Monday, December 31, 2012

बायांनो, सांभाळा


दिल्लीत एका युवतीवर बसमधे सामुहिक बलात्कार झाला आणि नंतर तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले.......
ज्या बातम्या आपण वाचतोय...... हे भयंकर आहे.

अन्यायाविरूद्धची/ क्रूर राक्षसी वृत्तीबद्दलची चीड असली तरी या क्षणी असहायताच दाटून आली आहे.
काहीच सुचेनासं झालं आहे.

आपल्या देशात कुठल्याही तेवीस वर्षाच्या मुलीचं भविष्य कदाचित असं असू शकतं?
किती लाजीरवाणी गोष्ट आहे.
कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात एक दिवस असाही उगवू शकतो?
तुमच्या, माझ्या, कुणाच्याही!
काय करायचं बायकांनी?
कसं सुरक्षित ठेवायचं स्वत:ला?
या घटनेमुळे घरोघरच्या किती मुली आणि त्यांचे आईबाप घाबरले असतील!
त्यांच्यावरची बंधने वाढतील.
अंधार पडला की बाहेर नको जायला. असं होईल.

बायकांना बलात्काराच्या भीतीतच आयुष्य काढायला लागतं.

बलात्कारी पुरूषांबद्दल मला आत्ता इथे काहीच बोलायचे नाही.
त्यांना कायद्याने काय व्हायची ती शिक्षा होईल.

जी मुलगी याला बळी पडली, तिचं काय?
............................................................................................


**********

सार्‍या जगभराच्या इतिहासात पुरूषांनी स्त्रियांवर राज्य केलं आहे, करताहेत. जगभर मातृकुळे होती आणि नंतर पितृकुळे/ पुरूषसत्ताक पद्धत आली. हा असा बदल का झाला असावा? यावरचे वेगवेगळे अभ्यास आहेत.

 मला कायम असं वाटतं की पुरूष हे करू शकले याचं कारण त्यांच्याकडे असलेली बलात्कार करण्याची क्षमता.
जे बाई करू शकत नाही आणि पुरूष करू शकतात असं काय आहे? तर बलात्कार.
बलात्कार करून एखाद्या बाईचं आयुष्य ते उद्ध्वस्त करू शकतात.
बलात्कार हा बाईचा आत्मसन्मान धुळीला मिळवणारा असावा म्हणून मग योनिशुचितेच्या कल्पना आणि पतिव्रताधर्म!
बलात्कार हा अपघात म्हणून सोडून देता येऊ नये यासाठी लहानपणापासून मुलीला तिने स्वत:ला कसं सांभाळलं पाहिजे, पावित्र्य कसं जपलं पाहिजे हे सांगितलं जातं, जन्मल्यापासून हे ऎकत वाढणारी मुलगी, पावित्र्यभंग झाला की मोडून पडणारच ना?

*******

 बलात्कार करण्याची क्षमता घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल!
मोकळेच!
कुठल्याही स्त्रीवर बलात्कार होऊ शकतो
कधीही, कुठेही
बायांनो, सांभाळा
तुमचं शीलच नाही तर तुमचा जीवही धोक्यात आहे.
तुमचा गुन्हा इतकाच आहे की तुम्ही बाईचं शरीर घेऊन जन्माला आला आहात
कुठलीही वेळ अवेळ असू शकते
कुठलीही जागा चुकीची असू शकते

बलात्कार करण्याची क्षमता घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल!
मोकळेच!
जमलं तर सांभाळा, नाहीतर मरून जा.
******

Friday, December 14, 2012

इंद्रधनु १०० - काही प्रश्न /मते


या लेखाच्या शीर्षकात इंद्रधनु - १०० असं असलं तरी मी या लेखात लिहिणार आहे ते फक्त माझ्या लेखांबद्दल ........
लेख वाचून माझ्या पर्यंत आलेले काही प्रश्न  /मते ...

 स्त्री-मुक्तीच्या विचारांमुळे काहीशी एकारली विचारपद्धती तू सर्वत्र अवलंबत तर नाहीस ना ? ( असं काही वेळा वाटून गेलं.)
(या एका विचारपद्धतीखेरीज अनेक पद्धतीने माणसाचा विचार होऊ शकतो,)
स्त्री-मुक्तीच्या विचारपद्धतीखेरीज  अनेक पद्धतीने माणसाचा विचार होऊ शकतो, हे मला मान्यच आहे.
त्या त्या विचारपद्धती बाईला आत्मसन्मानाने जगण्याची मुभा देतात की नाही, त्या मला मान्य आहेत की नाही, हा वेगळा मुद्दा आहे.
(मुळात त्या सगळ्या विचारपद्धतींचा माझा अभ्यास आहे, असं नाही. )
बाईला आत्मसन्मानाने जगायला मिळणं ही माझ्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.
खरं सांगायचं तर स्त्रीमुक्तीचाही मी खोलवर अभ्यास केलेला आहे, असं नाही. स्त्री-पुरूष समानतेची एक दृष्टी मिळाली की आजूबाजूच्या घटनांमधलं जे राजकारण दिसतं ते पुढं आणायचा प्रयत्न केला आहे.
मागच्या लेखात लिहिलं आहे तसं, समजा इथे पावसावर लिहिताना "अंगाला चिकटलेले कपडे आणि ते पाहणारांच्या नजरा... यांच्यासह मला भिजायला लागतं." या अनुभवावर मी लिहिलं म्हणून पावसाकडे मी त्याच पद्धतीने पाहते असं नाही, त्यापलीकडेही मी तो अनुभवते आणि तो माझ्या जगण्याचा अविभाज्य भाग आहेच. फक्त तो संपूर्णपणे इंद्रधनुवर प्रतिबिंबीत होणार नाही.

 स्त्रीवादावर आधारित आजूबाजूच्या भवतालाकडे पाहाणारी मांडणी हाच इंद्रधनु ब्लॉगचा स्कोप आहे.........
खरं तसं नाही. वेगळ्या विचारपद्धतीने त्या घटनेकडे पाहणारे लेख कुणी लिहिले आणि चर्चा पुढे गेली तर चालणार आहे. पण मी तसे लिहिलेले नाहीत. आणि स्त्रीवादी पद्धतीने स्त्रियांना अधिक चांगलं जाणून घेता येतं असं माझं मत आहे. स्त्रीवादी पद्धतीने दिसणारं जग सगळ्यांनीच एकदा पाहिलं पाहिजे, ते डोळे उघडणारं असेल. मग त्यातल्या त्रुटींवर, मतभेदांवर बोलूया.

 इंद्रधनु वरील बरेचसे विषय महत्त्वाचे नाहीत,
विषय महत्त्वाचा आहे की नाही कसं ठरवणार? जे विषय महत्त्वाचे वाटले/ मला/ माझ्या दृष्टीने त्यावर मी लिहिलं आहे. मी फक्त वाचणारांसाठी म्हणून लिहित नाही, मला स्वत:लाही शोधत असते. विषय मला भिडणं, आतून लिहावसं वाटणं, हे ही महत्त्वाचं असतं. मी जे काय लिहिते ते माझ्या अनुभवविश्वातलं आहे किंवा ते मी माझ्या अनुभवविश्वात आणते आहे. माझ्या अनुभवांच्या मर्यादा या माझ्या काही लेखांच्याही मर्यादा असणार आहेत. कुणी सुचवलं म्हणून एखाद्या विषयावर अभ्यास करून लिहायला हरकत नाही. कुणी सुचवलं तर बघू.
 मी निवडलेल्या विषयामुळे वाचकाचा रसभंग होत असेल, तर मी म्हणेन.. तरीही वाचा, हे आमचं आयुष्य आहे. :)

यापेक्षा महत्त्वाचे विषय घ्यायला हवे होते.
काही महत्त्वाचे विषय अजून आले नसतील तर पुढे येतील.
समजा बलात्कार, या अनुभवावर मी नाही लिहू शकणार पण बलात्कारच्या भीतीनं जगणं कसं आकसून घ्यायला लागतं, यावर लिहू शकते. कधीतरी लिहीन.
 वेश्या, लैंगिकतेचं राजकारण, पतिव्रताधर्म, बाललैंगिक अत्याचार, यावर अजून लिहिलेलं नाही. जरा बिचकत होते. कधीतरी लिहीन.

बरेचसे लेख गाभ्यापर्यंत पोचत नाहीत. ...
 यापुढे प्रयत्न करीन.
 लेखाचा जीवच थोडका आहे.
जे विषय निवडले आहेत त्यावरचाही खोलवर अभ्यास या लेखांमधून पोचणार नाही आहे.
मी नम्रपणॆ आणि मनापासून हे सांगू इच्छिते की या लेखांमधून समग्र असं काही नाही पोचणार, लक्ष वेधणं हे होऊ शकतं, पुढचा अभ्यास स्वत:च करायला हवा.
 मी जे लेख लिहिते त्याला माझी कुवत, माझा अभ्यास, माझे अनुभव, माझी संवेदनशीलता, यांच्या मर्यादा आहेत.
आणि असे अभ्यास इंद्रधनु बाहेर बरेच आहेत, तिकडे वळावं असं कुणाला वाटलं/ इंद्रधनु अपुरं आहे असं वाटलं, तर ते मी इंद्रधनु चं यशच आहे असं समजॆन.

  इंद्रधनु वर सगळ्यात महत्त्वाचं आहे ’आमचं व्यक्त होणं "
ही बाईला मनातलं बोलण्याची जागा आहे, त्याला विषयाच्या, कशा पद्धतीने व्यक्त होते आहे..... याच्या मर्यादा नसाव्यात.

या लेखांमधलं कुठलंही लिखाण पुरूषविरोधी नाही. यालाही माझे अनुभव कारणीभूत असतील. माझ्या आयुष्यातील जवळचे पुरूष खरोखरच खूप चांगले आहेत. किंबहुना सध्याच्या समाजव्यवस्थेने पुरूषांवरही कशी बंधनं लादली आहेत, त्यांनाही कसा चाकोरीचा काच आहे, याची मला जाणीव आहे. मी ते माझ्या लिखाणातून मांडायचा प्रयत्न करते.

 अजून एक... कुठलंही लेखन/व्यक्त होणं हे पूर्णत: व्यक्तिनिरपेक्ष नसतं. माझं लेखन हे माझं वय, माझं घडणं, माझी जात, माझा वर्ग, माझा वर्ण, मी ज्या समाजाचा हिस्सा आहे तो आजूबाजूचा समाज, त्यातलं माझं स्थान , तिथून मला दिसणारं जग, याला तोडून नसणार आहे.
 माझ्या बिंदूवरून शक्यतो सगळीकडे पाहायचा प्रयत्न करीत मी लिहिते आहे.

ज्यांनी ज्यांनी माझे लेख वाचले आणि त्यावरची आपली मतं माझ्या पर्यंत पोचवली त्यांची मी मनापासून आभारी आहे.

Friday, November 30, 2012

इंद्रधनु १०० - एक आढावा


इंद्रधनु या ब्लॉगवर १०० लेख लिहून झाले आहेत.
या टप्प्यावर इंद्रधनुवरील लेखन काय आणि कसं आहे? याचा आढावा घ्यावा असं वाटलं.
इंद्रधनु वर ’हेच किंवा तेच", ’या किंवा त्याच’ पद्धतीचं लिहिलं जाईल, असं काही ठरवलेलं नव्हतं.
स्त्रीवादाच्या चष्म्यातूनच पाहू असंही ठरवलेलं नव्हतं / नाही.
मी जो स्त्री अभ्यास केंद्रात कोर्स केला आहे, त्याने एक दृष्टी मिळाली, हे महत्त्वाचं असलं तरी तेव्हढंच आहे.
’बाई’ म्हणून जगताना पडणारे प्रश्न, होणारी घुसमट, खटकणार्‍या गोष्टी, मिळणारे दिलासे, असं सगळं इथे येऊ शकतं, आलेलं आहे.
या ब्लॉगवर केवळ बायकांचं लेखन आहे असं नाही ते बायकांशी/ त्यांच्या बाई असण्याशी निगडीत आहे.
म्हणजे ’पाऊस’ या विषयावरचा ललितनिबंध या ब्लॉगवर येणार नाही, मी बाई म्हणून पाऊस कसा अनुभवते? येऊ शकतं. मनसोक्त, मनमोकळं मला भिजता येतं का? अंगाला चिकटलेले कपडे आणि ते पाहणारांच्या नजरा... यांच्यासह मला भिजायला लागतं.
 ही या ब्लॉगची मर्यादा आहे. तेच या ब्लॉगचं सामर्थ्य आहे.
काही विषयांवर आम्ही सगळ्याजणींनी आपापली मतं लेख लिहून मांडली आहेत. स्वातंत्र्य, बाई असणं, काहीवर तिघीचौघींनी लिहिलं आहे, जसं की स्त्री-पुरूष मैत्री, कमावणं, बाकी लेखांमधून ती ती लेखिका व्यक्त झालेली आहे. तो तो विषय तिला भिडला आणि लिहावंसं वाटलं.
 म्हणजे आशाला लग्न करताना "पुरूषाचं वय बाई पेक्षा जास्त असलं पाहिजे" या रूढीवर लिहावंसं वाटलं. अश्विनीला व्हाईट लिली आणि नाईट रायडरच्या निमित्ताने लिहावंसं वाटलं. दीपाला ’सासू - सून -मुलगा’ यावर लिहावंसं वाटलं. वैशालीने "देवी अंगात येणं" यावर लिहलं.
 कुणीही स्त्रीवादाचा चष्मा घालून लिहिलेलं नाही. बाई म्हणून संवेदनशीलतेने जगताना जे जाणवलं ते त्यांनी लिहिलं आहे.
आमच्या काही वाचक देखील यात सामील झाल्या आणि त्यांनीही त्यांच्यापुढे उभ्या राहणार्‍या प्रश्नांवर लिहिलं आहे. पियूने नवर्‍याच्या आयुष्यातील आपलं स्थान काय आहे? असा प्रश्न उपस्थित केला.
 एफजीएम बद्दल वाचलं आणि लिहिलं, त्या सगळ्या बायकांशी आपलंही बाई म्हणून नातं जोडलेलं आहे, तिचं शरीर आणि माझं शरीर सारखंच आहे असं वाटलं.
 काही विषयांवर एका पेक्षा अधिक लेख लिहिले आहेत. लिहिताना, प्रतिक्रियांतून त्या विषयाचे आणखी पैलू जाणवत गेले. आणि पुढचे लेख लिहिले गेले.
सौंदर्य या विषयावर असे लेख लिहिलेले आहेत.
 हे सगळे लेख स्वानुभवावर आधारीत आहेत. लिहीणारी प्रत्येकजण त्या विषयाच्या अनुषंगाने तिचं जगणं मांडते आहे/ शोधते आहे.
उच्चवर्णीय, मध्यमवर्गीय बाईवर ’बाई’ असण्याचे कसे ताण आहेत, या ताणांकडे ती कसं पाहते, काय प्रतिक्रिया देते, याचा किंचित अंदाज हा ब्लॉग वाचून यावा, अशी अपेक्षा आहे.
 अजून बरेच विषय आहेत, ज्यावर लिहिता येईल / लिहिलं जाईल.
आमच्यापैकी प्रत्येकीला मोकळं होण्यासाठीची ही जागा आहे, त्याचा फायदा वाचणारांपैकीही कुणाकुणाला होऊ शकतो. माझ्या जातीचं कुणी भेटलं, कुणी आहे, म्हणून हुरूप येऊ शकतो.

