Sunday, September 15, 2013

बाईपणाची ... ओझी...



बाई असणं विसरता येत नाही.
म्हणजे बाई असणं मला नाकारायचं नाही, ते मला नकोसं आहे असं नाही.
माझ्या पुरूषाबरोबर माझ्या बाई असण्याचं काय करायचं ते मी बघून घेईन.
इतर पुरूषांच्या किंवा बायकांच्या किंवा मिश्रगटात मला सहज मोकळेपणाने , माणूस म्हणून वागायचे तर ते शक्य होत नाही.
माझी अपेक्षा अशी आहे की निदान काही वेळा ते विसरता यावं आणि आणि इतर वेळी नाही विसरता आलं तरी त्याचं ओझं होऊ नये.

हे बाई असणं विसरता येत नाही, त्याचं ओझं होतं याचे कितीक प्रसंग मला सांगता येतील.
खूप बायकांसाठी ही ओझी नसतीलही, बायकांनी कसं वागायचं हे मुरवलेलंच असतं ना आपल्यात.

नीटनेटकं बसायचं. आवरून बसायचं. घरातल्या मानाच्या जागा पुरूषांसाठी सोडून बसायचं, माझी आई जेवायला बसताना कायम अर्धी मांडी घालून बसते. म्हणजे एका पायाची आडवी घडी आणि एका पायाची उभी. बायकांनी कमी जागा व्यापायची. लहानपणी मी सगळ्यांच्या नकला करायचे तेव्हा मला कळलं. मी तिच्या मागेच लागले, तू छान मांडी घालूनच जेवायला बसायचंस तर गंमत म्हणजे तिला जमेना. नीट जेवता येईना. अवघडल्यासारखं झालं.
 बायकांनी आपले आतले कपडे दिसत नाहीयेत ना याची काळजी घेत राहायचं. ते वाळत घालायचे ते सुद्धा कुठेतरी लपवून.
पूर्वी नीट डोक्यावरून पदर, मग नीट खांद्यावरून, मग ओढणी व्यवस्थित घ्यायची, हुश्श! आता ते संपलंय, निदान शहरांमधून, शहरातल्या आम्ही वावरतो त्या स्तरामधून.
 पाळी सुरू असेल तर कपड्यांवर किंचितही डाग पडू नये याची काळजी घेत राहायचं. मला कधी कधी वाटतं की क्वचित कधी पडला डाग तर पडू दे की. काही वाटून घ्यायचं नाही. घामाने ओले झालेले कपडे दिसतात. चिखलाने माखले तर थोडा वेळ, घरी परतेपर्यंत चालवूनच घेतो ना. डाग पडण्याचा इतका ताण असतो, मग गडद रंगाचे कपडे घालायचे, ओढणीचे ड्रेस घालायचे.
 आणि माफक हसायचं, गडगडाटी हसू वगैरे बायकांसाठी नाही. पूर्वीतर तोंडावर हात ठेवून हसायचं, हातामागे दडून. मनमोकळं हवं तेवढं हसायचं नाही. नाजूक चालायचं. मान खाली घालून वगैरे
एकूण आत्मविश्वासाचं आणि आत्मसन्मानाचं खच्चीकरण.
 आधी पुरूषांनी जेवायचं मग बायकांनी जेवायचं.
पूर्वीतर पुरूषांनी बाहेरच्या खोलीत थांबायचं, बायकांनी स्वैपाकघरात जायचं.
कुठेही गेलेला असलात तरी वेळेत परतायचं.
काही काम नसताना गावभर हिंडायचं नाही.
बायकांनी चालण्या, बोलण्या, राहण्या, वागण्याचे इतके नियम आहेत ना, त्या म्हणजे कायम डोंबारणीसारख्या दोरीवरून कसरत करत चालत असतात.
 आपण सराईतपणे वातावरणाच्या दाबाचं ओझं घेऊन पृथ्वीच्या पृष्ठभागावर वावरावं, तसं पिढ्यान पिढ्यांच्या संकेतांचं ओझं घेऊन बायका जगत असतात. त्यांना त्याचा पत्ताच नसतो.

