Saturday, December 31, 2011

वारीस आणि एफजीएम -- १


पिरेल्लीची कॅलेंडर्स जगतविख्यात आहेत. या कॅलेंडर्सवर सुपरमॉडेल्स आणि सुपरस्टार्स झळकतात. त्यांनाही या कॅलेंडरवर आपली छबी झळकणं म्हणजे आपला बहुमान आहे असं वाटत असतं. पिरेल्ली च्या मोजक्या १५ - २० हजार प्रती काढल्या जातात. त्या विक्रीसाठी ठेवल्या जात नाहीत. पिरेल्लीची बडी गिर्‍हाईकं आणि जगातल्या काही नामांकीत व्यक्तींनाच ती भेट म्हणून दिली जातात. ऑस्करच्या कार्यालयात, युनोत, बिल गेटस च्या कार्यालयात किंवा मुकेश अंबानीच्या कार्यालयात .... ही झळकलेली दिसतात.
 १९८७ मधे पिरेल्ली कॅलेंडरच्या मुखपृष्ठावर छापलं गेलेलं जिचं छायाचित्र होतं. ती होती.... वारीस डियरी! हा फॅशन जगतातला सर्वोच्च बहुमान समजला जातो. तोवर वारीस ही फॅशन विश्वाला अज्ञात असलेली तरूणी होती.
  काय आहे तिची कहाणी? ती इथवर कशी पोचली?
 वारीस सोमालियातल्या एका खेड्यात जन्मली आणि वाढली. सोमालिया दुष्काळग्रस्त आणि कुपोषित. तिही एका खायप्यायची वानवा असलेल्या घरात जन्मली. सोमालियात घरगृहस्थी चालवतात स्त्रिया, पुरूष कधीतरी शिकार करतात आणि ऎरवी दारू पिऊन पडून राहतात. पण घरावर अधिकार असतो अर्थातच पुरूषांचा!
 थोडसं कळू लागल्यावर वारीस शेळ्या राखण्यासाठी जाऊ लागली. दिवसा तापलेल्या वाळूतून ती वणवण फिरायची रात्र होताच कडाक्याची थंडी पडायची, उशीरा ती घरी परते. अनेकदा अर्धपोटी राहावं लागायचं तर कधी कधी दोन दोन दिवस उपास घडे. तिथे कुणाला शाळेचं नावदेखिल माहीत नाही. या काळात निसर्गच तिचा सखासोबती होता. प्राण्यांसारखं तिही पाणी दिसताच पिऊन घ्यायची.
 दिवस असे जात होते, ती मोठी होत होती.... एक दिवस तिच्या बापाने तिच्यासाठी एका म्हातार्‍याचं स्थळ आणलं. वारीसचं रूप पाहून म्हातार्‍याने तिला मागणी घातली होती, त्याबदल्यात तो तिच्या बापाला पाच उंट आणि पंचवीस शेळ्या देणार होता. वारीस आईजवळ रडली, म्हणाली यापेक्षा तू मला मारून का टाकत नाहीस?
 मध्यरात्री आईने वारीसला हळूच उठवले आणि म्हणाली, " सूर्य उगवतो त्या दिशेने पळत जा. तिकडे मोगादिशू आहे, कदाचित तिथे तुझी बहीण भेटेल. आता पळ... तू आणि तुझं नशीब."  वारीस जिवाच्या आकांतानं पळात राहिली, काही वेळाने पाहिलं तर बाप मागून येत होता... तिला त्याच्यापेक्षा जास्त वाळवंटाची सवय होती... केंव्हातरी बाप थकला थांबला..... चारपाच दिवसांनी ती एका सडकेपाशी पोचली. मग बसवाल्याच्या कृपेने मोगादिशूला... मोगादिशू सोमालियाची राजधानी आहे...... काही दिवसांनी अचानक तिला तिची बहीण अमन भेटली.... मग तिच्याकडे राहिली..... अमनही तिच्याकडून भरपूर कष्ट करवून घेत असे..... मग मावशीकडे गेली.... योगायोगाने एका मावशीचा नवरा राजदूत होता .... मग घरकामात मगत करायला म्हणून त्यांच्याबरोबर लंडनला आली..... त्यांच्याकडे मोलकरीण म्हणूनच राहिली..... तीन वर्षांनी ते कुटूंब सोमालियात परत जाताना त्यांच्याबरोबर परत गेली नाही. लंडनमधेच कुठे कुठे कामे शोधत राहिली.
 तिचं रूप आणि बांधा कुणाच्याही नजरेत भरेल असाच होता. एका फोटोग्राफरने तिचे फोटो काढले पण बदल्यात काहीही पैसे दिले नाहीत. तिला धड इंग्लिश बोलता यायचं नाही. कुठूनतरी तोडकं मोडकं शिकली. ती मॅकडोनाल्डस मधे बशा धुवायचं, फरशा आणि भिंती धुवायचं काम करत होती. तेव्हा तिला डोनोव्हान या फोटोग्राफरचा फोटो काढायला ये म्हणून निरोप मिळाला. जावं की नाही , ती विचार करत होती. जाऊन तर पाहू, असे ठरवून गेली.
  टेरेस डोनोव्हान जागतीक किर्तीचा छायाचित्रकार होता. त्याने तिला ठरलेले हजार पौंड दिले आणि तिचे फोटो काढले. त्यावर्षी पिरेल्लीची थीम होती, ’ब्लॅक ब्युटी’ आफ्रिकन तरूणींचे फोटो कॅलेंडरवर झळकणार होते. .......... आणि मुखपृष्ठासाठी वारीसच्या छायाचित्राची निवड झाली!
....................................................................................................
वारीस अक्षरश: खोर्‍याने पैसे कमवू लागली..... काही दिवसांतच तिने मर्सिडीज घेतली, लंडनमधल्या उच्चभ्रू भागात एक बंगला घेतला.......
......................................................
 सारेच कसे अविश्वसनीय!

इथून पुढे एखाद्या राजकन्येसारखी वारीसची गोष्ट गेली असती....... पण तिच्या भूतकाळात आणखी काही दडलेले होते!
खरंतर राजकन्येला अप्राप्य ते काय असणार?

(संदर्भासाठी डॉ. श्रीकांत मुंदरगी यांच्या ’वाळूत उमललेलं फूल’ या चंद्रकांत दिवाळी अंकातील लेखाचा उपयोग झाला आहे. )


Thursday, December 15, 2011

वेश्या -- १



मी घराचं काम पाहात होते, काहीतरी आणायला रविवारपेठेत का कुठेतरी जायचं होतं, तिकडचे रस्ते मला फारसे माहीत नाहीत. कुठेतरी चुकले आणि एकदम बुधवारपेठेत शिरले. दुपारी बारा एकची वेळ असेल. त्या गल्लीतलं वातावरण वेगळं होतं, माझ्या लक्षात आलं. चेहरे रंगवलेल्या मुली आणि बायका. आपल्याला चित्रपटात पाहून असं वाटत असतं की वेश्या म्हणजे दिसायला सुंदर!  तसं काही नव्हतं, जाड्या भरड्या चेहर्‍याच्या, जरा भडक कपडे घातलेल्या त्या बायका होत्या. इथे संख्येने खूप दिसत होत्या म्हणून! इतरत्र वेगळ्या ओळखू आल्याच असत्या असं नाही. मी अस्वस्थ झाले, ती गल्ली कधी संपेल असं मला झालं! ऊन आणि गर्दी , रस्ता संपत नव्हता. केव्हातरी लक्ष्मी रोड लागला, ओळखीच्य़ा पाट्या दिसायला लागल्या आणि मला हुश्श झालं.
 काय घ्यायचं होतं ते न घेता सरळ मी घरीच आले.
 दिवसभर मला कसंसंच होत होतं.
 का?
 मला कळून मी वेश्यांना पाहिल्याचा तो पहिलाच / एकमेव प्रसंग होता.
 वेश्या म्हणजे न बोलण्याचाच विषय!

आम्हांला शिकायला ’वेश्यांचा अभ्यास’ होता, तेव्हा मी त्यावर विचार करायला लागले. त्यापूर्वी समाजाने स्त्रियांची केलेली ’गृहिणी आणि वेश्या’ ही विभागणी मला मान्यच होती.
 मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी ” गृहिणी म्हणजे जी कराराने एकाच गिर्‍हाईकाला आयुष्यभर शरीरविक्रय करते, तर वेश्या ही वेगवेगळ्या गिर्‍हाईकांना शरीरविक्रय करते." " वेश्या ही अधिक स्वतंत्र आहे, ती नाही म्हणू शकते" ....... अशी मांडणी केली आहे. ती शिकल्यावर दोन दिवस मला काही सुचेना. जसजसा विचार करू लागले, तसतसं ते किती खरं आहे, हे कळत गेलं. आणि ठिणगी पडल्यासारखं झालं. एकूणच समाजात लैगिंकतेचं राजकारण कसं चालतं, हे लक्षात आलं.
 स्त्रियांनी पातिव्रत्य राखणं ही पुरूषसत्ताक पद्धती चालू राहण्यातली कळीची गोष्ट आहे.

स्त्रियांनी हे समजून घेतलं पाहिजे    .... स्त्रियांचा अभ्यास, त्यांचा इतिहास, त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, त्यांची गुलामी, त्यांचं वस्तुकरण, त्यांची विभागणी....... आणि यामागचं राजकारण.......

............

Wednesday, November 30, 2011

Why This Kolaveri Di ?


’कोलावरी’ च्या लोकप्रियतेची लाट आहे.
(’गणपती दूध पितो’ ची एक लाट फार पूर्वी आली होती, ते मला आठवलं. नंतर त्याचं समाजशास्त्रीय विश्लेषण केलं गेलं.)

कोलावरीला अल्पावधीत मिळालेल्या लोकप्रियतेची कारणं शोधली जातील.

मला गाण्यातलं काही कळत नाही. गाण्याच्या गीतकार, संगीतकारांनी जे म्हंटलं आहे, ते मी एके ठिकाणी वाचलं. ते म्हणतात की हे प्रेमभंग झालेल्या तरूणाचं गाणं आहे, हा अनुभव सार्वत्रिक आहे, या भावनेशी तरूण रिलेट करू शकतात, म्हणून हे गाणं इतकं लोकप्रिय होतं आहे.   या गाण्याचं यश जर हे अधोरेखित करत असेल तर ते मला महत्त्वाचं वाटतं.

समाजाने प्रेमभंगाची भावना सहजतेने घ्यायला हवी. (त्यातल्या दु:खाबद्दल मी काहीच बोलत नाही आहे.) समोरच्याचा नकार म्हणजे फसवणूकच असं नसतं. कुठल्याही नात्यातून केंव्हाही एखाद्याला/ एखादीला बाहेर पडायचं असेल तर ती मुभा द्यायलाच हवी.

एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्यांची रिंकू पाटील, अमृता देशपांडे अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत आता जर आपला प्रवास ’कोलावरी डी’ कडे होत असेल तर ते खूपच छान आहे.

 आपल्याकडे कसं असतं? साखरपुडा म्हणजे लग्न नक्की! त्यापेक्षा साखरपुडा म्हणजे ’ आम्हांला एकमेकांशी लग्न करावंसं वाटतं आहे, एकमेकांना अजमावतो आहोत, जमलं तर लग्न करु" असं का असू नये?
 चार महिने एखाद्याबरोबर फिरल्यावर याच्याबरोबर आयुष्य काढणं शक्य नाही हे जर कळलं तर केवळ साखरपुडा झाला आहे म्हणून लग्न का करायचं? मुळात साखरपुडादेखील इतका वाजतगाजत कशाला हवा? खूप खर्च करायचा, खूप लोकांना बोलवायचं, मग निर्णय घेताना दडपण येणारच.
 लग्नानंतर सुद्धा मुलं होईपर्यंतचा काळ तुम्हांला विचार करण्यासाठी मिळू शकतो.

 तेव्हा मी ’हो’ म्हणाले/लो होते/तो आता ’नाही’ म्हणायचे आहे. हे का नाही चालत? माणसं वाढतात, बदलतात. आपण पुनर्विचाराच्या शक्यता का लक्षात घेत नाही?
आपण प्रेमभंगाला मान्यता देणार असू, तो स्वीकारणार असू आणि पुढे जाणार असू तर ती एक समजदारीची गोष्ट झाली.
’कोलावरी डी’ हे सांगू पाहतं आहे असं मला जाणवलं. थेट नाही, ते सांगायचं म्हणून असं नाही, पण अर्थाच्या अनेक शक्यतांपैकी एक, बदलणारा समाज जर या टप्प्यावर पोचत असेल तर ते स्वागतार्ह आहे.


