Thursday, December 15, 2011

वेश्या -- १मी घराचं काम पाहात होते, काहीतरी आणायला रविवारपेठेत का कुठेतरी जायचं होतं, तिकडचे रस्ते मला फारसे माहीत नाहीत. कुठेतरी चुकले आणि एकदम बुधवारपेठेत शिरले. दुपारी बारा एकची वेळ असेल. त्या गल्लीतलं वातावरण वेगळं होतं, माझ्या लक्षात आलं. चेहरे रंगवलेल्या मुली आणि बायका. आपल्याला चित्रपटात पाहून असं वाटत असतं की वेश्या म्हणजे दिसायला सुंदर!  तसं काही नव्हतं, जाड्या भरड्या चेहर्‍याच्या, जरा भडक कपडे घातलेल्या त्या बायका होत्या. इथे संख्येने खूप दिसत होत्या म्हणून! इतरत्र वेगळ्या ओळखू आल्याच असत्या असं नाही. मी अस्वस्थ झाले, ती गल्ली कधी संपेल असं मला झालं! ऊन आणि गर्दी , रस्ता संपत नव्हता. केव्हातरी लक्ष्मी रोड लागला, ओळखीच्य़ा पाट्या दिसायला लागल्या आणि मला हुश्श झालं.
 काय घ्यायचं होतं ते न घेता सरळ मी घरीच आले.
 दिवसभर मला कसंसंच होत होतं.
 का?
 मला कळून मी वेश्यांना पाहिल्याचा तो पहिलाच / एकमेव प्रसंग होता.
 वेश्या म्हणजे न बोलण्याचाच विषय!

आम्हांला शिकायला ’वेश्यांचा अभ्यास’ होता, तेव्हा मी त्यावर विचार करायला लागले. त्यापूर्वी समाजाने स्त्रियांची केलेली ’गृहिणी आणि वेश्या’ ही विभागणी मला मान्यच होती.
 मार्क्सवादी स्त्रीवाद्यांनी ” गृहिणी म्हणजे जी कराराने एकाच गिर्‍हाईकाला आयुष्यभर शरीरविक्रय करते, तर वेश्या ही वेगवेगळ्या गिर्‍हाईकांना शरीरविक्रय करते." " वेश्या ही अधिक स्वतंत्र आहे, ती नाही म्हणू शकते" ....... अशी मांडणी केली आहे. ती शिकल्यावर दोन दिवस मला काही सुचेना. जसजसा विचार करू लागले, तसतसं ते किती खरं आहे, हे कळत गेलं. आणि ठिणगी पडल्यासारखं झालं. एकूणच समाजात लैगिंकतेचं राजकारण कसं चालतं, हे लक्षात आलं.
 स्त्रियांनी पातिव्रत्य राखणं ही पुरूषसत्ताक पद्धती चालू राहण्यातली कळीची गोष्ट आहे.

स्त्रियांनी हे समजून घेतलं पाहिजे    .... स्त्रियांचा अभ्यास, त्यांचा इतिहास, त्यांच्यावरचे अत्याचार, त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा, त्यांची गुलामी, त्यांचं वस्तुकरण, त्यांची विभागणी....... आणि यामागचं राजकारण.......

............

1 comment:

  1. वेश्या ही अधिक स्वतंत्र आहे, ती नाही म्हणू शकते" .......
    खरं आहे हे. माझ्या खूप जवळच्या,मध्यमवर्गीय,म्हणायचं नाही पण ब्राह्मणाच्या घरातल्या माझ्या तीन मैत्रीणी आहेत, त्यांना हा अत्याचार आहे हे कळूनही केवळ समाजाची चौकट म्हणून,पदरात पोरं आहेत म्हणून आणि कोणी काय म्हणेल म्हणून गप्प बसून हे आजतागायत सहन करत आहेत.आणि चारचौघात आमचा कीती छान संसार चाललाय हे दाखवत आहेत. पैकी एकीने घटस्फोट घेतला आहे.पण त्या आतून पार कोलमडलेल्या आहेत.कारण त्यांचे नवरे नुसतेच डीगरीपुरते इंजिनिअर झाले आहेत,समाजापुढे स्वत:ला प्रतिष्ठीत व्यावसायिक म्हणून मिरवतात.रोज रात्री दारु पितात.(वर स्वत:च्या पैशाची पितो हा माज आहेच.) आणि रोज रात्री अश्या अवस्थेत बायकोकडून शारीरीकभुकेसाठी, जरी तिची इच्छा नसली तरी हा पुरुष सक्ती करणार.आज या माझ्या मैत्रीणींच्या लग्नाला साधारणत: पंधरा- वीस वर्षे झाली असतील,याच पद्धतीने त्या आत्याचार सहन करत आहेत.

    ReplyDelete

आतलं जग

श्रीदेवीला सारख्या कॉस्मेटीक सर्जर्‍या करून आपलं वय लपवावं असं वाटण्यामागे  काय असेल? असुरक्षितता, भीती, self accepatance  नाही, self lo...