Monday, June 28, 2010

मैत्री

एखादी स्त्री जेव्हा मैत्री करते तेव्हा ती ज्या व्यक्तीशी मैत्री करते, त्या व्यक्तीचं स्त्री किंवा पुरुष असणं हे त्या मैत्रीच्या आड येऊ शकता का?
हो. आपल्या समाजात, आपल्या काळात तरी अशी परीस्थिती आहे.
”एखादी स्त्री जेव्हा मैत्री करते” म्हणजे आपण कोणी मैत्री करायला जातो असं मला वाटत नाही, ती होते. हे म्हणजे ठरवून लग्न करू तसं नाही. मैत्रीचं हेच तर वेगळेपण आहे, केलीच पाहिजे अशी काही जबरदस्ती नाही.

१. स्त्री-पुरुष मैत्री निखळ असू शकते का?
मला माहीत नाही. पण असावी असा अंदाज आहे.
पण निखळ म्हणजे काय?
निखळ असण्या नसण्याची सीमारेषा कोणती आहे?
मिलिन्दची आणि माझी मैत्री निखळच होती. कधीतरी मिलिन्दने माझ्याशी लग्न करायचं ठरवलं, म्ह्णजे माझ्या बाजूने मैत्री निखळ आणि मिलिन्दच्या बाजूने नाही, असंच ना? मीही त्याच्याशी लग्न करायचं ठरवलं त्यानंतरच्या आमच्या मैत्रीला काय म्हणूया?
निखळ म्हणजे मैत्री करायची पण प्रेमात पडायचं नाही. या दोन्ही ठरवून करायच्या गोष्टी नाहीत.
मिलिन्द माझा चांगला मित्र होता पण जिवलग मित्र नव्हता, उलट प्रेमात पडल्यावर जिवलग झाला.
मलाही स्त्री-पुरूषाची निखळ मैत्री का असू नये असंच वाटायचं, मिलिन्दने मला विचारल्यावर मला वाईटच वाटले होते, निखळ मैत्रीचा एक आदर्श आम्ही उभा करू शकलो असतो. अशा काहीतरी माझ्या कल्पना होत्या. म्हणजे मी त्याचा विचार करत होते, काळजी करत होते, काही प्रमाणात हक्क दाखवत होते, अभ्यास सोडून त्याने आणून दिलेली पुस्तके वाचत होते पण या कशालाही प्रेम म्हणायची माझी तयारी नव्हती. म्हणजे एक लेबल दिलं की ते प्रेम झालं का? त्यापूर्वी नव्हतं का? असूनही जर आपल्याला कळलं नाही तर काय ?

या विषयावर लिहायचा मला काहीही अधिकार नाही. माझा एक चांगला मित्र होता, तो जिवलग होण्याच्या वाटेवर मी त्याच्या प्रेमात पडले.

दुसरं असं की प्रत्येकात स्त्री-पुरूष आकर्षणाचे आदिम तंतू असणारच, ते आपल्याला नातेसंबंधातही दिसतात. सासरा-सून, सासू-जावाई असे. मानवी संस्कृतीने आजवरच्या वाटचालीत बहीण-भाऊ, वडील-मुलगी असे काही निखळ नातेसंबंधही निर्माण केलेले आहेतच ना? मग त्यावर विसंबून असे म्हणूया की स्त्री-पुरुष मैत्री निखळ असू शकते. निखळ असण्या नसण्यापेक्षा मैत्री ही किमती गोष्ट आहे.


( इथे एव्हढ्च लक्षात ठेवू या की ही चर्चा सगळेच भिन्नलिंगी असतात असं गृहित धरून होते आहे. आपण समलैंगीकांच अस्तित्व विसरायला नको, त्या परीस्थितीत ’निखळ’ चं काय करायचं)


२. जिवलग मैत्रीण कि जिवलग मित्र ?