Tuesday, November 15, 2011

सुंदराचा वेध लागो मानवाच्या जीवना



शारीरिक सौंदर्य हे कोणीही घेऊन येतं, त्यात तुमचं काही कर्तृत्व नाही. फारतर तुम्ही त्याची जोपासना करता किंवा क्वचित कोणी आधुनिक विज्ञानाची मदत घेऊन, शस्त्रक्रिया करून तथाकथित सौंदर्य वाढवता.
मग सुंदर काय आहे? तुमची बुद्धिमत्ता? नाही. तीही तुम्ही घेऊन येता. तिची जोपासना करता किंवा करत नाही. अर्थात बुद्धिमत्तेला मी सौंदर्याच्या पायरीवर ठेवणार नाही जरा वर ठेवेन.
मग सुंदर करण्याजोगं आपल्या हातात काय आहे?
आपलं स्वत:चं आयुष्य.
आपले विचार, आपल्या कृती, आपली मूल्ये.
मी माझं जगणं सुंदर करीन असा शब्द स्वत:ला दिला पाहिजे.
माझं आयुष्य हे माझं एकटीचं असतं का? मी काही बेटावर राहात नाही. माझं जगणं हे माझ्या आजूबाजूच्या लोकांमधे असं विखूरलेलं आहे. ते आनंदी नसतील तर मला एकटीला हसता यायचं नाही.
जेव्हा मी असं म्हणते की "मी माझं जगणं सुंदर करीन" तेव्हा मी असं म्हणत असते की "मी माझ्या आजूबाजूच्या लोकांचं जगणं सुंदर करायचा प्रयत्न करीन"
"स्त्री-पुरूष समानता" हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं मूल्य आहे. ते मी माझ्या आचरणात आणते हे पुरेसं नाही, हे मूल्य मी माझ्या जवळच्यांमधे रूजवण्याचा प्रयत्न करीन.
” प्रत्येक माणसाला एक माणूस म्हणून किमान प्रतिष्ठा असली पाहिजे" ती त्याच्या कमाईवर, जात-वर्ण-लिंगाधारीत नसावी. माणसांनी माणसांशी माणसांसारखं बोललं वागलं पाहिजे.
"प्रत्येकाचं आयुष्य हे ज्याचं त्याचं आयुष्य असतं, आपण ते आपल्या ताब्यात घेऊ नये." विशेषत: पालकांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे. मुलं आपली असली तरी त्यांची आयुष्ये त्यांची असतात, त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्यावं.
 आपल्या समाजात नाटकीपणा, ढोंगीपणा आहे. तो करायला लागू नये असं मला फार वाटतं. मी माझ्या पातळीवर, प्रत्येकाशीच, शक्यतो खरं आणि मनापासून बोलायचा, वागायचा प्रयत्न करते. माणसं काही बेगडी नसतात. त्यांना कळतं खरं बोललेलं. त्यामुळे माझे माझ्या आप्तांशी, जवळच्या मित्रमैत्रिणींशी जेवढे आहेत तेवढे, जसे आहेत तसे, खरे आणि खास संबंध आहेत.
 अशी काही बेटे समाजात तयार झाली तर त्याची लागण होत राहील.
मला वाटतं प्रत्येकाने स्वत:पासून सुरूवात करावी. स्वत:वर विश्वास ठेवावा, जसे आहोत तसे स्वीकारावं स्वत:ला... गुणदोषांसह... जे बदल स्वत:त करणं आवश्यक आहेत, ते प्रयत्नपूर्वक करावेत.
 आणि हो, स्वत:वर प्रेम करावं. आपण जे काम करतो त्यावर प्रेम असावं. नावडीचं काम असलं तरी ते जबाबदारीने पूर्ण केलं पाहिजे. स्वत:कडून थोडी जास्त अपेक्षा ठेवावी. हो, मला जमेल मी करू शकेन.
जगण्याचा स्तर उंचावण्याचा प्रयत्न करणं म्हणजे जगणं सुंदर करत जाणं.
 आपण ते करू या.

Saturday, October 15, 2011

सौंदर्य - प्रसाधने आणि पोषाख


छान राहणं, छान दिसावंसं वाटणं, कुणाचं तरी किंवा सगळ्यांचं आपल्याकडे लक्ष जावं अशी इच्छा, या नैसर्गीक आदिम प्रेरणांपैकी आहेत.
मला ’मी’ छान दिसावं, माझ्याकडे कुणी पाहावं, असं वाटत असेल तर त्यात नाकबूल करण्यासारखं काय आहे?
प्रसाधनांचा वापर पूर्वापार चालत आलेला आहे.
त्यात काही नियम ठरवता येणार नाहीत.
निदान एक सारासार विचार केलेला असतो का?

समजा बाहेर जाताना किंवा कुठे कार्यक्रमाला जाताना मी माझे ओठ रंगवते. तर का?
मला माहित आहे, माझे ओठ लाल नाहीत. रंग वापरून मी तुम्हांला फसवते आहे. का?
माझ्यासाठी, मला छान वाटावं यासाठी मी ओठ रंगवलेले नाहीत, तसं असतं तर मी घरी रंगवून बसले असते ना?
मी ओठ रंगवते कारण तुम्ही माझ्याकडे पाहावं, दाद द्यावी अशी माझी इच्छा आहे.
यातही चुकीचं काहीच नाही, फक्त हा विचार मी केलेला आहे ना? हे तपासायला हवं.

समजा मला कुणाला फसवायचंच नाहीये.
’जशी आहे तशी’ मी स्वत:ला स्वीकारलेलं आहे, तुम्हीही तसंच स्वीकारा असं मला म्हणायचंय.
ते तरी शक्य असतं का?
मी उदास आहे.... दाराची बेल वाजते, येईल त्याला/तिला मी हसर्‍या चेहर्‍याने सामोरी जातेच ना?
किंवा फोन आला तर उत्साही स्वरांत बोलतेच ना?
म्हणजे मी जशी नाही तशी दाखवते आहे, ही फसवणूकच नाही का?

तर फसवणूक अटळ आहे.
जिने तिने/ज्याने त्याने आपल्या मर्यादा ठरवायच्या.
मग हलकी लिपस्टीक लावायची/ गडद लावायची, केसांचं काय करायचं? आणि यात वेळ किती घालवायचा? हे तुमचं तुम्ही ठरवा.
आपण जसं तयार होऊन समाजात जातो, त्याद्वारे काय संदेश देतो, तेच आपल्याला द्यायचे आहेत ना? याबद्दल सतर्क राहायला हवं.

जे प्रसाधनांचं तेच कपड्यांचं.
रंगसंगती हा काय प्रकार आहे? कुठल्या रंगाबरोबर कुठला रंग जातो हे ही तेव्हाच्या फॅशनच्या चलतीनुसार ठरतं.

बायकांच्या कपड्यांवर फारच बोललं जातं. विशेषत: जेव्हा ते पुरूषी नजरेला आव्हान देणारे असतात.
बलात्कार हे बायका असले तसले कपडे घालून ओढवून घेतात, हा ही एक पसरवलेला गैरसमज आहे.
यावरचा अभ्यास असं सांगतो, बलात्काराचं कारण "घातलेले कपडे" नसतं, अंगभर पदर घेणार्‍या, मोठ्ठं कुंकू लावणार्‍या बायकांवरही बलात्कार होतात. लिंगपिसाटांची संख्या नगण्य असते, बलात्कार करणारा पुरूष संधी साधत असतो.
 एवढ्यात एक ’बेशरमी मोर्चा" निघालेला. त्यावर उलटसुलट चर्चा झाली. "बायकांनी काय घालायचं हे बायका ठरवतील." याबाबत वाद असायचे कारण नाही.
 बायकांनी काय घालायचं हे जर पुरूषांच्या हातात दिलं तर ते काय!  बुरखा घालायला लावतील आणि मग उघडे हात किंवा चेहरा दिसला तरी ती बाई आपल्याला उपलब्ध आहे असे समजतील. या मोर्च्यामागे सांगायचं मुख्य होतं ते असं की बाई ही उपभोग्य वस्तू नाही.

 मी जे कपडे घालून समाजात वावरते त्याने काही संदेश दिले जातात, त्यावर माझं नियंत्रण नाही. तसे संदेश गेलेले मला चालणार आहेत का? किंवा मला त्याची पर्वा नाही? याचा मी विचार केलेला असला पाहिजे. कुठल्याही स्त्रीकडे पुरूषांच्या नजरा वळणार आहेत. किंवा तशा वळलेल्या मला आवडणार आहेत, तुमचं उत्तर काहीही असू देत, या प्रश्नाचा तुम्ही विचार केलेला असला पाहिजे. मी तोकडे कपडे घालीन, ठीकच आहे. पण लोक बघणार आहेत हे विसरून मला चालणार नाही. मी जे कपडे घालते त्याने "इतरांनी माझ्या शरीराकडे कसं पाहावं हे सांगते" आणि "मी माझ्या शरीराकडे कसं पाहते" हे ही सांगते. आपण घातलेल्या कपड्यांद्वारेही इतरांशी बोलत असतो, हे लक्षात घेऊ या.

बायकांनी काय कपडे घातले तर ते सभ्य कुठले असभ्य, हे तो तो समाज आणि तो काळ ठरवत असतो. कुठले कपडे पुरूषी नजरेला चाळवणारे आहेत, हे ही समाजानुसार वेगवेगळं असतं.
 आपल्याकडे साडी नेसतात तर पोट आणि पाठीचा काही भाग उघडा असतो. त्याचे कुणालाच काही वाटत नाही. एका युरोपीय महिलेची, जिने भारतीयाशी लग्न केलेलं होतं, आत्मकथा वाचल्याचे आठवते. ती साडी नेसून पोपला भेटायला गेली तर त्यांना ते भयंकर अपमानास्पद वाटले. त्यांच्याकडे पाय उघडे असले तर चालतात.
 केरळात कामकरी स्त्रियांनी उत्तरीय घ्यायचे नाही अशी पद्धत होती. त्यांनी फक्त कमरेच्या खालचेच वस्त्र नेसायचे असे. त्यावेळच्या एका कादंबरीत असे कथानक आहे की एक कामकरी मुलगी फॅशन म्हणून एक ब्लाऊज शिवून घालते तर तिला ती कशी वाया चालली आहे याबद्दलची बोलणी खावी लागतात. समाजात वावरणार्‍या सगळ्याच बायका जर फक्त कमरेखालचे वस्त्रच नेसत असतील, तर पुरूषांच्या दृष्टीने काय नि बायकांच्या दृष्टीने काय त्यात काहीच वावगे नसणार. केवळ या वेषभूषेमुळे बलात्कारांची संख्या वाढलेली असेल? मुळीच नाही.
******

मी कितीही असं म्हणत असले की चेहरा रंगवायचा की नाही, कपडे कुठले घालायचे? याचे स्वातंत्र्य मला आहे. तसे ते नसते, समाज त्याला दिशा दाखवत असतो.
 कुठल्याही समाजात आणि कुठल्याही काळात आपण असलो तरी त्या समाजाचा, काळाचा .... एक सारासार विवेक असतो.... त्याला धरून मी माझी प्रतिमा कशी असेल हे ठरवते ..... त्याप्रमाणे वागते.

*****

Monday, October 3, 2011

सौंदर्य-४

माझ्यामते आपण जसजसे शहाणे होतो,म्हणजे वयानुसार येणारे शहाणपण म्हणा हवं तर..आपल्याला बरेच काही शिकवून जातं.मी कॉलेजला असताना जरी कॉलेजची वेळ सकाळची सात असायची तरी मला शिकवणा-या बोकील मॅडमचा माझ्यावर प्रभाव होता त्या वयात. तो इतका होता की त्या जश्या स्वत:ल प्रेझेंटेबल ठेवायच्या ते मला खूप भावायचं.त्या शिकवायला आल्यावर एक प्रकारे आख्खे वर्गातील वातावरण ताजेंतवानं व्हायचं.मला त्या ज्या पद्धतीने स्वत:ला निटनेटकं ठेवायच्या ते फार आवडायचं.मग मी ही त्या जसे मॅचिंग कुंकू त्यांच्या पोशाखाप्रमाणे अगदी बारीक काडीने काढायच्या तसे मी ही काढत असे.त्यासाठी दहा मिनीटे लवकर उठत असे.माहीत नाही हे कोणी मला चांगलं,खूप छान दीसते असं म्हणावं हा त्यामागचा हेतू कधीच नव्हता.मला आठवतंय त्यासाठी मी तुळशीबागेत ती वेगवेगळे रंग असलेली ओल्या कुंकवाची डबी खरेदी केली होती.पण नंतर त्या अश्या सुंदर दीसण्यामागे त्यांची हुशारी,शिकवण्याची पद्धत,आणि इंग्रजी व क्रीएटीव्ह विषया वरील प्रभुत्व...अश्या अनेक गोष्टीं ही होत्या की ज्या त्यांच्या सौंदर्यात भर घालत होत्या.लग्नाआधी मलाही नटावं,आपण खूप छान रहावं ,कींबहुना आपण जे कपडे घालतो त्याचा काही एक रंगसंगती असावी.या गोष्टींकडे माझं खूप लक्ष असे. म्हणजे आत्ताही ते आहेच.मला कोणत्याही पॅन्टवर भलताच शर्ट कौस्तुभने घातलेला नाही चालत.म्हणजे ऑफीसमध्ये जातानाशर्ट इन करुन जाणे,दाढी करुन जाणे,स्वत:ला प्रेझेंटेबल ठेवावं असं मला वाटतं. पण अताशा मी त्याच्या नादी नाही लागत.( बहुतेक हे मला उशीरा आलेलं शहाणपण असेल).यात कोठेही आपण सुंदर, छान दीसलो नाही तर आपल्याकडे कोणी बघणारच नाही असा विचार नसतो. कींवा शर्ट आऊट केला,कश्यावरही काहीही घातलं,दाढी न करता गेला तर अडणार काहीच नाही.पण आपण व्यवसायानिमित्त जेथे वावरतो,त्यासाठी प्रेझेंटेबल रहावं असं माझं मत असतं.मला माहीत नाही आपलं चांगलं (प्रेझेंटेबल रहाणं) रहाणीमान ही आपल्या चांगलं दीसण्यासाठीची कींवा कोणी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून करत असणारी खटपट नव्हे.

