Friday, March 18, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ७

स्वयंपाकात पुरूषांचा सहभाग कितपत असतो?
औरंगाबादला भाजी आणण्याचं काम बाबांकडे होतं.
मेथी निवडणं किंवा क्वचित भाज्या चिरून देणं हे काम ते आवडीने करायचे/करतात.
आई म्हणायची, " तुम्ही राहू द्या. मी करते."
आम्ही वाड्यात राहायचो तेव्हाचं मला आठवतंय, आई म्हणायची, " दार तरी लोटून घ्या."
सगळ्यांनी बाबांना भाजी निवडताना पाहावं, हे तिला चालायचं नाही.
ही पुरूषांची कामं नव्हेत.
ताट,पाट, पाणी घेतल्यावर पुरूषांनी आयतं पाटावर येऊन बसायचं.
जेवण झालं की पाटावरून उठायचं, मागचं सगळं बायका बघतील.

आता हे असं राहिलेलं नाही.
तरीही घराघरांतून स्वयंपाक ही मुख्यत: बायकांचीच जबाबदारी आहे.
पुरूषांचा सहभाग हा लुटूपूटूचाच.
स्वयंपाकघरात सराईतपणे वावरणारे पुरूष मी पाहिलेले नाहीत.
( एखादा सन्माननीय अपवाद वगळता)
स्वयंपाक घरात पुरूष वावरतानाचं शुटींग करून बघायला पाहिजे.
त्यांची देहबोली, त्यांचे हावभाव.
बायकांचंही शुटींग केलं आणि दोन्हींची तुलना केली तर आपल्याला कळेल,
स्वयंपाकघराकडे कोण कसं बघतं?
खरं हा प्रकल्प करायला पाहिजे.
( दीपा, आपण करू या का?)

समज एकजण नोकरी करतो आहे आणि दुसरा घर सांभाळतो आहे,
तर घर सांभाळणारी व्यक्ती (बहुतेकदा बाई) स्वैपाकाचं बघणार हे स्वाभाविक आहे.
रोजचा रोज तोच, तोच स्वैपाक करणं कंटाळवाणं आहे.
मग जो नोकरी करतो आहे, त्याचंही काम तेच तेच आणि कंटाळवाणं असू शकतं.
म्हणजे कंटाळवाणी कामं आपल्याला करायलाच लागतात.
बाहेर नोकरी करणार्‍याला त्याच्या कंटाळवाण्या कामाचा मोबदला मिळतो.
आर्थिक स्वरूपात, नियमीतपणे.
स्वैपाकघर सांभाळणार्‍या घरच्या बाईला काय मोबदला मिळतो?
तिने त्यात समाधान मानायचं असतं.
तिची कर्तव्ये उच्च स्वरूपाची आहेत आणि भावनिक स्वरूपात मोबदला मिळतो.
पैशांसाठी ती मिंधी आहे.
पण तिला आदर आणि प्रेम तरी मिळतं का?
हो काहीवेळा मिळतो, काहीवेळा नाही.
आदर , प्रेम मोजणार कसं?
जे मिळतंय त्यात समाधानी राहायचं हे तिला शिकवलेलं असतं.

ज्या घरांमधे नवरा-बायको दोघेही नोकरी करतात त्यांच्याकडे दोघं मिळून स्वैपाकघर सांभाळतात, असं आहे का?
मुळीच नाही. जबाबदारी बाईवरच आहे.

स्वैपाक ही खूप वेळखाऊ गोष्ट आहे.
प्रत्यक्ष स्वयंपाक करण्यात/ खाण्यासंबंधीची कामं करण्यात समजा रोजचे तीन-चार तास जातात.
स्वैपाकासंबंधीचा विचार करण्यात इतका वेळ आणि मेंदूचा इतका भाग वापरावा लागतो.
तासभर कुठलंही काम केलं आणि संपलं असं ते नसतं.

बर्‍याच बायका स्वैपाक गळ्यात पडला म्हणून निभावतात.
पुरूषांना याची कल्पना असली पाहिजे.
पुरूषांनी कधीतरी स्वैपाक करून बघायला पाहिजे.
आम्ही आमच्या गटात बाबांना त्यांच्या आवडीचे/ त्यांना झेपतील असे पदार्थ करायला प्रोत्साहित केलं.
त्यांनी केलंही.
अर्थात त्यांचं कौतुक खूप झालं. पुरूषांनी क्वचित कधी स्वैपाक केला तर त्यांच्या वाट्याला कायम कौतुक येतं.
तरीही त्यांनी एवढ्या २५ जणांचा स्वैपाक केला हे विशेष आहे.
त्यामुळे त्यांना बायकांच्या कष्टाची जाणीव झाली की नाही कोण जाणे!
त्यातला तोच तोच पणा त्यांच्यापर्यंत पोचला की नाही माहित नाही.

पुरूषाला बाहेर जायला मिळतं, त्याने त्याची वाढ होते.
बाई घरातच राहिली (मनाने घरातच राहिली) की कुंटूंब हेच तिचं विश्व होऊन बसतं,
ती खुरटत जाते. कधी कधी त्रासदायकही होत जाते. स्वैपाकघरावर कब्जा मिळवते, इमोशनली ब्लॅकमेल करू शकते.
आणखी एक वाक्य़, ’ माझं आयुष्य तुमच्यासाठी खस्ता काढण्यात गेलं ’
कुणी सांगितलंय?
समाजाने ठरवून दिलंय......

( क्रमश:)

****

Thursday, March 17, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ६

स्वयंपाक ही खरोखर एक कलाकृती असते.
कलाकाराला दाद मिळाली की पुढच्या कामासाठी प्रेरणा मिळते, उर्जा मिळते.
ज्यांच्यासाठी कलाकृती असते, त्या/ते सुगरणी/सुगरण.
शिवाय
ज्यांच्यासाठी कारागिरी असते अशा बायका.
ज्यांच्यासाठी काम असतं अशा बायका.
ज्यांच्यासाठी ओझं असतं अशा बायका.
अशी बायकांची वर्गवारी करता येईल.
( कुठलीही बाई एका प्रकारात कधी स्थिर नसते.
वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या पदार्थांसाठी प्रकार बदलता असतो.)

जवळपास कुणालाही स्वयंपाक टळत नाही.
कौतुक केलं की त्यांना श्रमांचं चीज झाल्यासारखं वाटतं.
स्वांतसुखाय अशी ही कला नाहीये.
या कलेला बहुतेकदा दाद मिळते.
याला जोडून नावं ठेवणंही खूप असतं.
आपली पद्धत सर्वश्रेष्ठ असा बहुतेकींचा समज असतो.

नावं ठेवणं किंवा नाक मुरडणं म्हणूया , याचा सर्वाधिक त्रास सुनांना होतो.
जे काय स्वैपाकाघरातलं शीतयुद्ध चालू असतं, ते पुरूषांना कळूच शकत नाही.
साधं काकडीच्या चकत्या करायच्या किंवा दाण्याचा कूट करायचा यात इतके पाठभेद असतात.
साल काढून की ठेवून? कूट भरड की बारीक? चकत्यांची जाडी किती असावी? दाणे कितपत भाजावेत?
या खरंच महत्त्वाच्या गोष्टी असतात का?
हे वेगळ्याच कारणांसाठीचे मतभेद आणि मानसिक असुरक्षितता बाहेर पडण्याचे मार्ग असतात.
याकडे बायकाच बायकांच्या शत्रु असतात इतक्या सरधोपटपणे बघायला नको आहे.
पुरूषसत्ताक समाजरचनेतील जी सत्तेची उतरंड आहे, ती हे करायला भाग पाडते.

