Sunday, February 28, 2010

पहिली माझी ओवी गं.....

समाजात कुटुबांनी सुखी दिसण्याचं खूप दडपण असतं.(तेही समाजाच्या दृष्टीने सुखी) ते सगळं अर्थातच घरातल्या बाईवर असतं. त्यामुळे सासरघराशी, नवर्‍याशी पटवून तर घ्यावंच लागतं पण त्याचा देखावाही चारचौघात करावा लागतो.( हे दुहेरी दडपण आहे.)
आपण हे का समजून घेत नाही, कुठल्याही दोन माणसांमधे मतभेद असणं ही स्वाभावीक गोष्ट आहे. तसे ते नवरा-बायको या नात्यातही असणार. मतभेद असूनही ते नातं निरोगी असू शकतं. दोन माणसांचं सगळ्याच बाबतीत कसं पटू शकेल?
पूर्वीच्या एकत्र कुटूंबात / बायका एकत्र कामे करीत तेंव्हा या मतभेदांना, जाचाला मोकळं करायला काही जागा तरी होत्या. समदु:खी एकमेकींशी बोलून आपल्या भावनांना वाट करून देऊ शकायच्या. आताच्या विभक्त कुटूंबांमधे तशी जागाच राहिलेली नाही. त्या बाईने सोसायचंही आणि बोलायचंही नाही. तारेवरची कसरत आहे ही! पूर्वीच्या बायका ’ हे नशीबाचे भोग’ म्हणून स्वीकारायच्या. पण आजच्या शिकलेल्या बाईने हे कसं स्वीकारायचं?
सोसणं थांबवणं शक्य होतंच असं नाही, निदान बोलणं आणि मोकळं होणं यासाठी तरी आपल्या कुटूंबांमधे जागा पाहिजे. कोणाशीतरी बोलल्यामुळे ती व्यक्ती मार्ग दाखवते असं नाही, मार्ग आपल्यालाच शोधावा लागतो, पण बोलून ते मागे टाकून पुढे जाण्याच्या शक्यता तरी निर्माण होतात. असं मनातलं बोलण्यासाठी कोणी उरलंच नाहीये आपल्या कुटूंबपद्धतीत.आणि फ्लॅटसंस्कृतीमुळे समाजात. मग बोलायचं कोणाशी तर नवरा बायकोंनी एकमेंकांशीच. त्या नात्यावर सगळंच सांभाळायची जबाबदारी येते. ते सगळं पेलायची त्या बिचार्‍याची कुवत असते का?( मागे साप्ताहिक सकाळ मधे यावर एक चांगला लेख आला होता. कोणाला हवा असल्यास शोधून ठेवीन.) आपला नवरा कोणी सुपरमॅन नाही,( आपण सुद्धा सुपरवुमन नाही, व्हायचंही नाही.) त्याच्या मर्यादा जाणून घेणे आणि त्याला स्वीकारणे याशिवाय अन्य पर्याय नाही.( त्याच्यापुढेही याच्यापेक्षा वेगळा काय पर्याय असतो? )
आपणही मोकळे होण्याचे मार्ग शोधले पाहिजेत. एकटेपणा, नैराश्य या गोष्टी आपल्याही समाजात वाढत चालल्या आहेत.
पूर्वी बायका दळायला बसायच्या, कष्टाचेच काम ते. दळता दळता ओव्या म्हणायच्या श्रमाचाही भार कमी वाटायचा आणि मनही मोकळं व्हायचं. द्ळण नसलं तरी, आपणही आता सुरू केलं पाहिजे, पहिली माझी ओवी गं.....

