समाजाने सभ्यतेच्या काही मर्यादा आखून ठेवलेल्या असतात. आपण सगळेच शक्यतो त्या पाळायचा प्रयत्न करत असतो. कारण की आपण सभ्य असतो किंवा सभ्य असावं अशी आपली इच्छा असते किंवा सभ्यता आपल्यावर लादलेली असते.
ही सभ्यता म्हणजे काय? हे आपण ठरवलेले आहे का? नाही. समाजाने ठरवून ठेवलेले आहे. आणि वेगवेगळ्या समाजात सभ्यतेच्या मर्यादा या वेगवेगळ्या असतात. समाजाच्या वेगवेगळ्या स्तरात त्या वेगवेगळ्या असतात. माझी एक मध्यमवर्गीय मैत्रिण होती. लग्नानंतर ती एका अतिश्रीमंत घरात गेली. तिला सहज, मोकळेपणाने, मोठ्याने बोलायची सवय होती. त्या घरात तर अतिशय हळू आवाजात बोलायची पद्धत. ती तिच्या नेहमीच्या आवाजात बोलायला लागली की घरात इतरांना कळायचं नाही , हिला काय झालंय? (कुठे आग लागली आहे?), त्यांच्या प्रतिक्रियांवरून तिला लक्षात यायचं, हळू आवाजात बोलायला हवं आहे.
मोठ्याने बोलणं असभ्यपणाचं आहे का? किंवा हळू बोलणं असभ्यपणाचं आहे का? तर नाही. तुमच्या चौकटीत ते तसं होऊ शकतं.
समाजात काही एक पद्धती रूजत आलेल्या असतात, त्या निरपेक्षपणे चूक किंवा बरोबर नसतात. त्याचा किती ताण घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हे आपण ठरवायचं असतं. हे यानिमित्ताने मला सांगायचं आहे.
चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? असे रागलोभ न दाखवणारे सभ्य असं का समजलं जात असेल?
मला वाटतं, नाटकीपणा, मुखवटॆ घालून वावरणं हा आपल्या तथाकथित मध्यमवर्गीय मूल्यांचा गाभाच आहे. चांगलं चाललेलं नसेल तरी ते तसं दाखवण्याची आपली धडपड असते. राग काय आणि लोभ काय, या दोन्ही गोष्टी या मुखवट्याला तडे जाऊ देणार्या आहेत. ते आपल्याला चालत नाही.
मी पाहिलेल्या प्रसंगात ती बाई समाजाच्या मध्यमवर्गीय सभ्यतेच्या मर्यादा ओलांडत होती.
मी समजा खरोखरच थांबले असते तर काय केलं असतं? याबाबत समाजाची जी मार्गदर्शक नियमावली आहे त्यानुसार मी त्यात पडायला नको, असं आहे, त्यामुळे पडल्यावर मी काय करायचं हे अर्थातच नाही.
पहिली गोष्ट मला मी सभ्य आहे की असभ्य अशी कुठलीही भूमिका घ्यायची नाही आहे. दुसरं ती जे तडे पाडत होती ते मला घाईघाईने बुजवायचे नाहीत. म्हणजे मी जाऊन तिला ’ तुला काय झालंय? म्हणजे रस्त्यावर तू असं का वागत आहेस? तुला भान आहे का?" वगैरे काहीही बोलणार नव्हते.
हा रस्त्यावरच्या भांडणाचा अंक संपल्यावर, घरी गेल्यावर कदाचित आपण रागाच्या भरात काय हे वागून गेलो, असं अपराधीपण तिला येण्याची शक्यता आहे/ होती.
मला तिला इतकंच सांगायचं होतं, "बाई गं, असं चालतं. आपण मोडून पडण्यापेक्षा मुखवट्याला तडे गेले तर चालतात. तू तुझा राग, चीड बोलून टाक, मग तुला शांतपणे यावर विचार करता येईल."
कदाचित फारसं गंभीर नसेलही, किंवा असेल तर मी ऎकून घेईन. या एवढ्या वाहत्या रस्त्यावर कोणीच नाही मदतीला येऊ शकणारं, असं नको व्हायला. तिला ठेच लागली असती, अपघात झाला असता तर मी धावले असतेच ना? तसंच जर तुझं मन दुखावलं गेलंय तर मी तात्पुरती आहे.
******
पुढच्यावेळी मी असा प्रयत्न करीन.
******
ह्याला "रुमाल टाकणे" म्हणतात... आता जागा पकडलीच आहे तर लवकर जागा भरू द्या..
ReplyDelete:)
Deleteहो.
भरली.
