Monday, November 29, 2010

कमावणं

नीरज, आनंद, धन्यवाद!

कमावणं म्हणजे नोकरीच आणि ती ही निरर्थकच असा विचार का करावा? आवडीच्या गोष्टींतून अर्थार्जन का करू नये?
मान्य! (सगळ्यांना ते शक्य नसते तरी मान्य!)
मी जी नोकरी करत होते ती तशी निरर्थकच होती, कुणी सांगावं मी ती करत राहिलेही असते. मी त्यासंदर्भात लिहिले आहे.

 "कामाची विभागणी" हे तत्व महत्वाचं आहे.
मान्य़!
घरात येणार्‍या कमाईवर सगळ्यांचा हक्क आहे असे मानूया. मग काय करशील? समज प्रत्येकाच्या नावे त्याच्या/ तिच्या खात्यात ठरलेली रक्कम जमा केली, त्या पैशांवर त्या व्यक्तीचा हक्क, बरोबर आहे? म्हणजे ते पैसे ती व्यक्ती हवे तसे खर्च करू शकेल. (हे ही शक्य नसतं)
 मग तर माझी समस्या सुटलीच नां! मी सध्या जे काम करते त्याचेच पैसे मला मिळायला लागले तर आर्थिक परावलंबन नाही (रूखरूख नाही)
तू ज्या वाटेने विचार करतो आहेस त्यासाठी मला तुझ्याबद्दल आदर वाटतो. पण हा एक सापळा आहे, नीरज. घर सांभाळून मला पैसे मिळायला लागले तर मी घराबाहेर कशासाठी पडायचं?
 घरकामाला वेतन अशी चळवळ युरोपात झाली होती. काही देशांमधे तसे कायदेही झाले (कदाचित स्वित्झर्लंड किंवा स्वीडन) काही नवरे नियमितपणे घरकामाचा पगार आपल्या बायकांना देत असत. या आकृतिबंधामुळे असं झालं की त्या बायकांचं घरकाम पक्कं झालं, त्या घराशी बांधल्या गेल्या. जर त्या घरकामाचा पगार घेत आहेत तर घरकामात नवर्‍याच्या मदतीची अपेक्षाच नको. घरकाम हे तेच ते, कंटाळवाणे, कौशल्याची नाही तर वेळेची मागणी करणारे आहे. (मुलांकडे पूर्णवेळ लक्ष द्यावे लागते अशी कितीशी वर्षे असतात?) एकदा संसार मांडला आहे म्हणजे कुणालातरी घरकाम करावे लागणारच आहे, म्हणजे मदतनीसांचे साह्य घेऊन का असेना, त्यात अडकून राहावेच लागते. मग कौशल्याची, कस लागेल अशी, त्यांची वाढ होईल अशी, कामे त्यांच्या वाट्याला येतच नाहीत. व्यक्ती म्हणून त्यांचा विकास थांबवला जातो.
 घरातल्या जास्तीत जास्त कामांसाठी बाईला मदत मिळायला हवी. छोट्या विभक्त कुटूंबांमुळे स्त्रीचा श्वास मोकळा झाला आहे पण तिच्यावरच्या घरातल्या जबाबदार्‍या वाढल्या आहेत, तात्पुरती तिची जबाबदारी उचलू शकेल असं कुणी नाही. ’घर मी चालवते/ माझ्यामुळे चालते’ च्या मुखवट्यामुळे कुठल्या कुठल्या प्रगतीच्या वाटा बंद कराव्या लागतात याची बाईला जाणीव नाही. पर्यायी व्यवस्था काय असावी? कुटूंबव्यवस्था कशी असावी? कम्यून असावीत का ? निकड निर्माण झाली की समाज उत्तरे शोधेलच.(बहुदा)
 आता तर स्त्रियांवर इतका दबाव आहे (९० च्या उदारीकरणानंतर झालेले बदल....... यावर कधीतरी लिहिन.), तिने शिकलेलं असायला हवं, कुठल्यातरी कलेत पारंगत असायला हवं, चांगलं दिसायला हवं, घर व्यवस्थित ठेवायला हवं, मुलांच्या प्रगतीकडे लक्ष द्यायला हवं, नोकरी करायला हवी, घराबाहेरची कामे यायला हवीत....... ही यादी वाढती आहे.