मिलिन्द आणि नीरजने अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया दिल्या आहेत, सचिननेही कधी कधी दिल्या आहेत, त्यांचा आम्हांला फायदाच झाला. काहीवेळा गटाबाहेरच्यांनीही प्रतिक्रिया दिल्या, त्यावरही विचार झाला.

 समजून उमजून जगायचं असा मार्ग निवडल्यावर, रस्ता तर लांबचाच आहे आणि या ब्लॉगची सोबत आहे.



Wednesday, November 28, 2012

वाचकांचे लेख -- आमच्याकडे असंच असतं...


विद्याच्या लेखातल्या "तुमच्याकडे गणपतीला तळणीचे मोदक चालतात का ग?" हे वाचल्यानंतर मनात "तुमच्याकडे" आणि "आमच्याकडे" यावर बराच विचार झाला आणि मग जे काही प्रश्न पडले ते म्हणजे हा लेख..

आमच्याकडे गौरीनिम्मित ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु होता.. माझ्या माहेरी कुमारीकांची ओटी भरण्याची पद्धत नाहीये त्यामुळे मी जरा बिचकत होते. पटकन सासरच्या काहीजणी पुढे आल्या आणि म्हणाल्या " आता हे सगळ शिकून घे.. आमच्याकडे असच असत". मुळातच ओटी  वगैरे रस नसल्याने मी त्या जे सांगत होत्या तसे करून मोकळी झाले..

सासरचे वातावरण बरयापैकी लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल ह्याविषयी भीड बाळगणारे.. तरीदेखील घरात धुम्रपान, मद्यपान, तंबाखू खाणे आणि मांसाहार होतो. असं कसं चालत विचारल्यावर उत्तर एकच "आमच्याकडे असंच असत.. तुलाही होईल सवय हळूहळू"..

हे "आमच्याकडे असच असत" प्रकरण तुम्ही सगळयांनी सुद्धा कधी ना कधीतरी ऐकले असेलच.. वेगवेगळ्या प्रसंगात.. वेगवेगळ्या संदर्भात.. काहींनी तर ते अमुक एका पद्धतीचे कपडे वापरणे, अमुक वेळी जेवणे, एखादी भाजी एका विशिष्ट पद्धतीने बनवणे, अमुक एखादे काम किंवा घरातली सगळी कामे बाईनेच करणे अश्याही बाबतीत ऐकले असेल..

घरात एखादी मुलगी सून होऊन येते याचा अर्थ ती घराची कोणीच नसते का??  नवीन येणार्या सुनेने स्वत:च्या वागण्याने सगळ्यांची मने जिंकून घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे? घरात आधीपासून जे राहत आहेत त्यांचा त्या घरावर हक्क जास्त हे पटतेही एकीकडे.. पण म्हणून नव्याने राहायला येणाऱ्या/री ने त्या साच्यात स्वत:ला बसवून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे कि बरोबर?

कोणत्याही घराचे ठरलेले असे साचे, संस्कार असतात.. प्रत्येक कुटुंबागणिक ते बदलतात. हे सगळ्यांनाच माहित आहे आणि कबूलही आहे. कदाचित या सगळ्यांची नंतर सवयही होत असेल.

पण तरीही हे वाक्य मनावर कुठेतरी ओरखडा काढतं हे नक्की.. 

तुम्हाला असे प्रश्न पडले का? याबाबतीत तुम्हाला काय वाटत??

- स्पृहा

Sunday, November 25, 2012

देवी अंगात येणं......

लहानपणी आमच्या बिल्डिंगमधे खालच्या मजल्यावर राणीच्या आई रहायच्या. कुटूंब मारवाडी होतं. त्यामुळे नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात असे. तेव्हा नऊ दिवस त्यांच्या रोज अंगात यायचं. आम्हा मुलांना त्याबद्दल गंमत, असूया, उत्सुकता, भिती  अशा सगळ्या भावना असायच्या. त्यामुळे ९ दिवस ते बघायला आम्ही संध्याकाळच्या आरतीला जात असू. तिथं आम्हा सगळ्यांना सांभळून उभं रहावं लागे. कारण आरती सुरु झाली की हळूहळू त्या थरथरायला लागायच्या, आणि मग पूर्ण खोलीभर केस सोडलेल्या अवस्थेत पिसाळल्यासारख्या नाचायच्या. साडीचं, पदराचं भान नसायचं. मग त्यांचा छोटा मुलगा पायात आला तरी त्यांच लक्ष नसायचं. समोर पेटलेल्या आरतीवर आपण पडलो तरी ह्याची पर्वा नसायची. नवरा ह्यासगळ्या गोष्टी सांभाळण्यात गुंतलेला. थोड्यावेळाने दमल्यावर त्या शांत व्ह्यायच्या. जमिनिवर निपचित पडायच्या. आम्ही सगळे त्यांना नमस्कार करायचो. ती देवी आहे असं थोडावेळ वातावरण असायचं. दुस-यादिवशी नेहमीप्रमाणे परत रुटिन चालू. काल रात्रीची राणीची आई आणि आत्ताची ह्याचा सुतरामसंबंध नसायचा.
..............

राणीच्या आईविषयी थोडसं.......

नव-याची दुसरी बायको, त्यांच वय २२ होतं तेव्हा नवरा ५० वर्षाचा. पहिली बायको वारली. तिचे २ मुलगे नव्या आईच्या बरोबरीच्या वयाचे. त्यांची लग्नं नुकतीच झालेली. दोघांनाही वेगळं राहण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यांनी वडिलांवरचा राग आईशी तुसडेपणाने वागून, वाटणी मागून व्यक्त केलेला. राणीच्या आईलाही पाठोपाठची ३ मुलं - १ मुलगी व २ मुलं. सगळी मुलं १० -१२ वयाच्या आसपास आल्यावर वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांच रविवार पेठेत चहाच अमृततुल्या दुकान. उदर्निवाहाच प्रश्न उभा राहिल्यावर राणीच्या आई स्वत: दुकानात जाऊन बसायला लागल्या. पुढ मग आम्ही तिथे रहात नसल्याने संपर्क संपला.
.........

शाळा - कॉलेजमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या धार्मिक वृत्तीच्या, रितीरिवाज पाळणा-या, पुरुषप्रधान संस्कृतीला झुकतं माप देण्या-या. माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम का होईना मी काही एक ठोस विचारांनी वावरत होते. मी नास्तिक आहे, मुर्तिपूजा मानत नाही, मी पाळीच्या दिवशीपण मंदिरात जाते, लग्न झाल्यावर पण स्त्री-पुरुष समानतेकडे मी कशी बघेन हे मैत्रिणींशी बोलायचे. तेव्हा अंगात येण्याविषयी बोलणं झालं. मी पटकन म्हणाले तो सगळा ढोंगीपणा आहे. देवीवगैरे असं काही नसतं.
...........

मध्यंतरी असच एकदा कामवाल्याबाईंबरोबर बोलत होते. तेव्हा त्यांच्या वस्तीमधल्या एका बाईंबद्दल त्या म्हणाल्या की तिच्या अंगात येतं. चेष्टेत हसत म्हणल्या "काहीनाही ओ ताई, नुसती नाटकं आहेत ती". मग मी थोडं त्याबाईंबद्दल त्यांना विचारलं. तेव्हा पुढ आलेली माहीती अशी -  नवरा दारु पितो, रोज रात्री वस्तीमधे धुडगूस घालतो. बायकोला मारतो. आधीच्या बायकोच्या वयात आलेल्या मुलींशी नीट वागत नाही.  
...........

एक दिवस मी व माझी बहिण चाललो होतो तेव्हा अचानक राणीच्या आई भेटल्या. त्या माझ्या बहिणीच्या बरोबरीच्या वयाच्या असल्याने तिच्याशी नेहमी मनमोकळेपणाने बोलायच्या. मुलं काय काय करतात, हताशी कशी आली, दुकान कसं बघतात, हे आनंदानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं.
.........

राणीच्या आईंनी, त्यांची घुसमट, राग, दु:ख नवरात्रीमधले ९ दिवस तरी माझे हक्काचे असं गृहित धरुन अंगात आणून व्यक्त केली. तो नक्कीच ढोंगीपणा नव्हता. वस्तीमधे, ग्रामीण भागात अंगात येण्याच्या प्रकाराची वारंवारिता जास्त. जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच. शेवटी परिस्थिशी समझोता हा ह्या बायकांनी केलेलाच असतो. तो नक्कीच नाटकीपणा नाही.

Friday, November 9, 2012

व्रत वैकल्ये -- ३

http://asvvad.blogspot.in/2012/10/blog-post_23.html#comment-form


नीरज,
छान लिहिलं आहेस. आवडलं.
हा फार महत्त्वाचा सामाजिक प्रश्न आहे, असं मलाही वाटत नाही. हे मी सांगीतलेलं आहेच.
पण मला तो अभ्यास करण्यासाठी, नक्कीच महत्त्वाचा वाटतो आहे. त्याची नोंद झाली पाहिजे, हे ही वाटतंच आहे.
ज्या गोष्टींमधे निवडीला खरं वाव आहे, म्हणजे रंग पाळायचे की नाही? तुम्ही ठरवू शकता आहात. तेव्हढा सामाजिक दबाव नाही आहे.
 ही प्रथा अजून मजे मजेच्या स्वरूपातच आहे, तेव्हा लोक काय निवडतात?
त्यामागची कारणं काय असतात ? वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक स्तरातले लोक काय प्रतिक्रिया देतील?
हे जाणून घ्यायला मला आवडेल.
कुणीतरी खरंच हा प्रकल्पाचा विषय म्हणून , यावर काम करायला हवं आहे.
आपणही करायला हरकत नाही, आशाने तर सुरूवात पण केली. :)

>>नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे व्रत आहे असं का वाटतं हे समजून घ्यायला आवडेल.
ही आत्ता प्रथाच आहे, पण व्रत होण्याच्या मार्गावर आहे.
लोकांचा देवभोळेपणा काही कमी होतोय असं दिसत नाही, मंदिराच्या बाहेर हात जोडून उभे राहणार्‍यात किटितरी तरूण दिसतात.
म्हणून हे व्रत होऊ शकतं, असं वाटतय.

कुंभार विचार करतातच, असं नाहीच आहे, ते फक्त वळतात.

>>>> आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?
प्रथेचा संबंध एकदम पारतंत्र्याशी?!!

खूप ताणलं जातंय. पण ती वस्तुस्थिती आहे. म्हणजे बीजं आहेतच.
होळीला पुरणपोळी खाण्याची प्रथा आपण नाही सुरू केली.
आपण तसे वाढलो, समजा नाही खाल्ली त्या दिवशी पुरणपोळी तर चालतंच, हे कळलेलं असतंच की!
आणि होळीच्या दिवशी पुरणपोळी खायची प्रथा आपण स्वीकारतो, तेव्हा त्यादिवशी दुसरं काहीही खाण्याचं स्वातंत्र्य आपण गमावतो,
कारण समाजाचा एक हिस्सा म्हणून आपल्याला राहायचं असतं.
अशी कितीक स्वातंत्र्य आपण देऊन टाकतोच.
पण रंगाच्या प्रथेचं असं आहे, ती घडण्याच्या प्रक्रियेत आहे, काहीतरी विचार केला जाणं शक्य आहे.

