Friday, March 15, 2013

कसं सांगू?


मुक्ताला नाचाच्य़ा वर्गाला सोडायला गेले होते. एका बंगल्यांच्या सोसायटीतला हॉल! जरा लवकरच गेलेलो, अजून कोणी मुली आल्या नव्हत्या, ताई आल्या नव्हत्या. हॉलचं दार किलकिलं. बाकी आजूबाजूला कोणी नाही, रस्ता सुनसान. संध्याकाळी पावणेसहाची वेळ असेल. मला पुढे कामं होती. " जाऊ का गं? " तर " जा " म्हणाली.
 येतीलच मुली एवढ्यात असा विचार करून निघाले. "मुली येईपर्य़ंत बाहेर बाकावरच बसून राहा."
मग वाटत राहिलं, एवढं काय कामाचं? अगदी कोणी नव्हतं, सोबत थांबायला हवं होतं. नंतर वाटलं असू देत, एवढं तरी काय?

   रात्री बोलणं चाललेलं.. एकदम मला ते आठवलं. " आल्या का मैत्रिणी लगेच?"
" दहा मिनिटांनी आल्या असतील."
" तोवर बाहेरच थांबलीस ना? "
" नाही. आत जाऊन घुंगरू बांधले. एक काका हॉल झाडत होते."
" ते एकटेच आत होते?"
" हो. आमच्या ओळखीचे आहेत ते. "
ओळखीचे म्हणजे कधी कधी हॉल झाडताना पाहिलेले.
एकूण परिस्थिती माझ्या लक्षात आली, आजूबाजूला कोणी नाही, एकटा हॉल, आणि नेहेमी साफसफाई करणारा कुणीतरी माणूस...
मी शक्यतो आवाज नॉर्मल ठेवत म्हणाले, " तुला मुली येईपर्य़ंत बाहेर बाकावरच बसायला सांगितलं होतं ना?"
" अगं, घुंगरू बांधायला वेळ लागतो. बाहेर बसण्यापेक्षा ते कामं झालं ना?"

मला कळलं, मला जे वाटतंय ते काहीच हिला कळत नाहीये. भीतीची एक लहर माझ्या अंगातून गेली....
ही तशीच....
माझी भीती मला ट्रान्सफर करायची नव्हती, तिने घाबरू नये हे ही समजत होतं.
पण राहवेना. कसं सांगू?
जगाबद्दलचा अविश्वास तिच्या मनात तयार व्हायला नको आहे.
तो बिचारा माणूस चांगला असेलही, होताच.
पण काळजी घ्यायला तर शिकवायला हवंच आहे ना?
आईने मला सांगितलं तेच मी सांगणार आहे का?
तोच पाया आहे? स्त्रियांचं जग आणि पुरूषांचं जग यांच्यातल्या नात्याचा?
आईचं किती बरोबरच होतं असं वाटायला लागलं.
आईने दिलेल्या चष्म्यातून पुरूषांकडे पाहायचं मी नाकारलं, पण सावध तर राहिलेच. काळजी तर घेतच आले.
पवित्र-अपवित्र, नैतिक-अनैतिक जाऊ दे, माझ्या किंवा कुठल्याही बाईच्या इच्छेविरूद्ध कुठल्याही पुरूषाने तिला स्पर्श करायलाच नको.

कदाचित आईने थेट सांगितलं, तेच मी वळसे घेऊन सांगितलं.
तिला जवळ घेतलं आणि म्हणाले,
" अगं तो माणूस तिथे एकटाच, तू एकटीच, मला भीती वाटली. त्याने कुठे अंगाला हात लावला असता, आणखी काही केलं असतं.
ओळखीचा असो अगर अनोळखी असो, कुठल्याही पुरूषाने तुला नको तिथे हात लावला किंवा काही केलं तर काय करशील?
एकतर तिथून पळत आधी बाहेर यायचं, आणि ओरडायचं मोठ्यांदा, चालवून घ्यायचंच नाही. प्रतिकार करायचा. कोणीतरी मदतीला येतंच.
आणि तो कोणीही पुरूष असला ओळखीचा अगर अनोळखी, तरी मला सांगायचं. त्याचं काय करायचं ते मी पाहीन."

एकदम उंचीने वाढलेल्या, निरागस असणार्‍या माझ्या मुलीची काळजीच वाटायला लागली.

गौरी देशपांड्यांच्या एका कादंबरीतील वाक्यं आठवली......
... माझ्यावर बलात्कार झाला तर मी तो एक अपघात समजेन, त्यातून बाहेर येईन. पण माझ्या मुलीकडे कोणी पाहिलं ना तर त्याचा मी खून करीन.

