Sunday, November 21, 2010

कमावतं असणं / नसणं

तुमचे स्थान हे तुम्ही कमावतं असण्यावर अथवा नसण्यावर अवलंबून आहे असे तुम्हाला वाटते का?
कमावतं असण्या-नसण्यावर आपलं घरातलं स्थान अवलंबून नसतं.आणि ते तसं असूही नये.
MSc ला होते, तेव्हा मला कमावतं होण्याची घाईच झालेली होती. रिझल्ट लागण्याआधीच नोकरी मिळाली आणि माझ्या माझ्या आर्थिक जबाबदार्‍या मी उचलू लागले. लग्न ठरलं तेव्हा मी लग्नाच्या बाबतीत फ़ारसा काही वेगळा विचार केला नाही - म्हणजे कोर्टमॅरेज वगैरे. पण आपल्या लग्नातल्या खर्चाचा थोडातरी वाटा आपल्याला उचलता यायलाच हवा हे मात्र माझ्या डोक्यात पक्कं होतं. लग्नानंतर काही काळ आणि वेदात्मनच्या जन्मानंतर काही काळ मी कमावती नव्हते. खरंतर घरातलें सगळे आर्थिक व्यवहार मीच बघत होते. घरातले आर्थिक किंवा इतरही निर्णय आम्ही एकमेकांशी बोलल्याशिवाय घेत नव्हतो. माझ्याकडे भरपूर मोकळा वेळ होता. मोकळा वेळ कसा घालवायचा याचीही मला कधी चिंता पडली नाही. रोजच्या जबाबदार्‍या सांभाळून माझे कधी आवडीचे, कधी आवश्यक, कधी अनावश्यकही उद्योग चालूच असत. घरी असल्यामुळे बरेचदा आपण गृहीत धरले जात आहोत हे जाणवत असे, पण त्याबद्दल फ़ारसं काही वाटून घेतलं नाही. थोडंफ़ार हे होणार हे मीही गृहित धरलेलंच होतं. पण तरीही आपण कमावत नाही म्हणून मी अस्वस्थच असे. जगदीशचा कधीच आग्रह नव्हता मी कमावतं असावं असा. किंवा तो कधी घरातल्या खर्चांबद्दल मला विचारतही नसे/ नाही. पण आपण कमावत नाही म्हणून अस्वस्थ रहाणं हा माझ्याच स्वभावाचा भाग होता. आर्थिक बाजूचाही शक्य तेवढा वाटा तरी आपल्याला उचलायलाच हवा आणि ज्या क्षेत्रात शिक्षण घेतलं त्यात आपण काहीतरी करत रहायला हवं या उद्देशाने मी पुन्हा घर, मुलं आणि नोकरी या सगळ्या डगरींवर हात ठेवता येईल असं काम पाहिलं. यासाठी घरी बसून कमावतं रहाण्याचेही पर्याय होतेच. पण नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडल्यावर आपलं म्हणून एक वेगळं वर्तुळ तयार होतं, घरापासून थोडा काळ दूर रहाणं चांगलंच असतं - अशा सगळ्या कारणांमुळे मी कमावतं असणं आणि त्यासाठी काही काळ घराबाहेर असणंच स्वीकारलं. त्यामुळे माझ्या बाबतीत तरी कमावतं असण्याचा आणि घरातल्या स्थानाचा काही संबंध नाही.

कमावतं असण्याचे फ़ायदे-तोटे :
याबद्दल विद्याने लिहिलं आहेच.
कमावतं असताना मिळणारं कामाचं appreciation ही आणखी एक जमेची बाजू. घरी असताना ते जवळजवळ नसतंच.
मागे विद्याने लिहिलं होतं तसं, मी कमावत नव्हते त्या काळात मला स्वतःसाठी काही खर्च करताना प्रशस्त वाटत नसे. अत्यावश्यक, आवश्यक, अनावश्यक अशा चाळण्या लावून मी स्वतःसाठी वस्तू खरेदी करत असे. आताही त्या चाळण्या असतातच, पण चाळणीची छिद्रं जरा मोठी. यालाही बाकी कारण काहीच नाही. स्वभावातल्या गाठी एवढंच.
आपण घर सांभाळत असतो तेव्हा सगळ्यांकडूनच गृहित मात्र धरले जातो. असं होणं हे थोडंफ़ार स्वाभाविक आहे असं म्हणलं तरी त्रास होतोच.

