श्रावण - भाद्रपद - अश्विन, बायकांचे इतके सण असतात या महिन्यांमधे. मंगळागौरी, मग महालक्ष्म्या म्हणजे गौरी आणि नंतर नवरात्र. या सणांचे काय काय इतर अनेक उद्देश असले तरी यानिमित्ताने बायका एकत्र जमायच्या. एकमेकींशी संवाद होत असे.
आपण हे सगळे सण नाकारले. विशेषत: हळदी कुंकवाचे, जे की बायकांच्या वैवाहिक स्थितीवर अवलंबून आहेत. बायकांची त्यावरून वर्गवारी करतात.
नव्या समाजात आपण कुठले नवीन सण आणले का? जे की समतेच्या पायावर आधारीत आहेत. जे बायकांचा एक गट करतील. त्यांना एकमेकींशी संवाद साधण्याची संधी देतील.
तसं काही दिसत नाही.
आपण काय करतो आहोत? तर महाभोंडले आणि महाआरत्या आणि महा अथर्वशीर्षे.
पाया तर तोच राहतो आहे ना? जुन्या संस्कृतीचा. जी बायकांना कमी लेखते.
त्याचा एक फायदा होतो की अथर्वशीर्ष म्हणायला जाण्यासाठी बाईला घरातून सहज परवानगी मिळत असणार.
बायका बायका मिळून काहीतरी धार्मिक करताय ना? मग करा.
म्हणजे बाहेर जाऊ देतोय चा आव तर आणलेला आहे पण तरी पायात दोर्या तर आहेतच.
बायका बायका मिळून किंवा बायका पुरूष मिळून जोवर काही विचार करत नाहीत, तोवर पुरूषसत्तेला काही धोका नाही.
महिला दिनाचं आपण काय करून ठेवलं आहे? बायका बायका मिळून फारतर बाहेर जेवायला जातात, शुभेच्छांची देवघेव होते, नवरा हौशी असेल तर काहीतरी भेट देतो. दिवाळीचा पाडवा काय नि महिलादिन काय? आम्हांला काहीच फरक पडत नाही. शेवटी नवर्याला ओवाळायचे आणि भेट मिळवायची हेच आहे ना?
आपण आपल्या साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात.
त्यात गंमत, मजा ही तर हवीच पण हे सारं समतेच्या पायावर उभं असायला हवं.
आपल्या समाजातील समता कशी आहे? तर बायका पौरोहित्य करायला लागल्या. त्याने समाज पुढे गेला का?
नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे.
महिलांचे सण असायला हवेत. ती पोकळी नव्या वातावरणात दिसते.
आपापल्या सोयीने महिलामंडळांचे, भिशीमंडळांचे कार्यक्रम होत असणार. पारंपारिक पद्धतीने.
पण, एकेका सणाला
’मी माझ्या बाई असण्याचा विचार करीन."
"मला बाई म्हणून आत्मसन्मानाने कसं जगता येईल हे पाहीन"
" बाई म्हणून इतर सगळ्याजणींना कसं आत्मविश्वासाने जगता येईल, यासाठी प्रयत्न करीन."
............................
अशा काही मुद्द्यांवर विचार करता आला तर ते खूप हवं आहे.
**********
>> किंवा बायका पुरूष मिळून
ReplyDeleteखूप आवडलं.
>> नाही. आपण काही नव्या पोथ्या काढल्या नाहीत. जुनी व्यवस्था नव्या पद्धतीने पक्की होत आहे.
ReplyDeleteयाबद्दल थोडेसे:
आमच्या घराची वास्तुशांती करायची होती तेव्हा आम्ही ज्ञानप्रबोधिनीच्या पद्धतीने ती करायची असे ठरवले. (खरेतर, 'अजिबात नको' आणि 'रीतीप्रमाणे झालेच पाहिजे' या दोन टोकाच्या मतांमधला तो मध्यम मार्ग म्हणून निवडला होता) स्त्री पुरोहित होत्या. त्यांच्या विधींमध्ये बरीच कर्मकांडे टाळलेली होती. घराबाहेर काळी बाहुली टांगणे वगैरेही नव्हते.
एरवीच्या मंत्रांमध्ये जे "समर्पयामि", "करिष्यामि " असे असते, त्याचा अर्थ "मी" या या गोष्टी अर्पण करीत आहे, असा होतो. त्यात यजमान पुरुष त्या त्या गोष्टी अर्पण करीत असतो आणि पत्नी त्याच्या हाताला हात लावून सहभागी होत असते. इथे त्यात "समर्पयावः", "करिष्यावः" असा बदल केलेला होता. ज्याचा अर्थ "हे आम्ही दोघे मिळून अर्पण करीत आहोत" असा होतो. मला हा बदल चांगला वाटला.
जुना साचा तोच असला तरी हे विधी कालसुसंगत आणि सर्वसमावेशक करण्याचे ज्ञानप्रबोधिनीचे प्रयत्न स्तुत्य आहेत.
अर्थात, या धार्मिक विधींची गरज ज्याची त्याने ठरवायची हे खरेच.
