Monday, July 15, 2013

कौतुक -- १

एक मैत्रिण बर्‍याच दिवसांनी भेटली. गप्पा मारता मारता सहज म्हणाली, " .... घरी मावंदं केलं तर अडीचशे माणसांचा स्वैपाक मी एकटीने केला."
मी अवाक झाले. " का? " तर म्हणाली " हे म्हणाले होते, आचारी लाव. मी करायचा ठरवला आणि केला."
आदल्या दिवशी मुगाचा शिरा करून ठेवला. दुसर्‍या दिवशी फक्त पोळ्यांना बाई लावली. दोन भाज्या, चटणी, कोशिंबीर, भात..... आक्काने भाजी चिरून दिली. अजून कोणी थोडीफार मदत केलीही असेल पण फोडण्या/ तिखट/ मीठ...... अंदाज... सगळं हिनेच केलं.
म्हणजे नवरा मंगल कार्यालयाचा व्यवस्थापक आहे. तिच्या डोळ्यासमोर तिने आचार्‍याला हजार माणसांचा स्वैपाक करताना पाहिले असेल........ तरीही!
 प्रत्येकाची एक मर्यादा असते. मी २५ माणसांचा स्वैपाक एकटी करू शकते, अगदी वेळच पडली तर ५० - ६० त्यापुढे नाहीच.
हिला का करावा वाटला असेल? काय असेल त्यामागे?
कौतुक? कौतुक हवंसं वाटलं असेल?
हं पैसे जरासे वाचले असतील, पण त्यासाठी असेल असं नाही वाटत.
(किंवा हे करणं म्हणजे विसावा असेल, रोजच्या संसारातून मोकळीक.. कोण जाणे. )

कौतुक ही माणसासाठी अत्यावश्यक गोष्ट आहे.
अगदी मूलभूत गरजांपैकी एक!

प्रत्येक व्यक्तीने आपली एक स्वप्रतिमा घडवलेली असते. शक्यतो ती व्यक्ती आपल्या प्रतिमेला धरून वागत असते.
म्हणजे एखादीने ठरवलं/ तिने तिची प्रतिमा जर अशी घडवलेली असेल की ’मला चार माणसांपेक्षा जास्त लोकांचा स्वैपाक जमतच नाही.’
तर तिला तो जमणारच नाही.

आणि असं असतं की म्हणजे मला वाटतं की माणसाला कौतुक कशाचं हवं असतं तर, त्याच्या स्वप्रतिमेला धरून असेल ते!
म्हणजे मैत्रिणीला २५० माणसांचा स्वैपाक एकटीने केला याचं कौतूक करून घ्यायला खूप आवडलं असेल....
तर दुसरीला कोणी म्हणालं की चार माणसांच्यावर कोणी जेवायला असलं की ही घरी करायच्या फंदात पडतच नाही. तर ते कौतुकच वाटू शकेल.

मला असं म्हणायचंय  ’कष्ट हे गौण असतात किंवा असू शकतात.”

प्रश्न असा आहे की बाईला आपली स्वप्रतिमा घडवताना किंवा खरं तर स्वप्रतिमा घडवण्याची कितपत मोकळीक असते?

"आदर्श" हे समाज घडवत असतो. ते समाजातल्या निरनिराळ्या आर्थिक आणि सामाजिक स्तरांत वेगवेगळे असतात.
त्यातले चाकोरीची मोडतोड न करणारे आदर्श स्वीकारले जातात. स्वप्रतिमेवर अर्थातच या आदर्शांचा पगडा असतो.

स्वैपाक करता येण्याचं मूलभूत कौशल्य बाईला आलं पाहिजे असं समजलं जातं. त्यात काहीच्या काही वर जाणार्‍या बाईचं कौतुक होणारच. पण या माझ्या मैत्रिणीला जर म्हंटलं की एकटी प्रवास कर. तर तिला ते जमणार नाही. एकटीने प्रवास करून स्वत:चं कौतुक करून घ्यावं असं तिच्या मनातही येणार नाही.

म्हणजे " २५० माणसांचा स्वैपाक एकटीने करून पाहायचा" हे आव्हान घ्यावसं वाटलं तर घेऊ नये असं नाही.
समजा चाकोरी निवडायची सक्तीच आहे तर आहे त्या चाकोरीतही आव्हानं घ्यावीशी वाटणारच ना!

माझ्या कशाकशाचं कौतुक करा आणि कशाचं नको... हे बाईला ओळखता यायला हवं.
मला सगळंच येईल... च्या मागे जाऊन स्वत:ची फरफट करून घ्यायला नको.

(बाईला बाई म्हणून वाढवणं / घडवणं.. लिंगभाव हा असा सगळ्याच्या मुळाशी आहेच!)