>> नऊ दिवस आवर्जून वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायचा आनंद नाही का?

आपल्या समाजात असले आनंद किती असतात?
म्हणजे आपल्याकडे वर्षाला एखाद दुसरा सण असता, आणि लोक त्यात वेळ घालवत असते तर ठीक होतं.
आपल्याकडे सणावर सण चालूच असतात. प्रत्येक सणाच्या वेगळ्या प्रथा, वेगळे नियम,...
श्रावणापासून सुरू केलं तरी नागपंचमी, राखीपौर्णिमा, गोकुळाष्टमी, पोळा, गणपती, गौरी, दोन्हींचे विसर्जन, नवरात्र.... अडीच महिन्यात एव्हढे सण....
एखादा दिवस नाही , नऊ दिवस त्यात घालवायचे?
किती आनंद? किती उत्सव?

>>एखादी गोष्ट साजरी करायला मोठा समूह, एक पूर्ण समाजघटक, किंवा संपूर्ण समाजच एकत्र आला तर त्याला तुझा आक्षेप आहे का? असला तर का आहे?
नाही.
पण ती गोष्ट कुठली आहे? आणि साजरी करण्याची पद्धत काय आहे? ह्याचा विचार केला पाहिजे.

>> मोठ्या समुहाने एकत्र येऊन काही अर्थपूर्ण अथवा निरर्थक गोष्टी करणे मला आवश्यक वाटतं.
हो. समाज म्हणून एकत्र आहोत, या भावने साठी ते आवश्यक असतं.
निर्रथक म्हणजे किती निर्रथक? आणि किती काळ?

पेपरचा संबंध यासाठी आहे की त्यामुळे वेगाने पसरत जातं. निर्रथक गोष्टींना माध्यामांनी उचलून धरायचं आणि समाजाने माना डोलवायच्या हे बर्‍याच बाबींमधे होत असतं.
कोणीतरी सांगायचं आणि समुहाने विचार न करता करायचं, हे पटणारं नाहीच.
त्यापेक्षा छोट्या समुहात मजेच्या गंमतीदार कल्पना, गट लक्षात घेऊन राबवता येतात, तिथे निखळ मजा असू शकते.
अशा मान डोलावण्यात ती असतेच असं नाही.

>>“सकाळपासून रात्रीपर्यन्त, जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय” हे तू कशाच्या आधारावर लिहिलं आहेस माहीत नाही.
हे मी ऎकलंय. माझ्या अनुभवावरच आहे. मला ते अती झालं. लोक मजेत का असेना त्यावर बोलताहेत. आणि नुसतं बोलताहेत असं नाही कोणी कोणी आनंदाने आवर्जून नऊ दिवस नऊ रंग वापरताहेत, हे ही मला कळलं.
 नेटवर सुद्धा लोक मागण्या करताहेत की आम्हांला १३ साली कुठल्या दिवशी कुठले रंग वापरायचे ते कळवा. म्हणजे त्यांना बरं पडेल.

>> एखद्या वर्षी ऑफिसमध्ये विशिष्ट पद्धतीने (सार्वत्रिक प्रथेप्रमाणे) सण साजरा झाला, आता पुढच्या वर्षी “पुन्हा तसंच करू” असं ऑफिसमधील मंडळी म्हणायला लागली, तर मी म्हणेन, झालं की गेल्या वर्षी ते, आता या वर्षी काहीतरी वेगळी मजा करू.
आवडलं.
याच्यापुढे जे लिहिणार आहे, तो आगाऊपणा आहे, तरी लिहिते आहे.
आपण कुठलीही सार्वजनिक प्रथा का पाळतो आहोत? याचा विचार करायला हवा. त्याने काय साधलं? काय फायदा? काय तोटा?
हा विचार करायला हवा.
दिखाऊ प्रथांमधे आपण किती दिवस घालवायचे?
या प्रथेच्या निमित्ताने अंगावरचे कपडे आणि त्यांचे रंग यांना आपण केंद्रस्थानी आणतो आहोत.

बरं ही प्रथा पाळणं सक्तीचंच आहे समजा, त्यावर माझा पगारच अवलंबून आहे.
तर रंगांशी संबंधीत, रंगाची जाण वाढवणार्‍या, रंगांबाबत सजग करणार्‍या, माणसांची रंगाभिरूची घडवू शकणार्‍या, छोट्या समुहात शक्य असणार्‍या किती छान छान गोष्टी शक्य आहेत. ( हा आगाऊपणाच आहे, छान च्या प्रत्येकाच्या व्याख्या वेगळ्या असतात, हे ही मान्यच आहे.) त्या का नाही करायच्या?

नीरज,
 धन्यवाद! मजा आली.
 वाद घालण्याचा नवा आनंदाचा प्रकार, तू साजरं करण्याच्या यादीत घाल. :)
१) तू चर्चा आणखी पुढे नेलीस, म्हणून आणखी विचार केला गेला.
२) इतक्यात व्रत हा शब्द वापरायला नको, हे मान्य, पण व्रत होऊ शकतं.
३) "पाळणे" हे क्रियापदही मी ऎकलं, आपल्याला आवडो न आवडो लोक वापरताहेत. ते माझं नाही.
४) माझ्या मांडणीत काहीवेळा टोकाला गेले आहे (धागा न सोडता), ( असं टॊकापर्यंत जाऊन विचार केला पाहिजे, असं मला वाटतंच) पारतंत्र्याच्या बाबतीत , मान्य.
 आगाऊपणा चालवून घ्यावास, असं नाही. :)

आणि आता एक शेवटचं आणि महत्त्वाचं -- मी जे काही करते, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करतच असेन असं नाही. करत नाहीच. पण असं काही पृष्ठभागावर आलं, कोणी लक्षात आणून दिलं तर मी नक्कीच विचार करीन आणि बदलेन.

Wednesday, October 31, 2012

मुलीचं घर -- १


"मुलींनी आपल्या आईवडीलांना सांभाळायचे, अशी प्रथा हवी होती." माझी मैत्रिण एकदा म्हणालेली. तिच्या आईला स्वत:जवळ काही दिवस ठेवून घेण्याची, कायमचं ठेवून घेण्याची तिची इच्छा होती. सासरच्यांना वाटायचे, भाऊ आहेत की. भावजय नीट लक्ष द्यायची नाही. आईलाही मुलीकडे राहायला प्रशस्त वाटायचे नाही. मुलाकडे कसंही वागवलं गेलं तरी हक्क वाटायचा.
 " मुलींचा कसा आईवडीलांत जीव गुंतलेला असतो. त्या नीट करतील त्यांचं. " ........ ती म्हणते.
माझा यावर विश्वास नाही. मुलगे काय नि मुली काय! सारखेच! काही लक्ष देतील काही नाही, सरसकट काही विधान नाही करता येणार.


आज मला लिहायचंय ते आईवडीलांना मुलीकडे राहायला अवघडल्यासारखं होतं.... यावर.
अगदी एकुलती एक मुलगी असली, दोन्ही मुली असल्या तरीही.
मुलीच्या घरात त्यांना हक्क वाटत नाही.


मी जेव्हा लहान होते, तेव्हा आमच्या आजूबाजूच्या काही घरांमधे ’मुलीला मुलगा झाल्याशिवाय, त्याचं बारसं झाल्याशिवाय, मुंज झाल्याशिवाय.. आईवडील मुलीच्या घरी जेवत नसत.
मला आठवतं, शेजारच्या एका काकूंना बरं नव्हतं तर त्यांचे वडील भेटायला आलेले, उन्हाळयाचे दिवस होते, त्यांना तर मुलीच्या घरचं पाणी पण चालणार नाही, मग मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेले.... आणि घरी येऊन सांगितलं की " तुम्ही दोघे असं कधीही करणार नाही. तसं करणार असाल तर मला लग्नच करायचं नाही."
 काही लोक यातून मार्ग काढीत, म्हणजे मुलीकडे जेवायचं पण मग ताटासमोर पैसे ठेवायचे. भावना ही की मुलीकडे फुकटचं जेवलो नाही.
मी अगदी लहान असल्यापासून यावर बोलत आले आहे.
आई बाबांना सांगत आले आहे, लग्न झाल्यावर जे आणखी घर मिळेल, ते माझ्याइतकंच तुमचंही असणार आहे.
त्यांना मी बरंच बदलवलं असलं तरी पूर्ण नाही.
सारखं मला त्यांच्याशी भांडावं लागतं.
काही गोष्टी मी सोडून देते.


माझं नुकतं लग्न झालं होतं , तेव्हा आई माझ्याकडे आलेली, तिने जरा स्वैपाकघर आवरलं,
आणि नंतर मला म्हणाली, " डबे इकडचे तिकडॆ केलेत, तुझ्या सासूबाईंना चालेल ना?"
मला हसावं की रडावं कळेना.
जे काय भांडत आले, सांगत आले, ते सगळं वाहूनच गेलं की काय?


माझ्या मावशा, माम्या, आत्या यांच्यापेक्षा ते खूपच बरे आहेत.
तरी त्यांना कारणाशिवाय माझ्याकडे राहणं नको वाटतं, अर्थात भावाकडेही ते कारणाशिवाय फार राहात नाहीत, हे त्यातल्या त्यात साम्य.


देवांशी आमच्या घरी आम्हां दोघांनांही काही देणंघेणं नाही.
तरी कुणी विचारलं तर "माझं कुलदैवत बालाजी, मिलिन्दचं अंबेजोगाईची देवी", असली विक्षिप्त वाटतील (ऎकणाराला) अशी उत्तरे मी देते.
त्यातल्या त्यात आम्ही कुठला सण करत असू तर ’गणपती बसवणे"
मला आणि मुक्ताला गणपती करायला आवडतो.. म्हणून!
परवा आईबाबा गणेश चतुर्थीला होते,
आई एकदम म्हणाली, "तुमच्याकडॆ गणपतीला तळलेले मोदक चालतील ना?" (आमच्याकडे, औरंगाबादला, तळलेले मोदकच असतात.)
मी काहीही सांगितल्ं तरी तिचं बेसिक क्लिअर आहे.
तिच्या घरच्या म्हणजे माझ्या औरंगाबदच्या घरच्या सांस्कृतिक परंपरा चालवणारं, पुढे नेणारं घर हे तिच्या मुलाचं आहे.
आणि माझ्या या घरात मात्र तिच्या जावयाच्या घरच्या सांस्कृतिक परंपरा असायला हव्यात.


मी म्हणाले, "गणपतीला काय गं, उकडीचे असोत की तळलेले, मोदक मिळाल्याशी कारण!"
त्याला काही अर्थ नाही.

......................................
.....................................
....................................
...................................

 पुढे

http://asvvad.blogspot.in/2013/03/blog-post_31.html

***********


Tuesday, October 23, 2012

व्रत वैकल्ये -- २


अश्विनी,
>> उत्सव साजरा करण्याची एक पद्धत यापलीकडे त्याला काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही.
अगदी मान्य!
आपण फक्त महत्त्वाच्याच गोष्टींवर लेख लिहितो असं नाही. :)
यावर मला लिहावं असं वाटलं, कारण ही प्रथा सर्वव्यापी होत चालली आहे,
दुसरं असं की सकाळपासून रात्रीपर्यन्त , जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय.
ही उत्सव साजरा करण्याची पद्धत लवकरच रूढी होत जाईल, असं मला दिसतं आहे, त्याचे साक्षीदार आपण आहोत. त्याची नॊंद करून ठेवली पाहिजे असं मला वाटलं.
आणि समाजमनाची मानसिकता कशी असते? हे काही शोधता येईल का यावरून? हे पाहावंसं वाटलं.

ही प्रथा देवीच्या अवाढव्य मूर्ती, मोठाले मंडप किंवा कर्णकर्कश्य आवाज.... यासारखी अनिष्ट नाही. तिचं उपद्रव मूल्य काही नाही. असं जे म्हणते आहेस त्यावर मला वेगळं सांगायचं आहे.
पर्यावरणावर, समाजाच्या रोजच्या व्यवहारांवर अनिष्ट परीणाम करणार्‍या प्रथा तेव्हढ्या अनिष्ट आणि माणसाच्या मनावर परीणाम करणार्‍या , त्याला अनिष्ट वळण लावणार्‍या प्रथांना काय म्हणायचं? तशा प्रथा धोकादायक नाहीत का?

