हा विषय खरे तर मी माझ्या "आपली आपली एन्जॉयमेंट" मध्येच समाविष्ट करणार होते.. कारण तो थोडाफार त्या विषयाच्या जवळ जातो.. पण मला दोन्ही विषयांवर आपली स्वतंत्र चर्चा होणे अपेक्षित आहे म्हणून या दुसऱ्या लेखाचा घाट...
या लेखात मांडलेले विचार मनात यायचे कारण म्हणजे मी लग्नानंतर पहिल्यांदाच माहेरी (पुण्याहून मुंबईत) आले होते.. एकदम १० दिवसांसाठी.. पहिले काही दिवस (खर तर १-२ च) त्यातल्या त्यात बरे गेले.. पण नंतर खूप प्रकर्षाने नवऱ्याची आठवण यायला लागली.. त्याच्याशिवाय मी इथे इतके दिवस करू काय असं वाटायला लागलं सतत..
म्हणून मी दोनदा-तीनदा नवर्याला फोन केला.. तर तो त्याच्या मित्रांसोबत पार्टी करण्यात मग्न होता.. कधी फुटबॉल खेळण्यात.. कधी क्रिकेट.. कधी सिंहगड ट्रीप..
अगदी प्रामाणिकपणे कबूल करते.. मला खूप वाईट वाटले..
अगदी प्रामाणिकपणे कबूल करते.. मला खूप वाईट वाटले..
ज्याच्याशिवाय आपल्याला अज्जिबात करमत नाही त्याचे आपल्यावाचून काहीच अडत नाही हे ऐकून अहंकार थोडासा दुखावला गेला बहुतेक माझा...
आणि मग मी विचार करायला लागले.. त्याचे माझ्यावाचून अडावे असे काही मी केले आहे काय? घरात कपडे, भांडी आणि इतर स्वच्छतेला बाई आहेत.. त्या कपडे धुण्यापासून ते अगदी त्यांच्या घड्या पण करून ठेवतात.. इस्त्रीवाला घरी येऊन कपडे घेऊन जातो आणि आणून देतो.. अजून तरी घरात स्वयंपाक सासूबाई करतात.. मी त्यांना सगळी मदत करते..पहिल्यापासून अमुक कामे बायकोची आणि अमुक नवऱ्याची असा पायंडा पडू नये म्हणून मी त्याची कामे त्याला करायला लावते.. उदा. स्वत:चे ताट स्वत: वाढून घेणे, स्वत:ची अंतर्वस्त्रे स्वत: धुणे.. (मला सध्या तरी एवढीच कामे आठवत आहेत जी आम्हाला करायला उरतात).. लग्नाला ६ च महिने झाले असल्याने मुले असण्याचा काही संबंध नाही.. कि ज्यांचे माझ्यावाचून अडावे...
मी नुकताच महेंद्र कुलकर्णी यांच्या "काय वाट्टेल ते" ह्या ब्लॉग वरील एक लेख वाचला होता.. "गुळाचा गणपती" नावाचा.. त्यात त्यांनी लिहिलं होत.. बायका मुद्दाम आपल्या नवऱ्याला एकूण एक वस्तू हातात देऊन पांगळ करून टाकतात.. अगदी गुळाचा गणपतीच.. जेणेकरून त्याचे पदोपदी आपल्यावाचून अडावे.. त्या वेळी मी तो लेख वाचून.. "बंर झालं बाई आपण काही आपल्या नवऱ्याचा असा गुळाचा गणपती नाही होऊ देत" असा विचार करून आनंद मानला होता...
पण आज या घटनेनंतर विचार केला तर जाणवतंय.. बायका असं का करत असतील.. नवीन घरात आल्यावर.. नवऱ्याच्या आयुष्यात आपलं असं काही स्थान निर्माण करायच्या प्रयत्नात हे घडत असेल.. सासरी आल्यावर नवीन नवीन एक नवरा सोडून कोणीच आपले नसते.. विशेषत: लग्नानंतर शहर बदलले आणि नवीन शहरात कोणाशी ओळख पाळख नसेल तर खूपच एकटेपणा जाणवतो..नंतर हळूहळू हि इतरांबद्दलची परकेपणाची भावना कमी होते.. पण निदान लग्न नाव असतांना ती मुलगी खूप इन्सिक्युर फील करते... आणि आपल्यापाशी असलेल्या एकमेव गोष्टीला जीवापाड जपायला लागते.. थोडा हक्कही गाजवायला लागते.. आणि मग हे "गुळाचा गणपती" प्रकरण त्याचाच एक भाग असते..
