Sunday, June 30, 2013

कोबाल्ट ब्ल्यू



आम्ही कोलकत्याला गेलो होतो तेव्हा ठाकूरबाडी, टागोरांचं घर पाहायला गेलो होतो. "आत गेल्यावर अगदी शांतता हवी, खाली अंगणात फिरता येणार नाही" असं आम्हांला सांगितलं गेलं कारण आत एका चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं.
 तरूण टागोर दिवाणखान्यात बसून एक कुठलंसं बंगाली गाणं ऎकत असलेले. सूर वाड्यात मिसळून गेलेले. ..... वाड्यात टागोर वावरत असावेत असं वातावरण तयार झालेलं......
 मग कळलं. ऋतूपर्ण घोष रविन्द्रनाथ टागोरांवर एक चरीत्रपट करतोय. त्याचा रेनकोट मला आवडलेला. मग वरच्या गॅलरीतून कोणीतरी सांगितलं म्हणून अंगणात उभ्या असलेल्या त्या माणसाकडे नीट पाहिलं. काळा गॉगल... मोठ्या काळ्या मण्यांची माळ गळ्यात!.......
 ऋतूपर्ण घोष गेले ही बातमी वाचल्यावर ते आठवलं.
आणि मग ऋतूपर्ण बद्दल बरंच काय काय लिहून येत होतं, ते काहीही माहीत नव्हतं.
स्वत:ची लैंगिकता ओळखणं आणि ती स्वीकारणं आणि ती मिरवणं यासाठी त्याला किती झगडावं लागलं.
 ............

मागे एकदा मिलिन्दच्या अमेरिकेतील भावाने त्याच्या तिथल्या बॉसच्या या प्रवासाबद्दल एक लेख लिहिला होता ते आठवलं. आणि एका मोठ्या हॉस्पीटलचा मुख्य तो, ती झाल्यावर ते घरच्यांनी , मुलीने आणि हॉस्पीटलमधे सगळ्यांनी किती शहाणपणाने घेतलं.
..............

वंदनाताई एका पुस्तकाबद्दल बोलताना सांगत होत्या... लैंगिकतेची विभागणी नुसती बाई, पुरूष किंवा गे, लेस्बियन, अशी नाही करता येत. समाजाने ती सोयीसाठी ले्बलं दिलेली आहेत. माणसांच्या लैंगिकतेच्या वेगवेगळ्या शेडस असतात. प्रत्येकाला झगडायला लागत असणार!
............

आणखी एक आठवलं..... त्याबद्दल वाईट वाटतं. माझ्या एका मैत्रिणीची मुलगी एका परजातीच्या मुलाच्या प्रेमात पडलेली, लहान वयात लग्न करून बसलेली, मैत्रिण पूर्णच खचलेली.. मी सांगत होते , यातलं चांगलं पाहा.... ती काहीही ऎकण्याच्या मनस्थितीत नव्हती. मी तिला म्हणाले, " अगं , "मुलाबरोबरच" लग्नं केलंय ना? एवढं काय  " ............  मला आत्ता त्याबद्दल खूपच वाईट वाटतंय. मी ते माझे शब्द मागे घेतेय.
..............

 एका परीचितांकडे गेले होते. तिथे त्यांच्या ओळखीच्या बाई सांगत होत्या. माझ्या भोवती बागडणारी माझी मुलगी, मोठी झाली, ती कधीतरी मला पत्र लिहून आपल्या लैंगिकतेविषयी कळवते, सुरूवातीला मला धक्का बसला मग मी तिला लिहिलं, " तरीही तू माझी मुलगी आहेस आणि राहणार आहेस."
...............
 कोबाल्ट ब्ल्यू वाचताना तो झगडा जरा कळू शकला.
...............

चित्रा पालेकरांनी मुलीबद्दल लिहिलेलं. सुरूवातीला खूप अवघड गेलं. मी विचार करत होते, "वर्गात पहीली येणारी माझी मुलगी, अत्यंत हुशार, गुणी, प्रामाणिक अशी माझी मुलगी जेव्हा तिच्या लैंगिकतेबद्दल सांगते तेव्हा बदलली का? नाही. ती जितकी छान आहे तितकंच तिला आतून जे वाटतंय ते छान आहे. "
..............

नवरा-बायको आणि एक किंवा दोन मुलं असंच कुटूंब केन्द्रस्थानी ठेवून समाजाची रचना केलेली आहे ती बदलायला हवी.

एकाच वेळी आपल्याकडे लैंगिक गरज ही बिन महत्त्वाची, क्षूद्र, पापकारक वगैरे आहे आणि त्याच वेळी समाज तुमच्या लैंगिकतेवर कडक पहारा ठेवून आहे. समाजात रूढ असणार्‍या कित्येक चालीरीतींच्या, नियमांच्या मुळाशी गेलं तर हेच दिसून येईल.
................

कसे आहोत आपण समाज म्हणून? का नाही सगळ्यांच्या लैंगिकता स्वीकारू शकत? का नाही सगळ्यांना सामावून घेत? का चाकोरीत बसवू पाहतो प्रत्येकालाच! माणसांनी मोकळेपणाने श्वास घ्यावा असं का नाही वाटत आपल्याला? परस्परसंमतीनं दोन माणसांनी बंद दाराआड काय करायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्यांचं ते नातं समाज म्हणून आपण सहज स्वीकारूया.
.............

2 comments:

  1. सोनाली कुलकर्णीने ऋतूपर्ण घोषांवर छान लेख लिहीला होता.
    http://www.loksatta.com/viva-news/sad-demise-of-rituporno-ghosh-129400/
    आणि पुढे त्याच अनुषंगाने समलिंगी संबंधांचा उहापोह खालील लेखात केला होता:
    http://www.loksatta.com/viva-news/understanding-lesbians-gay-and-bisexual-persons-135156/
    दोन्ही लेख वाचनीय.

    - सचिन

    ReplyDelete
  2. लेख छान झाला आहे.

    मी या विषयाचा अजिबातच विचार केलेला नाही. करायला हवा.

    मी individualism चा पुरस्कर्ता आहे. (आणि या एका बाबतीत मला अमेरिकेचा कधीकधी मोह पडतो.) समाजातील इतर घटकांना हानी पोचत नाही एवढी काळजी घेऊन बाकी हवी ती मूल्यं स्वीकारण्याचं, हवं तसं वागण्याचं स्वातंत्र्य प्रत्येकाला असायला हवं. आपापल्या लैंगिकतेनुसार वागण्याचं स्वातंत्र्य हा देखील त्याचाच भाग.

    समाजाने, समाजातील आपणा सर्वांनी अधिकाधिक सहिष्णु व संवेदनशील व्हायला हवं आहे.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...