निसंशय! मला हेच वाटून गेलं.
7 comments:

 1. स्मृती माझ्यात इतकी गुंतली आहे की शाळेत शिकवताना ती सतत आई आत्ता काय करत असेल? याचाच विचार करत बसायची. एखाद्या मैत्रीणीशी खेळायला तिच्या घरी जातानाही ती मला तिच्या हॉलमध्ये बस म्हणायची आणि ती स्वत: आत तिच्याबरोबर खेळायची.तासन्तास आम्ही हेच करायचो गेले अनेक वर्षे. तिला तिच्या स्वत:च्या प्रगतीसाठी यातून बाहेर काढायला हवे. गेले अनेक वर्षे यासाठी मी प्रयत्न करत होते.यावर्षी पहील्याम्दा शाळेच्या मुक्कामी सहलीला ती गेली. आता बॅडमिंटन आणि पोहणं जोरात चालू आहे. जिथं तिथं आई लागत असणारी स्मृती, माझ्याशिवाय तिचं हे मोकळेपण आनंदाने साजरं करते आहे.मी तिला समोरच्या ग्राउंडवर गेटपाशी खाली सोडते आणि ती दुस-या मजल्यावर असणा-या बॅडमिंटनच्या हॉलकडे एकटी जाते. तसेच स्विमिंगचे. शाळेतून रीक्षाकाका परस्पर तलावावर सोडतात. मी तासाभराने तिला आणायला जाते.तिच्यात आता एवढा आत्मविश्वास आला आहे की सगळ्यांना सांगत सुटते की मी या सगळ्या गोष्टी एकटी करते.मला आई नाही लागत आता. खूप छान वाटतं तिला अशी बघून.
  मागच्या आठवड्यात त्या बॅडमिंटनच्या ग्राऊंडवरचा वॉचमन आमच्या सोसायटीत आला होता.मी काहीतरी आणायचे म्हणून बाहेर पडत होते.तो माझ्यापाशी आला आणि म्हणाला ताई तुमची मुलगी येते ना समोर? मी म्हणाले का? नाही मी बघतो तिला दर वेळी. मध्ये नव्हती दोन दिवस?हो. बुडवला क्लास तिने. तुम्ही कोण? तुमचे नाव? काय करता समोर? असे प्रश्न मी त्याला विचारले. मी त्याला झापू नाही शकले. कारन जर का त्याने डूक धरलं तर.....काय करावे या चिंतेत होते. आणि स्मृतीशीच बोलू या असे ठरवले.कालचाच कीस्सा पोहण्याच्या तलावावर मुली जेथे कपडे बदलतात तिथे काहीतरी कामासाठी सिमेंतची पोती ठेवली आहेत. काल स्मृती मला म्हणाली आई सिमेंटची पोती आहेत तर मी कपडे कसे बदलू तेथील माणसं म्हणतात इथं आत नाही यायचं आमची पोती ओली होतील. म्हणजे जिथे या मुली कपडे बदलतात त्याजागी पोती असल्याने कामगार येत जात असणार. मी स्मृतीला काय आणि कसे सांगू या विचारात आहे. पण मी बोलीन तिच्याशी आणि त्याजागी ती पोती न ठेवण्याबद्दल ऑफीसमध्येही बोलीन.
  आता मी बुचकळ्यात पडले आहे. माझ्यापासून दूर स्वत:च्या आत्मविश्वासाने स्मृती स्वत:च्या पायावर उभी राहू पहात आहे त्याचा आनंद मानू की काळजी?

  ReplyDelete
 2. दोन्ही प्रसंगांमध्ये सफाई करणारा, वॉचमन अशी माणसे आहेत.
  मुलांच्या मनात वर्गीय समीकरण (class based profiling) रुजणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. हो.
   पण खूप ओळखीचे, आदर वगरे वाटावा असं कुणी असलं तरी सांगायचं.
   हे ही सांगितलंय.

   Delete
 3. हे सगळं मी मुलीबरोबरच तिच्याच वयाच्या माझ्या मुलालादेखील सांगते. शाळेसाठी लागणारं सामान किंवा दूध-ब्रेड सारखं काही त्यांना मुद्दाम आणायला पाठवते, त्यांनी धीट व्हावं म्हणून, अगदी घराजवळच्या दुकानातच. पण मुलगी एकटी जाते तेव्हा मनावर जाणवेल इतपत दडपण असतं. एकूण परिस्थिती बघता यावर उपाय दिसत नाही !!

  ReplyDelete
 4. आपल्या आया पण आपल्या वेळेला किती धास्तावलेल्या असतील ना?

  ReplyDelete
 5. >> त्याचं काय करायचं ते मी पाहीन
  ज्या पद्धतीने समजावून सांगितलंस ते आवडलं

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...