मानवी संबंधांमधे जर सत्तेची वर्तुळं, जबाबदार्‍या आणि कर्तव्ये यात स्पष्ट्ता असेल तर ते संबंध अधिक सौर्हादपूर्ण होऊ शकतात.
संदिग्धतेचा प्रदेश अधिक असेल तर गडबड संभवते.
जबादार्‍यांविषयी नाराजी असेल तरी ती बाहेर पडायला वाट शोधत असते.

स्वैपाकघर ही जर एकत्र काम करण्याची जागा असेल तर हे घडणारच.
बायकांच्या आयुष्यातील स्वयंपाकाचं महत्त्व जसंजसं कमी होत जाईल तसं तसं नावं ठेवणंही कमी होत जाईल.

आता अगदी वेगळंच सांगू का?
नावं ठेवायला मजाही खूप येते.
तो एक कॅथर्सिसचा प्रकार आहे.
आपण खरोखरच करण्याच्या पद्धतीला नावं ठेवतो का?
नाही. आपल्याला त्या व्यक्तीला नावं ठेवायची असतात.
जर आपण व्यक्ती आणि रीत यांत फरक करू शकलो,
आणि केवळ पदार्थाची/ रितीची मजा घेतोय असं असलं तर दोन्ही बाजूंना मजा येऊ शकते.
मैत्री असेल तर हे घडतं.
:)

मैत्रीपूर्ण वातावरण तयार झालंय तर पुढचं सांगते. :)
एका एका प्रदेशाची किंवा त्या प्रदेशातील विशिष्ट समाजाची स्वयंपाकाची काही एक रित असते,
काही एक ठरलेले पदार्थ असतात.
इकडे पुण्यात मटार उसळ, अळूचं फतफतं, गोडसर भाज्या, उकडीचे मोदक, गूळपोळी हे प्रतिष्ठेचे पदार्थ आहेत.
हे सगळे पदार्थ मी पूर्वी खाल्लेले नव्हते. खाल्ले तेव्हा मला आवडले नाहीत.
मी म्हणजे एकटी मी नाही, आमच्या भागातला समाज माझ्यासारखा आहे, असणार.
मटार आम्ही सोलून कच्चे खातो.
अळूला आम्ही म्हणतो चमकोरा आणि त्याची भजी करतो.
मोदक आम्ही तळतो.
आणि तिळगुळाची पोळी करतो.
इकडची साधी मऊसूत पोळीसुद्धा आम्ही म्हणतो की तोंडात घोळत राहते, अशी पोळी नको.
आता काय करायचं?
इथल्या सगळ्यांचा समज हाच की उकडीचे मोदक आवडत नाहीत म्हणजे काय?
क्षूद्र माणूस तो! ( गाढवाला गुळाची वगैरे... :) )
कोण स्वत:हून स्वत:ला गाढव म्हणून घेणार? :)
इकडच्या नातेवाईंकांत काय, किंवा आमच्या गटात काय, मी अल्पसंख्याक!
किती वर्षे मी खुलेपणाने माझ्या नावडी आणि आवडीही सांगू शकत नव्हते.

मी कायम आपल्या देशात, आपली भाषा बोलणार्‍या माणसांत, आपल्यासारखे धार्मिक संस्कार असणार्‍या माणसांत राहिले आहे.
कायम बहुसंख्यकांच्या बाजूने असण्याची मला सवय होती, यामुळे मी अल्पसंख्याकांच्या अनुभवाची थोडीशी कल्पना करू शकते.

( क्रमश:)

अक्कणमाती चिक्कणमाती -- ७

****

Monday, March 14, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ५

चार कोसांवर भाषा बदलते असं म्हणतात.
पदार्थांचंही तसंच आहे.

माणूस शेती करायला लागला, स्थिरावला.
खाण्यायोग्य किती किती फळं, पानं, मुळं, खोडं त्याने शोधून काढली.
शिवाय वेगवेगळे प्राणी खाऊन बघितले असणार.
भाजणे, शिजवणे, वाफावणे, वाळवणे अशा प्रक्रिया शोधून काढल्या असतील.
कशाबरोबर काय, कशापद्धतीने, हे ही शोधलं असेल.
मग आपल्या ज्ञानाचा ठेवा पुढच्या पिढीकडे सूपूर्द केला असेल.
.
.
आणि मग ते आपल्यापर्यंत आलेलं आहे.
मी जो स्वैपाक करते ते मुख्यत: आईचं पाहून, शिकून शिवाय आत्यांचं आणि आणखी कुणाकुणाचं पाहून शिकले.
आई, तिच्या आईचं, मोठीआईचं पाहून, आईला सासू नसल्याने बाबांनी जे आणलं असेल ते पाहून शिकली.
मोठीआई तिच्या आईचं पाहून ती विदर्भातली होती शिवाय तिच्या मामेसासूचं पाहून, ती केरळातली होती.
स्वत: मोठीआई तेलंगणात राहिली, तिच्या सूना तिथल्याच.
त्यामुळे मी जी खाद्यसंस्कृती घेऊन पुण्याला आले ती अशी तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ, केरळातली अशी असणार.
मी जे करते त्यात गुंतपांगाळू/भोंगराळू, मेथीचा घोळाणा, काकडीची थालीपीठं, चिंचेचं सार, आंबट वरण.... असे पदार्थ आहेत.
 आंबट वरणाचं एक मजेशीर गाणं आमच्याकडे आहे.
आंबट वरणा
तुझीया चरणा
करोनी नमस्कार
सख्या भेट दे लवकर!
:)
कुणीतरी दूरदेशी जाऊन केलेलं गाणं असेल. :)
आम्हांला आंबट वरण अतिशय प्रिय आहे.
त्यामुळे जगात कुठेही गेले तरी मी आंबट वरण बरोबर नेणार हे नक्की होतं.
अर्थात मला जगात कुठेही जायचं नव्हतं, भारतात म्हणू या.
भारतातही नाही, महाराष्ट्रात, मराठी बोलणार्‍या माणसांत,
आणि महाराष्ट्रात मला औरंगाबादलाच राहायचं होतं.
औरंगाबादला नसणारच राहायला मिळत तर मग पुण्याइतकं छान  शहर नाही. :)

ठरल्याप्रमाणे आंबट वरण - भात तर मी घेऊन आले.
मीच स्वैपाक करायचे म्हणून पहिल्यांदा मी आंबटवरणाची स्वैपाकघरात प्रतिष्ठापना केली.
मिलिन्द आधी भात खायचा नाही, माझं भाताशिवाय व्हायचं नाही.
सवयीने तो थोडा भात खायला लागला.
हॉस्टेलवर राहिलेला असल्याने त्याला वेगळं खाण्याची सवय होती.
माझ्या पद्धतीच्या भाज्या त्याला आवडल्या नसतील/नाहीत, त्याने चालवून घेतलं.
माझं म्हणणं होतं की त्याच्या पद्धतीचा स्वैपाक हवा असेल तर त्याने तो करावा.
तुझ्या पद्धतीच्या भाज्या कर, आयतं मिळणार असेल तर मला चालेल.

