Monday, September 30, 2013

द लंच बॉक्स

मला हा चित्रपट खूप आवडला.

ही एका मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी आहे.
शाळेत जाणारी एक मुलगी, ऑफीसला जाणारा एक नवरा, वर राहणार्‍या देशपांडे काकू, आजारी वडील, आई आणि परीक्षेतील अपयशाने आत्महत्या केलेला भाऊ.
 नवर्‍याला आपलंसं करण्यासाठी वेगळं काहीतरी बनवण्याच्या खटपटीत ती.... इला.
तिला नवर्‍याची जवळीक खरोखर हवी आहे का? माहीत नाही.
पण नवर्‍याची मर्जी पुन्हा मिळवण्याच्या प्रयत्नात ..... ती.
जी कुणीही असू शकते.
नवरादेखील ऑफीस आणि काम यात पिचलेला.
नवर्‍याचं कुठे काही अफेअर तर नसेल? ती साशंक! असेल किंवा नसेलही.
पण तिच्या डोक्याला खुराक!

मुंबई
तोच पाऊस, तीच गर्दी, तेच डबे, तीच ने आण, तेच तेच ..... घडत काहीच नाहीये.
दुबारा बारीश शुरू हो सकती है!

गेली बारा की पंधरा वर्षे देशपांडे काकू, आधी कोमात गेलेल्या आणि आता दिवसा छताला टांगलेल्या फिरत्या ओरीयंट फॅन कडे बघत असणार्‍या नवर्‍याची देखभाल करताहेत.

खाली वर राहणार्‍या शेजारणींचं चांगलं सख्य आहे.

खाली वर सुरू असलेल्या संसारातही साम्य आहे का काही?
इलाचा नवराही दिवसा चाकोरीच्या फॅनमधे अडकलेला तर नाही?

काहीच न घडणारे कदाचित खुपसे दिवस!

आणि एक दिवस कधी न घडणारी चूक डबेवाल्यांकडून होते.
इलाने नवर्‍यासाठी तयार केलेला डबा कुणा साजन फर्नांडीस नावाच्या विक्षिप्त समजल्या जाणार्‍या अकौंटंटच्या टेबलावर जातो.
त्याची बायको वारलेली मागेच.
तोही स्वेच्छानिवृत्ती घेऊन नाशिकला जाण्याचं ठरवत असलेला.
अनपेक्षित चवदार जेवणाने तो सुखावतो.

डब्यातून चिठ्ठ्यांची देवाण घेवाण सुरू होते.

अजूनही तेच ते, वेगवेगळ्या भाज्या तयार करणं, डबा भरणं, डबेवाल्याने नेणं, पोचवणं, परत आणणं.
पण आता मनं बदलली आहेत.
तेच तेच असलं तरी त्यात प्रेम मिसळलंय, उत्कंठा आहे, वाट पाहणं आहे.
साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळालंय.

रोजचं चाकोरीतलं जगणं आपण टाळू शकत नाही, आजू बाजूची परीस्थिती बदलू शकत नाही.
प्रेम, आस्था, आपुलकी, शेअरींग याने जगणं बदलून जातं.

कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार होतो.

तोही बदलतो. केवळ शेखमुळे नाही तर नव्या मैत्रिणीमुळे, कधीतरी शेखच्या घरी जाऊन येतो, त्याच्या चुका दुरूस्त करत बसतो. गल्लीतल्या मुलांशी दोस्ती होते.

चित्रपटभर दोघांची भेट अशी होत नाही.

ती एकदाच इराण्याच्या हॉटेलमधे त्याची वाट पाहात थांबते,
एकट्या बाईसाठी असं वाट पाहात थांबणं किती साहसाचं आहे!
(तिचा नवरा कुठेही गेला तरी देशपांडे काकू विचारणार नाहीत पण दुपारभर ही नव्हती तर त्यांच्या चौकशा सुरू.)

चित्रपटाच्या शेवटी तो तिच्याकडे यायला निघतो.
कदाचित भेटेल कदाचित नाही.
दोघे मिळून भूतानला जातील?
कोण जाणे, नाहीच बहुदा.

सगळ्यांनी कामं छान केलेली आहेत. इरफान खान, नवाजुद्दिन सिद्दिकी आणि निम्रत कौर.
संथ, छोट्या छोट्या प्रतिक्रिया टिपणारा सिनेमा आहे.
भारती आचरेकरने नुसत्या आवाजाने देशपांडे काकूंचं व्यक्तिमत्व उभं केलं आहे.

पाहायलाच हवा असा चित्रपट आहे. चुकवू नका.

दिवाळीअंकातल्या एखाद्या जमून आलेल्या गोष्टीसारखा आहे.

5 comments:

  1. < कधीही जाऊ शकणार नाही असा एक भूतान मनात तयार होतो. >

    हाच कदाचित तो सुखाचा निर्देशांक असेल.

