Sunday, November 25, 2012

देवी अंगात येणं......

लहानपणी आमच्या बिल्डिंगमधे खालच्या मजल्यावर राणीच्या आई रहायच्या. कुटूंब मारवाडी होतं. त्यामुळे नवरात्रीचा सण मोठ्या प्रमाणात असे. तेव्हा नऊ दिवस त्यांच्या रोज अंगात यायचं. आम्हा मुलांना त्याबद्दल गंमत, असूया, उत्सुकता, भिती  अशा सगळ्या भावना असायच्या. त्यामुळे ९ दिवस ते बघायला आम्ही संध्याकाळच्या आरतीला जात असू. तिथं आम्हा सगळ्यांना सांभळून उभं रहावं लागे. कारण आरती सुरु झाली की हळूहळू त्या थरथरायला लागायच्या, आणि मग पूर्ण खोलीभर केस सोडलेल्या अवस्थेत पिसाळल्यासारख्या नाचायच्या. साडीचं, पदराचं भान नसायचं. मग त्यांचा छोटा मुलगा पायात आला तरी त्यांच लक्ष नसायचं. समोर पेटलेल्या आरतीवर आपण पडलो तरी ह्याची पर्वा नसायची. नवरा ह्यासगळ्या गोष्टी सांभाळण्यात गुंतलेला. थोड्यावेळाने दमल्यावर त्या शांत व्ह्यायच्या. जमिनिवर निपचित पडायच्या. आम्ही सगळे त्यांना नमस्कार करायचो. ती देवी आहे असं थोडावेळ वातावरण असायचं. दुस-यादिवशी नेहमीप्रमाणे परत रुटिन चालू. काल रात्रीची राणीची आई आणि आत्ताची ह्याचा सुतरामसंबंध नसायचा.
..............

राणीच्या आईविषयी थोडसं.......

नव-याची दुसरी बायको, त्यांच वय २२ होतं तेव्हा नवरा ५० वर्षाचा. पहिली बायको वारली. तिचे २ मुलगे नव्या आईच्या बरोबरीच्या वयाचे. त्यांची लग्नं नुकतीच झालेली. दोघांनाही वेगळं राहण्याखेरीज मार्ग नव्हता. त्यांनी वडिलांवरचा राग आईशी तुसडेपणाने वागून, वाटणी मागून व्यक्त केलेला. राणीच्या आईलाही पाठोपाठची ३ मुलं - १ मुलगी व २ मुलं. सगळी मुलं १० -१२ वयाच्या आसपास आल्यावर वडिलांचं निधन झालं. कुटुंबाची जबाबदारी पडली. त्यांच रविवार पेठेत चहाच अमृततुल्या दुकान. उदर्निवाहाच प्रश्न उभा राहिल्यावर राणीच्या आई स्वत: दुकानात जाऊन बसायला लागल्या. पुढ मग आम्ही तिथे रहात नसल्याने संपर्क संपला.
.........

शाळा - कॉलेजमधल्या माझ्या सगळ्या मैत्रिणी ह्या धार्मिक वृत्तीच्या, रितीरिवाज पाळणा-या, पुरुषप्रधान संस्कृतीला झुकतं माप देण्या-या. माझ्या आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम का होईना मी काही एक ठोस विचारांनी वावरत होते. मी नास्तिक आहे, मुर्तिपूजा मानत नाही, मी पाळीच्या दिवशीपण मंदिरात जाते, लग्न झाल्यावर पण स्त्री-पुरुष समानतेकडे मी कशी बघेन हे मैत्रिणींशी बोलायचे. तेव्हा अंगात येण्याविषयी बोलणं झालं. मी पटकन म्हणाले तो सगळा ढोंगीपणा आहे. देवीवगैरे असं काही नसतं.
...........

मध्यंतरी असच एकदा कामवाल्याबाईंबरोबर बोलत होते. तेव्हा त्यांच्या वस्तीमधल्या एका बाईंबद्दल त्या म्हणाल्या की तिच्या अंगात येतं. चेष्टेत हसत म्हणल्या "काहीनाही ओ ताई, नुसती नाटकं आहेत ती". मग मी थोडं त्याबाईंबद्दल त्यांना विचारलं. तेव्हा पुढ आलेली माहीती अशी -  नवरा दारु पितो, रोज रात्री वस्तीमधे धुडगूस घालतो. बायकोला मारतो. आधीच्या बायकोच्या वयात आलेल्या मुलींशी नीट वागत नाही.  
...........

