Monday, November 30, 2009

जाणीव

आईची १० ते ६ सरकारी नोकरी.घरात आजी-आजोबांचे वय झालेले.आजी अर्धांगवायुमुळे पूर्णपणे परावलंबी.तिचे सर्व अंथरुणात.अशावेळी आईची होणारी दमछाक मी समजू शकत होते पण तिला मदत करण्याइतकी मी मोठी नव्हते.माझे वय साधारण पाच सात वर्षांचे.बाबा तेव्हा कीर्लोस्कर कंपनीत होते.मला आठवतय तसं ते आईच्या आधी तासदीड तास घरी आधी यायचे कंपनीतून.त्या तासात ते आमच्या रात्रीच्या जेवणासाठीची तयारी करत असत.कणीक मळून ठेवणे,वरण भाताचा कुकर लावणे आणि एखादी भाजी चिरणे,इ.....कधीकधी तर पूर्ण स्वयंपाक देखील तयार असायचा.नोकरी करुन आई घरी आल्यावर बाबांची ही तयारी बघून,तिचा थकवा पळून जाई.हे म्हणण्याचं कारण एवढच की काम ही रोजचीच आहेत.
न संपणारी.......पण अश्यावेळी नुसतं कोणी, आपलं काम हलकं केले तरी पुढची दहा काम ती स्त्री आणखी उत्साहाने करते.आता ते सत्तर वर्षांचे आहेत.घरात सूनही आली आहे. तरीपण त्या दोघींच्या कामात त्यांचा नक्कीच मदतीचा हात असतो.
मला वाटतं स्त्री-पुरुष समानता, कामांच्या समसमान वाटण्या याही पलीकडे जाऊन त्या कामांत मदत करण्यामागे असलेलं प्रेम आणि आपुलकीचा भाग खूप मोठा आहे.स्त्री-पुरुष समानतेपेक्षाही मला अपेक्षित आहे ते एकमेकांना समजणं....मग ते नातं कोणतही असो.....

Wednesday, November 25, 2009

आम्ही

                                  जे मला जाणवतं
                                  तेच खरं आहे,
                                  जे मला सुखावतं
                                  तेच बरं आहे.
                                  हे तुझं सांगणं
                                  "मी" ला सार्वभौम मानणारं
                                  मलाही पटतं.
                                  पण लक्षावधी संबंधांनी
                                  माणसातला मी जेंव्हा
                                  दशदिशा पसरतो,
                                  तेंव्हा आपले रस्ते बदलतात.
                                  कारण मी चं रुपांतर
                                  "आम्ही" त झालेलं असतं.

                                                                ---कुसुमाग्रज
आम्ही सहाजणींनी (आशा, अश्विनी,स्मिता,दीपा, वैशाली,विद्या) मिळून हा ’इंद्रधनु’ blog सुरू केला आहे. आमच्या जिव्हाळ्याच्या विषयावर आम्ही लिहिले आहे आणि लिहिणार आहोत. बाई म्हणून जगताना येणारा कुठलाही अनुभव इथे येऊ शकतो. तो व्यक्त करताना आमच्या पॅलेटवर इंद्रधनुष्याचे सगळेच रंग आहेत. कुठलेही चित्र आम्ही काळ्या पांढर्‍या रंगात काढणार नाही, ते तसे नसतेच, आम्हांला माहित आहे. मिलिन्द आणि नीरज, तुमच्या प्रतिक्रियांचे मोल आम्ही जाणतो, जे आम्हांला आमच्या स्थानावरून दिसू शकणार नाही, ते बघायला तुमची मदत होणार आहे.

आतापर्यंतच्या आपल्या चर्चेत जे जे मुद्दे येऊन गेले त्यांचं स्त्रीवादी आकलन काय असू शकेल हे मांडण्याचा हा प्रयत्‍न.


गोष्ट एका राजकन्येची---- ’ एकेक ओंजळीमागे असतेच झर्‍याचे पाणी’ हे ’असतेच’ चं काय करायचं मिलिन्द?

