Friday, June 29, 2012

त्याच्या आयुष्यातील आपली गरज.. स्थान.. -- २


पियू,
   तुझे काय चुकले?
 आपल्या नवर्‍याच्या आयुष्यात आपले काही स्थान असावे, ते महत्त्वाचे असावे, आपल्यावाचून त्याचे अडावे, त्याला आपली आठवण यावी, असे वाटण्यात चुकीचे काय आहे?
कुठलीही दोन माणसे एकमेकांत गुंतलेली असतील/जवळच्या नात्यातली असतील तर त्यांना एकमेकांसाठी असं वाटणारच ना?
"आपल्या भावना", ”आपल्याला आतून वाटणं’ हे कधीही नाकारायचं नाही.
मग त्यामागची कारणं काय आहेत? गुंतागुंत काय आहे? ते शोधू या ना!
पण ’मला वाटूच नये”, ’असं मनात नाही यायला पाहिजे’,...... अशा अपेक्षा स्वत:कडून ठेवणं हे स्वत:वर अन्याय करणारं आहे, त्यावर विचार झाला की वाटणं बदलू शकतं.

 तोवर जिथे आहोत, तिथून सुरूवात करायची.
तुझं म्हणणं असं आहे की तुला त्याच्याबद्द्ल असं/जे वाटतं पण त्याला वाटत नाही. असं का?
हा तुम्हां दोघांना वाढवण्यातला फरक आहे.

 तू हे ऎकत वाढलीस की ..." आधी लग्न करा आणि मग नवरयाला घेऊन फिरा कुठे फिरायचे ते"......
तुझ्या नवर्‍याने हे वाक्य कधी ऎकले असेल का? नसावे.
मुली सहसा अशी वाक्ये ऎकत वाढतात. अगदी लहान असल्यापासून नवर्‍याची एक प्रतिमा त्यांच्या मनात तयार होत जाते, त्याचं घर म्हणजे माझं घर, त्याचं सुख म्हणजे माझं सुख, त्याला पटेल तसं मी वागीन, तो माझ्या आयुष्याचा मह्त्त्वाचा भाग असणार आहे, मी त्याच्याविना अपुरी, माझं ध्येय काय? त्याची मर्जी सांभाळणं, त्याच्या आयुष्यात स्थान निर्माण करणं.
 मुली नुसती अशी वाक्ये ऎकत नाहीत, तर आजूबाजूला बायकांना असं वागताना बघतात.
मुलग्यांना असं काहीही ऎकवलं जात नाही. त्यांच्या मनातली बायकोची प्रतिमा कशी असते? मदतनीसाची, किंवा रूममेटची.
म्हणजे लग्न झाल्यावर त्याला असे ऎकवले जाऊ शकते, " मोजे सापडत नाहीत का? आता बायकोला विचारत जा."
मग बायको नियमाने मोजे तयार ठेवू लागली की त्याला बायकोची आठवण येणारच! आपल्याला अशी पायाची दासी वगैरे व्हायचं आहे का? (तिथे स्थान निर्माण करायला पुष्कळ वाव आहे.) नाही ना?

 मुली सहसा असं करतात, तुझं काय मला माहीत नाही, त्यांच्या मनात जी घोड्यावरून दौडत येणार्‍या राजकुमाराची प्रतिमा असते, तिला आपल्या नवर्‍याचं रूप देतात. नवरा म्हणजे असा असणारच, असायलाच हवा, असं गृहीत धरतात.
 नवरा असण्याआधी तो एक माणूस आहे, आणि तो तसा नाही आहे. हे वास्तव मुली पाहू शकत नाहीत.
का? याला लग्नाची किंवा प्रेमाची जी मिथकं आहेत, तीही कारणीभूत आहेत.
लग्न हा एक व्यवहार आहे, सोय आहे, मग तुमचं ठरवून लग्न असो की प्रेमविवाह असो.
तू किंवा कुठलीही मुलगी ही नवर्‍याची एक प्रतिमा जपत, त्याची वाट पाहात वाढली आहे त्यामुळे एकदा तो त्या मुलीच्या आयुष्यात आला की तो तिचं सर्वस्व झालेला आहे.
 दुसरं असं की ती शरीराने त्याच्याशी बांधली गेली आहे, ते त्याला समर्पित केलं, म्हणजे तो खासचं आहे ना, तिच्यासाठी. आजवरचं आयुष्य, ते शील, काचेचं भांडं वगैरे ती जपत आली ती त्याच्यासाठीच!
 मला असं वाटतं लग्न झाल्या झाल्या मुली नवर्‍यात फार अडकतात, याचं कारण शारीरिक संबंध हे असावं.
मुलग्यांसाठी ते तसं नसतं. म्हणजे ते बायकोशी प्रामाणिक नसतात असं मी सुचवतही नाही आहे. पण ते स्वत:ला जपत आलेले नसतात, म्हणजे नाही त्यांना जपायला लागत.
बायकोशिवायही त्यांचं त्यांचं जग असतंच.