जेव्हा लग्न होतं तेव्हा दोन खाद्यसंस्कृती एकमेकांना भिडत असतात.
मुलींनी सासरचं वळण अर्थात ती खाद्यसंस्कृती स्विकारावी असंच त्यांना शिकवलं जातं.
सासरच्या पद्धतीच्या, नवर्‍याला आवडणार्‍या भाज्या शिकाव्यात/कराव्यात हे अपेक्षित असतं.
ते नाही का? सुप्रसिद्ध वचन! ’ नवर्‍याला जिंकायचा मार्ग त्याच्या पोटातून जातो.’
कशी क्रियापदे वापरली जातात ते पाहा. जिंकणे वगैरे, लग्न हे एक युद्ध आहे याची भाषेला पुरती जाणीव आहे. :)

नवर्‍याला जिंकायचं म्हणजे जिंकून त्याच्यावर राज्य करायचं असं नाही,
त्याची सेवा करायची, त्याने आपली सेवा कबूल करावी हे पाहायचं.
( त्याने दुसर्‍या स्त्रीकडे बघू नये, असंही अपेक्षित आहे की काय?!)

लेकी माहेरघरी येतात तेव्हा आया त्यांच्या आवडीचं करून घालतात/घालत असत.
( आता परिस्थिती थोडी बदलली आहे.)
कारण हा पदार्थ या पद्धतीने सासरी मिळत नाही, तो तर करतच नाहीत म्हणून.

माझ्य़ा माहेरच्या आणि सासरच्या खाद्यसंस्कृतीत बराच फरक आहे, दोन्हीकडे शाकाहार असला तरीही.
आमच्याकडे भाज्या-वरणात, पोहे-उपम्यात कशातही साखर घालत नाहीत.
भाज्यांमधे साखर घातली की त्या चविष्ट होतात की साखर न घालता अधिक चांगल्या लागतात?
हे कसं ठरवणार? आपल्या सवयींवर असतं.

भाजीवरण-उपमापोहे यात कशातही मी साखर घालत नाही.
( सासूबाई किंवा नणंदा आल्या तर त्या घालतात, पण त्या आलेल्या असतानाही मी माझ्या पद्धतीने करते, त्यांनी समजा केले तर त्या घालतात.)
मिलिन्दला गोड पदार्थ जरा गोSड लागतात. हा बदल मी केला आहे, मलाही आता त्याची सवय झालीय.
पोळ्या आमच्याकडे जरा जाड असतात. पूर्वी मी मिलिन्दच्या पातळ आणि माझ्यासाठी जाड लाटायचे. :)

साध्या साध्या गोष्टी असतात.
म्हणजे भात. भातात काय फरक? असं वाटू शकतं.
आमच्याकडे मोकळा करतात तर मिलिन्दकडे आस्सट! म्हणजे मऊ.
लग्न झाल्यावर सुरूवातीला एकदा मी संगमनेरला कुकर लावला आणि मोकळा भात केला.
मिलिन्दच्या आत्या आलेल्या होत्या, त्या म्हणाल्या, "भाताची शितं मोजता येतील. पाणी मोजून टाकलं नाहीस का?"
:)
मला तर वाटत होतं की किती छान मोकळा भात झालाय! माझ्यामुळे सगळ्यांना त्यादिवशी मोकळा भात खावा लागला.
आमच्याकडे आई काय सांगायची, असं पाणी बेताने टाकायचं, गिच्च गोळा भात करायचा नाही, मोकळा झाला पाहिजे.
:)
सुनांनी काय करायचं? तर सासरची रीत शिकून घ्यायची.
माझ्या पाहण्या-ऎकण्यात एकही असा जावाई नाहीये, जो सासरी गेल्यावर सामान्य परिस्थितीत, सहज अगदी सहज कुकर लावतो आहे किंवा पोळ्या लाटतो आहे. कुणाला माहित असेल तर कळवा.

मला काय कळलं? कुठल्याही प्रकाराला हा जास्त चांगला असं म्हणता यायचं नाही, सवयीवर आहे.
माझ्या सासरच्या माणसांना माझ्या माहेरच्या पद्धतीचं जेवण आवडणार नाहीये. माहेरच्यांना सासरचं आवडत नाही.
आमच्याकडे लग्नाच्या जेवणात तर जाड जाड आणि खूप मोठ्या पोळ्या लाटतात मग त्याचे उलथन्याने तुकडे करून वाढतात.
सासरच्यांना नसेल आवडलेलं.
याच्या उलट माझे मामा इकडच्या लग्नाला आलेले, गोडसर भाजी-वरण ते वैतागले ते म्हणाले मला जरा मिरचीचा ठेचा आणा.
ठेचा आणला तर काय? त्यातही साखर!
:)

आमच्या घरात या आघाडीवर आम्ही/ मी काय केलं? बरेचसे तह केले. रोजचे भाजी-वरण माझ्या पद्धतीने, गोड अधिक गोड मिलिन्दच्या पद्धतीने, पंजाबी ,गुजराती, दाक्षिणात्य पदार्थ शिकले तसे तसे, बाकीचे बाहेर जाऊन.
या युद्धात काही पदार्थ शहीद झाले.
त्यात एक कढी! आमच्यापद्धतीची जरा आंबट कढी मला खूप आवडते. मिलिन्दकडची साखर घातलेली गोडसर त्याला खूप आवडते.
माझी कढी बाजूला काढून मग त्यात साखर घातली तरी त्याला आवडत नाही.
त्याच्या पद्धतीने करून साखर घालण्याआधी बाजूला काढली तर ती मला आवडत नाही.
कढी आम्ही आमच्या आमच्या माहेरी जाऊन खातो.

(लग्नाआधी किंवा एकमेकांबरोबर राहण्याआधी एकमेकांना हे सांगावं की तुझ्या आवडीचे चार पदार्थ तू शिकून घे.)


( क्रमश:) 

अक्कणमाती चिक्कणमाती -- ६

******

Friday, March 11, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ४


स्वयंपाक करताना मजा येत नाही, असं आहे का?
तर नाही, मजा येते.
स्वयंपाकघर ही खरोखर प्रयोगशाळा आहे.
रंग, रस, गंध, स्पर्श आणि ध्वनी पंचेन्द्रियांना आवाहन आहे.
पहिले म्हणजे गंध, स्वैपाकघरातून काय मस्त मस्त वास येत असतात.
भाज्यांचे वेगवेगळे मुख्यत: हिरव्या रंगछटेतील रंग, रंगीबेरंगी कोशिंबीर,
डाळीचा पिवळा, पोळ्यांचा गव्हाळ, भाताचा पांढरा, लोणच्याचा लाल...
रंगाच्या दृष्टीने पाहिलं तर ताट कसलं भारी दिसत असतं.
साध्या पोळीचाही प्रवास पिठाचा रंग ते भाजलेल्या पोळीचा रंग असा बदलत असतो.
फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवलं की ते प्रसरण पावतं. हळू हळू वास यायला लागतो.
मोहरी तेलात भिजू न देता परफेक्ट टायमिंग साधत टाकली की ती तडतडते,
ती जळण्याच्या आत मिरची हिंग पडायला पाहिजे, मग भाजी!
बरेचदा मी मिरचीऎवजी लाल तिखट वापरते.
यात वेळेचं महत्त्व फार आहे.
पोह्यांमधला शेंगदाणा किंवा पुलावातला काजू विशिष्ट रंगात तळला गेला तरच मस्त लागतो.
तर स्वैपाकाचा एक माहोल तयार झालेला असतो.
कणीक छान मळली की हाताला तिचा स्पर्श कसा सुखावतो.
छान भूक लागलेली असली आणि असे गंध आणि रंग!
जेवायला मजा येते.
लहानपणापासून ज्या पद्धतीचं जेवण आपण करत आलेलो असतो त्यात तृप्त करण्याची क्षमता असते.
म्हणजे चायनीज किंवा थाई किंवा पिझा खाऊन पोट भरतं, चव कळते. ते आवडतंही.
तृप्त होतो का?
मला शंका आहे.
आपली मुळं खूप खोलवर गेलेली असतात.
आपल्या बालपणात, आपल्या मातीत.
तृप्तीशी आपल्या भावना निगडीत असतात.
आपल्या ओबडधोबड मूळ गावी कशी एक आतून प्रसन्नता आणि स्वस्थता येते.
आपण फिरायला जातो तेव्हा ते श्रीमंत आणि सुबक गाव आपल्याला आवडतं, आपण भारावतो पण आपली नाळ ही शेवटी आपल्या गावाशी जोडलेली असते.
तसंच जेवणाचंही असतं.