हे मला ’ठेविले अनंते..’ च्या चालीवर वाटतंय. दुसरे असे झरा म्हणजे शुद्ध,निर्मळ, चवदार असं पाणी समोर येतं. त्याला युगे लोटली तो झरा ओढ्याला मिळाला, ओढा नदीला, नदी समुद्राला... आमच्या ओंजळीत जे पाणी आहे ना? ते समुद्राचे आहे खारट. मीठ खाली ठेवून, यातलं पाणी बाष्प होऊन वर जाईल आणि त्याचा पाऊस पडेल तो खरा आमचा!

वैशाली, पूर्वापार चालत आलेल्या समजुती मुले सहजी स्वीकारत नाहीत असे मला म्हणायचे आहे. ती प्रश्न विचारतात, पण त्याजोगे वातावरण आपण घरी ठेवले नाही तर त्यांना ते स्वीकारावे लागते, मग तू म्हणतेस तसे घडते.

नीरज, "पिढ्यानपिढ्यांचे संकेत असे खोलवर भिनलेले असतात की आपण म्हणजे जणू स्वतंत्र व्यक्ती नाहीच. आपण केवळ समाजप्रवाहाचे सातत्य वाहून नेणारे हमाल"

खरं आहे, असा विचार करू लागलो की हताश व्हायला होतं.

’सध्याची जी स्थिती आहे तो समाजाच्या गरजेतून उत्क्रांत होत गेली आहे’ हा एक आपल्या आवडीचा गैरसमज आहे. समाजाची गरज म्हणजे कोणाची? पुरूष समाजाची?

आणि कसंकशी उत्क्रांत होत गेली स्थिती? सुरवातीच्या भटकणार्‍या समाजात ,मातृसत्ताक पद्धती होती. स्त्री जीव जन्माला घालू शकते त्याचे कुतूहल होते, आदर होता, तिच्या ठायी देवत्व असल्याचा समज होता. मग स्थिर शेतीचा शोध लागला, पशूपालन सुरू झाले, मूल जन्माला घालण्यातील स्वतःचा सहभाग पुरूषाला कळला, मग स्त्रीचे देवत्व गेले. वंशशुद्धतेसाठी स्त्रीवर बंधने लादली जावू लागली, टोळ्यांच्या युद्धासाठी मनुष्यबळ हवे होते, त्यामुळे स्त्रीला पुनरुत्पादनाच्या कामाला जुंपले गेले.ती घराशी बांधली गेली. तिचे क्षेत्र आकुंचित होत गेले नि पुरुषाचे विस्तारित. वरकड कमाई मुळे (पूर्वी रोजचे अन्न रोज शोधावे लागे, साठवणीमुळे) स्त्री रोज घराबाहेर नाही पडली तरी चालणार होते. त्यामुळे घर सांभाळणे हेच तिचे काम ठरले गेले. तिने बाहेर पडू नये म्हणून, तिने प्रतारणा करू नये म्हणून, तिच्यावर आणखी आणखी बंधने लादली गेली. त्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या शोधल्या गेल्या.

ही सगळी बंधने स्त्रीवर निसर्गतः आलेली नाहीत.

दीपा, स्त्री-पुरूषांनी करायची कामे वेगवेगळी समजली गेली, स्त्री म्हणून आणि पुरूष म्हणून वागायचे संकेत समाजाने ठरवून दिले आहेत, त्याप्रमाणेच वागायसाठी प्रत्येक जण धडपडत असतो. मोठेपणी ते अवघड जावू नये म्हणून घरोघरी समांतर शाळा सुरू असतात. त्यांचा अभ्यासक्रम बदलतोय असे जर तुझे निरीक्षण असेल तर ती चांगली गोष्ट आहे. बदल खरा तिथूनच व्हायला हवा आहे.

अश्विनी, खरं आहे देवांमधेही माणसांचे प्रतिबिंब पडलेले दिसणारच (देव झाले तरी माणसाचीच निर्मिती ना?) [देवदेवतांवर पुन्हा कधीतरी नक्की लिहूया]

वैशाली, पूर्वापार प्रथा तशाच चालू राहतात, कारण कोणी प्रश्न विचारत नाही. प्रश्न विचारायचेच नाहीत असे शिकवले गेलेले असते. प्रश्न विचारले की बदल घडतात, जसे की तुझ्याबाबतीत झाले. दुसरे म्हणजे घरातला कर्ता म्हणजे पुरूष, त्याच्या नावानेच सगळे असणार ना? त्याचं घर चालवण्यासाठी म्हणून तो लग्न करून बाईला घरी घेऊन येतो, तिचे काम तेवढेच.

