Monday, October 15, 2012

व्रत वैकल्ये


पहिलीतली छोटी मुलगी काल मला म्हणाली, " काकू, आज निळा ड्रेस घालायचा होता. तू कुठला घातलास बघ."
" हो?"
" हो. मी बघ निळा घातलाय."
" आईने काय घातलय आज?"
" निळी साडी"
" कुणी गं सांगीतलं हे? आज कुठल्या रंगाचे कपडे घालायचे ते?"
थोडा वेळ विचार केला आणि मग म्हणाली, " पेपरात लिहून येतं."
********

बायकांच्या सणावारांविषयीच आपण बोलत होतो. आता नवरात्रात कुठल्या दिवशी कुठल्या रंगाचे कपडे घालायचे? याचं एक नविन व्रत सुरू झालं आहे. पेपरमधे लिहून येणार.... मग बायका त्या त्या रंगाच्या साड्या किंवा ड्रेस घालणार... नसला तो रंग आपल्याकडॆ तर खरेदी करणार... एक फोटॊ काढून घेणार... आणि त्या वृत्तपत्राला पाठवणार...... दुसर्‍या दिवशी आवर्जून आपला फोटो आला का बघणार... नसेल तर खट्टू होणार.. असेल तर हर्षित!....
 काय हौस म्हणायची का काय?
मला याची मजा वाटते, विचार न करता , घराघरातल्या, कार्यालयातल्या, शाळेतल्या आणि कुठल्या कुठल्या बायका ( त्या दिवशी तो रंग वापरणं) हे का करत असतील?
बायकाच नाही पुरुषांसाठी जरी कुणी हे काढलं तरी पुरूषही आपलं डोकं गहाण ठेवतील. माझी खात्री आहे.

******

त्यात थोडी मजा आहे. असेल.
पण कुणीतरी सांगायचं आणि आपण करायचं. असं का होत असेल?
आपलं कुठल्याही दिवशी कुठल्याही रंगाचे कपडे घालण्याचं स्वातंत्र्य असं कुणालाही का देऊन टाकायचं?
माणसाची मूळ वृत्ती आहे का ही?
पारतंत्र्य!
कुणीतरी सांगा मी करीन.
कुणीतरी ठरवा मी तसं वागेन.
मला चाकोरी आखून द्या मी खाली मान घालून त्यातूनच फिरेन.

*******
आपण सगळ्यात आधी काय सोडून देत असू तर विचार करणं.
म्हणूनच एखाद्या हुकूमशहाला समाज आपल्याला हवा तसा वाकवता येतो.

*******
म्हणजे आपण देशप्रेमाची इंजेक्शन्स दिली की सैनिक तयार करणार.
धर्माची दिली  की दहशतवादी तयार करणार....
*******

10 comments:

 1. यानिमित्ताने "पण कुणीतरी सांगायचं आणि आपण करायचं. असं का होत असेल?" असा मुलभूत प्रश्न पडण्यापर्यंत या वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीचा विचार करणं हे आवडलं.
  नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगाचे कपडे घालणं यात मूळचा धार्मिक परंपरेचा भाग असला तरी माझ्या आजूबाजूला मात्र मला कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्यावेळी वेगवेगळे 'डे' ज साजरे करण्यामागे जी सेलिब्रेशनची, मौजेची भावना असते, तीच दिसते आहे. हल्ली बरीच मराठी वृत्तपत्रे अशा प्रकारची मार्केटिंगची आणि लोकप्रियतेची स्वस्तातली तंत्रे वापरत आहेत. आपले कसले कसले अनुभव लिहून पाठवा, कुठलेतरी ग्रुप फोटो पाठवा, गणपतीच्या सजावटीचे फोटो पाठवा, वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो पाठवा इत्यादी. त्यातलाच हा एक भाग. हे करणाऱ्या बायका ते निव्वळ मजा म्हणूनच करत आहेत.

  ReplyDelete
  Replies
  1. >> वरवर साध्या वाटणाऱ्या गोष्टीचा
   ही साधी गोष्ट इतकी पसरली आहे...

   >> कॉलेजमध्ये वार्षिक स्नेहसंमेलनाच्यावेळी वेगवेगळे 'डे' ज साजरे करण्यामागे जी सेलिब्रेशनची, मौजेची भावना असते,
   त्यात ती छोट्या समूहासाठी असते. आणि सहभागी होणारा/होणारी ते ठरवणार्‍या लोकांमधली एक किंवा त्यांच्या जवळची असू शकते/ असते. हे तसं नाही.