 पहिला लेख लिहिल्यावर मी एक क्रियापद वापरलं जाताना ऎकलं, नवरात्र पाळणे! रंग पाळणे!
या प्रथेला धार्मिक अस्तर आहे त्यामुळे सर्वसामान्यांत प्रथा नाही पाळली तर कोप होणार, अर्धवट सोडली तर आणखी काहीतरी होणार, नऊ दिवस नाही तर निदान एक दिवस पाळलंच पाहिजे..... असलं काय काय सुरू होईल.
मग रंग पाळल्याने कोणाची कशी भरभराट झाली च्या कहाण्याही येतील.
 दुसरं असं की कोणीतरी अज्ञात व्यक्ती ठरवताहेत आणि समाजातले बरेच लोक पाळण्याच्या मागे आहेत, चर्चा करताहेत. म्हणजे आकाशवाणी झाली "हे करा" की प्रश्न न विचारता लोक करताहेत, ही कशी मानसिकता आहे? ती आहेच, यानिमित्ताने दिसली, जशी अन्य निमित्तांमुळेही दिसते.
 -----
या मुळे मला एक जुना प्रसंग आठवला.
मी आठवीत असेन. औरंगाबादला गावात हडळ आली आहे, अशी अफवा उठलेली. जर तुम्ही हळदी-कुंकवाचे हात दारावर उठवले तर हडळ त्याला घाबरते, आणि त्या घरात जात नाही, असं होतं. पेपरमधून बातम्या, हळदी-कुंकवाचे हात उठवलेल्या घरांचे फोटॊ वगैरे. आम्ही ज्या निम्न मध्यमवर्गीय भागात राहतो, तिथे आजूबाजूला खूपच हात दिसत होते. हडळ येते की नाही माहीत नाही पण हात उठवण्यात काय तोटा आहे? झाला तर फायदाच!.... आमच्या घरावर अर्थातच असलं काही केलेलं नव्हतं. आमच्या मागे राहणार्‍या काकू आल्या आणि हात उठवले पाहिजेत वगैरे बोलायला लागल्या. आम्ही ते उडवून लावत होतो. विशेषत: बाबा!  बाबा म्हणाले रात्री दार वाजलंच, हडळ आली तर तिला सांगा मागे कुळकर्ण्यांकडॆ जा. ती इकडे आली की आम्ही बघून घेतो. बराच वेळ मजा चाललेली.
 शेजारचा एक शहाणासुरता माणूस ठामपणे नाही म्हणतोय याचा परीणाम त्या बाईवर झाला आणि तिने हात उठवले नाहीत.
मला भारी वाटलं, मग शाळेत किंवा कुठेही या विषयावर बोलणं चाललेलं असलं की आम्ही ते उडवून लावत असू. नाही म्हंटलं तरी त्याचा परीणाम होतो.
------
दुसरी एक गोष्ट आठवते, आहे.
 ताईने इथे दीडवर्ष राहून तिचं पीएचडीचं काम केलं. मनापासून आणि खूप छान. तिचे कष्ट दिसत होते, आम्ही पण चर्चांमधे सामील असायचो, तिच्या शोधनिबंधात जरा गुंतलेले.
नंतर सावकाश व्हायवा होती. त्यादिवशी विद्यापीठात ती एकटीच गेली. निदान तिच्या आई आणि बाबांना न्यायला हरकत नव्हती. तिचं कौतुक ऎकायला छानच वाटलं असतं.
 ती म्हणाली होती. तिथे व्हायवा म्हणजे नातेवाईकांची गर्दी होऊन बसते. डॉक्टरेट मिळणं हा एक उत्सव असल्यासारखं नटून थटून नातेवाईक येतात. नंतरच्या खाण्यापिण्याविषयीचंच बोलणं सुरू असतं. विद्यापीठातल्या या प्रथेला माझा ठाम विरोध आहे. त्यावेळी अभ्यासविषयक चर्चाच , पुरेशा गांभीर्याने व्हायला हवी. आई - बाबा तिथे शांत राहून ऎकतील, साध्या कपड्यात असतील, खरेच आहे. विद्यापीठातली ही पद्धत बंद व्हावी असं मला वाटतं, ते मला माझ्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे. ती एकटीच गेली. घरी आल्यावर संध्याकाळी आम्ही पार्टी केली.
-----
  सांगायचा मुद्दा असा की समाजातले बहुसंख्य लोक अशा पद्धतीने एका बाजूला झुकलेले असतात तेंव्हा काहीजणांनी तरी ठामपणे उभं राहायला लागतं आणि काही वेळा समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून दुसर्‍या बाजूला झुकायला लागतं.
----
अश्विनी, धन्यवाद! रंग पाळणारांच्या बाजूने काही बोलत/ लिहित राहीलीस.
म्हणून चर्चा पुढे गेली.

*******
माझ्या मनात एक कल्पना , पहिला लेख लिहिला तेव्हाच येऊन गेली होती. ती अशी की आपण "इंद्रधनु" ने , आपल्या आजू बाजूच्या बायकांशी या विषयावर बोलून त्यांची मते नोंदवून ठेवायची. अजून दोन वर्ष हे सातत्याने करायचं. बघू काय निघतंय ते! हा एक छान प्रकल्प होऊ शकेल.
*******


Monday, October 15, 2012

व्रत वैकल्ये


पहिलीतली छोटी मुलगी काल मला म्हणाली, " काकू, आज निळा ड्रेस घालायचा होता. तू कुठला घातलास बघ."
" हो?"
" हो. मी बघ निळा घातलाय."
" आईने काय घातलय आज?"
" निळी साडी"
" कुणी गं सांगीतलं हे? आज कुठल्या रंगाचे कपडे घालायचे ते?"
थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली, " पेपरात लिहून येतं."
********

बायकांच्या सणावारांविषयीच आपण बोलत होतो. आता नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे? याचं एक नविन व्रत सुरू झालं आहे. पेपरमधे लिहून येणार.... मग बायका त्या त्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालणार... नसला तो रंग आपल्याकडॆ तर खरेदी करणार... एक फोटॊ काढून घेणार... आणि त्या वृत्तपत्राला पाठवणार...... दुसर्‍या दिवशी आवर्जून आपला फोटो आला का बघणार... नसेल तर खट्टू होणार.. असेल तर हर्षित!....
 काय हौस म्हणायची का काय?
मला याची मजा वाटते, विचार न करता , घराघरातल्या, कार्यालयातल्या, शाळेतल्या आणि कुठल्या कुठल्या बायका ( त्या दिवशी तो रंग वापरणं) हे का करत असतील?
बायकाच नाही पुरुषांसाठी जरी कुणी हे काढलं तरी पुरूषही आपलं डोकं गहाण ठेवतील. माझी खात्री आहे.

******

त्यात थोडी मजा आहे. असेल.
पण कुणीतरी सांगायचं आणि आपण करायचं. असं का होत असेल?
आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?
माणसाची मूळ वृत्ती आहे का ही?
पारतंत्र्य!
कुणीतरी सांगा मी करीन.
कुणीतरी ठरवा मी तसं वागेन.
मला चाकोरी आखून द्या मी खाली मान घालून त्यातूनच फिरेन.

*******
आपण सगळ्यात आधी काय सोडून देत असू तर विचार करणं.
म्हणूनच एखाद्या हुकूमशहाला समाज आपल्याला हवा तसा वाकवता येतो.

*******
म्हणजे आपण देशप्रेमाची इंजेक्शन्स दिली की सैनिक तयार करणार.
धर्माची दिली  की दहशतवादी तयार करणार....
*******

Saturday, September 22, 2012

बायकांचे सण


श्रावण - भाद्रपद - अश्विन, बायकांचे इतके सण असतात या महिन्यांमधे. मंगळागौरी, मग महालक्ष्म्या म्हणजे गौरी आणि नंतर नवरात्र. या सणांचे काय काय इतर अनेक उद्देश असले तरी यानिमित्ताने बायका एकत्र जमायच्या. एकमेकींशी संवाद होत असे.
आपण हे सगळे सण नाकारले. विशेषत: हळदी कुंकवाचे, जे की बायकांच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून आहेत. बायकांची त्यावरून वर्गवारी करतात.
 नव्या समाजात आपण कुठले नवीन सण आणले का? जे की समतेच्या पायावर आधारीत आहेत. जे बायकांचा एक गट करतील. त्यांना एकमेकींशी संवाद साधण्याची संधी देतील.
तसं काही दिसत नाही.
 आपण काय करतो आहोत? तर महाभोंडले आणि महाआरत्या आणि महा अथर्वशीर्षे.
पाया तर तोच राहतो आहे ना? जुन्या संस्कृतीचा. जी बायकांना कमी लेखते.
त्याचा एक फायदा होतो की अथर्वशीर्ष म्हणायला जाण्यासाठी बाईला घरातून सहज परवानगी मिळत असणार.
बायका बायका मिळून काहीतरी धार्मिक करताय ना? मग करा.
म्हणजे बाहेर जाऊ देतोय चा आव तर आणलेला आहे पण तरी पायात दोर्‍या तर आहेतच.
बायका बायका मिळून किंवा बायका पुरूष मिळून जोवर काही विचार करत नाहीत, तोवर पुरूषसत्तेला काही धोका नाही.
महिला दिनाचं आपण काय करून ठेवलं आहे? बायका बायका मिळून फारतर बाहेर जेवायला जातात, शुभेच्छांची देवघेव होते, नवरा हौशी असेल तर काहीतरी भेट देतो. दिवाळीचा पाडवा काय नि महिलादिन काय? आम्हांला काहीच फरक पडत नाही. शेवटी नवर्‍याला ओवाळायचे आणि भेट मिळवायची हेच आहे ना?
आपण आपल्या साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात.
त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं.
आपल्या समाजातील समता कशी आहे? तर बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का?
नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे.

महिलांचे सण असायला हवेत. ती पोकळी नव्या वातावरणात दिसते.
आपापल्या सोयीने महिलामंडळांचे, भिशीमंडळांचे कार्यक्रम होत असणार. पारंपारिक पद्धतीने.
पण, एकेका सणाला
’मी माझ्या बाई असण्याचा विचार करीन."
"मला बाई म्हणून आत्मसन्मानाने कसं जगता येईल हे पाहीन"
" बाई म्हणून इतर सगळ्याजणींना कसं आत्मविश्वासाने जगता येईल, यासाठी प्रयत्न करीन."
............................
अशा काही मुद्द्यांवर विचार करता आला तर ते खूप हवं आहे.

**********

Friday, August 31, 2012

छोट्या छोट्या गोष्टी - ४


एका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या नातेवाइंकांमधे मिसळून जाऊ शकेन अशा वेशात होते. साडी का नेसली नाहीस?, मंगळसूत्र कुठं आहे? हे सुरूवातीचे प्रश्न टाळून, पुढे गप्पा मारता येणार होत्या.
चुलत बहीण, आतेबहीण जवळपास वर्षानंतर भेटत होत्या. त्यांच्या मुली लग्नाला आल्या आहेत.
एकीकडे पूजा चालली होती. आम्हांला काही फारसे काम नव्हते. आमच्या गप्पा सुरू झाल्या.
आतेबहीणीच्या मुलीला ’नीट पाहून/ बोलून नवरा निवड. असं सांगत होते."

आपल्याकडे मुलीला वाढवतात/ वाढवायचे ते तिचे लग्न करून देण्यासाठी असेच असते.
लहानपणापासूनच त्यादृष्टीने सवयी लावल्या जातात.
आणि लग्नाचे वय झाल्यावर त्यावरून एक सफाईचा हात फिरवला जातो.

बोलताना विषय ’आजकालचे कपड” इकडे वळला.
बहीण मुलीची तक्रार करत म्हणाली, " या मुलींना जीन्सची सवय असते. नीराला (तिच्या मुलीला) झोपतानाही पॅंट-टीशर्ट घालायची सवय आहे. आवरून सावरून बसणं माहीतच नाही!"
मी म्हणाले, " बरं आहे की, त्या पोषाखात बिनधास्त वावरता येतं. साडीसारखं नाही, इकडनं वर गेली का? तिकडनं गेली का? पाठ दिसतेय का? अन पोट दिसतय का? सांभाळावं लागत नाही."
" अगं पण सांभाळायची सवय असली पाहिजे. मी नीरासाठी दोन गाऊन घेऊन आले आहे. सांगीतलंय हे घालूनच झोपायचं. झॊपेतही कपडे सावरायची सवय हवी. " पुढे म्हणाली, " मी झोपते तेव्हा, झोपेत जर माझा परकर घोट्याच्या वर गेला तरी मला कळतं. मी तो व्यवस्थित करते. "
मी अवाक झाले. मला कळेचना काय बोलावं ते!

मला वाटलं माझ्या या बहीणीला मी किती कमी ओळखते! ही बाई वयात आल्यापासून कधीही गाढ, बिनधास्त झोपलेली नाही!
(तिने दर वेळी परकर/गाऊन घोट्याच्या वर गेला की नीट केलेला आहे.)
आणि घरोघरच्या किती मुली अशा झोपू शकत नाहीत, देव जाणे.

कायम शरीराचं भान ठेवायचं, सतत, चोवीस तास, कशी तारेवरची कसरत आहे ही!

मला जाणवलं , मी सुद्धा ही करते, तिच्याइतकी नाही पण करतेच.
मी पॅन्ट, सलवार, घालण्याचा पर्याय निवडीन आणि बिनधास्त झोपीन.
चार लोकात झोपायची वेळ येते, तेव्हा मी गाऊन घालणारच नाही, ( मी घरीही फारसा घालत नाही.) आपल्याला तो सावरायला जमत नाही, हे मला माहीत आहे.

पूर्वी सारखे हात गळ्याशी नेऊन चाचपायची सवय, आतले कपडे आतच आहेत ना? कुठे पट्टी बाहेर तर दिसत नाहीये ना?
साडी नेसली की दहा पिना लावून बंदोबस्त करायचा.

