Saturday, August 3, 2013

ओझं म्हणजे काय?



ओझं म्हणजे काय? चौकटीतील बंधन? टाळता न येणारी जबाबदारी? का हे सर्वच आणि अजून काही? मला वाटतं ओझं म्हणजे दडपण. मी जेव्हा दुसर्‍याच कुणाच्या, मग ती व्यक्ती असो वा समाज, दडपणाखाली एखादी गोष्ट करतो तेव्हा त्या गोष्टीचे ओझे होऊन बसते माझ्यासाठी.

मी काही चौकटीत वाढलो. काळानुसार, वयानुसार, कुवतीनुसार काही चौकटी बदलल्या; ज्या मला पटल्या त्या मी स्वीकारल्या; ज्या नाही पटल्या त्या मोडायचा (माझ्या परीने) प्रयत्न केला. 

लहान असताना मला हातावर मेंदी काढून घ्यायला आवडायची; पण शाळेत मित्रांचा गट जमण्याच्या वयात आलो आणि हातावर मेंदी परत उमटलीच नाही. साधं कविता आवडणं, गांधी-विनोबा ह्यांच्याबद्दल आदर बाळगणे अशा गोष्टी ह्या कुचेष्टांचा विषय ठरू शकतो ह्याचा अनुभव घेतला.  ‘फक्त मुलांच्या‘ शाळेत शिकताना नाटकात आनंदीबाईंचे काम केल्यामुळे किती हेटाळणी होऊ शकते ह्याची कल्पना करणं बर्‍याच जणांना अवघड जाईल. किशोरवयातील शालेय वर्षात मी पुरूष आहे; किंबहूना मी ‘बायल्या‘ नाही, हे सिद्ध करण्याचे खूप मोठे ओझे घेऊन मी जगलो असे आता जाणवते.
पुरूषाने रफ-टफ, माचो असलं पाहीजे ह्या ठाम समजुतीपायी पुरूषच एखाद्या पुरूषाची प्रचंड मनहानी करू शकतात. आता मेंदी काढावीशी वाटली तर मी जरूर ती हातावर उघडपणे मिरवीन. पण इतक्या वर्षानंतर आता मेंदी काढून घ्यावी ही इच्छाच राहिली नाही.

मी जसा जन्माला आलो त्या जातीच्या, कुटुंबाच्या, समाजाच्या काही रूढी, परंपरा होत्या ज्या मी पाळणे अपेक्षित होते. जेव्हापासून कळत्या, किंवा कमवत्या, वयात आलो तेव्हापासून ज्या रूढी मला पटल्या नाहीत त्या मी पाळत नाही...प्रसंगी इतरांचा रोष पत्करून. मी नास्तिक मनुष्य आहे. धार्मिक परंपरा पटत नसताना पाळणे मला मान्य नाही. साधं घरातल्या इतरांबरोबर उपवास पाळणे ह्या गोष्टीचंपण ओझं बनू शकतं (जर तुम्हाला ते पदार्थ आवडत नसतील तर ;-)). मग प्रश्न येतो तो हा की ‘मी उपवास पाळत नाही‘ म्हणजे मी काही विशेष करतोय का ‘मी आवडत नसतानाही उपवास पाळतो आईला छान वाटावं म्हणून‘ म्हणजे मी काही विशेष करतोय? इतरांच्या प्रेमाचं, काळजीचं पण कधी कधी ओझंच होऊन बसतं...

अजून एक ओझं पुरूषांना जाणवतं ते ‘कर्ता‘ असण्याचं. माझ्या मते मी हे ओझं पण झुगारून दिले आहे निदान काही काळापुरते तरी.

आणि हो. काही ‘आधुनिक ओझी‘ आहेतच: चांगला बाबा होण्याचं ओझं. चांगला जोडीदार होण्याचं ओझं. स्त्री-पुरूष समानतेतला चांगला पुरूष, चांगला मित्र होण्याचं ओझं. ही ओझी अशासाठी की ‘चांगला‘ असण्याची व्याख्या हे कोणी इतर ठरवतात आणि त्याप्रमाणे निवाडा केला जातो. हे दुसर्‍यांच्या अपेक्षांना पुरून उरण्याचं ओझं फारच त्रासदायक. पण हे ओझं लिंगनिरपेक्ष असावं.

शेवटी मला मनापासून पटलेलं एक वाक्य जे ओझं झुगारण्याच्याबाबतीत लागू पडतं असं मला वाटतं :
Be true to yourself. You will stop caring what others think of you when you will realize how rarely they actually do.

- सचिन

7 comments:

  1. मी जे लिहिणार होते त्याचा अर्धवट ड्राफ्ट तुला मिळाला इतकं हुबेहूब मला वाटतंय ते लिहिलं आहेस तू..

    अर्थात पुरुष म्हणून तुला लहानपणापासून जी ओझी बाळगावी लागली ती तुलाच ठाऊक.

    सगळंच पटलं..

    ReplyDelete
  2. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
    अर्धवट ड्राफ्ट लवकर पूर्ण होऊ दे. ;-)

    - सचिन

    ReplyDelete
  3. >> ही ओझी अशासाठी की ‘चांगला‘ असण्याची व्याख्या हे कोणी इतर ठरवतात आणि त्याप्रमाणे निवाडा केला जातो. हे दुसर्‍यांच्या अपेक्षांना पुरून उरण्याचं ओझं फारच त्रासदायक.

    खरंय. आपण आपल्या व्याखेनुसार चांगलं असण्याचं ठरवलं पाहिजे.

    >>इतरांच्या प्रेमाचं, काळजीचं पण कधी कधी ओझंच होऊन बसतं...
    हो. खूपच!

    ओझी झुगारून द्यायला तुला जमलेलं आहे का? :)

    ReplyDelete
  4. >>ओझी झुगारून द्यायला तुला जमलेलं आहे का? :)
    अगदी १००% नाही; पण बरीचशी ओझी झुगारून टाकता आली असे मला वाटते. ’प्रेमाचे/काळजीचे’ ओझे पुर्णपणे झुगारणे शक्य नाही; पण ही ओझीपण एका मर्यादेपर्यंतच पाळावीत असे माझे मत आहे. जिथे माझा जीव घुसमटून जातो अशी स्थिती येईल तेव्हा अशी ओझीपण झुगारूनच टाकीन.

    - सचिन

    ReplyDelete
  5. सहमत.
    अगदी नेमक्या शब्दात लिहीले आहे.
    >> अजून एक ओझं पुरूषांना जाणवतं ते ‘कर्ता‘ असण्याचं. माझ्या मते मी हे ओझं पण झुगारून दिले आहे निदान काही काळापुरते तरी. >>
    हे ओझं किती काळ झुगारता येईल ?

    ReplyDelete
  6. >>हे ओझं किती काळ झुगारता येईल ?
    आमची ’कर्ती’ जोपर्यंत हे ओझं बाळगायला तयार आहे तोपर्यंत ;-)

    - सचिन

    ReplyDelete
  7. ओझं? कुठंय?

    तू आहेसच ना सतत बरोबर! मग कसलं ओझं?

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...