फरहान अख्तरने मर्द MARD -- Men Against Rape and Discrimination असं कॅम्पेन सुरू केलं आहे.
मर्द असणं म्हणजे काय? हे सांगायला सुरूवात करणं स्वागतार्ह आहे.
यावरची जावेद अख्तर यांची कविता खूपच छान आहे.
जितेंद्र जोशींनी रूपांतर करताना कवितेचा गाभा बदलला आहे. आणि तीच टिपीकल, प्रेमळ पुरूषसत्तेची भूमिका घेतली आहे. अशा प्रेमळ पुरूषांच्या साथीतही बाईची घुसमट होते. असे पुरूष बाईवर खूप प्रेम करतात पण तिला वाढू देत नाहीत. जोशींनी स्त्रीला देवहार्यात बसवले आहे आणि पुरूषाला तिच्या संरक्षकाची भूमिका दिली आहे.
आईचा राखतो मान
आदर बहीणीचा
मुलीचा आणिक गृहिणीचा
तयाचा आम्हां आहे अभिमान
नका पुन्हा देव्हार्यात बसवू.
स्त्री म्हणजे कोमल छाया...
नको पुन्हा..... खरंच नको.
रक्षण करतो बाईचे
पुन्हा नव्या जगातही तिचे रक्षण करायला लागणारच आहे?
स्त्री जननी, स्त्री भगिनी , भार्या....
एवढंच!
या वर्तुळाबाहेरच्या स्त्रीचं काय?
आई, बहीण, मुलगी किंवा गृहिणी हीच बाईची ओळख आहे? त्याशिवायची विखुरलेली बाई आहे, मैत्रिण आहे, कार्यालयातली सहकारी आहे, कर्तबगार वरीष्ठ आहे, भाजीवाली आहे, कामवाली आहे.. ......
कदाचित वेश्या आहे, तिला आपण वर्तुळाबाहेर का ठेवायचं? तिच्याही इच्छेचा आदर केला पाहिजे. तिचा अभिमान नाही वाटणार म्हणून ती बाई नाहीच का? वर्तुळाच्या बाहेरच्या स्त्रियांशी कसंही वागायला पुरूष मोकळेच का?
नवी चौकट नवं कोंडणं........
जितेंद्र जोशींच्या हेतूबद्दल मला किंचितही शंका नाही. पण बाईला बरोबरीने वागवणारा पुरूष हवा आहे. तिच्या आत्मसन्मानाची जाणीव असणारा पुरूष हवा आहे.
पुरूष म्हणजे माणूस
पौरूष म्हणजे निव्वळ माणूसपण
मर्द म्हणजेही माणूस
मर्दानगी म्हणजे निव्वळ माणूसपण
हे मर्दा, तू बाईशी केवळ माणसासारखं वाग.
आणि दुसर्या पुरूषाशीही केवळ माणसासारखं वाग.
बाईला देव्हार्यात बसवून तिची पूजा करू नकोस,
वा तिला कस्पटासमान समजून तिला पायदळी तुडवू नकोस
ती माणूस आहे, हे विसरू नकोस,
माणसाचे सगळे अधिकार तिला आहेत,
ती नाही म्हणू शकणार आहे,
ती एकटी फिरेल, रात्री अपरात्री,
स्वत:ला आवडतील असे कपडे घालेल,
तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे,
आणि मनावर देखील,
हे तुला पचवायला अवघड जाईल,
पण ते स्वीकारण्यात तुझं पौरूष आहे,
सत्ता गाजवण्यात काही मर्दानगी नाही,
ती आहे बरोबरीने वागवण्यात,
बळजबरी करण्यात कसलं आलंय पौरूष?
ते आहे प्रेमाने आपलंस करण्यात,
नसेल तिचं प्रेम तुझ्यावर तर
ते स्वीकारणं ही मर्दानगी आहे.
अरेरावी करणं, अनादर करणं,
म्हणजे तुझ्यातलं पुरूषपण नाही
बाई ही जिंकण्याची वस्तू नाही
बाईला पुरूषाच्या आधाराने जगायला लागू नये.
बाईला सुरक्षित ठेवणं म्हणजे पुरूषार्थ नाही
बाईला वाढू दे मोकळेपणाने
आणि तू वाढतोस तितक्याच मोकळेपणाने
हे जग पुरूषांचं नाही की बाईचं नाही
दोघांचं मिळून आहे.
हे जाणणार्या पुरूषा.......
तू खरा मर्द आहेस!
********
जावेद अख्तर यांची कविता जितेंद्र जोशींचा पोवाडा / कविता इथे ऎकता येईल.
https://www.youtube.com/watch?feature=player_embedded&v=nbZj9YX_IBs
*********
> जितेंद्र जोशींच्या हेतूबद्दल मला किंचितही शंका नाही. पण
ReplyDelete> जोशींनी स्त्रीला देवहार्यात बसवले आहे आणि पुरूषाला तिच्या संरक्षकाची भूमिका दिली आहे.
अनुमोदन.
> तिच्या शरीरावर तिचा अधिकार आहे,
> आणि मनावर देखील,
> हे तुला पचवायला अवघड जाईल,
> पण ते स्वीकारण्यात तुझं पौरूष आहे
मस्त!
अगदी नितळ, निखळच व्याख्या करायची असेल पुरुषाची, त्याच्या पौरुषाची तर...
ReplyDeleteअरुणा ढेरेंच्या ’अनय’ मधून
पुरुष जो क्षमा करून नाही ऋणी करत;
पाठ फिरवून नाही उणी करत;
घेतो समजून, सावरतो, आवरतो, उराशी धरतो;
आपल्या नसलेल्या स्वप्नांसाठीही आपल्या काळजाचं घर करतो.
no words..!!
Deletesahee !!
Deleteही बाईच्या जगात कुठल्याही नात्यानी येणार्या पुरूषाची व्याख्या नाही होऊ शकत. .... हा मित्र, सखा आहे. कदाचित प्रियकर आहे. भाग्याने बाईच्या आयुष्यात आला तर आला..... त्याचं सामान्यीकरण नाहीच करता येणार.
Deleteप्रत्येक पुरूष असा जीवलग नसणारच.
... ही पौरूषाचीही व्याख्या नाहीच होऊ शकणार!!!