बाहेरील व्यक्ती तुमच्या कमावतं असण्या/नसण्याकडे कसं बघतात? त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम :
बाहेरील व्यक्तींच्या प्रतिक्रिया सगळ्याच प्रकारच्या असतात. म्हणजे घरी असताना - बरं झालं घरी आहेस ते- मुलांना वेळ देता येतो. (किंवा अगदी टोक म्हणजे, बाई घरी असली की घराला घरपण असतं!) किंवा बायकांचं हे असंच - मुलं झाली की करियर वगैरे गुंडाळूनच ठेवावं लागतं. आणि बाहेर पडल्यावर - बरं झालं पुन्हा नोकरी धरलीस ते. मुलंही लवकर सुटी होतात. वगैरे वगैरे.
मला वाटतं, बघेनात का कसेही. आपली उद्दिष्टं स्पष्ट असली आणि आपण त्यांच्याशी प्रामाणिक असलो की पुरे आहे.
पण नेहमीच बाहेरच्यांना इतकं सहजपणे कानाआड नाही करता येत. कधीतरी कुणीतरी जिव्हारी लागणारं काही बोलून जातं. मग ते बोल मागे टाकण्यासाठी स्वतःशीच झगडणं- स्वतःला समजावणं आणि त्याची बोच कमी करत रहाणं.

3 comments:

 1. कमावतं असताना मिळणारं कामाचं appreciation ही आणखी एक जमेची बाजू
  अश्विनी, हा मुद्दा माझ्याकडून निसटला होता आणि आपलं म्हणून एक वेगळं वर्तुळ तयार होतं, हा मुद्दा राहिला होता.
  ज्या घरांत फार प्रश्न आहेत, एकत्र कुटूंब आहे तिथल्या बाईची नोकरी म्हणजे घरापासून एक सुटकाच असते. मोकळा श्वास घेतायेण्याजोगी जागा.
  नोकरी असण्याची / कमावतं असण्याची एक शक्ती असते. पुरूषांना ’मला सोडून कुठं जाईल?’ चा माज करता येत नाही.
  त्यासाठी केवळ कमावतं असणं पुरेसं नाही, मनानेही स्वतंत्र असायला हवं, तसं असेल तर जरूरीपुरती नोकरी तुम्ही केंव्हाही मिळवू शकता.
  मुलींनी शिकताना हॉस्टेलवर राहिलंच पाहिजे म्हणजे आपण वेळ पडल्यास एकट्याही राहू शकतो, स्वत:चं ओझं स्वत: उचलू शकतो ची हिंमत येते.

  ReplyDelete
 2. Kamawana -- mhanaje Nokari karana.., ha vichar ka.?
  Nokari cha ekach phayada mhanaje "Fixed Income" , tyacha ek source jar ghari asel tar ,vegalya watene jayala kay harkat aahe..?
  Jya kshetrat shikhan ghetala tyatach kam karayala pahije , asahi rule nasava,

  ReplyDelete
 3. Dear All,
  Greetings!
  I think this is very Important Issue as Hamdlaing money is the first exprience of Power, We donot allow younger person to pay the bills and it is just to show the power, Even the girls do not accept that husband is less educatied then her and earns less then what she earns! so it is big mental block in mings of people, we need to change thinking and Consider Life is ruing on two wheels Fand M. Equality is the feeling to be enjoyed whave you seen the filn new one English vingalish - it states and gives nice view!

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...