Tuesday, October 23, 2012

व्रत वैकल्ये -- २


अश्विनी,
>> उत्सव साजरा करण्याची एक पद्धत यापलीकडे त्याला काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही.
अगदी मान्य!
आपण फक्त महत्त्वाच्याच गोष्टींवर लेख लिहितो असं नाही. :)
यावर मला लिहावं असं वाटलं, कारण ही प्रथा सर्वव्यापी होत चालली आहे,
दुसरं असं की सकाळपासून रात्रीपर्यन्त , जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय.
ही उत्सव साजरा करण्याची पद्धत लवकरच रूढी होत जाईल, असं मला दिसतं आहे, त्याचे साक्षीदार आपण आहोत. त्याची नॊंद करून ठेवली पाहिजे असं मला वाटलं.
आणि समाजमनाची मानसिकता कशी असते? हे काही शोधता येईल का यावरून? हे पाहावंसं वाटलं.

ही प्रथा देवीच्या अवाढव्य मूर्ती, मोठाले मंडप किंवा कर्णकर्कश्य आवाज.... यासारखी अनिष्ट नाही. तिचं उपद्रव मूल्य काही नाही. असं जे म्हणते आहेस त्यावर मला वेगळं सांगायचं आहे.
पर्यावरणावर, समाजाच्या रोजच्या व्यवहारांवर अनिष्ट परीणाम करणार्‍या प्रथा तेव्हढ्या अनिष्ट आणि माणसाच्या मनावर परीणाम करणार्‍या , त्याला अनिष्ट वळण लावणार्‍या प्रथांना काय म्हणायचं? तशा प्रथा धोकादायक नाहीत का?

