हतं. किंवा इथून सरळ दक्षिणेला जात राहिलो तर भूमी म्हणजे अंटार्क्टिकाच, पश्चिमेला गेलो तर सोमालीया....असा विचार करत बसावं..शक्य नव्हतं. आपल्याकडे शांततेने काही अनुभवताच येत नाही.

समोर अफाट पसरलेलं पाणी..त्याचे बदलते रंग...पायांखाली सरकणारी वाळू...मी पाण्यातल्या एका दगडावर जावून बसले. आवाज जरा दूर गेलेले. आणखी एक बाई माझ्या शेजारच्या दगडावर येऊन बसल्या, त्यांनी मुलाला बोलावलं. कॉलेजात जाणारा त्यांचा मुलगा आणि नवरा पण आला. मराठीच लोक होते. मुक्ताही आली. आम्ही दोघी पाण्यात पाय घालून बसलो. इतक्यात त्या बाईंची चप्पल पाण्यात वाहून गेली. त्यांचा तो नवरा खेकसला,’ साधी चप्पलही सांभाळता येत नाही का?’ आणि अजून बरंच काही. त्या कसानुंसा चेहरा करून बसल्या. एक शब्दही बोलल्या नाहीत, की आपली बाजू मांडली नाही. इतक्या वर्षांच्या संसारानंतर एक चप्पल वेंधळेपणाने हरवावी, इतकीही पत त्या बाईने कमावली नव्हती.

समोर अफाट पसरलेलं पाणी..त्याचे बदलते रंग...पायांखाली सरकणारी वाळू.....त्या माणसाचा खेकसणारा आवाज....... माझ्या अनुभवावर त्या सद्गृहस्थाने एक चरा पाडून ठेवला.

******************

तीन-चार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मी, मुक्ता आणि सुहृदच होतो घरी. रात्रीचे साडेदहा वाजले असतील. फोनची रिंग वाजली. मुक्ताने उचलला, म्हणाली,’ आई, काही कळत नाहीये.’ मी फोन हातात घेतला, विचारलं,”कोण पाहिजे?” ” प्यारी, आय लव्ह यू, आपकीही राह देख रहे है” रिसीव्हर ठेवेपर्यन्त मी एव्हढं ऎकलं. तीन-चार जणं असावेत, पार्श्वभूमीला बोलणं, गाणं ऎकू येत होतं. मला त्या आवाजाची किळस आली. मुक्ताने काय ऎकलं होतं?? मी तिला पुन्हा पुन्हा विचारलं. तिला काहीही कळलं नव्हतं. पाचच मिनिटात पुन्हा फोन आला, वाजत राहिला, दुसर्‍या कुणाचातरी असेल, मी उचलला, तीच पार्श्वभूमी, एक शब्दही न ऎकता मी फोन ठेवला. चिडले, धीटपणे पुन्हा फोनची वाट पाहात राहीले, दोनेक मिनीटंच.. लक्षात आलं पुन्हा तो आवाज ऎकण्याइतकी मी धीट नाही. फोन काढून ठेवला.

खरं मी छान मूडमधे होते, विन्दा दीडदा साठी फुलांचे मुखवटे करत होते. त्या एका फोनने सगळं बदलून टाकलं.

मुलं झोपेला आली होती, त्यांना झोपवलं. काम बाजूला ठेवलं, झोपायचा प्रयत्न करत होते, शक्य नव्हतं. आमच्या गच्चीचं दार आम्ही कधीही लावत नाही. उठून ते लावलं, त्याला कुलूप लावलं, समोरच्या दाराची कडी नीट लावलीये ना? पाहून आले. त्यात लॅचची किल्ली घालून ठेवली म्हणजे बाहेरून कुणाला लॅच वापरता येणार नाही. मी अस्वस्थ होते? ठीक आहे... घाबरले होते? का? माहीत नाही.

हे सरळच होतं की त्या माणसांनी कुठलातरी एक नंबर फिरवला तो आमचा निघाला. त्यांना मिलिन्द परदेशी गेला आहे, हे माहीत नसणारच. मग का??

तासाभरानंतर मी जरा ठीक झाले. त्या आवाजाचा त्रास होत होताच. ऎकलेल्या शब्दांचे अर्थ मी लावत नव्हतेच.... मिलिन्द असता तर इतका त्रास झाला नसता. त्याला नेहमी सोपी उत्तरं सापडतात. नुसतं त्याच्याशी बोलता आलं असतं तरी बरं वाटलं असतं. मला बोलायला, चिडायला, रडायला कोणीतरी हवं होतं, आईला बोलून काय सांगणार होते? इतक्या रात्री आणखी कुणाशी बोलू शकणार होते? मिलिन्द तीन-चार दिवसांनी येणार होता.

कुठल्या विकृत माणसांसाठी मी माझी मनस्थिती का बिघडून घेत होते?

पुन्हा पूर्ववत व्हायला मला पुढचे चार दिवस लागले.

एक चरा पडला तो पडलाच.

*************

Friday, May 28, 2010

मैत्री..... मनाला हवीहवीशी.

माझ्या आयुष्यात वयाच्या प्रत्येक टप्प्यावर जेव्हा कोणाशी मैत्री होते तेव्हा समोरची व्यक्ती स्त्री आहे का पुरुष याचा विचार करुन कधीच होत नाही.मला वाटते लहानपणापासून आपण कसे वाढवलो गेलो यावर ते अवलंबून असते. याबाबतीत विचारांनी माझी आई खुप सुधारीत होती. आणि बाबांचे विचार त्यामानाने मागासलेले.आईने लहानपणी आम्हाला सर्व जातीचे, सर्व थरांमधील, मित्र-मैत्रीणींशी मैत्री करायला हवी ती मोकळीक दीली.त्या मैत्रीच्या सीमारेषा,त्यातील फायदे तोटे,धोके हे वेळोवेळी त्या त्या वयानुसार समजावून सांगितले. त्यामुळे समाजाची कधीच भीती वाटली नाही. यात आमचे बाबा,नातेवाईक,सोसायतीतील इतर मंडळी हे सर्वजण मोडत होते.कारण त्या मैत्रीवर पूर्ण विश्वास असणारी माझी आई माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.आणि हाच विश्वास व आमच्या नात्यातील पारदर्शकता ही कोणत्याही वयात, कोणाशीही होणारी मैत्री टीकवण्यात होते.या आमच्या नात्यातील जमेच्या बाजूंमुळे मला लहानपणी,कॉलेजमध्ये मित्र मैत्रीणींची संख्या भरपूर होती.आणि त्यातही मित्रांच्या संख्येचे प्रमाण जास्त होते.लग्नाआधी आम्ही रात्री दहादहा वाजेपर्यंत गप्पा मारायचो,एकत्र फोटोग्राफीला जायचो,एकत्र स्केचिंग करायला जायचो.
एकत्र कुटुंबात लग्न करुन आल्यावर नवरा म्हणून कौस्तुभचा अंदाज यायला खूप वेळ लागला.याला एकत्र कुटुंबातील घरातील अनेक कारणे होती. त्यामुळे मित्रांशीच बोलणे केले.तो मला जास्त सोपा मार्ग वाटला.त्या मित्रांनीही माझी बाजू समजावुन घेऊन काही वर्ष फोन नाही केले,न भेटण्याचे ठरवले.आता गेली तीन एक वर्षांपासून आमच्या बॅचमधले मित्र-मैत्रीणी आम्ही एकत्र दोन एक महीन्यातुन एक दीवस भेटत असतो.घरी माझ्या जुन्या मित्रांचे फोन येतात.त्याबद्दल कौस्तुभला माहीतीही आहे.वेळोवेळी त्याची मित्रांशी ओळखही करुन दीली जाते.आता समाजाची भिती अजिबात वाटत नाही. एकत्र कुटुंबात कोण काय म्हणेल याचा मनावर ताणही येत नाही. कारण कोणतीही आमच्या मैत्रीमधील गोष्ट माझ्याकडून लपवली जात नाही.
परवाच मी मुलांना घेउन बालगंधर्वला प्रदर्शन बघायला गेले होते.मी त्या वस्तू आणि त्याची माहीती वाचण्यात गुंग होते. एवढ्यात मागून मला कोणीतरी ट्प्पल मारली. वळून मागे बघते तर माझा कॉलेजचा मित्र होता.क्षणभर मी ही चक्रावले. कारण त्याच्या वयाने म्हणा मी त्याला पटकन ओळ्खले नाही.वेगळ्या स्टाईलची मिशी,रहाणीमान सर्वच बदललेले होते. त्याच्याशी दहा मिनीटे गप्पा मारल्या. गप्पा मारत असताना स्मृतीचा चेहरा कावरा बावरा झालेला दीसला.मी ओळखले आणि मुलांची ओळख त्याच्याशी करून दीली.नंतर आम्ही घरी आलो आणि दारातच स्मृतीने मला विचारलं तो मगाशी तुला टप्पल मारणारा माणूस कोण होता?तिचा मगाशी झालेला कावराबावरा चेह-यामागचा प्रश्न आता तीने मला विचारला होता.दोघांनाही कॉलेजच्या त्या मित्राविषयी सांगितले.आम्ही एकत्र कसे काम करायचो अश्या गप्पा त्यांच्याशी मारल्यावर स्मृती मला म्हणते कशी की आई म्हणजे माझा जसा शाळेमध्ये यश हा मित्र आहे तसा तुझा तो मित्र होता का? कारण यश पण माझ्या डोक्यावर ट्प्पल मारतो.म्हणजे लहानपणी मित्राने गंमत म्हणून मारलेली टप्पल आपल्या नजरेला खटकत नाही याउलट हेच मोठ्या वयात तिच्या नजरेला खटकले.तर समाजाला काय म्हणायचे?
मैत्री ही समोरचा स्त्री-पुरुष कोण आहे यावर अवलंबून नाही. माझे विचार ज्याच्याशी जुळतात,मी कुठलाही विषय,कोणतीही अडचण,सुखात-दु :खात, कोणत्याही वेळेस ज्याच्याशी,जिच्याशी मनमोकळेपणाने शेअर करु शकते तो खरा मित्र.आणि यात वयाची अट नसते.
आताही कधीही, वयाच्या कोणत्याही टप्प्यावर मित्रांशी खूप वेळ मनमोकळ्या गप्पा माराव्यात,त्यांच्याबरोबर सिनेमाला जावे,एकत्र स्केचिंग-फोटोग्राफी करावी,त्या चित्रावर-फोटोवर तासंतास वाद घालावेत.एकत्र कॉफी प्यावी असे नक्कीच वाटते. यासाठी समाजाची, कोण काय म्हणेल याची भिती नाही वाटणार. कारण जवळच्या व्यक्तीचा माझ्यावर असणारा विश्वास व नात्यातील पारदर्शकता. या दोन गोष्टींनी बाकी समाजाशी लढण्याचे बळ येते. व त्या समाजाचा आपल्या मनावर ताण येत नाही.