Friday, September 30, 2011

सौंदर्य -- ३


’सौंदर्य’ हे एक मूल्य आहे. जे आयुष्य माझ्या वाट्याला आलं आहे, ते मी सुंदर करीन.
प्रत्येकाला सुंदर दिसण्याचा हक्क आहे. हे आपल्याला मान्यच आहे हं!
त्याच्या किती आहारी जायचं?
त्यात दाखवेगिरी किती आहे?? ...... पाहायला हवं.
आपण सुंदर दिसलो नाही तर कुणी आपल्याकडे लक्षच देणार नाही, अशी असुरक्षितता असते का मनात?
मेक अप शिवाय बाहेर पडू न शकण्याची असहायता का आहे?
काय करून टाकतो आपण आपल्या शरीराचं? एक खेळणं?


>>स्वीकारा ना स्वत:ला! जशा आहात तशा!
आणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.
स्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
स्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही?
कुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.
तुम्ही ”छानच’ आहात.

हे फार आदर्शवादी झालं.

वस्तुस्थिती अशी आहे की, गोरेपणा, नितळ त्वचा, सुळसुळीत केस वगैरे वगैरे देणार्‍या/ किंवा अशी आश्वासनं देणार्‍या क्रिम, तेले , साबणे यांची विक्रमी विक्री होते. त्याशिवाय ते एवढा पैसा जाहिरातीत ओतणार नाहीत.
 ही समाजाच्या दृष्टीने चांगलं दिसण्याची/ सुंदर दिसण्याची ऒढ कसली म्हणायची?
समाजाच्या दृष्टीने ही यातली महत्त्वाची गोष्ट आहे.
समाजा-समाजानुसार यातले सौदर्याचे निकष बदलत जातात.
आपल्या समाजात अजूनही "गोर्‍या रंगाची" "जेत्यांच्या रंगाची" ओढ कायम आहे.
आपण समशीतोष्ण कटीबंधातले लोक आहोत, आपला रंग हा सावळा/ काळाच असणार आहे.
जागतिकीकरणामुळे जसजशी जगाची ’जागतिक खेडे’ या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे, तसतशी प्रसाधन कंपन्यांचा जोर त्वचेच्या रंगापेक्षा नितळतेकडे वाढत आहे, त्यांना सर्वसमावेशक होणं गरजेचं बनलं आहे.
आपले हिरो कोण आहेत? तर रूपेरी पडद्यावरचे नट/ नट्या.
असं का व्हावं?

अनिता अवचटांना कॅन्सर झाला होता. उपचारादरम्यान त्यांचे सगळे केस गेले. त्या समाजात तशाच वावरत असत.
आपल्याला आपले पांढरे केस झाकावेसे वाटतात, का?
ह. अ. भाव्यांनी दुर्गा भागवतांची एक आठवण सांगितलेली आहे, दुर्गाबाई भाव्यांच्या पत्नीबरोबर भाजी निवडत बसल्या होत्या. त्यांना एके ठिकाणी भाषण द्यायला जायचं होतं. वेळ होत आली, तशी त्या निघाल्या, नेसणं थोडं ठीक केलं, म्हणाल्या , ” चला.” भाव्यांनी विचारलं, ” लुगडं बदलायचं नाही का?” त्या म्हणाल्या, ”हे चांगलंच आहे.” तशा घरगुती लुगड्यावर त्या भाषण द्यायला गेल्या. श्रोत्यांना मंत्रमुग्ध केलं.

हे आदर्श आमच्यासमोर का नसावेत?

ययातिच्या गोष्टीइतकीच माणसाच्या चिरतारूण्याच्या ओढीची गोष्ट जुनी असणार!

कुठलीही गोष्ट खूप खणत गेलात की ती स्त्री-पुरूष संबंधांपर्यंत येऊन पोचते.
सौंदर्याची तर पोचणारच पोचणार!

(क्रमश:)

Monday, September 26, 2011

सौंदर्य-२

विद्या तुझा सौंदर्य या विषयावरचा ब्लॉग वाचला आणि तेव्हाच माझ्या लहानपणापासूनच्या काही आठवणी मनात येऊन गेल्या.लहान नू.म.वि. शाळेत असताना आमचं स्नेहसंमेलन आलं की तेव्हा मला त्याच्यात आनंद घेण्यापेक्षा मनातून खूप वाईट वाटत असे याची मुख्य कारणे म्हणजे माझी उंची,ज्यामुळे नाचात कायमच मी मागच्या रांगेत ,दुसरं म्हणजे रंग...... समाजाच्या दृष्टीने गो-या गोमट्या, देखण्या यात बसणा-या मुली स्टेजवर पुढे असत. त्यामाने कमी देखण्या मागच्या रांगेत असा जणू नियमच ठरलेला.समाजात अजूनही दीसणं हा कीती महत्वाचा मुद्दा आहे.तेव्हा त्या शाळेच्या वयात या बद्दल मनात एक प्रकारचा न्यूनगंड आला होता.त्यातून स्वत:च शहाणपण यायला बरीच वर्षे गेली.मी कॉलेजला असताना जेव्हा फोटोग्राफी विषय घेतला तेव्हा काळा रंगातील सौंदर्य म्हणजे काय?अनेक काळ्या रंगाच्या असणा-या व्यक्तींचे उत्कृष्ठ फोटो मी जेव्हा पाहीले तसतसा मनातला न्यूनगंड कमी झाला.माझं लग्न करण्याचा जेव्हा आई बाबा विचार करत होते तेव्हा आलेल्या अनेक स्थळांपैकी बहुतेक मुलांच्याकडून आलेल्या फोनवरचे संवादावरुन रंगावरुन नकार हे कारण होते.माणूस एवढा आपल्या बाह्यरुपाला महत्व देतो.याउलट इकडं कौस्तुभकडे सगळे पांढरे फटक गोरे असताना जिथून मला खात्रीने नकार येईल अशी अपेक्षा होती तिथूनच होकार आलेला पाहून मला धक्काच बसला. कारण त्याआधी आलेल्या स्थळांमध्ये आपलं दीसणं कीती महत्वाचे आहे हे अनुभवायला येत होतं.त्याबद्दल कौस्तुभचे खरंच कौतुक.आता आई म्हणून मी जेव्हा स्मृतीला वाढवतं असताना आमच्याकडे इतर माझ्या पुतण्या रंगाने गो-या आहेत त्यामुळे कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.आपलं वागणं,आपल्यातले गुण,आपल्या जवळची हुशारी ,आपल्या आवडी-निवडी अश्या अनेक विषयावर तिच्याशी बोलल्यावर तिचा चेहरा एकदम खुलतो.खरंच लहानपणापासून या गोष्टी आपण कश्या दाखवतो हे फार महत्वाचे वाटते.गोरं म्हणजे सुंदर आणि तसं आपन नसू तर अनेक गोष्टींच्या लेपनाने तो तात्पुरता गोरा रंग मिळवून समाजात मिरवणा-या बायकांकडे बघून खरंच कीव करावीशी वाटते अनेक प्रकारची महागडी सौंदर्य प्रसाधने वापरुन आपण आहोत त्यापेक्षा अधिक सुंदर दाखवणे. त्यासाठी पैसा, वेळ, आपली बुद्धी खर्च करणे म्हणजे केवळ मुर्खपणा आहे.आपल्या मुलींकडे पाहीले की खरंच बरं वाटत की घराच्या बाहेर पडताना त्यांना पावडर न लावताही बाहेर पडता येतं. स्वत:च्या दिसण्यात त्या एवढ्या गुरफटल्या जात नाहीत.आपलं बोलणं,आपलं हासणं, आपल्यातील छंद,कल्पकता यासारख्या अश्या अनेक गोष्टी म्हणजे खरं सौंदर्य......... याचा अर्थ त्यांना खूप लहान वयात माहीती होतोय.

Thursday, September 15, 2011

सौंदर्य -- गोरेपणा


माझी एक मैत्रिण होती. काम सुबक नीटनेटकं. इंजिनीअर. आम्ही बरोबरच नोकरीत रूजू झालो. एकलहर्‍याला राहायचो तेंव्हा घर असलं तरी ते हॉस्टेलसारखंच असायचं. रात्री जागून गप्पा व्हायच्या. तिचा रंग काळा, केस लांब आणि जाड होते. वेणी खूप छान दिसायची.
 एकदा अशाच गप्पा मारत होतो. सांगत होती, ”माझ्या सगळ्या चुलत, मावस बहीणी गोर्‍या आहेत. त्यांच्या रूपाचं सारखं कौतुक, मी कोणाच्या खिजगणतीतही नसायचे, काय करावं माझ्यासारख्या सामान्य रूपाच्या मुलीने? मी अभ्यास करायचे. मी मार्क मिळवायला लागले , सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष जावू लागलं, थोडफार कौतुक सुरू झालं. त्याने अभ्यासाची मला गोडी लागली.”
  दीपा, तू लिहिलंस तसं, शाळेत नाचात गोर्‍या गोमट्या मुलींना घ्यायची पद्धत होती. मी नाचात नसायचे, मला भाषण देता यायचं, निबंध लिहिता यायचे, वर्गात पहिली, दुसरी यायचे, रंगाचा मला त्रास झाला नाही.
  याचं श्रेय आईला पण द्यायला हवं. तिने माझ्यात कधी रंगाचा न्यूनगंड येऊ दिला नाही.
एक वय असं येतं, जेव्हा आपण स्वत:च्या, स्वत:च्या दिसण्याच्या प्रेमात असतो, स्वत:चं दिसणं समाजाच्या पट्टीवर मोजत असतो, ही फेज माझ्यासाठी लवकर संपली, तेव्हाही रंगापेक्षा चेहर्‍यावरच्या फोडांचा मला अधिक त्रास होत असे, नुसता दिसण्याचा नाही तर दुखण्याचा...
इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी मला कधी काही करावं लागलं नाही. कॉलेजमधेही मुलं/ मुलगे माझ्याशी बोलायला येत ते अर्थातच माझ्या दिसण्यासाठी नाही, त्यामुळे सहज संवाद होऊ शके.
 जर लग्नाच्या बाजारात उभं राहायची वेळ आली असती तर त्रास झाला असता.
”समाजाच्या दृष्टीने सुंदर असाल तर ती पुढचं सगळंच आयुष्य श्रीमंतीत आणि तथाकथित सुखात घालविण्याची किल्ली आहे.”
पण जो नवरा केवळ आपल्या दिसण्यावर प्रेम करतो, त्याच्याबरोबर आयुष्य काढायचं म्हणजे खरंतर शिक्षा आहे! माझं रूप म्हणजे मी नाही. ते मला मिळालेलं आहे. त्याशिवायची जी मी आहे ना? ती ”मी” मला घडवलेली आहे. घडवलेल्या ”मी” शी नातं सांगू न शकणारांची काय पर्वा करायची?
****
>>कधीकधी तिच्याकडूनही काळ्या रंगाबद्दलची नाराजी दीसते तेव्हा या रंगापलिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत.
दीपा, हे वाक्य तू सहज लिहिलं असशील, तरी "रंगापलीकडे" असं आपण म्हणतो तेंव्हा रंगाचं महत्व आपण मान्य करतो असं होतं. वाक्यरचना विचारपूर्वक करायला हवी.
मुक्ता अभिनव मधे होती तेव्हा शाळेत ताईंनी ”तुम्ही चहा पिऊ नका, काळे पडाल." असं वर्गात सांगितलं. मी मुख्याध्यापिकाबाईंना भेटायला गेले होते. आपल्या मुलांना केवळ आपण घडवत नाही, समाजही घडवतो. आपण दक्ष राहिलं पाहिजे.
****

****
आपण पृथ्वीच्या ज्या कटीबंधात राहतो, तिथल्या लोकांचा रंग हा काळा, सावळा, निमगोरा असाच असणार आहे.
गोरेपणा म्हणजे त्वचेतील मेलॅनिन या रंगद्रव्याची कमतरता.
अर्थात हे सांगून उपयोग नाही.
*****


Thursday, September 1, 2011

सौंदर्य -- १


गावाहून आले की आमच्याकडे केबल/डीश नाही याचं मला फार बरं वाटतं.
बातम्या नकोत, चर्चा नकोत, मालिका नकोत..... काहीच नको.
गावाला असले की सगळ्यांबरोबर थोडाफार टीव्ही पाहिला जातोच.
मग मालिकांपेक्षा जाहिराती पाहाव्याशा वाटतात.
काही जाहिराती खरोखरच पाहण्यासारख्या असतात..... किती वेळा पाहणार??

नुसत्या जाहिरातींचा अभ्यास केला तर काय आढळेल?
कुठल्या आहेत आपल्यासमोरच्या महत्त्वाच्या समस्या?
घरादाराची, कपड्यांची, स्वत:ची स्वच्छता कशी राखावी?
केसांत कोंडा झाला तर?
झुळझुळीत केस आणि तजेलदार कांती, गोरेपणा कसा मिळवायचा?

या जाहिरातसुंदर्‍यांचं तर ना, मला काही कळतच नाही.
जसं जसं नीट पाहात जाल तसं तसं त्यांचं हसणं, नाचणं, कृत्रिम वाटायला लागतं.
त्यांच्या आनंदी असण्याचं रहस्य काय?   तर एक क्रिम? एक साबण?
फ्रिज करून ठेवलेलं त्यांचं ते हसणं!..... काय घडतंय आजूबाजूला हसण्यासारखं?
प्लास्टीकच्या बाहुल्याच नव्हेत का त्या? किल्ली दिली की हसणार्‍या, गाणं म्हणणार्‍या...
त्यांचं एक ठीक आहे, त्यांचं हसणं, त्यांची त्वचा, त्यांचे केस, त्यांचं सौष्ठव हे त्यांचं भांडवल आहे.
त्या पूर्णत: व्यावसायिक आहेत/ असाव्यात/ असल्या पाहिजेत.
आपलं काय?