   म्हणजे आपण ’इंद्रधनु’ सार्‍याजणींनी एका दिवशी विशिष्ट रंगाची साडी/ ड्रेस घालायचा ठरवला तर ठरवणार्‍या आपण असतो, सगळ्यांची मते घेतली जातात, निखळ मजा येते.

   >> हे करणाऱ्या बायका ते निव्वळ मजा म्हणूनच करत आहेत.
   हो. पण विचार करत नाहीयेत. काही वर्षांनी या मजेची रूढी होऊ शकते.

   तुझ्या आजूबाजूला ज्या बायका हे करताहेत त्यांना विचार, त्या असं का करताहेत? आणि आम्हांला कळव.

   >> आपले कसले कसले अनुभव लिहून पाठवा, कुठलेतरी ग्रुप फोटो पाठवा, गणपतीच्या सजावटीचे फोटो पाठवा, वाढदिवसाच्या निमित्ताने फोटो पाठवा इत्यादी. त्यातलाच हा एक भाग.
   नाही. हा त्यातला भाग नाही. इथे काहीतरी नियम लावून मग सहभागी करून घेणं असं आहे.
   अनुभव लिहिणॆ हे लोकांना व्यक्त होण्यासाठी व्यासपीठ देणं आहे. बाकी तू लिहिलंस ते ही विभक्त आणि छोटी कुटूंबे झाल्याने लोकांच्या समूह भावनेला वाट देणार्‍या गोष्टी आहेत.

   Delete
  2. नवरात्री उत्सवाचाच विचार करायचा झाला तर त्यात गेल्या पाच दहा वर्षात कितीतरी नवे पायंडे पडले आहेत. तोरण मिरवणुका, खऱ्या हत्तीभोवती महाभोंडला, देवीच्या अवाढव्य मूर्ती, त्यांच्यासाठी रस्त्यांवरती मंडप, वगैरे. या सगळ्यात विचार वगैरे तर नाहीच पण उपद्रवमूल्य मात्र भरपूर आहे. या प्रथा म्हणजे विशिष्ट पक्षाची, गटाची शक्तीप्रदर्शनेच असतात.
   रोज वेगळ्या रंगाचे कपडे घालून उत्सव साजरा करण्याच्या प्रकारातही काही विचार नाहीये, पण वर उल्लेखलेल्या प्रथा अनिष्ट आहेत तसं मला त्यात काही अनिष्ट वाटत नाही. त्याची रूढी होऊ शकते, हे मान्य. पण आपल्याकडच्या इतर रुढींप्रमाणे ही रूढी विशिष्ट गटातल्या बायकांसाठी नाही. उत्सव साजरा करण्याची एक पद्धत यापलीकडे त्याला काही महत्व द्यावं असं मला वाटत नाही.

   Delete
 2. बेंबट्या,
  जगात कुंभार थोडे आणि गाढवे फार.

  -- भिकाजी जोशी

  ReplyDelete
 3. काही वर्षांनी या मजेची रूढी होऊ शकते.>> ह्याला माझे १०००% अनुमोदन ...

  पण आपल्याकडच्या इतर रुढींप्रमाणे ही रूढी विशिष्ट गटातल्या बायकांसाठी नाही.>> माझ्या ओळखीतल्या विधवा बायकांनी लाल किंवा हिरव्या साड्या त्या दिवशीचा रंग असूनही नेसल्या नाहीत..

  ReplyDelete
 4. आपल्या ब्लॉगला स्टार माझा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन. आपले लेखन छान आहे. बायकांना नवीन साड्या घेण्यासाठी कोणतेही निमित्त पुरते असे म्हटले तर राग मानु नये! (त्याऐवजी एखादी साडी घेऊन टाकावी!)

  ReplyDelete
  Replies
  1. >>आपल्या ब्लॉगला स्टार माझा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन
   धन्यवाद!
   >>आपले लेखन छान आहे.
   आभारी आहे.
   >>बायकांना नवीन साड्या घेण्यासाठी कोणतेही निमित्त पुरते असे म्हटले तर राग मानु नये!
   असं सरसकट सगळ्या बायकांसाठी म्हणता यायचं नाही.
   :)

   Delete
 5. Indradhanu la स्टार माझा स्पर्धेमध्ये बक्षीस मिळाल्याबद्दल sarvanche hardik अभिनंदन !
  Ya nimittane recent lekh parat vachale.. chan vatale..
  Ani ho - regarding this very post, tumachya sagalyanchi ya vishayavar bolayala nakkich avadel :)

  Regards,
  Arati.

  ReplyDelete
  Replies
  1. धन्यवाद, आरती!
   :)
   कधीतरी नक्की बोलूया.

   Delete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...