Tuesday, August 16, 2011

भांडण - २


कौटुंबिक मतभेदांमधे ही बायकाबायकांमधली भांडणे आहेत, दोन बायकांचंच एकमेकींशी पटत नाही, अशा फटकार्‍याने ती बाजूला केली जातात. तसं नसतं. बायकांमधल्या वादाला पुरूषसत्ता नाहीतर/ आणि पुरूष कारणीभूत असतात.
पुरूषसत्ता कशी कारणीभूत असते?
पुरूषसत्तेची काही पायाभूत तत्वे आहेत, (त्यात पुरूषप्रधानता हे आहेच,) काही धारणा आहेत, काही उतरंडी आहेत.
उदा. लग्नानंतर मुलीने नवर्‍याच्या घरी राहायला जायचे,
मुलीचं घर कुठलं? जे तिच्या नवर्‍याचं घर ते तिचं घर.
इथे आपण हे मान्य करूया की समाजव्यवस्था चालायची तर त्याला काही चौकट आखावी लागेल, काही नियम लागतील, त्यात प्रत्येकाच्या स्वातंत्र्याचा संकोच होणार आहे.
जेव्हा सून लग्न होऊन घरात येते तेव्हा तिचं स्थान सर्वात खालचं असतं. म्हणजे सासूसासरे, नवरा, दीर, नणंदा, मग ती. हळूहळू या उतरंडीत ती वर चढत जाते...
स्वयंपाकघर हे असं क्षेत्र आहे, ज्यात सासू सून दोघी काम करत असतात. दोघींपैकी एकीला त्यात रस नसेल तर स्वयंपाकघरातले वाद कमी होतात. दोघींनी आपल्या कर्तृत्वाचं क्षेत्र तेच मानलेलं असेल तर अवघड होत जातं. त्यातून मार्ग काढता येतात/ काढले जातात. एकावेळी एकीने करायचं दुसर्‍यावेळी दुसरीने... एकमेकींच्या स्वैपाकात पडायचं नाही. असं ठरवूनच घ्यायचं.
प्रश्न असा येतो की .... आपला समज असा असतो की कौटुंबिक नाती ही भावनेवर आधारलेली असतात. त्यात इतक्या रूक्षपणे नियम ठरवत बसायचे?
मुळात आपण एक लक्षात घेऊ या की कौटुंबिक नाती ही केवळ प्रेमावर आधारीत नसतात त्यात खूप राजकारण असतं. नवरा - बायकोच्या नात्यातसुद्धा ओलावा टिकवणं म्हणजे एक कसरत असते, तिथे बाकीच्या नात्यांचं काय?
तर काय करावं?
मला असं वाटतं, प्रत्येक नात्याची घरात एक खुर्ची असते. तिचा आदर आपण केला पाहिजे. ती व्यक्ती आपल्याला आवडत नसेलही पण ती त्या खुर्चीत बसलेली आहे हे आपण विसरू नये.
 समजा मुक्ताच्या आजोबांचे आणि माझे मतभेद आहेत. तरी या घरातले ते ज्येष्ठ आहेत, त्यांना योग्य तो मान आणि आदर मिळालाच पाहिजे, त्याशिवायही मतभेद असू शकतात/ असतात.. त्याचं काय करायचं ते बघू या.
घरात कुणाला किती अधिकार आहेत? यावर मतभेद असतात.
भांडणांच्या मुळाशी आपण गेलो नाही तर वरवरच्या मलमपट्टीचा उपयोग होईलच असं नाही, मग घरातदेखील हसरा मुखवटा घालून वावरावे लागते, त्याचा ताण असतो.
हे माझं घर आहे. असं आपण जेव्हा म्हणतो तेव्हा माझं म्हणजे कुणाचं? माझं एकटीचं नाही ना!
या घरात मला कुठले हक्क आहेत? माझ्यावर कुठल्या जबाबदार्‍या आहेत? त्याप्रमाणेच घरातल्या इतर सदस्यांना कुठले हक्क आहेत आणि कुठल्या जबाबदार्‍या आहेत याची वर्तुळे निश्चित केलेली असली पाहिजेत.
बायकांना मन:शांती हवी असेल तर...
माझ्या घरात मला काय हवं आहे? माझ्या घरातल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत? नक्की कशाचा मला त्रास होतो? घरातलं काय मला बदलणं शक्य आहे? काय स्वीकारावं लागणार आहे? ... याचा विचार केलाच पाहिजे.
परीस्थिती पूर्णपणे बदलणं कुणालाच शक्य नसतं. थोडी बदलावता येते, थोडी स्वीकारावी लागते. त्यात जय पराजय काहीही नसतो.

*********

1 comment:

  1. आपण लहानाचे मोठे झालो ते एक आपल्या माहेरचं, आई- वडीलांचे घर . त्या घराच्या काही पद्धती,विचार,त्यात मिळणारा मोकळेपणा आणि इतर ब-याच काही गोष्टी यांचा आपल्या आयुष्यात व्यक्ती म्हणून घडण्यात खूप वाटा असतो. लग्नाआधी मी खूप मोकळ्या वातावरणात वाढले,मला माझी स्वत:ची काही एक मत होती आणि त्याप्रमाणे मी जगत आले. बाबांचा काही गोष्टींना विरोध होता. तो नाही पटला तरी ते घरातले मोठे म्हणून काही गोष्टी त्यांच्या मान्य नसूनही स्विकारल्या.पण त्या त्या वेळी तुमचं कसं चूक आणि मी कशी बरोबर असे वादही घातले. आपल्या माहेरच्या माणसांसाठी आपण जर हे करु शकतो तर जी नाती नव-यामुळे आपल्या लग्नानंतरच्या आयुष्यात शेवटपर्यंत निभावायची आहेत त्यांच्यासाठीही हे जमायला हवे.सुरुवातीला माझे आणि आईंचे अजिबात पटले नाही.पण कधीही त्यांच्याशी वाद नाही घेतला. नात्यात दुरावा येऊ नये म्हणून शांत बसून सहन करत होते.आज त्यांची एखादी गोष्ट नाही पटली तर मी समोरासमोर बसून त्यांना ती कशी बरोबर आहे हे पटवून देऊ शकते.तेच सासरच्या इतर मंडळींबाबत.सासू-सासरे,दीर-जावा मग ते मोठे असोत नाहीतर थाकटे.प्रत्येक नात्यापासून काहीना काही प्रकारचा त्रास होणारचं आहे. आपल्या सारखी समोरची व्यक्ती, तिची मतं नसणारचं आहेत हे जेव्हा आपण एकदा स्विकारतो तेव्हा त्या व्यक्तिपासून आपल्याला मनस्ताप होत नाही. विद्या तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. लग्न होऊन सासरच्या घरात आल्यावर आपला सून म्हणून खालचा नंबर असतो.एक एक पायरी वर चढून सगळ्यांना आपलंस करणं.किंवा मला काय हवं आहे? कुठल्या गोष्टी घरात चालणार आहेत?कुठल्या नाही?याप्रमाणे परीस्थिती थोडी बदलून तर काही वेळा परीस्थिती स्विकारुन घरातील आनंद टिकवता येतो.

    ReplyDelete

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...