स्वैपाक करणं माझ्यासाठी कायम कंटाळवाणंच होतं का? नाही.
मला मजा आलेली.
खाणारांनी शाबासकी दिल्यावर, खूप मार्क्स मिळावल्यावर कसं भारी वाटतं,
तसं मला वाटलेलं आहे.

बहुदा मी अकरावीत होते,
विश्वास पुण्याहून आलेला.
कशी कोण जाणे, मी पोळ्या करत होते.
पोळी अशी ट्म्म फुगली, तो म्हणाला, " वा!"
जमताहेत की तुला"
मग म्हणाला, " ही जी पोळी तू लाटते  आहेस ती जर अशीच फुगली तर मी तुला काहीही देईन."
" एवढं काय? फुगतात माझ्या पोळ्या "
आणि तीही पोळी फुगली, तो म्हणाला, "माग काय हवं ते! काहीही, मागे पुढे पाहू नकोस ."
" काय बरं मागू? ड्रेस? पुस्तक? "
" काहीही पटकन सांग. पुढची पोळी होईपर्यंत, नाहीतर संधी गेली."
आई गं! खरंच संधी गेली! :(
मला काही ठरवताच आलं नाही.
आपल्याला काय हवं आहे ते आपल्याला बरेचदा माहितच नसतं.

बाबा आणि मी मिळून स्वैपाक करायचो तर काय मजा यायची.
बाबा काय सुंदर कणीक मळून द्यायचे!
सोबतीला त्यांच्या गप्पा!
बाबा त्रिकोणी पोळ्या करत आणि बर्‍यापैकी जाड करत.
मी आणि विश्वास कधी कधी म्हणायचो, "बाबा, पोळी जरा जास्तच जाड झाली आहे."
" जाडी काय बघता? लुसलुशीत किती झाली आहे बघा. पापुद्रे कसे सुटले आहेत तुमच्या आईला सुद्धा अशी पोळी करायला जमणार नाही." :)
आम्ही गप्प बसत असू.
भाज्या पण कायच्या काय करायचे, वरणात दाण्याचा कूट घालायचे, काहीही!
वर आम्हांला त्यामुळे चव कशी बदलली आहे, छान झाली आहे, ते पटवून द्यायचे.
ते आम्हांला पटायचंच असं नाही पण आम्ही त्यांच्या प्रयोगांना शरण जात असू. :)
ते पसारा इतका करून ठेवत, वर याचे हात त्याला,
आईने जर पाहिलं असतं तर काही खरं नव्हतं.
आईचं शिस्तीच्या स्वैपाकघरात नुसता गोंधळ करून ठेवत.
दोन चार दिवस मजा यायची मग आईची वाट पाहणे सुरू होई.

मी नाट्यशास्त्राचा कोर्स करत होते तिथे एक पाककृतींची स्पर्धा ठरली.
माझ्या गटाला सुरळीच्या वडीची चिठ्ठी आली होती.
आमच्या तिकडे हा पदार्थ करत नाहीत,
आत्यांना फोन करून विचारलं.
आदल्या दिवशी घरी करून पाहिल्या,
आणि मग दुसर्‍या दिवशी तिथे बनवल्या आणि चक्क पहिला नंबर!

मिलिन्दच्या बाबांचे मामा संगमनेरला आले होते तेव्हा मी गुलाबजाम करून घेऊन गेलेले,
त्यांना खूप आवडले.
मग साताठ वर्षांनी मी त्यांच्याकडॆ गेले तेव्हा त्यांच्या सूनेने सांगितलं तुझे गुलाबजाम छान असतात ना?
:)
असं कुणी म्हंटलं की छान वाटतंच.
मी काही सुगरण नाही. हाताला चव वगैरे कॅटॅगरीतली तर अजिबात नाही.
कुठल्याही बाईला येतात तसे चार पदार्थ मलाही चांगले जमतात.
इतकंच

एकदा गंमत झाली.
मिलिन्दची आतेबहीण आली होती,
सखुबद्दा चाटून खाल्ला आणि म्हणाली, " तुझ्याकडून शिकून मीपण करते.
माझ्या भाच्यांना फार आवडतो, ते या लोणच्याला मावशीचं लोणचं म्हणतात,
मी म्हणते अरे, ते माझं नाही, विद्याने शिकवलेलं लोणचं आहे. तुम्ही याला मिलिन्दचं लोणचं म्हणा."
:) :)
मिलिन्दचा काय संबंध?

मी आईकडून शिकले. ती तिच्या आईकडून शिकली.
खरं कुठले कुठले पदार्थ आपण कुठून कुठून शिकतो, कशात भर घालतो,
त्यातले काही आपल्या घरात रूजतात.
पदार्थांचंही लोककथांसारखं असतं.
वर्षानुवर्ष लोकांनी लोकांना सांगितलेल्या तसे वर्षानुवर्षे लोकांनी (बायकांनीच मुख्यत:) लोकांसाठी करत आलेले पदार्थ.
कुठल्या पदार्थाची जननी कोण आहे ते ओळखणं अवघडच!
पदार्थाच्या माध्यमातून आपण समूहाशी जोडलेलो असतो.
लोकांचं शहाणपण त्यातही उतरलेलं असतं.

( क्रमश:) 

Thursday, March 10, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- ३

घराघराचा अन्नाकडे, जेवणाकडे पाहण्याचा एक दृष्टीकोन असतो.
आमच्याकडे औरंगाबादला असं आहे की ताजं आणि गरम जेवावं.
चवीपेक्षा वेगवेगळे प्रकार खायचेच, असं आहे.
रूचकर नसेल पण ते आरोग्यदायी असेल तर ते खायला हवं.
जेवण ही शरीरक्रियांसाठी, उर्जेसाठी आवश्यक बाब आहे.
तेवढंच महत्त्व त्याला आहे, जीभेवर ताबा महत्त्वाचा आहे.
आपण काहीही ( व्हेज) खाऊ शकतो, हे आम्हांला भारी वाटायचं.
बाबा कधीतरी कडुनिंबाच्या पानांचा कुटून रस काढत आणि ग्लासभर रस सहज पीत.
आमच्यासाठी अर्धा ग्लास असे. तो चेहरे वेडेवाकडे न करता प्यायला आम्ही शिकलो.
न आवडणार्‍या चवीची भाजी असेल तर ती संपवणं आम्हांला आव्हानात्मक वाटायचं.
आम्ही ती संपवायचो.
ताटात काहीही टाकायचं नाही.
हवं तितकंच वाढून घ्यायचं.
काहीही वाया घालायचं नाही.
आई आमच्याकडे पत्ताकोबीच्या दोन भाज्या करत असे,
पानांची एक आणि मग खालच्या खोडाच्या भागाची एक.
कोथिंबीरीच्या काड्यांची चटणी किंवा त्यांची मोळी बांधून आई वरणात सोडत असे,
नंतर ती काढून टाकायची मस्त स्वाद उतरतो, थोडीशीच पानं टाकली तरी चालतात.
यामागचं एक कारण काटकसर हे ही होतं.

