विद्याच्या लेखातल्या "तुमच्याकडे गणपतीला तळणीचे मोदक चालतात का ग?" हे वाचल्यानंतर मनात "तुमच्याकडे" आणि "आमच्याकडे" यावर बराच विचार झाला आणि मग जे काही प्रश्न पडले ते म्हणजे हा लेख..
आमच्याकडे गौरीनिम्मित ओट्या भरण्याचा कार्यक्रम सुरु होता.. माझ्या माहेरी कुमारीकांची ओटी भरण्याची पद्धत नाहीये त्यामुळे मी जरा बिचकत होते. पटकन सासरच्या काहीजणी पुढे आल्या आणि म्हणाल्या " आता हे सगळ शिकून घे.. आमच्याकडे असच असत". मुळातच ओटी वगैरे रस नसल्याने मी त्या जे सांगत होत्या तसे करून मोकळी झाले..
सासरचे वातावरण बरयापैकी लोक काय म्हणतील? समाज काय म्हणेल ह्याविषयी भीड बाळगणारे.. तरीदेखील घरात धुम्रपान, मद्यपान, तंबाखू खाणे आणि मांसाहार होतो. असं कसं चालत विचारल्यावर उत्तर एकच "आमच्याकडे असंच असत.. तुलाही होईल सवय हळूहळू"..
हे "आमच्याकडे असच असत" प्रकरण तुम्ही सगळयांनी सुद्धा कधी ना कधीतरी ऐकले असेलच.. वेगवेगळ्या प्रसंगात.. वेगवेगळ्या संदर्भात.. काहींनी तर ते अमुक एका पद्धतीचे कपडे वापरणे, अमुक वेळी जेवणे, एखादी भाजी एका विशिष्ट पद्धतीने बनवणे, अमुक एखादे काम किंवा घरातली सगळी कामे बाईनेच करणे अश्याही बाबतीत ऐकले असेल..
घरात एखादी मुलगी सून होऊन येते याचा अर्थ ती घराची कोणीच नसते का?? नवीन येणार्या सुनेने स्वत:च्या वागण्याने सगळ्यांची मने जिंकून घ्यायची म्हणजे नक्की काय करायचे? घरात आधीपासून जे राहत आहेत त्यांचा त्या घरावर हक्क जास्त हे पटतेही एकीकडे.. पण म्हणून नव्याने राहायला येणाऱ्या/री ने त्या साच्यात स्वत:ला बसवून घ्यावे हि अपेक्षा चूक आहे कि बरोबर?
कोणत्याही घराचे ठरलेले असे साचे, संस्कार असतात.. प्रत्येक कुटुंबागणिक ते बदलतात. हे सगळ्यांनाच माहित आहे आणि कबूलही आहे. कदाचित या सगळ्यांची नंतर सवयही होत असेल.
पण तरीही हे वाक्य मनावर कुठेतरी ओरखडा काढतं हे नक्की..
तुम्हाला असे प्रश्न पडले का? याबाबतीत तुम्हाला काय वाटत??
- स्पृहा
आमच्याकडे/तुमच्याकडे याचा त्रास होतो. मलाही झालेला आहे.
ReplyDeleteमी कुठल्या धार्मिक बाबतीत फारशी पडले नाही, त्यासंदर्भात नाही झाला.
पण इतर अनेक विषय असतात.
माझ्यासाठी, आमच्याकडे म्हणजे माझ्या घरी, म्हणजे माझ्या आईबाबांच्या घरी, हे स्पष्ट्च होतं.
मी आमच्याकडे, मिलिन्दकडे असे शब्द सुरूवातीपासूनच जाणीवपूर्वक वापरत आले आहे.
माझ्यासाठी आणखी एक वेगळं होतं, मला काही सासरघरात मिसळून जायचं नव्हतं,
स्वत:ला सासरघरात विरघळवणं हे मला मान्यच नाही.
मला माझं अस्तित्व टिकवायचं होतं आणि आहे.
मला कधीही सासरकडच्यांची मने जिंकायची नव्हती, ( खरं मला कुणाचीच मने जिंकायची नसतात, त्यासाठी म्हणून काहीही करू नये असंच मला वाटतं.)
सुनांमुळे घरं बदलतात, रिती बदलतात, हे बदल हळू हळू होतात, सून नवीन असताना तिच्यावर सत्ता गाजवण्यासाठी तू म्हणतेस त्या प्रकारांचा वापर होतो.
"कोणत्याही घराचे ठरलेले असे साचे, संस्कार असतात.........................."
ReplyDeleteया ज्या काही परंपरा, रीती असतात त्या घरातल्या कुणाच्या असतात ?
कुळधर्म, कुलाचार हे ज्या कुळाचे असतात ते कुळ पुरुषामुळे पुढे वाढतं, असंच ना ?
मग या लेखामागचा प्रश्न "घरातल्या सगळ्या परंपरा माझ्या नवर्याच्या बाबांनी वाहून आणलेल्या का म्हणून ? माझ्या बाबांनी वाहून आणलेल्या रीती पण त्यात का नकोत ?" या शब्दातही मांडता येईल.