९० च्या उदारीकरणानंतर उत्पादनाचे वेगवेगळे पर्याय सामान्यांसाठी खुले झाले.
नुसत्या साबणांचे, शांपूचे शंभरेक प्रकार आज बाजारात असतील.
टीव्हीमुळे ते वापरणार्‍या सुंदर्‍या आपल्या घरात घुसल्या.
पूर्वी कसं होतं, मधुबाला असेल किंवा हेमामालिनी असेल, या चित्रपटगृहांच्या पडद्यावर होत्या.
त्यामुळे स्थानिक यमींच्या गोरेपणाला, सौंदर्‍याला भाव होता.
चारचौघीत उठून दिसणारी..... पुरेसं होतं.
आजच्या यमीची तुलना थेट कतरीनाशी, करीनाशी, दीपिकाशी किंवा कोण नविन?... त्या सोनाक्षी वगैरेंशी होऊ लागली.
बाई गं, त्यांचा पूर्णवेळेचा उद्योग ’दिसणं’ सांभाळणं हा आहे. तुला ते जमेल का?

आजची बाई त्या स्पर्धेत स्वत:ला भरडून घेते आहे.
स्वीकारा ना स्वत:ला! जशा आहात तशा!
आणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.
स्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
स्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही?
कुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.
तुम्ही ”छानच’ आहात.

***

Tuesday, August 16, 2011

भांडण - २


कौटुंबिक मतभेदांमधे ही बायकाबायकांमधली भांडणे आहेत, दोन बायकांचंच एकमेकींशी पटत नाही, अशा फटकार्‍याने ती बाजूला केली जातात. तसं नसतं. बायकांमधल्या वादाला पुरूषसत्ता नाहीतर/ आणि पुरूष कारणीभूत असतात.
पुरूषसत्ता कशी कारणीभूत असते?
पुरूषसत्तेची काही पायाभूत तत्वे आहेत, (त्यात पुरूषप्रधानता हे आहेच,) काही धारणा आहेत, काही उतरंडी आहेत.
उदा. लग्नानंतर मुलीने नवर्‍याच्या घरी राहायला जायचे,
मुलीचं घर कुठलं? जे तिच्या नवर्‍याचं घर ते तिचं घर.
इथे आपण हे मान्य करूया की समाजव्यवस्था चालायची तर त्याला काही चौकट आखावी लागेल, काही नियम लागतील, त्यात प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार आहे.
जेव्हा सून लग्न होऊन घरात येते तेव्हा तिचं स्थान सर्वात खालचं असतं. म्हणजे सासूसासरे, नवरा, दीर, नणंदा, मग ती. हळूहळू या उतरंडीत ती वर चढत जाते...
स्वयंपाकघर हे असं क्षेत्र आहे, ज्यात सासू सून दोघी काम करत असतात. दोघींपैकी एकीला त्यात रस नसेल तर स्वयंपाकघरातले वाद कमी होतात. दोघींनी आपल्या कर्तृत्वाचं क्षेत्र तेच मानलेलं असेल तर अवघड होत जातं. त्यातून मार्ग काढता येतात/ काढले जातात. एकावेळी एकीने करायचं दुसर्‍यावेळी दुसरीने... एकमेकींच्या स्वैपाकात पडायचं नाही. असं ठरवूनच घ्यायचं.
प्रश्न असा येतो की .... आपला समज असा असतो की कौटुंबिक नाती ही भावनेवर आधारलेली असतात. त्यात इतक्या रूक्षपणे नियम ठरवत बसायचे?
मुळात आपण एक लक्षात घेऊ या की कौटुंबिक नाती ही केवळ प्रेमावर आधारीत नसतात त्यात खूप राजकारण असतं. नवरा - बायकोच्या नात्यातसुद्धा ओलावा टिकवणं म्हणजे एक कसरत असते, तिथे बाकीच्या नात्यांचं काय?
तर काय करावं?
मला असं वाटतं, प्रत्येक नात्याची घरात एक खुर्ची असते. तिचा आदर आपण केला पाहिजे. ती व्यक्ती आपल्याला आवडत नसेलही पण ती त्या खुर्चीत बसलेली आहे हे आपण विसरू नये.
 समजा मुक्ताच्या आजोबांचे आणि माझे मतभेद आहेत. तरी या घरातले ते ज्येष्ठ आहेत, त्यांना योग्य तो मान आणि आदर मिळालाच पाहिजे, त्याशिवायही मतभेद असू शकतात/ असतात.. त्याचं काय करायचं ते बघू या.
घरात कुणाला किती अधिकार आहेत? यावर मतभेद असतात.
भांडणांच्या मुळाशी आपण गेलो नाही तर वरवरच्या मलमपट्टीचा उपयोग होईलच असं नाही, मग घरातदेखील हसरा मुखवटा घालून वावरावे लागते, त्याचा ताण असतो.
हे माझं घर आहे. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माझं म्हणजे कुणाचं? माझं एकटीचं नाही ना!
या घरात मला कुठले हक्क आहेत? माझ्यावर कुठल्या जबाबदार्‍या आहेत? त्याप्रमाणेच घरातल्या इतर सदस्यांना कुठले हक्क आहेत आणि कुठल्या जबाबदार्‍या आहेत याची वर्तुळे निश्चित केलेली असली पाहिजेत.
बायकांना मन:शांती हवी असेल तर...
माझ्या घरात मला काय हवं आहे? माझ्या घरातल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत? नक्की कशाचा मला त्रास होतो? घरातलं काय मला बदलणं शक्य आहे? काय स्वीकारावं लागणार आहे? ... याचा विचार केलाच पाहिजे.
परीस्थिती पूर्णपणे बदलणं कुणालाच शक्य नसतं. थोडी बदलावता येते, थोडी स्वीकारावी लागते. त्यात जय पराजय काहीही नसतो.

*********

Sunday, July 31, 2011

गोष्टी मुलींच्या - १



माझ्या नंणंदेची एक मैत्रिण आहे, माहेश्वरी समाजातील. तालुक्याच्या गावची. लहानपणापासूनच हुशार. वर्गात पहिली असायची. COEP ला वसतिगृहात राहून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. नंतर एका चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी करत होती. दोन-तीन मुली घर घेऊन राहायच्या.
 आता लग्नाची वेळ आली आहे. घरच्यांनी स्थळे पाहायला सुरूवात केली आहे.
एकत्र कुटूंब आहे. आई दादाजीं समोर (सासर्‍यांसमोर) कधी जात नाही. घरात कोणीच नसेल तर घुंघट घेऊन कामापुरती, जेवायला वाढणे वगैरे, समोर जाते. लग्नाच्या वयाची मुलगी असलेली ही सून आहे, हे लक्षात घ्या. कुटूंबाचा काहीतरी एकत्रित व्यवसाय आहे.
 एकदा ती चार दिवसांची रजा काढून घरी आली. दादाजी म्हणाले, ” आता लग्न करायचं आहे, हीची नोकरी बास झाली, घरीच राहू दे.”
सगळ्यांना ते पटलं. तिला नोकरी सोडायला लावली. सध्या ती घरीच आहे. तिला फार घराबाहेर पडू देत नाहीत. ”सारखं काय लॅपटॉप आणि इंटरनेट?” त्यावर बंधने आली आहेत. कधी मैत्रिणीकडे आली की संगणकावरून इतरांशी संपर्क साधते.
 नवरा कसा मिळेल? माहीत नाही. त्याने जर नोकरी करू दिली तर ही करणार... नाहीतर नाही. नवरा हिच्या पसंतीने नाहीतर घरच्यांच्या पसंतीने ठरवला जाईल. शेवटी हिला विचारतील पण ऎकतीलच असं नाही.
 हिच्या पत्रिकेत मंगळ आहे, पत्रिका जुळणे अवघड, ती जुळल्याशिवाय पुढे जाणारच नाही. मंगळाची शांती करून घेत आहेत.
आईलाही वाटतं मुलीचं हे असंच असणार, असायला पाहिजे.

********

सगळ्या मैत्रिणींच्या गप्पा चाललेल्या.... असंच पुन्हाही कधीतरी आपण माहेरी येऊ तेव्हा भेटत राहू. ही म्हणाली, ” एकदा माझं लग्न होऊ दे, मी माहेरी येणारच नाही.”

*******
ही घराबाहेर राहिलेली मुलगी आहे, तिने जग पाहिलेलं आहे, स्वत: कमवायची धमक तिच्यात आहे.
आत्मविश्वास आहे का? तिच्यात लढण्याची बीजे आहेत का?
मला माहीत नाही.
तिला नवरा, सासरचे लोक कसे मिळतील?
काळजी वाटते.
तिची इच्छा नसताना तिला घराशी बांधून ठेवलं आहे.
समाज म्हणून आपण तिच्यासाठी काय करू शकतो?
काही नाही.

*******

Wednesday, June 15, 2011

नावात काय आहे!


मुलींनी लग्नानंतर नाव - आडनाव बदलू नये. नाव ही आपली ओळख असते. लग्नामुळे ती का बदलली जावी? पुरूषांची बदलते का?
कोणाची बायको म्हणून ओळखली जाण्यापेक्षा कुणाची मुलगी म्हणून ओळखलं जाणं मला पसंत आहे. मी जशी आहे तशी माझ्या बाबांनी मला स्वीकारलीच असती. आई - बाबांनी मला वाढवलं ते आपलं मूल म्हणून! मी घडत गेले. माझ्या नवर्‍याने माझ्याशी लग्न करायचे ठरवले ते माझ्यातल्या काही गोष्टी पटल्या / आवडल्या म्हणून! म्हणजे आमचं नातं विनाअट नाही.
 बाबांचं तसं नाही म्हणजे नसावं, वडील आहे त्या क्षमतांसह अपत्याला स्वीकारतात / स्वीकारावं. मला आईचं नाव लावायलाही आवडलं असतं, ते माझ्या हातात नव्ह्तं.
 मी लग्नानंतर माझं नाव/ आडनाव बदललं नाही. त्यामुळे जिथे जिथे मला किंवा मिलिन्दला आम्ही नवरा - बायको आहोत हे सांगायची गरज पडते, तिथे तिथे आमचं मॅरेज सर्टीफिकेट दाखवावं लागतं. साधं कुरीअरने आलेलं पत्र सही करून घ्यायचं असलं तरी कधी कधी तुमचं आडनाव वेगळं कसं? तुम्ही यांच्या कोण? असे प्रश्न विचारले जातात. मला ते सवयीचं झालं आहे.
 आमच्याकडे मोठे मूल बाबाचे नाव लावेल आणि धाकटे आईचे लावेल असे आम्ही ठरवले होते. त्याप्रमाणे सुहृदचे नाव शाळेत आम्ही सुहृद विद्या कुळकर्णी असे लावले होते.

त्रिनाम पद्धतीत आडनाव न लावता नावापुढे आईचे आणि वडिलांचे फक्त नाव लावतात. आडनावे किती वैशिष्ट्यपूर्ण असतात!, ती सोयीची आहेत, ती आपल्या समाजाची ओळख आहे. ती मिटून जावी असे मला वाटत नाही. आडनावामुळे जातीचा अंदाज येतो किंवा जात कळते. जे जात मानत नाहीत त्यांनी ही जातीवाचक ओळख नको व आई, वडीलांचे दोघांचेही नाव लावायचे अशी पद्धत सुरू केली. यावर माझे म्हणणे असे होते की इतर गोष्टींवरूनही लोक जातीचा अंदाज बांधतच असतात आणि जात हे आपल्या समाजातील वास्तव आहे ते असे वरवर नाकारून काय फायदा? जात आहे ती स्वीकारून आपले वर्तन जातीनिरपेक्ष ठेवले पाहिजे.