एक दिवस मी व माझी बहिण चाललो होतो तेव्हा अचानक राणीच्या आई भेटल्या. त्या माझ्या बहिणीच्या बरोबरीच्या वयाच्या असल्याने तिच्याशी नेहमी मनमोकळेपणाने बोलायच्या. मुलं काय काय करतात, हताशी कशी आली, दुकान कसं बघतात, हे आनंदानं आणि आत्मविश्वासानं सांगितलं.
.........

राणीच्या आईंनी, त्यांची घुसमट, राग, दु:ख नवरात्रीमधले ९ दिवस तरी माझे हक्काचे असं गृहित धरुन अंगात आणून व्यक्त केली. तो नक्कीच ढोंगीपणा नव्हता. वस्तीमधे, ग्रामीण भागात अंगात येण्याच्या प्रकाराची वारंवारिता जास्त. जेव्हा संधी मिळेल, मुभा मिळेल तेव्हा आपला विरोध, संताप, दु:ख व्यक्त करण्याचा तो एक माफक प्रयत्नच. शेवटी परिस्थिशी समझोता हा ह्या बायकांनी केलेलाच असतो. तो नक्कीच नाटकीपणा नाही.

6 comments:

  1. A good memory. Throws light on Ranichi Aai as well as on Vaishali. The analysis is true & good. The women, otherwise suppressed, having no say in the matters & also sexually dissatisfied had an 'official' way to express their frustration this way. But is there a better way that could be made available to them? Our whole society thrives on the neuroses of women & it is celebrated as a part of religion which is shameful. I would like to relate it to the women who publicly celebrated Kasab's death in a similar way--fugadyaa khelun. What fears do we hide in our minds that is exhibited in such a way? The photos were happily published in the newspapers. I do believe that Kasab should have been hanged long back. Yet I have also been thinking of the people who used Kasab for their political ends. Orphans & poor & weak people are invariably used & we watch people falling prey to such politics all over the world. It is sad. It is everywhere. How can this be ended? I wished the women would not express their euphoria is such a crass way. But again as Ranichi aai they are suppressed in our cultural politics thus have lost the capacity to think differently? As a mother I am really very anxious about my children...will they be any wiser, saner than my generation? Will they be able to cross the barriers of religion, caste, region, nationality etc.? Here comes my second line of response, Vaishali says, they were Marawaris so they celebrated Navaratri elaborately...Navaratri was celebrated elaborately even in Maharashtra since long. Ghagari funkane, kumarika jewayala ghalane--[brahman, also pure i.e. whose menstruation cycle has not begun, etc.] so are we revealing the long cherished prejudices of regionalism? Also if Vaishali is a non-believer then she needs to clear why she visits a temple [though a rebellion is indicated in visiting the temple during menstruation]. For this takes us to the issue of deep-rooted practices which indicate the need to conform to the social norms like visiting a temple. Is it because you feel soothed when you visit the temple? Or you visit as a mere convention? Or Because you do not want to hurt the elders? These questions need to be addressed frankly & open-mindedly for they contributes to other social practices which are going corrupt & divisive; however mindless that visit might be. Faith is a completely different matter. It gives strength to undertake a mission. It could be secular.

    Vandana

    ReplyDelete
  2. वंदनाताई, तुमची प्रतिक्रिया आवडली.

    >> Will they be able to cross the barriers of religion, caste, region, nationality etc.?

    यातला nationality etc. हा भाग खूप आवडला.

    >> Faith is a completely different matter. It gives strength to undertake a mission.

    Why not question "Faith" as well? Can strength (not) be derived from within without explicit faith in anything?

    ReplyDelete
  3. वंदनाताई, मलाही तुमची प्रतिक्रिया खूप आवडली.
    >> Our whole society thrives on the neuroses of women & it is celebrated as a part of religion which is shameful.