माझ्या सासरचं थोडं वेगळं आहे.
तिथे चवीला महत्त्व आहे.
जे काय घरात असेल त्यात, याच्याऎवजी ते, वापरून आई पदार्थ करते.
आत्यांचं तसं नाही. त्या ठरल्याप्रमाणे करतात.
त्या पदार्थांवर जास्त मेहनत घेतात.
तेल, तूप सढळ हस्ते वापरत, पदार्थ नटवतात.
त्यांचे पदार्थ रूचकर असतात.
त्यांनी पदार्थाचा एक दर्जा ठरवलेला असतो,
तसा त्यांना व्हायला हवा असतो.
नाही झाला तर त्यांचा मूड जातो.
चवीला महत्त्व असल्याने, पदार्थ अधिकाधिक चविष्ट करत जाणे, हे घडतं.
ही खूप शिकण्यासारखी गोष्ट आहे.
बाकी त्यांच्यासाठी अंदाज, वाया न जाणं हे फारसं महत्त्वाचं नाही.
शिळं अशी काही संकल्पना नाही.

अन्नासंबंधीचं आपलं जे वागणं असतं ते आपल्या डोक्यात असतं,
आपल्या विचारात असतं.
आपण काय विचार करतो आणि का करतो? हे प्रत्येकाने पाहायला हवं असतं.
जगभरात असा कुठलाही पदार्थ नाही की जो रूचकर आहे असं जगातली प्रत्येक व्यक्ती सांगेल.
आपल्या सवयी असतात, आपल्या भावना असतात, आपल्या आठवणी त्याच्याशी निगडीत असतात.
आपल्या घराच्या म्हणून परंपरा असतात, इतिहास असतो.
संगमनेरला नरकचतुर्दशीच्यादिवशी सकाळी फोडणीचे पोहे करतातच,
सगळे फराळाचे पदार्थ असतात तरीही. कारण मिलिन्दची आजी तसं करायची म्हणून आत्या करतात.
छान वाटतं.

माझा अन्नासंबंधीचा विचार काय आहे?
मुख्यत: तो औरंगाबादच्या घरासारखा आहे.
पण विशिष्ट पदार्थासाठी विशिष्ट साहित्य, ठराविक प्रमाणात घ्यायचंच,
आणि तो पदार्थ आपल्याला हवा आहे तसा करायचा.
चवीकडेही लक्ष पुरवायचं हे मी वाढवलेलं आहे.

स्वयंपाकघर सांभाळणारी/ चालवणारी म्हणून माझी काय जबाबदारी आहे, असं मी मानते?
घरातल्या सगळ्यांना आणि आल्या गेल्यांना वेळच्यावेळी पोटभर जेवायला घालणं ही माझी जबाबदारी आहे.
त्यासाठीचा कच्चामाल आहे ना? हे पाहणं. पथ्यपाणी असेल तर ते सांभाळणं.
स्वयंपाकात वैविध्य आणणं. प्रत्येक सदस्याच्या आवडीनिवडीचा विचार करणं.
आपण " समतोल आहार " करतो आहोत ना? हे पाहणं.
त्यासाठी तेलातूपाचा , गोडाचा अतिरिक्त वापर न करणं.
मुलांच्या मनात अन्नाविषयीचा एक दृष्टिकोन तयार करणं.
स्वयंपाक करायचा म्हणजे काय काय करावं लागतं, हे मुलांपर्यंत पोचवणं. :)

( क्रमश:)

**********

Wednesday, March 9, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- २

सकाळी मिलिन्दला मी चहा करून देत असे, अगदी तीन-चार वर्षांपूर्वीपर्यंत हे चालू होतं.
तो स्वत: चहा करत नाही/तेव्हा करायचा नाही.
वास्तविक शिकेल नाहीतर चहा न घेता जाईल असा मी विचार करायला हवा ना?
मला उशीरापर्य्ंत झोपायला आवडतं आणि तेवढा चहा करून देण्यासाठी मी उठत असे,
फार लवकर नाही, सव्वासातला. :)
माझ्या मनात कुठेतरी हे आहेच की जर मी नोकरी करत नाही तर स्वैपाकघर सांभाळलं पाहिजे.
त्याच्या बरोबरीने नोकरी केली असती तर मी याबाबत आग्रही राहिले असते.

सवयीने मी स्वैपाक करत असले तरी ते काही माझ्या आवडीचं काम नाही.
जुजबी आणि आवश्यक तेवढाच स्वैपाक मी करते.
वरण-भात-भाजी-पोळी- कच्चं- इतकाच.
दोन -तीन भाज्या किंवा साईड डीश असं काही नाही.
मी केवळ भारतीय पदार्थ करते.
माझं वाहवत जाणं थांबलेलं आहे.
चायनीज, थाई, इटालियन असे कुठलेही पदार्थ मी करत नाही.
ते बाहेर इतके सुंदर मिळतात, जीभ त्याला सोकावली आहे,
हवे तेव्हा आम्ही बाहेर जाऊन खातो.
मुळात मिलिन्दला कुठे कुठे जाऊन काय काय खाण्याची आवड आहे,
म्हणून हे जमतं.
अशावेळी तो बिलाकडे पाहात नाही, मला हे जमलं नसतं. :)

पण स्वैपाकातले माझे काही स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत.
माझा अन्नाकडे पाहण्याचा काही एक दृष्टीकोन आहे.
फार प्रकार नसतील तरी चालणार आहे पण ताजं आणि गरम खावं.
माझा अंदाज परफेक्ट असतो.
आमच्याकडे फार क्वचित शिळं उरतं.
महिन्यातून एक-दोनदा इतकं ते प्रमाण कमी आहे.
फ्रिज मला लागत नाही अशी परिस्थिती आहे.
मधे बंद पडलेला तेव्हा ९ - १० महिने आमच्याकडे फ्रिज नव्हता.
मी म्हणत होते, घ्यायलाच नको.
शेवटी उन्हाळ्यात आईसक्रिम ठेवण्यासाठी म्हणून घेतला.
मी स्वैपाक करून ठेवत नाही.
कुकर लावते, कणीक भिजवते, भाजी फोडणीला टाकते,
भाजी होईस्तोवर कुकर झालेला असतो, वरण फोडणीला टाकते,
कोशिंबीर किंवा कच्च्या चकत्या, की आम्ही पानं घेतो.
वरण गरम, भात गरम, भाजी गरम...
मी पोळ्या करायला घेते आणि तव्यावरची पोळी ताटात!
शेवटची तव्यावरची पोळी मी घेते आणि जेवायला बसते.
साधारण तासभर स्वैपाकाला आणि अर्ध्या तासात आम्ही तो संपवतो.
अर्थात भाजी कुठली आहे आणि कशी करायची आहे त्यावर वेळ ठरतो.
गेली दोन वर्षे माझ्याकडे पोळ्यांना मावशी आहेत, त्यामुळे तास - दोन तास शिळ्या पोळ्या आम्हांला खायला लागतात.
त्यापूर्वीपर्यंत जवळ जवळ अठरा वर्षे मी हे करत होते.
याकाळात पुन्हा गरम करण्यासाठी लागणारा गॅस वाचलेला आहे.
अन्न वाया घातलेलं नाही.
ताजं- गरम- सकस अन्न खाल्लेलं आहे.
हे मी माझ्या आईकडून शिकले आहे.

