Tuesday, February 15, 2011

छोट्या छोट्या गोष्टी


दीपाकडे ’मुद्गल शंभर’ कार्यक्रमाला जमलो होतो तेव्हाची गोष्ट. आनंद, कौस्तुभ, जगदीश आणि नीरज पानं आणायला गेले. राजू थांबला होता, सचिन ’फोनवर’, खाली गेलेला. आमच्या जरा गप्पा झाल्या, हिशोब झाले. मी उठले आणि समोरच्या सोफ्यावर जाऊन बसले. नेहमी पुरूषांनीच का बसायचं इथे? आज आपण बायका मुख्य स्थानावर बसूया. अश्विनी वेदात्मनला घेऊन माझ्या शेजारी येऊन बसली. वेदात्मन झोपला होता. ती म्हणाली, ”खरंच यांच्या घरी मी कधीच इथे बसलेली नाही.” शेजारच्या खुर्चीवर आशा येऊन बसली. डायनिंग टेबलाजवळच्या खुर्चीत वैशाली बसली. वीणा आमच्या सोफ्याला टेकून बसली. स्मिता समोर झोपाळ्याच्या खुर्चीत बसली. दीपा आत होती. मिलिन्द आला, राजूच्या बाजूला बसला , तिकडच्या सोफ्यावर राजू बसला होता. आम्ही पानॆ आणणारांची ( पानांची नव्हे) वाट पाहू लागलो. बघू आल्यावर काय करतात ते! .... ते आले तेंव्हा त्यांच्या नेहमीच्या जागा भरलेल्या होत्या. नेमकी तेव्हाच वैशाली वेदात्मनला पांघरूण आणण्यासाठी आत गेली होती. तिच्या खुर्चीवर कौस्तुभ बसला, जगदीश टेरेसवर गेला, नीरज मुलांच्या खोलीकडे गेला. आनंद सर्वांना पाने देऊ लागला... जागा नाही म्हंटल्यावर पहिल्यांदा आनंद सेटल झाला, खाली बसला, नीरज येऊन खाली बसला. कौस्तुभ कागद आणायला उठला तेंव्हा मी वैशालीला खूण केली, त्या खुर्चीत येऊन बस, ती पोचण्यापूर्वीच कौस्तुभ येऊन खुर्चीत बसला. मग ती वीणाशेजारी बसली. त्यानंतर जगदीश येऊन बसला.
 जर आम्ही सगळ्या खाली बसलेल्या असतो तर या पुरूषांनी पटापट त्यांच्या नेहमीच्या जागा घेतल्या असत्या. त्या रिकाम्या नाहीत म्हंटल्यावर कुठे बसावे त्यांना सुचेना.
 इथे काही मानपानाचा प्रश्न नाही, आपण आपल्या गटात किती मोकळेपणाने आणि सहजतेने वावरतो! तरी रुजलेल्या काही गोष्टी आहेतच.

आपल्या घरांमधल्या मोक्याच्या, प्रशस्त जागा या पुरूषांसाठी राखीव असतात. तुम्ही बघा, तुमच्या घरात असं आहे की नाही?
पुरूषांच्या अनुपस्थितीत घरातल्या बायका तिथे बसतात किंवा बसत नाहीत.
 आमच्याकडेही आजोबा आले की कुठे बसतात, आज्या कुठे बसतात हे ठरलेले आहे.
लक्षात घ्या कुणी ठरवलेले नाही, ते ठरलेले असतेच. वाढवण्यातल्या ज्या अनेक गोष्टी असतात त्यातली एक ही आहे.
कुठे बसायचं, कसं बसायचं, हे इतकं मुरवलेलं असतं ना आमच्यात. आम्हीही झापडबंद पद्धतीने हे नियम पाळतो. ( आणि पुरूषांचं तरी काय वेगळं आहे? )
****

विचार करायचा ठरवला तर इतक्या गोष्टी आहेत, दमायला होतं.

****

5 comments:

 1. प्रयोग आवडला. निरीक्षण उत्तम. अनुमान पटण्याजोगे. पण इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा यात सवयीचा भाग अधिक दिसतो. शाळेत, कॉलेजात, लोकलमध्ये देखील माणसं ठरलेल्या जागाच धरतात.

  ReplyDelete
 2. >>इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा यात सवयीचा भाग अधिक दिसतो.
  अनुमोदन!
  आपल्या सवयींकडे नीट पाहिलं तर त्यामागे काय काय दडलेलं आढळून येईल?

  ReplyDelete
 3. बापरे .भलतच डेंजर काम आहे.
  मला लक्षात सुधा आले नाही की बसण्याच्या जागेवरून एव्ह्डे वेगवेगळे निष्कर्श निघतील.

  ReplyDelete
 4. आपल्या आधीच्या पिढ्यांमध्ये तर हे खूप होतं आणि आहे.
  मानाच्या जागा जशा पुरुषांसाठी राखीव तसंच (जास्त चीड आणणारं खरं तर) चांगल्या, ताज्या पदार्थांचं राखीव असणं.
  सकाळची पोळी, कालची भाजी ही घरातल्या स्त्रीने स्वत:ला घ्यायची हे तर आपण बहुतेकांनी पाहिलेलं असणार.
  माझ्या आत्याने तिच्या घरात हे ४०~५० वर्षापूर्वीच बदललं. सगळ्या शिळ्याची समान वाटणी करुन प्रत्येकाला पहिल्यांदा पानात वाढायला सुरुवात केली.
  आजही आमच्या घरात जर पोळी थोडी काळी झाली, थालिपीठ जळलं (तव्यावर टाकलं आणि दीपा/वैशाली/अश्विनी/आशा चा फोन आला की होतं असं. तो स्वतंत्र विषय आहे..) की विद्या पटकन म्हणते, ते राहू दे, मी घेईन.
  (तिच्या जबाबदारीत कुचराई झाल्याची शिक्षा तिनेच भोगायला हवी ना.)
  अजून खूप पल्ला गाठायचा आहे...

  जाता जाता.
  छोट्या छोट्या गोष्टींबद्दल प्रश्न उभे राहताना; झापडबंद पद्धतीने नियम पाळण्याबद्दल विचार करताना, लेखातल्या दुसर्‍याच वाक्याबद्दल पण प्रश्न पडायला हवा, हे असं का.

  ReplyDelete
 5. >>लेखातल्या दुसर्‍याच वाक्याबद्दल पण प्रश्न पडायला हवा, हे असं का.


  खरं आहे. (लिहिताना माझ्या हे लक्षात आलं होतं)
  घरातल्या गोष्टी बदलणं, जग बदलण्यापेक्षा सोप्या आहेत.
  अर्थात हे काही समर्थन नाही.

  पुढच्यावेळी तो बदल करून पाहू.

  ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...