 पहिला लेख लिहिल्यावर मी एक क्रियापद वापरलं जाताना ऎकलं, नवरात्र पाळणे! रंग पाळणे!
या प्रथेला धार्मिक अस्तर आहे त्यामुळे सर्वसामान्यांत प्रथा नाही पाळली तर कोप होणार, अर्धवट सोडली तर आणखी काहीतरी होणार, नऊ दिवस नाही तर निदान एक दिवस पाळलंच पाहिजे..... असलं काय काय सुरू होईल.
मग रंग पाळल्याने कोणाची कशी भरभराट झाली च्या कहाण्याही येतील.
 दुसरं असं की कोणीतरी अज्ञात व्यक्ती ठरवताहेत आणि समाजातले बरेच लोक पाळण्याच्या मागे आहेत, चर्चा करताहेत. म्हणजे आकाशवाणी झाली "हे करा" की प्रश्न न विचारता लोक करताहेत, ही कशी मानसिकता आहे? ती आहेच, यानिमित्ताने दिसली, जशी अन्य निमित्तांमुळेही दिसते.
 -----
या मुळे मला एक जुना प्रसंग आठवला.
मी आठवीत असेन. औरंगाबादला गावात हडळ आली आहे, अशी अफवा उठलेली. जर तुम्ही हळदी-कुंकवाचे हात दारावर उठवले तर हडळ त्याला घाबरते, आणि त्या घरात जात नाही, असं होतं. पेपरमधून बातम्या, हळदी-कुंकवाचे हात उठवलेल्या घरांचे फोटॊ वगैरे. आम्ही ज्या निम्न मध्यमवर्गीय भागात राहतो, तिथे आजूबाजूला खूपच हात दिसत होते. हडळ येते की नाही माहीत नाही पण हात उठवण्यात काय तोटा आहे? झाला तर फायदाच!.... आमच्या घरावर अर्थातच असलं काही केलेलं नव्हतं. आमच्या मागे राहणार्‍या काकू आल्या आणि हात उठवले पाहिजेत वगैरे बोलायला लागल्या. आम्ही ते उडवून लावत होतो. विशेषत: बाबा!  बाबा म्हणाले रात्री दार वाजलंच, हडळ आली तर तिला सांगा मागे कुळकर्ण्यांकडॆ जा. ती इकडे आली की आम्ही बघून घेतो. बराच वेळ मजा चाललेली.
 शेजारचा एक शहाणासुरता माणूस ठामपणे नाही म्हणतोय याचा परीणाम त्या बाईवर झाला आणि तिने हात उठवले नाहीत.
मला भारी वाटलं, मग शाळेत किंवा कुठेही या विषयावर बोलणं चाललेलं असलं की आम्ही ते उडवून लावत असू. नाही म्हंटलं तरी त्याचा परीणाम होतो.
------
दुसरी एक गोष्ट आठवते, आहे.
 ताईने इथे दीडवर्ष राहून तिचं पीएचडीचं काम केलं. मनापासून आणि खूप छान. तिचे कष्ट दिसत होते, आम्ही पण चर्चांमधे सामील असायचो, तिच्या शोधनिबंधात जरा गुंतलेले.
नंतर सावकाश व्हायवा होती. त्यादिवशी विद्यापीठात ती एकटीच गेली. निदान तिच्या आई आणि बाबांना न्यायला हरकत नव्हती. तिचं कौतुक ऎकायला छानच वाटलं असतं.
 ती म्हणाली होती. तिथे व्हायवा म्हणजे नातेवाईकांची गर्दी होऊन बसते. डॉक्टरेट मिळणं हा एक उत्सव असल्यासारखं नटून थटून नातेवाईक येतात. नंतरच्या खाण्यापिण्याविषयीचंच बोलणं सुरू असतं. विद्यापीठातल्या या प्रथेला माझा ठाम विरोध आहे. त्यावेळी अभ्यासविषयक चर्चाच , पुरेशा गांभीर्याने व्हायला हवी. आई - बाबा तिथे शांत राहून ऎकतील, साध्या कपड्यात असतील, खरेच आहे. विद्यापीठातली ही पद्धत बंद व्हावी असं मला वाटतं, ते मला माझ्या कृतीतून दाखवून द्यायचं आहे. ती एकटीच गेली. घरी आल्यावर संध्याकाळी आम्ही पार्टी केली.
-----
  सांगायचा मुद्दा असा की समाजातले बहुसंख्य लोक अशा पद्धतीने एका बाजूला झुकलेले असतात तेंव्हा काहीजणांनी तरी ठामपणे उभं राहायला लागतं आणि काही वेळा समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून दुसर्‍या बाजूला झुकायला लागतं.
----
अश्विनी, धन्यवाद! रंग पाळणारांच्या बाजूने काही बोलत/ लिहित राहीलीस.
म्हणून चर्चा पुढे गेली.

*******
माझ्या मनात एक कल्पना , पहिला लेख लिहिला तेव्हाच येऊन गेली होती. ती अशी की आपण "इंद्रधनु" ने , आपल्या आजू बाजूच्या बायकांशी या विषयावर बोलून त्यांची मते नोंदवून ठेवायची. अजून दोन वर्ष हे सातत्याने करायचं. बघू काय निघतंय ते! हा एक छान प्रकल्प होऊ शकेल.
*******


8 comments:

  1. काल आपली व्रत-वैकल्ये/रूढी आणि त्यांचे पुढील पिढींपर्यंत पोचणारे संदेश ह्याबद्दल जी चर्चा चालली होती त्या अनुषंगाने मला खालील कविता आठवली.
    --------
    हस्तांतर - धामणस्कर

    विसर्जनासाठी गणपती नेताना
    मला मूर्ती जड झाली, तेव्हा
    उसळत्या तारुण्याचा
    माझा मुलगाच मला म्हणाला: द्या इकडे.

    मी मूर्ती तात्काळ मुलाच्या हातावर ठेवली
    चौरंगासहित.
    मुलानेही मूर्ती हातात घेतली नीट सावरून, तर
    मी एका दैवी आनंदात अकल्पित
    परंपरा पुढे सरकल्याच्या....