पण असं काही नवऱ्याच्या बाबतीत घडत नाही.. किंबहुना मला वाटायला लागलेय कि हे त्याच्या खिजगणतीतही नसते.. तो त्याच्याच घरात.. त्याच्याच परिसरात राहत असल्याने त्याला असे इन्सिक्युर वाटत नाही.. त्याच्यावर प्रेम करणारी अनेक माणसे त्याच्या आसपास असतातच..
मागेच कुठल्यातरी लेखावर दिलेल्या प्रतिक्रियेत दिपाताईने म्हटलेय तसे नवऱ्याला बायकोसाठी कधीतरी खास काही करावे असे वाटतच नाही त्याचे हे कारण असावे.. कि त्याने कोणाच्यातरी (बायकोच्या) आयुष्यात आपले काही स्थान निर्माण करायलाच हवे अशी गरज त्याला वाटत नाही..
मग आपल्याला वाटायला लागते.. याच्या आयुष्यातले आपल नक्की स्थान तरी काय?
संसार म्हणजे
रोजची तीचतीच
कामे फक्त
व्हायला हवीत
करणारी कोण
याला तशी
काहीच
किंमत नाही
रोजची तीचतीच
कामे फक्त
व्हायला हवीत
करणारी कोण
याला तशी
काहीच
किंमत नाही
हि ८ मार्च २०१० ला ब्लॉग वर आलेली कविता बहुतेक याच भावनेतून जन्मलेली असावी..
तर.. माझा प्रश्न असा आहे सख्यांनो आणि सखींनो..
"आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे यासाठी त्याला "गुळाचा गणपती" बनवून पांगळे करणे याव्यतिरिक्त काही मार्ग आहेत काय? असतील तर ते कोणते?
"आपल्या नवऱ्याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे यासाठी त्याला "गुळाचा गणपती" बनवून पांगळे करणे याव्यतिरिक्त काही मार्ग आहेत काय? असतील तर ते कोणते?
- पियू
तुझा हा ब्लॉग वाचून खूप छान वाटले.ब्लॉग वाचून आणि मी पंधरा वर्षे मागे गेले. आत्ता तू ज्या मनाच्या अवस्थेत आहेस ते अगदी साहजिकच आहे.नवीन लग्न झाल्यावर सुरुवातीच्या काळात आपण आपल्या नव-याच्या घराला,त्यातील माणसांना आपलेसे करण्यासाठी हरत-हेने प्रयत्न करत असतो.आपलंस करण्यासाठी आपण त्यांच्यात सामावून जाण्यासाठी बारीक बारीक गोष्टींमध्ये जीव लावून,त्यानुसार प्रत्येकात गुंतवू बघत असतो.आणि खरंच सांगते की हे सगळं करण म्हणजेच प्रेम ही समज करवून घेतो.म्हणजे मी बायको म्हणून माझ्या नव-याच्या बारीक बारीक गोष्टी खूप जपीन.कींवा तुझ्या म्हणण्यानुसार आपण त्याला इतकं पांगळ बनवतो की तो आपल्यावर अवलंबून रहावा,अथवा त्याचे आपल्यावाचून आडावे.आणि हे म्हणजेच प्रेम.पण खरंच शांतपणे विचार केलास तर तुलाही कळेल की यात प्रेम नसून सगळ्यांनी त्या त्या कामासाठी तुला गॄहीत धरणे आहे.जे वरवर पहाता आपल्याला प्रेम असल्याचा भास असतो.
ReplyDeleteआपला स्वत:चा आनंद ,आपल्याला मजा येण्याच्या गोष्टी या कोणाही माणसावर अवलंबून ठेवू नकोस. बघ ती व्यक्ती जर आपल्या बरोबर असेल तर नक्कीच मजा येते.पण नाही म्हणून ती गोष्ट करायचीच नाही हे चुकीचे आहे.आलात तर तुमच्या बरोबर नाहीतर त्याच्याशिवाय.....प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहीजे. तो कोणावर अवलंबून ठेवू नये.नवीन नवीन लग्न झाल्यावर हे वाटूच शकतं.हे मी तुला लग्नाला पंधरा वर्षे झाल्यावर सांगत आहे.यावर नक्की विचार कर.
अच्छा.. म्हणजे जे चालू आहे (पांगळे न बनवण्याचे प्रयत्न) ते योग्य आहेत तर...