पण आता चित्र बदलतंय,खरं आहे, स्मिता. नव्या सुनेला/ बायकोला नवं घर आपलंसं वाटण्यासाठी काय करायला हवं? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. [पुन्हा कधीतरी यावर लिहूया] मी स्वतः यासाठी खूप वेळ घेतला, स्वतःला खूप त्रास करून घेतला.

आशा, पुरुषप्रधान व्यवस्था पुरुषांचापण पूर्ण विचार करत नाही, खरं म्हणजे त्यांचीपण अडचणच होते, माणसाला आपल्या आवडीप्रमाणे जगण्याची संधीच यात मिळत नाही. कुटूंबासाठी कमावण्याचे (मध्यमवर्गात) प्रचंड दडपण पुरूषावर असते. पुढे कमावता येईल असेच अभ्यासक्रम त्याला निवडावे लागतात. बायको जर त्याच्या बरोबरीची त्याने मानली नाही तर तो एकटा / एकाकी पडतो. शिवाय रडण्याची सोय नाही., भावना मोकळ्य़ा करू शकत नाही, त्याचंही व्यक्तिमत्व खुरटतंच.

खरं म्हणजे स्त्री-पुरूष समानता असणारं, बरोबरीचं नातं किती सुंदर असतं. आणि आपलं आयुष्य ते किती समृद्ध करतं.

तुझा दुसरा मुद्दा पण महत्त्वाचा आहे.

स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने, त्याच्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजविले म्हणजेच तिचा दर्जा उंचावतो का?

नाही. पण तसे समजले जाते. आपल्याकडे काय आहे आशा, प्रमाण हा पुरुष आहे. म्हणजे---- सरासरीने बायकांची उंची कमी असते.(शारीरिक) ----- सरासरीने पुरूष उंच असतात ----असे नसते (खरे , अजूनही चांगली उदाहरणे देता येतील.) . त्यामुळे स्त्रीलाही तसं वाटतं. शिवाय आव्हान देणारी, बुद्धीला खाद्य पुरवणारी, अशी क्षेत्रं पुरूषांची समजली जातात. आपण सगळ्या कामांना समान प्रतिष्ठा कशी मिळवून देणार हा आपल्यापुढचा प्रश्न आहे.

पुढचे, स्त्रियांना कार्यक्षेत्र निवडीचा अधिकार/स्वातंत्र्य मिळाले पाहिजे.

स्त्रीलाच का?  पुरूषालाही.
ही फार अवघड गोष्ट असते.

मी माझ्या इच्छेने हवं ते शिकले. माझा निवडीचा अधिकार / स्वातंत्र्य मी वापरलं.

पण मी आवडीचं शिकले का? तर नाही. आपल्याला येणं आणि आपल्याला आवडणं यात अंतर असतं. अवघड असतं स्वतःची आवड ओळखणं! ती ओळखण्याची संधी आपला समाज आपल्याला देतो का? आपल्या समाजाचे हिरो कोण आहेत ? कुठल्या कामांना प्रतिष्ठा आहे? संधी आहे. समाजाची नैतिक चौकट कुठली आहे? किती उदारमतवादी आहे? आपण कुठल्या काळात जन्मलोय? तेंव्हाचे समाजाच्या पुढचे प्रश्न कुठले आहेत?------------ त्यावर आधारित आपलं निवडीचं स्वातंत्र्य असतं. ते निरपेक्ष नसतंच.

आदर्श समाज तो, ज्यात प्रत्येकाला आपल्या स्त्रीत्व आणि पुरूषत्वाच्या बंधनांपलीकडे जावून आपल्या आवडीचं काम करता येईल.