सारखं सांभाळत राहायचं.
मला कंटाळा आला आहे.
मला सोडून द्यायचंय.

*********

बायकांवर किती आणि किती प्रकारचॊ प्रेशर्स असतात.
याची त्यांना जाणीवही नसते.
त्या चालत असतात....
चालत राहण्याची त्यांना सवय असते.

**********



Wednesday, August 15, 2012

वाचकांचे लेख -- अधिक महिना आणि जावयाचे वाण..

आता अधिक महिना जवळ आला आहे. सगळीकडे (निदान माझ्या आसपास तरी) अधिक मासाच्या वाणाची चर्चा सुरु झाली आहे. लग्नाचे हे पहिलेच वर्ष असल्याने माझ्या नवर्याला या वर्षी काय वाण मिळेल याची उत्सुकता इकडे लागून राहिलेली आहे. तिकडे आई बाबांची सुद्धा वाण म्हणून द्यायला सोनाराकडे एक फेरी झाली आहे.

का देतात अधिक मासात जावयाला वाण?? कुणाला ठाऊक आहे? इकडे ज्या लोकांना वाण काय मिळणार म्हणून उत्सुकता आहे त्यांना हा प्रश्न विचारल्यावर ते काहीतरी विनोदी उत्तरे देऊन माझा प्रश्न हसण्यावारी नेत आहेत..

मुळात अधिक महिनाच काय? पहिल्या वर्षाच्या प्रत्येक सणाला जावयाला आणि मुलीच्या सासरकडच्या लोकांना काही ना काही दिले पाहिजे असं शास्त्र कोणी काढलं? आणि ते का पाळाव लागतं??

इतक्या का आपण मुली टाकाऊ असतो? कि आपल्यासारखीला आश्रय देणारा जावई महान होय.. त्याला लग्नात हुंडा द्यावा, मग लग्नानंतर पहिल्या वर्षी प्रत्येक सणाला काही ना काहीतरी द्यावे; हे काय कमी म्हणून आयुष्यभर.. म्हणजे अगदी सासू ९८ वर्षाची झाली आणि जावई ७० वर्षाचा म्हातारा झाला तरीही अधिक मासाचे वाण द्यायचे. हे काय कमी म्हणून ती सासू वारली तरी मुलीचा भाऊ वाण देऊन हि परंपरा कायम ठेवतो.

माझा ह्या देण्या-घेण्याला सक्त विरोध आहे. का म्हणून मुलीच्या आई-वडिलांनी मुलीच्या सासरी हे असं सतत देत राहायचं?? आई-वडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांना "नका देऊ" सांगून पटत नाही. सासरच्यांना नका घेऊ सांगितलेले आवडणार नाही. नवर्याला सांगितले तर तो म्हणतो कि "मला त्यांच्याकडून काहीही नको पण त्यांनी खूप आग्रह केला तर मला त्यांचे मन मोडवणार नाही".

मला नक्की माहितीये कि सध्या माझ्या आई-वडिलांची जावयाला सोन्या-चांदीची वस्तू देण्याची नक्कीच ऐपत नाहीये. त्यांनी पोटाला चिमटा काढून हि वस्तू घेतली आहे. आधीच माझ्या लग्नासाठी बाबांनी खूप कर्ज काढले होते. (मुळात लग्न साधेपणाने करायची आमची इच्छा होती पण मोठ्यांनी ती हाणून पाडली. इकडची (सासरची) माणसे आम्ही लग्नाचा अर्धा खर्च करतो असं म्हणत होते.. पण माझेच आईवडील जुन्या वळणाचे असल्याने त्यांनी लग्नाचा सगळा खर्च ऐपत नसतांना स्वत:च उचलला).

आता मला आई-बाबांकडून काहीही घ्यायला लाज वाटते. ह्या सगळ्या सिस्टीम वरच खूप राग येतोय..

हि कुठली भिकारडी (विवाह) संस्था?? मुलीच्या आईवडिलांच्या पोटाला चिमटे घेऊन त्यांना मुलीच्या सासरकडच्या लोकांचा मानपान करायला लावणारी? मी लग्न केले हे चुकले का?? कि विधिवत लग्न करायची त्यांची (माझ्या आणि नवर्याच्या आईवडिलांची) अट मानली हे चुकले?

खूप कात्रीत अडकल्यासारखे झाले आहे. तुम्ही अश्या प्रसंगातून गेले आहात का? काय केलेत अश्या वेळी? मी काय करू शकते अश्या प्रसंगात?

- आश्लेषा

खरं बोलणं... सांगणं... ऎकणं -- २


खरं बोलणं म्हणजे सत्य असं असतं का? "खरं" म्हणजे आपल्या परीघात, आपल्या परीस्थितीत, आपल्या समजॆनुसार, आपल्या आकलनानुसार जे आपल्याला प्रतीत झालं आहे ते... असं म्हणता येईल. पण सत्य तरी नितळ सत्य असतं का? सत्य हे असं आगीसारखं सार्वकालिक, सर्व परीस्थितीत, सर्व लोकांसाठी एकच, असं नसतं. त्यालाही हे काळवेळेचे डाग असतातच. डाग पण नाही म्हणता यायचं डाग वरवरचे असतात, त्याशिवाय आत सत्य असंही नसतं. सत्याच्या मुशीतच ते आहे.

मग मी म्हणते तेच खरं, तेच सत्य, असं करून नाही चालायचं.
प्रत्येकाचं आपापलं "खरं" असतं, ही मुभा आपण प्रत्येकाला द्यायला हवी.

कृपया हे लक्षात घ्या की इथे मी अतिशय सूक्ष्म बाबींबद्दल बोलत आहे. आपण सरसकट खरं आणि खोटं म्हणतो तसं हे नाही.

म्हणजे प्रत्येकाचं एक (वर दिलेल्या व्याख्येनुसार) खरं असतं.

प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे की स्थल/ काल/ व्यक्ती/ दृष्टीकोन/ या पलीकडे आपण किती जाऊ शकू.
आपण जे खरं मानून चाललो आहोत , त्याला किती मर्यादा आहेत, हे समजून घेतलं पाहिजे.

आपल्याला प्रतीत झालेलं "खरं" तरी आपण थेट बोलतो/सांगतो का? तर नाही.
भाषेची एक गंमत असते, वरवर जरी ती सारखीच दिसत असली, तरी समुहानुसार तिचे वेगवेगळे अर्थ असतात.
घराची अशी एक भाषा असते. घरातल्यांनाच तिचे खोल अर्थ लागतात.
दोन व्यक्तींमधेसुद्धा त्यांची त्यांची एक भाषा असते/ असू शकते.

आपण सांगत असतो/ व्यक्त होत असतो ते केवळ भाषेद्वारे नाही. देहबोली ही खूप महत्त्वाची असते.
’भाषा + देहबोली’ ने माणूस पूर्णपणे व्यक्त होतो. ते आपल्याला वाचता आलं पाहिजे.

भावनांची भाषा जगभर सारखी असावी, त्याची तीव्रता कमी जास्त असू शकेल.
म्हणजे मी निखळ भावना म्हणते आहे. आनंद, दु:ख, निराशा....

खरं म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस जेंव्हा बोलत असतो, तेंव्हा खरंच बोलत असतो.
आपण ते पूर्णपणे वाचू शकत नाही.
आपल्याला ते पूर्णपणे ऎकू येत नाही.

बरेचदा आपल्याला खोटच बोलायचं असतं.
जाणीवपूर्वक.
किंवा आपल्याला सवय असते, बरं वाटेल, पटेल तेच बोलण्याची.
किंवा समाजाच्या चौकटीत आपल्याला सुरक्षित वाटत असतं, समाजाने जे आपल्याकडून अपेक्षिलेलं असतं तेच आपण बोलत जातो.
किंवा खरं बोलण्यासाठी जी किंमत द्यावी लागते ती देण्याची आपली तयारी नसते.
किंवा .....

मला वाटतो आपण सांगीतलं आणि संपलं असं नको, समोरच्या व्यक्तीपर्य़ंत ते खरं पोचलं आहे ना, याची काळजी घ्यायला हवी, निदान आपल्या जवळच्या व्यक्तींपुरती.
आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे.

*******

Tuesday, July 31, 2012

ओरखडा -- 2


समाजाने सभ्यतेच्या काही मर्यादा आखून ठेवलेल्या असतात. आपण सगळेच शक्यतो त्या पाळायचा प्रयत्न करत असतो. कारण की आपण सभ्य असतो किंवा सभ्य असावं अशी आपली इच्छा असते किंवा सभ्यता आपल्यावर लादलेली असते.
 ही सभ्यता म्हणजे काय? हे आपण ठरवलेले आहे का? नाही. समाजाने ठरवून ठेवलेले आहे. आणि वेगवेगळ्या समाजात सभ्यतेच्या मर्यादा या वेगवेगळ्या असतात. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात त्या वेगवेगळ्या असतात. माझी एक मध्यमवर्गीय मैत्रिण होती. लग्नानंतर ती एका अतिश्रीमंत घरात गेली. तिला सहज, मोकळेपणाने, मोठ्याने बोलायची सवय होती. त्या घरात तर अतिशय हळू आवाजात बोलायची पद्धत. ती तिच्या नेहमीच्या आवाजात बोलायला लागली की घरात इतरांना कळायचं नाही , हिला काय झालंय? (कुठे आग लागली आहे?), त्यांच्या प्रतिक्रियांवरून तिला लक्षात यायचं, हळू आवाजात बोलायला हवं आहे.
 मोठ्याने बोलणं असभ्यपणाचं आहे का? किंवा हळू बोलणं असभ्यपणाचं आहे का? तर नाही. तुमच्या चौकटीत ते तसं होऊ शकतं.

समाजात काही एक पद्धती रूजत आलेल्या असतात, त्या निरपेक्षपणे चूक किंवा बरोबर नसतात. त्याचा किती ताण घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हे आपण ठरवायचं असतं. हे यानिमित्ताने मला सांगायचं आहे.

 चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? असे रागलोभ न दाखवणारे सभ्य असं का समजलं जात असेल?
 मला वाटतं, नाटकीपणा, मुखवटॆ घालून वावरणं हा आपल्या तथाकथित मध्यमवर्गीय मूल्यांचा गाभाच आहे. चांगलं चाललेलं नसेल तरी ते तसं दाखवण्याची आपली धडपड असते. राग काय आणि लोभ काय, या दोन्ही गोष्टी या मुखवट्याला तडे जाऊ देणार्‍या आहेत. ते आपल्याला चालत नाही.

 मी पाहिलेल्या प्रसंगात ती बाई समाजाच्या मध्यमवर्गीय सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत होती.
मी समजा खरोखरच थांबले असते तर काय केलं असतं? याबाबत समाजाची जी मार्गदर्शक नियमावली आहे त्यानुसार मी त्यात पडायला नको, असं आहे, त्यामुळे पडल्यावर मी काय करायचं हे अर्थातच नाही.

 पहिली गोष्ट मला मी सभ्य आहे की असभ्य अशी कुठलीही भूमिका घ्यायची नाही आहे. दुसरं ती जे तडे पाडत होती ते मला घाईघाईने बुजवायचे नाहीत. म्हणजे मी जाऊन तिला ’ तुला काय झालंय? म्हणजे रस्त्यावर तू असं का वागत आहेस? तुला भान आहे का?" वगैरे काहीही बोलणार नव्हते.

 हा रस्त्यावरच्या भांडणाचा अंक संपल्यावर, घरी गेल्यावर कदाचित आपण रागाच्या भरात काय हे वागून गेलो, असं अपराधीपण तिला येण्याची शक्यता आहे/ होती.

 मला तिला इतकंच सांगायचं होतं, "बाई गं, असं चालतं. आपण मोडून पडण्यापेक्षा मुखवट्याला तडे गेले तर चालतात. तू तुझा राग, चीड बोलून टाक, मग तुला शांतपणे यावर विचार करता येईल."

 कदाचित फारसं गंभीर नसेलही, किंवा असेल तर मी ऎकून घेईन. या एवढ्या वाहत्या रस्त्यावर कोणीच नाही मदतीला येऊ शकणारं, असं नको व्हायला. तिला ठेच लागली असती, अपघात झाला असता तर मी धावले असतेच ना? तसंच जर तुझं मन दुखावलं गेलंय तर मी तात्पुरती आहे.

******

पुढच्यावेळी मी असा प्रयत्न करीन.

******


Tuesday, July 17, 2012

वाचकांचे लेख -- छान चाललंय आमचं !!! ( "ओरखडा"वर प्रतिक्रिया)

ह्याच विषयावर खर तर मीही लिहिणार होते.. मध्यंतरी नवऱ्याशी थोडा अबोला धरला होता (खर तर त्या वेळी खूप म्हणजे खूपच राग आला होता) आणि नेमके घरात पाहुणेच पाहुणे येत होते त्या दिवशी..