Deleteपण मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थोड्या (किंवा कदाचित खूप) डिस्टर्ब का होतो? आपल्याला वाईट का वाटते? (का असे फक्त सुरुवाती-सुरुवातीला होते?)
आणि.. ब्लॉग च्या शेवटी लिहिलंय तसं... त्याच्या आयुष्यात आपली काही जागा असावी असं आपल्याला वाटत.. मग एखाद्याच्या आयुष्यात असे स्थान निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं?
या बाबतीत सासूबाईंचा आदर्श ठेवून नाही चालणार (त्यांनी नवऱ्याच्या मनात कितीही स्थान निर्माण केले असले तरी). त्या त्याची आई होत्या. पण बायको म्हणून त्याच्यासाठी स्वत:च्या एकूण एक इच्छांना मुरड घालून केवळ त्यालाच आपले विश्व बनवले तर मग तू म्हणतेस तसे आपल्याला स्वत:चा आनंद मनमोकळेपणाने घेता येणार नाही.
त्याच्याशी बोलून त्याच्या आयुष्यात येणाऱ्या अडी-अडचणीत साथ देणे किंवा त्याचे विचार जाणून घेणे, त्याच्याशी त्याला आवडेल त्या विषयावर चर्चा करणे हे करता येईल.. पण मुळातच नवरा अबोल आणि काही शेअर न करणारा असेल तर?? (जनरली नवरे असेच असतात का ग?)
>>मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थोड्या (किंवा कदाचित खूप) डिस्टर्ब का होतो? आपल्याला वाईट का वाटते?
Deleteमाझ्यामते अहंकार दुखावल्यामुळे / अपेक्षाभंगामुळे
आपल्यावाचून कोणाचं अडतं हे अहंकार सुखावणारं असतं. आपण किती महत्त्वाचे असा समज मनात होतो किंवा असंच महत्त्व द्यावं अशी अपेक्षा केली जाते. मग त्यादृष्टीनेच विचार केला जातो. ‘त्याला फ़क्त माझ्याच हातचं अमुक एक आवडतं किंवा अमुक एक बाबतीत त्याचं माझ्यावाचून पान हलतं नाही..’ असं स्वत:चं महत्त्व वाढवणं सुरू होतं. पण हे लक्षात येत नाही की हळूहळू आपणच स्वत:ला बंधनात जखडून घेतो आहोत (साधं उदाहरण म्हणजे नोकरीत आपल्यावाचून काम अडतं, आपण महत्त्वाचे हे छानच वाटत असतं. पण रजा घ्यायची असते किंवा कामात बदल हवा असतो तेव्हा हेच कारण आड येतं. मग ‘डेलिगेशन’चं महत्त्व लक्षात येतं:)). जर स्वत:चं स्वतंत्र / स्वावलंबी असणं मोलाचं वाटत असेल तर इतरांनी आपल्यावर अवलंबून राहावं / आपल्यावाचून त्यांचं अडावं असा विचार का?
एखाद्याच्या आयुष्यात आपले स्थान निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावेत असं मला तरी वाटत नाही. काळाच्या ओघात ते आपोआपच तयार होतं. तुमच्या सहजीवनाची तर आत्ता कुठे सुरुवात झाली आहे. ह्या नात्याला फ़ुलायला वेळ दे :).
अश्विनीने लिहिलंय तसं, एकमेकांचे स्वातंत्र्य जपणं, आपापली 'स्पेस' तयार करणं /जपणं मलाही महत्वाचं वाटतं आणि हे फ़क्त नवर्यासाठीच नाही तर मुलांच्याबाबतीत किंवा कुटुंबातील प्रत्येकाच्या बाबतीतच लक्षात घ्यायला हवं असं मला वाटतं.
खूप छान समजावलस.. पटतंय... :)
Delete१) शेरलॉक होम्सने म्हंटल्याप्रमाणे आधी डोक्यात निष्कर्ष ठरवून घ्यायचा आणि मग त्याच्या समर्थनार्थ असलेली उदाहरणे (च फक्त) गोळा करायची असं होतंय का हे अगदी स्वत:शीच तपासून बघा
ReplyDelete२) आपण आपल्या डोक्यात काही आडाखे ठरवून घेतलेले असतात, जोडीदाराचे performance indicators म्हणूयात. गंमत (किंवा मेख) अशी आहे की हे आडाखे आपण मनात धरतो आणि त्याप्रमाणे वागला नाही की खट्टू होतो. (दिलवालेतलं पलटके देखा तो.. हे सिनेमात छान वाटतं पण प्रत्यक्षात तसं नाही ना होणार.)