मी पोळ्या करते, त्यामुळे साहजिक मी शेवटी जेवते,
मिलिन्द करत असता तर तो जेवला असता.
मिलिन्दला गरमच पोळ्या हव्यात, असं त्याचं नव्हतं.
मध्यंतरी मी डाऎट करत होते, मी माझ्या दोन पोळ्या करून आधी जेवून घेत असे,
मग सगळ्यांना करून घालत असे.

( क्रमश:)  

अक्कणमाती चिक्कणमाती -- ३

****

Tuesday, March 8, 2016

अक्कणमाती चिक्कणमाती -- १

महिलादिनाच्या शुभेच्छा!

सध्या मी पूर्वी जसं नियमीतपणे महिन्यातून दोनदा लिहित असे तसं लिहित नाही.
थोडा काळ विश्रांती! :)
पण ८ मार्च च्या निमित्ताने स्वयंपाकावर लिहायचं राहिलेलं, ते लिहिते आहे.

*******

स्वयंपाक हा कधी माझ्या आवडीचा विषय नव्हता.
आमच्या वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी त्यामुळे असेल, मी भातुकली कधी फारशी खेळले नाही.
दोन -चारदा असेल.
सांगायचा मुद्दा खेळातही कधी मी स्वयंपाकाकडे ओढली गेले नाही.
स्वयंपापाकात आईला मदत करणे हे ही मी केलेलं नाही.
ते ( न करणं) आईने मला करू दिलं.

सातवी-आठवीत मी कुकर लावायला शिकले, नंतर पोळ्या - भाजी हे ही शिकले.
पण ते केवळ अडीनडीला. रोज केलं पाहिजे असं काही नव्हतं.
माझ्या मैत्रिणी काय काय नविन शिकत होत्या, मी त्यात नव्हते.
मावशीला सांधेदुखीचा खूप त्रास होता आई तिच्या मदतीला कधी कधी नांदेडला जाई, तेव्हा मी, विश्वास आणि बाबा मिळून स्वैपाक सांभाळायचो.
बाबांना सगळा स्वैपाक येत असल्यामुळे मी त्यांची मदतनीस असंच असे.
आई बाबा जेव्हा यात्रा वजा सहलीला जात असत तेव्हा दोन- तीन आठवडे स्वयंपाकघरासह सगळं घर मी सांभाळत असे.
अर्थात तेव्हा मी एकटीच घरी असे.

मुलगी म्हणून मला स्वैपाक आलाच पाहिजे, हे शिकून घे - ते शिकून घे असं आईने कधी केलं नाही.
" काय एवढं स्वैपाकाचं? अंगावर जबाबदारी पडली की जमतो’ असं ती म्हणत असे.
आणि मला वाटत असे की मी काही स्वैपाकघराशी बांधून घ्यायची नाही.
लग्नाआधी मी काही फारसे नवनविन पदार्थ करून पाहिले असं झालं नाही, चार दोन केले असतील.

मी बाहेरची कामं सांभाळत असे. म्हणजे काय काय आणून दे, बिलं भर असली कामं करत असे.
आत्ता कळतंय की त्याने बाबांना मदत होत असे, आईला नाही.

लग्नं झालं. मला स्वैपाक येत होता. मिलिन्दला येत नव्हता.
मी नोकरी करत नव्हते. मिलिन्द करत होता.
अर्थात स्वैपाकाची जबाबदारी माझ्याकडे आली.
ही दोघांची मिळून जबाबदारी आहे, हे माझ्या मनात पक्कं होतं.

स्वयंपाकघर ही एक प्रयोगशाळा असते.
ती माझ्या ताब्यात आली.
माझ्याकडे वेळ होता.
काय काय करून बघायची सुरसुरी मला आली.
माझ्या सासूबाईंनी रूचिरा हे पुस्तक मला दिलं होतं.
टिव्ही वरचे कुकरी शोज मी पाहायचे.
वेगवेगळ्या साप्ताहिक, मासिक, वर्तमानपत्रातली स्वयंपाक विषयक सदरे आवर्जून वाचायचे. :)
पाककृती लिहून ठेवण्यासाठी एक वही केली होती.
मी वाहावत चाललेले :)
त्याचं एक कारण वाहवा हे ही होतं.

मी लग्नानंतर दोनेक महिन्यांत असेल,
आंब्याच्या वड्या केलेल्या त्या इतक्या छान झालेल्या, नंतर नारळाच्या केल्या त्या पण मस्त जमल्या.
वड्या करून कुठे कुठे पाठवणे असं सुरू झालं.
अनिल अवचटांच्या पुस्तकात वड्या जमणं म्हणजे स्वैपाकातली कशी वरची पायरी आहे हे वाचलं होतं.
त्यामुळे मलाही भारी वाटत होतं.
मग भातांचे प्रकार शिकले,
दाक्षिणात्य पदार्थ शिकले,
पंजाबी भाज्या वगैरे शिकले,
पोळ्यांचे प्रकार शिकले.
गोडाधोडाचे शिकले.
वेगवेगळ्या प्रकारची आईसक्रिम्स शिकले, ( कोर्स करून नव्हे असंच, आधी महाजन मावशींकडून शिकले.)
वर्षाची लोणची घालायला शिकले. ( हे मामींकडून)
रुचिरा घेऊन प्रत्येक पदार्थाला टीक करणे,
आणि अभ्यासाला असल्यासारखं पुस्तक संपवणे असा संकल्प मी केलेला आठवतो आहे.
आई कडून शिकले, आत्यांकडून शिकले आणखीपण कुणाकुणाकडून शिकले.

कोणीही पुण्यात आलं की त्यांना जेवायला बोलवायचं असं माझं असायचं.
काही जण आमच्याकडेच उतरायचे.
१५-२० माणसांचा स्वैपाक मी एकटी करू शकत असे.
माणसांची आवड होती.
माझ्या बाजूचे नातेवाईक तर जाऊदे, मिलिन्दकडच्याही सगळ्या नातेवाईकांना मी आग्रहाने बोलावत असे.
कोणाला काय आवडतं, मागच्या वेळेस काय केलं होतं, आता वेगळ काय करूया?
कशाशी काय जाईल?
विचार करून मेनू ठरवणे यातही माझा बराच वेळ जात असे.
मला या सगळ्यात कायम मजा यायचीच असं नाही.
मला ते काम खूप व्हायचं असंही होतं.
पण आले गेले नावाजत हे एक आहे.
आणि दुसरं मला वाटे आपण संसार थाटला आहे,
तर आल्या गेल्याचं स्वागत करणं हे आपलं कर्तव्य आहे.
आपण साधं जेवायला घालू शकत नाही?
एवढं तर एका घराने करायलाच हवं.
वेळी अवेळी आलेल्या कुठल्याही माणसासाठी आपल्या घराचं दार उघडं असलं पाहिजे.
किमान त्याला जेवू घातलं पाहिजे.
जे करायचं ते आनंदाने केलं पाहिजे.

