Tuesday, March 30, 2010

जरा विचार करू या -- १

बाई घरात/ कामात इतकी का गुंतून असते? पुरूष का नसतॊ?

मी यावर जरा विचार केला, कुठल्या निष्कर्षाला पोचले असे नाही, सर्व बाजूंनी तपासून पाहिलंय असंही नाही. जो विचार केलाय तो तुमच्यापर्यन्त पोचवावा असं वाटलं. आपल्याला मिळून काही ठरवता येईल का बघूया.

आपण जेव्हा इतरांच्या घरी जातो तेव्हा त्यांच्या घरी केलेल्या मदतीचं आपल्याला ओझं वाटत नाही. सांगतील ती मदत तशीच/ तेव्हढीच करायची. आपल्या घरी काम वाटतं कारण केलेलं सगळं पुरेल (फार उरणार नाही ना?) ना? आवडेल ना? ही जबाबदारी आपली असते. कुणाला जेवायला बोलवायचं ठरवलं तर फक्त स्वैपाक करणं एव्हढच काम नसतं तर, कुठले कुठले पदार्थ करायचे हे ठरवावं लागतं, येणार्‍यांना काय आवडेल याचा विचार करावा लागतो, त्यांची काही पथ्ये असतील तर ती लक्षात ठेवावी लागतात एव्हढंच नाही तर मागच्या वेळी त्यांना बोलावलं होतं तेव्हा जे केलेलं असेल तेच परत करायचं नाही हे ही लक्षात ठेवावं लागतं. सुगृहिणी होणं काही सोपं नसतं. किती वेळ जातो हा सगळा विचार करण्यात! गुंतून पडतो आपण. (चांगलं म्हणवून घ्यायची चटक लागते.)
म्हणजे मला म्हणायचंय नुसतं पोळ्या करायचं काम करायला काही वाटत नाही कारण त्यावेळी मी मला हवे ते वेगळे विचार करू शकते.त्यात विचार करण्याचा वेळ जात नाही. कोणी ठरवून दिलेलं काम करणं सोपं आहे, जसं की पुरूष करतात.

हे एक उदाहरण झालं, याशिवाय आणखी किती गोष्टी असतात! कुठल्या कुठल्या कार्यक्रमांना जायचं असतं. (लग्न, मुंज, वाढदिवस वगैरे) मग तिथे आहेर काय द्यायचा याचा विचार करावा लागतो, योग्य, साजेसा, दिखाऊ नसलेला, त्या व्यक्तीला आवडेलसा,(आपण ठरवलेल्या किंमतीचा) किती वेळ जातो या सार्‍यात? सगळे आपल्या जवळचे असतात असं नाही, जवळच्यांसाठी विचार करण्यात वेळ गेला तर वेळ घालवला असं वाटत नाही, तेव्हढा वेळ आपण त्या व्यक्तीसोबत असतो मनाने. पण इतरांसाठी ते काम होऊन बसतं आणि आपण गुंतून पडतो.

आपल्या रूढी-परंपरा पण बायकांना फार गुंतवून ठेवतात. ज्यांच्या घरी सगळे सण साजरे होतात त्या घरात बाईचा पिट्टा पडतो. सण साजरे करताना विचार करावा लागत नाही. तेच तेच त्याच पद्धतीने करत राहायचं. त्याचाही कंटाळा येतो, विचार न करता का त्याच पद्धतीने वागायचं?

एखाद्या घरात वर्षानुवर्षे सासू जर घरातले/स्वैपाकघरातले सगळे निर्णय घेत असेल त्या सुनेच्या हातात काहीच अधिकार नसतील तर तिने काय कायम सांगीतलेली कामे करत राहायची?

मी तयार केलेल्या जाळ्यात पुरती फसत चालले आहे.

एकीकडे मी म्हणतेय की निरर्थक कामांचा विचार करण्यामधे गुंतायचं नाही आणि दुसरीकडे म्हणतेय की जी कामे बायका/ आपण करतो त्याचे अधिकार आपल्याकडे पाहिजेत, म्हणजे ते नीट विचार करून ठरवणे आलं.

काय करायचं अशावेळी?

शिवाय हा सगळा विचार करण्याचा वेळ वाचवून त्यात तरी काय करायचंय? (कुठे दिवे लावायचेत?)

