Monday, August 30, 2010

काळजी

आमच्या घरी बाबांनी माझी कधी काळजी केली नाही. आई करत असे, पण बाबा करत नसत त्यामुळे घराला तसं वळण नव्हतं. यावेळेच्या आत घरी पाहिजे असंही काही नव्हतं. पण थेट नसलं तरी मर्यादांची अदृश्य परीघं असतातच की! ती माझ्या समजुतीप्रमाणे मी कधी ओलांडली नाहीत. म्हणजे घराने मर्यादेची रेघ ओढलेली नव्हती इतकंच. इतकंच कसं? आजूबाजूच्या घरांशी तुलना करता किंवा न करताही हे खूपच होतं.
 मिलिन्दकडे त्याचे बाबा काळजी करतात, सुरूवातीला मला ते छान वाटलं (आईचं काळजी करणं तसं कधी वाटलं नाही, हं!) पण नंतर नंतर लक्षात येत गेलं, कोणीतरी आपली काळजी करणं म्हणजे पायातल्या बेड्याच असतात.
 काळजी करणं म्हणजे आपल्यावर ’अविश्वास दाखवणं’ असतं, आपल्या क्षमतेबाबत शंका घेणं असतं. (म्हणजे या हेतूने कोणी काळजी करतं असं नाही.) काही वेळा काळजी करणं म्हणजे व्यवस्थेवरचा अविश्वास असतो, समाजावरचा अविश्वास असतो. म्हणजे मी खूप चांगली/ व्यवस्थित गाडी चालवीत असेन पण म्हणून मला अपघात होण्याची शक्यता मावळत नाही तर इतर सगळ्यांनीही नीट गाडी चालवली पाहिजे. बर्‍यापैकी लोक बर्‍यापैकी गाडी चालवतात असा विश्वास पाहिजे, आलाच प्रसंग तर मी तो निभावून नेऊ शकेन याबाबत खात्री पाहिजे. मधेच ट्रॅफिकजाम होऊ शकतो, कोणी भेटू शकतं, अशा सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या म्हणजे जर मला यायला उशीर व्हायला लागला तर काळजी वाटणार नाही.  प्रत्येकाला आलेले अनुभव वेगळे असतात, त्यातून तो घडत जातो. त्यामुळे काळजी वाटणं कमी जास्त प्रमाणात असू शकतं, आपण हे ही समजून घेतलं पाहिजे.
 मिलिन्द माझी कधी काळजी करत नाही. ( कधी कधी मला वाटतं याने माझी जरा काळजी करावी.) मलाही त्याची कधी काळजी वाटत नाही.  मिलिन्द मुंबईला होता तेंव्हा त्याचा मित्र ज्याची बायको आणि मुलगा पुण्यात राहात असे, रोज रात्री तासभर फोन करून इथलं घर चालवत असे, म्हणजे मुलाचा अभ्यास, शाळा, खोड्या, इतर प्रश्न. मिलिन्दने हे केलं नाही. मला एकटीला सारं सांभाळता येणार नाही असं त्याला कधी वाटलं नाही. (आता तर या गोष्टीचा तो गैरफायदा घेतो की काय असं मला वाटतं) असं काळजी न करण्यामुळे आपण स्वतंत्र, सुटे होत जातो. आपल्या क्षमता कमाल मर्यादेपर्यन्त वापरू शकतो. आत्मविश्वास वाढतो. एकूणच जगण्याचा दर्जा उंचावतो.
 तर मुख्य मुद्दा असा की काळजीच्या बेड्या काढून फेकल्या पाहिजेत. काळजी म्हणजे प्रेम नाही हे लक्षात घेतलं पाहिजे (जरी त्याची सीमारेषा अंधुक असली तरी) कुठल्याही प्रेमाने तुमचा विकास थांबवायला नको. तुम्हांला परावलंबी बनवायला नको.

**************

हल्ली या वर्षादीडवर्षात मीही काळजी करणारी झाले आहे की काय अशी मला शंका येते आहे. मग मी विचार करायला लागले. मला, कुणाला उशीर झाला तर, अपघातांची, आजारपणाची, मरणाची काळजी वाटत नाही. मला माणसांच्या आत्मसन्मानाची काळजी वाटते, ती दुखावली गेली तरची काळजी वाटते, उरातले खोल घाव सांभाळत ती कशी जगतील याची काळजी वाटते, मनासारखं जगायला न मिळणार्‍यांची काळजी वाटते, संवेदनशील माणसांची संवेदनशीलता आपल्या समाजात जपली जाईल ना? याची काळजी वाटते, विचार न करता जगणारांची काळजी वाटते.......... या सगळ्या काळज्यांचही काय करायचं ते वेळ काढून एकदा ठरवायला पाहिजे.

***********

1 comment:

  1. व्यवस्थेवरचा अविश्वास असतो, समाजावरचा अविश्वास असतो.... हे कटु सत्य आहे. त्यामुळेच काळजी, ताण याचे प्रमाण वाढले आहे. इथे व्यक्तीवरचा अविश्वास हा भागच नाही.

    -वैशाली

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...