    हे केवढं खरं आहे!

    घरात बोडण असे तेव्हा माझ्या आजीच्याही अंगात येई. आजी त्यावेळी एकदम परकी वाटू लागे. अंगात येण्यामागची कारणं समजू लागली तशी मी नेहेमी विचार करी, इतक्या शांत, समाधानी, तृप्त दिसणाऱ्या बाईच्या मनात कसली उलथापालथ चालू असेल? का तिला ती अशा पद्धतीने बाहेर काढावीशी वाटत असेल? तेव्हा मी तिच्याशी याबद्दल बोलू नाही शकले. पुढे आजोबा गेले आणि तिच्या अंगात यायचे बंद झाले. देवीलाही विधवा बाई वर्ज्य असावी.

    अलीकडेच, जवळच्या एका घरी मंगळागौरीची पूजा होती. जिची मंगळागौर होती, ती पूजा करता करता एकदम श्वास जोरात घेऊ लागली. तिला काहीतरी त्रास होतो आहे हे पाहून मी पळत तिच्यापाशी गेले आणि तिला पाणी विचारू लागले.थोडावेळ आत झोपतेस का म्हणत होते तोवर आजूबाजूची कुजबुज वाढली आणि मला तिथून बाजूला केलं गेलं. तिच्या अंगात देवी आली होती. जमलेल्या लहानथोर बायकांनी तिला हळदीकुंकू लावून नमस्कार केले. पाच दहा मिनिटांनी ती नॉर्मल झाली आणि पूजा पुढे चालू झाली. तिच्या सासूबाई धन्य झाल्या होत्या. मी सुन्न झाले होते.

    नीरज,
    >> Why not question "Faith" as well? Can strength (not) be derived from within without explicit faith in anything?

    हे आवडलं.

    ReplyDelete
  4. त्यामागचे हेतू कळले, त्यामागे उपद्रवमूल्य नाहीये हे कळलं तर आपण त्या माणसांचं वागणं समजून घेऊ शकतो इथवर ठीक आहे.
    पण म्हणून ती कृती म्हणजे नाटकीपणा नव्हता असं कसं म्हणता येईल ?
    मुळात देवी अंगात येणं हे जर आपल्याला मान्य नसेल तर कोणी, कुठल्याही कारणासाठी तसा दावा केला तर तो नाटकीपणाच असायला हवा आपल्यासाठी.

    ReplyDelete
  5. This is rather simplistic. One cannot avoid considering the mind-body relationship. If the mind is disturbed/unhappy/frustrated it is invariably reflected in the body.Most of the major problems of culture spring from this negligence of mind-body relationship. If the mind needs to be treated it needs to feel assured that you believe in the pain it is suffering. The pain is true. Superstitions can only be removed if treated sympathetically & with inherent rationality that accepts the mind-body relationship.

    ReplyDelete
  6. अंगात येणं हा नाटकीपणा नसेल पण अंगात आणणं हा नाटकीपणाच असतो.
    माझ्या आत्याच्या अंगात यायचं आणि आमची खात्री होती की तो नाटकीपणाच होता.
    पहिल्यांदा कदाचित त्यांना काही मानसिक त्रास झाला असेल पण नंतर दर मंगळवारी ती पंचपदी आणि नंतर अंगात येणं हे नाटकीच असायचं.
    हे करूण आहे, हे तर खरंच.
    कुठलीही व्यक्ती ही सत्ताहीन नसते. गुलाम देखिल नसतात.
    जर त्या व्यक्तीला पुरेसा वाव मिळाला नाही तर ती तिच्यातलं उपद्रवमूल्य वापरू शकते.
    खूप घुसमट झाली की ती घुसमट अशी कुठूनही बाहेर येते.
    अंगात येण्याला धार्मिक प्रतिष्ठा असल्याने त्याद्वारे मिळणारी सत्ता, अधिकार ती बाई मिळवते.
    आपण आपल्या समाजव्यवस्थेत बाईची धुसमट बाहेर पडण्यासाठीचे असे मार्ग ठेवले आहेत, ते दुर्दैवी आहे.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...