Tuesday, January 15, 2013

भय इथले संपत नाही.....


ओळखीच्या वार्‍या तुझे घर कुठे सांग... या कार्यक्रमाला गेलो होतो. तेंव्हाची गोष्ट.

 मध्यंतरानंतरचा कार्यक्रम सुरू झाला. साडेअकरा वाजले होते. हृदयनाथ सांगत होते........पक्षांची घरटी होती, ते झाड तोडले कोणी.............मी भिऊन अंधाराला, अडगळीत लपूनी जाई,............घर थकलेले संन्यासी.......... मी आणि अश्विनी दोघीच असतो तर हे अर्धवट टाकून निघावे लागले असते. उशीरात उशीरा बारापर्यंत घरी. पण नीरज-स्मिताच्या गाडीतून आलो होतो म्हणून थांबता येत होते. माझी दुचाकी त्यांच्या घरी ठेवली होती. कार्यक्रम संपायला एक वाजेल. त्यापुढे स्मिताकडून माझी दुचाकी घेऊन मी घरी कशी जाणार? म्हणजे आज गाडी त्यांच्याकडेच ठेवावी लागेल. उद्या सकाळी रिक्षा करून जा, गाडी घेऊन या, काय कटकट ना! माझ्याऎवजी मिलिन्द असता तर हे प्रश्न आलेच नसते.

 हे विचार बाजूला ठेऊन मी ग्रेस काय सांगताहेत ते ऎकू लागले. ती गेली तेंव्हा रिमझिम पाऊस निनादत होता....   मेघांत मिसळली किरणे सूर्य सोडवीत होता. एकदा हृदयनाथांनी ’ते मेघांत अडकली किरणे” असं म्हंटलं होतं... ” पंडितजी, अडकलेलं सोडविता येण्याची शक्यता असते. ही मिसळलेली आहेत... दारूत काही मिसळलं.....शराबकी नशा अगर दो दिनमें उतर गयी,, तो वो झुटीं हैI नशा तो उतरनीही नही चाहिये.” .......

 एकनंतर कार्यक्रम संपला. आम्ही परत यायला निघालो..... मेघांत मिसळली किरणे सूर्य सोडवीत होता....... कर्वे रोडवर आलो. अगदी तुरळक पण वाहने होती. मनात म्हणाले, दीडलाही सुनसान नसतो रस्ता. कदाचित मी घरी माझी गाडी घेऊन जाऊ शकेन. पण बोलले नाही, नकोच. पौड फाट्याला नीरजने गाडी पौड रस्त्याकडे वळवली. मी ठरल्याप्रमाणे त्यांच्याघरून माझी दुचाकी घेऊन घरी जाईन अशी त्याची कल्पना झाली होती का? का बरं? इथे इंद्रधनु वर काय काय लेख लिहित असते म्हणून? नीरजला सांगावे का, मला घरी सोड असं. काही बोलले नाही.

 त्यांच्या घरापाशी नीरजने गाडी थांबवली, तो म्हणाला,’ ही एकटी जाईल ना घरी?”  स्मिता म्हणाली,” जाशील ना, गं ” मला त्यांच्या सहज साध्या विचारण्याचे कौतुक वाटले. आश्चर्य पण. .... ”सुबोध दुर्बोध ऎसी कोई चीज नही होती जनाब, आपण ती तशी बनवतो.” मी ’हो’ म्हणाले. मी नाही का म्हणाले नाही?..... मी घाबरते एकटी रात्रीबेरात्री पुण्यातल्या रस्त्यांवरून फिरायला.....भय इथले संपत नाही... हे मी नाकारत नाही, हे सहीनीशी लिहून देण्याची माझी तयारी आहे. पण त्या दोघांनी सहजपणे माझ्यावर जो विश्वास दाखवला होता, त्याचं काय करू? कुंडलिका अवरोहण मी करू शकेन असं जगदीशला का वाटलं असेल? कसा त्याने माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवला? .... ये तो मुझे बढानेवाली चीज है ना? माझा विकास करणारी गोष्ट आहे, ती मला स्वीकारली पाहिजे.
 मेघांत अडकली किरणे असंच असेल माझ्याबाबतीत, सोडवता येतीलही...

  पेट्रोल संपणे शक्य नाही.. परवाच टाकलेय. गाडी कदाचित किक मारून सुरू करायला लागेल.. ठीक आहे. चाक पंक्चर होऊ शकतं... हो. ते कसं टाळता येईल?... पण त्याचा विचारच करायला नको.

