Wednesday, March 13, 2013

बाईपणाची ओझी



ओझी म्हणजे नक्की काय?

मला वाटतं, मनाला पटणाऱ्या, पेलणाऱ्या अपेक्षा असल्या (इतरांकडून आपल्यासाठी) की त्यांचं ओझं होतं. मग या अपेक्षांना रूढी, रिती-रिवाज, सामाजिक, आर्थिक अशी कुठलीही पार्श्वभूमी असू शकते.
 'बाईपणाच ओझं' यात मग एक स्त्री म्हणून जन्माला येणं ही अजून एक पार्श्वभूमी add होते. आणि या सर्वांचा परिपाक असलेल्या अपेक्षा प्रत्येक स्त्रीला सामोऱ्या येतात.
            व्यक्तीपरत्वे ही ओझी बदलू शकतात किंबहुना एकाच व्यक्तीच्या संदर्भातही काळाप्रमाणे, कुठल्या गोष्टी ओझी या सदरात मोडत आहेत यात बदल होऊ शकतो.
यातल्या काही गोष्टी काहीजणींना सहज जमणाऱ्या, आवडणाऱ्या असल्या तर त्यांचं ओझं वाटत नाही. पण प्रत्येक स्त्रीला तसंच  वाटेल असं नाही. उदा. कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं.
कधी कधी असं पण होतं कि आधी आवडत असतं पण मध्येच कधी नाही केलं तर इतरांकडून विचारणा होते आणि मग त्या गोष्टीचं ओझं वाटायला लागतं. माझ्या एका मारवाडी मैत्रिणीच उदाहरण देते. ती पुण्यात एका software कंपनीत आहे. इथे ती आणि नवरा दोघच रहातात. लग्न झाल्यावर अगदी हौसेने नवीन साड्या, त्याच्याबरोबर सगळ्या matching गोष्टी, हातभार लाल-पांढऱ्या बांगड्या(तिचा नवरा यूपी चा आहे) अशी खरेदी केली. सुरुवातीला नवीन साडी नेसली कि नटून फोटो काढून मला दाखवायची. पुण्यात रहाताना अगदी इथल्या मुलींसारखी जीन्स-टी शर्ट मध्ये असते. पण जेव्हा सासरी जाते तेव्हा तिथे त्याच नव्या साड्या नेसून सगळे दागिने घालून, घुंघट काढून रहायला लागतं. तिथे त्याचा तिला त्रास होतो. तिथे तिने तसंच रहायला हवं या अपेक्षेचं तिला ओझं होतंय. खरंतर साडी नेसून नटण ही तिची आवडती गोष्ट आहे तरीही.
सामाजिक ओझी बरीच आहेत. पाळी चालू असताना मंदिरात जाणे हे पाळीशी संबधित एकाप्रकारचं ओझं आहे. जे मी लग्न झाल्यावर झुगारून दिलंय. सासरी मला कुणीच या गोष्टीवरून काही बोललं नाही. उलट असं काही पाळायची गरज नाही हेच सांगितलं. पण पाळीशी संबंधित इतकी ओझी असतात समाजात वावरताना. आपली पाळी सुरु आहे हे कुणाला कळू द्यायचं नाही. उघडपणे सांगायचं नाही. पॅड बदलायचं असेल तर ते लपवून बाथरूममध्ये घेऊन जायचं. खूप वेळ जर एका जागी बसायला लागलं तर उठल्यावर मागे डाग तर नाही पडलेला याची काळजी करणं. फक्त बायकाच जवळ असल्या तर यावर बोलणं होतं, एकमेकींना मदत होते. पण पुरुष कधी बोलतात का की आज माझ्या बायकोची पाळी चालू आहे. तिला त्रास होतोय वगैरे. जवळपास जर ५०% समाजाची ही दर महिन्याची शारीरिक अवस्था आहे तर त्यात काहीतरी लपवण्यासारखं आहे असं आपण का वागतो? का ओझं आहे आपल्यावर या गोष्टींचं आणि तेच ओझं आपण आपल्या मुलीना पण देतोय. निदान आपण तरी आपल्या मुलाशी, वडिलांनी आपल्या मुलीशी पाळीबद्दल बोलताना अडखळू नये असं मला वाटतं.
घराबद्दल बोलायचं झालं तर बराचशा अपेक्षा या आपण जबाबदाऱ्या म्हणून घेतो. आणि मग त्यांच ओझं वाटायला लागलं तरी ते जबाबदारीच्या लेबलाखाली झाकायचा प्रयत्न करतो. यात आपण म्हणजे स्वतः आणि घरचे सुद्धा. उदा. स्वयंपाक करणं, मुलाचं बघणं, घर आवरणं, पाहुणे-रावळे बघणं...वगैरे पण हि उदाहरणं इथेच थांबत नाहीत 
आता पूर्वीसारखं घरातली कामं बायकांची आणि बाहेरची पुरूषांची असं नाहीये. बाई पण बाहेर काम करत असल्याने तिची कामं पण वाढली आहेत. आणि मग स्वतःला prove करायला बऱ्याच गोष्टींची जबाबदारी ती घेते किंवा तिच्यावर येते. इथे परत जबाबदारी आणि अपेक्षेची गल्लत आहेच. आणि मग यातून येणारं ओझं आहे.
व्यवसायाच्या ठिकाणी काहीजणींना पुरुष सहकाऱ्यांच्या तुलनेत आपण कमी नाही हे दाखवून द्यायला लागतं. बरेचदा संधी मिळूनही पुढे जाता येत नाही. मला आठवतंय, माझी आई बँकेत होती. तिथे तिला ऑफिसर म्हणून प्रमोशन मिळणार होतं पण मग मुंबईतून बाहेर जावं लागणार होतंआईने नको म्हणून सांगितलं. क्लार्क म्हणूनच शेवटी रिटायर झाली.
आता बऱ्याच अंशी हे ओझं कमी झालेलं दिसतं. नवराही बायकोला अशा बाबतीत बहुधा पाठींबा देताना दिसतो. व्यवसायाच्या ठिकाणी पुरुष सहकारी कसे असतील, तिथे एक स्त्री म्हणून कसं वागायचं याचं ओझं असतचरात्री उशिरा बाहेर असणं याचं ओझं पुण्यात तरी बरंच कमी वाटतं मुंबईपेक्षा
अजून बरीच ओझी आहेत सामाजिक संकेत झालेली. उदाएकत्र कार्यक्रमाला स्त्रियांनी डावीकडच्या बाजूला बसणे. खाली बसणे. घरी पाहुणे आलेले असताना बायकांनी पुरुष आणि मुलांनंतर जेवणे आणि आवरून ठेवणे, स्वतःच्या कपड्याचं कायम भान ठेवणं(कुठून काही दिसत तर नाहीये ना, साडीचा पदर जागेवरच आहे ना) वगैरे वगैरे....

