Friday, August 31, 2012

छोट्या छोट्या गोष्टी - ४


एका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या नातेवाइंकांमधे मिसळून जाऊ शकेन अशा वेशात होते. साडी का नेसली नाहीस?, मंगळसूत्र कुठं आहे? हे सुरूवातीचे प्रश्न टाळून, पुढे गप्पा मारता येणार होत्या.
चुलत बहीण, आतेबहीण जवळपास वर्षानंतर भेटत होत्या. त्यांच्या मुली लग्नाला आल्या आहेत.
एकीकडे पूजा चालली होती. आम्हांला काही फारसे काम नव्हते. आमच्या गप्पा सुरू झाल्या.
आतेबहीणीच्या मुलीला ’नीट पाहून/ बोलून नवरा निवड. असं सांगत होते."

आपल्याकडे मुलीला वाढवतात/ वाढवायचे ते तिचे लग्न करून देण्यासाठी असेच असते.
लहानपणापासूनच त्यादृष्टीने सवयी लावल्या जातात.
आणि लग्नाचे वय झाल्यावर त्यावरून एक सफाईचा हात फिरवला जातो.

बोलताना विषय ’आजकालचे कपड” इकडे वळला.
बहीण मुलीची तक्रार करत म्हणाली, " या मुलींना जीन्सची सवय असते. नीराला (तिच्या मुलीला) झोपतानाही पॅंट-टीशर्ट घालायची सवय आहे. आवरून सावरून बसणं माहीतच नाही!"
मी म्हणाले, " बरं आहे की, त्या पोषाखात बिनधास्त वावरता येतं. साडीसारखं नाही, इकडनं वर गेली का? तिकडनं गेली का? पाठ दिसतेय का? अन पोट दिसतय का? सांभाळावं लागत नाही."
" अगं पण सांभाळायची सवय असली पाहिजे. मी नीरासाठी दोन गाऊन घेऊन आले आहे. सांगीतलंय हे घालूनच झोपायचं. झॊपेतही कपडे सावरायची सवय हवी. " पुढे म्हणाली, " मी झोपते तेव्हा, झोपेत जर माझा परकर घोट्याच्या वर गेला तरी मला कळतं. मी तो व्यवस्थित करते. "
मी अवाक झाले. मला कळेचना काय बोलावं ते!

मला वाटलं माझ्या या बहीणीला मी किती कमी ओळखते! ही बाई वयात आल्यापासून कधीही गाढ, बिनधास्त झोपलेली नाही!
(तिने दर वेळी परकर/गाऊन घोट्याच्या वर गेला की नीट केलेला आहे.)
आणि घरोघरच्या किती मुली अशा झोपू शकत नाहीत, देव जाणे.

कायम शरीराचं भान ठेवायचं, सतत, चोवीस तास, कशी तारेवरची कसरत आहे ही!

मला जाणवलं , मी सुद्धा ही करते, तिच्याइतकी नाही पण करतेच.
मी पॅन्ट, सलवार, घालण्याचा पर्याय निवडीन आणि बिनधास्त झोपीन.
चार लोकात झोपायची वेळ येते, तेव्हा मी गाऊन घालणारच नाही, ( मी घरीही फारसा घालत नाही.) आपल्याला तो सावरायला जमत नाही, हे मला माहीत आहे.

पूर्वी सारखे हात गळ्याशी नेऊन चाचपायची सवय, आतले कपडे आतच आहेत ना? कुठे पट्टी बाहेर तर दिसत नाहीये ना?
साडी नेसली की दहा पिना लावून बंदोबस्त करायचा.

सारखं सांभाळत राहायचं.
मला कंटाळा आला आहे.
मला सोडून द्यायचंय.

*********

बायकांवर किती आणि किती प्रकारचॊ प्रेशर्स असतात.
याची त्यांना जाणीवही नसते.
त्या चालत असतात....
चालत राहण्याची त्यांना सवय असते.

