Wednesday, October 31, 2012

मुलीचं घर -- १


"मुलींनी आपल्या आईवडीलांना सांभाळायचे, अशी प्रथा हवी होती." माझी मैत्रिण एकदा म्हणालेली. तिच्या आईला स्वत:जवळ काही दिवस ठेवून घेण्याची, कायमचं ठेवून घेण्याची तिची इच्छा होती. सासरच्यांना वाटायचे, भाऊ आहेत की. भावजय नीट लक्ष द्यायची नाही. आईलाही मुलीकडे राहायला प्रशस्त वाटायचे नाही. मुलाकडे कसंही वागवलं गेलं तरी हक्क वाटायचा.
 " मुलींचा कसा आईवडीलांत जीव गुंतलेला असतो. त्या नीट करतील त्यांचं. " ........ ती म्हणते.
माझा यावर विश्वास नाही. मुलगे काय नि मुली काय! सारखेच! काही लक्ष देतील काही नाही, सरसकट काही विधान नाही करता येणार.


आज मला लिहायचंय ते आईवडीलांना मुलीकडे राहायला अवघडल्यासारखं होतं.... यावर.
अगदी एकुलती एक मुलगी असली, दोन्ही मुली असल्या तरीही.
मुलीच्या घरात त्यांना हक्क वाटत नाही.


मी जेव्हा लहान होते, तेव्हा आमच्या आजूबाजूच्या काही घरांमधे ’मुलीला मुलगा झाल्याशिवाय, त्याचं बारसं झाल्याशिवाय, मुंज झाल्याशिवाय.. आईवडील मुलीच्या घरी जेवत नसत.
मला आठवतं, शेजारच्या एका काकूंना बरं नव्हतं तर त्यांचे वडील भेटायला आलेले, उन्हाळयाचे दिवस होते, त्यांना तर मुलीच्या घरचं पाणी पण चालणार नाही, मग मी त्यांच्यासाठी पाणी घेऊन गेले.... आणि घरी येऊन सांगितलं की " तुम्ही दोघे असं कधीही करणार नाही. तसं करणार असाल तर मला लग्नच करायचं नाही."
 काही लोक यातून मार्ग काढीत, म्हणजे मुलीकडे जेवायचं पण मग ताटासमोर पैसे ठेवायचे. भावना ही की मुलीकडे फुकटचं जेवलो नाही.
मी अगदी लहान असल्यापासून यावर बोलत आले आहे.
आई बाबांना सांगत आले आहे, लग्न झाल्यावर जे आणखी घर मिळेल, ते माझ्याइतकंच तुमचंही असणार आहे.
त्यांना मी बरंच बदलवलं असलं तरी पूर्ण नाही.
सारखं मला त्यांच्याशी भांडावं लागतं.
काही गोष्टी मी सोडून देते.


माझं नुकतं लग्न झालं होतं , तेव्हा आई माझ्याकडे आलेली, तिने जरा स्वैपाकघर आवरलं,
आणि नंतर मला म्हणाली, " डबे इकडचे तिकडॆ केलेत, तुझ्या सासूबाईंना चालेल ना?"
मला हसावं की रडावं कळेना.
जे काय भांडत आले, सांगत आले, ते सगळं वाहूनच गेलं की काय?


माझ्या मावशा, माम्या, आत्या यांच्यापेक्षा ते खूपच बरे आहेत.
तरी त्यांना कारणाशिवाय माझ्याकडे राहणं नको वाटतं, अर्थात भावाकडेही ते कारणाशिवाय फार राहात नाहीत, हे त्यातल्या त्यात साम्य.


देवांशी आमच्या घरी आम्हां दोघांनांही काही देणंघेणं नाही.
तरी कुणी विचारलं तर "माझं कुलदैवत बालाजी, मिलिन्दचं अंबेजोगाईची देवी", असली विक्षिप्त वाटतील (ऎकणाराला) अशी उत्तरे मी देते.
त्यातल्या त्यात आम्ही कुठला सण करत असू तर ’गणपती बसवणे"
मला आणि मुक्ताला गणपती करायला आवडतो.. म्हणून!
परवा आईबाबा गणेश चतुर्थीला होते,
आई एकदम म्हणाली, "तुमच्याकडॆ गणपतीला तळलेले मोदक चालतील ना?" (आमच्याकडे, औरंगाबादला, तळलेले मोदकच असतात.)
मी काहीही सांगितल्ं तरी तिचं बेसिक क्लिअर आहे.
तिच्या घरच्या म्हणजे माझ्या औरंगाबदच्या घरच्या सांस्कृतिक परंपरा चालवणारं, पुढे नेणारं घर हे तिच्या मुलाचं आहे.
आणि माझ्या या घरात मात्र तिच्या जावयाच्या घरच्या सांस्कृतिक परंपरा असायला हव्यात.