    ReplyDelete
  2. साध्या साध्या गोष्टी सांगायला त्यांना कुणीतरी मिळालंय.
    रोजचं चाकोरीतलं जगणं आपण टाळू शकत नाही, आजू बाजूची परीस्थिती बदलू शकत नाही.
    प्रेम, आस्था, आपुलकी, शेअरींग याने जगणं बदलून जातं.

    कोणत्याही स्त्रीची एवढी माफक अपेक्षा.... संपूर्ण सिनेमा या थिमवर..... नात्यांमधले बारकावे टीपत सगळ्यांनीच प्रत्येकाच्या भुमिकेत जीव ओतलेला आहे.

    ReplyDelete
  3. > दुबारा बारीश शुरू हो सकती है!
    मस्त! लेख जमून आलाय.

    > ही एका मध्यमवर्गीय गृहिणीची कहाणी आहे.
    हं. त्या दृष्टीकोनातून पाहता येईल. त्या शिवाय ती आजच्या आपल्या जगात एकटं असण्याऱ्या, थोडीशी आपुलकी, थोडीशी सोबत शोधणाऱ्या, तेवढ्याने फुलून येणाऱ्या प्रत्येकाची प्रातिनिधिक कहाणी आहे.

    > छोट्या छोट्या प्रतिक्रिया टिपणारा सिनेमा आहे
    तेवढ्यासाठी पुन्हा पहायला हवा.

    ReplyDelete
  4. बाईच्या एकटेपणावर मी पूर्वीही लिहिलंय.
    (इथे त्याचंही एकटेपण आहे.)
    सुख दु:ख वाटून घ्यायला कुणीतरी हवं.

    कुणीतरी एक बाई आपल्या मुलीसह आत्महत्या करते.
    ही बातमी ऎकून इला लिहिते, " कशी ती गच्चीवर गेली असेल? मुलीला घेऊन कशी एकेक पायरी चढली असेल? काय सांगितलं असेल लहानगीला. दागिने काढून ठेवताना काय वाटलं असेल?"
    ती स्वत: हा प्रवास मनाने करून येते.
    ते कृतीत आणत नाही, तिला बोलायला कुणीतरी मिळालंय.
    माझं जिणं मला जड झालंय, मला मरावंस वाटतंय, हे सांगायला कुणीतरी हवं ना?
    मग तिथून परत फिरता येतं.

    त्यासाठी ’तो’ च कुणीतरी हवा असतो असं नाही, जिवाभावाची मैत्रिण? तीही चालू शकते.
    देशपांडेकाकू अशा ठळक आहेत, त्यांच्याशी थेट, व्यवहाराचं बोलता येऊ शकतं.
    पण आतलं आतलं नाही.
    ( मित्र मिळालाच नसता तर तिने वर जाऊन देशपांडे काकूंशी बोलून एक संवेदनशील नातं जन्माला घातलं असतं का? कोण जाणे..... खरं माणसं असतात अवती भवती, आपणच हात पसरत नाही, कवेत घेत नाही.)

    म्हणजे ही प्रेमकहाणी आहे, असंही नाही.
    प्रेम आहेच का त्यांच्यात? म्हणजे भेटण्याची ओढ आहे ते आकर्षण आहे? असेल किंचित
    संवाद.... संवादाची ओढ आहे.

    अगदी साने गुरूजी स्टाईल होईल पण गृहिणी एवढा जीव ओतून स्वैपाक करते, त्याला दाद दिली जाते का?
    संसारात छोटी छोटी कौतुकं, दाद, शाबासकी, देतो का एकमेकांना?

    मैत्री करतो का एकमेकांशी?
    प्रेम बहुदा जातंच संपून पण मैत्री केली की ती टिकते, वाढते.

    मैत्री आहे की नाही कसं शोधायचं?
    मुलाबाळांचं, संसाराचं वगळता, विचारांच्या पातळीवर आणि भावनांच्या पातळीवरही आपण एकमेकांशी बोलतो का?
    आठ दहा दिवसांतनं एकदा..... तासभर....
    जगातली सगळ्यात किमती गोष्ट आहे, वेळ देणं.....
    आपण देतो का?


    ReplyDelete
  5. विद्या तुझा लेख आणि तुझीच प्रतिक्रिया.. दोन्ही आवडले.
    मीही पाहिला हा सिनेमा.. तरल आहे अगदी..

    तू एकदा "मित्र:माय फ्रेंड" बघावास आणि त्यावर(सुद्धा) लिहावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.

    (एक निरीक्षण: ज्यांना इंग्लिश विन्ग्लीश आवडला नाही त्यांना हाही मुव्ही आवडला नाही. कदाचित बायका आणि त्यांच्या भावनांना हि एवढीच किंमत आहे समाजात)

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...