     ही सगळी ओझी आहेत असं सांगताना पुरुषांवर काहीच ओझं नसेल असं गृहीत धरलेलं नाही. पण त्यांच्यावरच ओझं समजून त्याच्याशी तुलना करून बायकांची ओझी मांडली आहेत असंही नाही. समाजाकडून आलेलं ओझं यात 'समाज' म्हणजे स्त्रिया आणि पुरुष एकत्र असा विचार आहे.

     आजच्या आपल्या पिढीत पूर्वीपेक्षा बाईपणाची ओझी बरीच कमी झाली आहेत. आपली ती झुगारून द्यायची क्षमता पण वाढली आहे. आपल्यापेक्षा आपल्या पुढच्या पिढीत अजून बदल दिसतील
पण ही ओझी झुगारून देताना त्यामुळे नवी ओझी तर निर्माण होत नाही आहेत ना याकडे पण लक्ष द्यायला हवे आहे.

1 comment:

  1. छान!

    >>माझी आई बँकेत होती. तिथे तिला ऑफिसर म्हणून प्रमोशन मिळणार होतं पण मग मुंबईतून बाहेर जावं लागणार होतं. आईने नको म्हणून सांगितलं.
    आईला याचा अभिमान वाटतो की खंत?

    >>यातल्या काही गोष्टी काहीजणींना सहज जमणाऱ्या, आवडणाऱ्या असल्या तर त्यांचं ओझं वाटत नाही. पण प्रत्येक स्त्रीला तसंच वाटेल असं नाही. उदा. कुंकू लावणं, मंगळसूत्र घालणं.
    बरोबर आहे.
    पण गुलामांना जसं त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्यावी लागते, तोवर गुलामीचं ओझं त्यांच्यावर नसतंच.
    तसंच स्त्रियांच्या या ओझ्यांची, गुलामीची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे,
    असं नाही का तुला वाटत?

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...