**********



10 comments:

  1. तुझ्या बहिणीचं उदाहरण थोडं टोकाचं वाटलं. (का अगदी सर्रास सापडणारं आहे?) पण असू दे. मुद्दा योग्य आहे. टोकाच्या उदाहरणाने बऱ्याचदा मुद्दा अधिक स्पष्ट होतो.

    >> याची त्यांना जाणीवही नसते.
    छोट्या छोट्या गोष्टी. पण त्यामागील समजुतींची जाणीव ठेवली पहिजे. आपलं वागणं, अथवा सवय कोणत्या गृहितकावर आधारलेली आहे याची जाणीव झाल्याशिवाय आपण कसे बदलणार?

    >> बायकांवर किती आणि किती प्रकारचॊ प्रेशर्स असतात.
    बरोबर आहे. पण इंद्रधनूचा विषय आहे म्हणून बायका हा शब्द इथे ठीक आहे. नाहीतर हेच विधान कोणाहीबद्दल करता येईल.
    "आपली सावली पडली तर बामनाला विटाळ होतो" अशा समजुतीच्या सावटाखाली असलेल्या दलिताच्या प्रेशरला तू काय म्हणशील?

    ReplyDelete
    Replies
    1. >>छोट्या छोट्या गोष्टी. पण त्यामागील समजुतींची जाणीव ठेवली पहिजे. आपलं वागणं, अथवा सवय कोणत्या गृहितकावर आधारलेली आहे याची जाणीव झाल्याशिवाय आपण कसे बदलणार?
      हो

      >> बरोबर आहे. पण इंद्रधनूचा विषय आहे म्हणून बायका हा शब्द इथे ठीक आहे. नाहीतर हेच विधान कोणाहीबद्दल करता येईल.
      "आपली सावली पडली तर बामनाला विटाळ होतो" अशा समजुतीच्या सावटाखाली असलेल्या दलिताच्या प्रेशरला तू काय म्हणशील?

      तरीही दलित बाईवर दलित पुरूषापेक्षा जास्त प्रेशर / सामाजिक दबाव असेल ना!

      Delete
  2. एका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, अ्सं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या नातेवाइंकांमधे मिसळून जाऊ शकेन अशा वेशात होते. साडी का नेसली नाहीस?, मंगळसूत्र कुठं आहे? हे सुरूवातीचे प्रश्न टाळून, पुढे गप्पा मारता येणार होत्या.

    ----

    बायकांवर किती आणि किती प्रकारचॊ प्रेशर्स असतात !!

    ReplyDelete
    Replies
    1. हं.
      पण ती माझी निवड होती.
      सुरूवातीचे प्रश्न टाळायचे असे मी ठरवले म्हणून.

      Delete
  3. एका जवळच्या नातेवाईकांकडे मंगळागौरीला गेले होते. साडी नेसून, मंगळसूत्र (एक प्रकारची माळ, असं समजून) घालून गेले होते. म्हणजे त्या सगळ्या नातेवाइंकांमधे मिसळून जाऊ शकेन अशा वेशात होते. साडी का नेसली नाहीस?, मंगळसूत्र कुठं आहे? हे सुरूवातीचे प्रश्न टाळून, पुढे गप्पा मारता येणार होत्या.