*************

एका ८० वर्षांच्या म्हातार्‍या बाईची गोष्ट वाचल्याचे लक्षात आहे. संधीवात झालेला, रुग्णालयात भरती केलेलं, सांधे आखडलेले, काही हालचाल करणं शक्य नाही, सांगितलेले व्यायाम करायची नाही. डॉक्टरांना कळेना कसे करावे, ही आजीबाई काही साथच देत नव्हती. नवीन आलेल्या फिजिओथेरपिस्ट्ने आजींना एक उशी देऊन सांगितलं की हा तुमचा नवरा आहे असं समजा आणि हातांच्या मुठी करून उशीवर मारा. या सल्ल्यामुळे आजी पंधरा दिवसात बर्‍यापैकी बर्‍या झाल्या.

*************

4 comments:

  1. नवरा बायको, किंवा दोन व्यक्ती,दोघांमध्ये मतभेद हे असणारच.मी नेहमी विचार करते. मतभेद होतात तर ते का होत असतील? विचार वेगळे,आवडी-निवडी वेगळ्या, का यापेक्षाही काही वेगळच? नेहमी अश्यासाठी म्हणते याचे कारण एखादी गोष्ट वारंवार तशीच्या तशी घडते.पण प्रत्येक वेळी मनात एक आशा असते की कदाचित यावेळी तो आपल्या म्हणण्याला हो म्हणेल.....एक साध उदाहरण देते.कौस्तुभला चित्रपटग्रुहात जाऊन सिनेमा बघायला नाही आवडत?(मग ते प्रभात सारख साध का असेना.....)अनेकवेळा मी हे त्याला विचारते.मलाही फारसं सिनेमाच वेड नाही. पण आजकाल येणारे वेगळ्या विषयाचे सिनेमे मी बघायचे नाही सोडत.प्रत्येक वेळी मी त्याला विचारल्यावर तो पहील्या झटक्यातच नकार देतो.किंबहुना तसं तो नाही म्हणणार याची पूर्ण खात्री मला प्रत्येक वेळी असते.तरीपण मनात कुठतरी असं वाटत असतं की कदाचित यावेळेला तो हो म्हणेल.किंवा त्याने मला बर वाटावं म्हणून तरी हो म्हणावं..........हे एक उदाहरण सांगितलं.जर क्षणभरासाठी असं ठरवल की नवरा-बायको म्हणुन दोघेही दोन वेगळ्या व्यक्ती आहेत व त्यांच्या आवडी-निवडी या वेगळ्या असणारच आणि त्यानुसार त्यांच्यात मतभेद हे होणारच.तर अश्यावेळी दोघांचे मार्गही दोन होऊन जातील.जसं स्त्री म्हणून प्रत्येक वेळी जरी तिची आवड नसेल तरी केवळ नव-याच्या आवडीप्रमाणे तरी असे ठरवून त्यानिमित्ताने आपण घरातले (नवरा-बायको व त्यांची मुले ) एकत्र काही काळ घालवू असे त्या स्त्रीला जितके मनापासून वाटत असते तितके त्या नव-यांना वाटते की नाही ?का तो भागच पुरुष म्हणून त्यांच्या कप्प्यात नसतोच.की तसा ते आव आणतात.का समोरची विचारुन विचारुन मागे लागून थकेल आणि विचारायचे थांबेल किंवा आपला वेगळा मार्ग निवडेल?ही भावना त्याच्या मनात असते का माहीत नाही.म्हणजे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य जरुर आहे पण त्यामध्ये नात्याच्या जवळच्या व्यक्तींचा त्यात विचार केला गेला नाही की मतभेद हे होणारच.