Tuesday, November 24, 2009

बालपणीच्या आठवणी... (१)

मी अगदी लहान होते. तेव्हा आम्ही कोल्हापूरला एका वाड्यात रहात होते. माझ्याबरोबर खेळायला मालकांचा नातू होता. त्याच्याकडे तीन चाकी सायकल होती. त्यामुळे तो ड्रायव्हर आणि मी कंड्क्टर. (हे ठरलेलेच) मग ताईने उत्साहाने मला गळ्यात अडकवायची तिकीटांची ब्याग करुन दिली. प्रत्येक पैश्यांच्या तिकीटांचा गठ्ठा करुन पुठ्ठ्यावर चिकटवला. (आता एखादे तिकीट जरी हवे असेल तरी शोधावे लागेल.) मग आम्ही तिकीट देत, स्टोप घेत बराच वेळ खेळायचो. तेव्हा पासून तिकडचे परिचीत लोक मला कंडक्टर म्हणून हाक मारायचे.
दोन वर्षापूर्वी पन्हाळ्य़ाला गेलॊ होतो. तेव्हा कोल्हापूरला थांबलो होतो. आवर्जून वाड्याजवळ गेलॊ. वाडा अगदी तसाच. वर जायचा मोह झाला. मालकांच घर पण तसच. आजोबा (वय वर्ष ८८) अगदी तसेच पलंगावर पेपर वाचत बसले होते. मी आत गेले. मी कोण आले आहे हे सांगितल्यावर जोरात म्हणाले, "कंडक्टर ये" आणि मला जवळ घेतलं. मग आनंदला आणि रेणूला आमच्या ड्रायव्हर - कंडक्टर चे किस्से सांगितले. ड्रायव्हर तेव्हा कामावर गेल्याने भेट झाली नाही.
बाहेर पडल्यावर रेणूने विचारले " तू कधीच ड्रायव्हर झाली नाहीस?" मी म्हणलं "नाही, त्याची सायकल होती मग त्यानच ठरवलं" ती लगेचच म्हणाली, "मग तू का नाही तुझ्या आई-बाबांकडून तुला सायकल घेतलीस ?" मी थोडी संभ्रमात पडले. नक्की काय पोहोचतय. अस नकळत ठरवलं जात का, की कंडक्टर होण ड्रायव्हर पेक्षा खालच्या दर्जाच आहे (जस मुलांनी क्रीकेट खेळायच ठरवलं की, ब्याटींग करण्यासाठी भांडणं होतात), का आपल्या प्रत्येक इच्छा या पूर्ण झाल्याच पाहिजेत, काही तडजॊड असू शकते हा मार्गच नाही.

Monday, November 23, 2009

‘पुरुषप्रधानता व स्त्री’ - एक विचारमंथन

एक होती राजकन्या .... वाचून प्रथम वाटले खरचं, आपण सुध्दा किती ’टिपिकल’ विचार करतो. स्त्री आणि पुरूष यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिमा, त्यानुसार कामाची-जबाबदा-यांची विभागणी असे ‘संस्कार’ वर्षानुवर्षे आपल्या मनात रूजलेले आहेत. नकळतपणे का होईना पण या प्रतिमा तयार करण्याला आपणही थोडाफ़ार हातभार लावत असतो का?
तसे आजकाल आपण स्त्रिया, पुरुषाच्या बरोबरीने , पुरुषाच्या क्षेत्रात कामे करत असतो. पण कधीतरी .. काही प्रसंगी.... आता हे काम पुरूषाचे असा विचार आपल्याही मनात डोकावतो किंवा हे काम पुरुषाने करावे अशी अपॆक्षापण आपण करतो. पण असे विचार मनात आले म्हणजे आपण पुरूषप्रधानतेला खतपाणी घालतो किंवा पुरूषप्रधान संस्कृतीला बळी पडतो? का ती आपली त्यावेळची सोय असते?

पुरुषप्रधान संस्कृती जिथे पुरुष केंद्रस्थानी, स्त्रीचं स्थान त्याच्यापेक्षा दुय्यम दर्जाचे. तिचे कार्यक्षेत्र ’चूल आणि मूल’ इतके मर्यादित वगैरे. पण मग स्त्रियांनी पुरुषाच्या बरोबरीने, त्याच्या कार्यक्षेत्रात कर्तृत्व गाजविले म्हणजेच तिचा दर्जा उंचावतो का? प्रत्येक स्त्रीलाच ‘झाशीची राणी’ किंवा ‘किरण बेदी’ बनणे कदाचित आवडणारही नाही. काही स्त्रिया आवडीने आपल्या कर्तृत्वासाठी पारंपारिक क्षेत्रच निवडतील/निवडतात. पण हे कार्यक्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य/आधिकार मात्र स्त्री ला हवा हे महत्त्वाचे! आणि स्त्री ला गृहित न धरता, तिने घेतलेल्या निर्णयाला मान आणि साथ द्यायला हवी पुरुषाने.