जिवलग मैत्रीण असो की मित्र , ही खूप हेवा करण्याजोगी गोष्ट आहे. मलातरी जिवलग या शब्दाच्या जवळपास जावू शकणार्‍या मैत्रीणीच आहेत. वेगवेगळ्या मैत्रीणींशी माझं वेगवेगळ्या तारांवर जुळतं. प्रत्येक माणसाला अनेक पैलू असतात, त्यातले जे आपल्याशी जुळतात त्या बाजूने मैत्री सुरू होते. मला माणसांमधे रस असल्याने, एकूणच त्यांना समजून घेण्याच्या प्रक्रियेत माझी किमान पातळीवरची मैत्री कुणाशीही होऊ शकते. कुठलाही माणूस फूली मारण्यासारखा नसतो.

मैत्री्णी सहज होऊ शकतात, तितक्या सहज मित्र होऊ शकत नाहीत. आता परीस्थिती बदलल्यासारखी वाटते.

जिवलग मित्र असण्याचा एक फायदा आहे की नवर्‍याला किंवा इतर पुरूषांना समजून घेण्यासाठी त्याची मदत होऊ शकते. एक स्त्री म्हणून मला जे कधीच कळू शकणार नाही, ते त्याच्या नजरेने पाहता येऊ शकतं, जाण वाढू शकते, जग समजून घ्यायला मदत होऊ शकते. अनुभवाचं वर्तूळ वाढवता येऊ शकतं. हे जग शेवटी स्त्री-पुरूषांचं मिळूनच बनलं आहे ना!

(यावर सोपा उपाय म्हणजे नवर्‍याशी मैत्री करता आली तर पहा, तिथे काही धोका नाही. )

३. समाजाचा स्त्री-पुरुष मैत्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा त्या मैत्रीच्या आड येतो का?

हो,आणि समाजाचाच नाही तर आपल्या स्वत:चादेखील. समाज म्हणजेदेखील आपणच ना?
माझ्या ओळखीच्या मुलांपैकी कोणी माझ्याशी जर फार चांगला वागायला किंवा बोलायला लागला तर मी त्याच्याबरोबरचे बोलणे हळू हळू संपवत आणत असे. खरं याची गरज नव्हती पण मला वाटे गैरसमज नकोत. आपणसुद्धा समाजाचा भाग असतो, काही गोष्टी भिनलेल्या असतात. त्यातून प्रयत्नानेच बाहेर पडावे लागते.

मैत्री आहे तर आहे, ती जर स्त्री पुरूषांमधली असली तर ती निखळ आहे हे त्या दोघांना दाखवत बसावं लागतं, इतकं सगळं सांभाळत मग ती मैत्री हवी कशाला?

धर्मापुरीकर काका किती मोठे आहेत. नात्यानेही ते माझे दूरचे काका आहेत.पण त्यांची माझी ओळख आत्ताच झाली. आमची काही मैत्री नाही, ते अधून मधून फोन करतात. त्यांच्या कथांसंबंधी बोलतात, दरवेळी न चुकता मिलिन्दची चौकशी करतात. मी सुद्धा काकूंची विचारपूस करायचे, खरं याची काय गरज आहे? मी काकूंची चौकशी करणं सोडून दिलं. कुठल्याही वयाचे स्त्री-पुरूष काही नातं बांधू पाहात असतील तर समाज त्यांच्यामधे असतोच असतो. समाजाचं काय करायचं ते त्या दोघांनी ठरवायचं.

४. लग्नाआधी असलेला मित्र हा लग्नानंतरही तेवढाच जवळचा वाटतो/राहतो का?

नव्हता मला कोणी मित्र. म्हणजे ओळखीचे बरेच होते पण मित्र म्हणावा असा कुणी नव्हता. कदाचित माझ्या व्याखेत मित्र ही कुणालाही सहज लागू करू अशी उपाधी नसेल.

लहानपणी आम्ही वाड्यात राहायचो तेंव्हा सगळे मुलगे आणि मी एकटीच मुलगी असे होते. नातेवाईकांमधेही माझ्या वयाच्या एका मामेबहीणी व्यतिरिक्त बाकी सगळे सहासात भाऊच आहेत. दहावी पर्यन्त मी मुलींच्या शाळेत शिकले असले तरी नंतर वर्गात मुलगेच अधिक असे होते.