त्यामुळे जर त्याच्या आयुष्यात स्थान नाही, त्याला आपली गरज नाही असं वाटायला लागलं तर अहंकार दुखावला जात असेल, पण त्यापेक्षाही मला वाटते ही निराशा आहे.

या पार्श्वभूमीवर तुझा प्रश्न काय आहे, तो पाहू या.
नवर्‍याच्या आयुष्यात आपली काही गरज निर्माण करणे, यासाठीचे मार्ग कुठले? त्याच्या आयुष्यातलं आपलं स्थान काय?
केव्हा नवर्‍याला आपली गरज भासावी, असं तुला वाटतं?
मोजे घालताना नक्कीच नाही.
म्हणजे त्याला भावनिक पातळीवर आपली गरज भासली पाहिजे असं तुला वाटतं.
संकटात, आनंदात, दु:खात, ऎरवी सहजही त्याला तू आठवली पाहिजेस. आणि त्याने तुला ते सांगीतलंही पाहिजे.
त्याला आठवत असणारही पण तो तुला सांगत नाही आहे, अशी एक शक्यता आहे.
दुसरी शक्यता अशी आहे की नाही त्याला आठवण येत.... अशावेळी काय करायचं.
स्वीकारायचं.
तुला त्याचा त्रास होतोय, वाईट वाटतंय... ठीकच आहे.
पण स्वत:ला दुखवून घ्यायचं नाही.
तो तुझ्याशिवाय मजा करू शकतोय पण तू त्याच्याशिवाय मजा करू शकत नाही आहेस. काय करायचं?
स्वीकारायचं.

एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं ते असं की आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू आपण आहोत. केंद्रस्थानी दुसर्‍या कुणालाही, नवर्‍यालाही ठेवायचं नाही.
स्वत:कडे त्याच्या नजरेने पाहायचं नाही.
मी जर त्याच्या आयुष्यात सर्वात महत्त्वाची व्यक्ती नाही आहे तर याचं कारण माझ्यात काहीतरी कमी आहे, असे अर्थ काढायचे नाहीत.

मुळात खरोखरी एकमेकांच्या प्रेमात पडण्यासाठी सहा महिने हा खूपच थोडा कालावधी आहे, एवढ्यात तर एकमेकांची पुरेशी ओळखही होत नाही. (याबद्दल सगळ्यांनी सांगीतलं आहेच! :) )

 आपण आपल्या गतीने, आपल्या चालीने चालत राहायचं, आपल्या मुल्यांसह, त्यामुळे जर कोणाच्या मनात स्थान निर्माण झालं तर झालं, नाही झालं तर नाही झालं. स्थान निर्माण करण्यासाठी असं वरून नाही काही करता येत.

 एक मला बरं वाटलं तुझा नवरा नाटक करत नाही आहे. हे तुमचे नाटक करण्याचे दिवस आहेत, प्रतिमेत अडकण्याचे दिवस आहेत. ते तो करत नाही आहे, छानच ना? कुठल्याही जवळच्या नात्यात ’खरा माणूस’ आपल्या समोर असायला हवा. मग त्याला कसं समजून घ्यायचं बघता येईल. पण तो जर खोटा असेल, अगदी जाणीवपूर्वक नाही ..... समाजाच्या दबावाखाली, तर संवादच संपेल.

 एकमेकांमधे काही नातं निर्माण करायचं असलं तर ते विश्वासाच्या पायावर उभं असलं पाहिजे, एकमेकांशी गाभ्यातून खरं बोलता आलं पाहिजे. एकमेकांकडे सहानुभूतीने बघता आलं पाहिजे. एकमेकांना क्षमा करता आली पाहिजे. अशी खरी नाती दु्र्मीळ असतात.
अशा दुर्मीळ व्यक्तींची गरज भासणारच आणि एकमेकांच्या आयुष्यात त्यांना स्थान असणारच.2 comments:

  1. विद्या छान मांडले आहेस. सर्व पातळ्यांवरचे विष्लेशण आवडले. एकदा का तुमची काही ठोस विचारांची बैठक असेल तर मग कुठल्याही अपेक्षा, ताण तणाव, समज-गैरसमज यावेळी मार्ग काढणे सुकर जाते.

    ReplyDelete
  2. मला आवडलं.

    सर्वस्व-समर्पणाचा मुद्दा (आणि ते याच्या तळाशी असणं हाही ) महत्वाचा आहे आणि मुलगा-मुलगी मानसिकतेत (घडवण्यामध्ये) याबाबतीत खूप फरक असतो.

    लग्नाच्या आधीची काही वर्षं बहुतेक मुलांची बर्‍यापैकी बेजबाबदारपणे गेलेली असतात. आपण अचानक कोणाला तरी उत्तरदायी (answerable) आहोत हे पचवणं त्यांना जमत नाही. बायको माहेरी जाणे म्हणजे काय मज्जा वगैरे मिथकांच्या पाठीमागे हीच भावना असते.

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...