बायकांना जी नेमून दिलेली कामं आहेत ती अतिशय कंटाळवाणी आहेत. घर सांभाळणं. हे अतिशय किचकट, वेळखाऊ, तेच तेच असं काम आहे.
 त्यामुळे होतंय काय की घर व्यवस्थित ठेवणं ही बायकांची जबाबदारी आहे. त्याचं ओझं होतं.
घर सजवणं, त्याची मांडणी हे सर्जनशील काम आहे पण धूळ पुसत बसणं, चादरीच्या सुरकुत्या काढत बसणं कंटाळवाणं आहे,
बायकांना त्याचा ताण येतो.

 आणि स्वैपाकघर सांभाळणं, मला त्याची अजिबात आवड नाही.

घरचं, परंपरेनं आलेलं देवाधर्माचं करत राहणं. तेही एक ओझंच असतं.

बायका जेव्हा जमतात, विशेषत: समारंभांमधे तेव्हा दिसणं, कपडे, दागिने यावर बोलत बसतात, तिथे वेळ काढणं अवघड होतं. कदाचित याला ओझं म्हणता येणार नाही.

 हल्ली ना , दात सरळ, रांगेत असले पाहिजेत चं एक ओझं मुलींवर, कदाचित मुलांवरही आहे.

 बायकांवर आणखी एक ओझं म्हणजे त्यांचं वजन नियंत्रणात ठेवणं.
सध्या उच्चमध्यमवर्गीय, मध्यमवर्गीय स्त्रियांना त्यांच्या वजनाचं फारच पडलेलं आहे.
आरोग्याचं कारण आहेच, पण त्यापलिकडेही दिसण्याचं कारण आहेच.
मला जाड असायचं नाही. मिलिन्द म्हणतो, तू पण हे ओझं बाळगतेस.
असेलही.

 आणखी एक ओझं म्हणजे
यशस्वी नवर्‍याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
अगदी ओझं नाही पण अवघडलेपण आहेच.

हो, आदर्श बायको असण्याचं ओझं, आपला नवरा कसा परीपूर्ण आहे हे दाखवण्याचं ओझं, नवराबायकोचं कित्ती छान चाललेलं आहे, हे दाखवण्याचं ओझं,
 नवराबायको मधली वादळं कुणाशीतरी बोलावीत, तर असं अक्षरश: कुणीच नसतं कितीक बायकांना (पुरूषांनांही) , जेव्हा भांडणं आप्तांना कळायला लागतात तेव्हा वेळ निघून गेली आहे अशीच शक्यता असते.

 सार्वजनिक ठिकाणी बायकांसाठी बाथरूम्सची सोय नसते, पुरेशी नाही. त्यामुळे बाहेर पडल्यावर नैसर्गिक धर्मासाठी कुठे जावंच लागू नये याची मुली लहानपणापासून सवय करतात. कार्यालयांमधेही पुरेशी सोय आणि स्वच्छता असतेच असं नाही. त्यामुळे पुरेसं पाणी न पिणार्‍या बायका आहेत. युरीन इन्फेक्शन, आणि संबंधित विकारांचं मूळ बरेचदा या व्यवस्थेत आढळतं.
 आम्ही इंजिनीअरींगला असताना तास सगळे मेन बिल्डींगमधे पण एकुलती एक लेडीज रूम मागच्या इमारतीत असल्याने आम्हांला तिकडे जावे लागायचे. त्यातही व्यवस्था अशी होती की लेडीज रूमबाहेर जिन्याजवळ टॉयलेटस मग १२-१५ मुली आणि ४०० मुलं असं प्रमाण असणार्‍या आमच्या कॉलेजात जाणार्‍या येणार्‍या सगळ्यांना कळणार की आम्ही तिकडे जातोय. कोणी नाही पाहून आम्ही जायचो आणि यायचो.  कोणीही असो, आपल्याला जायचंय तर जावू हे करण्यासाठी आम्हांला वेळ लागलेला, धैर्य गोळा करावं लागलेलं. त्यानंतर मग आम्ही मुलींनी आम्हांला मेन बिल्डींगमधे एक लेडीज रूम किंवा किमान एक टॉयलेट हवं आहे ची मागणी केली होती.
 तर बाथरूमला जाऊन येण्याचा एक कार्यक्रम आणि तो कसा पार पाडायचा याचं बायकांना ओझं असतं.