Delete:)
तुमच्या चौकटीत ते तसं होऊ शकतं.>> अगदी बरोबर.. आमच्या कुटुंबात सगळ्यांचं एखाद गेट टुगेदर असेल तर नवर्याच्या बाजूला मोकळी खुर्ची असूनही तिथे बसले तर भुवया उंचावणारे अनेक आहेत. जुन्या काळच्या संस्कारांमुळे बायका गेट टुगेदरला (मनाने) मोकळ्या होणाच्याऐवजी बायकांचा एक घोळका बनवून तिथे बसतात. मला आणि माझ्या जावेला मात्र आमच्या नवर्यांच्या शेजारी बसायचं असत.. आणि विशेष म्हणजे नणंदा ह्याच संस्कारात वाढलेल्या असल्याने वयाने तरुण असूनही त्यांनाही आमचे आमच्या नवर्याच्या शेजारी बसणे रुचत नाही. आणि आमच्या नवर्यांच्या देखील ते पटकन अंगवळणी पडत नाही. तिथे आमचा (माझा आणि माझ्या जावेचा) प्रश्न हाच असतो कि स्वत:च्याच लग्नाच्या नवर्याच्या शेजारच्या खुर्चीत (मांडीवर नव्हे) बसणे असभ्यता आहे काय?? पण आम्ही दोघी एवढ्या सगळ्यांमध्ये एकट्या पडतो म्हणून गप्प बसतो.
ReplyDeleteसमाजात काही एक पद्धती रूजत आलेल्या असतात, त्या निरपेक्षपणे चूक किंवा बरोबर नसतात. त्याचा किती ताण घ्यायचा किंवा घ्यायचा नाही हे आपण ठरवायचं असतं. हे यानिमित्ताने मला सांगायचं आहे.>> हे मात्र अगदी बरोबर आहे.. आणि हेही एक जनरल निरीक्षण, कि अर्ध्याहून जास्त सामाजिक शिष्टाचार हे स्त्रियांवरच लादले गेले आहेत आणि त्यातल्या कित्येकांना तर काहीच बेस (आधार) नाहीये. उदा. विवाहित बाईने मंगळसूत्र घातलेच पाहिजे हा एक सामाजिक शिष्टाचार बनला आहे. त्यामागचे कारण काहीही असो.. तो बायकांवर लादला गेला आहे हे नक्की..
चार लोकात आपले राग-लोभ दाखवायचे नाहीत, असं बंधन आपल्यावर का असेल? असे रागलोभ न दाखवणारे सभ्य असं का समजलं जात असेल?>> रागाचं माहित नाही पण लोभ (प्रेम) दाखवल्यावर कपाळावर आठी घालणारे अनेकजण मी माझ्या सासरी पदोपदी अनुभवते आहे. "आमच्यावेळी नव्हते बाई असे" हे वाक्य तर एक डोकेदुखी होऊन बसले आहे. त्यात ती रमाबाई रानडेंची मालिका सासू अगदी मन लावून पाहते. त्यामुळे तिच्या (बाल) मनावर कसले परिणाम होत आहे माहित नाही. पण तिचे वागणे त्या मालिकेनुसार घडी-घडीला बदलते आहे. त्या रमाला रात्र होऊन सगळ्यांची निजानीज झाल्याशिवाय माधवाच्या अभ्यासिकेत जायचे नाही अशी ताकीद असल्याने आमच्या घरात "चारचौघात आपले लोभ दाखवायचे नाहीत" या शिष्टाचाराला अगदी उत आला आहे.
म्हणजे मी जाऊन तिला ’ तुला काय झालंय? म्हणजे रस्त्यावर तू असं का वागत आहेस? तुला भान आहे का?" वगैरे काहीही बोलणार नव्हते.>> अर्थातच ग.. तू तिला काही मदत हवी आहे का याविषयी विचारणार होतीस. पण तिने रागाच्या भरात एकदम "माइंड युवर ओन बिझनेस" म्हटले असते तर तुझ्यापाशी काय उत्तर होते?
मला तिला इतकंच सांगायचं होतं, "बाई गं, असं चालतं. आपण मोडून पडण्यापेक्षा मुखवट्याला तडे गेले तर चालतात. तू तुझा राग, चीड बोलून टाक, मग तुला शांतपणे यावर विचार करता येईल.">> ह्याच्याशी किमान १०००% सहमत. तूच मागे म्हणाली होतीस तसं "आपलं वाटण नाकारायच नाही". आणि आपल्या कुठल्याही नैसर्गिक भावनेमुळे अपराधी वाटून घ्यायचं नाही.
या एवढ्या वाहत्या रस्त्यावर कोणीच नाही मदतीला येऊ शकणारं, असं नको व्हायला.>> ती रडत असती तर कदाचित मीही कसलाही विचार न करता गेले असते तिची विचारपूस करायला.
>>स्वत:च्याच लग्नाच्या नवर्याच्या शेजारच्या खुर्चीत (मांडीवर नव्हे) बसणे असभ्यता आहे काय??
Deleteसभ्यता किंवा असभ्यता ही निरपेक्ष नसते. समाजातल्या वेगवेगळ्या गटातही ती वेगवेगळी असते.