    >> मला नेहमी एका गोष्टीचं आश्चर्य वाटत.. स्त्रीला समजून घ्यावं हि अपेक्षा मी एखाद्या पुरुषाकडून करण्याआधी एखाद्या स्त्रीकडूनच करेन. कारण ती खऱ्या अर्थाने बाईपण जगत असते. पुरुषांना (काही वेळा खरंच बिचारे असतात ते काही बाबतीत) हे सारे आपण सांगतो तसे आहे असं मानून चालावं लागत. पण खुपदा अनुभव असा आहे कि एखाद्या स्त्रीने काय घालावं.. अमुक पद्धतीने वागावं असं पिअर प्रेशर आजूबाजूच्या पुरुषांपेक्षा बायकांचच जास्त असत. असं का?? त्या स्त्रियांना तेच योग्य आहे असं वाटत असत?? कि हे घालणे (मंगळसूत्र/ टिकली) खूप अभिमानास्पद आहे असे त्यांच्या मनावर बिम्बवलेले असते? कि आपल्याला जी मोकळीक मिळाली नाही ती हिलाही मिळू नये असा स्त्रीसुलभ (मत्सराला स्त्रीसुलभ का म्हणतात कोणास ठाऊक) मत्सर असतो? का मला (घालायला/करायला) जमत तर हिला का जमू नये असा सवाल असतो? नक्की बायकांनाच काय प्रॉब्लेम असतो? कि पुरुषांनाही असतो बायकांनी मंगळसूत्र न घातल्याने प्रॉब्लेम? फक्त पुरुष पुढे येऊन पटकन विचारू शकत नाहीत- "का ग मंगळसूत्र का नाही घातलं? टिकली का नाही लावली" असं??

    झॊपेतही कपडे सावरायची सवय हवी.

    >> माझ्या मते हि पूर्वीची गरज असेल. एकत्र कुटुंबात राहतांना सर्वांसोबत एकत्र झोपावे वगैरे लागत असेल तेव्हा असे कपडे वर जाणे वगैरे आवर्जून/ सवय लावून घेऊन टाळावे लागत असेल. आता प्रत्येकाची (प्रत्येक कपलची) स्वतंत्र बेडरूम असते. अर्थात सगळीकडे असतेच असं नाही पण मेजॉरिटी घरात असते. आणि स्वत:च्याच बेडरूम मध्ये कपड्यांचं इतकं भान बाळगाव लागत नसावं. (कोणाला नवर्यानेच बघायची लाज वाटत असेल तर नाईलाज आहे).
    आणि खरंच ज्या घरात अजूनही सर्वांसोबत एकत्र झोपावे लागते तिने लग्न झाल्यावरच कश्याला सवय लावून घ्यायची? रादर वयात आल्यापासून तरी कश्याला? लहान असल्यापासूनच अशी आवरून-सावरून झोपायची सवय लावून घ्यायला पाहिजे. (म्हणजे हे मी तिच्या आईला म्हणते आहे. मला मान्य आहे असं नाही)

    चार लोकात झोपायची वेळ येते, तेव्हा मी गाऊन घालणारच नाही, ( मी घरीही फारसा घालत नाही.) आपल्याला तो सावरायला जमत नाही, हे मला माहीत आहे. >> गाऊन हा इतका भयंकर प्रकार आहे. तो घालण्यापेक्षा काहीही न घातलेले चांगले. मला उलट गाऊन घालून वावरायची लाज वाटते. न जाणो एखादी गाऊन घातलेली बाई पाय घसरून पडली तर बिचारीचे शर्ट- पॅंट घातलेल्या बाईपेक्षा जास्त अंगप्रदर्शन होईल.

    पूर्वी सारखे हात गळ्याशी नेऊन चाचपायची सवय, आतले कपडे आतच आहेत ना? कुठे पट्टी बाहेर तर दिसत नाहीये ना? साडी नेसली की दहा पिना लावून बंदोबस्त करायचा.
    >> बाईचं बाईपण खूपसं तिच्या दिसण्यावर ठरवलं जात. माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या खुपश्या मैत्रीणींनी मला मेक-अप बॉक्स गिफ्ट देऊन मला सांगितले होते "आता तुझं लग्न होणार आहे. जरा नीट आवरून/ मेक अप करून बसत जा" (मी कॉलेज मध्ये अवतारात जाण्याबद्दल ग्रुप मध्ये प्रसिद्ध होती. मी वाईटात वाईट दिसले तरी मला पसंत करेल तोच माझा मित्र असं काहीतरी माझं मत होत त्या वेळी.) तेव्हा मला खूप गम्मत वाटली होती. पण खरंच लग्न झाल्यावर अधून मधून खूप बायका नुस्त मला बघायला यायच्या (बघू तरी तुमची सून कशी दिसते?) त्यामुळे ह्या नटण्याचा खूप कंटाळा आला होता/आहे. मला तर सासुबाईंनी केस सुद्धा कपू दिले नाहीत बरेच महिने. म्हणजे काही म्हणायच्या नाहीत प्रत्यक्ष.. पण केस कापून आले एकदा तर खूप चिडल्या होत्या. आपण हे बदललं पाहिजे. मुलीने नेहमी सुंदर आणि गुडी-गुडी दिसावं हि अपेक्षा बदलली पाहिजे. आणि ते आपल्याच हातात आहे. आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या गुणांना महत्व देणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त सहवासात राहून, अशी क्षेत्रे निवडून तिथे काम करणे यातला आनंद काही औरच आहे.