रमा

मिलिन्दच्या एका मित्राने संगमनेरला एक तीन मजली, नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी अशी फर्निचरची शोरूम काढली आहे. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्या इमारतीवर दिव्यांच्या माळा वगैरे, तिथे जेवण होतं. मध्यभागी सॅलडचं डेकोरेशन, एक बर्फाचा मोठा गणपती, एका बाजूला पाणीपुरी, कुल्फी असे स्टॉल्स, दुसरीकडे सगळे जेवणातले पदार्थ, दोन तीन गोड पदार्थ. श्रीमंती अशी वाहत होती.
हा मिलिन्दचा मित्र स्वत:च्या कर्तृत्वावर मोठा झालेला. आमचं लग्न झालं तेव्हा वडीलांचं छोटं दुकान होतं. पुढे सगळा व्यवसाय यानेच वाढवला. आता तर गावातल्या कॉलेजच्या संचालक मंडळावर आहे. आणखीही काय काय करत असेल.
आम्ही गेलो, अगदी ’ या! या!’ मिलिन्दचे बाकीचेही बरेच मित्र आलेले होते. शोरूम पाहून आलो, म्हंटलं,”छान आहे.” मी विचारलं, ” हे बाजूचं वर्कशॉप आहे का?” ” नाही, पूर्वी होतं. आता आपली (आपली??? ती त्याची स्टाईल आहे.) दोन युनिट्स MIDC त आहेत. एक पावडर कोटींगचं नवं आहे.” पुढे म्हणाला,” वहीनी, तिकडे बसा ना, रमा तिथेच आहे.” रमा म्हणजे त्याची बायको. मी तिकडे गेले. तिथे पूजा केलेली होती.
मी प्रसाद घेतला. रमाला शोधत होते. साताठ वर्षांपूर्वी भेटले होते. चेहरा नीट आठवत नव्हता. तिथे असणार्‍या बर्‍याच बायकांपैकी एक रमा मी निश्चित केली. खरं तिच्याभोवती फार बायका नव्हत्या. ती एकटीच उभी होती, मला वाटलं तीच असावी. मी विचारलं, ’रमा ना?’ ’हो’ मग मी माझी ओळख करून दिली. सांगीतलं शोरूम छान आहे, वगैरे. ती मला यजमाणीन वाटतच नव्हती. ती इतकी अलिप्त दिसत होती, ताणाखाली वाटत होती. ’ तुम्ही जे सगळं पाहताय ते माझं आहे’ असे कुठलेही भाव तिच्या चेहर्‍यावर नव्हते. ती मिरवत नव्हतीच. मी निघताना तिने माझे हात हातात घेतले,’जेवून जा, नक्की." तिचे हात गार होते. आजचा प्रसंग तिला निभावून न्यायचा होता??

परात्मता... त्या समारंभाचा ती हिस्सा नव्हती.

का बरं?

तिचं लग्न झालं तेव्हा नवरा छोटा व्यावसायीक होता. त्याच्या छॊट्याशा वर्तुळात ती आत्मविश्वासाने वावरत असणार. सासू-सासरे, दीर, सगळ्याचं ती करत होती. तिच्या कष्टांना किंमत होती. नवर्‍याचं वर्तूळ वाढत गेलं. भराभर तो मोठा होत गेला. श्रीमंती येत गेली. किती साड्या आणि दागिने घेणार?? त्यालाही मर्यादा आहे, शेवटी ओझ्याच्याच गोष्टी त्या! ती सराईत झाली नाही, दुसरी एखादी झाली असती कदाचित. तिच्या घरी तीच पाहुणी होऊन राहिली होती?

********



बायकांचं काय असतं? घर नवर्‍याचं, मुलं त्याची, त्याचं नाव लावणारी ......

मला नेहमी वाटतं, अध्यात्मात जाणं बायकांना किती सोपं आहे. संसार असार आहे वगैरे. सगळं सोडून बायका हिमालयात तरी का गेल्या नसाव्यात? जावून तिकडेतरी शोधा की मोक्ष बिक्ष काय आहे ते!

सतत दुय्यम होऊन राहणं का स्वीकारतात त्या?

आपल्याकडे बायकांनी विचार करावा, प्रश्न विचारावेत, बदलाची अपेक्षा ठेवावी.... असं काही वाढवलंच जात नाही त्यांना.

************

Friday, May 21, 2010

मी बाई आहे याचा मला अर्थातच आनंद होतो, समाधान आहे.

स्त्रियांच एकंदरीतच समाजातील स्थान मग ते पूर्विच्या काळापासून ते आत्ताच्या आधुनिक काळार्यंत कशाप्रकारे होत/आहे ह्याचा विचार मी स्त्री म्हणून जास्त समजून करु शकते असं वाटतं. परिस्थिती बदली तरी अजूनही कुठल्याना कुठल्याप्रकारे अत्याचार हे वेगवेगळ्या पध्दतीने होतच आहेत ह्याचा खेद वाटतो.

स्त्री म्हणून काही आलेले अनुभव, मनावर कोरल्या गेलेल्या घटना, वाचनातील प्रसंग ह्यातून एक दहशत ही सतत आपल्या बाजूला वावरत असतेच. आताच्या काळात कणखर स्त्री ही त्याला प्रतिकार करुन उभी राहू शकते. पण अजूनही पन्नास टक्के स्त्रीया असहाय्य असतात ह्याची टोचणी सतत मनात जाणवते.
स्त्री व पुरुष यांची निसर्गत:च शारीरिक ठेवण भिन्न असल्यामुळे प्रत्येकाची बलस्थान वेगवेगळी आहेत. ती त्यांच्या क्षमतेनुसार आहेत. मग ती ताकद असो अथवा सहनशीलता. त्यामुळे श्रेष्ठत्वाचा निकष आपण लावू शकत नाही. पण बौध्दिक, मानसिक क्षमता ह्या दोघांच्याही तुल्यबळ आहेत. आणि तरीही ब~याच अंशी अनेक सामाजिक स्तरात स्त्रीच्या ह्या क्षमता स्विकारताना कुठेतरी नकार दिसतॊ ह्याच वाईट वाटतं.

स्त्री होणं किंवा पुरुष होण हे नैसर्गिक आहे. त्याचा फायदा / तोटा असा विचार न करता दोघांनाही समाजाने निर्माण केलेल्या प्रथांना, येत असलेल्या अनुभवांना सामोरे जावेच लागते. मी स्त्री म्हणून माझ्या मनात कायमची भिती, ताण निर्माण करणारे अनुभव खालील प्रसंगातून घेतले आहेत -
- गर्दीतून जाताना - बसमधून प्रवास करताना - रेल्वेतून रात्रीचा प्रवास करताना - N.C.C. मधे जवानांबरोबर वावरताना. त्या त्या वेळी मी प्रतिकार जरुर केला पण एक भिती बाळगूनच. तेव्हा ह्या पुरुष जातीचा खूप संताप आला. ह्या उलट माझ्या संपर्कातील सर्व पुरुष हे अत्यंत संवेदनशील व समानता मानणारे आहेत. दुस~या बाजूने विचार केला तर मी आज स्त्री आहे म्हणून मी माझ्या भावना मोकळेपणाने व्यक्त करु शकते, मात्त्रुत्वाचा सुखद अनुभव घेऊ शकते ह्याचं मला समाधान मिळतं.
ह्या जन्मात मी स्त्री म्हणून जन्मले आणि म्हणूनच मी तिला पूर्णत: समजू शकले. त्यामुळे पुढच्या जन्मी मला पुरुष म्हणून पण अनुभव घ्यायला आवडेल. एकंदरीतच ह्याबाबतीतली नैसर्गिक व सामाजिक रचना जास्त जवळून तपासता येईल असे वाटते.

पण आज मी स्त्री आहे ह्याचा मला अत्यंत आनंद होतो. त्यामूळेच मी खूप समाधानी आहे.

Saturday, May 15, 2010

मनापासून वाटले ते.....

दररोज सकाळी आयता चहाचा कप हातात येणे,आरामात पेपर वाचन करणे, फक्त स्वत:चेच आवरणे, आयता नाष्टा- जेवण घेणे, मनात येईल तेव्हा कोठेही कसेही पाय पसरुन बसणे, मनात येईल तेव्हा आराम करता येणे, मनाला वाट्टॆल तेव्हा ,वाट्टॆल तितकी झोप घेता येणे,मानसिक शारीरीक ताण कमी करण्यासाठी आपले आवडीचे छंद जोपासणे,चप्पल पायात घातली की घराबाहेर पडता येणे,आठवड्याची एक अशी हक्काची सुट्टी मिळणे,व ती सुट्टी फक्त आठवडाभर दमलो या कारणाने सत्कारणी लावणे,रात्री उशिरा पर्यंत घरी आले तरी चालणे, मित्रांबरोबर कटटयावर चकाटया पिटत बसणे, मनात येईल तेव्हा शिट्टी मारता येणे, जोरात आळस देता येणे, चारचौघांच्या समोर जांभई देता येणे, ढेकर देता येणे,आणि पादता येणे , उन्हाळ्यात उघडे बसता येणे,महीन्याच्या त्या अडचणींचे चार दिवस वाटयाला न येणे, मासिक पाळीचा शारीरीक व मानसिक होणारा त्रास वाटयाला न येणे, अशी एक ना अनेक उदाहरणे बघितली की मला नेहमी वाटते की मी पुरुषाच्या जन्माला आले असते तर बरे झाले असते.
या उलट मी स्त्री आहे याचा मला निश्चित अभिमान वाटतो.कारण आयुष्यातल्या स्त्रीच्या वाट्याला येणा-या प्रत्येक भुमिकेत मिळणारे समाधान. म्हणजे कधी मी कुणाची मुलगी, तर कोणाची बहीण, तर कोणाची बायको, तर कोणाची आई असते.आणि या नात्यांमध्ये असणारा ओलावा मला भावतो. या प्रत्येकात स्त्री म्हणुन असलेली माझी गुंतवणूक महत्वाची वाटते. मी स्त्री आहे याचा निश्चित अभिमान आहे कारण मी माझ्यातून स्त्री-पुरूषाचे प्रतिक म्हणून एका नव्या जीवाला जन्म देऊ शकते. एकाच वेळी अनेक कामांवर लक्ष केंद्रीत करून ती चोख बजावण्याचे सामर्थ्य स्त्रीयांमध्ये असते, संसार (मुले वाढवणे, त्यांची आजारपणे, त्यांचा अभ्यास, इ. अनेक अश्या अर्थी) आणि नोकरी अश्या अनेक गोष्टींसाठी लागणारी मॅनेजमेंट ही स्त्रीयांकडे उत्तम असते असे मला वाटते.
स्त्री असणे व पुरुष असणे या दोन्ही गोष्टी ज्याच्या त्याच्या जागी योग्य व श्रेष्ठ आहेत असे माझे मत आहे.प्रत्येकाचे नक्कीच फायदे व तोटे आहेत. म्हणूनच निसर्गत:च काही गुणधर्म हे स्त्री व पुरुषांत वेगवेगळे असतात ते आपण मान्य केले पाहीजे.