मनात येते की ही ’पुरुषप्रधानता’ पुरुषांना तरी पूर्णाथाने सोयीची वाटते का? त्यांच्यावर सतत कर्तेपणाची भूमिका! त्यांना ह्या पुरुषीपणाच्या चाकोरीतून बाहेर पडावेसे वाटत नसेल?

माझ्यामते, ‘पुरुषप्रधानता’ ही स्त्री-पुरुषांची मानसिकता आहे की जी हळूहळू बदलते आहे. स्त्री च्या मानसिकतेमधे जसा फ़रक पडला आहे तसाच पुरूषात ही पडलाच असेल ना! स्त्री बदलते आहे तसा पुरुष ही बदलतो आहेच. ‘चूल-मूल’ हे आता केवळ स्त्रीचेच कार्यक्षेत्र न राहता, पुरुषाचाही त्यात सहभाग वाढतो आहे.

एकंदरितच ‘पुरुष’ केंद्रस्थानी असणे किंवा ‘स्त्री’ केंद्रस्थानी असणे, हे दोन्ही ‘निकोप’ समाज घडवायला मानविणारे नाहीच. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांना पूरक आहेत, हा स्त्री-पुरुष समतेचा विचार समाजात १००% रुजायला अजून बराच काळ जाणार आहे. पण आपण त्याची मुळं रोवायला तर सुरु करु शकतो आपल्या आणि आपल्या मुलांच्या मनात! आणि विद्याने मांडले तसे, प्रथम स्त्री-पुरुषाची लेबल्स काढून ‘माणूस’ म्हणून जगायला शिकूयात का?

Sunday, November 22, 2009

चित्र बदलतंय....

विद्या, आपल्या ब्लॉगवरचा विषय वाचून मन भूतकाळात डोकावतंय... मी जेव्हा लग्नानंतर सासरी आले तेव्हा माझं जग पूर्णपणे बदललं होतं. एका चौकोनी कुटुंबातून मोठा गोतावळा असणार्‍या कुटुंबात मी प्रवेश केला होता. वयही लहान असल्याने खूप गांगरून गेले होते . एक छोटासाच प्रसंग सांगते. लग्नानंतर काही दिवसांनी आमच्याकडे बरेच पाहुणे - नीरजचे मामा, त्यांची मुलं वगैरे जेवायला आले होते . सगळे पुरुष आधी जेवले . मग पाहुण्यांमधल्या बायका जेवल्या. शेवटी मी आणि सासूबाई जेवायला बसलो. नीरजचे जेवून झाल्यावर तो त्याच्या भाऊ - बहिणीबरोबर गप्पा मारत बसला. आणि मी शेवटी जेवून, सगळं आवरत होते. तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं. मला असं वाटत होतं कि मी या घरात आलेली एक नवीन सून आहे कि काम करणारी बाई... जर नीरजने मला आवरताना किंवा जेवायला वाढताना मदत केली असती तर मी पण त्यांच्याबरोबर गप्पा मारायला जाऊ शकले असते. आणि असाच प्रसंग जर माझ्या माहेरी घडला असता तर... जेवून झाल्यावर नीरजने आवरावं अशी त्याच्याकडून कुणी अपेक्षाही केली नसती. हा फरक का? मुलगा जेव्हा लग्न करून एक मुलगी आपल्या घरी आणतो तेव्हा तिला ते घर लवकर आपलंसं वाटायला लागण्यासाठी त्यानेसुद्धा प्रयत्न कारण तितकंच गरजेचं आहे.