6 comments:

  1. माझा मुद्दा थोडा अजून स्पष्ट करत आहे.

    (सध्याच्या परिस्थितीत) हा एक सापळा आहे हे मान्य. पण कामाची विभागणी कमी करणे हा त्यावर उपाय आहे असे मला वाटत नाही.

    "कामाची विभागणी" हे तत्व सर्वांना माहीत आहेच. पण तरी इथे पुन्हा थोडक्यात...

    समजा जगण्यासाठी ’अ’ आणि ’ब’ या दोनच गोष्टी गरजेच्या आहेत. मिलिन्द एका तासात १० अ किंवा २ ब गोष्टी बनवू (कमवू) शकतो. विद्या एका तासात ४ अ किंवा ८ ब गोष्टी बनवू (कमवू) शकते.

    कामाची विभागणी केली नाही तर दोन तासात १४ अ (मिलिन्द १० + विद्या ४) आणि १० ब (मिलिन्द २ + विद्या ८) गोष्टी तयार होतील. पण विभागणी केल्यास, २० अ (मिलिन्द १० + मिलिन्द १०) आणि १६ ब (विद्या ८ + विद्या ८) तयार होतील. म्हणजेच १४ अ आणि १० ब दोन तासांपेक्षा कमी वेळात तयार होतील आणि मिलिन्द व विद्याला अधिक "मोकळा वेळ" मिळेल.

    माझा मुद्दा असा आहे की, कामाची विभागणी, त्याचे फायदे, त्याकरिता कुटुंबातील प्रत्येक घटकाने दिलेले योगदान आणि त्याचे मुल्य कुटुंबातील प्रत्येकाने विचारात घ्यावे. जी व्यक्ती कमावत नाही त्याबद्दल त्या व्यक्तीला रुखरुख वाटण्याचे कारण नाही आणि इतरांना त्या व्यक्तीचे योगदान कमी महत्वाचे मानण्याचा हक्क नाही.

    विभागणी ही माझ्या मते व्हायलाच हवी, फक्त ती स्त्री की पुरुष या निकषावर होऊ नये. घरकाम आणि कमावणे हीच जर योग्य विभागणी मानली, तर सरासरी ५०% स्त्रिया या केवळ घरकाम आणि इतर ५०% केवळ कमावण्याचे काम करु लागतील (म्हणजेच ५०% पुरुष हे केवळ कमावण्याचे काम आणि इतर ५०% केवळ घरकाम करु लागतील) तेव्हा सध्याची अन्यायी विभागणी संपेल.

    अर्थात हे तात्विक झालं. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक निरनिराळ्या प्रकारांनी आपण कामाची विभागणी करु शकतो. जेव्हा पती-पत्नी ही विभागणी परस्परसंमतीने त्या दोघांना हवी तिककी आणि हवी तशी (आणि स्त्री की पुरुष हा निकष न लावता) ठरवतील/ ठरवू शकतील तेव्हा हा अन्याय संपलेला असेल.

    ReplyDelete
  2. >> आता तर स्त्रियांवर इतका दबाव आहे

    याचंही कारण (काही अंशी) तेच आहे. विभागणी थांबवून आपण सगळेच सगळ्या गोष्टी करु पहात आहोत. तेवढंच काम जास्त वेळात होणार. ताण-दबाव वाढणारच.
    कित्येक घरात पुरूष अजूनही केवळ त्यांची विभागलेली कामं करत आहेत. स्त्रिया सगळी कामं करत आहेत. मग तेथे स्त्रियांवर अति-ताण आणि पुरुषांचा काही अंशी कमी- काही अंशी जास्त.
    जेथे पुरुषही स्त्रियांच्या बरोबरीने सगळी कामे करत आहेत, तेथे दोन्हींवर जास्त ताण येतो आहे.
    जेथे अजूनही पारंपारिक विभागणी आहे तेथे अन्याय आहे पण ताण त्यामानाने कमी आहे.
    अपारंपारिक-पुरोगामी विभागणी फार क्वचित पहायला मिळते. नाटककार देवेंद्र पेम (म्हणे - ठामपणे सांगता येणार नाही) घरीच असतो, (स्वयंपाकासकट, मुलांसकट) सगळं घरचं बघतो, दुपारी लिहीतो, बायको नोकरी करते, कमावते. देवेंद्रला नाटकातून काही अर्थार्जन होत असेल, पण ती त्याची जबाबदारी नाही.