Thursday, May 13, 2010

मी बाई आहे याचा मला आनंदच होतो.

मी बाई आहे याचा मला आनंदच होतो.

बाईचं आयुष्य अधिक समृद्ध असतं पुरूषाच्या आयुष्यापेक्षा. नैसर्गीकदृष्ट्याही आणि सामाजिकदृष्ट्याही. अधिक सुखाचं असतं असं नाही म्हणत आहे मी, पण समृद्ध नक्कीच असतं.

बाई ही कायमच कमी दर्जाची समजली गेली आहे. माणसाच्या इतिहासात (HIS-STORY) बाईच्या कामाची कुठे नोंदच केली गेलेली नाही. बायकांनी लावलेला टोपलीचा शोध असो की शेतीचा शोध असो, पुसले गेले. व्यवस्थाच अशी बनवली गेली की फक्त घराबाहेरच्या कामांची नोंद होते. बायकांना वर्षानुवर्ष घरकामालाच जुंपलं गेलं आहे. त्यांना संधीही सहज मिळत नाही. आजचं हे जग मुख्यत्वे पुरूषाच्या कर्तृत्वावर उभं आहे. बायका सहकारी असतील पण नेतृत्व पुरूषांच आहे.

मला बरं वाटतं मी पुरूष नाही ते. या जगाचं जे वाट्टोळं केलं आहे, तेही पुरूषांनीच ना? बहुसंख्य दहशतवादी पुरूष आहेत, बहुसंख्य सैनिक पुरूष आहेत, बहुसंख्य राजकारणी पुरूष आहेत. बलात्कार करणारे तर पुरूषच असतात फक्त.

मला बाई असण्याचं समाधान वाटतं. त्यात अश्विनी म्हणते तसं निर्मितीची क्षमता हे एक आहे, पण तेच एक नाही.( त्याआधारे बायकांची केली जाणारी वर्गवारी मला मान्य नाही.)  समजून घेण्याची क्षमता वगैरे मिलिन्द म्हणतो तसं सामाजिक घडणीने लादलेल्या गोष्टी आहेत. मग माझं बाईपण कशात आहे?केवळ शारिरिक फरकात? हो, आदर्श समाजव्यवस्थेत ते तेव्हढ्यातच असेल.पण आजच्या समाजव्यवस्थेत मला ते सारखं लक्षात ठेवावं लागतं.

मला केवळ एक चांगलं माणूस म्हणून जगायचं आहे. आपण समाजात समानतेचं वातावरण आणू शकलो तर तुम्ही बाई असा की पुरूष असा तसा फरक पडणार नाही.

बाई असण्याचे तोटे हे आहेत, प्रतिष्ठा आणि आत्मसन्मान तुम्हांला सहजी मिळत नाही, कमवावा लागतो. तुम्हांला कायम आवरून सावरून राहावं लागतं, पावित्र्य जपणे, पुरूषांपासून सांभाळून राहणे या आणखी काही गोष्टी. दुय्यमत्व स्वीकारावे लागते.
बाई असण्याचे फायदे असे आहेत की, कमावण्याचं, कर्ते असण्याचं दडपण नसतं. अपेक्षांचं दडपण कमी असतं. यादी वाढवता येईल पण ही सगळी कारणे आपल्या आजच्या समाजव्यवस्थेमुळे आहेत.

स्मिताने लिहीलं आहे तसं प्रत्येकात काही खास स्त्रीचे मानले गेलेले गुण असतात तर काही खास पुरूषाचे मानले गेलेले गुण असतात. (मानले गेलेले यासाठी की तसं च घडवलं जातं.) पण समाजात स्त्रीचे तथाकथित पुरूषी गुण आणि पुरूषाचे तथाकथित स्त्रीत्व प्रगट करणारे गुण जाहीरपणे स्वीकारले जात नाहीत.

मी तेच तर म्हणते आहे, मला माझ्या गुणावगुणांसह मोकळेपणाने एक माणूस म्हणून जगायचं आहे.

मी एक बाई आहे, मी वेगळी आहे पुरूषांपेक्षा, माझं कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी म्हणून मला पुरूष व्हायचं नाहीये.

तथाकथित पुरूषांचं मानलं गेलेलं क्षेत्र निवडायचं, तिथे त्यांच्या नियमांनी खेळून आपला ठसा उमटवून स्वत:ला सिद्ध करायचं. हा मार्ग जुना झाला. जिथे तिथे ’प्रमाण’ पुरूष आहे. हे जगच बदलायला हवं. जरा आमच्या डोळ्यांनी बघायला जगाने शिकायला हवं.

अश्विनीने लिहिलंय तसं ’नको हे बाईपण’ असं वाटणारे प्रसंग माझ्यावरही आले नाहीत. नको ते पुरूष असं म्हणायला लागावं असे पुरूषही माझ्या वाट्याला आले नाहीत.

खरं म्हणजे माझ्या जवळच्या वर्तूळातले पुरूष फारच चांगले आहेत. माझ्याशी तरी चांगलेच वागलेले आहेत. बाबा माझ्याशी समानतेने वागले. मिलिन्दच्या डोक्यात समानतेचा तराजू पक्का आहे. तो माझ्याशीच समानतेने वागतो असे नाही तर त्याच्या बहीणींशी, इतर नात्यातल्या, ऑफीसमधल्या स्त्रीयांशी पण समानतेने वागतो, हे मला महत्त्वाचे वाटते.( माझ्याही समोर कोणी अन्यायी पुरूष नाही, ज्याला मी जबाबदार धरू.) माझा राग व्यवस्थेवरच आहे.

बाईपण श्रेष्ठ की पुरूषपण? हे ठरवता येणं अवघड आहे. पण निकाल देणं अनिवार्य असेल तर मी तो बाईच्या बाजूने लावेल.

मिलिन्दला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणाला निर्विवादपणे स्त्री. कारण विचारल्यावर म्हणाला,” बायकांची स्वत:ला विसरून दुसर्‍याच्या भुमिकेतून विचार करण्याची क्षमता आणि निरनिराळ्या रूपांमधे वेगवेगळ्या नावांनी (वात्सल्य, ....) अमर्याद प्रेम करण्याची शक्ती.

Tuesday, May 11, 2010

-o-o-o-

मी भाग्यवान आहे.. मी मुलगी म्हणून जन्मले. मी जशी आहे तशी मला आवडते. माझ्या गुणदोषांसकट आवडते. मला माझी बलस्थाने माहिती आहेत आणि उणीवाही ठाऊक आहेत. काही उणीवा मी प्रयत्नपूर्वक दूर करू पाहाते तर काही तशाच सांभाळते. मला तडजोडी कराव्या लागतात. कधी दोन पावलं मागं यावं लागतं. कधी काही संधीही गमावाव्या लागतात. याचा त्रास तर होतोच. खंतही वाटते.
तडजोडी, संधी गमावणं, माझ्यातल्या उणीवा, यांचं कारण प्रत्येक वेळी माझं बाईपण हेच असतं? नक्कीच नाही.
माझ्या भोवतालची परिस्थिती, व्यवस्था कारण असतं त्यामागे? मग का मी त्या व्यवस्था मानते? का नाही झुगारुन देत? पुन्हा बाईपण आडवं येतं?
जेव्हा हीच व्यवस्था, परिस्थिती (कधीकधी) पुरुषांनाही तडजोडी करायला लावते, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक पुरुष तरी कुठे व्यवस्थेला आव्हान देतो?
मग परिस्थिती बदलता न येणं ही बाईपणाची उणीव? की माझी व्यक्तीगत उणीव? की जी व्यवस्था बाईपणाला दुय्यम स्थान देते त्या व्यवस्थेची उणीव?
’नको हे बाईपण’, ’जळ्ळा मेला बायकांचा जन्म’ असं वाटायला लावणारे प्रसंग माझ्यावर कधी आले नाहीत हे खरंच, पण समजा तसे आले, तरी मी बाईपणाला दोष नाही देणार. मी ज्या समाजात रहाते, तिथे असणारं बाईचं दुय्यम स्थान, तिला कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी, तिचे भोग हे त्या व्यवस्थेतील दोषांमुळे आहेत. ’नको हे बाईपण’ असं म्हणताना मी नकळत पुरुषी श्रेष्ठत्वच मान्य करते. बाई म्हणुन असणार्‍या माझ्या क्षमतांना कमी लेखत असते.
अरुणा ढेरेंची एक कविता आहे -
काळोखाचेप्रचंड ओझे
उचलून...वर्षानुवर्ष...
चालत रहातात बायका
आयुष्याचे डोंगर
चढतात...उतरतात...
उतत नाहीत की मातत नाहीत
निर्मळ हातांनी
अवजड ओझे सावरत जातात.
या कवितेतल्या बायका मी माझ्या आसपास, कुटुंबात खूप बघितल्या. त्या काही फ़ार शिकलेल्या नव्हत्या. धो धो पैसा कमावत नव्हत्या. पण त्यांनी त्यांचं घर आपल्या खांद्यांवर उभं केलं होतं. एकटीच्या बळावर उभं केलं होतं. त्यांचे पुरुष हरलेले होते. कोणी व्यसनात बुडालेले होते, कोणी जुन्या वैभवाच्या भ्रामक जगात वावरत होते- वर्तमानात जगायलाच तयार नव्हते. या बायका मात्र लवचिकपणे सगळे आघात पचवत पुन्हा पुन्हा उभ्या रहात होत्या. स्वतःबरोबर संसार सावरत होत्या. मुलांना घडवत होत्या. काय होतं त्यांच्याकडे? त्या काळोखाचे ओझे त्या उचलू शकल्या ते त्यांच्या अंतरीच्या उजेडाच्या जोरावर. त्यांच्या बाईपणाच्या जोरावर. भोवतालचा काळोख उजळून टाकण्याचीही शक्ती त्या उजेडात होती. पण व्यवस्थेच्या पोलादी भिंतींनी तो उजेड झाकोळून टाकला होता. भिंतिंआडचा उजेड मात्र त्यांना बळ देत राहिला. बाईपणाबरोबर येणारी शरीर-मनाची लवचिकता, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृती, आहे त्या परिस्थितीशी कधी जुळवुन घेत, कधी दोन हात करत पाय़ घट्ट रोवुन उभं रहाणं ही त्यांची शक्तीस्थानं होती. ती त्यांना त्यांच्या बाईपणानं दिलेली होती.
बाईपण जसं या शक्ती देतं तसंच एक वेगळं, तरल, संवेदनशील, भावगर्भ अनुभवविश्वही मला देतं. माझ्या शरीरात निसर्गानं काही वेगळ्या योजना, रचना केल्या आहेत. मी माझ्यात एक नवीन जीव सामावून घेऊ शकते. त्याला पोसू शकते, वाढवू शकते. बाहेरच्या जगात आणू शकते. याच नैसर्गिक क्षमता मला आणखीही काही देतात. मी माझ्याबरोबरच्यांचा स्वतःपलिकडे जाऊन विचार करु शकते. त्यांना जास्त चांगलं समजुन घेऊ शकते.
बाईपणाचा मला अभिमान असला तरीही श्रेष्ठत्वाचा वाद मात्र मला निरर्थक वाटतो. निसर्गानं तर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी विभागणी स्त्री-पुरुषात केलेलीच नाहीये. तिथे क्षमतांचं परस्परपूरकत्व मात्र आहे. मी बाई म्हणुन पुरुषापेक्षा श्रेष्ठही नाही आणि हीन तर मुळीच नाही. पण बाईपणाला झाकोळून टाकणार्‍या त्या पोलादी भिंतींचं काय करायचं? अजून किती काळ आणि किती शक्ती जाणार त्यांना उखडून काढण्यात? पण त्या उखडुन काढता येत नाहीत, तोवर काळोखाची ओझी वाहाणं अटळच.

