Sunday, July 15, 2012

ओरखडा


आम्ही कर्वे रस्त्यावरून जात होतो. स्कूटरवर होतो, घाईत होतो. एवढ्यात येणारे काही लोक वळून पाहताहेत, थांबून पाहताहेत, असं दिसलं. काही अपघात झालाय की काय? म्हणून बघत बघत पुढे जात होतो.
 दिसले दृश्य ते असे, एक बाई , कामकरी/कष्टकरी वर्गातली नव्हे तर, सुखवस्तू घरातली, कॅप्री आणि टीशर्ट घातलेली, तावातावाने पुढे चाललेली, खूप चिडलेली, वय ३०-३५, तिच्या पंधरावीस फूट मागे  एक पुरूष तिच्याशी बोलण्याच्या पावित्र्यात, तिच्या मागे मागे चाललेला. ती मधेच ओरडून मागे वळून त्याच्याकडे पाहात हातवारे करत रागारागाने काही तरी बोलत होती.
 असे दृश्य भररस्त्यात कधी पाहिल्याचे मला आठवत नाही.
  हे दृश्य माझ्या मनासमोरून जात नाही. मी पुन्हा पुन्हा मागे जाते आणि विचार करते काय झालं असेल त्या बाईला? मध्यमवर्गात सहसा पाळले जाणारे नियम तोडावेत, असं वाटण्याइतपत काय झालं असेल?
 आपल्यावर मर्यादा पाळण्याचं बंधन असतं, काय ते घराच्या चौकटीत, दाराआड, ते ही शक्यतो झोपण्याच्या खोलीतच. असं असताना ती हे सगळे नियम का तोडत असावी?

त्या दोघांचं काय नातं असावं? बहीण- भाऊ तर नसावेत. नवरा- बायको असतील, एकमेकांत गुंतलेले मित्र-मैत्रिण असतील, एकत्र राहणारे मित्र-मैत्रिण असे असेल.

दोष कुणाचा असेल? बाईचा की पुरूषाचा? मला माहीत नाही.
किंवा असं दोघांपैकी एकाकडे बोट दाखवता यायचंही नाही.

मला त्या बाईच्या हिमतीचं कौतुक वाटतंय. "सगळं काही छान चाललंय" च्या अवकाशावर ती ओरखडे काढत चालली होती.
सकाळच्या वेळी नेहमीसारख्या घाईत असणार्‍या कर्वे रस्त्याच्या चित्राला ती फाडत चाललेली!

चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल?
तुम्हांला काय वाटतं?

*****************

आणखी मला असं वाटलं की मी थांबले का नाही?
मी घाईत नसते तर थांबले असते का?
अशा वेळी मी किंवा कोणीही काय करायला हवं?
आपल्याला असं शिकवलं गेलंय की कुणाच्याही खाजगी गोष्टीत पडायचं नाही. त्यातल्या त्यात नवरा-बायकोच्या तर नाहीच नाही.
मला वाटतं मी थांबायला हवं होतं, काही मदत हवी आहे का? विचारायला हवं होतं. त्या दोघांना कदाचित जवळच्या हॉटेलमधे नेता आलं असतं, चहा घेता घेता मी नुसतं ऎकून घ्यायला हवं होतं.
समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं.

********************
पुढच्यावेळी मी असा प्रयत्न करीन.

******************

4 comments:

  1. >> "सगळं काही छान चाललंय" च्या अवकाशावर ती ओरखडे काढत चालली होती

    मस्त!

    ReplyDelete
  2. >>चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल?
    Never wash your dirty linen in ’public’.
    चार लोकात आपले राग-लोभ दाखवले तर त्याचा ’तमाशा’ व्हायचीच शक्यता जास्त! चार ’हितचिंतकांचा’ सल्ला जरूर घ्या त्याने फायदा होईल असे वाटत असेल; दुसरी बाजू समजायला मदत होईल असे वाटत असेल किंवा किमान पक्षी बोलल्याने हलके वाटणार असेल तर. पण शेवटी आपली लढाई ही आपणच लढायची असते.

    तू मध्ये पडायचं कारणंच काय होतं? त्या बाईला (किंवा पुरूषाला) मदतीची गरज होती असं वाटतय का? तू लिहीलं आहेस ते वाचून मला तर असं वाटलं की त्यांच्यामध्ये कोणी पडलं नाही ते कदाचित बरंच झालं असेल. असंही झालं असेल की तिचा राग नंतर शांत झाला; त्यांच्यात संवाद झाला आणि ते दोघे(च) जवळच्या हॉटेलमध्ये जाऊन चहा घेऊन आले.

    कोणी कुणाला शारिरीक इजा पोचवत असेल तर जरूर न बोलावतादेखील मध्ये पडावं. त्रयस्थांच्या मानसिक इजा हुकमीपणे ओळखण्याची कला माझ्यात तरी नाही.

    - सचिन

    ReplyDelete
  3. कर्वे रस्त्याच्या चित्राला ती फाडत चाललेली!! >> मस्त
    असं काही ’वेगळं’ दिसलं की तू सोडून देऊ शकत नाहीस हे तुझं वेगळेपण आहे.
    चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल?
    तुम्हांला काय वाटतं? >>
    मला वाटतं हा सामाजिक संकेत आहे म्हणून किंवा आधीच डोक्याला झालेला ताप वाढू नये म्हणून आणि आपलं छान चाललेलं आहे याचं इतरांच्या नजरेतलं कौतुक (किंवा असूया) आपल्याला नकळत आवडते- ती तशीच रहावी म्हणून
    माझ्या बाबतीत आणखी एक कारण- आपल्या रागामुळे मुलं केविलवाणी होतात हे मी पाहू शकत नाही म्हणून..
    समाज म्हणून बघ्यांच्या गर्दीतलं एक व्हायचं नाही, हे ठरवायलाच हवं >>
    हे त्या घटनेच्या गांभीर्यावर अवलंबून असावं असं मला वाटतं. तू पाहिलीस ती घटना वेगळी होती पण सामाजिकदॄष्ट्या गंभीर नव्हती..त्या स्त्री व पुरूषासाठी ती मानसिकदृष्ट्या गंभीर असेलही.

    ReplyDelete
    Replies
    1. >>आपल्या रागामुळे मुलं केविलवाणी होतात हे मी पाहू शकत नाही म्हणून..
      अगदी खरं!

      Delete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...