माझ्या मते "गेट-टुगेदर" हा नवीन काळाने आपल्याला दिलेला एक छान सण आहे. ह्याला ना काळ पहावी लागत ना वेळ.. ना वय बघावे लागत ना इतर काही.. ज्यांची इच्छा आहे ते बायका-बायकांचं किंवा फक्त पुरुषांचं किंवा सगळ्याचं असं वेगळ वेगळ गेट टुगेदर करू शकतो. अजून एक फायदा असा कि रूढी-परंपरांची बंधने नसल्याने आपण सगळ्या भेटणार्या लोकांकडून थोडीफार मदत मागू शकतो.. उदा. प्रत्येकाने एक पदार्थ बनवून आणणे, प्रत्येकाकडून कॉनट्रिब्युशन घेणे. यामुळे पूर्वीच्या सणांच्या वेळेला ज्या बाईच्या घरात सगळे जमतात तिचा जीव काम आणि खर्चाने मेटाकुटीला येत असे. तेही टाळले जाते/ जाऊ शकते. :)
ReplyDeleteछानच लिहीलयस..
ReplyDeleteनव्या समाजात आपण कुठले नवीन सण आणले का? जे की समतेच्या पायावर आधारीत आहेत. जे बायकांचा एक गट करतील. त्यांना एकमेकींशी संवाद साधण्याची संधी देतील. >>
आपण आपल्या साजरं करण्याच्या रिती बदलायला हव्यात.>>
या अनुषंगाने सांगावसं वाटतं आमचा अक्षरा ग्रुप/bookclub दर महिन्याला किमान दोनदा भेटतो. मुख्यत: पुस्तकांचे वाचन, देवाणघेवाण,चर्चा इ. होते शिवाय अंध मुलांसाठी अवांतर पुस्तकांचे ध्वनीमुद्रण वगैरे. कुणी काही ’वेगळे’ केले तर लहानमोठ्या पार्ट्या, एकत्र सिनेमा, ट्रीप हे अधूनमधून चालूच असते. हे साजरं करणंच आहे. मात्र बायका-पुरूष मिळून हे होत नाहीये. काही पुरूषांना या (पुस्तकांच्या) उपक्रमात रस आहे पण त्यांना सामील करून घेण्याची मैत्रिणींची मुळीच इच्छा नाही :)
संक्रांतीचं हळदीकुंकू वगैरे प्रकारांऐवजी बर्याच जणी ’तिळगूळ संमेलन’ करू लागल्या आहेत आणि त्यात सर्वांना खुले आमंत्रण दिले जाते. येथील सामूहिक अष्टमीला (सवाष्ण) बायकांची ओटी भरली जाई. आम्ही काही जणींनी त्याला विरोध केला आणि आता नारळ-ब्लाऊजपीस वगैरेचे 'पाकीट' सरसकट सगळ्या बायकांना दिले जाते.
ही काही फार मोठी क्रांती नाही, समतेच्या आसपास जाण्यासाठी तर अजून खूप काही करायला हवं आहे. मुळात बहुसंख्य पुरूषांना अजूनही, लाजत मंगळागौर पूजणारी बायको, "एवढी पत्री तोडणं योग्य आहे का" असा प्रश्न विचारणार्या बायकोपेक्षा जास्त आवडते, पण बदल कूर्मगतीने का होईना होत आहेत.
मुळात बहुसंख्य पुरूषांना अजूनही, लाजत मंगळागौर पूजणारी बायको, "एवढी पत्री तोडणं योग्य आहे का" असा प्रश्न विचारणार्या बायकोपेक्षा जास्त आवडते >>>
ReplyDeleteअसेलही किंवा नसेलही.. त्याने काय फरक पडतो ?
’समतेच्या आसपास जाण्यासाठी अजून खूप काही करायला हवं आहे’, या संदर्भातली प्रमुख अडचण अशा अर्थाने हे वाक्य आले आहे. पुरूषांना, विशेषत: नवर्याला काय रूचते-काय नाही याचा विचार बहुसंख्य स्त्रिया करतात, कारण त्याच्या कलाने घेण्याची सूचना तिला घरातून-समाजातून सतत केली जाते. यामुळे या बायका ’वेगळा’ विचार शक्यतो करत नाहीत, केला तर मांडत नाहीत आणि मांडला तरी पटवून देऊ शकत नाहीत. एखादीचा ’पत्री तोडायला विरोध’ हे एक उदाहरण! तो फारसा महत्वाचा मुद्दा मानला जाणार नाही कदाचित (कारण मंगळगौर तर पूजते आहे ना! मग झालं तर!!) पण (विद्याने मांडलेल्या मुद्यानुसार) "मला बाई म्हणून आत्मसन्मानाने कसं जगता येईल हे मी पाहीन" हा विचार सहजपणे या नवर्यांना झेपणारा नाही. समता वगैरे दूरच्या गोष्टी. अशा पुरूषांचं प्रमाण समाजात अजूनही प्रचंड असल्याने फरक नक्कीच पडतो.
ReplyDelete