Sunday, May 2, 2010

मनोगत

स्त्री किंवा पुरूष असणे हे आपल्या मर्जीवर अवलंबून नाही. पण निवडीचे स्वातंत्र्य असते तरी मला स्त्रीच व्हायला आवडले असते. हा विषय विद्याने सुचवला तेव्हा पहिला विचार हाच आला.

नंतर जेव्हा खोलवर विचार सुरु केला तेव्हा जाणवले की स्त्री आणि पुरूष यांच्यात शारिरीक भेद असले तरी मानसिकदृष्ट्या पाहिले तर प्रत्येकात थोडी स्त्रीची व थोडी पुरूषाची मानसिकता असतेच. विविध प्रसंगानुरूप ज्याची त्याची जी गरज असेल त्यानुसार हे प्रमाण कमी जास्त होत असते.

काही गोष्टी स्त्रियांनाच जमतात किंवा त्या त्यांनीच करायच्या आणि काही गोष्टींत पुरुषांची मक्तेदारी आहे म्हणून तेथे स्त्रियांनी वळायचेच नाही असे असू नये. आणि त्यासाठी स्त्री असो वा पुरूष, कुठेतरी ह्या गोष्टींचा स्वीकार करायची मनाची तयारी किंवा मोकळेपणा असावा.

उदाहरण द्यायचं झालं तर दुःखाच्या क्षणी रडणे ही गोष्ट स्त्रियांकडून अपेक्षित असते पण कधीकधी आपल्या दुःखाला वाट करून देण्यासाठी काही अश्रू पुरुषांच्या डोळ्यांतून ओघळले तर त्यात काय काही चुकीचे नाही. तसेच आयुष्यात एखाद्या कसोटीच्या क्षणी पुरुषाने कणखर रहायचे आणि स्त्रीने कोसळून जायचे असेच असायला हवे असे नाही. उलट स्त्रीने कणखरपणे उभे राहून पुरुषाला आधार दिला तरीही चालण्यासारखे आहे.

एकूणच मला असं वाटतं की मी स्त्री असले तरी ते स्त्रीपण मी कसं स्वीकारते आहे हे अधिक महत्वाचे आहे. स्त्री असण्याचे फायदे तोटे स्वीकारूनही सर्वांगाने संपूर्ण असे जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मी पुरुष असते (की असतो?) तरी मला वाटतं की मी हाच विचार केला असता.

Friday, April 30, 2010

लग्न:-- ठरवणे, करणे, मोडणे, टिकवणे...वगैरे वगैरे

अभिनवमधे मुक्ताचा पहिला दिवस. तिला सोडायला मी शाळेत गेले होते. तिथे मला माझी शाळेतली मैत्रीण भेटली. तिच्या मुलीला सोडायला आलेली. दहावी नंतर एकदोनदाच आम्ही कुठे बाहेर, बाजारात वगैरे भेटलो असू.
अभिनवमधेही आमचा आयांचा एक गट होता. आम्ही वारंवार भेटायचो, काही कार्यक्रम ठरवायचो. शिवाय मुलामुलींचे वाढदिवस वगैरे असायचे. आमच्या छान गप्पा व्हायच्या. एका वाढदिवसानंतर आम्ही बरोबरच बाहेर पडलो, पार्कींगमधे गाड्या काढत होतो, आमच्या मुली तिथेही खेळत होत्या. मैत्रीण म्हणाली,’ विद्या, मला घरी जावसंच वाटत नाहीये. काय म्हणून मी तिथे जाऊ? मला काही स्थानच नाही त्या घरात. घरात फिरताना देखील माझा नवरा सहा इंच दूरून जातो, माझ्याशी कामापुरतं बोलतो, सासू आणि नवरा मिळून घरातल्या गोष्टी ठरवतात. मी कुणीच नाहीये त्यांची.’ मी थांबले, तिच्या पाठीवर हात ठेवला, थोपटलं. यापलीकडे मी काय धीर देऊ शकणार होते? उशीर झालेला, बहुदा त्यावरूनच बोलणं निघालं असेल.
ही हसती खेळती माझी मैत्रीण , ती स्वत: बोलली म्हणूनच त्यावर विश्वास ठेवायचा, नाहीतर कुणाला खरं वाटणार नाही. घरी आले पण मला काही सुचेना. आपण स्वत:च्या आयुष्याचंही भलं करू शकू याची खात्री नसते, दुसर्‍यांच्या बाबतीत तर असहाय्यच असतो, मदत तरी काय करायची?........ ऎकून घ्यायचं. मी तेच केलं. पुढे आम्ही दोघी ठरवून भेटलो, ती बोलत होती, मी ऎकत होते.

नवरा म्हणून, वडील म्हणून, घरातली कुठलीही जबाबदारी तो घेत नव्हता. बॅंकेत नोकरी करतो, जरूरीपुरते पैसे दिले की त्याचं काम संपलं. मैत्रीण वकील आहे, तिच्यापुरतं कमवायची. सासू दोघांमधे समेटाचा प्रयत्न करत नव्हती, उलट दोघे दूर जायला हातभारच लावत होती.
हिला त्रास होता, पण माहेरी काही बोलली नव्हती. लग्नानंतर वर्षाच्याआत मुलगी झाली. मुलगी सहा महिन्यांची असेल, तिच्या बाबांनी औरंगाबादहून बसचं रिझर्वेशन केलं, तिने फोन करून कळवलं, ’या गाडीने येतोय असं.’ तर म्ह्णाला,’ कशाला येतेस? नाही आलीस तरी चालेल.’ आता काय करायचं?म्हणजे निघताना काही भांडण झालेलं नव्हतं, कधी इतक्या टोकापर्यन्त बोलणं गेलं नव्हतं आणि अचानक असं!! मग तिला आईबाबांना सांगावं लागलं. अशा त्याच्या कितीतरी गोष्टी होत्या.तेंव्हा समेट झाला पण नंतर आणखी काही उभं राहिलं.

मैत्रीणीची जुळवून घ्यायची खूप इच्छा होती. तिला वाटायचं मुलीला बाबा हवा. हा तर अजिबात मुलीत गुंतलेला नव्हता. कितीतरी घरं मुलांमुळे उभी असतात. आम्ही दोघी जीवनसाथमधे शोभा भागवतांकडे गेलो, त्यांनी सगळं ऎकून घेतलं. एका मानसोपचारतज्ञ/ समुपदेशकाचा सल्ला घ्यावा, असं सुचवलं, त्याच्याकडे गेलो. नेहमीच ज्याला खरी समुपदेशनाची गरज असते, तो कधीही स्वत:हून पुढे येत नाही, त्याच्या जोडीदाराने येऊन फारसा फायदा होत नाही. आणखीही प्रयत्न केले. वेगळं होण्याचा निर्णय तिला घेता येत नव्हता. कधीही कुठलाही निर्णय अगदी बरोबर असा नसतोच, त्या वाटेवर नकोसंही काय काय असतंच. कुठलाही निर्णय घेतला तरी डोळसपणे घ्यायचा, त्याचे फायदे- तोटे स्वीकारायचे, त्याची जबाबदारी घ्यायची आणि ठामपणे पुढे जायचं, हे ज्याचं त्यालाच करावं लागतं. आपण कुणाच्याही आयुष्याची जबाबदारी घेऊ शकत नाही, दोन्ही वाटांवरचं चित्र फारतर स्पष्ट करू शकतो, निवड जिची तिने करायची. कधीतरी तिला पटलं, वेगळं व्हायला हवं.
आता ती प्रक्रिया सुरू आहे.

----------

माझ्या मैत्रीणीचं मला खूप कौतुक वाटतं. ती या सगळ्या काळात धीराने वागली. सुरुवातीला तिला हे अवघड जायचं, सारखं रडू यायचं, त्याच्याशी नीट भांडताही यायचं नाही, ताणाचे काही काही शारीरिक परीणाम दिसायला लागले होते, हळूहळू ती यातून बाहेर आली. तिचं आणि मुलीचं छान जग उभं केलं. आई-बाबा पाठीशी आहेत, पण त्यांच्या घरी राहायला गेली नाही. स्वतंत्रपणे राहते. एक पालक असणार्‍यांचा एक गट आहे, तिथे सक्रिय आहे. वकीलीतही जम बसतोय, दोघींपुरतं आरामात कमावते.