जी दाद मला मिळायची ती स्वैपाकाला असेच पण त्याहून अगत्याला असे, असं आज मला वाटतं.
मिलिन्दच्या मावशींना मी म्हणालेले, " मावशी, एवढं काय! तुम्ही होतात, तुमचीपण मदत झालीच की!"
त्यावर त्या म्हणाल्या होत्या," काम तर आपण करतो आणि रोज खातोही. वेगवेगळे पदार्थ केलेस त्याचं वाटलंच
पण तुझं अगत्य, आपलेपणाने करतेस ते जास्त आवडलं. "
त्यांची प्रतिक्रिया माझ्या लक्षात राहिली आहे. त्याने मला एक वेगळा कोन मिळाला.
पुढे कधीतरी मी शिकले Attitude किती महत्त्वाचा असतो ते!

कधी कधी मला कंटाळा येतो मग वाटतं,
माझ्या आईने हे वर्षानुवर्षे केलेलं आहे, मला का जड जावं?

न सांगता, मला गृहित धरून कोणीही आमच्याकडे आले तरी
मी कधीही आलेल्या माणसांवर नाराजी दाखवली आहे, वैतागले आहे किंवा आदळाआपट केली आहे असं झालेलं नाही.
मी त्यांच्याशी नीट बोलले नाही असंही केलेलं नाही.
वरकरणी आनंदानेच मी केलं, आत मला कंटाळा येत असला तरीही.
अजूनही मला तेच वाटतं.
एकतर नीट करावं , जमणार नसेल तर थेट सांगावं.

लग्नानंतर सुरूवातीच्या दिवसांत मी स्वैपाकाची जबाबदारी घेतली तरी ती मी एकाहाती सांभाळायची असं नव्हतं.
मिलिन्दनेपण केलं पाहिजे हा आग्रह मी धरत असे.
त्याला पोहे शिकव, उपमा शिकव हे केलेलं आहे.
मी त्याला गरम डोसे करून वाढायचे आणि म्हणायचे की मलाही गरम हवे आहेत, तू करून वाढ.
खिचडी कर.
हे प्रयत्न कधी बंद पडले हे आता मला आठवतही नाहीये.
त्याला आवड नाही.
मी म्हणायचे , " मलाही आवड नाही पण करत्येय ना? कुणीतरी केलं पाहिजे ना?
मीही तुझ्याइतकीच शिकले आहे शिवाय स्वैपाकही शिकलेय. तू काय शिकलास?"
मिलिन्द म्हणाला, " तुला आवडत नाही तर तूही करू नकोस "
" मला असं म्हणून चालेल काय?"
एकदा जोरदार भांडण झालं.
मिलिन्द म्हणाला, " आपण पुण्यासारख्या शहरात राहतो, इथे काहीही मिळू शकतं.
मला चहा आला नाही तरी चालणार आहे. बाहेरचं खाणं म्हणजे निसत्व, अस्वच्छ असं आता राहिलेलं नाही."
मी म्हणाले, " तरीही रोज?"
तो म्हणाला, "रोज!. घरात स्वैपाकघर असलं पाहिजे असंही काही नाही."
"काय?"
"हो"
" अरे, आजारी माणसं असतात, तान्ही बाळं असतात. त्यांच्या खाण्याचं, पथ्याचं काय करायचं?"
" सगळं बाहेर मिळू शकतं."
" असं आहे? स्वैपाक ही इतकी बिनमहत्त्वाची गोष्ट आहे.? मी काय करत बसले आहे? गेली ८-१० वर्षे मी काय करते आहे?" ( तेव्हा आमच्या लग्नाला तेवढी वर्षे झालेली. :))
मी भयंकर चिडलेले.
मी त्याला मुदत दिली म्हणाले, " आठ दिवसांनी नीट विचार करून सांग, आपल्या घरात स्वैपाकघर हवं की नको?
माझी १० वर्षे मी यात घालवलेली आहेत. तुझं उत्तर आलं की मी ठरवीन काय ते."
स्वैपाकघर ही घराला एकत्र जोडणारी जागा आहे.
जेवताना आपण किती मजा करतो.
मिळून जेवण , जेवतानाच्या गप्पा हा दिवसातला आनंददायी वेळ असतो.
आणि ते करताना घरातली बाई/पुरूष (जर कुठल्या घरात असेल तर) किती खपत असतात.
तिच्या श्रमांविषयी आपल्याला आदर असला पाहिजे.
नुसता आदर नाहीच कामाचा, मदत करायला हवी.
स्वैपाकघरातलं काम जर घरातल्या सर्वांनी मिळून केलं तर ते तितकं कंटाळवाणं राहणार नाही.
असो.
दोन दिवसांनी विचारलं, " सांग, घराला स्वैपाकघर पाहिजे की नको?"
अजूनही त्याचं काही आवश्यकता नाही असंच उत्तर होतं.
आठ दिवसांनी शेवटी त्याने " पाहिजे " असं उत्तर दिलं.
कदाचित मी जिद्दीला पेटले म्हणून असेल. :)
आपल्या विचारात जर एवढी तफावत असेल आणि मी जी वर्षे स्वैपाकघरात घालवली त्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल,
तर मी तुला सोडून देते, असंच मी म्हणत होते.

त्यानंतर ताईचं आजारपण झालं, सुहृदची पथ्ये, हे सगळं काय बाहेरून आणता आलं असतं?
स्वैपाकघर नसतं तर कसं जमवणार होतो?

पण आज वाटतं मीही जरा जास्तच करत होते,
स्वैपाकघर नाही ही कल्पना इतकी काही टोकाची नाही.
सर्वसाधारण परिस्थीतीत अशक्य नाही.
हॉस्टेलमधे राहायचोच ना?

 स्वैपाक करणारी व्यक्ती एकटीच तेच तेच करत्येय असं असायला नको.
ज्यांना स्वैपाकाची खरंच आवड आहे, त्यांनाही रोज रोज तेच तेच करायला आवडतं का?
स्वैपाकाला दाद मिळाली की माणूस ( बाईमाणूस :)) त्या मोहात पडतो आणि वाहवत जातो.
सुगरणींनी सुद्धा यावर विचार करायला हवाच आहे.

एकूणच बाई स्वैपाकघरात कशी अडकत जाते, याचा मला चांगलाच अनुभव आला होता.
मला कंटाळाही यायला लागलेला.

मी स्वैपाक केला पाहिजे अशी सक्ती मिलिन्दने कधीही केली नाही.
आलेल्या माणसांना बाहेर जेवू घालायची त्याची तयारी असे.
मलाही तो कशाला दमतेस? असंच म्हणत असे.
भाज्या बाहेरून आणू, गोड बाहेरून आणू,
पण मलाच ते सगळं घरी करायचं असे.
आता मी अशी बाहेरची मदत घेते.