त्या दिवशी त्या सगळ्यांसमोर सगळ काही छान चाललंय असा अभिनय करण्याचा खूप वैताग आला होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला कि काय त्रास आहे? नवरा-बायको मध्ये वाद होतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे (उदा. जवळ जवळ ठेवल्यावर भांड्याला भांड लागायचंच!!! हि म्हण). तरीही आमच्यात काही वाद झाला असेल तर तो असा लपवायचा का?? माझ्या सासूबाई पण अध्येमध्ये म्हणतात.. "नवऱ्यात आणि आपल्यात काही वाद झाला तर तो आपला आपल्यात ठेवावा, लोकांना कळता कामा नये" तेव्हा त्यांचा काय राग आला होता. आपणच का गप्प बसायचं नेहमी? बाईनेच का घरच्या अडचणी घरातच दाबून टाकायच्या?? इत्यादी विचार मनात आले होते.

पण.. नंतर शांत झाले तेव्हा मला ते पटले बरेचसे..

आणि मग माझ्या लक्षात आले.. त्या दिवशी "आमच्यात वाद झाला नाहीये" याचा अभिनय माझ्या नवऱ्यालासुद्धा तितकाच करावा लागला होता.. असं नव्हत कि तो पुरुष होता म्हणून येणाऱ्या-जाणार्यांना मोकळेपणाने "आमच भांडण झालंय" असं सांगू शकला.. मग मी विचार केला.. घरात काहीतरी बिनसलंय हे चारचौघात सांगायचा अधिकार/ मोकळीक आपल्या घरात कोणाला असते? तर कोणालाच नाही.. अगदी घरचे मोठे/कर्ते असूनही माझ्या सासू-सासर्यांनाही नाही.मग लक्षात आले, "सगळं काही छान चाललंय" हा सामाजिक शिष्टाचाराचा एक भाग आहे निव्वळ.

चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? तुम्हांला काय वाटतं?>>>

"गृहच्छिद्र कोणाला दाखवू नये" असं म्हणतात.. त्यामागे काही कारण आहे.. माझ्या मते त्याचे कारण आपण किंवा पुरुषप्रधान संस्कृती नसून घरातली चुगलखोर आणि इतरांना बदनाम करायला टपलेली माणसे हे आहे. प्रत्येकाच्या घरात काही अधिक-उणे असते हे जितके खरे आहे तितकेच हेहि कि आपल्या आसपासच्या बऱ्याचश्या लोकांना (ज्यांना आपण विघ्नसंतोषी म्हणतो) अश्या "उण्या" मध्ये फार रस असतो.. इतरांच्या घरातल्या कुठल्याही घडलेल्या घटनेकडे असे लोक चघळायला एक माल-मसाला अश्या दृष्टीने बघतात.. आणि मग गोष्ट षटकर्णी होते. हा सगळा प्रकार टाळण्यासाठी चार-चौघात आपले राग (लोभ मुद्दाम लिहिलेले नाहीये, मला लोभ न दाखवणे पटत नाही आणि त्याविषयी सविस्तर लिहिणार आहे लवकरच) दाखवायचे नाहीत असा सर्वसाधारण शिष्टाचार रुजला असावा.

याखेरीज मीहि कधीतरी "नवऱ्यासोबत भांडण झाले आहे/ मी नाही बोलत ए त्याच्याशी" असं काहीजणांना उघड सांगून पाहिलं. म्हणजे मुद्दाम असं सांगितलं नाही.. पण ..का लपवायचं? आपण काही पाप केलं आहे का? इत्यादी इत्यादी भावनेमुळे मी ते लपवलं नाही. पण त्यामुळे मला विविध अनुभव आले.

१. बरेचजण खुश झालेले दिसले. आमच्यात समेट होण्यापेक्षा त्याचे कोणकोणते गुण मला आवडत नाहीत हे खोदून खोदून विचारून त्यांनी माझ्या रागात भर घालायचा प्रयत्न केला.

२. काही लोकांनी जज ची भूमिका घेतली. आणि स्वत: न्यायनिवाडा करायला बसले. आमच्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी विचारून घेतल्या आणि तुम्हा दोघांचे चुकले आहे.. दोघांनी अमुक केले पाहिजे.. आता आम्ही समाजाचा एक भाग असल्याने आमचे वर्तन कसे असले पाहिजे यावर तद्दन रटाळ लेक्चरबाजी केली आणि फुकट चहा पिऊन पळून गेले.

३.काही लोकांना (विशेषत: इकडच्या) माझ्यावर बोट ठेवायला कारणच हवे होते. त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले. आणि ते मी कशी चूक आहे आणि माझ्या नवऱ्याशी कशी वाईट वागते हे सगळे बोलून यथेच्छ तोंडसुख घेतले. ते जेवढे मला बोलले.. तेवढे बोलण्याएवढा राग तर माझ्या नवऱ्यालाही माझा आला नव्हता. (शेवटी माझी बाजू घ्यायला नवराच मध्ये पडला आणि आमच्या रागाचे प्रेमात रुपांतर झाले).

या सगळ्या अनुभवातून हे शिकले कि थोडा वेळ लागला तरी चालेल..पण आपल्यातले भांडण शांतपणे चर्चा करून आपणच मिटवायचे.. (चोमड्या)लोकांना मध्ये पडू द्यायचे नाही. त्यांच्या हातात कोलीत द्यायचे नाही.

अर्थात.. तुमच्यातले भांडण कुठले आणि तुमच्यावर होणारा अन्याय कुठला ह्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे.. घरातल्या गोष्टी बाहेर काय सांगायच्या म्हणून एखादी अन्याय सहन करत बसली तर त्याला काय अर्थ? पण भांडण किंवा वाद शक्यतोवर आपला आपणच सोडवला पाहिजे.

असे दृश्य भररस्त्यात कधी पाहिल्याचे मला आठवत नाही.>>

अभिमानाने सांगायची गोष्ट नाही. पण असे मीही केले आहे. नवऱ्याचा राग आला असेल आणि टू-व्हीलर वर बसले असेल तर गाडी सिग्नलला थांबल्यावर सरळ उतरून भलत्याच दिशेला चालू पडायचे असा त्रास मी त्याला दिलेला आहे. बिचारा "गाडीवर बस" म्हणून माझी मनधरणी करत राहायचा मग. आणि थांबलेले लोक पाहत राहायचे. तसं तर हे खूप बालिश आहे. पण मला गम्मत वाटायची. तू त्या बाईचे/ मुलीचे वय दिले आहेस म्हणून.. नाहीतर मला वाटलं असत तू मलाच पाहिलंय असं करतांना कधीतरी.. ;)

आणखी मला असं वाटलं की मी थांबले का नाही? >>

कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता.

अशा वेळी मी किंवा कोणीही काय करायला हवं?>>

मला वाटत जोपर्यंत सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे (ते दोघे एकमेकांना शिवीगाळ करत नाहीयेत, मारामारी करत नाहीयेत, भर रस्त्यात उभे राहून एकमेकांची उणी-दुणी काढत नाहीयेत) तोपर्यंत आपण मध्ये पडणहि योग्य नाही.

आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुणाच्याही खाजगी गोष्टीत पडायचं नाही. त्यातल्या त्यात नवरा-बायकोच्या तर नाहीच नाही. >>

दोघांपैकी कोणावरही अन्याय होतोय असं आपल्याला वाटत नसेल तर पडायचं नाही.

मला वाटतं मी थांबायला हवं होतं, काही मदत हवी आहे का? विचारायला हवं होतं. त्या दोघांना कदाचित जवळच्या हॉटेलमधे नेता आलं असतं, चहा घेता घेता मी नुसतं ऎकून घ्यायला हवं होतं.>>

आशा म्हणाली तसं मलाही वाटत कि त्यांना काही मदतीची गरज होती असं वरकरणी वाटत नव्हत.. उद्या तू सार्वजनिक ठिकाणी आहेस आणि तू थोड्याश्याच मोठ्या आवाजात नवऱ्याला काही बोललीस पटकन.. आणि मग एकदम चार लोक येऊन तुला काय झालं असं विचारायला लागले तर तुलासुद्धा कानकोंडच होईल बहुतेक..

समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं.>>

हे मान्यच आहे.. पण ते (कोण)कोणत्या बाबतीत हेही ठरवायला हवं.

--गार्गी

Sunday, July 15, 2012

ओरखडा


आम्ही कर्वे रस्त्यावरून जात होतो. स्कूटरवर होतो, घाईत होतो. एवढ्यात येणारे काही लोक वळून पाहताहेत, थांबून पाहताहेत, असं दिसलं. काही अपघात झालाय की काय? म्हणून बघत बघत पुढे जात होतो.
 दिसले दृश्य ते असे, एक बाई , कामकरी/कष्टकरी वर्गातली नव्हे तर, सुखवस्तू घरातली, कॅप्री आणि टीशर्ट घातलेली, तावातावाने पुढे चाललेली, खूप चिडलेली, वय ३०-३५, तिच्या पंधरावीस फूट मागे  एक पुरूष तिच्याशी बोलण्याच्या पावित्र्यात, तिच्या मागे मागे चाललेला. ती मधेच ओरडून मागे वळून त्याच्याकडे पाहात हातवारे करत रागारागाने काही तरी बोलत होती.
 असे दृश्य भररस्त्यात कधी पाहिल्याचे मला आठवत नाही.
  हे दृश्य माझ्या मनासमोरून जात नाही. मी पुन्हा पुन्हा मागे जाते आणि विचार करते काय झालं असेल त्या बाईला? मध्यमवर्गात सहसा पाळले जाणारे नियम तोडावेत, असं वाटण्याइतपत काय झालं असेल?
 आपल्यावर मर्यादा पाळण्याचं बंधन असतं, काय ते घराच्या चौकटीत, दाराआड, ते ही शक्यतो झोपण्याच्या खोलीतच. असं असताना ती हे सगळे नियम का तोडत असावी?

त्या दोघांचं काय नातं असावं? बहीण- भाऊ तर नसावेत. नवरा- बायको असतील, एकमेकांत गुंतलेले मित्र-मैत्रिण असतील, एकत्र राहणारे मित्र-मैत्रिण असे असेल.

दोष कुणाचा असेल? बाईचा की पुरूषाचा? मला माहीत नाही.
किंवा असं दोघांपैकी एकाकडे बोट दाखवता यायचंही नाही.

मला त्या बाईच्या हिमतीचं कौतुक वाटतंय. "सगळं काही छान चाललंय" च्या अवकाशावर ती ओरखडे काढत चालली होती.
सकाळच्या वेळी नेहमीसारख्या घाईत असणार्‍या कर्वे रस्त्याच्या चित्राला ती फाडत चाललेली!

चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल?
तुम्हांला काय वाटतं?

*****************

आणखी मला असं वाटलं की मी थांबले का नाही?
मी घाईत नसते तर थांबले असते का?
अशा वेळी मी किंवा कोणीही काय करायला हवं?
आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुणाच्याही खाजगी गोष्टीत पडायचं नाही. त्यातल्या त्यात नवरा-बायकोच्या तर नाहीच नाही.
मला वाटतं मी थांबायला हवं होतं, काही मदत हवी आहे का? विचारायला हवं होतं. त्या दोघांना कदाचित जवळच्या हॉटेलमधे नेता आलं असतं, चहा घेता घेता मी नुसतं ऎकून घ्यायला हवं होतं.
समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं.

********************
पुढच्यावेळी मी असा प्रयत्न करीन.

******************

Friday, June 29, 2012

वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. --- ३

छान लिहिलंयस ग..  
तू मनोविज्ञान किंवा विवाह समुपदेशन यापैकी कोणत्या क्षेत्रात आहेस का?
मनाचा गुंता अगदी सहज सोडवलास.. टप्प्याटप्प्याने..

तुझे काय चुकले?>> खूप लोक जेव्हा "तुझं चुकतंय" असं म्हणतात तेव्हा पटकन "माझं चुकलं" असं म्हणून एक पाउल मागे यायची माझी प्रवृत्ती आहे.. त्याचे मुळ कदाचित माझ्या मुलगी असण्यात किंवा मला ज्याप्रकारे वाढवले गेले त्यात असावे. काही वेळेस खरोखर माझी चूक असतेच.. पण ती नसते तेव्हाही माझं चुकलंय हे मी कबूल करते माझ्या अश्या वृत्तीमुळे..

"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे.>> हे असं म्हणणारे खूप कमी भेटतात.. आपल्या समाजात/ संस्कृतीत काही वेळेस काही विचार/भावना मनात येणे (उदा. काकस्पर्श), कोणाकडूनही कुठलीही अपेक्षा करणे हे सरसकट चूक मानले जाते. 

हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.>> ह्म्म्म.. हे बरोबर आहे. माझ्या बाबतीत मला आयुष्यातली बरीचशी मौजमजा करण्यासाठी मला लग्न होण्याची वाट पहायला लागली आहे (त्यामुळे मलाच माझ्या लग्नाची इतकी घाई होती कि मी सासरी जातांना रडले पण नाही :D :D) . तसं त्याचं झालं नसावं. आणि शिवाय माझ्याच नवरयापुरत बोलायचं झालं तर इकडे सासरी नातेसंबंधान्विषयी खूप पारंपारिक अप्रोच आहे. माझ्या सासरेबुवांनी कधीच अजूनही आईंना नावाने हाक मारलेली नाहीये किंवा (मी मागे म्हटलं तसं) कुठेच फिरायला वगैरे घेऊन गेलेले नाहीयेत.. मुलांची नावंसुद्धा ठेवतांना सासूबाईंना विचारले देखील नव्हते.. त्यांच्या आईने (माझ्या आजेसासूबाई) सांगितले ते नाव ठेवले. माझा नवरा तेच पहात लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या दृष्टीने कदाचित तो माझ्याशी बोलतो किंवा माझ्यासोबत बाहेर येतो हेच खूप (आणि पुरेसे) असेल.

आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?>> नक्कीच नाही. म्हणूनच मी काय ते स्थान निर्माण नाही झाले तरी चालेल.. पण त्याला त्याची कामे स्वत:लाच करू देते/ करायला लावते/ सांगते. मात्र माझ्या सासूबाई त्यावेळी आमची नव्हती हो टाप कधी नवरयाला स्वत:चे ताट स्वत: वाढून घ्या म्हणायची..असे भुवया विस्फारून सांगतात.. (मी गम्मत म्हणून सोडून देते :) ).

मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात. >> रंग-रूपाच्या बाबतीत मुळीच अशी प्रतिमा नव्हती. पण तो मला फुलासारखं जपेन (आणि माझ्यामागे भुंग्यासारखा फिरेन :D :D ), आणि सारख सारख मला काय हव नको ते विचारेन असे काहीतरी माझे विचार होते.. पण ते बरेचसे बालिश आहेत याची मला लग्नानंतर आपणहून जाणीव झाली. (शिवाय घरकाम करण्यात एवढी सूट आहे याला मी फुलासारखे जपणेच म्हणेन.)

नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.>> हे कोणत्या बाबतीत म्हणते आहेस? रंगाच्या, रूपाच्या, पैश्यांच्या, आवडीनिवडीच्या, सवयींच्या (उदा. स्वच्छता इत्यादी) कि स्वभावाच्या??

मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.>> तो एक भाग झाला.. मुळात स्त्रीचं सर्वस्व.. मग ते तन-मन-धन काही का असेना.. ते नवऱ्याच्या मालकीचं आहे.. तिच्या स्वत:च नाही, या संस्कारात आहे.. तू शारीरिक अनुषंगाने म्हणते आहेस पण आजही बरयाच मुली लग्न झाले कि आपली कोणत्याही मुलाशी असलेली मैत्री/ संपर्क  कमी करते क्वचित तोडून टाकते हि भावनिक गुंतवणूक झाली ना.. आणि धनाच्या बाबतीत तर आपण नकोच बोलूयात.. तो एक स्वतंत्र विषय आहे..

बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.>> आणि बायकोच तसं नसतं.. याच कारण पुन्हा त्यांना कसं वाढवलं गेलं आहे त्यात असत.. हो ना?

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.>> खुपदा असे विचार मनात येतात कि मी त्याला आपलंस करू शकले नाही.

त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.>> असेल.. सर्वसामान्य पुरुषांप्रमाणे तोही अबोल असेल.. किंवा त्याच्या संस्कारात पुरुषाने आपल्या भावना व्यक्त करणे नसेल.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही. >> थोडक्यात आपला आनंद आणि भावना परावलंबी करायच्या नाहीत. बरोबर?

मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.>> हम्म्म.. याने निराशा नक्कीच कमी होईल.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )>>
हो ना.. पण मुळात आसपास नवविवाहित जोडपी पहिली कि ते प्रेमातला हा असा मिस यु लव्ह यु वाला बालीशपणा खूप करतात..त्यात पण मजा असते एक. मग मला असं वाटायचं कि आपल्या लग्नाला ६च महिने झाले, इतक्यात आपल्या नात्यातली नवलाई संपली का??कि आता मी असले काय नि नसले काय.. कुठे फरक पडतो? मी माझ्या लेखात जो प्रसंग सांगितला आहे त्यावरून मी काढलेला निष्कर्ष लग्नाला अजून ६च महिने झाले आहेत म्हणून सगळ्यांनी चुकीचा आहे असे सांगितले. पण उलट आमच्या लग्नाला २० वर्ष झाली असती आणि त्याला माझी आठवण आली नसती तर कदाचित आता मी माहेरी जाण्यात आता कसली नवलाई असं मीच म्हटलं असत..आणि मला वाईट वाटलं नसत.. नवऱ्याने आपल्याला सारख मिस यु किंवा लव्ह यु म्हणव हि अपेक्षा लग्नानंतरच्या पहिल्या ६ महिन्यानंतर असते कि लग्नाला १०-१२ वर्ष झाल्यावर?? 
कदाचित माझा प्रश्न चुकला.. एकदम स्थान वगैरे म्हणणे एकदम चुकीचे होते.. पण त्याला माझी आठवण यावी हि अपेक्षा रास्त होती.. तुला काय वाटत??

स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.>> बर झालं सांगितलस ते.. माझा आटापिटा कमी होईल..

तुझ्या या स्वतंत्र लेखाबद्दल खूप खूप आभार.. आत्मपरीक्षण करण्यास मदत झाली आणि स्वत:ला आणि स्वत:च्या भावनांना जसे आहे तसे स्वीकारण्यासाठी सुद्धा..

ता.क. १. मी जिथे जिथे मुला-मुलीवर होणारे संस्कार आणि त्यांची वाढ असे म्हटले आहे तिथे मला पालक आणि आजूबाजूचा समाजही जे संस्कार करतो त्यांविषयी बोलायचे आहे. मी कुठेच पालकांना अश्या संस्कारांसाठी एकमेव दोषी मानलेले नाही.

ता.क. २. एवढी मोठी प्रतिक्रिया त्या लेखाखाली देण्यात तांत्रिक अडचण येते आहे त्यामुळे हि प्रतिक्रिया स्वतंत्र लेख म्हणून प्रसिद्ध करावा.

-पियू

त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. -- २


पियू,
   तुझे काय चुकले?
 आपल्या नवर्‍याच्या आयुष्यात आपले काही स्थान असावे, ते महत्त्वाचे असावे, आपल्यावाचून त्याचे अडावे, त्याला आपली आठवण यावी, असे वाटण्यात चुकीचे काय आहे?
कुठलीही दोन माणसे एकमेकांत गुंतलेली असतील/जवळच्या नात्यातली असतील तर त्यांना एकमेकांसाठी असं वाटणारच ना?
"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.
मग त्यामागची कारणं काय आहेत? गुंतागुंत काय आहे? ते शोधू या ना!
पण ’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे, त्यावर विचार झाला की वाटणं बदलू शकतं.

 तोवर जिथे आहोत, तिथून सुरूवात करायची.
तुझं म्हणणं असं आहे की तुला त्याच्याबद्द्ल असं/जे वाटतं पण त्याला वाटत नाही. असं का?
हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.

 तू हे ऎकत वाढलीस की ..." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते"......
तुझ्या नवर्‍याने हे वाक्य कधी ऎकले असेल का? नसावे.
मुली सहसा अशी वाक्ये ऎकत वाढतात. अगदी लहान असल्यापासून नवर्‍याची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार होत जाते, त्याचं घर म्हणजे माझं घर, त्याचं सुख म्हणजे माझं सुख, त्याला पटेल तसं मी वागीन, तो माझ्या आयुष्याचा मह्त्त्वाचा भाग असणार आहे, मी त्याच्याविना अपुरी, माझं ध्येय काय? त्याची मर्जी सांभाळणं, त्याच्या आयुष्यात स्थान निर्माण करणं.
 मुली नुसती अशी वाक्ये ऎकत नाहीत, तर आजूबाजूला बायकांना असं वागताना बघतात.
मुलग्यांना असं काहीही ऎकवलं जात नाही. त्यांच्या मनातली बायकोची प्रतिमा कशी असते? मदतनीसाची, किंवा रूममेटची.
म्हणजे लग्न झाल्यावर त्याला असे ऎकवले जाऊ शकते, " मोजे सापडत नाहीत का? आता बायकोला विचारत जा."
मग बायको नियमाने मोजे तयार ठेवू लागली की त्याला बायकोची आठवण येणारच! आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?

 मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात.
 नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.
का? याला लग्नाची किंवा प्रेमाची जी मिथकं आहेत, तीही कारणीभूत आहेत.
लग्न हा एक व्यवहार आहे, सोय आहे, मग तुमचं ठरवून लग्न असो की प्रेमविवाह असो.
तू किंवा कुठलीही मुलगी ही नवर्‍याची एक प्रतिमा जपत, त्याची वाट पाहात वाढली आहे त्यामुळे एकदा तो त्या मुलीच्या आयुष्यात आला की तो तिचं सर्वस्व झालेला आहे.
 दुसरं असं की ती शरीराने त्याच्याशी बांधली गेली आहे, ते त्याला समर्पित केलं, म्हणजे तो खासचं आहे ना, तिच्यासाठी. आजवरचं आयुष्य, ते शील, काचेचं भांडं वगैरे ती जपत आली ती त्याच्यासाठीच!
 मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.
मुलग्यांसाठी ते तसं नसतं. म्हणजे ते बायकोशी प्रामाणिक नसतात असं मी सुचवतही नाही आहे. पण ते स्वत:ला जपत आलेले नसतात, म्हणजे नाही त्यांना जपायला लागत.
बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.

या पार्श्वभूमीवर तुझा प्रश्न काय आहे, तो पाहू या.
नवर्‍याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे, यासाठीचे मार्ग कुठले? त्याच्या आयुष्यातलं आपलं स्थान काय?
केव्हा नवर्‍याला आपली गरज भासावी, असं तुला वाटतं?
मोजे घालताना नक्कीच नाही.
म्हणजे त्याला भावनिक पातळीवर आपली गरज भासली पाहिजे असं तुला वाटतं.
संकटात, आनंदात, दु:खात, ऎरवी सहजही त्याला तू आठवली पाहिजेस. आणि त्याने तुला ते सांगीतलंही पाहिजे.
त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.
दुसरी शक्यता अशी आहे की नाही त्याला आठवण येत.... अशावेळी काय करायचं.
स्वीकारायचं.
तुला त्याचा त्रास होतोय, वाईट वाटतंय... ठीकच आहे.
पण स्वत:ला दुखवून घ्यायचं नाही.
तो तुझ्याशिवाय मजा करू शकतोय पण तू त्याच्याशिवाय मजा करू शकत नाही आहेस. काय करायचं?
स्वीकारायचं.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही.
स्वत:कडे त्याच्या नजरेने पाहायचं नाही.
मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )

 आपण आपल्या गतीने, आपल्या चालीने चालत राहायचं, आपल्या मुल्यांसह, त्यामुळे जर कोणाच्या मनात स्थान निर्माण झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.

 एक मला बरं वाटलं तुझा नवरा नाटक करत नाही आहे. हे तुमचे नाटक करण्याचे दिवस आहेत, प्रतिमेत अडकण्याचे दिवस आहेत. ते तो करत नाही आहे, छानच ना? कुठल्याही जवळच्या नात्यात ’खरा माणूस’ आपल्या समोर असायला हवा. मग त्याला कसं समजून घ्यायचं बघता येईल. पण तो जर खोटा असेल, अगदी जाणीवपूर्वक नाही ..... समाजाच्या दबावाखाली, तर संवादच संपेल.

 एकमेकांमधे काही नातं निर्माण करायचं असलं तर ते विश्वासाच्या पायावर उभं असलं पाहिजे, एकमेकांशी गाभ्यातून खरं बोलता आलं पाहिजे. एकमेकांकडे सहानुभूतीने बघता आलं पाहिजे. एकमेकांना क्षमा करता आली पाहिजे. अशी खरी नाती दु्र्मीळ असतात.
अशा दुर्मीळ व्यक्तींची गरज भासणारच आणि एकमेकांच्या आयुष्यात त्यांना स्थान असणारच.