----------------


आम्ही सारखं त्यावर बोलत होतो, या लग्नाचं कुठे काय चुकलं?
खरं म्हणजे लग्नाआधीही काही थोड्या गोष्टी लक्षात आल्या होत्या, त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं.
हे टाळता कसं आलं असतं?
काही गोष्टींबाबत त्याची मतं काय आहेत? लग्नाकडे तो कोणत्या दृष्टीने पाहतो? हे समजून घ्यायला हवं होतं.
पत्रिका, काही मुलं पाहिल्यावर आता जमायलाच हवं चा ताण, घाई , हे टाळता आलं असतं.

--------------

लग्नासारखी गंभीर गोष्ट आपण गांभीर्याने कधी घेणार?
स्वत:ला ओळखणं, आपल्याला काय हवं आहे, हे ओळखणं, जोडीदार कसा हवा आहे हे ठरवणं, त्याला शोधणं. ह्या यातल्या पायर्‍या आहेत.
लग्न यशस्वी (निदान टिकाऊ म्हणू या) होण्यासाठी हे अपरिहार्यच आहे.
कुणा एकाच्या त्यागावर चालणारी घरं, यापुढे टिकण्याची शक्यता कमी आहे.

--------------
लग्नाच्या खरेद्या, कपडे, दागिने, समारंभ यापेक्षा महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, हे आपण लक्षात घ्यायला हवं. विवाहपूर्व समुपदेशनाला पर्याय नाही. लग्न आपण का? कशासाठी करतो आहोत? त्यानंतर आयुष्य कसं बदलणार आहे, कुठल्या तडजोडी कराव्या लागतील त्यातल्या कुठल्या मी करणार नाही, ही सारी स्पष्टता लग्नाआधी असायला हवी.

-------------
आपणही एकदा भागवतांची ती ’प्रश्नपत्रिका’ सोडवायला हवी. स्वत:ला, जोडीदाराला ओळखण्याच्या प्रक्रियेत कुठेतरी सवयीने थांबून गेलेलो असू कदाचित! पाणी वाहतं राहायला मदत होऊ शकेल.



*******************



आपल्याकडे आईवडील आणि त्यांची मुलं (एक किंवा दोन) हे एक आदर्श कुटूंब म्हणून सारखं थोपलं जातं. त्याचीच प्रतिबिंबं जिकडे तिकडे दिसत असतात. जाहिरातींमधलं सुखी कुटूंबाचं चित्र बघा. त्यामुळे काय होतं? अविवाहित, परित्यक्ता, मुले नसणारी, एक पालक असणारी कुटूंबे आपण परीघावर ढकलतो. त्यांची जगण्याची पद्धत कम अस्सल ठरवतो. ती फक्त वेगळी आहे असं समजून सामावून का घेत नाही?
माझी मैत्रीण आणि तिची गोड मुलगी जेंव्हा टीव्ही बघत असतील, तेंव्हा त्यांनी त्या जगाशी कसं नातं जोडायचं?


***************

जरा विचार करु या-३

मुळात बाई बाईत फरक हा अनेक गोष्टीत आणि अनेक प्रकारे केला जातो.म्हणजे ती एखादी कामवाली, अडाणी, अशिक्षित, शिकलेली,घर सांभाळणारी अथवा नोकरी करणारी.मुळात त्या बाईशी वागणारी आजूबाजूची मंडळी(त्यात दुसरी स्त्री पण आली) ही तिचा दर्जा......ती मिळवत असलेला पैसा(मग तो चार घरची धुणं-भांडी करुन मिळवलेला असो वा नोकरी करुन)आपल्याला ती स्त्री कीती आणि कशी कामास येते यावर ठरवत असतात.मग त्या स्त्रीचे समोरच्या व्यक्तीशी नाते कोणतेही असो.ती त्याच्या अपेक्षेप्रमाणे पात्र ठरली तर ती चांगली नाहीतर तिला कोणीही यावे कसेही बोलावे व तिच्याशी कसेही वागावे हे ठरलेले असते. यात तिच्या स्वत:चा असा विचार करणारी व्यक्ती आपल्याला पहायला मिळत नाही.हा फरक समाजात अनेक थरांमध्ये वेगवेगळा आढळतो. म्हणजे काही घरांत जिला मुलगा आहे, जी कमावती आहे, जी घरात आपण म्हणू त्याला मान डोलावते,जी आपल्या तालावर नाचते अश्या स्त्रीया या त्यांच्यामते श्रेष्ठ असतात.याउलट जिला मुली आहेत,जी घर सांभाळते पण पैसे कमावून आणत नाही,इतरांचा विचारांबरोबर स्वत:चा विचार सुद्धा करते,व सगळ्यांसमोर आपले मत मांडते.अश्या स्त्रीयांना मिळणारी वागणूक ही नेहमी वेगळी असते.मला वाटतं की एक स्त्री आयुष्याच्या ज्या प्रवासातून जात असते तिने दुस-या स्त्रीला मग ती कोणत्याही जातीची असो, सुशिक्षित असो, वा कोणत्याही थरातील असो. तिला जाणून घेणे हे इतरांपेक्षा एका स्त्रीला खरतर सोपे जायला हवे. पण समाजात हे चित्र आपल्याला खूप कमी ठीकाणी बघायला मिळते. ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

Saturday, April 3, 2010

जरा विचार करू या - २

आमच्या मावशी, आम्ही सर्वत्र मधे राहायला आलो तेव्हापासून आमच्याकडे येतात. तेव्हा त्यांच्यासोबत त्यांची मुलगीपण यायची. काम स्वच्छ, नीटनेटकं, जास्त बोलणं नाही की चौकशा नाहीत.


हळूहळू त्या रूळल्या, मग काही काही बोलायला/ सांगायला लागल्या. आधी धाकटी दोन मुलं गावाकडे शिकत होती. मावळात त्यांचं गाव. त्या मुलांना शिकायला इकडं आणलं. मोठा मुलगा आणि मुलगी आधीच इथे आले होते. नवरा मुंबईत गिरणीत होता. सगळे गिरणीकामगार बेकार झाल्यावर हे कुटूंब काही दिवस गावात राहून नंतर इथे आले. नवर्‍याला दारूचं व्यसन. तो काहीच काम करत नाही, इतक्या वर्षात दोन-तीन वर्षे काहीतरी काम केले असेल.

मोठ्या मुलाने दहावीनंतर शाळा सोडली, नोकरीला लागला, मावशींना जरा त्याचा आधार. तो वूडलॅन्ड मधे वॉचमन होता. काही गुंड कुणाशीतरी भांडण म्हणून सोसायटीत घुसले, हा त्यांच्यामागे धावला, प्रतिकार करत होता तर त्यांनी यालाच मारले. तो गेला. मावशी खचल्या, म्हणाल्या मी आता या गावात राहात नाही. मावळात परत गेल्या. महिन्या दीड महिन्याने परत आल्या. तिकडे बसून राहून खायला काय मिळणार? पुन्हा माझ्याकडे यायला लागल्या. कुठे कोर्टात केस करणार? संबंधीत मंडळी म्हणाली पैसे देतो, यांनी मान्य केलं. खूप मागे लागल्यावर ठरलेल्या एक लाखापैकी नव्वद हजार मिळाले. चाळीस हजारात लेकीचं लग्न केलं. चाळीस हजारात सुतारदर्‍यात जागा घेतली. उरलेले उडवले नवर्‍याने. निदान जागा घेतली गेली.

सगळ्यात धाकट्याला कांजिण्या झाल्या, ताप मेंदूत गेला तो हातपाय वाकडे करू लागला. मी हे रोज ऎकत होतेच, नीट चालत नाहीये म्हंटल्यावर मी त्याला मुक्ताच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले, पुढे न्युरोसर्जन आणि काय काय तपासण्या, पंधरा दिवस दवाखान्यात, मग बरा होऊन घरी आला, वाचला. त्याचे लाड वाढले, अभ्यासातलं लक्ष कमी झालं.

दुसरा अभ्यासात बरा आहे, त्याच्याही परीक्षांच्या वेळेस बापाचा पिऊन गॊंधळ, भांडणे.

मग शेती विकून घर बांधायचे ठरवले, आता पैसे येणारच म्हणून नवर्‍याची दारू, उधारी वाढली.

आम्ही इकडे राहायला आलो. मावशींना म्हंटले तुम्हीच या इकडे. त्यांना पायी बरंच दूर पडतं, पण येतात. मग इथेच आणखी दोन कामे पाहून दिली, त्यांनी मयूर कॉलनीत जाणे सोडले.

खूप प्रयत्नांनी शेती विकली गेली, आलेल्या दीड-दोन लाखात पत्रे घालून घर बांधलं. मोठ्याला दहावीला चांगले मार्क्स मिळाले, तो बारावी करून आता BCS करतोय, अर्धवेळ नोकरी करतोय, तरी महागाई इतकी वाढली आहे, घर चालवणं अवघड जातं.

त्या जरा स्थिरस्थावर झाल्या की काहीतरी संकट उभं राहतं, नवर्‍याची उधारी, नाहीतर दारू, नाहीतर आजारपण.परवा म्हणाल्या, ” घरात अगदी दाणा नव्हता, कुणाकडून तरी शंभर रूपये उसने आणले, त्यातनं किलोभर गहू, साखर आणि असाच काहीतरी किराणा आणला, सत्तर संपले, तीस उरले तर धाकट्याला बरं नाही दोन दिवसांपासून म्हणून दवाखान्यात पाठवला.” त्यांना रोज भाजी खाणं शक्य होत नाही. समतोल आहाराचं काय? धाकट्याला कावीळ आहे म्हणून डॉक्टरांनी सांगीतलं. तपासण्या करायला सांगीतल्या. ’दैव कसं कुठूनही मारायलाच बघतय’ म्हणत होत्या.

आज तपासणीचे रिपोर्ट आले. त्यांना सोडायला आणि रिपोर्ट बघायला गेले होते. ऎरवी कधी सोडायला गेले तर त्यांना शिवतीर्थनगरच्या रस्त्यावरच सोडते. आज घरी गेले. इतके आत आत घर आहे, मला सापडले नसते. रिपोर्ट पाहिला. हिमोग्लोबीन ६.४ आहे, WBC खूप कमी आहे. डॉक्टरांनी अ‍ॅडमीट व्हायला सांगीतलं आहे.

