Tuesday, July 31, 2012

ओरखडा -- 2


समाजाने सभ्यतेच्या काही मर्यादा आखून ठेवलेल्या असतात. आपण सगळेच शक्यतो त्या पाळायचा प्रयत्न करत असतो. कारण की आपण सभ्य असतो किंवा सभ्य असावं अशी आपली इच्छा असते किंवा सभ्यता आपल्यावर लादलेली असते.
 ही सभ्यता म्हणजे काय? हे आपण ठरवलेले आहे का? नाही. समाजाने ठरवून ठेवलेले आहे. आणि वेगवेगळ्या समाजात सभ्यतेच्या मर्यादा या वेगवेगळ्या असतात. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात त्या वेगवेगळ्या असतात. माझी एक मध्यमवर्गीय मैत्रिण होती. लग्नानंतर ती एका अतिश्रीमंत घरात गेली. तिला सहज, मोकळेपणाने, मोठ्याने बोलायची सवय होती. त्या घरात तर अतिशय हळू आवाजात बोलायची पद्धत. ती तिच्या नेहमीच्या आवाजात बोलायला लागली की घरात इतरांना कळायचं नाही , हिला काय झालंय? (कुठे आग लागली आहे?), त्यांच्या प्रतिक्रियांवरून तिला लक्षात यायचं, हळू आवाजात बोलायला हवं आहे.
 मोठ्याने बोलणं असभ्यपणाचं आहे का? किंवा हळू बोलणं असभ्यपणाचं आहे का? तर नाही. तुमच्या चौकटीत ते तसं होऊ शकतं.

समाजात काही एक पद्धती रूजत आलेल्या असतात, त्या निरपेक्षपणे चूक किंवा बरोबर नसतात. त्याचा किती ताण घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हे आपण ठरवायचं असतं. हे यानिमित्ताने मला सांगायचं आहे.

 चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? असे रागलोभ न दाखवणारे सभ्य असं का समजलं जात असेल?
 मला वाटतं, नाटकीपणा, मुखवटॆ घालून वावरणं हा आपल्या तथाकथित मध्यमवर्गीय मूल्यांचा गाभाच आहे. चांगलं चाललेलं नसेल तरी ते तसं दाखवण्याची आपली धडपड असते. राग काय आणि लोभ काय, या दोन्ही गोष्टी या मुखवट्याला तडे जाऊ देणार्‍या आहेत. ते आपल्याला चालत नाही.

 मी पाहिलेल्या प्रसंगात ती बाई समाजाच्या मध्यमवर्गीय सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत होती.
मी समजा खरोखरच थांबले असते तर काय केलं असतं? याबाबत समाजाची जी मार्गदर्शक नियमावली आहे त्यानुसार मी त्यात पडायला नको, असं आहे, त्यामुळे पडल्यावर मी काय करायचं हे अर्थातच नाही.

 पहिली गोष्ट मला मी सभ्य आहे की असभ्य अशी कुठलीही भूमिका घ्यायची नाही आहे. दुसरं ती जे तडे पाडत होती ते मला घाईघाईने बुजवायचे नाहीत. म्हणजे मी जाऊन तिला ’ तुला काय झालंय? म्हणजे रस्त्यावर तू असं का वागत आहेस? तुला भान आहे का?" वगैरे काहीही बोलणार नव्हते.

 हा रस्त्यावरच्या भांडणाचा अंक संपल्यावर, घरी गेल्यावर कदाचित आपण रागाच्या भरात काय हे वागून गेलो, असं अपराधीपण तिला येण्याची शक्यता आहे/ होती.

 मला तिला इतकंच सांगायचं होतं, "बाई गं, असं चालतं. आपण मोडून पडण्यापेक्षा मुखवट्याला तडे गेले तर चालतात. तू तुझा राग, चीड बोलून टाक, मग तुला शांतपणे यावर विचार करता येईल."

 कदाचित फारसं गंभीर नसेलही, किंवा असेल तर मी ऎकून घेईन. या एवढ्या वाहत्या रस्त्यावर कोणीच नाही मदतीला येऊ शकणारं, असं नको व्हायला. तिला ठेच लागली असती, अपघात झाला असता तर मी धावले असतेच ना? तसंच जर तुझं मन दुखावलं गेलंय तर मी तात्पुरती आहे.