मी म्हणाले, "गणपतीला काय गं, उकडीचे असोत की तळलेले, मोदक मिळाल्याशी कारण!"
त्याला काही अर्थ नाही.

......................................
.....................................
....................................
...................................

 पुढे

http://asvvad.blogspot.in/2013/03/blog-post_31.html

***********


4 comments:

 1. विषय आवडला.

  याची मुळं शोधत गेलो तर "मुलीने लग्नानंतर मुलाच्या(!) घरी जायचं" या आणि एकूणच पुरुषप्रधान समाजाने ठसवलेल्या सर्व नियमांत असेल ना. त्यावर अजून खोलात जाऊन लिहीणार आहेस का? म्हणजे लिही.

  >> जे काय सांगत आले, ते सगळं वाहूनच गेलं की काय?
  बहुतेक वेळा मुलांबाबत बोलताना पालकांच्या तोंडी येणारं हे वाक्य तू उलट वापरलंस. मस्त!

  ReplyDelete
 2. जावयाचे घर जसं मुलीचं व्हायला लागलं तसं मुलाचं घर सुनेचं व्हायला लागलं..
  आता काहींच्या बाबतीत सुनेपेक्षा मुलीच्या घरात जास्त मोकळेपणा जाणवतो असं होत असेल.

  ReplyDelete
 3. हे सारे अजून काही ठिकाणी होत ही असेल.पण आता त्याचे प्रमाण पुष्कळ कमी झाले आहे.आजकालच्या घरांमध्ये,खूपदा मुलीच्या आई वडिलांचा,सहभाग जास्त असतो.ते परके पण वगेरे वगेरे फक्त बोलण्या पुरेसे असते.घरावरची पाटी नक्की वेगळ्या आडनावाची असते.पण आत घरात अनेक निर्णय मुलीचे आई वडील घेत असतात,मुलीच्या सासू सासर्यांनी घेतलेले निर्णय बदलायला भाग पडत असतात, असेही दृश्य दिसते आहे.सगळ्यात मजा म्हणजे हेच आई वडील,आपला मुलगा कसा बायकोच्या कह्यात गेलेला आहे,कसे तिच्या माहेरचे सगळे ठरवतात,याने दुख्ही पण असतात.माझ्या ओळखीत एक घर आहे.ती सून खरे तर ठीक आहे. घरातील निर्णय घेताना ती सगळ्यांचा विचार घेऊन करायचा प्रयत्न करते.पण मग आई ने फोन करून जर सांगितले,की हे नाही बरोबर,हे असे कर..तर मग ती कोणाचे न ऐकता आई म्हणेल तेच करते.
  सध्याची एक म्हण ठाऊक आहे की नाही......२ मुलींची आई,"महाराणी"१ मुलगा १ मुलगी, यांची आई.."राणी"...फक्त मुलगा वा मुलगे यांची आई..भिकारणी....!!
  तेव्हा लम्बकाने दुसरे टोक गाठले आहे असे जाणवते.मध्याच्या जवळपास असावे,ही प्रगल्भता केव्हा येईल त्याची वाट बघायची...

  ReplyDelete
 4. आता काहींच्या बाबतीत सुनेपेक्षा मुलीच्या घरात जास्त मोकळेपणा जाणवतो असं होत असेल.>> माहित नाही. पण मला तसं आढळलं नाही कुठेच..

  माझ्या घरी लग्न झाल्यापासून आई एकदाही राहायला आलेली नाहीये.. मैत्रिणी पण म्हणतात.. "नको.. तुझ्या घरी सगळे असतात"..

  आत्ता आम्ही सासूसासरे आणि दिरासोबत राहतो.. मलाच खुपदा जे घर माझ वाटत नाही ते माझ्या आई-वडिलांना वाटेल अशी अपेक्षा मी कशी करू??

  कधीकधी वाटत कि वेगळ राहत असतो तर परिस्थिती जरा वेगळी असती..
  कारण माझ्या घरापासून पायी ५ मिनिटावर राहणार्या माझ्या चुलत बहिणीकडे आई बाबा नेहमी येतात.. पण मुंबईहून पुण्यात येऊनही इकडे सक्ख्या मुलीकडे थांबत नाहीत..

  हे घर मी सध्यातरी माझ वाटेल अश्या आशेवर आहे.. माझ्या आईबाबांना कधी वाटेल कुणास ठाऊक.. :(

  असो.. फार पर्सनल झाल न..

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...