माझे नाव लावण्यावर  जवळचे नातेवाईक आणि माझ्या मैत्रिणीदेखिल अनेक प्रश्न विचारीत. पटकन हे कोणालाच पटायचे नाही. म्हणजे
”अगं एका घरात भावाबहीणींची नावे निराळी असली तर त्यांच्यात दुरावा येईल? ”
”का? आत्ताही बहीणीच्या लग्नानंतर दोघांची आडनावे वेगळी होतातच की!
” आता आईचं नाव येतंच की दहावीच्या प्रमाणपत्रावर?”
” नाव येतं आडनाव नाही! ते प्रमाणपत्र म्हणजे मुलाची ओळख नाही.”
” मूल वडीलांच्या कुळातलं असतं म्हणून ते नाव लावायचं”
” ते आईच्याही कुळातलं असतंच की!”
यावर आणखी पुढे तर मी म्हणते असे, ”माझं मूल हे माझं मूल आहे हे नक्की! ते मी सांगते माझ्या नवर्‍याचं आहे म्हणून त्याचं आहे!” ... हे तर कोणालाही झेपत नसे.
 आम्ही सुहृदचं नाव ठरवल्याप्रमाणे टाकलं. पहिलीत गेल्यावर नावाची नोंद शासन दरबारी होते. त्यामुळे जन्माचा दाखला लागतो. तो दिला. त्यावर आईचं फक्त नाव आणि वडीलांचं पूर्ण नाव असं असतं. आईचं आडनाव नाही. त्यामुळे शाळेने चौकशी केल्यावर कळले असे नाव ठेवायचे असल्यास गॅझेटमधे बदलून घ्यावे लागेल. ( खरे म्हणजे बदलायचे काही नव्हतेच! फक्त लावायचे होते.)
 अशी नावें ठेवणार्‍या इतर पालकांनी काय केले? हे जाणून घेण्यासाठी गणेश विसपुते यांना फोन केला. त्यांनी आपल्या मुलींची नावे त्रिनाम पद्धतीने ठेवलेली आहेत. त्यांनाही आता दहावीला गॅझेटमधे नाव (परत एकदा) आणायला लागणार होते. ते म्हणाले ,” आपण ठाम राहायचं, म्हणायचं आमच्यात असंच आहे. त्या साऊथ इंडियन लोकांना कोणी विचारत नाही तुमचं नाव असंच का? हवी ती कागदपत्रे पुरवीत राहायचं.”
त्यानंतर सचिनला फोन करून श्रुती पानसे आणि इब्राहिम खान यांनी त्यांच्या मुलाचं नाव काय घातलं आहे? त्यांचा अनुभव काय आहे? हे विचारून घ्यायला सांगीतलं.
 त्यांनी रूढ पद्धतीप्रमाणेच नाव घातलेलं आहे नाहीतर फार कटकटी असतात. तो पुढे म्हणाला, विनय र. र. यांनी त्यांच्या मुलीचं नाव त्रिनाम पद्धतीप्रमाणे ठेवलं आहे, त्यांच्या मुलीने मात्र आपल्या मुलाचे नाव रूढ पद्धतीने ( वडीलांचे नाव आडनाव लावून) घातले आहे. सततच्या कटकटींना ती वैतागलेली होती. तिचे स्वत:चे नावही आई- बाबांनी रूढ पद्धतीने ठेवले असते तर बरे झाले असते,असे तिला वाटते. रश्मीताई म्हणाल्या ,” नाव वेगळ्या पद्धतीचे असले की बरीच कागदपत्रे लागतात, गॅझेटमधे नाव बदलून घेऊनही मनिषाताईंच्या मुली्ला दहावीच्या ऎन परीक्षेत नावामुळे त्रास झाला.”
 एकूण काय तर आईचे नाव/ आडनाव मुलांनी लावावे हे स्वीकारण्याची समाजाची / चौकटीची तयारी नाही. नसेल तर कोणीतरी लढायला हवं. अगदी खरं आहे.
 माझी लढायची तयारी नाही. आज माझ्यासाठी तो शाळेत नीट डबा खाईल ना? पूर्णवेळ शाळेत रूळेल ना? घाबरणार नाही ना? हे प्रश्न अधिक महत्त्वाचे आहेत. त्याच्या इतर चिंता मला नसत्या तर मी लढलेही असते. आता मी त्या मनस्थितीत नाही.
 मिलिन्द म्हणाला ,” तू याकडे सोय म्हणून पाहात असशील तर हरकत नाही, तुला हा तुझा पराभव आहे असं वाटत असेल तर लढायला हवं”
 मी म्हणाले,” ही सोय आहे. कशाच्या बदल्यात काय मिळवायचं याचा मी व्यावहारीक विचार करते आहे. नावासाठी इतक्या कटकटींना सामोरं जाण्याची माझी इच्छा नाही. आज माझ्यात ती ताकदही नाही. पूर्वी मला या मुद्द्याविषयी जितकं तीव्रतेनं वाटायचं ते आज वाटत नाही.”

मग शाळेत जाऊन मी सुहृदचं आधीचं नाव खोडून ते बाम सुहृद मिलिन्द असं केलं.

*****
सुहृदला विचारलं, ” तुझं नाव तुला आत्ता आहे तसं सुहृद विद्या कुळकर्णी असं आवडेल की सुहृद मिलिन्द बाम असं आपल्या ताईसारखं आवडेल?”
”मला माझं नाव सुहृद विद्या कुळकर्णी असंच आवडतं.

******

हल्ली मी विचार करते तो समाज जावू देत खड्ड्य़ात! मी काही समाज बदलण्याचा मक्ता घेतलेला नाही! माझं काय चाललं आहे ते समाज बघतो तरी का? मला साथ देतो का? नाही ना! मग मी का विचार करायचा? मी पण माझ्यापुरतंच बघीन.

दरवेळी हे जमेल का? मला माहित नाही.

*******

हा माझा पराभव आहे का? मी ’सोयी’आड दडते आहे का?
नसावं. हा बदल मी खूप सहजतेने केला आणि स्वत:ला काही लावून घेतलं नाही.
बहुदा मी समजदार झाले असेन.

******

Tuesday, May 31, 2011

गप्पा


यावेळी मी आणि माझी एक मुंबईची मैत्रिण भेटायचे ठरवून औरंगाबादला गेलो होतो. ती दोनच दिवसांसाठी आली होती. दुसर्‍या दिवशी सगळे आटोपून रात्री सव्वादहा - साडेदहाला आमच्याकडे आली दहा मिनिटे आईबाबांशी बोलली, नंतर आम्ही गच्चीवर गेलो.
 पूर्वी यायचा तसाच तिचा भाऊ साडेअकरा बाराला तिला बोलवायला आला. ती म्हणाली, ” येते तासाभराने.”
आई म्हणाली,” दीड वाजलाय. किती वेळ गप्पा!”
मी म्हणाले,” तू थांब आता इथेच.” सकाळी सहाच्या रेल्वेने तिला मुंबईला जायचे होते. सव्वाचारला ती गेली, आवरून लगेच स्टेशनवर गेली. मला म्हणाली, ” गाडीत झोपायचेच आहे.”
खूप वर्षांनी आम्ही अशा रात्रभर निवांत गप्पा मारल्या.

----------

ती आणि तिचा नवरा त्याच दिवशी शनि- शिंगणापूरला जाऊन आले होते. तिथे घराला दारे नसतात, हे पाहण्यासाठी म्हणून. तिथे तेव्हढ्या परीसरात खरोखरच दारे नाहीत. ती म्हणाली, ” न्हाणीघराला, शौचालयांनादेखील दारे नाहीत. नुसते पडदे .” दारे नाहीत हे मला माहीत होते, चोर देवाच्या भीतीने चोरी करत नसणार एवढेच माझ्या मनात येऊन गेले होते. त्यापलीकडे मी काही विचार केलेला नव्हता. मी म्हणाले, ” दारे काही फक्त समोरच्या व्यक्तीवर अविश्वास दाखविण्यासाठी नसतात. आपल्याला एकांत हवा असतो, तो मिळण्याची खात्री हवी असते. ”
” हो ना!, मी विचारलं एकीला तुमच्या झोपायच्या खोलीलापण दारं नाहीत का? कसं वाटतं तुम्हांला ? ”
” असं विचारलंस??”
” हो, त्यात काय?”
(माझ्या  बर्‍याच मैत्रिणी ’ त्यात काय’ म्हणणार्‍या आहेत. त्या मला आवडतात.)
पुढे म्हणाली, ”तिथे झोपायच्या खोलीची रचना अशी असते की येणारा थेट येऊ शकत नाही ,  त्याची चाहूल लागते.”
”काय हा वेडेपणा! एकदा त्या शनीला सांगून टाकायचं, बाबा रे आमचा तुझ्यावर विश्वास आहे, आम्ही आमच्या तिजोर्‍या उघड्या टाकू पण काही आवश्यक दारे लावू.”

---------

” विद्या, मी एवढया नवरा-बायकोच्या जोड्या पाहते आहे ना! प्रत्येकाला साजेसा जोडीदार मिळतो. बघ मला माझ्यासारखा मिळाला, तुला तुझ्यासारखा मिळाला. अण्णा - वहिनी दोघेही उधळे आहेत”
” छे! मला नाही पटलेलं. वर्षानुवर्ष ते एकमेकांबरोबर राहून जुळवून घ्यायला शिकतात, कोणाही दोघांत काही जुळणार्‍या काही न जुळणार्‍या गोष्टी असतात. आपण खुशीत असलो की आपल्याला जुळणार्‍या गोष्टी प्रामुख्याने दिसतात, नसलो की न जुळणार्‍या”

----------

”माझी शेजारीण खूप सुंदर आहे. तिचा नवरा असातसाच आहे, दिसायला. लग्नाला वीस-बावीस वर्षे झाली आहेत. अजूनही तिच्या मनात येतं .... आपल्याला आई वडील नव्हते, मामावर भार नको म्हणून याच्याशी लग्न केलं / करावं लागलं..... दिसण्याचं वगळता तो तसा चांगला आहे.”

----------

तिचे सासरे गेले तेव्हाचं सगळं सांगत होती, मला महानिर्वाण नाटकाची आठवण झाली.

------------

”तुला मीना आठवते? माझी मामेबहीण, माझ्या मावसभावाशी लग्न झालं तिचं”
” हो. आठवली.”
” तिचं कमी वयात लग्न झालं. पुढे मुलं झाली. संसाराची जबाबदारी पडली, मी तेव्हा शिकतच होते. ती मागच्या महिन्यात एका लग्नासाठी मुंबईला आली होती. माझ्याकडे उतरली. एकटीच आली होती. पाच सहा दिवस राहिली. हृषिकेशच्या परीक्षांमुळे मी रजा घेतलेली होती. तो जायचा परीक्षेला आणि आम्ही दोघी भटकायचो. तिला मी मुंबई दाखवली, फोर्ट्मधे पायी फिरवलं, लोकलमधून फिरलो. काही आवडलं की खायचं, खरेदी करायची. तिच्या आवडीची साडी घेऊन दिली. मजा केली. मला फारसं काही वाटलं नाही पण ती खूप भारावली होती. सारखं किती छान मोकळं वाटतयं.. असं म्हणत होती. मी फार केलं असं म्हणत होती.
एवढं काय? येणारांना मी मुंबई दाखवते, यावेळी रजेमुळे सोय झाली. गप्पा झाल्या. इथून हैद्राबादला गेल्यावरही ती सगळ्यांना मुंबईच्या गोष्टी सांगत होती. मामा मला फोनवर म्हणाले, ”तू मीनावर काय जादू केलीस?”
तिला आम्ही पूर्वी गप्पा मारायचो त्या आठवत होत्या, मी बरचसं विसरले होते. एकटीने काय मी फिरतेच ना! रोजचा स्वैपाक करायचा नाही, मुलं पाठीमागे नाहीत, आपल्याला हवं ते कारायचं... याचच तिला अप्रूप होतं.
 संसारात ती पार बुडाली. मी नोकरी करत असल्यामुळे माझं मला स्वत:चं विश्व आहे. तिच्या लग्नापूर्वी आम्ही गप्पा मारायचो, मजा करायचो ..... त्यानंतर तिने आजवर काही मजाच केलेली नव्हती.

********

बायकांना कसं जखडून टाकलं जातं ना! ...... स्वैपाक करा, भांडी घासा, कपडे धुवा ( किंवा मदतनीसाकडून करून घ्या), किराणा आणा, भाज्या आणा, बिलं भरा, मुलांच्या मागे फिरा, त्यांचा अभ्यास - त्यांचे कलावर्ग - त्यांचे खेळ, नवर्‍याला सांभाळा, आल्यागेल्याकडे बघा..... हे सगळं आपली पायरी सांभाळून ....... या चोवीस तासातून स्वत:साठी वेळ काढा........
 वर्षानुवर्ष मीनासारख्या कितीक बायकांच्या अंगावरून स्वातंत्र्याची साधी झुळूकदेखील जात नाही.......
पण काळजी करु नका बायका जगतात त्याशिवायही.... त्या चिवट असतात.

********

Thursday, May 12, 2011

भारतीय स्त्रीचे गृहिणीकरण -- १



इंग्रज भारतावर राज्य करत होते. भारताला लुटत होते. स्वत: ’सभ्य लोकांचा देश’ म्हणून मिरवत होते. भारतावर राज्य करण्यासाठी त्यांना काहीतरी नैतिक कारण हवं होतं. कुठल्याही देशाची संस्कृती किती पुढारलेली आहे हे ठरवण्यातले महत्त्वाचे मापक तिथल्या स्त्रियांची स्थिती कशी आहे? हे आहे. आपल्याकडे सती, केशवपन असल्या प्रथा त्यामुळे सारे भारतीय हे रानटी अवस्थेत आहेत आणि त्यांच्या उद्धारासाठीच इंग्रज हे भारतावर राज्य करीत आहेत, अशी ही भुमिका होती.
 त्या विरोधात इथल्या आणि काही पाश्चात्य इतिहासकारांनी पूर्वी म्हणजे प्राचीन काळी गार्गी, मैत्रेयी यांचे दाखले देत तेव्हा भारतात स्त्रिया पुरूषांच्या बरोबरीच्या होत्या, नंतरच्या काळात मध्ययुगात विशेषत: मुस्लिमांच्या आक्रमणानंतर इथल्या स्त्रियांची स्थिती खालावली अशी एक इतिहासाची रचना समोर आणली.
 आमचा इतिहास गौरवाचाच आहे, अशी भूमिका घेतली. भारतीयांना उभं राहण्यासाठी ती गरजेची होती.
इंग्रजांनी जर आमच्यावर सत्ता गाजवायला नको असेल तर आपण आधी आपल्या स्त्रियांची स्थिती सुधारली पाहिजे असं नवशिक्षितांना आणि सुधारकांना वाटायला लागलं.
 मग व्हिक्टोरीयन इंग्रजी गृहिणी ही प्रमाण मानून इथल्या स्त्रीचं गृहिणीकरण सुरू झालं.
पहिल्यांदा हे बंगालमधे झालं आणि नंतर हे महाराष्ट्रात सुरू झालं.
 स्त्रियांनी शिकलं पाहिजे, सुधारलं पाहिजे असं ठरवलं गेलं.
स्त्रीचं काम काय? तर मुले सांभाळणं, त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देणं, शिवण - टिपण करून घर व्यवस्थित ठेवणं वगैरे वगैरे.
स्त्रीने शिकायचं का? तर मुलांना शिक्षित आई मिळावी म्हणून. मुलांवर चांगले संस्कार व्हावेत म्हणून. तिने यासाठी गणित, शास्त्र हे शिकण्याची गरज नाही, तिने गृहविज्ञान शिकावं.
 तिने वावरायचं कसं, बोलायचं कसं हे ही ठरवलं जावू लागलं.
...........................................................

