Monday, December 31, 2012

बायांनो, सांभाळा


दिल्लीत एका युवतीवर बसमधे सामुहिक बलात्कार झाला आणि नंतर तिला वाचवण्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले.......
ज्या बातम्या आपण वाचतोय...... हे भयंकर आहे.

अन्यायाविरूद्धची/ क्रूर राक्षसी वृत्तीबद्दलची चीड असली तरी या क्षणी असहायताच दाटून आली आहे.
काहीच सुचेनासं झालं आहे.

आपल्या देशात कुठल्याही तेवीस वर्षाच्या मुलीचं भविष्य कदाचित असं असू शकतं?
किती लाजीरवाणी गोष्ट आहे.
कुठल्याही स्त्रीच्या आयुष्यात एक दिवस असाही उगवू शकतो?
तुमच्या, माझ्या, कुणाच्याही!
काय करायचं बायकांनी?
कसं सुरक्षित ठेवायचं स्वत:ला?
या घटनेमुळे घरोघरच्या किती मुली आणि त्यांचे आईबाप घाबरले असतील!
त्यांच्यावरची बंधने वाढतील.
अंधार पडला की बाहेर नको जायला. असं होईल.

बायकांना बलात्काराच्या भीतीतच आयुष्य काढायला लागतं.

बलात्कारी पुरूषांबद्दल मला आत्ता इथे काहीच बोलायचे नाही.
त्यांना कायद्याने काय व्हायची ती शिक्षा होईल.

जी मुलगी याला बळी पडली, तिचं काय?
............................................................................................


**********

सार्‍या जगभराच्या इतिहासात पुरूषांनी स्त्रियांवर राज्य केलं आहे, करताहेत. जगभर मातृकुळे होती आणि नंतर पितृकुळे/ पुरूषसत्ताक पद्धत आली. हा असा बदल का झाला असावा? यावरचे वेगवेगळे अभ्यास आहेत.

 मला कायम असं वाटतं की पुरूष हे करू शकले याचं कारण त्यांच्याकडे असलेली बलात्कार करण्याची क्षमता.
जे बाई करू शकत नाही आणि पुरूष करू शकतात असं काय आहे? तर बलात्कार.
बलात्कार करून एखाद्या बाईचं आयुष्य ते उद्ध्वस्त करू शकतात.
बलात्कार हा बाईचा आत्मसन्मान धुळीला मिळवणारा असावा म्हणून मग योनिशुचितेच्या कल्पना आणि पतिव्रताधर्म!
बलात्कार हा अपघात म्हणून सोडून देता येऊ नये यासाठी लहानपणापासून मुलीला तिने स्वत:ला कसं सांभाळलं पाहिजे, पावित्र्य कसं जपलं पाहिजे हे सांगितलं जातं, जन्मल्यापासून हे ऎकत वाढणारी मुलगी, पावित्र्यभंग झाला की मोडून पडणारच ना?

*******

 बलात्कार करण्याची क्षमता घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल!
मोकळेच!
कुठल्याही स्त्रीवर बलात्कार होऊ शकतो
कधीही, कुठेही
बायांनो, सांभाळा
तुमचं शीलच नाही तर तुमचा जीवही धोक्यात आहे.
तुमचा गुन्हा इतकाच आहे की तुम्ही बाईचं शरीर घेऊन जन्माला आला आहात
कुठलीही वेळ अवेळ असू शकते
कुठलीही जागा चुकीची असू शकते

बलात्कार करण्याची क्षमता घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल!
मोकळेच!
जमलं तर सांभाळा, नाहीतर मरून जा.
******

4 comments:

  1. >> "क्षमता" घेऊन सगळे पुरूष हिंडताहेत खुशाल! मोकळेच!
    "सगळे". खरं आहे. तरीही माझ्या (आणि माझ्यासारख्या बहुसंख्य(?) पुरुषांच्या) मनीही या क्षणी तुझ्या/तुमच्या सारखीच असहायताच दाटून आली आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. >>माझ्या (आणि माझ्यासारख्या बहुसंख्य(?) पुरुषांच्या) मनीही या क्षणी तुझ्या/तुमच्या सारखीच असहायताच दाटून आली आहे.
      खरं आहे / असणार. असे पुरूष आहेत, हे माहीत आहेच.

      इतकी चीड आलेली आहे, त्यांच्या बलात्कार करण्याच्या क्षमतेबद्दल,
      मग नाही वगळावंस वाटलं, त्यातून कुठल्याही पुरूषाला.
      क्षमता आहेच, हे तर आहेच.

      Delete
  2. Vidya tu mhanteys tyat agdi 100 takke vastavach ahe...

    Ani asa kahi ghadta tevha mla purush asnyachi lajach vatte.... arthat ti vataylach havi...

    Kahi divsanpasun mi ya karnastav chintatur ahe... kahi lihayla hi jamat nahiye...

    ReplyDelete
    Replies
    1. कविता असहायतेतून लिहिली गेली आहे. ती भावनिक प्रतिक्रिया आहे.
      अशी बातमी आल्यावर असं वाटलं की आजूबाजूच्या कुठल्याही पुरूषाकडे ही क्षमता आहेच ना.
      कसं वाचवायचं स्वत:ला?

      आजूबाजूच्या पुरूषांवर आणि त्यांच्या चांगुलपणावर माझा पूर्ण विश्वास आहे.

      बलात्कार अनैसर्गिक आणि क्रूर आहे. तो पुरूषच करू शकतो. पण तीच कृती नैसर्गीक आणि आनंदी असते, पुनर्निर्माणाच्या शक्यतेची असते. ते ही पुरूषच करू शकतो. हे मी विसरलेली नाही.

      बायका बलात्कार करू शकत नाहीत म्हणून, त्या करू शकत असत्या तर त्यांनी केलेच नसते असं मी म्हणणार नाही.

      बलात्कार करणे ही पुरूषी वृत्ती आहे असं नाही तर ती माणसातली राक्षसी वृत्ती आहे.

      आपल्या पुरूष असण्याची लाज कशाला वाटून घ्यायची? तशी वाटून घ्यावी असा कुठलाही उद्देश (लेखाचा) नाही. अशा घटनांनंतर असं वाटू शकतं. पण त्यातून बाहेर यायला हवं.

      लेखन ही मोकळं होण्याची वाट आहे. ती बंद करायला नको. जे काय वाटतंय ते लिहिलंत तर पुढे जाता येईल.

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...