    मी पुन्हा तरूण ययातीसारखा;
    माझा मुलगा जख्ख म्हातारा,
    परंपरेच्या ओझ्याने वाकलेला....
    ------
    - सचिन

    ReplyDelete
  2. अश्विनीकडे अर्धवट वाद घालून झाल्यानंतर तू हा लेख लिहून तुझे विचार अधिक स्पष्ट केले आहेत. त्यामुळे ते अधिक नीट कळायला मदत झाली. लवकरच या विषयावर सविस्तर प्रतिक्रिया लिहून मी माझे मत मांडेन.

    ReplyDelete
  3. विद्याजी
    एबीपी माझा : ब्लॉग माझा स्पर्धा.पुरस्काराबद्दल मनःपूर्वक अभिंनदन.

    ReplyDelete
  4. "व्रत वैकल्ये" विषयावरील दोन्ही लेखांवर मिळून ही प्रतिक्रिया आहे.

    -----------------

    लेखाच्या शीर्षकातला "व्रत" हा शब्द मला पटलेला नाही. प्रथा म्हटलं तर चालेल? प्रथा हा शब्द तू देखील वापरला आहेस, त्यामुळे तुलाही तो चालेल असं वाटतंय.

    दिवाळीत आकाशकंदील लावायचं व्रत आहे का? मला तरी प्रथाच वाटते. गणपतीत मूर्तीची प्रतिष्ठापना? प्रथाच ना.

    नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे हे व्रत आहे असं का वाटतं हे समजून घ्यायला आवडेल.

    याचं एक "नविन" व्रत सुरू झालं आहे असं तू लिहिलं आहेस. आपल्याकडे हे नवीन आहे. मुंबई-ठाण्यात राहिल्याने मला लहानपणापासून ही पध्दत ठाऊक होती. आपल्याकडे नव्याने काही तरी पद्धत रूढ होते आहे. कदाचित ती प्रथाच पडेल, कदाचित रुढीही होईल, कदाचित खुळ (फॅड) असेल, निघून जाईल. (तात्पुरतं खुळ असण्याची शक्यता आता कमी झाली आहे, आणि प्रथा पडण्याची शक्यताच अधिक दिसते आहे, हे मान्य आहे.) वाढदिवसाला केक कापणे, ३१ डिसेंबरला रात्री नवीन वर्षाचे स्वागत करणे, या देखील अशा नव्या पध्दती आहेत.

    -----------------

    "पेपरात लिहून येतं आणि तुम्ही विचार न करता ते सांगतील ते करता" याला तुझा आक्षेप दिसतो. तो रास्तच आहे.

    मात्र हे इतक्या गोष्टींच्या बाबतीत म्हणता येईल की विचारता सोय नाही. अमुक रंगाचे कपडे घालण्याच्या प्रथेबद्दल तुझा जो आक्षेप आहे, त्यात "पेपरात लिहून येतं आणि लोक ते करतात" यामुळे होणारी चिडचिड मिसळते आहे, असं मला वाटलं.

    या प्रथेबाबतीत लिहून हल्ली येतं आहे. पद्धत त्यापूर्वीची आहे. ती अधिक लोकप्रिय करण्यात पेपराचा नक्कीच सहभाग असेल. पण पेपरवाले सांगतात (कुंभार) आणि लोक करतात (गाढव), असं ते मला वाटत नाही. (म्हणजे लोक विचार करत नाहीत हे मान्य आहे. पण पेपरवाले कुंभार आहेत आणि त्यांचं विचारपूर्वक चाललं आहे हे मान्य नाही. त्यांचंही लोकांसारखंच चाललं आहे.)

    -----------------

    >> आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?

