Thursday, March 9, 2017

लंच बॉक्स......


हा सिनेमा मुंबईच्या डबा संस्कृतीचा आहे.या डब्याभेवती सिनेमा रंगत जातो.एक नातं फुलतजातं.एक
तरुण बाई आणि रीटायरमेंट्ला  आलेला पुरुष यांच्यातले नातेसंबध .यांची ओळख होत जाते तीच या लंचबॉक्समुळं.हळूहळू त्याचा प्रवास प्रेमाच्या दिशेने होत जातो.

इला (इमरत कौर )....एक मध्यम वर्गातील गृहीणी,तिला एक लहान मुलगी आहे.तिच्या नव-याचे विवाहबाह्य संबंध आहेत.घरी असला तरी मोबाईलमद्ये डोकं घालून बसलेला.
इला, आपल्या हाताने चविष्ठ जेवण बनवून नव-याला खूश करु पहाणारी....
साजन ( इरफान खान ) असाच एक सरकारी काम करणारा....त्याच्या पत्नीचे निधन झाले आहे.आपल्या ऑफीसात तो जेवणाचा बाहेरुन डबा मागवतअसतो. एके दिवशी डबेवाल्याच्या चुकीमुळे इला जो नव-यासाठी डबा पाठवत असते तो साजनच्या हाती येतो.डबेवाल्याच्या लक्षात हे येत नाही आणि इलाचा डबा रोज त्याच्याकडे येऊ लागतो.या डब्यातून त्यांचा पत्रव्यवहार सुरु होतो. दोघे अनोळखी डब्यातून रोज एकमेकांना चिठ्ठ्या लिहायला लागतात.आपली मनं मोकळी करत जातात.प्रत्येक गोष्ट शेअर करु लागतात.मोकळेपणा इतका येतो की आपल्या नव-याचे विवाहबाह्य संबंध आहेत हेही ती त्याच्याशी बोलते.अश्या अनेक चिठ्ठ्यांमधून व्यक्त होत जाताना दोघं भावनिक पातळीवर एकमेकांच्या जवळ येतात.अश्याच एका चिठ्ठीत इला त्याला भूतानला चालली आहे असे सांगते.त्यावर तुझ्या बरोबर मी पण येऊ इच्छितो असे तो उत्तर पाठवतो.अनोळखी व्यक्तीबरोबर कसं भूतानला जायचं म्हणून ते हॉटेलमध्ये प्रत्यक्ष  भेटायचं ठरवतात. ती आतुरतेने वाट बघत असते.पण तो तिला भेटतच नाही.दुस-या दिवशी डब्यातून चिठ्ठी पाठवून ती त्याला न येण्याचे कारण विचारते.त्याला उत्तर म्हणून तो लिहून पाठवतो की तो तिला भेटायला आला होता , पण भेटला नाही कारण इलाच्या तुलनेत तो जास्त वयाचा  होता.तो तिला चिठ्ठीत म्हणतो आपण इथचं थांबाव.एके दिवशी इलाला त्याचा नोकरीचा पत्ता कळतो.ती तिथे जाते पण तो नोकरी सोडून नाशिकला निघून गेलेला असतो.सिनेमाच्या शेवटी तो नाशिकहून परत येतो  आणि तिचा शोध घेत असताना दाखवला आहे आणि पार्शभूमीला डब्बेवाल्यांचे संगीत चालू आहे.

समाजातल्या अश्या अनेक स्त्रीया......
आपल्या सहजीवनातील , रोजच्या जगण्यातल्या छोट्या छोट्या गोष्टीतील आनंद ,माझा नवरा,मुलं याभोवतीचं जग  हेच आपलं आयुष्य मानणा-या ,सगळं कसं छान चाललंय हे दाखवण्याची धडपड करणा-या ,मधूनच नाही माझं चांगल चाललय म्हणून पाऊल उचलणा-या  ,गृहीणी म्हणून समाजाच्या असलेल्या मर्यादा संभाळणा-या  , जोडीदाराकडून अपेक्षित असणा-या भावनिक समाधान देणा-या गोष्टी दुस-या कोणा पुरुषाकडून मिळवणा-या अश्या अनेक स्त्रीया आपल्या आजूबाजूला आहेत.या सगळ्यांचं प्रतिनिधित्व इला ही व्यक्तिरेखा करते.सिनेमाची कथा म्हणून आपल्याला हे पटेलही,आवडेल सुद्धा.पण प्रत्यक्षात एखादी स्त्री आपल्या आवतीभोवती अशी असेल तर याकडे आपण कसे बघतो ते महत्वाचे. नाही का ?


Wednesday, March 8, 2017

कहानी - २कहानी २ ची कहानी बाललैंगिक अत्याचारांवर आहे.
त्यात योगायोगाच्या आणि फिल्मी म्हणाव्यात अशा घटना आहेत.
तरीही योग्य तो संदेश लोकांपर्यंत पोहोचतो असं मला वाटतं.
लहान वय, आजूबाजूच्या जवळच्या, प्रेमाच्या माणसांकडून विश्वासघात, मुलीच्या मनातली भीती, तिचं गप्प गप्प होणं, अशा अनुभवामुळे मोठेपणी पुरूषांची आणि लैंगिक सुखाचीच वाटणारी भीती, याबाबतीत गमावलेला आत्मविश्वास....... कहानी
कहानी आपल्या आजूबाजूला घडणारी आणि आपल्याला माहितच नसलेली, आपण बघू शकत नाही अशी!
पण दुर्गा रानी सिंग? ती बघते, तिला जाणवतं... ती शोधते आणि तडीस नेते.
आपल्या सख्ख्या काकाच्या अत्याचारांना बळी पडणारी छोटी मिनी, काकाच्या बाजूने असणारी सख्खी आजी, त्याच घरात राहण्यावाचून पर्याय नसणारी मिनी.