    ReplyDelete
    Replies
    1. >> पुरुषांनाही असतो बायकांनी मंगळसूत्र न घातल्याने प्रॉब्लेम?
      असतो.
      >> माझ्या मते हि पूर्वीची गरज असेल.
      नाही. क्वचित कधीतरी वेळ आली तर, ऎनवेळी कसं जमेल? म्हणून तयारी हवी.
      आणि किती जणींना स्वतंत्र बेडरूम मिळत असणार? फारच कमी.

      >>मी वाईटात वाईट दिसले तरी मला पसंत करेल तोच माझा मित्र असं काहीतरी माझं मत होत त्या वेळी.
      :)

      >>आपल्या दिसण्यापेक्षा आपल्या गुणांना महत्व देणाऱ्या लोकांच्या जास्तीत जास्त सहवासात राहून, अशी क्षेत्रे निवडून तिथे काम करणे यातला आनंद काही औरच आहे.
      hmmmm

      Delete
    2. >> गाऊन हा इतका भयंकर प्रकार आहे. तो घालण्यापेक्षा काहीही न घातलेले चांगले.

      अशा वाक्यांना "असे मला वाटते/ माझ्यामते/ माझ्याकरिता" असे काहीतरी जोडले पाहिजे (असे मला वाटते). हा प्रत्येकीच्या आवडीनिवडीचा, सोयीचा (वैयक्तिक) प्रश्न आहे. आजच्या पिढीतील कोणाला नऊवारी भयंकर वाटेल, आणि जुन्या पिढीतील कोणाला जीन्स. उलटही वाटले तरी हरकत नाही. कुणाला गाऊन सोयीचा वाटतो, कुणाला नाही वाटत. इतकंच. त्यात काही चूक बरोबर नाही.

      जे बायकांचे तेच पुरुषांचे. मी काही लुंगी वापरू शकत नाही. पण म्हणून तो प्रकार भयंकर असे होत नाही.

      Delete
    3. अम्म्म.. मला भयंकर म्हणजे वाईट अश्या अर्थाने म्हणायचे नव्हते.. पण मी ह्या वाक्याआधी "माझ्या मते" हा शब्द जोडायला हवा होता. आभार...
      लुंगीचे उदाहरण भारी आहे एकदम.. :)

      Delete
    4. >>>> गाऊन हा इतका भयंकर प्रकार आहे. तो घालण्यापेक्षा काहीही न घातलेले चांगले.

      >>अशा वाक्यांना "असे मला वाटते/ माझ्यामते/ माझ्याकरिता" असे काहीतरी जोडले पाहिजे (असे मला वाटते).

      वाचताना हे ’भयंकर ’ पियूच्या मतेच आहे, हे कळू शकते, स्पष्टीकरणाशिवाय .. (असे मला वाटते.)

      >> कुणाला गाऊन सोयीचा वाटतो, कुणाला नाही वाटत. इतकंच. त्यात काही चूक बरोबर नाही.
      अनुमोदन!