    ReplyDelete
  3. ‌‌>>"कामाची विभागणी" हे तत्व सर्वांना माहीत आहेच.
    :) तुला यातून काय अभिप्रेत आहे, हे खरोखरच माझ्या लक्षात आले नव्हते. मला याच्या अगदी उलट वाटले होते. प्रत्येक कामात विभागणी असे.
    हे तुझे ’कामाची विभागणी’ हे तत्व मला मान्य नाही. तू बलुतेदारीचा पुरस्कार करतोस का?
    समाज हे एक यंत्र आहे आणि त्यात माणसे म्हणजे स्क्रू आहेत, ते हवे तिथे बसवायचे, जेणेकरून यंत्र तुझ्या कल्पनेप्रमाणे/ इच्छेप्रमाणे चालेल.
    असं आहे का?
    समाजात जिवंत माणसे असतात, त्यांना मन आहे, इच्छा आहेत, स्वत:चं आयुष्य कसं जगायचं यासंबंधीच्या त्यांच्या काही कल्पना आहेत. ते तसं जगायचं स्वातंत्र्य तू त्यांना देणार की नाही?
    घर आणि कमावणे ही चुकीचीच विभागणी आहे. समज मला कमवायचं आहे तर मी असाच नवरा शोधला पाहिजे जो घरकाम करेल. मधेच मी ज्याला कमवायचंच आहे अशाच माणसाच्या प्रेमात पडले तर काय करायचं? एक तर मी अशा माणसाच्या प्रेमातच पडायला नको, पडले तरी त्याच्याशी लग्न करायला नको, हो की नाही? शिवाय तू एकीकडे असे म्हणतोस की आवडीच्या गोष्टींतून अर्थार्जन का करू नये?
    सगळंच कसं जमवायचं?
    काही नकोशी, दोघांनाही न आवडणारी कामे असणारच आहेत. त्यांचं काय करायचं? शिवाय कामाच्या दर्जाचं काय?
    आणि कामाच्या विभागणीचे काय काय बरं फायदे आहेत? ’मोकळा वेळ अधिक मिळेल’ च्या शिवाय ( त्या मोकळ्या वेळात करायचं काय? तुझ्या कल्पनेप्रमाणे)

    >>>आता तर स्त्रियांवर इतका दबाव आहे

    >>याचंही कारण (काही अंशी) तेच आहे. विभागणी थांबवून आपण सगळेच सगळ्या गोष्टी करु पहात आहोत. तेवढंच काम जास्त वेळात होणार. ताण-दबाव वाढणारच.
    ताण/ दबाव असण्याचं कारण वेळ कमी मिळणं आहे, असं तुला वाटतं?

    >>जेथे अजूनही पारंपारिक विभागणी आहे तेथे अन्याय आहे पण ताण त्यामानाने कमी आहे.
    हो, जर पारंपारिक विचारांचेच स्त्री-पुरूष असतील तर.
    मग काय? ताणाची निवड करायची की अन्यायाची?
    अन्यायाची निवड करणार असशील तर प्रश्नच सुटले.
    ( देवेंद्र पेमच्या घरी फक्त भुमिकांचीच अदलाबदल झालेली आहे? की आणखी काही बदल आहेत? )

    ReplyDelete
  4. आपली सगळी समाजव्यवस्थाच "कामांची विभागणी" या तत्वावर उभी आहे. तीच तुला मान्य नसेल तर (यावर पुढे बोलणं) कठीण आहे.