काय करायचं या बाईने आता?

मी तरी काय करते? करू शकते? हवे तेंव्हा हात उसने पैसे देते, त्यांना बरं वाटावं असं बोलते, त्यांचं ऎकून घेते, त्या नाही आल्यातरी चालवून घेते. यापलीकडे काय??



गेल्या दहावर्षात माझं आयुष्य कसं गेलं? संथ, निवान्त.

का? माझ्या जातीमुळे? माझ्या शिक्षणामुळे?

बाई बाईच्या आयुष्यात इतकी तफावत का असते?

त्यांनी माझ्याघरी काम करावं, असं मी काय कमावलंय? मी त्यांना कामाचे मोल देऊ शकते, तेही स्वत: कमावून नाही तर माझा नवरा कमावतो म्हणून!

जगण्याच्या प्राथमिक गरजांसाठी मला झुंजावं लागत नाही, म्हणून मला इतर गोष्टी सूचू शकतात.

मी जे माझे प्रश्न म्हणते ते मावशींच्या खिजगणतीत तरी असतील का?

ते माझे प्रश्न तरी खरे की आभासी?



*****************



आत्ता जरी मला याचा त्रास होत असला तरी हे लिहून झालं की मी उठेन. सचिनकडे कांदाभात न्यायचाय म्हणून कांदा बारीक चिरेन. मन लावून भात करेन. तिथे गेल्यावर मजेत गप्पा मारेन, एका कोपर्‍यात मावशींना आठवत असले तरी.

मावशी कुठ्ला दवाखाना स्वस्तात पडेल याचा विचार करत असतील.

त्या कुठे घरगुती/ अंधश्रध्देचे उपाय करत नाहीयेत याचं बरं वाटून घेईन.

Tuesday, March 30, 2010

जरा विचार करू या -- १

बाई घरात/ कामात इतकी का गुंतून असते? पुरूष का नसतॊ?

मी यावर जरा विचार केला, कुठल्या निष्कर्षाला पोचले असे नाही, सर्व बाजूंनी तपासून पाहिलंय असंही नाही. जो विचार केलाय तो तुमच्यापर्यन्त पोचवावा असं वाटलं. आपल्याला मिळून काही ठरवता येईल का बघूया.

आपण जेव्हा इतरांच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या घरी केलेल्या मदतीचं आपल्याला ओझं वाटत नाही. सांगतील ती मदत तशीच/ तेव्हढीच करायची. आपल्या घरी काम वाटतं कारण केलेलं सगळं पुरेल (फार उरणार नाही ना?) ना? आवडेल ना? ही जबाबदारी आपली असते. कुणाला जेवायला बोलवायचं ठरवलं तर फक्त स्वैपाक करणं एव्हढच काम नसतं तर, कुठले कुठले पदार्थ करायचे हे ठरवावं लागतं, येणार्‍यांना काय आवडेल याचा विचार करावा लागतो, त्यांची काही पथ्ये असतील तर ती लक्षात ठेवावी लागतात एव्हढंच नाही तर मागच्या वेळी त्यांना बोलावलं होतं तेव्हा जे केलेलं असेल तेच परत करायचं नाही हे ही लक्षात ठेवावं लागतं. सुगृहिणी होणं काही सोपं नसतं. किती वेळ जातो हा सगळा विचार करण्यात! गुंतून पडतो आपण. (चांगलं म्हणवून घ्यायची चटक लागते.)
म्हणजे मला म्हणायचंय नुसतं पोळ्या करायचं काम करायला काही वाटत नाही कारण त्यावेळी मी मला हवे ते वेगळे विचार करू शकते.त्यात विचार करण्याचा वेळ जात नाही. कोणी ठरवून दिलेलं काम करणं सोपं आहे, जसं की पुरूष करतात.

हे एक उदाहरण झालं, याशिवाय आणखी किती गोष्टी असतात! कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना जायचं असतं. (लग्न, मुंज, वाढदिवस वगैरे) मग तिथे आहेर काय द्यायचा याचा विचार करावा लागतो, योग्य, साजेसा, दिखाऊ नसलेला, त्या व्यक्तीला आवडेलसा,(आपण ठरवलेल्या किंमतीचा) किती वेळ जातो या सार्‍यात? सगळे आपल्या जवळचे असतात असं नाही, जवळच्यांसाठी विचार करण्यात वेळ गेला तर वेळ घालवला असं वाटत नाही, तेव्हढा वेळ आपण त्या व्यक्तीसोबत असतो मनाने. पण इतरांसाठी ते काम होऊन बसतं आणि आपण गुंतून पडतो.

आपल्या रूढी-परंपरा पण बायकांना फार गुंतवून ठेवतात. ज्यांच्या घरी सगळे सण साजरे होतात त्या घरात बाईचा पिट्टा पडतो. सण साजरे करताना विचार करावा लागत नाही. तेच तेच त्याच पद्धतीने करत राहायचं. त्याचाही कंटाळा येतो, विचार न करता का त्याच पद्धतीने वागायचं?

एखाद्या घरात वर्षानुवर्षे सासू जर घरातले/स्वैपाकघरातले सगळे निर्णय घेत असेल त्या सुनेच्या हातात काहीच अधिकार नसतील तर तिने काय कायम सांगीतलेली कामे करत राहायची?

मी तयार केलेल्या जाळ्यात पुरती फसत चालले आहे.

एकीकडे मी म्हणतेय की निरर्थक कामांचा विचार करण्यामधे गुंतायचं नाही आणि दुसरीकडे म्हणतेय की जी कामे बायका/ आपण करतो त्याचे अधिकार आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे ते नीट विचार करून ठरवणे आलं.

काय करायचं अशावेळी?

शिवाय हा सगळा विचार करण्याचा वेळ वाचवून त्यात तरी काय करायचंय? (कुठे दिवे लावायचेत?)

*********

लग्न झाल्यानंतरची पहिली दोन-तीन वर्षे वगळता बाकी सारा काळ वरच्या सगळ्या गोष्टी मीच पाहते आहे. म्हणजे मिलिन्द सुचवतो, मदत करतो पण जबाबदारी माझीच असते. मला वाटलं ही जबाबदारी मिलिन्दने पण घ्यायला पाहिजे. मग एके दिवशी मी त्याला सांगीतलं, तुझ्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रम असेल तर सगळं तू पाहायचंस, माझ्या नातेवाईकांचं मी बघीन. मीसुद्धा सुचवीन, काही आणायचे झाल्यास आणीन, मदत करीन पण ठरवायचं तू. मी त्यावर विचार करणार नाही. (खरं म्हणजे इतक्या वर्षांनंतर त्याचे अन माझे नातेवाईक इतका काटेकोर फरक राहिलेला नाही, त्याचे नातेवाईक येऊन तो नसला तरी माझ्याशीच मनसोक्त बोलून वर तुझ्याशीच बोलायचं होतं, असं म्हणून जातात आणि उलटही होतं.)

मी असं ठरवल्यावर काही दिवसांनी त्याच्या एका नातेवाईकाचा फोन आला, ’सत्यनारायणाच्या प्रसादाला या’ असा. फोन मीच घेतला. मिलिन्दला निरोप सांगीतला. शिवाय हे ही सांगीतलं ’ त्यांनी नुकतंच घर घेतलयं, त्यामुळे सत्यनारायण असावा, त्यांच्या घरासाठी काही घ्यायचंय का ते ठरव.’ मिलिन्द म्हणाला,’ त्यांनी फोनवर असं काही सांगीतलं का?नाही ना? मग कशाला न्यायचं?’ मी म्हणाले,’बघ बाबा, मला तरी वाटतयं’ मिलिन्दने ठरवलं काही भेटवस्तू न्यायची नाही. तिथे आलेल्या बाकीच्या सगळ्या नातेवाईकांनी काहीतरी भेटवस्तू आणलेली होती. मी तर निर्विकार चेहर्‍याने वावरत होते, मी माझ्याकडून मिलिन्दला सांगीतलेलं होतं. (मिलिन्द तर माझ्यापेक्षा पोचलेला आहे.)

घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं, आमच्यात काय ठरलंय हे नातेवाईकांना काय माहित? ते तर ’विद्याला सुचलं नाही’ असाच विचार करणार ना!

**********

Thursday, March 25, 2010

निर्मिती

अखेर तो दीवस उजाडतो. पोटात बारीक बारीक कळा येऊ लागतात. पहील्या पहील्या कळा सहन होणा-या,सुखद
वाटणा-या.आपल्यातूनच एक नवीन जीव निर्माण होणार ही कल्पनाच मुळी केवढी आनंददायी आहे.त्यासाठी काही वाट्टॆल ते सहन करण्याची शक्ती प्रत्येक स्त्री मध्ये त्यावेळी कोठून येते कोण जाणे.मनात असंख्य विचार येत असतात. कसा असेल तो इवलासा जीव. नाक,डोळे हात, पाय,चेहरा,रंग.जावळ असेल का? का नसेलच?मुलगा का मुलगी? या आणि अश्या असंख्य कुतुहलापोटी,उत्सुकतेपोटी पडलेल्या प्रश्नात मोठी गंमत आहे.कालच भावजय बाळंत झाली तिच्यापाशी असताना असे अनेक गमतीशीर प्रश्न मनात येऊन गेले.स्वत:च्या वेळीही असे अनेक प्रश्न पडलेच होते. पण त्यावेळी कळा सहन करण्याचा भाग त्यामध्ये खूपच जास्त होता.त्यावेळेचे स्वत:वर येणारे दडपण हे त्या कुतुहलावर मात करत होते.काल जरा आजूबाजूला मला बघता आले. दर एक तासाने एक नर्स येत होती आणि तिच्या पोटावर छोटसं यंत्र लावून बाळाचे ठोके तपासत होती.एरवी या नर्सेस अगदी नॉर्मल चेह-याने वावरत असताना आपल्याला दीसतात.पण आपल्याच पेशंटपाशी आल्या की काय होत त्यांना कोणास ठाऊक. उगाचच गंभीर चेहरा करतात.तो त्यांचा चेहरा बघून आजूबाजूच्या नातेवाइकांना घाबरायला होत असते.किंबहूना आपणही दडपणाखाली असतो म्हणून तो तसा चेहरा बघुन अजुनच दडपणात भर पडते. हाच अनुभव तिला आत ऑपरेशन थेअटरमध्ये नेल्यावर.उगाचच सगळ्या नर्सेसची पळापळ.मध्येच आतून एखादी पळत येणार आणि गंभीर चेह-याने बाहेरच्या नर्सला ओरडतच अहो लवकर या पळा लवकर असे म्हणणार.हे सगळे गंभीर नाट्य बघुन बाहेर उभे रहणारे आपण उगाचच गंभीर होतो. आणि ही धावाधाव बघून ही सगळी धावाधाव आपल्याच आत असणा-या पेशंटसाठी चालली आहे असा तर्क काढत असतो. काही आत प्रॉब्लेम तर नाही ना? अशी उगाचच प्रत्येकाच्या मनात शंका येते.मधूनच एक वयस्कर आजी (नर्स)आतून येतात. त्यांना मी विचारलं आजी झाली का हो बाळंत? तर त्या म्हणाल्या हो आत्ताच.त्यांना म्हणलं काय झालं काही कळलं का? तर म्हणाल्या मला नाही सांगता येणार....परत या अर्धवट उत्तराने आम्ही उगाचच गंभीर.खरतर हॉस्पिटलचेही काही नियम असतील.पण त्या आजी असे म्हणल्यावर सगळं बर असेल ना आत? अशी उगाचच शंका येऊन गेली पुन्हा एकदा.हे सगळ फक्त चाललं होत ते मनातील दडपणामुळे.....साधारण दहा मिनीटे हे नाट्य चालले आणि डॉ. बाळाला हातात घेऊन बाहेर आले. तो नवा इवलासा जीव बघून सगळ्यांच्याच मनावरचे दडपण चुटकीसरशी गळून पडले. खरंच आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक क्षणी अशी अनेक मनावर येणारी दडपणं ही केवळ आपल्या मुलांचे चेहरे बघून कुठच्या कुठे पळुन जातात हे काल मला पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवले.

