यावर्षीच्या नवलच्या दिवाळीअंकात वंदना भागवत यांनी हिटलर छळ छावण्यातून वाचलेल्या लोकांच्या अनुभवांवर आधारित पुस्तकाचा लिंगभाव परिप्रेक्ष्यातून केलेला अभ्यास अनुवादित केला आहे.
त्यातल्या स्त्रिया लढत राहतात. का बरं?
स्त्रिया प्रतिकूल परीस्थितीतही जीवटपणे चिवटपणे लढत राहतात. जेव्हा पुरूष हरतात, नाउमेद होतात, सगळं सोडून देतात तेव्हाही स्त्रिया प्रयत्न करत राहतात. हे त्यांच्यात कुठून येत असणार??
स्त्रियांच्या वाढवण्यात याची मुळं असावीत. वर्षानुवर्षे असंच जगल्यामुळे काही प्रमाणात त्यांच्या जीन्समधेही असतील.
स्त्रियांना सोसण्याची सवय असते. त्यांना दुय्यम असण्याची सवय असते. त्यांना डावललं जातं, त्यांचा अपमान केला जातो, हसत हसत त्यांची खिल्ली उडवली जाते. त्यांच्याकडे वस्तू म्हणून पाहिलं जातं, त्यांचं शरीर दुसर्या कुणाच्यातरी वापरासाठी आहे, त्यांना कळलेलं असतं, गोषात राहायचं तरी पुरूषांसाठी, सजायचं तरी पुरूषांसाठी, त्यांच्याकडे सतत संशयाने पाहिलं जातं मग ते अध्यात्मात असो, साहित्यात असो की इतर कलांमधे असो, त्यांना निरर्थक कामे करत राहण्याची सवय असते, त्यांना वाट पाहण्याची सवय असते, आयुष्याकडून त्या फारशा अपेक्षा ठेवत नाहीत, त्या स्वत:साठी नाही तर दुसर्या कुणाकुणासाठी जगत असतात.
कसोटीची वेळ येते तेव्हा त्यांना मरायला बाहेर पाठवलं जातं. शौर्याचं, अभिमानाचं, सैनिकी मरण मरायला पुरूष तयार असतात, पण अपमानाचं लाजिरवाणं मरण मरायला स्त्रियांना पुढे केलं जातं.
सगळे पुरुषी समजले जाणारे गुण हे पहिल्या रांगेतले ठरवलेले आहेत.
स्त्रियांचं मात्र जगणं दुय्यम, मरणं दुय्यम, लढणं दुय्यम.
*********
या जगात ज्या स्त्रियांनी दुय्यम असणं स्विकारलंय त्यांना सोपं आहे, ज्यांना त्या दुय्यम आहेत हेच माहीत नाही त्यांच्यासाठी सोपं आहे, .... ज्या हे स्विकारत नाहीत, व्यवस्थेला सतत प्रश्न विचारत असतात, त्यांचं काही खरं नाही, .........
त्यांचीही समाजाने काळजी करायला नको, शेवटी त्या स्त्रिया आहेत....
स्त्रियांना सोसण्याची सवय असते.
*********
मला हा वंदना भागवतांचा लेख वाचायला आवडेल.
ReplyDelete