’कोलावरी’ च्या लोकप्रियतेची लाट आहे.
(’गणपती दूध पितो’ ची एक लाट फार पूर्वी आली होती, ते मला आठवलं. नंतर त्याचं समाजशास्त्रीय विश्लेषण केलं गेलं.)
कोलावरीला अल्पावधीत मिळालेल्या लोकप्रियतेची कारणं शोधली जातील.
मला गाण्यातलं काही कळत नाही. गाण्याच्या गीतकार, संगीतकारांनी जे म्हंटलं आहे, ते मी एके ठिकाणी वाचलं. ते म्हणतात की हे प्रेमभंग झालेल्या तरूणाचं गाणं आहे, हा अनुभव सार्वत्रिक आहे, या भावनेशी तरूण रिलेट करू शकतात, म्हणून हे गाणं इतकं लोकप्रिय होतं आहे. या गाण्याचं यश जर हे अधोरेखित करत असेल तर ते मला महत्त्वाचं वाटतं.
समाजाने प्रेमभंगाची भावना सहजतेने घ्यायला हवी. (त्यातल्या दु:खाबद्दल मी काहीच बोलत नाही आहे.) समोरच्याचा नकार म्हणजे फसवणूकच असं नसतं. कुठल्याही नात्यातून केंव्हाही एखाद्याला/ एखादीला बाहेर पडायचं असेल तर ती मुभा द्यायलाच हवी.
एकतर्फी प्रेमातून झालेल्या हत्यांची रिंकू पाटील, अमृता देशपांडे अशी उदाहरणं आपण पाहिली आहेत आता जर आपला प्रवास ’कोलावरी डी’ कडे होत असेल तर ते खूपच छान आहे.
आपल्याकडे कसं असतं? साखरपुडा म्हणजे लग्न नक्की! त्यापेक्षा साखरपुडा म्हणजे ’ आम्हांला एकमेकांशी लग्न करावंसं वाटतं आहे, एकमेकांना अजमावतो आहोत, जमलं तर लग्न करु" असं का असू नये?
चार महिने एखाद्याबरोबर फिरल्यावर याच्याबरोबर आयुष्य काढणं शक्य नाही हे जर कळलं तर केवळ साखरपुडा झाला आहे म्हणून लग्न का करायचं? मुळात साखरपुडादेखील इतका वाजतगाजत कशाला हवा? खूप खर्च करायचा, खूप लोकांना बोलवायचं, मग निर्णय घेताना दडपण येणारच.
लग्नानंतर सुद्धा मुलं होईपर्यंतचा काळ तुम्हांला विचार करण्यासाठी मिळू शकतो.
तेव्हा मी ’हो’ म्हणाले/लो होते/तो आता ’नाही’ म्हणायचे आहे. हे का नाही चालत? माणसं वाढतात, बदलतात. आपण पुनर्विचाराच्या शक्यता का लक्षात घेत नाही?
आपण प्रेमभंगाला मान्यता देणार असू, तो स्वीकारणार असू आणि पुढे जाणार असू तर ती एक समजदारीची गोष्ट झाली.
’कोलावरी डी’ हे सांगू पाहतं आहे असं मला जाणवलं. थेट नाही, ते सांगायचं म्हणून असं नाही, पण अर्थाच्या अनेक शक्यतांपैकी एक, बदलणारा समाज जर या टप्प्यावर पोचत असेल तर ते स्वागतार्ह आहे.
No comments:
Post a Comment