३) आपले अनुभव, आपले प्रश्न हे वैयक्तिक असतात. प्रत्येकवेळेला त्याचं सामान्यीकरण (generalisation) करणं योग्य असेलच असं नाही. म्हणजे मला असं वाटतं,दिसतं,जाणवतं आहे, तर हा लगेच बायांचा समान प्रश्न होईल का ?
तुमच्या लग्नाला ६च महिने झाले आहेत, एकदम आयुष्यातलं स्थान वगैरेपर्यंत पोचण्यात घाई होते आहे
नक्की विचार करेन. प्रतिक्रियेसाठी खूप खूप आभार.
Delete'त्याचं माझ्यावाचून पावलोपावली अडतं' आणि 'त्याचं माझ्यावाचून मुळीच अडत नाही' ही त्याच्या आयुष्यातलं आपलं स्थान ठरवण्याची मापेच नव्हेत. आपलं एकमेकांवाचून किती अडतं, यापेक्षा आपण एकमेकांना स्वतंत्रपणे वाढायला, फुलायला, आपापली 'स्पेस' जपायला कशी मदत करतो; हे जास्त महत्वाचं नाही का?
ReplyDelete'मग एखाद्याच्या आयुष्यात असे स्थान निर्माण करण्यासाठी काय करावं लागतं?' - या प्रश्नाला काही नेमकं उत्तर असणार नाही आणि त्याच्या आयुष्यात आपलं स्थान काय हे तसा कसोटीचा प्रसंग आल्याशिवाय कळणारही नाही.
बोलून व्यक्त होणं, प्रत्येक गोष्ट शेअर करणं ही प्रत्येकाची गरज असेलच असं नाही किंवा, तसा प्रत्येकाचा स्वभाव असेलच असं नाही. आपण जसजसं एकमेकांना ओळखत जाऊ तसतशा या गोष्टी आपलं आपल्यालाच उलगडत जातात.
तुझा प्रतिसाद खूप आवडला.. नक्की विचार करेन. आभार..
Delete"तुमच्या लग्नाला ६च महिने झाले आहेत, एकदम आयुष्यातलं स्थान वगैरेपर्यंत पोचण्यात घाई होते आहे"
ReplyDeleteअनुमोदन
अम्म.. खंर तर माझं जरास चुकलंच.. अश्विनीने म्हटलंय तसं "त्याचं माझ्यावाचून पदोपदी अडत/ मुळीच अडत नाही" हेच मी कदाचित त्याच्या आयुष्यातल माझं स्थान वगैरे ठरवायचं माप समजत होते.. खंर तर माझा अहंकार कुठेतरी दुखावला गेला होता..
Deleteसगळ्या प्रतिक्रियांशी सहमत.. माझं खरंच चुकलं...
खरंच पियू, तुझ्या लग्नाला सहाच महिने झाले आहेत. अजून थोडा वेळ जाऊ दे. प्रत्येक संसारात प्रॉब्लेम्स असतात, तशी गंमतही असते. ती गंमत शोधून त्याचा आनंद घ्यायला विसरू नकोस.
ReplyDeleteAll THE BEST!!!
पियू तुझे स्वागत.
ReplyDeleteतुझे ब्लॉग वाचले. तू खूप मोकळेपणाने लिहीत आहेस ते खूप आवडले.
>>मग नवर्याचे आपल्यावाचून अडले नाही कि आपण थोड्या (किंवा कदाचित खूप) डिस्टर्ब का होतो? आपल्याला वाईट का वाटते
आपल्यावाचून कोणाचं आडलं आहे, आपल्यावर कोणीतरी अवलंबून आहे हा विचार सर्वसाधारणपणे व्यक्तिचा अहंभाव सुखावणारा असतो.
खरतर मला वाटतं प्रत्येकवेळी प्रत्येक गोष्ट ही क्रुतीतून, बोलण्यातून दाखवली पाहिजे अस नाही. ते व्यक्तीच्या स्वभावावर अवलंबून असतं. त्यापेक्षा अडचणीच्यावेळी साथ असणं, भावनिक, मानसिक आधार असणं, एकमेकांना जाणणं हे कितीतरी पटीने मोलाच आहे.