      माझे यावरचे मत (आधी आलेलेच)
      >> मी जे कपडे घालून समाजात (किंवा घरातल्या लोकांसमोर घरात) वावरते त्याने काही संदेश दिले जातात, त्यावर माझं नियंत्रण नाही. तसे संदेश गेलेले मला चालणार आहेत का? किंवा मला त्याची पर्वा नाही? याचा मी विचार केलेला असला पाहिजे. कुठल्याही स्त्रीकडे पुरूषांच्या नजरा वळणार आहेत. किंवा तशा वळलेल्या मला आवडणार आहेत, तुमचं उत्तर काहीही असू देत, या प्रश्नाचा तुम्ही विचार केलेला असला पाहिजे. मी तोकडे कपडे घालीन, ठीकच आहे. पण लोक बघणार आहेत हे विसरून मला चालणार नाही. मी जे कपडे घालते त्याने "इतरांनी माझ्या शरीराकडे कसं पाहावं हे सांगते" आणि "मी माझ्या शरीराकडे कसं पाहते" हे ही सांगते. आपण घातलेल्या कपड्यांद्वारेही इतरांशी बोलत असतो, हे लक्षात घेऊ या.
      +
      कुठलेही कपडे मी घालीन, तो हक्क माझ्याकडे/प्रत्येकाकडे एका मर्यादेपर्यंत आहे, हे लक्षात घेऊ या, आणि तो बजावू या.

      Delete
    5. कुठलेही कपडे मी घालीन, तो हक्क माझ्याकडे/प्रत्येकाकडे एका मर्यादेपर्यंत आहे, हे लक्षात घेऊ या, आणि तो बजावू या. >>

      बरोबर आहे. पण आपल्या समाजात एवढी मतमतांतरे आहेत काय चांगले आणि काय वाईट यावर.. त्यामुळे आपण कोणत्या विचारांच्या लोकांना भेटायला जातो आहोत हे महत्वाचे.. त्यावर आपण काय घालायचे किंवा नाही ते ठरते.. मग ते तुम्हाला आवडो वा ना आवडो.

      मी जे कपडे घालून समाजात (किंवा घरातल्या लोकांसमोर घरात) वावरते त्याने काही संदेश दिले जातात, त्यावर माझं नियंत्रण नाही. /
      मी तोकडे कपडे घालीन, ठीकच आहे. पण लोक बघणार आहेत हे विसरून मला चालणार नाही. मी जे कपडे घालते त्याने "इतरांनी माझ्या शरीराकडे कसं पाहावं हे सांगते" आणि "मी माझ्या शरीराकडे कसं पाहते" हे ही सांगते. /
      आपण घातलेल्या कपड्यांद्वारेही इतरांशी बोलत असतो, हे लक्षात घेऊ या.

      >>>असं असल तरी एखाद्या मुलीने तोकडे कपडे घातलेत म्हणजे तिने बलात्काराला आमंत्रण दिले आहे असे मुळीच होत नाही. तू वर अतिशय चांगल्या हेतूने लिहिलेली वाक्ये (तीनही) अनेक हिडीस प्रवृत्तीचे लोक अत्यंत चुकीच्या ठिकाणी सफाई द्यायला वापरतात. पुरुष तर सोडाच, पण बायकासुद्धा.." असले कपडे घातल्यावर बलात्कार होणारच, पुरुष आकर्षित होणारच" इत्यादी बोलतात तेव्हा शरमेने मान खाली जाते. फेसबुकवर "Don't teach me what to wear, teach your son not to rape !!!" असं एक पेज आहे. त्यावरच्या स्टोरीज वाचून समाजात काय काय भयंकर गोष्टी चालतात हे कळल्यावर चीड येते फक्त.

      (अर्थात माझी हि प्रतिक्रिया तुझ्या "सौंदर्य - प्रसाधने आणि पोषाख" ह्या तुझ्या लेखावर ( http://asvvad.blogspot.in/2011/10/blog-post_15.html ) जास्त योग्य ठरेल. पण कपड्यांचा आणि पोशाखाचा विषय निघालाच आहे म्हणून...)

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...