गावाहून आले की आमच्याकडे केबल/डीश नाही याचं मला फार बरं वाटतं.
बातम्या नकोत, चर्चा नकोत, मालिका नकोत..... काहीच नको.
गावाला असले की सगळ्यांबरोबर थोडाफार टीव्ही पाहिला जातोच.
मग मालिकांपेक्षा जाहिराती पाहाव्याशा वाटतात.
काही जाहिराती खरोखरच पाहण्यासारख्या असतात..... किती वेळा पाहणार??
नुसत्या जाहिरातींचा अभ्यास केला तर काय आढळेल?
कुठल्या आहेत आपल्यासमोरच्या महत्त्वाच्या समस्या?
घरादाराची, कपड्यांची, स्वत:ची स्वच्छता कशी राखावी?
केसांत कोंडा झाला तर?
झुळझुळीत केस आणि तजेलदार कांती, गोरेपणा कसा मिळवायचा?
या जाहिरातसुंदर्यांचं तर ना, मला काही कळतच नाही.
जसं जसं नीट पाहात जाल तसं तसं त्यांचं हसणं, नाचणं, कृत्रिम वाटायला लागतं.
त्यांच्या आनंदी असण्याचं रहस्य काय? तर एक क्रिम? एक साबण?
फ्रिज करून ठेवलेलं त्यांचं ते हसणं!..... काय घडतंय आजूबाजूला हसण्यासारखं?
प्लास्टीकच्या बाहुल्याच नव्हेत का त्या? किल्ली दिली की हसणार्या, गाणं म्हणणार्या...
त्यांचं एक ठीक आहे, त्यांचं हसणं, त्यांची त्वचा, त्यांचे केस, त्यांचं सौष्ठव हे त्यांचं भांडवल आहे.
त्या पूर्णत: व्यावसायिक आहेत/ असाव्यात/ असल्या पाहिजेत.
आपलं काय?
९० च्या उदारीकरणानंतर उत्पादनाचे वेगवेगळे पर्याय सामान्यांसाठी खुले झाले.
नुसत्या साबणांचे, शांपूचे शंभरेक प्रकार आज बाजारात असतील.
टीव्हीमुळे ते वापरणार्या सुंदर्या आपल्या घरात घुसल्या.
पूर्वी कसं होतं, मधुबाला असेल किंवा हेमामालिनी असेल, या चित्रपटगृहांच्या पडद्यावर होत्या.
त्यामुळे स्थानिक यमींच्या गोरेपणाला, सौंदर्याला भाव होता.
चारचौघीत उठून दिसणारी..... पुरेसं होतं.
आजच्या यमीची तुलना थेट कतरीनाशी, करीनाशी, दीपिकाशी किंवा कोण नविन?... त्या सोनाक्षी वगैरेंशी होऊ लागली.
बाई गं, त्यांचा पूर्णवेळेचा उद्योग ’दिसणं’ सांभाळणं हा आहे. तुला ते जमेल का?
आजची बाई त्या स्पर्धेत स्वत:ला भरडून घेते आहे.
स्वीकारा ना स्वत:ला! जशा आहात तशा!
आणि जशा आहात तशा तुम्ही छानच आहात.
स्वत:कडे पुरूषाच्या नजरेतून बघणं टाळा.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
स्वत:मधलं असं ’छान’ सापडलं, की ती छान दिसेलच की नाही?
कुणाला दिसला नाहीत ’छान’... तर तो त्यांच्या नजरेचा दोष आहे.
तुम्ही ”छानच’ आहात.
***
This comment has been removed by the author.
ReplyDelete:)
ReplyDeleteआताच्या काळात स्वत:ला प्रेझेंट करणं ह्याला खूप महत्व आलं आहे.
ReplyDeleteलग्नामधे ही ब्रायडल मेकअपच खूप स्तोम माजलं आहे. ह्यामधे पुरुषही मागे नाहीत. शाळेपासूनच मुली - मुलं त्याकडे आकर्षित होतात.
आपल्यात काय काय छान आहे ते शोधा.
ReplyDeleteतसंच समोरच्यात काय छान आहे तेही.
आवडीचं काम करणारी, कामात मग्न असलेली, मनातलं बोलणारी, प्रेमात पडलेली, मनापासून दाद देणारी कुणीही व्यक्ती छान दिसते.
आजही काळा रंग , नकटं नाकं, बुटकेपण,इत्यादी अनेक बाह्य गोष्टींना नावं ठेवणा-यांची संख्या काही कमी नाही.
ReplyDelete