पण आता लग्नानंतर ११ वर्षांनी कुठेतरी मला वाटतंय की चित्र बदलतंय... मुलगा असूनही आदित्यला घर सजवायची, व्यवस्थित ठेवायची मनापासून आवड आहे. मी काही नवीन पदार्थ करत असले की तो आवर्जून माझ्याशेजारी येऊन उभा राहतो. "मी करतो तू मला सांग", असं त्याचा आग्रह असतो. नीरज पण, मला खूप काम असलं किंवा मी दमले असेन तर मला खूप मदत करतो. आणि गंमत म्हणजे घरी आलेले पाहुणेसुद्धा तू आमच्याबरोबर जेवायला बस असा आग्रह करतात. मला घरीच आलेल्या या अशा काही अनुभवांवरून असं वाटतंय की स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न पुरुष करत आहेत. आणि हा बदल स्वागतार्ह आहे.

Friday, November 20, 2009

एक आठवण...


अश्विनी, तू जेव्हा भूपाळ्या, पाळणे, जयंत्या याबद्द्ल लिहीलंस तेव्हा जाणवलं खरंच असं का ? माझी एक घरगुती आठवण जरा वेगळ्या संदर्भाची मला एकदम आठवली. मी खूपच लहान होते (२-३ री मधे). त्यामानाने बहिण व भाऊ समजत्या वयाचे. तेव्हाच्याकाळी कुठलीही वस्तू एकच आणून सगळ्यांना कशी वापरता येईल असा दृष्टिकोन. (अर्थात परिस्थिती पण नव्हती) सायकल घेतली ती लेडीज. म्हणजे सगळ्यांनाच वापरता येईल. तेव्हा सायकलवर नाव घातलं जाई. त्यावर नाव घातलं "उमेश जोशी". असं का? असा प्रश्न कदाचित ताईला पडला असेल. मी थोडी मोठी झाले तेव्हा एकदा स्त्रीमुक्ती... वगैरे विषय चालला होता, तेव्हा ह्या प्रसंगाला वाचा फुटली. ताई म्हणाली, "बघ वैशाली सायकलवर उमेश जोशी हे नाव, स्वयंपाक घरातील भांडी आई वापरते, पण नाव "वि. पं. जोशी" आई म्हणाली, "तू उगीच वाकडा अर्थ लावतेस. सगळीकडे एकसारख नाव असलं की लक्षात ठेवायला सोपं जातं. (तेव्हा उमेश जोशी हे नाव का हे मात्रा गुलदस्त्यात राहिलं). मग थोडं मागे गेले. आईच्या माहेरी सगळी भांडी, ट्रंका, धान्याच्या कोठ्या इ. बरच काहीवर "बा. रा. जोशी" हे नाव. तसच वडिलांकडे "पं.के. जोशी" हे नाव. (विद्या इथं मला म्हणायच आहे की पूर्वापार प्रथा तश्याच चालू राहतात का कोणी विचारत नाही). माझं लग्न झालं तेव्हा आनंदचं पुण्यातलं घर नविन थाटलेलं.काही मोजकी भांडी व वस्तू. त्यावर सगळीकडे "वि. स. भिडे" असं लिहीलं होतं. सासूबाई म्हणाल्या, "काही भांडी आपण घेऊयात. तुझ्या पसंतीने घ्यायची म्हणून मी थांबले" मग त्यांना जी आवश्याक वाटत होती त्या सगळ्या भांड्यांची खरेदी झाली. त्या म्हणाल्या "सगळ्यावर नाव व तारीख घाल, बरं असतं". मग मी लगेच भांडीवाल्याला सांगितलं, हं घाला "वैशाली भिडे" (आज मी हे लिहील्यावर परत एकदा त्याभांड्यांवरची तारीख बघितली - ४-१-९६)

