Tuesday, May 11, 2010

-o-o-o-

मी भाग्यवान आहे.. मी मुलगी म्हणून जन्मले. मी जशी आहे तशी मला आवडते. माझ्या गुणदोषांसकट आवडते. मला माझी बलस्थाने माहिती आहेत आणि उणीवाही ठाऊक आहेत. काही उणीवा मी प्रयत्नपूर्वक दूर करू पाहाते तर काही तशाच सांभाळते. मला तडजोडी कराव्या लागतात. कधी दोन पावलं मागं यावं लागतं. कधी काही संधीही गमावाव्या लागतात. याचा त्रास तर होतोच. खंतही वाटते.
तडजोडी, संधी गमावणं, माझ्यातल्या उणीवा, यांचं कारण प्रत्येक वेळी माझं बाईपण हेच असतं? नक्कीच नाही.
माझ्या भोवतालची परिस्थिती, व्यवस्था कारण असतं त्यामागे? मग का मी त्या व्यवस्था मानते? का नाही झुगारुन देत? पुन्हा बाईपण आडवं येतं?
जेव्हा हीच व्यवस्था, परिस्थिती (कधीकधी) पुरुषांनाही तडजोडी करायला लावते, तेव्हा त्यांच्यातला प्रत्येक पुरुष तरी कुठे व्यवस्थेला आव्हान देतो?
मग परिस्थिती बदलता न येणं ही बाईपणाची उणीव? की माझी व्यक्तीगत उणीव? की जी व्यवस्था बाईपणाला दुय्यम स्थान देते त्या व्यवस्थेची उणीव?
’नको हे बाईपण’, ’जळ्ळा मेला बायकांचा जन्म’ असं वाटायला लावणारे प्रसंग माझ्यावर कधी आले नाहीत हे खरंच, पण समजा तसे आले, तरी मी बाईपणाला दोष नाही देणार. मी ज्या समाजात रहाते, तिथे असणारं बाईचं दुय्यम स्थान, तिला कराव्या लागणार्‍या असंख्य तडजोडी, तिचे भोग हे त्या व्यवस्थेतील दोषांमुळे आहेत. ’नको हे बाईपण’ असं म्हणताना मी नकळत पुरुषी श्रेष्ठत्वच मान्य करते. बाई म्हणुन असणार्‍या माझ्या क्षमतांना कमी लेखत असते.
अरुणा ढेरेंची एक कविता आहे -
काळोखाचेप्रचंड ओझे
उचलून...वर्षानुवर्ष...
चालत रहातात बायका
आयुष्याचे डोंगर
चढतात...उतरतात...
उतत नाहीत की मातत नाहीत
निर्मळ हातांनी
अवजड ओझे सावरत जातात.
या कवितेतल्या बायका मी माझ्या आसपास, कुटुंबात खूप बघितल्या. त्या काही फ़ार शिकलेल्या नव्हत्या. धो धो पैसा कमावत नव्हत्या. पण त्यांनी त्यांचं घर आपल्या खांद्यांवर उभं केलं होतं. एकटीच्या बळावर उभं केलं होतं. त्यांचे पुरुष हरलेले होते. कोणी व्यसनात बुडालेले होते, कोणी जुन्या वैभवाच्या भ्रामक जगात वावरत होते- वर्तमानात जगायलाच तयार नव्हते. या बायका मात्र लवचिकपणे सगळे आघात पचवत पुन्हा पुन्हा उभ्या रहात होत्या. स्वतःबरोबर संसार सावरत होत्या. मुलांना घडवत होत्या. काय होतं त्यांच्याकडे? त्या काळोखाचे ओझे त्या उचलू शकल्या ते त्यांच्या अंतरीच्या उजेडाच्या जोरावर. त्यांच्या बाईपणाच्या जोरावर. भोवतालचा काळोख उजळून टाकण्याचीही शक्ती त्या उजेडात होती. पण व्यवस्थेच्या पोलादी भिंतींनी तो उजेड झाकोळून टाकला होता. भिंतिंआडचा उजेड मात्र त्यांना बळ देत राहिला. बाईपणाबरोबर येणारी शरीर-मनाची लवचिकता, सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे जाण्याची वृती, आहे त्या परिस्थितीशी कधी जुळवुन घेत, कधी दोन हात करत पाय़ घट्ट रोवुन उभं रहाणं ही त्यांची शक्तीस्थानं होती. ती त्यांना त्यांच्या बाईपणानं दिलेली होती.
बाईपण जसं या शक्ती देतं तसंच एक वेगळं, तरल, संवेदनशील, भावगर्भ अनुभवविश्वही मला देतं. माझ्या शरीरात निसर्गानं काही वेगळ्या योजना, रचना केल्या आहेत. मी माझ्यात एक नवीन जीव सामावून घेऊ शकते. त्याला पोसू शकते, वाढवू शकते. बाहेरच्या जगात आणू शकते. याच नैसर्गिक क्षमता मला आणखीही काही देतात. मी माझ्याबरोबरच्यांचा स्वतःपलिकडे जाऊन विचार करु शकते. त्यांना जास्त चांगलं समजुन घेऊ शकते.
बाईपणाचा मला अभिमान असला तरीही श्रेष्ठत्वाचा वाद मात्र मला निरर्थक वाटतो. निसर्गानं तर श्रेष्ठ-कनिष्ठ अशी विभागणी स्त्री-पुरुषात केलेलीच नाहीये. तिथे क्षमतांचं परस्परपूरकत्व मात्र आहे. मी बाई म्हणुन पुरुषापेक्षा श्रेष्ठही नाही आणि हीन तर मुळीच नाही. पण बाईपणाला झाकोळून टाकणार्‍या त्या पोलादी भिंतींचं काय करायचं? अजून किती काळ आणि किती शक्ती जाणार त्यांना उखडून काढण्यात? पण त्या उखडुन काढता येत नाहीत, तोवर काळोखाची ओझी वाहाणं अटळच.