त्यामुळे मुलांमधे सहज वावरायची सवय मला होती. सहज मी कुणाशीही गप्पा मारू शकते, पण ते कुणी माझे मित्र नव्हते, मी त्या कुणाशीही मनातलं बोलायला गेले नाही. ती माझ्या वर्गातली मुलं होती, शेजारची मुलं होती, मैत्रीणींचे भाऊ होते, भावाचे मित्र होते, चुलत-मावस भाऊ होते, ते सगळे तसेच राहीले त्यातला कुणीही मित्र झाला नाही. होऊ शकले असते त्यांना मी थांबवलं. (मैत्री ठरवून करता येत नसली तरी ठरवून थांबवता येते.)

लग्नाआधी जर कुणी मित्र असेल तर लग्नानंतरही तो तेव्हढाच जवळचा राहायला हरकत नसावी. फक्त नवरा त्याच्यापेक्षा जवळचा होऊन बसतो त्यामुळे मित्र दूर गेला, किंवा मित्राला आपण दूर गेलो असे वाटणे शक्य आहे.

आपल्याकडे नवरा हाच सगळ्यात जवळचा मित्र असण्याची सक्ती आहे, प्रत्येकीच्या बाबतीत ते कसे शक्य असेल? नात्यांच्या मर्यादा आणि शक्तीस्थानं यांच्याकडे सरळ, स्वच्छ नजरेने पाहणं आपण शिकायला हवं आहे.

५. वयानुसार स्त्री/पुरुष मैत्रीच्या नात्यात झालेला बदल.

लग्न झाल्यावर, त्यातही मुलं जरा मोठी झाल्यावर आपण Danger Zone मधून बाहेर पडलो आहोत असं वाटतं, पुरूषांशी वागताना मोकळेपणा वाटू शकतो. लोकांच्याही केवळ स्त्री म्हणून पाहण्याच्या नजरेत बदल होतो. संसारात स्थिर झाल्यावर समजदारी वाढणे, नातेसंबंधांची जाण येणे असं होतं. (प्रत्येकाच्याच बाबतीत होतं असं नाही.)

६. स्त्री-पुरुष मैत्रीबाबत आलेले चांगले/वाईट अनुभव.

अनुभव नाहीत. मी ज्याला मैत्री म्हणते तशी मैत्री माझी कोणाशीही (पुरूषांशी) नाही, ( एक मिलिन्दशी आहे पण ती निखळ नाही. :) )

मैत्री का हवी असते माणसाला?

वाटेवर सोबत हवी म्हणून...सांगावसं वाटतं काय काय म्हणून...समोरच्याला समजून घ्यायचं असतं म्हणून...आपल्याला कु्णीतरी समजून घ्यावं म्हणून...शोधायचं असतं काय काय म्हणून.. लावलेले शोध कुणापुढेतरी ठेवावेसे वाटतात म्हणून...खात्री हवी असते सोबत असण्याची म्हणून...आधाराला हवं असतं कुणीतरी म्हणून...आधार व्हावसं वाटतं कुणाचातरी म्हणून...सुखदु:ख कळावं कुणालातरी म्हणून... ज्याला कळेल अशा कुणाशीतरी गाभ्यातलं बोलता यावं म्हणून.... सगळ्या संसाराच्या धकाधकीत विश्रांतीला हवं ना कुणीतरी.

पण यासाठी मित्रच का? मैत्रीणी आहेत की! आणि त्या पुरेशा आहेत.

(सगळ्यात छान म्हणजे स्वत:शी मैत्री करणं, स्वत:ला ओळखणं, स्वत:ला शोधणं)

सगळ्या मुली/ बायका मला मराठी पुस्तकांसारख्या वाटतात. मला त्यांना वाचता येतं, त्या मला कळतात. सगळे मुलगे/पुरूष मला इंग्रजी पुस्तकांसारखे वाटतात, वाचले तरी कळले आहेत याची खात्री वाटत नाही. मग वाचावेसेही वाटत नाहीत. तरी ती पुस्तके वाचली पाहिजेत, कळली पाहिजेत असंही वाटत राहतं.

3 comments:

  1. विद्या शेवटचा para अगदी चपखल उपमा देऊन मांडला आहेस.
    छान मोकळेपणाने लिहीले आहेस.

    ReplyDelete
  2. ’निखळ’ म्हणजे काय याचे जास्त विवेचन असले तर हवे होते. विशेषतः स्त्रीवादाचं काय म्हणणं आहे ?
    प्रत्येक समाजाचे/काळाचे/स्तराचे याबद्दल वेगळे निकष असणार. अशारीर म्हणजे निखळ असं अभिप्रेत आहे का या लेखापुरतं ?