Tuesday, November 17, 2009

दिल है छोटासा...बहोत बडी आशा

मागे वळून बघता लहानपणीच्या भातुकलीच्या खेळाचे रुपांतर संसारात कसे झाले हे कळले देखील नाही.लहानपणी मैत्रीणींबरोबर मांडलेला भातुकलीचा हा डाव आज संसारातील डावापेक्षा इतका का निराळा असतो?लहानपणीचा हा सहज, सोपा,खेळ काही वेळा अवघड होऊन बसतो.कोठे जाते ही सहजता? जसजसे मोठे होतो तसतशी आपल्याभोवती असलेली समाजाच्या कर्तव्यांची वर्तुळे वाढतच जातात असे वाटते.आणि आपण या वर्तुळात किती आणि कसे गुरफटलो जातो हे आपल्याला कळूनही,आपण त्यातून बाहेर पडू शकत नाही.आजच्या मुलांचे आजचे भातुकलीचे चित्रच वेगळे आणि आशादायी वाटते.आत्ताच्या मुलांमुलींमध्ये(या अर्थी की मुलगे पण आवडीने भातुकली खेळताना दिसतात.) हे मुलांचे, ते मुलींचे खेळ असे काही वेगळे राहीले नाही.किंबहुना तसे ते मानतही नाहीत.मुलगे भातुकली खेळताना जसे दिसतात, तश्या मुलीदेखील क्रिकेट,ऑफीस-ऑफीस, यांसारखे मुलांचे खेळ खेळताना दिसतात.फक्त अजुनही त्यांचे हे खेळ खेळताना बघणारे आपण मोठे, त्याला बायल्या असे संबोधितो.हे बायल्या संबोधिणे आता या मोठया झालेल्या पुरुषाला सहन होत नाही.कमीपणाचे वाटू लागले आहे.कारण आपल्या डोक्यात अजूनही नाही म्हणलं तरी स्त्री-पुरुषांनी करायच्या कामाच्या चौकटी स्पष्ट आहेत.त्या चौकटी मोडण्याचे सामर्थ्य क्वचितच एखाद्यातच.येथे आपण नक्कीच विचार करायला हवा असे वाटते.येणारी पिढी नक्कीच बदलते आहे.पण आपल्याभोवतीची वर्तुळे मात्र तिच आहेत.अगदी घट्ट, न सुटणारी.....चला थोडे या वर्तुळांच्या बाहेर डोकवूयात..... एकूणच आपण, मोठे खूप भरकन होतो असे वाटते.या मोठे होण्यात विचारांची प्रगल्भता क्वचितच कोणा एकाकडे दिसते.

Monday, November 16, 2009

गोष्ट एका राजकन्येची

मु‍क्‍ता पहिलीत होती ,तेंव्हाची गोष्ट आहे. सुहृद चार-पाच महिन्यांचा असेल. आम्ही खेळत होतो. सुहृद राजा मुक्‍ता राजकन्या. ती हसतच नाहीये. मग तिला हसवायला कोण-कोण आले, ती मात्र गंभीरच. मग राज्यात दवंडी पिटली----जो कोणी राजकन्येला हसवेल त्याला अर्धे राज्य मिळेल आणि त्याचे राजकन्येशी लग्न लावण्यात येईल हो..... ----- चार गोष्टी एकत्र करून मी ती गोष्ट रचली होती. मुक्‍ताला हे नाटक खूपच आवडले. म्हणाली,” चल परत खेळूया". आम्ही पुन्हा खेळायला सुरवात केली. आता मुक्‍ताला गोष्ट माहिती होती. दवंडीपर्यन्त आलो. मुक्‍ता दवंडी पिटायला गेली----जो कोणी राजकन्येला हसवेल त्याला अर्धे राज्य मिळेल आणि त्याचे राजकन्येशी लग्न लावण्यात येईल हो..... आणि ती जर मुलगी असेल तर ती राजवाड्यात राजकन्येची बहिण म्हणून राहिल हो.......----- मी अवाक झाले.
मला हे सुचले नव्हते. इतक्या वर्षात! कितीदा ह्या अशा गोष्टी मी वाचल्या असतील. एक मुलगी हे करू शकेल ही शक्यताच विचारात घेतलेली नव्हती. का?
पुरूषप्रधानता (Patriarchy) ही समाजात इतकी रूजलेली आहे, सवयीची आहे की ती आपल्याला सहज, नैसर्गीक वाटते. आपल्याला घडवणे/ वाढवणे असेच असते की मोठे झाल्यावर आपल्याला एक बाई किंवा पुरूष व्हायचे असते, एक माणूस नाही. लहानपणापासून ज्या गॊष्टी सांगितल्या जातात किंवा गाणी त्यातही असेच असते.(आई बिचारी रडत असेल, बाबांचा पारा चढत असेल) . मालिका, चित्रपट, नाटके .... सगळीकडेच.
मला धक्का बसला कारण मी समजत होते पुरूषसत्तेचा हा कावा माझ्या लक्षात येतो. पण तसे नाही. काही काही गोष्टी माझ्यातही भिनल्या आहेत.

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...