माझ्या जेवणाची जबाबदारी तुझ्यावर आहे असं समजू नकोस,
हे मिलिन्दने मला लग्न झाल्या झाल्याच सांगितलेलं आहे.
मी जेव्हा माहेरी जात असे म्हणजे आजोळी जात असे,
’तू इकडे आल्यावर आता मिलिन्दच्या जेवणाच्ं काय?" हा प्रश्न मला हमखास विचारला जाई.
मी जरा चिडत असे. "इतकी वर्षे तो जेवायचा ना? बघेल त्याचं तो."
" आता लग्न झालंय"
" पुण्यात सोय होते, चांगलं मिळतं जेवायला आणि त्याला आवडतंही बाहेर जेवायला,
मी नसले की त्याच्या आवडीचं नॉनव्हेज खाता येतं."
माझी असली उत्तरं त्यांना आवडत नसत. :)


( क्रमश:)

अक्कणमाती चिक्कणमाती -- २


****

स्वयंपाक कला

सगळी रोजची , दैनदिन कामे आटपून जरा chatting करत होते, तर मागून लगेच मुलाची, 

आरुषची, हाक, आई -आई , भूक लागली, काही तरी खायला दे! त्याला म्हंटले अरे काय देऊ,भाजी-पोळी, 

कि वरण-भात, कि fruits देवू चिरून तर quick  reply … no. असे ओरडला. काही तरी tasty दे. जर 

प्रश्न च पडला . रोज रोज काय नवीन द्यावे आणि tasty. मग परत एकदा internet गुरु ला साकडे 

घातले. मग त्याला हवा तो पदार्थ करून दिला. त्याने आवडी ने yummy  म्हणता  खाल्ला . आरुष हि 

खूष …. मी ही खुष ! 

       मला खरेंतर लग्नाआधी कधी स्वयंपाकाची विशेष जवाबदारी पडली नव्हती, कारण माझी आई 

गृहिणी होती. आणि माझ्या आईने पण कधी अभ्यास सोडून घरकाम - स्वयंपाक करणे याच आग्रह धरला 

नाही. Rather आमच्या घरी, म्हणजे माहेरी, माझ्यात आणि माझ्या भावात कधी भेदभाव केला नाही. 

अगदी लग्न होईपर्यंत सगळा काळ अगदी सुखात गेला. आधी शिक्षण, मग career यातच वेळ गेला. 

आणि मग पडल्या डोक्यावर अक्षता. लग्नानंतर एकदम Germany च! मग मात्र थोडं -थोडं tension 

यायला लागलं. म्हणजे रोजचा थोडाफार स्वयंपाक येत असे. पण ते रोजचेच. अगदी शिरा-उपमा असे 

साधेच पदार्थ असले तरी मला ते करायचं म्हटलं तरी tension यायचे. मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा 

आम्ही Siegen येथे राहत होतो. इतर cities पेक्षा जर लहान गाव. अगदी पहिले एक वर्ष तर मी पण 

ब्रेड खाऊन घालवलं. आणि काही ठराविक भाज्या म्हणजे बटाटा, फ्लोवर, मोठ्ठ वांगं, फरसबी, छोले-

राजमा चे tins बस्स एवढंच. सोबत भात आणि ब्रेड. ह्या सगळ्या भाज्या करायची माझी आधीची पद्धत 

म्हणजे फोडणी करणे, त्यात भाजी टाकणे, तिखट-मीठ -मसाला आणि भरपूर पाणी. भाजी शिजेपर्यंत 

बघत राहायचं. शिजली की hot-plate बंद. ह्या प्रकरणाशी hot-plate शी जुळवता जुळवता माझ्या नाकी 

नऊ आले. बर नवरा पण मी जे करायचे ते गुपचूप खयच. बहुतेक त्यालाही हीच पद्धत येत होती. मग 

अशातच नवऱ्याने, तुषारने, सांगितले, दिवाळीत आपल्या घरी माझ्या मित्रांना बोलावयाचे आहे. मला 

आनंद झाला, पण एवढा १०-१२ जणांचा करायचे tension पण आले. पण दोघांनी मिळून menue 

ठरवला, स्वयंपाक पण दोघांनी मिळून केला. आणि सगळ्यांनी चवीने खाल्ले. बस मग काय? माझा 

confidence वाढला आणि हळूहळू सवयीने hot-plate शी सुत जुळू लागले. इथे जे पदार्थ मिळतात, 

त्यांनाच आपल्या भारतीय पद्धतीने बनविणे जमू लागले. काही दिवसांनी मी एका मुलाची आई शले. 

आणि खरंच हो… "गरज ही शोधाची जननी असते" हे जननी झाल्यावरच मला पटले. मग त्याच्यासाठी 

करताना मीही नविन-नविन पाककृती शिकत गेले. अगदी "कोंड्यापासून मांडा" करणे जे कौशल्यही 

आत्मसात केले. मग आता "सुगरण" अगदीच नाही, पण आता मी कोणताही पदार्थ करून शकते. आणि 

मग इथे abroad ला राहायचा एक मोठ्ठा फायदा म्हणजे अगदी ५० माणसांचा स्वयंपाक करणे, योग्य 

अंदाज बांधणे, कितीला किती प्रमाण हे अगदी नजरेनेच कळू लागले. कोणत्या पदार्थाला काय लागेल? 

किती लागेल? हे आपोवापाच कळायला लागले. Proper management नी आपण  अगदी एकटी, 

कोणाच्या मदतीशिवाय सगळे करू शकतो असा आत्मविश्वास मला आता आहे. हे सगळे स्वयंपाक 

प्रशिक्षण मला माझ्या Germany मधील वास्तव्यने दिले. माझे बाबा जेव्हा माझ्याकडे आले होते तेव्हा 

त्यांना अगदी  खूप कौतुक वाटले, मी उत्तम स्वयंपाक करते आहे हे पाहून. 

काही दिवसांनी तुषारने २ वर्षांकरता Indore ला जायचे ठरवले… आम्ही २ वर्षे इंदौरला वास्तव्यास होतो. 

आणि मग  थेट खवय्यांच्या शहरात आगमन. इंदौरनी पण मला खूप काही दिले. खूप जीवा-भावाच्या 

मैत्रिणी, सक्खे शेजारी. आम्ही राहत होतो ती colony एक कुटुंबच झाले. इथे तर जिभेला आणि 

त्याचबरोबर माझ्या पाककलेला खूप छान exposure मिळाले. मी अजून स्वयंपाकाच्या क्लुप्त्या शिकले. 

इंदौरला पण भिशी पार्टी, मुलाची B´day party, हळदी-कुंकू समारंभ यात माझ्या पदार्थाचे होत असलेले 

कौतुक आणि एकटीने करण्याचे कौशल्य (इथे मदतनीस किंवा घरकाम करणाऱ्या मावशींशिवाय बरे) याला 

मिळालेली दाद तर अविस्मारणीयाच. मग आम्ही पुन्हा एकदा Siegen ला परत आलो. आता मात्र इथे 

सुखद धक्का मिळाला, एक तर आता इथे Indian grocery आधीपेक्षा जास्त मिळू लागली. पिठे, भाज्या 

पण. शिवाय by post भारतातून हवे ते सगळे मागवता येवू लगले. त्यामुळे आता खूप सुसह्य वाटत 

    खरच खाणे किंवा जेवण हे अगदी आपल्या जीवनातील अगदी अपरिहार्य बाजू. सकाळी उठल्यापासून 

ते झोपेपर्यंत सतत वेग-वेगळ्या चवीचे खायला लागते. त्यामुळेच कि काय हल्ली प्रत्येक TV  channel 

वर विविध  भाषेत अगदी मराठी त  सुद्धा एक तरी cookery  शो अस्तोच. आणि बरे का? ह्या सर्व 

shwos ना TRP भरपूर  मिळतो, असा ऐकले आहे. विविध bolgs पण हल्ली दिसतात.

     असाच माझा हा स्वयंपाक कलेचा प्रवास unlimited आणि non-shop सुरूच राहील आणि 

दिवसेंदिवस समृद्ध होईल… 

--  अनघा संत

Siegen, Germany  

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...