******

आपण का शिकायचं? शिक्षण म्हणजे काय बरं? आपण का शिकलोय?.....

*******

Saturday, April 30, 2011

नाती


नवरा - बायको किंवा कुठल्याही स्त्री - पुरूषांमधली नाती ही खूप गुंतागंतीची असतात. त्या सगळ्या नात्यांना समाजमान्यता लागते. त्यात बर्‍याचशा आर्थिक बाबी असतात.
 हरीयाणात नवरा गेल्यावर त्या बाईचं धाकट्या दिराशी लग्न लावलं जात असे. याला कारण जमीन त्याच घरांत राहाणे आवश्यक. आपल्याला हे खूप विचित्र वाटलं तरी त्या अख्ख्या समाजाची त्याला मान्यता होती / आहे.
 केरळात / दक्षिण भारतात मामाशी लग्न करायची प्रथा होती / आहे. या प्रथेची मुळं मातृसत्ताक पद्धतीत आहेत.
आपल्याकडे महाराष्ट्रात ’ विधवाविवाहाला मान्यतेचा कायदा’ आला. समाजाच्या वरच्या स्तरांतल्या / वरच्या जातीतल्या विधवांसाठी हा आधुनिक असला तरी खालच्या समाजातील स्त्रियां एक नवरा गेल्यावर सहजच दुसरा करीत. किंवा पहिल्या नवर्‍याशी पटत नसेल तर त्याला सोडून दुसर्‍याशी घरोबा करीत. याला समाजमान्यता होती. त्यांचं पोट हातावर, इस्टेटीसाठीची भांडणे नाहीत, स्त्रिया स्वत: कमावतात त्यामुळे हे स्वातंत्र्य त्यांना मिळत होतं.
 इंग्रजांनी लग्न कायदेशीर केले. त्यामुळे लग्नविधी निश्चित केले गेले. अर्थातच उच्च जातीतले लग्नविधी हेच प्रमाण मानले गेले, त्यामुळे हे ब्राह्मणी विधी सगळ्या जातींवर लादले गेले. त्यामुळे उच्च जातीतल्या स्त्रियांना काही सुरक्षितता मिळाली असेल पण खालच्या जातीतल्या स्त्रियांना त्याचा काच झाला. त्यांच्यातली सहज लग्न होणे आणि मोडणे, पुन्हा करणे या बाबी अवघड होऊन बसल्या. शिवाय पातिव्रत्याच्या कल्पनाही झिरपत झिरपत खाली गेल्या.
 तर स्त्री-पुरूष नाती, जी आपल्याला भावनेवर वगैरे आधारलेली ्वाटत असतात ती अशी कायदा, समाज, कुटूंब , आर्थिक स्तर, इस्टेट यांवर आधारित असतात.
अर्थात यातूनही काही नाती फुलतात.
****
नवरा - बायकोच्या नात्यात त्यांच्या एकमेकांविषयीच्या अपेक्षा या अशा बाहेरच्या समाजाने ठरवलेल्या असतात हे जर लक्षात आले तर आपण मुळापासून विचार करू शकू.
****

Thursday, April 14, 2011

सांगू तरी कोणापाशी

सरलं दळण
माही भरली ओंजळ
सोन्याची तुळस
वर मोत्याची मंजूळ

सरलं दळण
मी ते आनिक घेणार
देवा विठ्ठ्लाची
मले पालखी येणार

जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
शेवटला भास
मन फिरते आकाशी

गेला माहा जीव
मले भीतीशी कुटवा
सोन्याचं पिंपळपान
माह्या माहेरी पाठवा


गेला माहा जीव
राया रडे खळाखळा
लग्नाचा जोडा
न्हाई मिळत येळोयेळा

गेला माहा जीव
नका करू संध्याकाळ
पोटच्या पोराची
थंड्या पान्याची आंगूळ

गेला माहा जीव
माह्या किरडीले साकळ्या
दिर लावी ओझा खांदे
राम चालू द्या मोकळा

शेवंतीचं बन या कार्यक्रमातलं हे शेवटचं गाणं आहे, माधुरी पुरंदरे ते प्रभावीपणे सादर करतात. हे जात्यावरचं गाणं आहे. 
एक सासुरवाशीण आपलं मन मोकळं करते आहे. कदाचित जातं ओढायला सोबतीण आहे, बहुदा नाही.
सकाळी लवकर उठून रोजचं दळण दळायचं.
... सकाळी सकाळीच ती आपल्या मरणाचं स्वप्न पाहते आहे. तो सगळा प्रसंग ती डोळ्यासमोर उभा करते....
पहिल्यांदा अंगावर शहारे येतात ते , 

गेला माहा जीव
नका करू संध्याकाळ
पोटच्या पोराची
थंड्या पान्याची आंगूळ

हे ऎकून / वाचून....
...
सगळंच तर ती स्पष्टपणाने सांगते आहे.
......

पुन्हा पुन्हा वाचताना मी थबकले ...

जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
मला वाटलं या शोकांतिकेचं मूळ या ओळींमधे तर नाही?