1 comment:

  1. खूप आवडलं.

    काही वर्षांपूर्वीपर्यंत performance appraisal मध्ये तुमचे weakness लिहून ते कसे दूर करणार याच्यासाठीचे मुद्दे असायचे.
    आता असं म्हणताहेत की या उणीवा तर असणारच आहे. त्यापेक्षा महत्वाचं हे आहे की strengths ओळखून त्यांचा वापर करुन घेणं..

    स्वत:पलिकडे जाउन इतरांना समजून घेणं / empathy ही बाईपणाची खूप मोठी देणगी आहे. ..
    ही देणगी खरंच नैसर्गिक आहे का असं बिंबवण्यात पुरुषी समाजव्यवस्थेचा डाव आहे हा अर्थातच वादाचा मुद्दा.

    तू उल्लेख केलेल्या ’घर’ सावरणार्याव, पेलणार्याा बायका बहुतेकांनी पाहिल्या/अनुभवल्या असतीलच.
    आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये हे जितकं दिसलं तितकं आत्ता दिसतं आहे का ? (आपली वर्तुळं बदलली म्हणून आपल्याला दिसत नसेल ही शक्यता आहेच अर्थात). एकाएकी पुरुष जास्त जबाबदार झालेत की मीच एकटीनं का हा गाडा ओढायचा असं आत्मभान येऊ लागलंय..

    व्यवस्थेचे चटके पुरुषांनाही सोसावे लागतात हे खरंच पण बाईला जास्त सोसावे लागतात आणि बाई म्हणून सोसावे लागतात हेही खरं. ज्या पुरुषांना जी काय हताशा येते त्याची जबाबदारी कोणाची हे ठरवता येत नाही आणि म्हणून ते निर्गुण निराकार नैराश्याशी झुंजत असतात. बाईला मात्र या सगळ्या अन्यायी व्यवस्थेचा प्रतिनिधी समोर सगुण साकार दिसत असतो आणि “माझं हे असं कारण तू/तो हा असा” ही एक मलमपट्टी उपलब्ध असते. त्याने घाव अर्थातच भरत नाहीत हे नक्कीच पण घाव घालण्याला प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जबाबदार कोण हे तरी माहीत होतं ..

    (ता.क. वरती दोन पिढ्यांची तुलना केली म्हणून काही वर्षांपूर्वी वाचलेल्या एका पुस्तकाबद्दलच्या लेखाची आठवण झाली.
    गूगल वर शोधून पाहा. What our Mothers didn't tell us: Why Happiness eludes the Modern Woman. अमेरिकन संदर्भ आहे. मी पुस्तक वाचलेलं नाही. लेख वाचला आहे. Alternate viewpoint म्हणून मह्त्वाचा आहे.)

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...