Monday, March 8, 2010

कविता

कंटाळा आला आहे मला
रोज रोज तेच तेच करण्याचा
कंटाळा आला आहे
कांदा चिरण्याचा,
टीव्हीवरची धूळ पुसण्याचा
(तिथेच जन्मत असल्यासारखी कुठून येते कोण जाणे)
कंटाळा आला आहे
फोनची रिंग वाजली की तो उचलण्याचा,
कुरिअरवाल्याच्या कागदांवर सह्या करण्याचा
(पत्रधारकाशी माझं नातं काय आहे सांगण्याचा)
कंटाळा आला आहे
बोलण्याचा,
येणार्‍या जाणार्‍यांसाठी हसून दार उघडण्याचा
(की हसण्याचाच)
कंटाळा आला आहे
मुलांची काळजी करण्याचा,
मुलांशी वागताना बालमानसशास्त्राचे सगळे नियम लक्षात ठेवण्याचा
(सारखं स्वत:ला तयार ठेवण्याचा)
कंटाळा आला आहे
नवर्‍याशी भांडण्याचा,
त्याच्यावर प्रेम करण्याचा,
(आणि त्यालाही आला असेल तर?)
कंटाळा आला आहे
शब्दांचे अर्थ लावण्याचा,
वाचण्याचाच;
(मग ती पुस्तके असोत की माणसे)
कंटाळा आला आहे
कंटाळा करण्याचा,
कंटाळ्याचं गाठोडं इतकं वाढलं आहे’
पाय दमत चाललेत आत्ताच
(आजीने या कंटाळ्याचं काय केलं? आणि आईने?)
कंटाळा आला आहे
मुक्काम कधी हे माहीत नसताना
चालत राहण्याचा
खरंच कंटाळा आला आहे
(बदली कोणी मिळू शकेल?)

*************
 
संसार म्हणजे
रोजची तीचतीच
कामे फक्त
व्हायला हवीत
करणारी कोण
याला तशी
काहीच
किंमत नाही

बदली म्हणून
आपलं एक
बुजगावणं
उभं करायचं
हुबेहुब आपल्यासारखं
त्यात आपला
जीव फक्त
ओतायचा नाही

तो राखायचा
आपल्या आवडींसाठी

***********

घरी राहणं पत्करल्याचे
फायदेही असतात काही
टाळता येतात पुरूषांचे
नकोसे स्पर्श
विसरायला होतात
जगातले अनोळखी पुरूष
कधीतरी बाहेर पडल्यावर
सावधपणे, आकसून
वावरायचं नाही राहीलं लक्षात
नाट्यगृहात समोर कार्यक्रम चालू
शिताफीने झेलला
मागच्या माणसाचा स्पर्श
दंडावर
(सावधपणा मुरलेला असतो
बायकांच्या अंगात)
त्याचच कौतुक वाटत राहिलं
कार्यक्रमभर!
आपण काहीच करू शकत नाही
लोकांना जर वाटलं
ही फक्त एक बाई आहे
शरीर असलेली

*************

असं काही झालं की
आपण मनस्थिती बिघडून घेतो
आणि स्पर्शालाच घाबरायला लागतो;
प्रेमाचे, मायेचे,
वात्सल्याचे,
धीर देणारे,
कौतुक करणारे,
क्षमा करणारे,
किती हर तर्‍हेचे स्पर्श
स्पर्शांना आपण वाळीत टाकतो,
काय गमावून बसतो
याची आपल्याला कल्पनासुद्धा नसते.

*************

जुनी मैत्रिण
भेटली खूप दिवसांनी
मागच्या पानावरून पुढे
गप्पा सुरू झाल्या,

आपलं कसं
छान आहे नं!
सगळंच
एकमेकींना माहित!

नवी मैत्री करायला
नको वाटते
पुन्हा सगळं सुरवातीपासून
कुठे सांगत बसायचं?

सांगणं म्हणजे
पुन्हा एकदा भोगणंच की!
ती ताकद
राहीली नाही आता!


*************
 
”मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा”


कवी असोत की शायर
प्रेम करायचं ते त्याने
करवून घ्यायचं ते तिने
विचारायचं त्याने
होकार द्यायचा तिने
इथेसुद्धा पायर्‍या
ठरलेल्या आहेत
कर्ता तो कायमच
(आणि कर्म तिचं??)
प्रेमबीम करायचं असलं
तरी ती दोन पायर्‍या खालीच

एके दिवशी सकाळी उठल्यावर
साक्षात्कारासारख्ं तुमच्या लक्षात येतं
प्रेम म्हणजे ’हे असं असतं’

******************

Wednesday, March 3, 2010

व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने

साध्या मध्यमवर्गीय कुटुंबातले माधव आणि भक्ती. पस्तीशी गाठलेले, अविवाहित. एकटेही आणि एकाकीही. दोघे इंटरनेट च्या माध्यमातून बोलत असतात. त्या आभासी, स्वप्नातल्या जगात माधव असतो नाईट रायडर - काळा सूट, टाय, हॅट, गॉगल घालणारा, रुबाबदार. आणि भक्ती असते व्हाईट लिली देखणी, त्याच्या बोलण्यावर लाजणारी, त्याच्यावर जीव ओवाळून टाकणारी. मग दोघे लग्न करायचं ठरवतात. त्यासाठी प्रत्यक्ष भेटायचं ठरवतात. प्रत्यक्ष भेटीत मात्र ते भक्ती आणि माधवच असतात. दोघांनी चॅटिंग करताना घातलेले व्हाईट लिली आणि नाईट रायडरचे मुखवटे आता उपयोगाचेच नसतात. मग एकेका प्रसंगातून दोघांनाही एकमेकांची खरी ओळख होत जाते. व्हाईट लिलीच्या आवरणाखालची संशयी, सावध, आक्रमक भक्ती आणि नाईट रायडरच्या आवरणाखालचा चारचौघांसारखा, पोटापाण्याच्या मागे असलेला, टक्कल पडलेला माधव - दोघांनाही एकमेकांच्या स्वभावातली, विचारातली, सवयींमधली दरी जाणवू लागते. तडजोड दोघांनाही शक्य नसते. संवादाचा धागाच उरत नाही. शेवटी पुन्हा ते पूर्वीच्याच मुखवट्यांचा, स्वप्नातल्या जगाचा आधार घेतात आणि चॅटिंग द्वारे संवाद सुरु करतात. नाटक अजूनही बरंच काही सांगत होतं. मला लक्षात राहिलं ते व्हाईट लिली आणि नाईट रायडर झाल्याशिवाय त्यांना एकमेकांशी संवादच साधता न येणं.
नात्यांमधेही असं होतं का? कधी आपण समोरच्याला आपल्याला हवा तो मुखवटा घालू पाहतो कधी समोरच्याला हवा तसा मुखवटा आपण स्वतःला घालायचा प्रयत्न करतो. क्वचित कधी खरा चेहरा आणि तो मुखवटा एक असतात. क्वचितच कोणाला मुखवटे न घेता जगता येतं. पण कित्येकदा मात्र ते मुखवटेच आपली ओळख बनतात. ते मुखवटे जपण्याचा आपणही कसोशीने प्रयत्न करत राहतो.कित्येकदा समोरच्यानंही आपल्याला हव्या तशा मुखवट्यात स्वतःला बसवावं असाही प्रयत्न करतो. काही नात्यांच्या तर अपेक्षाच अशा असतात की मुखवटे चढवल्याशिवाय त्या पूर्णच करता येत नाहीत.
मुखवटे म्हणजे तडजोड. मुखवटे म्हणजे जे नाही ते आहे असं भासवणं.
आतून काही तुटत असेल, काही फुटून बाहेर येत असेल, डोळे वाहत असतील, चेहरा वेडावाकडा झाला असेल. पण मुखवटा असतो. तो हे काहीच उघडं पडू देत नाही. पुन्हा, जो मुखवटा चढवलेला/चढलेला असेल, त्याच्याशी सुसंगत असं, त्याला शोभेल असं वागणंही ओघानंच आलं. हे 'ज्याला जसे हवे तसे' मुखवटे आपण चढवले की खूपसे प्रश्न उत्तराची अपेक्षा न बाळगताच बाजूला जातात. कारण ते प्रश्न तर खऱ्या चेहऱ्यालाच पडलेले असतात. मुखवटा काही प्रश्न विचारतच नाही. तो तयार होतो तोच मुळी समोरच्याच्या प्रश्नाला उत्तर म्हणून. त्याच्या मागणीचा पुरवठा म्हणून.
कधीतरी कुठलातरी हळवा कोपरा दुखावला जातो, मुखवटा खळ्ळकन फुटतो. आतला वेगळाच अनोळखी चेहरा बाहेर येतो. त्याच्या मागण्या असतात. त्याचे प्रश्न असतात. त्याची स्वप्नं असतात. त्याच्या भावना असतात. पण समोरच्याला सवयच नसते त्या चेहऱ्याशी संवाद करण्याची. त्याला तो मुखवटाच सवयीचा आणि सोयीचा असतो. पुन्हा तो तुटलेला मुखवटा सांधायचा आणि चढवायचा. नीट पाहिलं तर चरे दिसतात त्याच्यावरचे नाहीतर असतोच तो पुन्हा 'ज्याला जसा हवा तसा.'