    ReplyDelete
  2. दीपाताईचे पटले.. माझ्या लग्नानंतरही नवर्याचे सर्वस्व त्याचे मित्रच (आई-वडील एकवेळ समजून घेता येते) आहेत.. त्याला बरे वाटावे म्हणून मी त्यांच्यात मिसळतेही.. पण म्हणून मला बरे वाटावे म्हणून त्याला काही करावे असे वाटत नाही.. (जसे कि आमच्या दोघांसाठीच वेळ काढणे.. इत्यादी)
    अश्या वेळी शांतपणे बोलले कि नवरा एकदम भांडणावर येतो (मित्र हा त्याच्यासाठी एकदम वीक पोइंत आहे).. सासुबैंना वाटते.. कि मीच भांडणे उकरून काढते.. म्हणून मी आता बोलणेच सोडून दिले आहे.. गप्प असते.. पण एकटे पडल्याची जाणीव खूप अस्वस्थ करते.. (माझे इथे पुण्यात कोणी मित्र-मैत्रिणी नाहीत आणि अजून गाडी येत नसल्याने एकटीने कुठे जाता पण येत नाही :( ) मी उदास असते.. तेव्हा सासूबाई म्हणतात.. आपल्या मनात कितीही दु:ख असले तरी ते बाहेर दिसता कामा नये.. आणि दीर वैगेरे लोकांच्या नजरेत दिसते कि "आता काहीही भांडण नाही तरी हिचे तोंड वाकडेच दिसते".. साधे व्यक्त होण्याचेही स्वातंत्र्य नाही... बोलूनही नाही.. आणि सदैव खोटा आनंदाचा तमाशा करायचा...खूप ताण येतो..

    ReplyDelete
    Replies
    1. लग्न ही एक व्यावहारीक गोष्ट आहे.
      लग्नाविषयी आपण खूप रोमॅंटीक कल्पना घेऊन असलो तर नैराश्य येऊ शकते.
      ’बोलणे थांबवणे’ हे काही उत्तर नाही.
      ठरवून, दोघांची चांगली मनस्थिती असताना, बोलणे केलेच पाहिजे.
      त्यातला एक महत्त्वाचा मुद्दा असा असू शकेल ’ या या गोष्टींचा मला खूप त्रास होतो, तुझ्या दृष्टीकोनातून त्या गोष्टी त्रास करून घेण्यासारख्या नसतीलही पण मला त्रास होतो हे खरं आहे, मला त्रास होऊ नये अशी तुझी इच्छा असेलच ना? तर या गोष्टींचं काय करूया?"
      >>आपल्या मनात कितीही दु:ख असले तरी ते बाहेर दिसता कामा नये..
      आधीच्या पिढीतल्या बायकांची हीच रित होती, हा त्यांचा स्वानुभव असू शकेल.
      पाहुण्यांसाठी हे ठीक आहे, जवळच्या माणसांसमोर, नवर्‍यासमोरही कायम मुखवटा घालून कसे वावरता येणार?
      खूप ताण येत असणार.... खरं आहे. लग्नानंतर इतक्या नवनवीन गोष्टींशी जुळवून घ्यावं लागतं की कधी कधी माझी मी उरणार आहे की नाही? अशी शंका यायला लागते. या बाकीच्या सगळ्या परीस्थितीचं खापर फोडायलाही एकटा नवराच समोर असतो, हे असं होऊ द्यायचं नाही. तो त्याच्या घरात राहात असला तरी मानसीकदृष्ट्या तो ही अनेक बदलांना सामोरा जात असतो.
      सोसायचं पण बोलायचं नाही, असं नाही चालणार. कुठेतरी मन मोकळं करता आलं पाहिजे.
      आपल्या समाजात विवाहपूर्व समुपदेशनाची अत्यंत गरज आहे.
      शुभेच्छा!

      Delete
    2. जसं स्त्री म्हणून प्रत्येक वेळी जरी तिची आवड नसेल तरी केवळ नव-याच्या आवडीप्रमाणे तरी असे ठरवून त्यानिमित्ताने आपण घरातले (नवरा-बायको व त्यांची मुले ) एकत्र काही काळ घालवू असे त्या स्त्रीला जितके मनापासून वाटत असते तितके त्या नव-यांना वाटते की नाही ?>>

      दीपश्री.. नवरयाच्या आवडीला आपली आवड मानून संसार करायचे जे संस्कार पुरुषप्रधान संस्कृतीत आपल्यावर झालेत तसे ते नवरेलोकांवर झालेले नसतात.. म्हणून असं होत..

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...