समाजाच्या चाकोर्‍या, रूढी, परंपरा माणसांना काचत असतात, त्या मोडता येतील इतके बळ सामान्य सासुरवाशीणीत कुठून असणार?
तिने सहन करत राहणे एवढेच अपेक्षित आहे. 
माहेर नुसते नावालाच. सासर घरी माप ओलांडून आल्यावर त्या घरातून बाहेर पडायचे ते तिरडीवरूनच.
हे काहीही एक बाई बदलू शकत नाही. मुळात तिच्यात काही मानसिक बळ असावं असं तिला वाढवलंच जात नाही.
हे स्वीकारू या.
पण तिचा त्रास, जाच तिने बोलून दाखवावा, मनमोकळं करावं असं तरी कुणी हवं ना?
......
जिवाले जड झालं
सांगू तरी कोणापाशी
अशी एखादी सखी असती तर कदाचित सहन करायची ताकद मिळाली असती.
~~~
काय केलं असेल तिने? एखादा आड, विहिर जवळ केली असेल??
जीव तिच्यात गुंतून राहतो.

..................

आजच्या आपल्या समाजातही ’सहनही करायचं आणि बोलायचंही नाही’  असं आहे.
ते बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
निदान बोलायला तरी हवं.

....................

Thursday, March 31, 2011

वाजत गाजत


काल भारत पाकिस्तान उपान्त्य फेरीचा सामना संपल्यानंतर बाहेर पडलो. भारताने सामना जिंकल्याने खुशीत होतो, त्यासंबंधी बोलत होतो. दवाखान्यात जायचे होते.रात्रीचे साडेअकरा वाजले होते. पौड रस्त्यावर आलो तर नुसती गर्दी, अडकलो. सगळ्यांनी कुठे कुठे एकत्र मॅच पाहिली असणार... घरी परतत असणार. समोर चौकात काही तरूण मुलं मुली एकत्र जमून आनंद साजरा करत असणार.... साहजिक आहे.... वा! मुलांबरोबर मुलीही दिसताहेत. ट्रॅफिक जॅम मधे अडकलो तरी आजूबाजूचे चेहरे आनंदी दिसत होते. पाच मिनिटे ... दहा मिनिटे झाली..... इंचाइंचाने पुढे सरकत होतो. चौकाच्या जसजसे जवळ येत होतो तसतसे उत्साह अतिरेकी दिसायला लागला. बाजूला काही दारूच्या बाटल्या फुटलेल्या दिसल्या, पुढे मुले दारू पित होती. झुलत होती, बाटल्या हातात दिसत होत्या. ओरडत होती, एकमेकांना टाळ्या देत होती, मिठ्या मारत होती. एका बाईकवर तीन तीन जण, काही मुलांनी शर्ट काढलेले होते. या सगळ्यांनी  उन्मादी अवस्थेत जावं असं झालं होतं तरी काय?
 भारत - पाकिस्तान सामन्यात भारत जिंकायची शक्यता अधिक होती. ते ही बाजूला ठेवू पारंपारीक प्रतिस्पर्धी म्हणून जिंकल्याचा अधिक आनंद, ठीक आहे.... पण इतका??
 माध्यमे भस्मासुरासारखी आहेत. त्यांना सतत बातम्या लागतात. वाचणारे , पाहणारे त्यात वाहून जातात. माध्यमांनी ही गोष्ट इतकी टोकाची करण्याची जबाबदारी उचलली पाहिजे.
 भारत हरण्याची शक्यता होतीच ना? जर हरलो असतो तर या मुलांनी काय केलं असतं? तोड्फोड, नासधूस? जिंकण्याचा अतिरेकी आनंद तर हरण्याची अतिरेकी निराशा.
 एखादी गोष्ट तुम्ही जितक्या अभिमानाची करून ठेवाल तितकी ती घडली नाही तर शरमेची होऊन बसते.
*******
 हॉस्पीटलमधे पोचलो तर तिथेही बरेच लोक. दोन मुलांना लागले होते कारण ते जोरात गाडी चालवताना पडले होते. एक मुलगी अशीच बाईकवरून पडली म्हणून. एक गाडीवरून पडलेला तरूण रक्तबंबाळ होऊन आला, चालू शकत नव्हता आम्ही त्याला वाट करून दिली. तिथला कर्मचारी म्हणाला ” आज मॅचमुळे फार गर्दी आहे.” दोघे तिघे बाहेर पट्ट्या बांधून बसले होते.
 निघताना दोन तरूण म्हणाले,” तुम्ही हे इंजेक्शन दिलं आहे, त्यावर ड्रिंक्स घेतली तर चालतील का?”
डॉक्टर म्हणाले, ” नाही त्याचे साईड इफेक्टस होतील.”
” आज मॅच जिंकली, आज तर घेतलीच पाहिजे, काही झालं तर तुम्ही आहातच.”

*******
साखरपुडा खूप लोकांना बोलावून, खूप खर्च करून, वाजत गाजत केला जातो. त्यानंतर जर मुलाला / मुलीला आपण एकमेकांसाठी योग्य नाही असं लक्षात आलं तरी लग्न टाळता येणं फारच अवघड होऊन बसतं
 त्यापेक्षा साध्या पद्धतीने घरातल्या घरात, आपण एकमेकांना जाणून घेत आहोत हे ध्यानात ठेऊन, परतीची वाट असू शकते ही जाणीव दोन्ही बाजूंनी ठेऊन केला तर?
 पुढे अयशस्वी होणारी काही लग्ने टाळता येऊ शकतील.
********

Monday, March 14, 2011

स्त्रिया ..... दुय्यम


यावर्षीच्या नवलच्या दिवाळीअंकात वंदना भागवत यांनी हिटलर छळ छावण्यातून वाचलेल्या लोकांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचा लिंगभाव परिप्रेक्ष्यातून केलेला अभ्यास अनुवादित केला आहे.
त्यातल्या स्त्रिया लढत राहतात. का बरं?

स्त्रिया प्रतिकूल परीस्थितीतही जीवटपणे चिवटपणे लढत राहतात. जेव्हा पुरूष हरतात, नाउमेद होतात, सगळं सोडून देतात तेव्हाही स्त्रिया प्रयत्न करत राहतात. हे त्यांच्यात कुठून येत असणार??
 स्त्रियांच्या वाढवण्यात याची मुळं असावीत. वर्षानुवर्षे असंच जगल्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या जीन्समधेही असतील.
 स्त्रियांना सोसण्याची सवय असते. त्यांना दुय्यम असण्याची सवय असते. त्यांना डावललं जातं, त्यांचा अपमान केला जातो, हसत हसत त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यांच्याकडे वस्तू म्हणून पाहिलं जातं, त्यांचं शरीर दुसर्‍या कुणाच्यातरी वापरासाठी आहे, त्यांना कळलेलं असतं, गोषात राहायचं तरी पुरूषांसाठी, सजायचं तरी पुरूषांसाठी, त्यांच्याकडे सतत संशयाने पाहिलं जातं मग ते अध्यात्मात असो, साहित्यात असो की इतर कलांमधे असो, त्यांना निरर्थक कामे करत राहण्याची सवय असते, त्यांना वाट पाहण्याची सवय असते, आयुष्याकडून त्या फारशा अपेक्षा ठेवत नाहीत, त्या स्वत:साठी नाही तर दुसर्‍या कुणाकुणासाठी जगत असतात.
 कसोटीची वेळ येते तेव्हा त्यांना मरायला बाहेर पाठवलं जातं. शौर्याचं, अभिमानाचं, सैनिकी मरण मरायला पुरूष तयार असतात, पण अपमानाचं लाजिरवाणं मरण मरायला स्त्रियांना पुढे केलं जातं.
 सगळे पुरुषी समजले जाणारे गुण हे पहिल्या रांगेतले ठरवलेले आहेत.
स्त्रियांचं मात्र जगणं दुय्यम, मरणं दुय्यम, लढणं दुय्यम.

*********

या जगात ज्या स्त्रियांनी दुय्यम असणं स्विकारलंय त्यांना सोपं आहे, ज्यांना त्या दुय्यम आहेत हेच माहीत नाही त्यांच्यासाठी सोपं आहे, .... ज्या हे स्विकारत नाहीत, व्यवस्थेला सतत प्रश्न विचारत असतात, त्यांचं काही खरं नाही, .........
त्यांचीही समाजाने काळजी करायला नको, शेवटी त्या स्त्रिया आहेत....
 स्त्रियांना सोसण्याची सवय असते.

*********



Tuesday, March 1, 2011

छोट्या छोट्या गोष्टी..........३

सकाळी उठल्यापासून पांघरुणाची घडी घालणे,आंघोळीचे कपडे काढून ठेवणे,बेडवर आंघोळीनंतरचा त्याने तसाच फेकलेला टॉवेल उचलणे,घरातली घालायची शॉर्ट अशीच कोठेतरी भिरकावलेली ती उचलणे, ऑफीसला जातानाचे म्हणून इस्त्रीचे पॅन्ट,शर्ट,रुमाल,आदल्या दिवशी घातलेल्या पॅन्टमधून खिशातले सामान बाहेर काढून ठेवणे.वेळ इकडची तिकडे न होता वेळेवर नाष्टा तयार असणे,त्या शेजारी पाणी पिण्याचा ग्लास ठेवणे, त्यानंतर त्यांनी खाल्लेल उचलून ठेवणे, खाऊन झाल्यावर म्हणून सुपारीचा डबा समोर ठेवणे, घरातील इस्त्री करायचे असलेले कपडे इस्त्रीला ती आपलीच जबाबदारी आहे. ( कारण आता त्या गोष्टी आठवल्या की माझ्या बावळटपणाचे हासू येते.) एखादी अमूक एक पॅन्ट, कींवा शर्ट नसेल तर त्यावरुन तेव्हा कौस्तुभ भडकायचा. आणि त्याक्षणी अनेकवेळा लॉन्ड्रीवाल्याकडे त्याने मला पळवले आहे. त्याचे हे भडकणे टाळण्यासाठी म्हणा कींवा त्यापासून मला होणार असलेल्या मानसिक त्रास टाळण्यासाठी त्याची ही प्रत्येक कामे दबावाखाली ( खरतर तेव्हा ही ती त्याने स्वत:च करणे अपेक्षित होते तरीही )लग्नानंतरची सुरवातीची काही वर्षे मी चोख बजावत असे. खरतर मनात अनेकदा त्या कृतीबद्दल राग यायचा पण आईंपुढे विरोध करण्याची धमक त्यावेळी माझ्यात नव्हती.कारण एकत्र कुटुंबपद्धती.........याविषयी कधीही कौस्तुभकडे तक्रार न करता बिंनडोकासारखी ही कामे करत राहीले. खरतर तेव्हाही त्याच त्याला आपणहून कळावे अशी अपेक्षा मी ठेवत होते.
आता चित्र खूप बदलले आहे.यातील बरीचशी कामे आणि त्याबरोबरच माझी काही कामे (वैयक्तिक माझी नव्हे.आम्हा दोघांची सामाईक असलेल्या कामांपैकी काही कामात कौस्तुभचा सहभाग वाढला आहे.
तसे पाहीले तर बारीक बारीक खूप गोष्टी आहेत की त्याचा जर विचार केला तर त्रासच होणार आहे. जश्या पुरुषांच्या वागण्यात आहेत तश्या त्या आपल्याही वागण्यात आहेतच.नातं बरोबरीचे असेल व कामातील सहभाग बरोबरीने असला तर त्या गोष्टींचा त्रास होणार नाही.यात फरक पडला की मनस्ताप होतो.

Monday, February 28, 2011

छोट्या छोट्या गोष्टी - २


असंख्य छोट्या छोट्या गोष्टी आपण सोडून देतो, द्यायला हव्यात. निदान त्याची जाणीव तरी आपल्याला असते का?
त्या सोडाव्या लागणार आहेत हे आपण स्वीकारावं पण सोडतो आहोत याची जाणीव असावी.
लग्न झाल्यापासूनच बायको नवर्‍याची सगळी कामे आपल्याकडे घेते. साधी कपडे नीटनेटके ठेवण्यापासून, गावाला जाण्याची तयारी, जमतील ती बाहेरची कामे, एखाद्या कुशल व्यवस्थापकासारखी! हे आपण का करतो? नवर्‍याशी आपले काय नाते असते? कसे असावे अशी आपली अपेक्षा असते?
   लग्नाच्या थोडसं आधी मिलिन्दने मला विचारले होते,’कंपनीच्या एका योजनेअंतर्गत काही घरगुती वापराच्या वस्तू घेण्यासाठी निवडायच्या आहेत, त्यात इस्त्री घ्यायची का?’ मी म्हणाले,” मला करायला जमणार नाही, तू वापरणार असशील तर घे.” मला माझ्या कपड्यांना इस्त्री लागतेच असे नाही. त्याचे तो बघेल.
 लग्नानंतर मिलिन्दची रजा संपली, आम्ही पुण्याला आलो, मिलिन्दने त्याचे कपडे धुवायला भिजत घातले, बरेच होते, दोन-तीन बादल्या. भिजल्यावर त्याने धुवायला सुरूवात केली. मी वाचत होते, एकटाच कपडे धुतोय म्हणून उठून बाथरूमच्या दाराशी जाऊन त्याच्याशी गप्पा मारत उभी राहिले, मला त्याला मदत करावीशी वाटली नाही, असं नाही, का करायची? तेंव्हा मी फार टोकदार होते. घर म्हणजे वसतिगृह नाही, नवरा बायको म्हणजे रूममेटस नाहीत. तरी ज्याची कामे त्याने करावीत हेच बरं. शेवटी वाळत घालायला मी मदत केली, मग दोघेही बाहेरच्या खोलीत येऊन गप्पा मारत बसलो. मिलिन्दने एका शब्दानेही किंवा कृतीतून मी त्याला मदत केली पाहिजे असं सुचवलं नाही.
 माझ्याजागी मिलिन्द असता तर( किंवा उलट) चा खेळ खेळायचा झाला तर मी कपडे धूत असताना वाचन सोडून माझ्याशी गप्पा मारायला नक्कीच आला नसता.
 नंतर नंतर हा काटेकोरपणा गेला, आमच्यातली हद्द्देखील पुसली गेली. मी घर सांभाळणे एव्हढंच करत बसले, तरी
छोट्या छोट्या गोष्टी करताना/ सोडताना त्याचे अर्थ काय आहेत हे माझ्या डोक्यात असतं.

काही वेळा छोट्या गोष्टींनी ’शितावरून भाताची परीक्षा’ करता येते.

नवर्‍याशी आपले नाते काय असते? कसे असावे अशी आपली अपेक्षा असते?
आपण लग्न कशासाठी करतो?
त्याची कामे करणे, त्याची सोय पाहणे म्हणजे प्रेम करणे आहे का?
आपल्याला त्याच्या ’पायाची दासी’ वगैरे व्हायचं नाहीये ना? ( तिथे पुष्कळ जागा आहे.) आपल्याला जर सोबत हवी आहे आणि द्यायची आहे तर तो मार्ग हा नाही.
आपल्याला लग्नाच्या नात्यात मैत्री हवी असेल तर नातं बरोबरीचं असायला हवं.
छोट्या छोट्या गोष्टी करताना किंवा सोडून देताना आपल्यातलं नातं बरोबरीचं आहे याची खोल जाणीव दोघांनांही असायला हवी.


*****

Tuesday, February 15, 2011

छोट्या छोट्या गोष्टी


दीपाकडे ’मुद्गल शंभर’ कार्यक्रमाला जमलो होतो तेव्हाची गोष्ट. आनंद, कौस्तुभ, जगदीश आणि नीरज पानं आणायला गेले. राजू थांबला होता, सचिन ’फोनवर’, खाली गेलेला. आमच्या जरा गप्पा झाल्या, हिशोब झाले. मी उठले आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसले. नेहमी पुरूषांनीच का बसायचं इथे? आज आपण बायका मुख्य स्थानावर बसूया. अश्विनी वेदात्मनला घेऊन माझ्या शेजारी येऊन बसली. वेदात्मन झोपला होता. ती म्हणाली, ”खरंच यांच्या घरी मी कधीच इथे बसलेली नाही.” शेजारच्या खुर्चीवर आशा येऊन बसली. डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीत वैशाली बसली. वीणा आमच्या सोफ्याला टेकून बसली. स्मिता समोर झोपाळ्याच्या खुर्चीत बसली. दीपा आत होती. मिलिन्द आला, राजूच्या बाजूला बसला , तिकडच्या सोफ्यावर राजू बसला होता. आम्ही पानॆ आणणारांची ( पानांची नव्हे) वाट पाहू लागलो. बघू आल्यावर काय करतात ते! .... ते आले तेंव्हा त्यांच्या नेहमीच्या जागा भरलेल्या होत्या. नेमकी तेव्हाच वैशाली वेदात्मनला पांघरूण आणण्यासाठी आत गेली होती. तिच्या खुर्चीवर कौस्तुभ बसला, जगदीश टेरेसवर गेला, नीरज मुलांच्या खोलीकडे गेला. आनंद सर्वांना पाने देऊ लागला... जागा नाही म्हंटल्यावर पहिल्यांदा आनंद सेटल झाला, खाली बसला, नीरज येऊन खाली बसला. कौस्तुभ कागद आणायला उठला तेंव्हा मी वैशालीला खूण केली, त्या खुर्चीत येऊन बस, ती पोचण्यापूर्वीच कौस्तुभ येऊन खुर्चीत बसला. मग ती वीणाशेजारी बसली. त्यानंतर जगदीश येऊन बसला.