आणि मग दोन बायकांनी यावर वेळ घालवणं किती फोल आहे असंही म्हणता येईल.
आणि असं म्हणायची जर आपली तयारी नसेल तर आपल्याला पुन्हा मूळ प्रश्न काय आहे तिथपर्यंत जावं लागेल.
परंपरा, रीती एका पिढीकडून पुढे नेण्यात महत्वाचा वाटा बायकांचा आहे हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्या बायका त्यात कळत-नकळत स्वत:चं बरंच काही मिसळत जातात हेही ओळखावं लागेल.
आपल्या घरात आणि आपल्या काकूच्या घरातल्या परंपरा,रीती काही प्रमाणात वेगळ्या असतात, त्या कशा वेगळ्या झाल्या यावरही विचार करावा लागेल.
या ज्या काही परंपरा, रीती असतात त्या घरातल्या कुणाच्या असतात ?
Deleteकुळधर्म, कुलाचार हे ज्या कुळाचे असतात ते कुळ पुरुषामुळे पुढे वाढतं, असंच ना ?
>> मला हे फक्त धार्मिक बाबतीत म्हणायचं नव्ह्तं मिलिंद.. एकुणातच अमुक एका पद्धतीचे कपडे वापरणे, अमुक वेळी जेवणे, एखादी भाजी एका विशिष्ट पद्धतीने बनवणे, अमुक एखादे काम किंवा घरातली सगळी कामे बाईनेच करणे ह्या सगळ्या गोष्टी पण "आमच्याकडे" आणि "तुमच्याकडे" प्रकारात मोडतात.
अजून एक म्हणजे मी ज्या घरात/ ज्या संस्कारात वाढले त्या घराला मी माझं म्हणेल.. मग ते माझ्या वडिलांचं असो.. आईचं असो.. किंवा अजून कोणाचं...
मग या लेखामागचा प्रश्न "घरातल्या सगळ्या परंपरा माझ्या नवर्याच्या बाबांनी वाहून आणलेल्या का म्हणून ? माझ्या बाबांनी वाहून आणलेल्या रीती पण त्यात का नकोत ?" या शब्दातही मांडता येईल.
>> हा प्रश्न नाहीये लेखाचा..नविन मुलगी सून म्हणून घरात आली कि तिला तिच्या मुळ आवडी-निवडी आणि सवयी मोडायला लावून तिला मुद्दाम आपल्या साच्यात कोंबायचा जो प्रयत्न चालतो. त्यातही त्याने काही फारसं साध्य होणार नसतं. पण तरीही सत्ता गाजवायला, तू आता "आमच्या" घरात आहेस.. इथे "आम्ही" सांगू तसं वागावं लागणार याची जाणीव करून देण्याचा अट्टाहास हा या लेखाचा विषय आहे..
परंपरा, रीती एका पिढीकडून पुढे नेण्यात महत्वाचा वाटा बायकांचा आहे हे लक्षात घ्यावं लागेल आणि त्या बायका त्यात कळत-नकळत स्वत:चं बरंच काही मिसळत जातात हेही ओळखावं लागेल.
>> असेलही. मग तसं असेल तर घरात नवीन आलेल्या सुनेला सुद्धा मोकळ्या मनाने त्यात आपलं काही मिसळू द्यावं हेच तर मागणं आहे. पण असं होत नाही. कारण स्त्रियांना वर्षानुवर्ष हे घर आणि परंपरा हेच तुझं विश्व आहे अशी शिकवण दिली जाते. त्यामुळे नवीन कोणी घरात येउन आपल्या विश्वात लुडबुड करावी हे मुळी आधीच्या बाईला सहन होत नाही.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद !
Deleteमीही हे फक्त धार्मिक बाबतीत म्हणत नव्हतो. ’आमच्याकडे’ आणि ’तुमच्याकडे’ यात येणार्या सगळ्याच गोष्टींबद्दल माझा हा प्रश्न आहे की कोण आम्ही आणि कोण तुम्ही..
आणि यातले "आमच्याकडे" हे जर फक्त माझ्या वडिलांकडून आलेल्या रीतींमुळे बनलेलं नसेल आणि ’तुमच्याकडे’ हे जर फक्त नवर्याकडून आलेल्या रीतींमुळे बनलेलं नसेल तर काही काळात दोन्हींचं मिळून ’आपल्याकडे’ होईलच. हे मिश्रण काही ५०:५० नक्कीच नसेल पण ०:१०० असंही नसेल.
मला त्याहून महत्वाचं हे म्हणायचं आहे की हा मनुष्यस्वभाव आहे. सर्व आस्थापनांमध्ये ’organisation culture' असतंच ना ? नवीन रुजु झालेला उमेदवार सुरुवातीचे काही दिवस ती संस्कृती समजावून घेण्यात, तिच्याशी जुळवून घेण्यात घालवतो, त्यात स्वत:चं काही मिसळतो. ’organisation culture' ही मग बदलत जाते, सामावून घेत समृद्ध होत जाते. कुटुंबाचंही असंच असतं.