कहानीत तीन बायका आहेत, एक मिनी, एक तिची आजी आणि एक दुर्गा!
 ( कहानीत एक अत्याचार करणारा काका आहे आणि पहिल्यांदा नाही तरी दुसर्‍यांदा दुर्गाला मदत करणारा पोलीस ऑफीसर आहे. पण आज मला पुरूषांबद्दल बोलायचं नाहीये. )

मिनी लहान आहे आणि आपल्या जवळची माणसे योग्यच वागत असणार अशा भ्रमात ती आहे, तिचे त्रास योग्य आहेत का? ते बोलायला देखील तिला कुणी नसतं.
तिला मग एक दुर्गा भेटते. दुर्गाने लहानपणी हे भोगलेलं आहे. जिवाच्या आकांताने ती मिनीला वाचवू पाहात असते आणि वाचवते.
मिनीत ती छोट्या दुर्गाला पाहात असते. मिनीला ’’ते” आवडतं असं दुर्गाला सांगितलं जातं तेव्हा ती म्हणते की हे कळण्याचं, ठरवू शकण्याचं तिचं वय तरी आहे का? ....
 (.... मुलींना/मुलांना सज्ञान होऊ देत आणि मग काय ते ठरवू देत.)
 मिनीसाठी ती आपल्या प्रियकराला सोडते. अजूनही पुरूषाबरोबर राहण्याची, संसाराची तिला भीती वाटत असते का? ही पळवाट ती शोधते का? प्रियकराला विश्वासात घेऊनही ती हे करू शकली असती.

 यातली आजी जी आहे तिच्या वागण्याने आपल्याला सगळ्यात जास्त धक्का बसतो. ती त्या माकडीण आणि तिचं पिल्लू या गोष्टीतल्या माकडीणीसारखी आहे का? अशा आज्या असत असणार. 'दोघी' मधे आपल्या मुलीला वेश्याव्यवसायाला लावणारी आई आहे. आपल्याला वाटतं कठीण, कसोटीच्या प्रसंगात माणसाने उजळून निघावं. पण माणसं स्वार्थी असतात, भेकड असतात, नैतिकतेची चाड नसणारी असतात, मूर्ख असतात, दुष्ट असतात. अशी माणसं जगायला लायक असतात? की नसतात? सिनेमात जेव्हा ती फिल्मी पद्धतीने मरतात तेव्हा बरं वाटतं.
खरंच बरं वाटतं. वास्तवांत असं घडणं शक्य नाही हे कळत असतानाही बरं वाटतं.

 या प्रश्नात हे महत्वाचं आहे की अत्याचारीत बालकाचं भविष्य त्याच्या भूतकाळातून मोकळं करणं. बालकाचा आत्मविश्वास वाढवणं, त्याच्या/तिच्या मनातला अपराधभाव काढून टाकणं.

 अशा अत्याचारांच्या विरोधात निर्भीडपणे उभं राहायलाच हवं असं आपल्याला आतून जे वाटत असतं, ते दुर्गा करते. ती उजळून निघते. तिच्या आयुष्याचं ध्येय बनवते. एका मुलीला एक सुरक्षित भविष्य देऊ करते. त्या दोघींमधे एक छानसं आश्वासक नातं तयार होतं.
 यातलं दुर्गाचं काम विद्या बालनने फार छान केलं आहे. आपल्या दिसण्याची आणि फिगरची ती अजिबात पर्वा करत नाही. व्यक्तिरेखेशी एकनिष्ठ राहण्याचा प्रयत्न करते. ती बाई म्हणून उभी आहे किंबहुना तिचं बाईपण दाखवणारा चित्रपट आहे आणि ती कुठेही दुय्यम नाहीये ती ’हिरो’ आहे. नायिका ’हिरो’ असणारे चित्रपट येताहेत आणि यायला हवे आहेत. आपल्या आयुष्यात आपण ’हिरो’ असतो हे आपण बायकांनी मनावर बिंबवायला हवं. :)


 स्त्री आणि पुरूष या नात्यांत भीती आली की ते विद्रूप होतं. भीती म्हणजे धाक नाही, भीती म्हणजे हा आपल्या तनामनावर अत्याचार करेल ही भीती! जेव्हा स्त्रीचं पुरूषाशी भीतीमुक्त नातं असतं.... बहीणीचं भावाशी,  मैत्रिणीचं मित्राशी , आईचं मुलाशी, बापाचं लेकीशी.... ते फार सुंदर असतं.

 पुरूषांबरोबरची अशी सुंदर नाती तुमचं आयुष्य फुलवत जावोत ही आजच्या महिलादिनी शुभेच्छा!


आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...