Thursday, July 15, 2010

बाई

’बाई’ किंवा ’बायका’ असे शब्द मी पूर्वी कधी वापरत नसे. ते मला आवडायचे नाहीत. मी कायम स्त्री, महिला असेच शब्द वापरायचे. तेच बायकांसाठी सन्मानदर्शक शब्द आहेत असे मला वाटे.


चांगल्या शिकल्या सवरल्या बाईला ’बाई’ काय म्हणायचे! ती स्त्री. बाईपण ओलांडून माणूसपणाकडे गेलेली.

हे सगळं करत असताना मी बायकांची प्रतवारी करत आहे हे माझ्या लक्षात येत नसे. मी स्त्री आणि माझ्याकडे काम करणार्‍या मावशी म्हणजे कामवाली बाई. स्त्री आणि बाई असे शब्द वापरताना बायकांची आर्थिक, सामाजिक उतरंड मी पक्की करत असे.

जेव्हा माझा स्त्रियांचा रितसर अभ्यास सुरू झाला तेव्हा समाजात स्त्रियांचे कसे वेगवेगळे गट पाडले गेलेले आहेत, हे मी शिकले. त्याही पलीकडे शरिरविक्रय करणार्‍या स्त्रिया, वेश्या किंवा सेक्स वर्कर्स तर माझ्या दृष्टीने जगात अस्तित्वातच नव्हत्या. त्यामागचे राजकारण मी शिकले. वेगवेगळ्या विचारसरणीच्या स्त्रीवाद्यांचे त्यावरचे विचार आम्हांला अभ्यासायला होते. आणि ’डोळे उघडावेत’ तसे माझे झाले. मी कितीही माझ्या स्वातंत्र्याचा विचार करत असले तरी ते सारे विचार चौकटीतले होते. माझ्या विचार करण्याच्या मर्यादा मला कळल्या. पुटं गळून पडावीत तसे झाले.

जर मला स्त्रियांचा विचार करायचा असेल तर फक्त मध्यमवर्गातल्या, उच्चवर्णातल्या स्त्रियांचा विचार करून चालणार नाही. निदान विचारांच्या पातळीवरतरी माझ्या कुवतीप्रमाणे मी सगळ्या स्त्रियांना सामावून घ्यायला पाहिजे. हे कधीतरी मला कळलं

मग जगातल्या सगळ्या बायकांशी नातं सांगणारा ’बाई’ हा शब्दच मला जवळचा वाटू लागला.

त्यानंतर मी प्रामुख्याने मी ’बाई’ हाच शब्द वापरायला सुरूवात केली.

1 comment:

  1. दलितांना गांधीजींनी हरिजन म्हणायला सुरुवात केली. तो शब्द सर्व डॉ आंबेडकरांनी झिडकारला तो याच कारणासाठी.

    अमेरिकेतही Negro, Black असं म्हणणं अन्यायाचं आहे असं वाटून आधी colored मग Afro-American असं म्हणायला लागले होते उदारमतवादीलोक. ते सगळं सोडून देउन आता black हा पुन्हा अस्मितानिदर्शक शब्द झाला आहे.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...