*********

लग्न झाल्यानंतरची पहिली दोन-तीन वर्षे वगळता बाकी सारा काळ वरच्या सगळ्या गोष्टी मीच पाहते आहे. म्हणजे मिलिन्द सुचवतो, मदत करतो पण जबाबदारी माझीच असते. मला वाटलं ही जबाबदारी मिलिन्दने पण घ्यायला पाहिजे. मग एके दिवशी मी त्याला सांगीतलं, तुझ्या नातेवाईकांकडे काही कार्यक्रम असेल तर सगळं तू पाहायचंस, माझ्या नातेवाईकांचं मी बघीन. मीसुद्धा सुचवीन, काही आणायचे झाल्यास आणीन, मदत करीन पण ठरवायचं तू. मी त्यावर विचार करणार नाही. (खरं म्हणजे इतक्या वर्षांनंतर त्याचे अन माझे नातेवाईक इतका काटेकोर फरक राहिलेला नाही, त्याचे नातेवाईक येऊन तो नसला तरी माझ्याशीच मनसोक्त बोलून वर तुझ्याशीच बोलायचं होतं, असं म्हणून जातात आणि उलटही होतं.)

मी असं ठरवल्यावर काही दिवसांनी त्याच्या एका नातेवाईकाचा फोन आला, ’सत्यनारायणाच्या प्रसादाला या’ असा. फोन मीच घेतला. मिलिन्दला निरोप सांगीतला. शिवाय हे ही सांगीतलं ’ त्यांनी नुकतंच घर घेतलयं, त्यामुळे सत्यनारायण असावा, त्यांच्या घरासाठी काही घ्यायचंय का ते ठरव.’ मिलिन्द म्हणाला,’ त्यांनी फोनवर असं काही सांगीतलं का?नाही ना? मग कशाला न्यायचं?’ मी म्हणाले,’बघ बाबा, मला तरी वाटतयं’ मिलिन्दने ठरवलं काही भेटवस्तू न्यायची नाही. तिथे आलेल्या बाकीच्या सगळ्या नातेवाईकांनी काहीतरी भेटवस्तू आणलेली होती. मी तर निर्विकार चेहर्‍याने वावरत होते, मी माझ्याकडून मिलिन्दला सांगीतलेलं होतं. (मिलिन्द तर माझ्यापेक्षा पोचलेला आहे.)

घरी आल्यावर माझ्या लक्षात आलं, आमच्यात काय ठरलंय हे नातेवाईकांना काय माहित? ते तर ’विद्याला सुचलं नाही’ असाच विचार करणार ना!

**********

1 comment:

  1. माझ्या नजरेसमोरची दोन उदाहरणे आधी मी तुम्हाला सांगू इच्छिते.एक उदाहरण म्हणजे माझ्या आई बाबांचे. माझ्या बाबांना प्रत्येक घरगुती कार्यक्रमात निर्णय घ्यायला, त्यात सहभागी व्हायला आवडते.त्याचे प्रमाण इतके आहे की त्याचा माझ्या आईला मनस्ताप होतो. म्हणजे एखाद्याला भेटवस्तू द्यायची असेल तर नुसत्या आईने निर्णय घेतलेले त्यांना चालत नाही.मग ते नातेवाईक आईकडचे असोत कींवा बाबांकडचे...प्रत्येक वेळी त्यांना विचारुनच काय ते फायनल ठरवायचे असा नियमच आहे. या स्वभावाचा आयुष्यभर आईला त्रासच होतो.घरातला किराणा,मंडई, अश्या अनेक गोष्टी की त्यामध्ये बाबांच्या सहभागाने (आईच्या भाषेत लुडबुड )त्यांच्यात वादच होतात. आता तुम्ही म्हणाल कसे?तर आई नोकरी करताना ह्याच कामात बाबांचा सहभाग होता. तेव्हा ती नोकरीहून दमून आल्यावर बाबांनी केलेली हीच लुडबुड तिला मदत वाटायची. पण आता दोघेही रिटायर झालेत तर हीच मदत आता तिला लुडबुड वाटते.म्हणजे आई नोकरी करत होती तेव्हा आणि रिटायर झाली तरी बाबांचा रोल हा तोच राहीला.पण आईचा त्यांच्याकडे बघण्याचा द्रुष्टीकोन बदलला.ही झाली एकाच प्रसंगाची बाबांची बाजू.याउलट आईच्या द्रुष्टीने विचार केला तर मी म्हणीन की आई नोकरी करते तेव्हा कींवा आत्ता रीटायर झाली तेव्हा देखील बाबांच्या मदतीचा भाग हा प्रमाणापेक्षा जास्त झालेला तिला चालत नाही. मग ती मदत न रहाता लुडबुड होते.आणि त्यांचा तिच्या कामात प्रमाणापेक्षा दखल देणे हे वादाचे कारण बनते. म्हणजे एक उदाहरण सांगते की बाबांनी मंडई आणली की त्यांनी आणलेल्या भाज्या आईला कधीच पटत नाहीत.हीच का भाजी आणली पासून ती एवढ्या प्रमाणात का आणली आणि एवढ्याची का आणली वैगरे वैगरे......असे आणि अश्या पद्धतीचे आमच्या आई बाबांसारखे असंख्य जोडप्यात रंगलेले नाटकांचे प्रयोग आज अनेक घरात होताना दिसतात वर्षानुवर्षे.या रटाळ विषयावरच्या भांडणाचा कंटाळा कसा येत नाही ह्या सगळ्यांना कोणास ठाऊक.हे लहानपणापासून मी बघत आले माहेरी.याबाबतीतले कौस्तुभचे वागणे मला योग्य वाटते.आमच्या घरात त्याची लुडबुडही नाही आणि मदत ही नाही.कित्येक समारंभ येतात आणि जातात.पण कौस्तुभ त्या गावचा नसतो.प्रत्येक प्रसंगाला जर का भेटवस्तू द्यायची असेल तर मी त्याला बजेट सांगते.केवढ्याची वस्तू घेऊन आले हे देखील सांगते.भेटवस्तू आणलेली मी त्याला दाखवते.पण तो एका नजरेने त्याकडे बघतो.दुस-या क्षणाला त्या गावचा नसतो. त्यावर काहीही प्रतिक्रीया नाही. चेहरा निर्विकार.मला वाटतं की यामुळे पुढचे वादविवाद टळतात.पहील्यांदा मलाही वाटायचे की हा काहीच कसा नाही बोलत वस्तू दाखवल्यावर.....पण माझ्या आई बाबांचे उदाहरण पुढे आले की त्याचे हे वागणे योग्यच वाततं .आजपर्यंत प्रत्येकच घर खर्चात मी त्याला खर्चाचे पैसे मागते तेवढे तो देतो आणि यावर त्या पैशाचे तू काय केलस? किंवा त्यातले काय शिल्लक राहीले हे तो कधीच विचारत नाही.त्यामुळे ही त्याची स्वभावाची बाजू नक्कीच लक्षात घेण्याजोगी आहे असे मला वाटते.मंडई, किराणा यांचा चेहरा देखील त्याने आज तागायत पाहीलेला नाही त्यामुळे त्याही वादांचा प्रश्नच येत नाही.या सगळ्यात माहेरी माझ्या बाबांचा असलेला सहभाग व त्याने आईला होणारा मनस्ताप हे बघता कौस्तुभचे असे वागणे मला फारच सुसह्य वाटते.आपण बायका म्हणतो की आपल्या नव-याने आपल्याला मदत म्हणून हातभार लावावा. पण पुष्कळदा ह्याचा व्यापच होतो.बायका पण सोईस्कररित्या पुरुषांना समान हक्क म्हणुन कामांच्या वाटण्यात घेणार. आणि काही वेळा याच पुरुषांची त्यांना लुडबुड नको म्हणून त्यांना झिडकारणार.......तर मला असे वाटते की आधी आपल्या डोक्यात याविषयीचे विचार स्पष्ट आहेत का की आपल्याला त्यांच्याकडुन काय अपेक्षित आहे....मदत ? की लुडबुड? आणि हे एकदा स्पष्ट झाले की बाकीचे इतर अवतीभोवतीचे काहीही म्हणोत आपल्याला काहीही फरक नाही पडत.म्हणुन परत एकदा यावर नक्कीच विचार करुयात.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...