******

पुढच्यावेळी मी असा प्रयत्न करीन.

******


Tuesday, July 17, 2012

वाचकांचे लेख -- छान चाललंय आमचं !!! ( "ओरखडा"वर प्रतिक्रिया)

ह्याच विषयावर खर तर मीही लिहिणार होते.. मध्यंतरी नवऱ्याशी थोडा अबोला धरला होता (खर तर त्या वेळी खूप म्हणजे खूपच राग आला होता) आणि नेमके घरात पाहुणेच पाहुणे येत होते त्या दिवशी..

त्या दिवशी त्या सगळ्यांसमोर सगळ काही छान चाललंय असा अभिनय करण्याचा खूप वैताग आला होता. तेव्हा माझ्या मनात विचार आला कि काय त्रास आहे? नवरा-बायको मध्ये वाद होतात हे त्रिकालाबाधित सत्य आहे आणि ते सगळ्यांना मान्य आहे (उदा. जवळ जवळ ठेवल्यावर भांड्याला भांड लागायचंच!!! हि म्हण). तरीही आमच्यात काही वाद झाला असेल तर तो असा लपवायचा का?? माझ्या सासूबाई पण अध्येमध्ये म्हणतात.. "नवऱ्यात आणि आपल्यात काही वाद झाला तर तो आपला आपल्यात ठेवावा, लोकांना कळता कामा नये" तेव्हा त्यांचा काय राग आला होता. आपणच का गप्प बसायचं नेहमी? बाईनेच का घरच्या अडचणी घरातच दाबून टाकायच्या?? इत्यादी विचार मनात आले होते.

पण.. नंतर शांत झाले तेव्हा मला ते पटले बरेचसे..

आणि मग माझ्या लक्षात आले.. त्या दिवशी "आमच्यात वाद झाला नाहीये" याचा अभिनय माझ्या नवऱ्यालासुद्धा तितकाच करावा लागला होता.. असं नव्हत कि तो पुरुष होता म्हणून येणाऱ्या-जाणार्यांना मोकळेपणाने "आमच भांडण झालंय" असं सांगू शकला.. मग मी विचार केला.. घरात काहीतरी बिनसलंय हे चारचौघात सांगायचा अधिकार/ मोकळीक आपल्या घरात कोणाला असते? तर कोणालाच नाही.. अगदी घरचे मोठे/कर्ते असूनही माझ्या सासू-सासर्यांनाही नाही.मग लक्षात आले, "सगळं काही छान चाललंय" हा सामाजिक शिष्टाचाराचा एक भाग आहे निव्वळ.

चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? तुम्हांला काय वाटतं?>>>

"गृहच्छिद्र कोणाला दाखवू नये" असं म्हणतात.. त्यामागे काही कारण आहे.. माझ्या मते त्याचे कारण आपण किंवा पुरुषप्रधान संस्कृती नसून घरातली चुगलखोर आणि इतरांना बदनाम करायला टपलेली माणसे हे आहे. प्रत्येकाच्या घरात काही अधिक-उणे असते हे जितके खरे आहे तितकेच हेहि कि आपल्या आसपासच्या बऱ्याचश्या लोकांना (ज्यांना आपण विघ्नसंतोषी म्हणतो) अश्या "उण्या" मध्ये फार रस असतो.. इतरांच्या घरातल्या कुठल्याही घडलेल्या घटनेकडे असे लोक चघळायला एक माल-मसाला अश्या दृष्टीने बघतात.. आणि मग गोष्ट षटकर्णी होते. हा सगळा प्रकार टाळण्यासाठी चार-चौघात आपले राग (लोभ मुद्दाम लिहिलेले नाहीये, मला लोभ न दाखवणे पटत नाही आणि त्याविषयी सविस्तर लिहिणार आहे लवकरच) दाखवायचे नाहीत असा सर्वसाधारण शिष्टाचार रुजला असावा.

याखेरीज मीहि कधीतरी "नवऱ्यासोबत भांडण झाले आहे/ मी नाही बोलत ए त्याच्याशी" असं काहीजणांना उघड सांगून पाहिलं. म्हणजे मुद्दाम असं सांगितलं नाही.. पण ..का लपवायचं? आपण काही पाप केलं आहे का? इत्यादी इत्यादी भावनेमुळे मी ते लपवलं नाही. पण त्यामुळे मला विविध अनुभव आले.