    ‌‌बाकी, "तू बलुतेदारीचा पुरस्कार करतोस का?" पासून "स्वातंत्र्य तू त्यांना देणार की नाही?" पर्यंतची वाक्ये मला (प्रश्नार्थक असली) तरी अन्यायी वाटली. मी जे म्हणत नाही आहे ते माझ्या तोंडी का घालावे? मी जे म्हणतोय तेवढेच म्हणतोय. ते पुढे खेचून त्यातून माझ्या भुमिकेबद्दल केलेले आखाडे तुझे स्वतःचे आहेत.

    मी जे म्हणतोय ते स्पष्ट होत नसेल/ मला मांडता आले नसेल तर पुन्हा एकदा प्रयत्न करतो...

    १. सध्याची कामांची विभागणी अन्यायी आहे(च्च) (कारण स्त्री की पुरुष या निकषावर ती केली जाते)
    २. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक निरनिराळ्या प्रकारांनी आपण कामांची विभागणी करु शकतो
    ३. जेव्हा पती-पत्नी ही विभागणी परस्परसंमतीने त्या दोघांना हवी तितकी आणि हवी तशी (आणि स्त्री की पुरुष हा निकष न लावता) ठरवतील/ ठरवू शकतील तेव्हा हा अन्याय संपलेला असेल.
    ४. अन्याय संपवण्याकरता "कामांची विभागणी"च थांबवणे आवश्यक नाही आणि हितावहही नाही.
    ५. स्वातंत्र्य, न्याय या गोष्टी (माझ्यासाठी) कामांची विभागणी, ताण टाळणे यांपेक्षा जास्त महत्वाच्या आहेत. तेव्हा जिथे कामांची विभागणी अन्यायी होत असेल तेथे कामांची विभागणी कमी करणे अथवा न करणे आणि ताण सहन करणे पण स्वातंत्र्य आणि न्याय टिकवणे याला मी प्राधान्य देईन.

    भुमिका स्पष्ट करण्यासाठी "कामाची" विभागणी ऐवजी आता "कामांची" विभागणी असा शब्दप्रयोग आता केला आहे. शेवटचा मुद्दा (५ वा) यापुर्वी गृहीत धरला होता. पण वेगळा (नेमका उलटा) अर्थ काढला गेल्याने माझी भुमिका स्पष्ट करण्यासाठी आता घातला आहे.

    ReplyDelete
  5. ”कामांची विभागणी” हे तत्व तू ज्या बाजूने पुढे आणतो आहेस, विशेषत: ” घरकाम आणि कमावणं” हे तर मान्यच नाही.

    >> समाजव्यवस्थाच "कामांची विभागणी" या तत्वावर उभी आहे.
    हे मान्य आहे. :)
    किंबहुना मानवाच्या प्रगतीतला तो एक महत्त्वाचा टप्पा आहे.

    >>बाकी, "तू बलुतेदारीचा पुरस्कार करतोस का?" पासून "स्वातंत्र्य तू त्यांना देणार की नाही?" पर्यंतची वाक्ये मला (प्रश्नार्थक असली) तरी अन्यायी वाटली. मी जे म्हणत नाही आहे ते माझ्या तोंडी का घालावे? मी जे म्हणतोय तेवढेच म्हणतोय.
    तू जे म्हणतो आहेस त्या रेषा वाढवत नेल्या तर त्यांची जी टोके मला दिसली, ती दाखवली. ते तुझ्या तोंडी घाललेलं नाही. म्हणजे "तू बलुतेदारीचा पुरस्कार करतोस का?" नाही ना? मग अशी मांडणी का करतो आहेस? असं मला विचारायचं होतं.
    आवडीचं काम, काय आवडावं याची लहानपणापासूनच सुरूवात, त्यातून अर्थाजन, समाजाच्या दृष्टीने व्हायला हवीत अशी कामे, अशी सगळी सांगड घालत बलुतेदारीकडे जायचं नाही आहे ना? असं मला म्हणायचं होतं.
    आणखी एक, टोकापर्यन्त गेलो की मुद्दे स्पष्ट होत जातात, आधीच्या टप्प्यांवरचं म्हणणं अधिक काटेकोर करत जाता येतं.

