Sunday, July 31, 2011

गोष्टी मुलींच्या - १माझ्या नंणंदेची एक मैत्रिण आहे, माहेश्वरी समाजातील. तालुक्याच्या गावची. लहानपणापासूनच हुशार. वर्गात पहिली असायची. COEP ला वसतिगृहात राहून अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं. नंतर एका चांगल्या कंपनीत, चांगल्या पगाराची नोकरी करत होती. दोन-तीन मुली घर घेऊन राहायच्या.
 आता लग्नाची वेळ आली आहे. घरच्यांनी स्थळे पाहायला सुरूवात केली आहे.
एकत्र कुटूंब आहे. आई दादाजीं समोर (सासर्‍यांसमोर) कधी जात नाही. घरात कोणीच नसेल तर घुंघट घेऊन कामापुरती, जेवायला वाढणे वगैरे, समोर जाते. लग्नाच्या वयाची मुलगी असलेली ही सून आहे, हे लक्षात घ्या. कुटूंबाचा काहीतरी एकत्रित व्यवसाय आहे.
 एकदा ती चार दिवसांची रजा काढून घरी आली. दादाजी म्हणाले, ” आता लग्न करायचं आहे, हीची नोकरी बास झाली, घरीच राहू दे.”
सगळ्यांना ते पटलं. तिला नोकरी सोडायला लावली. सध्या ती घरीच आहे. तिला फार घराबाहेर पडू देत नाहीत. ”सारखं काय लॅपटॉप आणि इंटरनेट?” त्यावर बंधने आली आहेत. कधी मैत्रिणीकडे आली की संगणकावरून इतरांशी संपर्क साधते.
 नवरा कसा मिळेल? माहीत नाही. त्याने जर नोकरी करू दिली तर ही करणार... नाहीतर नाही. नवरा हिच्या पसंतीने नाहीतर घरच्यांच्या पसंतीने ठरवला जाईल. शेवटी हिला विचारतील पण ऎकतीलच असं नाही.
 हिच्या पत्रिकेत मंगळ आहे, पत्रिका जुळणे अवघड, ती जुळल्याशिवाय पुढे जाणारच नाही. मंगळाची शांती करून घेत आहेत.
आईलाही वाटतं मुलीचं हे असंच असणार, असायला पाहिजे.

********

सगळ्या मैत्रिणींच्या गप्पा चाललेल्या.... असंच पुन्हाही कधीतरी आपण माहेरी येऊ तेव्हा भेटत राहू. ही म्हणाली, ” एकदा माझं लग्न होऊ दे, मी माहेरी येणारच नाही.”

*******
ही घराबाहेर राहिलेली मुलगी आहे, तिने जग पाहिलेलं आहे, स्वत: कमवायची धमक तिच्यात आहे.
आत्मविश्वास आहे का? तिच्यात लढण्याची बीजे आहेत का?
मला माहीत नाही.
तिला नवरा, सासरचे लोक कसे मिळतील?
काळजी वाटते.
तिची इच्छा नसताना तिला घराशी बांधून ठेवलं आहे.
समाज म्हणून आपण तिच्यासाठी काय करू शकतो?
काही नाही.

*******

No comments:

Post a Comment

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...