१. बरेचजण खुश झालेले दिसले. आमच्यात समेट होण्यापेक्षा त्याचे कोणकोणते गुण मला आवडत नाहीत हे खोदून खोदून विचारून त्यांनी माझ्या रागात भर घालायचा प्रयत्न केला.

२. काही लोकांनी जज ची भूमिका घेतली. आणि स्वत: न्यायनिवाडा करायला बसले. आमच्यातल्या बऱ्याचश्या गोष्टी विचारून घेतल्या आणि तुम्हा दोघांचे चुकले आहे.. दोघांनी अमुक केले पाहिजे.. आता आम्ही समाजाचा एक भाग असल्याने आमचे वर्तन कसे असले पाहिजे यावर तद्दन रटाळ लेक्चरबाजी केली आणि फुकट चहा पिऊन पळून गेले.

३.काही लोकांना (विशेषत: इकडच्या) माझ्यावर बोट ठेवायला कारणच हवे होते. त्यांच्या हातात आयते कोलीत मिळाले. आणि ते मी कशी चूक आहे आणि माझ्या नवऱ्याशी कशी वाईट वागते हे सगळे बोलून यथेच्छ तोंडसुख घेतले. ते जेवढे मला बोलले.. तेवढे बोलण्याएवढा राग तर माझ्या नवऱ्यालाही माझा आला नव्हता. (शेवटी माझी बाजू घ्यायला नवराच मध्ये पडला आणि आमच्या रागाचे प्रेमात रुपांतर झाले).

या सगळ्या अनुभवातून हे शिकले कि थोडा वेळ लागला तरी चालेल..पण आपल्यातले भांडण शांतपणे चर्चा करून आपणच मिटवायचे.. (चोमड्या)लोकांना मध्ये पडू द्यायचे नाही. त्यांच्या हातात कोलीत द्यायचे नाही.

अर्थात.. तुमच्यातले भांडण कुठले आणि तुमच्यावर होणारा अन्याय कुठला ह्यातला फरक तुम्हाला कळला पाहिजे.. घरातल्या गोष्टी बाहेर काय सांगायच्या म्हणून एखादी अन्याय सहन करत बसली तर त्याला काय अर्थ? पण भांडण किंवा वाद शक्यतोवर आपला आपणच सोडवला पाहिजे.

असे दृश्य भररस्त्यात कधी पाहिल्याचे मला आठवत नाही.>>

अभिमानाने सांगायची गोष्ट नाही. पण असे मीही केले आहे. नवऱ्याचा राग आला असेल आणि टू-व्हीलर वर बसले असेल तर गाडी सिग्नलला थांबल्यावर सरळ उतरून भलत्याच दिशेला चालू पडायचे असा त्रास मी त्याला दिलेला आहे. बिचारा "गाडीवर बस" म्हणून माझी मनधरणी करत राहायचा मग. आणि थांबलेले लोक पाहत राहायचे. तसं तर हे खूप बालिश आहे. पण मला गम्मत वाटायची. तू त्या बाईचे/ मुलीचे वय दिले आहेस म्हणून.. नाहीतर मला वाटलं असत तू मलाच पाहिलंय असं करतांना कधीतरी.. ;)

आणखी मला असं वाटलं की मी थांबले का नाही? >>

कारण तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न होता.

अशा वेळी मी किंवा कोणीही काय करायला हवं?>>

मला वाटत जोपर्यंत सिच्युएशन कंट्रोल मध्ये आहे (ते दोघे एकमेकांना शिवीगाळ करत नाहीयेत, मारामारी करत नाहीयेत, भर रस्त्यात उभे राहून एकमेकांची उणी-दुणी काढत नाहीयेत) तोपर्यंत आपण मध्ये पडणहि योग्य नाही.

आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुणाच्याही खाजगी गोष्टीत पडायचं नाही. त्यातल्या त्यात नवरा-बायकोच्या तर नाहीच नाही. >>

दोघांपैकी कोणावरही अन्याय होतोय असं आपल्याला वाटत नसेल तर पडायचं नाही.