आपण एकातरी मुलाला जन्म दिला पाहिजे, याचं ओझं बायकांवर असतं.

प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.

 कधी माझ्यावर बलात्कार तर होणार नाही ना? या खोलवरच्या भीतीचं एक ओझं घेऊन बायकांना जगायला लागतं.





******

6 comments:

  1. मी जे लिहिणार होते ते आता इथेच टाकते:

    १. बाईला ड्राईव्हिंग येत असेल तरीही सगळे कुटुंब फिरायला जाताना तिने को- ड्राईव्हरच्या सीट वर बसायचे नाही. ती सीट घरातल्या कर्त्या पुरुषासाठी राखीव असते. मग त्याला ड्राईव्हिंग येत असो वा नसो.

    २. घरात कोणी पाहुणे आले कि पटकन बाईने उठून त्यांच्या पाहुणचाराची तयारी करायची.. मग नातेवाईक कोणाच्याही बाजूचे का असेनात.. किंवा ती बाहेरून कितीही दमून आलेली का असेना..

    ३. घरातल्या कामासाठी पटकन बाईला हाक मारली जाते. मग पुरुष मदत मागणाऱ्या बाईच्या शेजारीच का उभा असेना.

    ४. नवरा/ दीर बाहेरून घरात आला कि घरच्या बाईने लगेच त्याला चहा-पाण्याचे विचारावे, बहुतेक वेळा तर त्यानेच चहा करण्याची ऑर्डर सोडावी..पण ऑफिस मधून आलेल्या सुनेने चहा करण्याची ऑर्डर... ?? (ह्या बाबतीत बऱ्याच जणांचं असं मत असेल कि आता ऑफिस मधून घरी आलेल्या सुनेला चहा करून मिळतो. पण असं असलं तरी ती हक्काने मागू शकत नाही. तिला "चहा मिळेल का" अशी विनंतीच करावी लागते.. किंवा

    ५.बाईने नवरयाला "अहो-जाहो" म्हणायचे. (हे अजूनही दिसते. माझ्याच माहेरी माझ्या आई-वडिलांना माझ्या वहिनीने माझ्या दादाला नावाने हाक मारू नये असे वाटते. त्यांना समजवायला गेले तर "तुला अक्कल नाही; तू गप्प बस" असे सांगितले जाते.)

    ReplyDelete
  2. लेख आवडला. सुरुवातीचा आणि शेवटचा भाग अधिक भावला.
    यादी अजून बरीच लांबवता येईल ना! पण यातील कोणती ओझी सर्वात जड, असह्य होणारी, सर्वव्यापी अशी सांगता येतील? कोणती ओझी झुगारणं तुलनेने सोपं आहे?

    > आणखी एक ओझं म्हणजे यशस्वी नवर्‍याची बायको म्हणून पार्ट्यांना जायचं.
    थोडं समजलं, अधिक स्पष्ट करता येईल?

    ReplyDelete
    Replies
    1. http://kavitanchagaon.blogspot.in/2013/10/blog-post.html

      Delete
    2. यावर बरंच लिखाण झालं आहे.. शोधून टाकते इथे..
      विद्या कविता छान आहे. पण भाषांतरीत आहे असं वाटतंय..
      त्यामुळे पहिलं कडवं अगदीच डोक्यावरून गेलं..

      Delete
    3. कविता भाषांतरीत नाही.

      http://www.esakal.com/Tiny.aspx?K=Q2BTb

      हा लेख वाचून बघ.

      Delete
  3. लिहीलेलं बरचसं पटलं-भिडलं.
    >> प्रौढ कुमारीकांना, परित्यक्तांना, विधवांना आपण स्वच्छ चारित्र्याचे आहोत हे दाखवत बसण्याचं एक ओझं असतं. विवहितांपेक्षा कुठल्याही पुरूषाशी वागताना त्यांना फारच काळजी घ्यावी लागते.

    अगदी खरं आहे. निमशहरी गावात, खेड्यात विवाहितेलाही हे ओझं असतं.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...