    प्रथेचा संबंध एकदम पारतंत्र्याशी?!! होळीच्या दिवशी पुरणपोळी खाल्ली तर खायचं स्वातंत्र्य सोडून दिलं असंच? मुद्दाम त्या दिवशी पुरणपोळी खायचा आनंद नाही का? नऊ दिवस आवर्जून वेगवेगळ्या रंगांचे कपडे घालायचा आनंद नाही का? सगळेच जण त्या दिवशी तेच खाताहेत/ घालताहेत यामुळे तो आनंद कमी होतो की जास्त?

    "पारतंत्र्य - हुकुमशहा - इंजेक्शन्स - सैनिक/ दहशतवादी" हे जे विचार तू मांडले आहेस ते त्यांच्या जागी स्वतंत्र विचार म्हणून योग्यच वाटले. या विशिष्ट प्रथेतून (अगदी उदाहरणादाखल घेऊनही) निघणारा निष्कर्ष म्हणून मात्र अजिबातच पटले नाहीत.

    -----------------

    >> त्यात ती छोट्या समूहासाठी असते. आणि सहभागी होणारा/होणारी ते ठरवणार्‍या लोकांमधली एक किंवा त्यांच्या जवळची असू शकते/ असते. हे तसं नाही.

    एखादी गोष्ट साजरी करायला मोठा समूह, एक पूर्ण समाजघटक, किंवा संपूर्ण समाजच एकत्र आला तर त्याला तुझा आक्षेप आहे का? असला तर का आहे?

    नाटक किंवा सिनेमा आपण पाहतो तेव्हा आपल्याला अनोळखी असलेले प्रेक्षक किती महत्वाचे असतात. आपण आणि ते सगळे असं मिळूनच तो सोहळा असतो.

    क्रिकेटचा विश्वचषक आपण जिंकला, सगळा देश ते यश साजरं करण्यात गुंतलेला. आपण सामना बघत होतो आणि कुठूनतरी काही सेकंद आधीच लोकांच्या ओरडण्याचा आवाज येत होता. (साजरं करण्याच्या काही पद्धती – वाहतूक अडवून नाचणे, वगैरे - आपल्याला पटल्या नसतील, पण) सगळ्यांनी मिळून साजरं करणं यात मजा आहे.

    नाटक-सिनेमा एका मोठ्या समुहाचे सोहळे असतात. पण “सण” तर बऱ्याचवेळा संपूर्ण समाजाच्या स्तरावरच होतात. मोठ्या समुहाने एकत्र येऊन काही अर्थपूर्ण अथवा निरर्थक गोष्टी करणे मला आवश्यक वाटतं.

    -----------------

    थोडक्यात म्हणजे, (१) या प्रथेला व्रत म्हणणे, त्याबाबतीत पाळणे हा शब्दप्रयोग करणे, (२) पेपरात येतंय म्हणून ते अधिक आक्षेपार्ह मानणे, (३) त्याचा पारतंत्र्याशी संबंध जोडणे आणि (४) छोट्या समूहापर्यंत मर्यादित नाही म्हणून आक्षेपार्ह मानणे या गोष्टी मला पटल्या नाहीत.

    (अपूर्ण)

    ReplyDelete
  5. (मागून पुढे चालू)

    आता या प्रथेबद्दल माझं मत विचारशील, तर ही प्रथा अगदीच निरर्थक आणि बिनडोक आहे असंच मी देखील म्हणेन.

    अशा अनेक निरर्थक गोष्टी आपण (निदान मी) करत असू (असेन). (करत रहाव्यात असं मला म्हणायचं नाही.) उदा. आपण IPL चा एक सामना बघून आलो. निरर्थक मजाच नुसती. (पण कृत्रिम प्रकाशात जेव्हा असा एखादा सामना खेळवला जातो तेव्हा ग्रामीण भागात अनेक गावे अंधारात रहातील याचीच तजवीज होत असते ना.)

    वर ज्या मुद्द्यांना मी विरोध दर्शवला आहे, ते मुद्दे तू मांडले असलेस तरी मला वाटतं ते तुझे मुख्य मुद्दे नाहीतच.