    शेवटची उपमा मला नीट नाही कळाली.
    भाषा वाचता येते, शब्दाचा अर्थ समजतो म्हणजे पुस्तक कळतं ?
    एकाच वाक्यात साने गुरुजी ते ग्रेस, जीए, शाम मनोहर सारेच ?

    ReplyDelete
  3. निखळ म्हणजे अशारीर.(लेखापुरतच नाही लेखाबाहेर देखील.) बघ तू सोपंच करून टाकलंस. हा प्रश्न खरं म्हणजे स्मिताला विचारायला हवा, तिला काय अभिप्रेत आहे? तुला काय वाटतं मिलिन्द ?
    इतकं सोपंही करता येणार नाही, पण कुठेतरी रेघ ओढायची ती इथे.

    जहाल स्त्रीवाद्यांनी तर पुरूषांशी संघर्षाचीच भूमिका घेतली होती. त्यांनी सांगीतलं की आम्हांला पुरूषांशी कुठल्याही प्रकारे संबंधच नको. त्यातील काहीजणींनी आपल्या लैंगिक प्रेरणांनुरूप वर्तन न करता समलिंगी संबंध ठेवले.
    स्त्रीवाद्यांनी सांगीतलं की माझ्या शरीरावर माझा हक्क. दुसरं स्त्रीयांच्या दास्याचं मूळ पुरूषसत्तेत, लग्नसंस्थेत आहे.
    मैत्रीबद्दल स्त्रीवाद्यांनी काय म्हट्लं आहे मला माहित नाही.
    मैत्रीमधे दोघांनी एका पातळीवर असणं अपेक्षीत आहे, तसं सगळ्या मैत्र्यांमधे असतं का? तर नाही, तिथेही अवलंबून असणं, केवळ आधार शोधणं, असं असतंच की! मला अपेक्षीत आहे ते दोघांनी एका पातळीवर असणं, दोघांनाही मैत्रीची तितकीच गरज असणं. माझ्या ज्या खूप जवळच्या मैत्रीणी आहेत त्यांच्याशी माझी मैत्री एकतर्फी होत चालली आहे असंच वाटतं मला हल्ली.
    आणि लग्नांतर्गतही जर आपण एका पातळीवर असू तर ती मैत्री. किंवा इतर नातेसंबंधाबाबतही.

    काळ/ समाज आणि स्तर याची चौकट धरूनच हे विवेचन आहे. सध्याची तरूण पिढी खूप मोकळी आहे.
    आपल्याकडे स्त्री-पुरूष मैत्रीचा काय इतिहास आहे? कृष्ण-द्रौपदी वगळता मला अशी मैत्री दिसत नाही. तुला आठवते आहे का? मुळात स्त्रीयांची आणि पुरूषांची जगं वेगवेगळीच होती आत्तापर्यन्त. त्यांचा एकमेकांशी काही संबंधच नसे. त्यामुळे मधल्या काळातल्या ज्या कथा आहेत त्या जमीनदार-गणिका मैत्रीच्या. त्यानंतरच्या काळात नात्यात मैत्री होत गेली असली पाहीजे. बाबांची सवितामावशीशी चांगली मैत्री होती, किंवा माईआत्याशी आहे, म्हणजे नात्यापलीकडे जावून मैत्री. आत्यांची आनंदमामाशी आहे. तुझी आणि आत्यांची आहे. हा नात्यापलीकडचा स्नेह आहे. आता असा स्नेह नात्याबाहेरील पुरूषांशी जडू शकेल.

    शेवटची उपमा तू फार ताणू नकोस. माणसं असतात ना रे! साने गुरूजींपासून ग्रेस पर्यन्त. तर ग्रेस पुरते कळत नाहीत तशा काही बायका कोडी बनून येतात, तरी त्या कळत नाहीयेत हे कळतं. इंग्रजी बाळबोध पुस्तके कळतात पण त्यात कुणाला रस असतो? जी वाचली तरी कळत नाहीत त्यात भाषेचा अडसर, हे एक कारण वाढतं.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...