 जर आम्ही सगळ्या खाली बसलेल्या असतो तर या पुरूषांनी पटापट त्यांच्या नेहमीच्या जागा घेतल्या असत्या. त्या रिकाम्या नाहीत म्हंटल्यावर कुठे बसावे त्यांना सुचेना.
 इथे काही मानपानाचा प्रश्न नाही, आपण आपल्या गटात किती मोकळेपणाने आणि सहजतेने वावरतो! तरी रुजलेल्या काही गोष्टी आहेतच.

आपल्या घरांमधल्या मोक्याच्या, प्रशस्त जागा या पुरूषांसाठी राखीव असतात. तुम्ही बघा, तुमच्या घरात असं आहे की नाही?
पुरूषांच्या अनुपस्थितीत घरातल्या बायका तिथे बसतात किंवा बसत नाहीत.
 आमच्याकडेही आजोबा आले की कुठे बसतात, आज्या कुठे बसतात हे ठरलेले आहे.
लक्षात घ्या कुणी ठरवलेले नाही, ते ठरलेले असतेच. वाढवण्यातल्या ज्या अनेक गोष्टी असतात त्यातली एक ही आहे.
कुठे बसायचं, कसं बसायचं, हे इतकं मुरवलेलं असतं ना आमच्यात. आम्हीही झापडबंद पद्धतीने हे नियम पाळतो. ( आणि पुरूषांचं तरी काय वेगळं आहे? )
****

विचार करायचा ठरवला तर इतक्या गोष्टी आहेत, दमायला होतं.

****

Friday, January 28, 2011

खरं बोलणं... सांगणं... ऎकणं


खरं बोलणं हा नातेसंबंधांचा पाया आहे. नाती जितकी जवळची  असतील तितकं आपण अधिक खरं बोलतो. पूर्ण खरं बोलतायेण्याजोगी काही नाती आपल्याला असली पाहिजेत. नाहीतर आपण धुक्यातलं काहीतरी बोलत बसतो आणि तेच खरं आहे असं समजून चालतो. नंतर (की आधीपासूनच) खरं काय ते शोधणंही सोडून देतो.
 खर्‍याच्या प्रत्येकाच्या व्याख्याही वेगवेगळ्या असतात. त्यामुळे आपण खरं बोललो तरी ऎकणारे वेगळाच अर्थ लावतात. त्यांना पूर्ण खरं ऎकायची सवयच नसते ना? कधी कधी मी माझ्या थेट खर्‍याचा अर्थ समजावून सांगते आणि याचा अर्थ हाच + एव्हढाच आहे असंही सांगते.
 दूरच्या माणसांशीही शक्यतो खरंच बोलावं असा माझा प्रयत्न असतो. खरं पचणार नाही असं वाटलं तर मी बोलायचं टाळते पण शक्यतो खोटं बोलत नाही.
 आपल्या समाजात सगळीकडे खोटं बोलणं, खोटं वागणं, खोटं कौतुक , खोटी सभ्यता असं सुरू आहे. तुम्हांला ही नाटकं करायचा कंटाळा नाही येत?
मला येतो. म्हणजे मी ती करत नाही असं नाही. पण कुणाशीतरी खरं बोलून पहा, इतकं मोकळं छान वाटतं.
समाजात बदल करता येणं आपल्याला शक्य आहे का? नाही. पण आपल्या आजूबाजूचा परीसर स्वच्छ करायला काय हरकत आहे?
आपल्या जवळच्या व्यक्तींपुरतं साधं, स्वच्छ, सरळ आणि खरं जगून पाहूया.
खरं बोलणं म्हणजे स्वत: स्वत:ला स्वीकारणं आहे.
***
माझ्या बहीणीकडे एक कौटूंबिक प्रश्न निर्माण झाला. मी त्यात पडले. तिथे घरात कोणीही कोणाशीही खरं बोलत नव्हतं. ते लोक स्वत:शीही खरं बोलत नव्हते. मी माझ्या भाचीला म्हणाले,” पहिल्यांदा आपण हे ठरवून टाकूया की मी तुझ्याशी खरंच बोलेन आणि तुही काही झालं तरी माझ्याशी खरंच बोलशील.” बहीणीशीही हेच बोलले, पुढे त्या दोघींनीही तसं ठरवलं. यामुळे एकमेकांबद्दलचे गैरसमज कमी व्हायला मदत झाली. घरात संवाद सुरू झाला.
***
घरात नवरा- बायकोने एकमेकांशी खरं बोललं पाहिजे. म्हणजे आपण खोटं बोलत असतो का? तर नाही. ”खरं” म्हणजे काय खरं आहे ते शोधून बोललं पाहिजे. बर्‍याच जणांना/ जणींना स्वत:शीही खरं बोलायची सवय नसते. अशी मंडळी स्वत:कडेही समाजाच्या नजरेतूनच बघतात.
पण काही प्रश्न आहेत...
मिलिन्दशी सगळंच बोलत राहणं आणि खरं बोलत राहणं , त्याला न आवडणारंही बोलत राहणं ही माझीच गरज होऊन बसली होती/ आहे.
स्वत: त्यांचं काही सांगणं ही त्याची गरज नाही आणि ऎकणं ही सुद्धा! दीड-दोन वर्षांपूर्वी मी त्याला सांगीतलं... मी तुला सगळंच सांगत बसणार नाही. तू विचारलंस तरच सांगेन. क्वचित तो विचारतो, बहुतेकदा विचारतच नाही.
 माझा समज होता सगळं सांगून मी त्याला माझ्या जगण्यात सहभागी करून घेते. खरंच आहे ते!
माझा बहुदा ओव्हरडोस होत असणार आता मी त्याला आवश्यक वाटेल, वेळ असेल तेवढंच सांगते.
नवरा - बायकोत तो म्हणतो असायला हवं ते अंतर हे असेल.
***
काही वेळा नेमकं बोलता येणं, खरं शोधता येणं... अशी कौशल्ये नसतील तर काय करायचं?
बोललेलं समजून घेता आलं नाही तर?
मला माहीत नाही.
***
आपल्या आई-वडिलांशी चांगले संबंध असणं ही एक समाधानाची बाब असते.
त्यांनाही आवश्यक ते सगळं सांगीतलं पाहिजे. परवानगी मागायची असे नाही.
असं सांगणं म्हणजे त्यांनाही आपल्या आयुष्यात स्थान देणं असतं.
***
कुणाशीही मनापासून बोलणं, सांगणं म्हणजे आपल्या जगण्यात त्याला/ तिला सहभागी करून घेणं, सोबती बनवणं असतं.
****

Tuesday, January 25, 2011

सासू-सून- मुलगा....माझा विचार

मूळात कोणतीही दोन माणसे.... त्यांचे विचार वेगळे,जगण्याची उद्दीष्टे वेगळी,पद्धती वेगळ्या,आवडी-निवडी वेगळ्या.हे आपण जर समजावून घेत असू तर आपली अपेक्षा अशी असते की समोरच्याने पण तसाच आपल्या सारखा विचार करावा. आणि यामध्ये फरक पडत असेल तर मतभेद, वादविवाद यांना सुरुवात होते. मग ते नातं कोणतही असो.भाऊ- बहीण, आई-मुलगी, नणंद-भावजय,सासू-सून,नवरा-बायको आणि अशी अनेक. पण या सगळ्यांमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात सासू- सून हे नात जास्त डोक्यात जातं. मला वाटतं की यामागची कारणं सुद्धा शोधली पाहीजेत. तसा विचार करायला हवा.
नणंद-भावजय.........
आमच्याकडे कौस्तुभला सख्खी बहीण नाही. त्यामुळे नणंद या नात्यापासून मी वाचले. असे म्हणते कारण माझ्या आईच्या आणि माझ्या आत्त्याच्या नात्याच्या आठवणींनी त्या नात्यातील अनुभवाने मी जेव्हा लग्नाला उभी राहीले तेव्हाच आई- बाबांना माझी एक अट घातली की मला एकवेळ दोन-चार दिर असतील तर चालतील पण नणंद नको.नणंद-भावजय या नात्याचीच डोक्यात तिडीक बसली होती. आता तुम्ही म्हणाल की मी कोणाची तरी नणंद आहेच. नक्कीच आहे. आता मलाही भावजय आहे. पण मागील पीढीचा हा अनुभव पाहून त्यानुसार आमच्या दोघींचे नाते जास्तीत जास्त कसे चांगले राहील यासाठीचे वागणे माझ्या हातात आहे.ती नोकरी करते.भावाचे लग्न झाले तसे आईला- बाबांना बसून समजावून सांगितले की आता उटसूट माहेरी येणे,किंवा माहेरच्या कोणत्याही निर्णयात माझे मत ग्राह्य धरणे चुकीचे आहे.ती नव्याने घरात आली आहे तुमच्या चौघांच्या एकमेकांतील नात्याने हे घर फुलूद्यात.त्या आनंदात आम्ही नक्कीच तुमच्या बरोबर आहोत.आणि हे माझ्या आईनेही चांगल्या रीतीने स्विकारले आहे. आणि यामुळेच भावजयीला जर का एखाद्याचे वागणे मग ते माझ्या भावाबद्दल असो, कींवा आई-बाबांच्या बद्दल असो तिचा हक्काने मला फोन येतो आणि यात कोठेही तक्रारीचा सूर नसतो व तो प्रॉब्लेम चुटकीसरशी सामज्यस्याने सोडवला जातो. समजावून घेऊन कोणत्याही नात्याला कोणत्याही नात्याशी मोकळेपणाने एखादी अडचण मांडता यावी असे नाते असावे असे मला मनापासून वाटते.
सासू-मुलगा-सून...........
या नात्यातही रोज छोट्या-छोट्या कारणांवरुन वाद हे होणारच आहेत. सुरवातीला माझं प्रचंड डोकं फीरायचं.आणि त्यातून माझा स्वभाव हा कोणाही बद्दल काही तक्रार न सांगण्याचा. त्यामुळे या स्वभावाने मी मला स्वत:ला आतल्या आत खूपच त्रास करुन घेत असे.माझा चेहराच बघून खूपदा कौस्तुभ मला विचारत असे की काय झालं पण मी त्याला म्हणत होते की तुझ्या पर्यंत काही नाही. याचा अर्थच असा की जरी सासूचे वागणे आपल्याला खटकणारे असले तरी आपण ज्याच्याकडे तिच्याविषयीची तक्रार करणार आहे तो आपला नवरा असण्या आधी तिचा मुलगा आहे.कोणत्याही मुलाला त्याच्या आईविषयी तक्रार ऎकून घेणे हे अपमानास्पद वाटते. रहाता राहीला प्रश्न कोण चूक कोण बरोबर. आणि त्याने कोणाची बाजू घ्यायची.खरंतर सासू-सून वादातील पूर्ण प्रसंग घडताना तो नवरा म्हणजेच सासूचा मुलगा हा त्या प्रसंगाला हजर असणे आणि तो हजर नसताना घडून गेलेल्या वादावर दोघींच्या बाबतीत योग्य निर्णयाने वागणे यात फरक आहे.कारण प्रत्येकजण आपण बरोबर या धारणेने त्या मूलाच्या म्हणजेच नव-याच्या पुढे आपली बाजू मांडत असतो.अश्यावेळी आपल्या भोवतालची परीस्थिती जर वर्षानुवर्षे तशीच रहाणार आहे तर अश्या माणसांचा, अश्या परीस्थितीचा त्रास करुन न घेता त्याने योग्य निर्णय घेणे.हे मला महत्वाचे वाटते.आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे आपण नवरा- बायको म्हणून जेव्हा दोघेच असतो तो पर्यंत काही नाही. पण जेव्हा मुलं होतात तेव्हा त्यांच्यापुढे, संपूर्ण घराचे मनस्वास्थ्य संभाळणे गरजेचे आहे असे वाटते.
पूर्वी यातलं मला काहीच जमत नव्हतं यातून काय मार्ग काढावा काहीच सुचत नव्हते. याचा परीणाम कौस्तुभवर सतत चिडचिड होत होती.पण एक दिवस शांत बसून विचार केला व त्यातून मार्ग सापडला.आपल्या स्वत:च्या स्वास्थ्यासाठी, आपल्या मुलांसाठी, त्यांचे बालपण आनंददायी रहाण्यासाठी, घर हसतं रहाण्यासाठी, प्रत्येक नात्यातील काही खटकणा-या गोष्टीं नक्की सोडून देऊयात.

Saturday, January 15, 2011

सासू - सून - मुलगा / नवरा - २

काही खर्‍या गोष्टी लक्षात घेतल्या, परीस्थितीकडे स्वच्छपणे पाहता आलं तर गुंते कमी होण्याची शक्यता असते.

१) सासूबाईंना आई म्हणायची पद्धत पडलेली असली तरी ती आई असू शकत नाही. इतक्या सहज कुणालाही आई होता आले तर ’आईपण’ ते काय राहिले? ती नंणंदेला झुकतं माप देणार, त्यावरून त्रागा करायचं काय कारण? मुलीला एक ड्रेस की सुनेला एक ड्रेस ही समान वागणूक नसते, ते दाखवणं असतं. आई आहे नां ती? नणंदेला तिने बावीस- तेवीस वर्षे वाढवलं आहे, त्या दोघींत घट्ट नातं असणारच. आपण त्यात पडायचं काय कारण?
 मलातरी माझ्या आईने मला झुकतं माप दिलेलं आवडणार आहे, मी जर तिला तिच्या सुनेसारखीच झाले तर मी दुखावली जाईल. ड्रेसची नि बांगड्यांची वाटणी शक्य आहे, प्रेमाचे काय? ( ते मुलीवरच जास्त असणार हे मान्य केल्यावर, इतर गोष्टींचं काय एवढं?)

२) सासू नणंदेची ’आई’ आहे तशी नवर्‍याची ’आई’ आहेच नां? ती त्याच्यावर हक्क सांगणारच आहे. आपलं मुलाने ऎकावं असं तिला वाटणारच आहे. मुलाचं लग्न झाल्यामुळे तिला जरा असुरक्षितता आली असेल, तिचे मेनापॉज चे दिवस असतील, समजून घेऊया तिला. तिने एकाहाती आजवर घर चालवत आणले असेल.... असतील काही कारणं आणखीही... पहिल्यांदा समजूनच घेऊ यात.
 म्हणजे अन्याय सहन करायचा असे नाही. ज्या तडजोडी शक्य नाहीत तिथे ठामच राहायचं, पण वाद चिघळू द्यायचे नाहीत. स्पष्टपणे, शांतपणे आपलं म्हणणं सांगायचं आणि त्याप्रमाणे वागायचं.

३) आपल्या घरात आपल्याला काय हवं आहे, कसं वातावरण.. ते एकदा नवर्‍याबरोबर बसून नीट ठरवायला हवं. प्रत्येक घराचे आपापले नियम असतात, घर त्या नियमांवर चालत असतं. एकदा नियम ठरवले की सगळ्यांसाठी ते सारखे आहेत.

४) नवर्‍याला आपणहून काही कळेल याची वाट पाहू नये, त्याला (आपल्याला) नक्की काय खुपतंय ते स्पष्टपणे सांगीतलं पाहिजे, त्याआधी ते आपल्याला शोधता आलं पाहिजे.

५) काही गोष्टी स्विकारण्यावाचून गत्यंतर नसते, त्या स्विकाराव्या लागल्या याचा त्रास करून घेऊ नये. नवर्‍यालाही काही बाबी अपरीहार्यपणे स्विकाराव्या लागलेल्या असतात.

६) आपण परीपूर्ण (परफेक्ट) नाही हे मान्य करावं. तसं कुणी नसतंच. सासू आणि नवरा हे ही परीपूर्ण असणं शक्य नाही, तेही चुकू शकतात.

७) सासू / नवरा  यांच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, त्या सांगाव्यात, (सगळ्याच पूर्ण होणार नसतात.) त्यांच्या काय अपेक्षा आहेत, त्यातल्या कुठल्या आपल्याला पूर्ण करता येणार नाहीत / का करता येणार नाहीत याची कल्पना द्यावी.

८) घराचं मनस्वास्थ्य सगळ्यात महत्त्वाचं आहे पण त्यासाठी आपलं स्वातंत्र्य विकायला काढू नये. आपण घर, नवरा, मुलं यांना प्राधान्य देत असलो तरी स्वत:साठी जगणं विसरू नये. (स्वत:च्या मनस्वास्थ्यासाठी ते गरजेचं आहे.)

यांपैकी काही गोष्टी मला जमतात. काहींसाठी प्रयत्न करते आहे.

माझ्या अनुभवाबाहेरचे, तुम्हांला आस्था असणारे काही मुद्दे राहून गेले असतील. तुम्ही भर घालू शकाल.

------------------------------------

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...