 मुळात जर आदर्श हे लिंगनिरपेक्ष होऊ शकले तर हवं आहे.

बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे ती बदलायची असेल तर आदर्श बदलले पाहिजेत म्हणजे कौतुकासाठी म्हणून काही करायच्या कितीतरी वाटा तिला मोकळ्या होतील.

4 comments:

  1. आपल्याला काय करायचंय आणि आपल्यातल्या कोणत्या गुणांचा विकास घडवायचा आहे हा निर्णय जोपर्यंत आपला आपण घेत आहोत तोपर्यंतच ते आपल्याला आनंद देत राहील.

    ज्या दिवशी लोकांनी (समाजाने) आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून आपली धडपड चालू होते तेव्हा तुम्ही स्वत:च्याच प्रतिमेत अडकत जाता आणि आयुष्यभराचे गुलाम होता.

    "लोक काय म्हणतील" ह्या ३ शब्दांना आपले आयुष्य विकून टाकणाऱ्या लोकांचा मला अतिशय तिटकारा आहे.

    ReplyDelete
  2. >>प्रश्न असा आहे की बाईला आपली स्वप्रतिमा घडवताना किंवा खरं तर स्वप्रतिमा घडवण्याची कितपत मोकळीक असते?

    त्याहूनही महत्वाचा प्रश्न हा अहे की किती जणांची आपली स्वप्रतिमा स्वतःला हवी तशी घडवण्यासाठी झगडण्याची तयारी आणि हिंमत असते? मी मुद्दाम बायकांना हा शब्द टाळला आहे कारण माझ्यामते तू स्वप्रतिमेबद्दल जे मुद्दे उपस्थित केले आहेस ते खरं तर लिंगनिरपेक्ष आहेत.
    गोपीकृष्ण किंवा बिरजूमहाराजांचा आदर्श घेऊ पहाणार्‍या काही नावाजलेल्या युवा नर्तकांची चेष्टा-मस्करी होताना आपण अनेकांनी अनुभवली असेल. ह्या लोकांना स्वप्रतिमा घडवण्यासाठी कित्येक बायकांपेक्षाही जास्त धडपड आणि संघर्ष करावा लागला असेल. तू मांडलेल्या ‘चाकोरीची मोडतोड न करणारे आदर्श स्वीकारले जातात‘ ह्या मुद्द्यामागे हा संघर्ष टाळण्याची वृत्ती आहेच.

    >>माझ्या कशाकशाचं कौतुक करा आणि कशाचं नको... हे बाईला ओळखता यायला हवं.
    >>बाईला जी स्वप्रतिमा हवी आहे ती बदलायची असेल तर आदर्श बदलले पाहिजेत म्हणजे कौतुकासाठी म्हणून काही करायच्या कितीतरी वाटा तिला मोकळ्या होतील.

    स्वप्रतिमेत अडकण्यानेसुद्धा विचार चाकोरीबद्ध होऊ शकतात ह्याचा धोका ओळखायला पाहिजे. त्याहीपेक्षा जास्त धोका समाजाच्या कौतुकात अडकण्याचा आहे. समाज अशाच गोष्टींचे कौतुक करेल ज्या गोष्टी समाजमान्य, रूढींशी सुसंगत आहेत (positive reinforcement). त्यामुळे लोकमान्यता/समाजाने केलेले कौतुक ह्याचे स्वप्रतिमेशी नाते जितके पुसट ठेवता येईल तितके चांगले.

    - सचिन

    ReplyDelete

  3. "आपल्याला हवं ते करायला सतत कोणाचीतरी संमती का घ्यावी लागते आपल्याला? साधं खातानाही कुणाच्या तरी भावना दुखावल्या जातील, असं का येत राहतं मनात? लाल किंवा पिवळी साडी आवडली तरी आजूबाजूचे म्हणतात, 'बाई गं, वय आहे का तुझं असले रंग घालायचं?'' आपण कसं दिसावं, काय खावं, कधी कसं वागावं याची परिमाणं ठरलेली. आपल्या हातात काहीच नाही. नाहीतर लोकापवादाचं भय फार. त्याचा बागुलबुवा मानगुटीवर बसलेला. मग स्वतःचा निर्णय घेण्याच्या निर्मळ आणि निर्व्याज आनंदाला आपण सतत मुकत राहतो, मुकत आलोय."

    सकाळ दि. १९ जुलै.

    http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=4748910053851741520&SectionId=2&SectionName=संपादकीय&NewsDate=20130719&Provider=-&NewsTitle=आनंद मनासारखं करण्यातला

    ReplyDelete
    Replies
    1. मिलिंद मला अगदी हेच म्हणायचं होतं.

      योग्य शब्दात मांडल्याबद्दल आभार !!!

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...