मला वाटतं मी थांबायला हवं होतं, काही मदत हवी आहे का? विचारायला हवं होतं. त्या दोघांना कदाचित जवळच्या हॉटेलमधे नेता आलं असतं, चहा घेता घेता मी नुसतं ऎकून घ्यायला हवं होतं.>>

आशा म्हणाली तसं मलाही वाटत कि त्यांना काही मदतीची गरज होती असं वरकरणी वाटत नव्हत.. उद्या तू सार्वजनिक ठिकाणी आहेस आणि तू थोड्याश्याच मोठ्या आवाजात नवऱ्याला काही बोललीस पटकन.. आणि मग एकदम चार लोक येऊन तुला काय झालं असं विचारायला लागले तर तुलासुद्धा कानकोंडच होईल बहुतेक..

समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं.>>

हे मान्यच आहे.. पण ते (कोण)कोणत्या बाबतीत हेही ठरवायला हवं.

--गार्गी

Sunday, July 15, 2012

ओरखडा


आम्ही कर्वे रस्त्यावरून जात होतो. स्कूटरवर होतो, घाईत होतो. एवढ्यात येणारे काही लोक वळून पाहताहेत, थांबून पाहताहेत, असं दिसलं. काही अपघात झालाय की काय? म्हणून बघत बघत पुढे जात होतो.
 दिसले दृश्य ते असे, एक बाई , कामकरी/कष्टकरी वर्गातली नव्हे तर, सुखवस्तू घरातली, कॅप्री आणि टीशर्ट घातलेली, तावातावाने पुढे चाललेली, खूप चिडलेली, वय ३०-३५, तिच्या पंधरावीस फूट मागे  एक पुरूष तिच्याशी बोलण्याच्या पावित्र्यात, तिच्या मागे मागे चाललेला. ती मधेच ओरडून मागे वळून त्याच्याकडे पाहात हातवारे करत रागारागाने काही तरी बोलत होती.
 असे दृश्य भररस्त्यात कधी पाहिल्याचे मला आठवत नाही.
  हे दृश्य माझ्या मनासमोरून जात नाही. मी पुन्हा पुन्हा मागे जाते आणि विचार करते काय झालं असेल त्या बाईला? मध्यमवर्गात सहसा पाळले जाणारे नियम तोडावेत, असं वाटण्याइतपत काय झालं असेल?
 आपल्यावर मर्यादा पाळण्याचं बंधन असतं, काय ते घराच्या चौकटीत, दाराआड, ते ही शक्यतो झोपण्याच्या खोलीतच. असं असताना ती हे सगळे नियम का तोडत असावी?

त्या दोघांचं काय नातं असावं? बहीण- भाऊ तर नसावेत. नवरा- बायको असतील, एकमेकांत गुंतलेले मित्र-मैत्रिण असतील, एकत्र राहणारे मित्र-मैत्रिण असे असेल.

दोष कुणाचा असेल? बाईचा की पुरूषाचा? मला माहीत नाही.
किंवा असं दोघांपैकी एकाकडे बोट दाखवता यायचंही नाही.

मला त्या बाईच्या हिमतीचं कौतुक वाटतंय. "सगळं काही छान चाललंय" च्या अवकाशावर ती ओरखडे काढत चालली होती.
सकाळच्या वेळी नेहमीसारख्या घाईत असणार्‍या कर्वे रस्त्याच्या चित्राला ती फाडत चाललेली!

चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल?
तुम्हांला काय वाटतं?

*****************

आणखी मला असं वाटलं की मी थांबले का नाही?
मी घाईत नसते तर थांबले असते का?
अशा वेळी मी किंवा कोणीही काय करायला हवं?
आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुणाच्याही खाजगी गोष्टीत पडायचं नाही. त्यातल्या त्यात नवरा-बायकोच्या तर नाहीच नाही.
मला वाटतं मी थांबायला हवं होतं, काही मदत हवी आहे का? विचारायला हवं होतं. त्या दोघांना कदाचित जवळच्या हॉटेलमधे नेता आलं असतं, चहा घेता घेता मी नुसतं ऎकून घ्यायला हवं होतं.
समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं.

********************
पुढच्यावेळी मी असा प्रयत्न करीन.

******************

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...