Wednesday, August 15, 2012

खरं बोलणं... सांगणं... ऎकणं -- २


खरं बोलणं म्हणजे सत्य असं असतं का? "खरं" म्हणजे आपल्या परीघात, आपल्या परीस्थितीत, आपल्या समजॆनुसार, आपल्या आकलनानुसार जे आपल्याला प्रतीत झालं आहे ते... असं म्हणता येईल. पण सत्य तरी नितळ सत्य असतं का? सत्य हे असं आगीसारखं सार्वकालिक, सर्व परीस्थितीत, सर्व लोकांसाठी एकच, असं नसतं. त्यालाही हे काळवेळेचे डाग असतातच. डाग पण नाही म्हणता यायचं डाग वरवरचे असतात, त्याशिवाय आत सत्य असंही नसतं. सत्याच्या मुशीतच ते आहे.

मग मी म्हणते तेच खरं, तेच सत्य, असं करून नाही चालायचं.
प्रत्येकाचं आपापलं "खरं" असतं, ही मुभा आपण प्रत्येकाला द्यायला हवी.

कृपया हे लक्षात घ्या की इथे मी अतिशय सूक्ष्म बाबींबद्दल बोलत आहे. आपण सरसकट खरं आणि खोटं म्हणतो तसं हे नाही.

म्हणजे प्रत्येकाचं एक (वर दिलेल्या व्याख्येनुसार) खरं असतं.

प्रत्येकाने असा प्रयत्न केला पाहिजे की स्थल/ काल/ व्यक्ती/ दृष्टीकोन/ या पलीकडे आपण किती जाऊ शकू.
आपण जे खरं मानून चाललो आहोत , त्याला किती मर्यादा आहेत, हे समजून घेतलं पाहिजे.

आपल्याला प्रतीत झालेलं "खरं" तरी आपण थेट बोलतो/सांगतो का? तर नाही.
भाषेची एक गंमत असते, वरवर जरी ती सारखीच दिसत असली, तरी समुहानुसार तिचे वेगवेगळे अर्थ असतात.
घराची अशी एक भाषा असते. घरातल्यांनाच तिचे खोल अर्थ लागतात.
दोन व्यक्तींमधेसुद्धा त्यांची त्यांची एक भाषा असते/ असू शकते.

आपण सांगत असतो/ व्यक्त होत असतो ते केवळ भाषेद्वारे नाही. देहबोली ही खूप महत्त्वाची असते.
’भाषा + देहबोली’ ने माणूस पूर्णपणे व्यक्त होतो. ते आपल्याला वाचता आलं पाहिजे.

भावनांची भाषा जगभर सारखी असावी, त्याची तीव्रता कमी जास्त असू शकेल.
म्हणजे मी निखळ भावना म्हणते आहे. आनंद, दु:ख, निराशा....

खरं म्हणजे सर्वसाधारणपणे माणूस जेंव्हा बोलत असतो, तेंव्हा खरंच बोलत असतो.
आपण ते पूर्णपणे वाचू शकत नाही.
आपल्याला ते पूर्णपणे ऎकू येत नाही.

बरेचदा आपल्याला खोटच बोलायचं असतं.
जाणीवपूर्वक.
किंवा आपल्याला सवय असते, बरं वाटेल, पटेल तेच बोलण्याची.
किंवा समाजाच्या चौकटीत आपल्याला सुरक्षित वाटत असतं, समाजाने जे आपल्याकडून अपेक्षिलेलं असतं तेच आपण बोलत जातो.
किंवा खरं बोलण्यासाठी जी किंमत द्यावी लागते ती देण्याची आपली तयारी नसते.
किंवा .....

मला वाटतो आपण सांगीतलं आणि संपलं असं नको, समोरच्या व्यक्तीपर्य़ंत ते खरं पोचलं आहे ना, याची काळजी घ्यायला हवी, निदान आपल्या जवळच्या व्यक्तींपुरती.
आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे.

*******

2 comments:

  1. The truth is rarely pure and never simple -- Oscar Wilde

    ReplyDelete
  2. मला वाटतो आपण सांगीतलं आणि संपलं असं नको, समोरच्या व्यक्तीपर्य़ंत ते खरं पोचलं आहे ना, याची काळजी घ्यायला हवी, निदान आपल्या जवळच्या व्यक्तींपुरती.
    आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
    खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे. >>

    अगदी मान्य.. मला स्वत:च्या अगदी जवळच्या बाबतीत नेहमी खर आणि खरंच बोलायला आवडत. पण इतरांच्या बाबतीत मी तस करू शकत नाही. कदाचित तू म्हणतेस तसं आपल्याला सवय असते, बरं वाटेल, पटेल तेच बोलण्याची.
    किंवा समाजाच्या चौकटीत आपल्याला सुरक्षित वाटत असतं, समाजाने जे आपल्याकडून अपेक्षिलेलं असतं तेच आपण बोलत जातो.
    किंवा खरं बोलण्यासाठी जी किंमत द्यावी लागते ती देण्याची आपली तयारी नसते.

    असंच काहीतरी माझं असावं...

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...