Friday, May 28, 2010

रमा

मिलिन्दच्या एका मित्राने संगमनेरला एक तीन मजली, नगर जिल्ह्यातली सर्वात मोठी अशी फर्निचरची शोरूम काढली आहे. त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो. त्या इमारतीवर दिव्यांच्या माळा वगैरे, तिथे जेवण होतं. मध्यभागी सॅलडचं डेकोरेशन, एक बर्फाचा मोठा गणपती, एका बाजूला पाणीपुरी, कुल्फी असे स्टॉल्स, दुसरीकडे सगळे जेवणातले पदार्थ, दोन तीन गोड पदार्थ. श्रीमंती अशी वाहत होती.
हा मिलिन्दचा मित्र स्वत:च्या कर्तृत्वावर मोठा झालेला. आमचं लग्न झालं तेव्हा वडीलांचं छोटं दुकान होतं. पुढे सगळा व्यवसाय यानेच वाढवला. आता तर गावातल्या कॉलेजच्या संचालक मंडळावर आहे. आणखीही काय काय करत असेल.
आम्ही गेलो, अगदी ’ या! या!’ मिलिन्दचे बाकीचेही बरेच मित्र आलेले होते. शोरूम पाहून आलो, म्हंटलं,”छान आहे.” मी विचारलं, ” हे बाजूचं वर्कशॉप आहे का?” ” नाही, पूर्वी होतं. आता आपली (आपली??? ती त्याची स्टाईल आहे.) दोन युनिट्स MIDC त आहेत. एक पावडर कोटींगचं नवं आहे.” पुढे म्हणाला,” वहीनी, तिकडे बसा ना, रमा तिथेच आहे.” रमा म्हणजे त्याची बायको. मी तिकडे गेले. तिथे पूजा केलेली होती.
मी प्रसाद घेतला. रमाला शोधत होते. साताठ वर्षांपूर्वी भेटले होते. चेहरा नीट आठवत नव्हता. तिथे असणार्‍या बर्‍याच बायकांपैकी एक रमा मी निश्चित केली. खरं तिच्याभोवती फार बायका नव्हत्या. ती एकटीच उभी होती, मला वाटलं तीच असावी. मी विचारलं, ’रमा ना?’ ’हो’ मग मी माझी ओळख करून दिली. सांगीतलं शोरूम छान आहे, वगैरे. ती मला यजमाणीन वाटतच नव्हती. ती इतकी अलिप्त दिसत होती, ताणाखाली वाटत होती. ’ तुम्ही जे सगळं पाहताय ते माझं आहे’ असे कुठलेही भाव तिच्या चेहर्‍यावर नव्हते. ती मिरवत नव्हतीच. मी निघताना तिने माझे हात हातात घेतले,’जेवून जा, नक्की." तिचे हात गार होते. आजचा प्रसंग तिला निभावून न्यायचा होता??

परात्मता... त्या समारंभाचा ती हिस्सा नव्हती.

का बरं?

तिचं लग्न झालं तेव्हा नवरा छोटा व्यावसायीक होता. त्याच्या छॊट्याशा वर्तुळात ती आत्मविश्वासाने वावरत असणार. सासू-सासरे, दीर, सगळ्याचं ती करत होती. तिच्या कष्टांना किंमत होती. नवर्‍याचं वर्तूळ वाढत गेलं. भराभर तो मोठा होत गेला. श्रीमंती येत गेली. किती साड्या आणि दागिने घेणार?? त्यालाही मर्यादा आहे, शेवटी ओझ्याच्याच गोष्टी त्या! ती सराईत झाली नाही, दुसरी एखादी झाली असती कदाचित. तिच्या घरी तीच पाहुणी होऊन राहिली होती?

********बायकांचं काय असतं? घर नवर्‍याचं, मुलं त्याची, त्याचं नाव लावणारी ......

मला नेहमी वाटतं, अध्यात्मात जाणं बायकांना किती सोपं आहे. संसार असार आहे वगैरे. सगळं सोडून बायका हिमालयात तरी का गेल्या नसाव्यात? जावून तिकडेतरी शोधा की मोक्ष बिक्ष काय आहे ते!

सतत दुय्यम होऊन राहणं का स्वीकारतात त्या?

आपल्याकडे बायकांनी विचार करावा, प्रश्न विचारावेत, बदलाची अपेक्षा ठेवावी.... असं काही वाढवलंच जात नाही त्यांना.

************

1 comment:

 1. We do not see things as they are. We see them as we are. असं एक quotation आहे.
  हाच राशोमोन इफेक्टसुद्‍धा. (you see what you want to see).

  यातली जी रमा आहे ती प्रत्यक्षात माहेरची सधन शेतकरी कुटुंबातली आहे. डामडौल, वैभव तिच्यासाठी परके नाही. सासरी ते दिसायला उशीरच झाला.

  तिच्या वर्तुळातल्या, सवयीच्या लोकांबरोबर ती सराईतपणे / मालकिणीप्रमाणे वावरते. (त्यादिवशीही वावरत होती)

  वागणे, दाखवणे, वावरणे याबाबतीतले शहरी/मध्यमवर्गीय/ब्राह्मणी निकष आणि त्यांचे निकष वेगळे असतात.

  तिची अलिप्तता/ परात्मता नसेलच असे मला म्हणायचे नाहीये. त्या निष्कर्षापर्यंत पोचण्याएवढा तिचा आणि माझा परिचय नाही आणि बहुधा होणारही नाही.

  या टिप्पणीच्या सुरुवातीस लिहिलेली वाक्ये माझ्या टिप्पणीसही अर्थात लागू आहेतच.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...