एन. टी. रामाराव यांची पत्नी भर निवडणूकीच्या सभेत त्यांच्या मांडीवर बसत असे, तसे फोटॊही वर्तमानपत्रात त्याकाळी प्रसिद्ध झालेले होते.
ती असभ्यता समजली गेली नाही, (त्या समाजात)
त्यामुळे अशा कल्पनांचा किती त्रास करून घ्यायचा, त्या बदलायची आपल्याला किती निकड वाटते, हे सर्वस्वी आपल्यावर आहे.
>> उदा. विवाहित बाईने मंगळसूत्र घातलेच पाहिजे हा एक सामाजिक शिष्टाचार बनला आहे. त्यामागचे कारण काहीही असो.. तो बायकांवर लादला गेला आहे हे नक्की..
ज्यांना तो लादला गेला आहे असं वाटतं त्यांनी तो धुडकारला पाहिजे. पण कितीक बायकांवर हे लादले गेलेले नाही, त्या स्वत:च्या इच्छेने घालतात. माझ्या आईला तर मंगळसूत्र म्हणजे आपला नवराच आहे असं वाटत असावं इतकं ती ते सांभाळते, लग्न झाल्यापासून तिने आजवर कधीही तिचा गळा मोकळा ठेवलेला नाही.
असं असतं की बाईच्या (पुरूषाच्या देखील) इच्छा या देखील समाज ठरवत असतो.
हे एकदा आपल्याला कळलं पाहिजे.
>> अर्थातच ग.. तू तिला काही मदत हवी आहे का याविषयी विचारणार होतीस. पण तिने रागाच्या भरात एकदम "माइंड युवर ओन बिझनेस" म्हटले असते तर तुझ्यापाशी काय उत्तर होते?
हो. ती हेच म्हणण्याची सर्वात जास्त शक्यता होती. म्हणून काय मी विचारयचेच नाही का? तो माझा अपमान आहे असे मी समजले नसते. "ठीक आहे." म्हणाले असते, "लागली मदत तर मी आहे" म्हणाले असते. अजून काय!
माझा आजवरचा अनुभव असा आहे की आपण मनापासून बोललेले माणसांना कळते.
>> ती रडत असती तर कदाचित मीही कसलाही विचार न करता गेले असते तिची विचारपूस करायला.
तिच्या डोळ्यातून पाणी गळत नसले तरी ती रडत आहे असेच मला वाटले/ कळले, म्हणून मला तिची विचारपूस करायला गेले पाहिजे असे वाटले.
असं असतं की बाईच्या (पुरूषाच्या देखील) इच्छा या देखील समाज ठरवत असतो. हे एकदा आपल्याला कळलं पाहिजे. >>>
Deleteतुझे लेख वाचून हळूहळू हे कळतंच आहे ग.. जाणवतंय सुद्धा.. पण आपल्याला हे कळून फायदा काय??
माझा आजवरचा अनुभव असा आहे की आपण मनापासून बोललेले माणसांना कळते.>> खरे आहे.
Panchatantra madhil goshta ahe. Dho; dho pawasat zadawaril makade kudkudat basali ahet. Tyach zadawar gharati bandhoon bagale rahat ahet. Gharatyat rahoon; tyanche pawasapasoon rakshan hot asate. Pan kudkudnarya makadankade pahoon tyanna daya yete. Bagale makadanna wichartat; "Tumhi amachyapramane ghare bandhoon ka rahat nahi?" Sarwa makade ekmekankade baghatat. Tyanchya dolyat ek "understanding" asate. Konich bagalyanna uttar det nahi. Pawus thambato. Makade aplya jagewaroon uthatat. Sarwa zadachya phandyanwar nachat bagalyanchi gharati padoon takatat. Goshta sampali.
ReplyDeleteManasanmadhe ase anubhav yetat ki nahi? Yetat na? Mhanunach " Jyache karave bhale to mhanato apalech khare" ashya mhani nirman hotat. Sensitivity asane hi changalich gosta ahe. Pan ti wisely waparavi lagate. Kay karanar tyala? Aple sadhu; sant ase hote; pan tyanna kiti tras sahan karawa lagala. Apali tashi tayari ahe ka? Yacha vichar karawa. Apalya sensitivity bhowati ek bhint bandhoon ghyawi lagate. Nahi tar apalya car chya khidkitoon hat pudhe karanarya mulankade baghoon apan khachun jawoo ashi sthiti ahe. Ani apali kartawye par padatana ashi sthiti asane changale nahi. Barobar na? --- Umesh.
तुम्ही लिहिलेय त्या गोष्टीत तथ्य आहे.
ReplyDeleteपण समोरचा माणूस हा बगळा आहे की माकड? कसं ऒळखणार?
मी समोरच्याला एक संधी देईन.
संवेदनशीलतेमुळे खचून न जाता तिच्यामुळे कुठे विधायक कामाकडे जाता येते का , हे पाहिले पाहिजे.