    ही प्रथा धार्मिक आहे आणि त्यामुळे उद्या ती एक अनिष्ट रुढी होऊन बसण्याची शक्यता आहे, हा तुझा प्रमुख आक्षेप आहे.

    ही प्रथा पूर्णपणे धार्मिक आहे असं मला वाटत नाही. ती बहुतांश धार्मिक आणि अंशतः सांस्कृतिक आहे. शिवाय “लवकरच (ती) रूढी होत जाईल, असं मला दिसतं आहे” असं म्हणण्याइतकी खात्रीही मला नाही वाटत आहे. (बऱ्याच प्रथा अशा एकावेळी धार्मिक आणि सांस्कृतिक असतात. त्यातल्या काही अनिष्ट रुढी झाल्या असतील, पण कित्येक प्रथा आनंद देण्या-घेण्याच्या पद्धती म्हणून त्यातलं सांस्कृतिक अंग टिकवून आहेत.)

    पण तरी तुझ्या या मुद्द्याशी मी सहमत आहे.

    (केवळ) “या प्रथेला धार्मिक अस्तर आहे (म्हणून/) त्यामुळे (लगेच) सर्वसामान्यांत प्रथा नाही पाळली तर कोप होणार, अर्धवट सोडली तर आणखी काहीतरी होणार, नऊ दिवस नाही तर निदान एक दिवस पाळलंच पाहिजे..... असलं काय काय सुरू होईल.... मग रंग पाळल्याने कोणाची कशी भरभराट झाली च्या कहाण्याही येतील”.... असं मात्र मला नाही वाटत. म्हणजे तशी शक्यता अगदी शून्यच आहे असं नाही, पण अगदीच कमी असावी असं मला वाटतं.

    “सकाळपासून रात्रीपर्यन्त, जिम असो, शाळा असो, कार्यालय असो, लिफ्ट असो की दवाखाना असो,
    सगळीकडॆ त्यावर बोललं जातंय” हे तू कशाच्या आधारावर लिहिलं आहेस माहीत नाही. हे इतकं आहे? मला तसं तितकं दिसलेलं नाही. तसं असेल तर कठीण आहे.

    सहज म्हणून एखद्या वर्षी ही मजा करणं यात फार चुकीचं काही होतंय असं मला (अजूनही) नाही वाटत. तरी मला हे मान्यच केलं पाहिजे, की या प्रथेसंबंधी आपल्या वागण्याचा समाजावर काय परिणाम होत असेल, असा आणि इतका विचार मी केला नव्हता. तुझ्या लेखामुळे आणि तुझ्याशी झालेल्या वादामुळे तो करता आला.

    “सांगायचा मुद्दा” समाजातले बहुसंख्य लोक (“अशा पद्धतीने” हे शब्द वगळून) एका बाजूला झुकलेले असतात तेंव्हा काहीजणांनी तरी ठामपणे उभं राहायला लागतं आणि काही वेळा समतोल साधण्याचा प्रयत्न म्हणून दुसर्‍या बाजूला झुकायला लागतं, हे अगदी मान्य आहे.

    एखद्या वर्षी ऑफिसमध्ये विशिष्ट पद्धतीने (सार्वत्रिक प्रथेप्रमाणे) सण साजरा झाला, आता पुढच्या वर्षी “पुन्हा तसंच करू” असं ऑफिसमधील मंडळी म्हणायला लागली, तर मी म्हणेन, झालं की गेल्या वर्षी ते, आता या वर्षी काहीतरी वेगळी मजा करू.

    छोट्या छोट्या गोष्टींचा इतका विचार करायला लावल्याबद्दल धन्यवाद!

    ReplyDelete
  6. विद्या कुलकर्णी तुम्ही विजेता झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन व खरोखर खूप सुंदर लेख आहेत . असे लिखान सदैव चालू ठेवावी हि विनंती .

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...