Sunday, February 28, 2010

पहिली माझी ओवी गं.....

समाजात कुटुबांनी सुखी दिसण्याचं खूप दडपण असतं.(तेही समाजाच्या दृष्टीने सुखी) ते सगळं अर्थातच घरातल्या बाईवर असतं. त्यामुळे सासरघराशी, नवर्‍याशी पटवून तर घ्यावंच लागतं पण त्याचा देखावाही चारचौघात करावा लागतो.( हे दुहेरी दडपण आहे.)
आपण हे का समजून घेत नाही, कुठल्याही दोन माणसांमधे मतभेद असणं ही स्वाभावीक गोष्ट आहे. तसे ते नवरा-बायको या नात्यातही असणार. मतभेद असूनही ते नातं निरोगी असू शकतं. दोन माणसांचं सगळ्याच बाबतीत कसं पटू शकेल?
पूर्वीच्या एकत्र कुटूंबात / बायका एकत्र कामे करीत तेंव्हा या मतभेदांना, जाचाला मोकळं करायला काही जागा तरी होत्या. समदु:खी एकमेकींशी बोलून आपल्या भावनांना वाट करून देऊ शकायच्या. आताच्या विभक्त कुटूंबांमधे तशी जागाच राहिलेली नाही. त्या बाईने सोसायचंही आणि बोलायचंही नाही. तारेवरची कसरत आहे ही! पूर्वीच्या बायका ’ हे नशीबाचे भोग’ म्हणून स्वीकारायच्या. पण आजच्या शिकलेल्या बाईने हे कसं स्वीकारायचं?
सोसणं थांबवणं शक्य होतंच असं नाही, निदान बोलणं आणि मोकळं होणं यासाठी तरी आपल्या कुटूंबांमधे जागा पाहिजे. कोणाशीतरी बोलल्यामुळे ती व्यक्ती मार्ग दाखवते असं नाही, मार्ग आपल्यालाच शोधावा लागतो, पण बोलून ते मागे टाकून पुढे जाण्याच्या शक्यता तरी निर्माण होतात. असं मनातलं बोलण्यासाठी कोणी उरलंच नाहीये आपल्या कुटूंबपद्धतीत.आणि फ्लॅटसंस्कृतीमुळे समाजात. मग बोलायचं कोणाशी तर नवरा बायकोंनी एकमेंकांशीच. त्या नात्यावर सगळंच सांभाळायची जबाबदारी येते. ते सगळं पेलायची त्या बिचार्‍याची कुवत असते का?( मागे साप्ताहिक सकाळ मधे यावर एक चांगला लेख आला होता. कोणाला हवा असल्यास शोधून ठेवीन.) आपला नवरा कोणी सुपरमॅन नाही,( आपण सुद्धा सुपरवुमन नाही, व्हायचंही नाही.) त्याच्या मर्यादा जाणून घेणे आणि त्याला स्वीकारणे याशिवाय अन्य पर्याय नाही.( त्याच्यापुढेही याच्यापेक्षा वेगळा काय पर्याय असतो? )
आपणही मोकळे होण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. एकटेपणा, नैराश्य या गोष्टी आपल्याही समाजात वाढत चालल्या आहेत.
पूर्वी बायका दळायला बसायच्या, कष्टाचेच काम ते. दळता दळता ओव्या म्हणायच्या श्रमाचाही भार कमी वाटायचा आणि मनही मोकळं व्हायचं. द्ळण नसलं तरी, आपणही आता सुरू केलं पाहिजे, पहिली माझी ओवी गं.....

*************

एका ८० वर्षांच्या म्हातार्‍या बाईची गोष्ट वाचल्याचे लक्षात आहे. संधीवात झालेला, रुग्णालयात भरती केलेलं, सांधे आखडलेले, काही हालचाल करणं शक्य नाही, सांगितलेले व्यायाम करायची नाही. डॉक्टरांना कळेना कसे करावे, ही आजीबाई काही साथच देत नव्हती. नवीन आलेल्या फिजिओथेरपिस्ट्ने आजींना एक उशी देऊन सांगितलं की हा तुमचा नवरा आहे असं समजा आणि हातांच्या मुठी करून उशीवर मारा. या सल्ल्यामुळे आजी पंधरा दिवसात बर्‍यापैकी बर्‍या झाल्या.

*************

Monday, February 15, 2010

परावलंबन-२

दीपा,
खूप खरं लिहीलं आहेस. हे सोपं नसतं.
पण यात नवीन काही नाही. हे असं चालत आलेलं आहे. इतकं सवयीचं आहे, बर्‍याच जणींना/जणांना ते नैसर्गीक वाटतं.
स्त्री परावलंबी असणे हे पुरूषसत्ताक व्यवस्थेसाठी गरजेचं आहे.

तुझं काय म्हणणं आहे? परावलंबन नको? नक्की?
हे नीट विचार करून ठरवायला हवं आहे.
परावलंबन ही खूप मोहविणारी गोष्ट आहे. ’आपण विचारच करायचा नाही’ ही तर चैन आहे. आपल्या वतीने कोणीतरी विचार करेल, आपण केंव्हा काय करायचं हे ठरवेल, आपण नुसतं तसं वागायचं. किती छान!
हे नकॊ असेल तर विचार करायला हवा. आपल्या निर्णयाची आणि आपल्या आयुष्याचीही जबाबदारी घ्यायला हवी. चुकलात तर कोणाकडे बोट दाखवून सुटका करून घेता येणार नाही. आणि मग चुकत माकत जगायलाही मजा येईल.
आहे ही चौकटही बर्‍यापैकी वाकवून घेता येते. तसे प्रयत्न आपण करतो का?
स्त्री ही नकोशी आहेच, फक्त ती समाजधारणांना अनुकूल अशी वागत असेल तर तिला चालवून घेतात.
त्याचं काय आहे दीपा? देवाने आधी पुरूष निर्माण केला , नंतर त्याला एक खेळणं हवं, त्याच्या सेवेसाठी आणि मनोरंजनासाठी कुणीतरी हवं ना? म्हणून स्त्री निर्माण केली. ही गोष्ट तुला माहीत आहे ना? पुढेही मुक्‍तीच्या मार्गातली धोंड वगैरे.....

’माझ्या शरीरावर माझा हक्क’ असं सांगत स्त्रीवादी चळवळ पुढे आली. तुमच्या शरीरावर तुमचा अधिकार आहे, ती काही कुणाची इस्टेट नाही. तुम्ही स्वत:च्या शरीराचा आदर करा आणि इतरांना करायला लावा. स्वत:च्या हक्कांविषयी जागरूक राहा. ही लढाई जिची तिला लढायची आहे, स्त्रियांनाही शारीरिक सुखाचा अधिकार आहे हे सांगणारी एक विचारधारा तुमच्या पाठीशी आहे इतकंच! (इथे फ्रॉइडदेखील स्त्रियांच्या विरोधात आहे, त्याचं म्हणणं त्यापुढच्या शास्त्रज्ञानी खोडून काढलं)

(तुझ्या लेखात न आलेल्या संशय/ पावित्र्य या गोष्टीसाठीही बायकांना खूप सोसावं लागतं. अगदी सीता अहिल्येपासून ते आजतागायत, जगभरच! Chastity belt चा इतिहास असो की तस्लिमा नसरीनची लज्जा असो.)

तू उलट विचार करून पाहिला आहेस का? पुरूष किती परावलंबी असतात याचा??

ते, त्यांचे ते स्वत:, काहीही करू शकत नाहीत. त्यांना वाढवलयंच तसं! बिच्चारे.

०००००००००००००००००००००००००

बायकांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असावं असं मला कायमच वाटत आलेलं आहे.

आता तरी आम्ही दोघांनी मिळून काही प्राधान्यक्रम ठरवले आहेत, काही व्यवस्था ठरवलेली आहे, पण लग्न झालं तेंव्हा लग्न केलं म्हणून मिलिन्दने मला का पोसायचं असं मला वाटत असे. देण्याघेण्याचा व्यवहार ’साजरा’ व्हायचा असेल तर घेणार्‍यापेक्षा देणार्‍याला ती काळजी घ्यावी लागते.आर्थिकबाबतीत मिलिन्दने हे खूप सहजपणे केलं. (नाहीतर मी तेंव्हा कायम दुखवून घ्यायला तयार अशीच असे.)

तरीही काही गोष्टी माझ्यात भिनलेल्य़ा आहेत. मिलिन्दसाठी, मुलांसाठी किंवा घरासाठी काही खर्च करायचा असेल तर मी एकदा विचार करते, पण माझ्या एकटीसाठी काही घ्यायचे असेल तर मी चारदा विचार करते, नक्की हे आवश्यक आहे ना?(खरं म्हणजे ती रक्कम फारशी मोठी नसते.)

आत्ताच्या टप्प्यावर आमच्या घरातली कामाची विभागणी ही पारंपारिकच आहे. त्यानुसार स्वैपाक करणे हे माझेच काम आहे.

आम्ही वेगवेगळ्या कारणांसाठी बाहेर जेवायला जातो. कधी ठरवून, कधी मुलांना हवं असतं म्हणून, कधी कोणालातरी घेऊन, कधी मिलिन्द्ने काहीतरी वाचलेलं असतं, तिथला खास पदार्थ खाण्यासाठी. पण कधी मला स्वैपाक करायचा कंटाळा येतो म्हणून आम्ही बाहेर जातो. अशावेळी मला वाटतं पार्सलच आणलं तर? किंवा नुसती पावभाजीच खाल्ली तर, चालेल की! बाहेरच जायचं ठरलं तर मला वाटतं अगदी ’ऑफ बीट’ वगैरे नको. सूप पासून सुरूवात आणि आईसक्रीमपर्यन्त नको. अशावेळी मी आवर्जून बील पाहते, ती रक्कम म्हणजे मला माझ्या कामचुकारपणाची किंमत आहे असं वाटतं. म्हणून मी कंटाळा करायचं थांबवते असं नाही पण चुकचुकत राहणंही थांबवू शकत नाही.

००००००००००००००००००००००००००००००००००

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...