Friday, June 15, 2012

मौज-मजा




बायकांना पुरूषांशिवाय मजा करावीशी वाटत नाही किंवा त्या करत नाहीत असे सर्वसाधारणपणे दिसते.
आपल्या परंपरेत असे काही सण आहेत, जेंव्हा बायका बायका मजा करतात. उदा. हळदीकूंकू, मंगळागौर, डोहाळजेवण हे अगदी बायकांचे सण आहेत. पुरूषांना अशा समारंभांना बंदी असते आणि बायका ते साजरे करतात. अशा पुरूषपात्रविरहीत सणांमधे मजा येते.
 (आम्ही इंद्रधनुच फक्त जमतो तेव्हा अशा "पुरूषपात्रविरहीत बैठकींना" खूप मजा येते. अशावेळी बसण्या, बोलण्या, वावरण्याचे जे किंचित ताण इतरवेळी असतात, ते नसतात. मोकळं वाटतं.)
म्हणजे जर परंपरेची परवानगी असेल तर बायका बायका मजा करतात.
ही परवानगी फक्त सौभाग्यवतींना किंवा कुमारीकांना होती. विधवांना हे सगळंच नाकारलेलं. बायका बायकांच्या मजेसाठीही नवरा असणं गरजेचं होतं.
 बायकांना पुरूषांशिवाय मजा करावीशी वाटत नाही याची मुळं मला वाटतं पतिव्रताधर्मात आहेत. ( पतिव्रताधर्म आणि त्यामागचं राजकारण याबद्दल कधीतरी लिहिन.) आणि आधी पुरूष आणि नंतर बायका अशी उतरंड.
 साधी जेवायची गोष्ट घेतली तरी पुरूषांची पंगत आधी अशी पद्धत होतीच ना? उरलं सुरलं बायकांच्या पंगतीला. बाईने नवर्‍याच्या ताटात जेवायचं. त्याचं उष्ट खायचं. काही दयाळू नवरे आपल्या बायकोला मिळावं म्हणून ताटात जास्तीचं गोडधोड वाढून घेत आणि पानात ठेवत. ते म्हणजे प्रेम! आपल्या पाळीव कुत्र्यामांजरावर प्रेम करावं तसं ही पुरूषमंडळी आपल्या बायकांवर प्रेम करीत आणि बायका करवून घेत.
 अशा बायका एकट्या जेवायला हॉटेलात जातील का?
 मजा म्हणजे काय? मजेची व्याख्या आपण कशी करू? ’अ’ व्यक्तीच्या मजेची व्याख्या ’ब’ व्यक्ती नाही करू शकणार. ’अ’ ने जर सांगीतलं ती मजेत आहे तर मजेत आहे. मग इथे प्रश्न येतो संस्कारांचा, समाजातील व्यक्तीची भूमिका आणि प्रतिमा यांचा.
 पियू, इथे तू म्हणतेस तशी मजा न करण्याची मुळे बायकांवरील संस्कारांत आहेत.
 पूर्वीपासून घर हेच बायकांचं कार्यक्षेत्र होतं. त्यामुळे जी काय मजा करायची ती घरातच. अशी प्रथा होती की ’ बाहेर जाणाराला कुठे जात आहात?" असं विचारून हटकायचं नाही. नाहीतर काम होत नाही. पुरूष मजा करायला कुठे जात आहेत हे बायकांनी विचारायचं देखील नाही. वा! काय न्याय आहे?
 मला वाटते आता थोडे बदल होताहेत. बायका बदलताहेत. तुझ्या सासूबाईंसारख्या आणखीही बायका असतील पण अशा सहलींना जाणार्‍या बायकाही आहेत. तुझ्या सासूबाईंनी आवडीच्या सहलीला जाण्याची संधी का नाकारली असेल? तुला काय वाटतं?
 १)अशी संधी नाकारून त्या नवर्‍यासाठी त्याग करत आहेत, त्यामुळे समाजात प्रतिष्ठा मिळत आहे.
 २) त्याचवेळी नवर्‍याला मी तुमच्यासाठी काय काय सोडते असं सांगून ’इमोशनली ब्लॅकमेल" करून त्याचे फायदे मिळवता येतात.
 ३) आणि खरं म्हणजे त्या स्वत:च्या सुखासाठी, आनंद मिळविण्यासाठी मनाने तयारच नाहीत.
हे तिसरं जे कारण आहे ना, ते करूण आहे.
आपण बायका आपल्याला स्वत:ला सुखी करण्याचा आपल्याला हक्क आहे असं मानतच नाही.

मला असं वाटतं,  फार त्याग-बीग करू नये कोणी, बायकांनी तर नाहीच नाही. आपल्यालाही आपण हे सोडलं ते सोडलं वाटत राहतं आणि ज्याच्यासाठी त्याग करतो ना ? त्यालाही त्याचं ओझं होऊन बसतं.

>> मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का??
आहे आणि हा अधिकार नुसता खिशात ठेवू नकोस.
मजा कर.


वाचकांचे लेख -- त्याच्या आयुष्यातली आपली गरज..

हा विषय खरे तर मी माझ्या "आपली आपली एन्जॉयमेंट" मध्येच समाविष्ट करणार होते.. कारण तो थोडाफार त्या विषयाच्या जवळ जातो.. पण मला दोन्ही विषयांवर आपली स्वतंत्र चर्चा होणे अपेक्षित आहे म्हणून या दुसऱ्या लेखाचा घाट...

या लेखात मांडलेले विचार मनात यायचे कारण  म्हणजे मी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी (पुण्याहून मुंबईत) आले होते.. एकदम १० दिवसांसाठी.. पहिले काही दिवस (खर तर १-२ च) त्यातल्या त्यात बरे गेले.. पण नंतर खूप प्रकर्षाने नवऱ्याची आठवण यायला लागली.. त्याच्याशिवाय मी इथे इतके दिवस करू काय असं वाटायला लागलं सतत..

म्हणून मी दोनदा-तीनदा नवर्याला फोन केला.. तर तो त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यात मग्न होता.. कधी फुटबॉल खेळण्यात.. कधी क्रिकेट.. कधी सिंहगड ट्रीप..
अगदी प्रामाणिकपणे कबूल करते.. मला खूप वाईट वाटले..
ज्याच्याशिवाय आपल्याला अज्जिबात करमत नाही त्याचे आपल्यावाचून काहीच अडत नाही हे ऐकून अहंकार थोडासा दुखावला गेला बहुतेक माझा...

आणि मग मी विचार करायला लागले.. त्याचे माझ्यावाचून अडावे असे काही मी केले आहे काय? घरात कपडे, भांडी आणि इतर स्वच्छतेला बाई आहेत.. त्या कपडे धुण्यापासून ते अगदी त्यांच्या घड्या पण करून ठेवतात.. इस्त्रीवाला घरी येऊन कपडे घेऊन जातो आणि आणून देतो.. अजून तरी घरात स्वयंपाक  सासूबाई करतात.. मी त्यांना सगळी मदत करते..पहिल्यापासून अमुक कामे बायकोची आणि अमुक नवऱ्याची असा पायंडा पडू नये म्हणून मी त्याची कामे त्याला करायला लावते.. उदा. स्वत:चे ताट स्वत: वाढून घेणे, स्वत:ची अंतर्वस्त्रे स्वत: धुणे.. (मला सध्या तरी एवढीच कामे आठवत आहेत जी आम्हाला करायला उरतात).. लग्नाला ६ च महिने झाले असल्याने मुले असण्याचा काही संबंध नाही.. कि ज्यांचे माझ्यावाचून अडावे...

मी नुकताच महेंद्र कुलकर्णी यांच्या "काय वाट्टेल ते" ह्या ब्लॉग वरील एक लेख वाचला होता.. "गुळाचा गणपती" नावाचा.. त्यात त्यांनी लिहिलं होत.. बायका मुद्दाम आपल्या नवऱ्याला एकूण एक वस्तू हातात देऊन पांगळ करून टाकतात.. अगदी गुळाचा गणपतीच.. जेणेकरून त्याचे पदोपदी आपल्यावाचून अडावे.. त्या वेळी मी तो लेख वाचून.. "बंर झालं बाई आपण काही आपल्या नवऱ्याचा असा गुळाचा गणपती नाही होऊ देत" असा विचार करून आनंद मानला होता...

पण आज या घटनेनंतर विचार केला तर जाणवतंय.. बायका असं का करत असतील.. नवीन घरात आल्यावर.. नवऱ्याच्या आयुष्यात आपलं असं काही स्थान निर्माण करायच्या प्रयत्नात हे घडत असेल.. सासरी आल्यावर नवीन नवीन एक नवरा सोडून कोणीच आपले नसते.. विशेषत: लग्नानंतर शहर बदलले आणि नवीन शहरात कोणाशी ओळख पाळख नसेल तर खूपच एकटेपणा जाणवतो..नंतर हळूहळू हि इतरांबद्दलची परकेपणाची भावना कमी होते.. पण निदान लग्न नाव असतांना ती मुलगी खूप इन्सिक्युर फील करते... आणि आपल्यापाशी असलेल्या एकमेव गोष्टीला जीवापाड जपायला लागते.. थोडा हक्कही गाजवायला लागते.. आणि मग हे "गुळाचा गणपती" प्रकरण त्याचाच एक भाग असते..

पण असं काही नवऱ्याच्या बाबतीत घडत नाही.. किंबहुना मला वाटायला लागलेय कि हे त्याच्या खिजगणतीतही नसते.. तो त्याच्याच घरात.. त्याच्याच परिसरात राहत असल्याने त्याला असे इन्सिक्युर वाटत नाही.. त्याच्यावर प्रेम करणारी अनेक माणसे त्याच्या आसपास असतातच..
मागेच कुठल्यातरी लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेत दिपाताईने म्हटलेय तसे नवऱ्याला बायकोसाठी कधीतरी खास काही करावे असे वाटतच नाही त्याचे हे कारण असावे.. कि त्याने कोणाच्यातरी (बायकोच्या) आयुष्यात आपले काही स्थान निर्माण करायलाच हवे अशी गरज त्याला वाटत नाही..

मग आपल्याला वाटायला लागते.. याच्या आयुष्यातले आपल नक्की स्थान तरी काय?

संसार म्हणजे 
रोजची तीचतीच
कामे फक्त
व्हायला हवीत
करणारी कोण
याला तशी
काहीच
किंमत नाही

हि ८ मार्च २०१० ला ब्लॉग वर आलेली कविता बहुतेक याच भावनेतून जन्मलेली असावी..

तर.. माझा प्रश्न असा आहे सख्यांनो आणि सखींनो..
"आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे यासाठी त्याला "गुळाचा गणपती" बनवून पांगळे करणे याव्यतिरिक्त काही मार्ग आहेत काय? असतील तर ते कोणते?

 पियू

Tuesday, June 12, 2012

वाचकांचे लेख -- आपली आपली एन्जॉयमेंट !!!


हा माझा ह्या ब्लॉग साठीचा पहिलाच लेख आहे... काही चुकलं तर समजून घ्या...

जास्त पाल्हाळ न लावता मुद्द्यावर येते.. माझं असं ऑ  ब्झर्वेशन आहे कि लहानपणापासून जसे स्त्रीच्या मनावर "पुरुषांशिवाय तू कोणीही नाही/ तुझ्या अस्तित्वाला काही अर्थ नाही" असे बिंबवले जाते त्याचप्रमाणे "पुरुषांशिवाय मजा/आनंद हा खरा आनंदच नाही" असेही ठसवले जाते... ह्याचाच परिणाम म्हणून पुरुष आपल्या  बायकांशिवायही मजेत पार्टी 
 वगैरे करताना दिसतात.. इकडे तिकडे ट्रीप ला जातांना दिसतात.. पण बायकांना मात्र नवऱ्याशिवाय कुठल्या मौजमजेची कल्पनाही करवत नाही..

बायको घरी नसेल तर खुशाल एकटे-दुकटे सुद्धा हॉटेल मध्ये येऊन जेवणारे अनेकजण आपण पहिले असतील.. पण आज कंटाळा आला म्हणून एकटीच बाई कधी कुठे येऊन जेवतेय असे दिसते का?? अगदी घरात एक दिवसापुरते तिच्यावर अवलंबून असणारे कोणीही नसले तरी..??

पुरुष स्वत:चे मजेमजेचे प्लान्स ठरवतांना बायकांना अगदी सहज गृहीत धरतात.. म्हणजे.. एखाद्या पुरुषाच्या मित्रांच्या ग्रुप मध्ये ट्रीप ला  वगैरे  कुठे जायचे ठरले तरी तो अगदी सहज होकार कळवून मोकळा होतो.. बायका मात्र "ह्यांना विचारून/ आईंना विचारून सांगते" अश्या छापाची उत्तरे देतात.. आणि नुसतीच उत्तरे देत नाहीत तर खरोखर परवानगी काढतात.. (आता हा भाग वेगळा कि बऱ्याच जणी "हे सोडत नाहीयेत.. किंवा सासूबाईंना नाही चालणार" याचा बहाणा म्हणून वापर करतात).. पण म्हणून तिला फक्त तिचा विचार करून चालत नाही हे खरे..

माझ्या सासुबाईंची नेहमी तक्रार असते कि त्यांना माझ्या सासरेबुवांनी कधीच कुठे फिरायला वगैरे नेले नाही.. त्यांची फिरण्याची आवड मारून टाकली इत्यादी.. म्हणून मी ठरवले कि आपण त्यांना सध्या प्रसिद्ध असलेल्या एका लेडीज ओन्ली ट्रीप (केसरीची माय फेअर लेडी)ला पाठवू.. तसं मी त्यांना बोलूनही दाखवले.. पण कसचं काय? त्यांना आपल्या नवऱ्याशिवाय कुठे जायचे किंवा कोणती मजा करायची हि कल्पनाच सहन झाली नाही.. त्यांनी मला तसं बोलूनही दाखवले...

एवढेच कश्याला? मला लहानपणापासून कधीच कुठल्या मुक्कामी ट्रीप ला वैगेरे कधी जाऊ दिले नाही घरातून.. कधी विचारले तर उत्तर मिळायचे.." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते".. म्हणजे? मला स्वत:ला एक माणूस म्हणून कुठलीही मौज-मजा करण्याचा अधिकार नाही का?? अर्थात याला अपवाद असणारे पालक आणि सासरकडचे असतीलही जगात.. पण.. मेजोरीटी ह्या अश्या संस्कारांचीच दिसून येते...

अर्थात हेही मान्य आहे कि प्रत्येक वेळी घरच्यांचीच सक्ती असेल असे नाही.. कुठे एकटे जायला.. आपल्यालाच खुपदा  नवऱ्याशिवाय मजा करावीशी वाटत नाही.. पण.. मला वाटते ह्याची मुळे आपल्या इच्छेत कमी आणि आपल्यावरच्या संस्कारात जास्त दडलेली आहेत..

तुम्हाला काय वाटते???

- पियू

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...