Saturday, November 16, 2013

देव - १

मी एका धार्मिक, परंपरा पाळणार्‍या अशा घरात जन्मले.
आमच्याकडे रोज आई देवाची पूजा करायची. सोवळ्यात नाही पण धूतवस्त्रात.
आमच्या छोट्या घरात देवघर भिंतीला लावलेलं होतं.
सकाळी मी उठायच्या आधी आईची पूजा झालेली असायची.
संध्याकाळी आई देवापाशी दिवा लावायची.
मी आणि माझा भाऊ संध्याकाळच्या प्रार्थना, स्तोत्रे म्हणायचो.
घरात पंचांग असायचंच, चांगला/ वाईट दिवस पाहिला जायचा.
बहुतेक सगळे सणवार साजरे केले जायचे.

आधी देवाला नेवेद्य, नविन कपडे आणले की आधी देवापुढे ठेवले जायचे.
कुंकू लावून आधी देवाला नमस्कार मग घरातील मोठ्यांना अशी पद्धत होती.
आई रोज गाईसाठी पोळी/ नेवेद्य काढायची, रोज चिमण्यांना तांदूळ घालायची,
देवासमोर, दारात रांगोळी असे.

तर असं होतं की देव आहेच.
रामायण , महाभारतातल्या गोष्टी लहानपणीच ऎकलेल्या होत्या.
तेव्हा काही चांगली किर्तने ऎकलेली आहेत.
तिसरी, चौथीत असताना शाळेतून आल्यावर भागवत ऎकायला गेल्याचं आठवतंय.

तिसरीत जेव्हा सगळे स्वातंत्र्यलढ्यातले नेते इतिहासात होते तेव्हा हे देव नाहीत का? असा प्रश्न विचारला होता.
उत्तर मिळालं देव फार फार वर्षांपूर्वी होऊन गेले.
म्हणजे अजून फार फार वर्षांनी गांधी/ नेहरू/ टिळक हे ही देव होतील, असाच विचार करून थांबले होते.

एक कोटी वेळा रामनामाचा जप केला की आपण बोलू ते खरं होतं असं ऎकलेलं.
रोज कितीवेळा रामनामाचा जप करता येणं शक्य आहे?
मग कोटीवेळा म्हणून व्हायचं तर किती वर्षे लागतील, याचा एकदा हिशोब केलेला आठवतो आहे.

चिरंजीव असणारा हनुमान, अश्वथामा कुठे कुठे भटकत असतील, असं वाटायचं.

कोणत्याही माणसाचे पाय अधर असतील तर तो देव, इतकं सोपं होतं.
कधीतरी इरेला पडून कुणाचे पाय अधर आहेत हे पाहात बसलेले आठवतंय.
प्रत्येकाचे जमिनीला टेकलेले. देव बराच दुर्मिळ आहे! परीक्षेला जाण्याआधी आवर्जून देवाला नमस्कार केला जायचा.
’पेपर सोपा निघू दे’ असं मनात म्हणतही असू, बहुदा.

देव या मूर्तीत आहे का? देव म्हणजे काय असेल? असा लहानपणी कधी विचार केलेला नव्हता.
देव आहे, संतांना मदत करणारा, कुठे कुठे , वेगवेगळी रूपे घेऊन अजूनही लोकांना मदत करीत असेल, असं होतं.
काहीही मोठ्यांनी सांगितलं की स्वीकारायचं असंच, देवाला जोडूनच, स्वर्ग - नरक, पाप-पुण्य ते सगळंच स्वीकारलेलं होतं.

(क्रमश:)

1 comment:

  1. मला अगदी लहानपणीचे आठवतं.आमचे घर धार्मिक.आजी आजोबा असताना घरात खूपच सोळंओळं पाळलं जायचं.सगळे सणवार ,सगळ्या पूजा आणि त्या बरोबर येणा-या सर्व चालीरीती...देवघरातील देवाला त्यांच्यानुसार फुले विकत आणली जात.म्हणजे गणपतीला जास्वंद,शंकराला पांढरं फुलं,आणखी कोणाकोणाला त्यात्याप्रमाणे फुलं वाहीली जायची.आजोबा-बाबा मंडईतून न चुकता दररोज फुलपुडा आणत असत.घरातील पूजा चालू असताना घरातील बाईने पारोसे तिकडे फीरकलेले चालायचे नाही.त्यामुळे पूर्वी वाड्यातील एकच खोली असल्याने आजोबा उठायच्या आत आई पहाटे लवकर उठून आंघोळ करायची.आईला या गोष्टीचा त्रास व्हायचा.पण घरात वाद नको,घराची रीत म्हणून ती ते करत गेली.पाळत गेली.आम्ही लहान होतो.सण असेल,एखादी पूजा असेल तर मेहूण जेवल्याशिवाय,नैवेद्य दाखवल्याशिवाय आम्हाला खायला मिळायचे नाही.पण आईला पटत नसूनही ते ती निमुटपणे करत गेली.हीच सवय बाबांची देखील आहे.तेही खूप कडक आहेत या बाबतीत आजही त्यांची पूजा चालू असताना त्यांच्या आसपास गेलेलं त्यांना चालत नाही.पण फरक हा झालाय की त्यांनी ते त्यांचे नियम स्वत:पुरते ठेवलेत.आणि आईनेही घरात त्या बाबतीत काही बदल केलेत. तिचाही देवावर विश्वास आहे.पण त्याचा घरातील इतरांना जाच नसतो.बहुतेक तिला झालेल्या त्रासामुळे का कोण जाणे.तिने नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचे नाही,सोळंओळं अश्या सर्व गोष्टींवर फुली मारली आहे.जो पदार्थ नव्याने घरात बनवला जातो तो आधी घरातल्या लहान मुलाला मग तो देवापुढे ,असं तिला चालतं.आजही घरात सणवार चालतात पण प्रत्येकाच्या सोयीनुसार.म्हणजे घरात गौरी असतात आणि आता माझी भावजय नोकरी करणारी आहे.त्यामुळे तिने त्याची तयारी आदल्या दिवशी रात्री करुन गौरी बसवलेल्या माझ्या आईला चालतात,त्यापुढे मांडले जाणारे पदार्थ बाहेरुन विकत आणलेले चालतात.तिला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. सण कसे करायचे,करायचे की नाही याबाबतीतही तिला बंधन नाही.मला आठवतंय.मी लहान होते.आणि आईची पाळी नेमकी गौरी बसवतात त्या दिवशी सुरु झाली.तिने तश्याच गौरी बसवल्या.हे तिला चालते.बाबा खूप कट्टर आहेत या धार्मिकतेबद्दल पण आईने कधी विरोध करुन, कधी समजावून स्वत:चा त्यामागचा विचार मांडून कोणालाही न दुखवता यातून मार्ग काढला आहे. (क्रमश:)

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...