आपल्याकडच्या पद्धतीनुसार मुलगी मुलाच्या घरी येते (हेच अन्यायकारक आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो पण तो काही या लेखाचा विषय नाही. अर्थात प्रत्येक विषय अगदी तर्कशुद्ध पद्धतीने अन्यायकारक पुरुषप्रधान समाजरचना इथपर्यंत आणता येतो) आणि त्यामुळे तिला हे जास्त प्रकर्षाने जाणवतं, खुपतं, बोचतं (काहींना रुचतही असेल). मुलं जरी शरीराने सासरी राहायला गेली नाहीत तरी त्यांनाही हा सांस्कृतिक धक्का पचवावा लागतो. ज्या जोड्या लग्नानंतर स्वतंत्रच राहायला लागतात त्यांनाही मधूनमधून ही ठेच लागतेच (तो श्रीखंड का ते श्रीखंड यावरही भांडण होऊ शकतंच ना).
तर organisation culture, new entrant या दृष्टीने याकडे पाहिलं तर बरं असं माझं मत आहे. यामुळे प्रश्न सुटॆलच असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. पण सुटायची शक्यता वाढेल असं मला वाटतं. प्रश्नाचं weightage किती हे तर नक्कीच लक्षात येईल.
जाताजाता : माझे हे विवेचन मुख्यत: आचारातल्या/उच्चारातल्या फरकांबद्दलच फक्त आहे. विचारांमध्ये, मूल्यांमध्ये मुळातूनच खूप तफावत असेल तर हा मध्यममार्ग नाही चालू शकणार. तिथे एक तर दुर्दम्य आत्मविश्वास (मी यांना सगळ्यांना माझ्या मार्गाने चालायला लावेन) किंवा संपूर्ण शरणागती किंवा आता बस !
उदा. मी जर उद्या दाउदकडे कामाला लागलो तर ते organisation culture मला गिळून टाकणार हे उघड आहे.
यातले "आमच्याकडे" हे जर फक्त माझ्या वडिलांकडून आलेल्या रीतींमुळे बनलेलं नसेल आणि ’तुमच्याकडे’ हे जर फक्त नवर्याकडून आलेल्या रीतींमुळे बनलेलं नसेल तर काही काळात दोन्हींचं मिळून ’आपल्याकडे’ होईलच. हे मिश्रण काही ५०:५० नक्कीच नसेल पण ०:१०० असंही नसेल.
Delete>> मला नाही वाटत तसं. उलट हा "काही" हा काळ दोन्हीकडच्या लोकांची परीक्षा पाहणारा असतो. कधी सून स्वत:च्या विचारांसाठी सारख्या द्याव्या लागणाऱ्या फाईट मुले दमून शरण जाते आणि मिसळून जाते (आणि लोकांना वाटतं..आता सगळं सुरळीत झालंय) किंवा कधी (खरे तर फार क्वचित) इतर लोक आपला हट्ट सोडतात.
मला त्याहून महत्वाचं हे म्हणायचं आहे की हा मनुष्यस्वभाव आहे. सर्व आस्थापनांमध्ये ’organisation culture' असतंच ना ? नवीन रुजु झालेला उमेदवार सुरुवातीचे काही दिवस ती संस्कृती समजावून घेण्यात, तिच्याशी जुळवून घेण्यात घालवतो, त्यात स्वत:चं काही मिसळतो. ’organisation culture' ही मग बदलत जाते, सामावून घेत समृद्ध होत जाते.
>> काही ठिकाणचं कल्चर फार रिजिड असतं. ते आपल्या येण्याने बदलत नाही.
मुलं जरी शरीराने सासरी राहायला गेली नाहीत तरी त्यांनाही हा सांस्कृतिक धक्का पचवावा लागतो.
>> नाही. उलट त्यांना किंवा त्यांच्या विचारसरणीला सपोर्ट करायला तिथे अनेकजण असतात (एकत्र कुटुंबात). याउलट एकटे राहतांना त्यातल्या त्यात सोपे जाते. काही बाबतीत नवरा "हे तुझं तू ठरव" म्हणून मोकळा होतो.. आणि काही वेळा बायको.. आणि समानता साधली जाते.
माझे हे विवेचन मुख्यत: आचारातल्या/उच्चारातल्या फरकांबद्दलच फक्त आहे. विचारांमध्ये, मूल्यांमध्ये मुळातूनच खूप तफावत असेल तर हा मध्यममार्ग नाही चालू शकणार.
>>>अमुक एका पद्धतीचे कपडे वापरणे, अमुक वेळी जेवणे, अमुक एखादे काम किंवा घरातली सगळी कामे बाईनेच करणे ह्या वरवर लहान दिसणारया गोष्टींमागे सवयीपेक्षा विचारसरणीचा भाग असतो ना? दिसायला ती गोष्ट छोटीशीच दिसली तरी त्याचे मूळ विचारसरणीत असलेल्या फरकामुळे असते. उदाहरण देऊ का?