    >> सरासरी ५०% स्त्रिया या केवळ घरकाम आणि इतर ५०% केवळ कमावण्याचे काम करु लागतील (म्हणजेच ५०% पुरुष हे केवळ कमावण्याचे काम आणि इतर ५०% केवळ घरकाम करु लागतील) तेव्हा सध्याची अन्यायी विभागणी संपेल.
    असंच मला वाटायचं. शिकत असताना मी म्हणायचे, मला ज्याला घरकाम करायला आवडेल असाच नवरा हवा आहे, कमावण्याचं काम मी करीन. माझी शिक्षणाची काही अट नाही, पदवीधर असला / नसला मला चालणार आहे. असा नवरा सध्याच्या समाजात मिळणं केव्हढी अवघड गोष्ट आहे. आणि लग्न काही केवळ कमावणं आणि घरकाम यासाठी नाही करत आपण, मला त्याच्याशी संवाद साधता आला पाहिजे, आमच्या काही आवडीनिवडी सारख्या असायला हव्यात, मोकळ्या वेळात काय करायचं याच्या थोड्यातरी कल्पना जुळल्या पाहिजेत.
    तर.... घरकामही दोघे मिळून करा आणि कमवायचंही बघा, हे सारं करताना आपण सुपरमॅन किंवा सुपरवुमन नाही, याचंही भान ठेवा.

    >> १. सध्याची कामांची विभागणी अन्यायी आहे(च्च) (कारण स्त्री की पुरुष या निकषावर ती केली जाते)
    मान्य.

    >> २. प्रत्यक्ष आयुष्यात अनेक निरनिराळ्या प्रकारांनी आपण कामांची विभागणी करु शकतो
    ३. जेव्हा पती-पत्नी ही विभागणी परस्परसंमतीने त्या दोघांना हवी तितकी आणि हवी तशी (आणि स्त्री की पुरुष हा निकष न लावता) ठरवतील/ ठरवू शकतील तेव्हा हा अन्याय संपलेला असेल.

    हे स्पष्ट करण्यासाठी एखादं ’प्रारूप’ तू मांडून दाखवशील का?

    >> ४. अन्याय संपवण्याकरता "कामांची विभागणी"च थांबवणे आवश्यक नाही आणि हितावहही नाही.
    मला कामात विभागणी सुद्धा गरजेची आहे असं म्हणायचंय. कामांच्या विभागणीच्या संदर्भात कामाचा दर्जा ही गोष्टही महत्त्वाची आहे.

    >> स्वातंत्र्य आणि न्याय टिकवणे याला मी प्राधान्य देईन.
    हे गृहित धरलेलं होतं. :)

    जिथे पोचायचं आहे त्याबाबतीत फारसे मतभेद आहेत, असं दिसत नाही आहे, पण मार्गांबद्दल निश्चित आहेत.
    आता,
    १) जी दर्जाहीन, कंटाळवाणी पण आवश्यक कामे आहेत त्यांचं काय करायचं?
    २) प्रत्येकाला कामातलं समाधान मिळायला हवं, याबद्दल तुला काय म्हणायचं आहे?
    ३) प्रत्येकाला स्वत:च्या विकासाची संधी मिळायला हवी, याबद्दल?
    ४) >> कुटुंबातील प्रत्येक घटकाने दिलेले योगदान आणि त्याचे मुल्य कुटुंबातील प्रत्येकाने विचारात घ्यावे. जी व्यक्ती कमावत नाही त्याबद्दल त्या व्यक्तीला रुखरुख वाटण्याचे कारण नाही.
    हे आदर्शवादी होत नाही का?

    ReplyDelete
  6. http://www.washingtonpost.com/news/parenting/wp/2014/06/05/dads-who-stay-home-because-they-want-to-has-increased-four-fold/

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...