 माझ्या मनात रात्री ११/ ११-३० पर्यंत चालेल असं पक्कं आहे, फारतर बारा, तेही एकदाच मावशींकडे नागपंचमीचे खेळ पाहायला गेलो होतो तेंव्हा. ते गणपतीचे दिवस होते, रस्त्यावर वर्दळ होती. रंगत चाललेला कार्यक्रम सोडून आम्ही पावणे बाराला निघालो होतो, तेंव्हाही अश्विनीच सोबत होती. आता दीड!!!!!!   म्हणजे त्या वेळेचीच भीती वाटत होती. बारा आणि दीडमधे काय फरक पडतो?  
 अश्विनी मागे बसली, त्यांच्या गल्लीपाशी म्हणाली,’इथेच सोड’ आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिले आणि कळलेच सगळे. ” पोचलीस की मिस कॉल दे” 

 मी गुजरात कॉलनीत शिरले, त्या वळणावळणाच्या रस्त्यावरून मी कितीदा येते / जाते. आत्ता कुठल्या वळणावर काय दिसेल? भीती वाटायला लागली, तिला मी पोटातून वरतीच येऊ देत नव्हते. मी सुसाट गाडी चालवत होते, एकदम ब्रेक लावायची वेळ आली तर?... हा मधला काळ मला शक्य तितक्या लवकर संपवायचा होता. सुनसान रस्ते, रस्त्यावरचे पिवळे दिवे, घरांघरांत अंधार..... अंधार चुकावा म्हणुनि.... ही दुनिया वेगळी आहे, अपरिचित आहे. .... दगडाच्या बैलाला अंधाराची शिंगे..... बधाईच्या इथलं वळण आलं... चला इथून पुढे रस्ता तरी रुंद आहे..... ऎरवी नुसती इथे तिथे फिरणारी अपरीचित माणसे किती बळ देत असतात. ..... गेटसमोर गाडी थांबवली, वॉचमनने घाईने दार उघडलं, गाडीवरच्या स्टीकरकडे नजर टाकली. मी आत गेले. गाडी लावली. दारासमोर उभी राहून बेल वाजवली .... इतकं बरं वाटलं. मिलिन्दने दार उघडलं. आत आले, घरी पोचणं किती सोपी गोष्ट होती, मी किती घाबरले!

 नंतर अश्विनीशी बोलले तर म्हणाली,” तुला म्हणाले खरं, इथेच सोड असं, पण घरी पोहचेपर्यंत मीही घाबरले होते. प्रत्येक बिल्डिंगच्या मागे कुणी मुलं तर उभी नसतील ना? ती एकदम समोर तर येणार नाहीत ना? असंच मनात येत होतं. ..... भय इथले संपत नाही...

 कशाचं आहे हे भय? कुणी इतकं रूजवून, मुरवून ठेवलंय आमच्यात? खोल शोधलं तर हे अपरिचित पुरूषांचं भय आहे, आणखी चिरफाड केली तर ही विनयभंग , बलात्काराची भीती आहे. आपण पेपरमधे कसल्या कसल्या बातम्या वाचतो ना? काही झालं तरी रात्री दीडला एकटं फिरणार्‍या बाईचाच दोष असणार. ती high risk rare possibility होती. म्हणजे खोल दरी आहे, वरून नेहमी मारतो तशीच दोन-अडीच फुटांची उडी मारायची आहे, सहज जमणार आहे, जर का तोल गेला तर मरणच.

 मरण का पण? मी आणि मिलिन्द एकदा बोलत होतो. बलात्कार झाला तर त्या बाईची काहीच चूक नसते. एक अपघात झाला समजायचं आणि सोडून द्यायचं. विचारांनी सरळ आहे, प्रत्यक्षात मात्र तुम्हांला चिरडून टाकणारं आहे.....भय इथले संपत नाही... बायकांना असंच वाढवलं जातं ना, आयुष्यात तुम्हांला काय शिकायचंय, कोण व्हायचंय यापेक्षा महत्त्वाचं तुमचं पावित्र्य जपायचंय. हे माझ्या जीवावर मी सांभाळूच शकत नाही, ते मला माझ्या नवर्‍याच्या, ज्यांच्यावर विसंबू शकेन अशा इतर पुरूषांच्या मदतीने, उरलेल्या असंख्य पुरूषांच्या भरवशावर सांभाळायचे आहे. रात्री दीड वाजता नेहमीच्या रस्त्यावर पाच मिनिटे गाडी चालवणे यांसाठी कुणा पुरूषाची मदत लागत असेल तर मला समानता हवी म्हणण्याचा काही अधिकारच नाही. माझं स्थान दुय्यम आहे आणि मी ते स्वीकारायला हवं. ते मला स्वीकारायचं नसेल तर परीणामांना तोंड देण्याची माझी तयारी असायला हवी. 

 कसल्या समाजात जगतो आपण?? जिथे बायकांसाठी रात्रीची संचारबंदीच आहे, सतत सतत ५०% माणसं भीती मनात बाळगून जगताहेत?

 रूकैय्या हुसेनचं ’सुलतानाज ड्रीम्स’ अशी दीर्घकथा आम्हांला अभ्यासाला होती. त्यातला एक सवाल बिनतोड होता. जर जंगली श्वापदांपासून आपल्याला भीती असेल तर त्यांना पिंजर्‍यात ठेवायचे की आपणच पिंजर्‍यात राहायचे? विसाव्या शतकाच्या सुरूवातीला तिने ही कथा लिहिली आहे. 

...... भय इथले संपत नाही...... हे वास्तव तर आहेच. पण वेळच आली तर त्याला वळसा घालून जाता येईल हे शिकले.

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...