Friday, November 21, 2014

दीपू

आमच्या वाड्यात लहानांत सगळे मुलगे आणि सर्वात लहान मी एकटी मुलगी.
माझ्यापेक्षा वर्षाने मोठा दीपू. पहिला वहिला मित्र. तसे वाड्यातले सगळेच मित्र पण हा खास मित्र.
 आम्ही दोघं खेळात कायम लिंबू-टिंबू. घरातही लहान त्यामुळे समदु:खी.
आमची छानच मैत्री होती. आम्ही गळ्यात गळे घालून वाडाभर फिरत असू. दुसरी तिसरीपर्यंत असेल, म्हणजे तसे लहानच.
पण तरीही आमच्या गळ्यात गळे घालण्याबद्दल किंवा एकत्र असण्याबद्दल कोणीही कधीही हटकलेलं नव्हतं.
तो आमच्या घरी नाहीतर मी त्यांच्या घरी नाहीतर दोघे मिळून वाड्यात कुठेतरी.
तो वरच्या इयत्तेत असला तरी माझं सगळं ऎकायचा. एकमतच असायचं आमचं. :)

वाड्यात छोट्या मुलांनी गणपती बसवायचा असं ठरवलं. दीपूचा मोठा भाऊ मनोज त्यात पुढे होता.
चिठ्ठ्या टाकून मुलांची कार्यका्रिणी वगैरे ठरवण्यात आली. अध्यक्ष, सचिव, खजिनदार वगैरे....
आम्ही दोघंही कुठेच नाही, आम्ही भोकाड पसरलं असेल, आया मधे पडल्या असतील, मग आम्हांला कुठलीतरी (हरकाम्या टाईप) पदं मिळाली.
एकाच नावेतले प्रवासी असल्याने आमचं मेतकूट होतं.

दीपूची मोठी बहीण आक्का चांगली दहावीत वगैरे होती, आईच्या बरोबरीने कामं करायची, तिची गणती मोठ्यातच होत असे.
मनोज त्यांच्याकडच्या मोठ्या टेबलावर चादरी वगैरे घालून घरातल्या सगळ्यांच्या कपड्यांना इस्त्री करायचा.
आम्ही दोघं तिथेच आसपास रेंगाळत त्याच्याशी गप्पा मारत खेळत असू.
मग शेवटी तो दीपूच्या आणि त्याच्याबरोबर माझ्याही रूमालाला त्रिकोणी/चौकोनी घड्याघड्यांची इस्त्री करून देत असे.
तो गरम रूमाल घरी आणून मी व्यवस्थित कप्प्यात ठेवत असे.

तो चित्र छान काढायचा. त्याच मोठ्या टेबलावर ड्रॉईंग शीट पसरून तो तो वेगवे्गळी चित्रे काढत असे. हुबेहूब!
पुस्तकातल्यासारखे शिवाजीमहाराज!
आणि मग चित्राभोवती फ्रॆम असावी तशी वेगवेगळी वेलबुट्टी काढत असे.
एका शीटवर पाच-सहा छोटी छोटी चित्रे तो काढायचा.
डोळे विस्फारून आम्ही पाहात असू.
त्याचं पाहून मी डोळा काढायला शिकले.
मग पाहिलेल्या त्याच्या वेलबुट्ट्य़ा कुठे कुठे वापरल्या, कधी रांगोळीत कधी मेंदीत.
तोही कुठून कुठून शिकला असेल पण मी शिकले ते त्याच्याकडून.
त्याचं झालं की तो कागदाची व्यवस्थित गुंडाळी करून रबर लावून ठेवत असे.
त्याच्या नेटकेपणाला आम्ही जरा दबून असायचो.

गणपतीत एकेवर्षी आक्काने पाण्यावर सुंदर रांगोळी काढली होती.
आधी कोळशाची बारीक पूड करून घेतली, परातीत पाणी घेतलं, त्यावर सगळीकडे ती पूड पसरली आणि मग हलक्या हाताने त्यावर पांढरीशुभ्र रांगोळी काढली. साधीच रांगोळी, नेहमीची पण दिव्याच्या प्रकाशात काय सुंदर दिसत होती!
तर तिचं हे ठरल्यापासून, कोळशाची पूड, ती चाळणीनं चाळणं, मग परातीत पाणी घेणं...... रांगोळी पूर्ण होईपर्य़ंत, आम्ही तिच्या मागे मागे.

आमच्या काळी मुलांना भरपूर वेळ असे, बारीक निरीक्षण करण्याची संधी असे.
असं काहीही कळलं की आधी आम्ही एकमेकांना सांगत असू आणि मग  काय घडतंय तिथे बसून राहात असू.
साधा कल्हईवाला आला तरी त्याची सगळी भांडी होईपर्यंत आम्ही बसून राहात असू. कळकट भांडी एकदम चमकायला लागत, तो चमत्कार मिळूनच पाहायचा असे. शिवाय त्या कल्हईवाल्याला मदत देखील करायचो. वाडाभर तो फाटकाबाहेर बसलाय हे सांगत फिरायचं, शिवाय भांडी संपत आली की अजून काही आहेत का, बघा, तो आणखी चार महिने यायचा नाही, हे ओरडत आणखी एक फेरी.

अगदी नाली तुंबली असेल, ते साफ करायला माणूस आला असेल तरी आम्हांला ते टक लावून बघायचं असे. तुंबलेलं पाणी वाहून गेलं, वर चार बादल्या पाणी टाकलं, तेही भराभर वाहून गेलं की आम्ही विजयी चेहर्‍याने एकमेकांकडॆ बघत असू.

एकूण काय तर सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमधे एकमेकांसोबत.
उन्हाळ्यात पत्ते, शिवाय नेहमीचे चंफूल, चिरकी, गोट्या, चक्का असे सगळ्या मुलांबरोबरचे खेळ असायचेच.

मी पहिलीत किंवा दुसरीत असताना असेल. दीपूच्या बाबांनी असेल किंवा अन्य कुणी असेल, त्याच्यासाठी एक छोटुसा शाईपेन आणला. नेहमीच्या पेनांपेक्षा जवळपास निम्मा. जाडीलाही, उंचीलाही. असं ऑलीव्ह ग्रीन रंगाचं पेन आणि सोनेरी टोपण! नुसतं शोभेचं नव्हतं ते! शाई भरली की मस्त चालायला लागलं. ते मिळालं की दीपू  लगेच दाखवायला आमच्याकडे घेऊन आला. कसलं देखणं होतं ते! त्याच्या छोट्या हातात तर ते काय ऎटबाज दिसायचं. ते तसलं पेन मला लगेच हवं झालं. पण ते काही आमच्या इथे मिळत नव्हतं. ते पेन मिळालं आणि दीपू असा हवेतच. सारखं पेन त्याच्याजवळ आणि सारखं त्यासंबंधीच बोलणं. पेनशिवाय त्याला काही सुचेना. तो नेहमीचा दीपू राहिलाच नाही. त्याच्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही असं काहीतरी आमच्या मधे येत होतं. नेहमीच्या गप्पा नीट होईनात. थोडी भांडणं व्हायला लागली, पटेनासं झालं. एकीकडे ते पेन हवंच असं मला झालेलं. आणि मी काय केलं असेल? दोन-तीन दिवसांनी त्याचा डोळा चुकवून ते पेन चक्क चोरलं. मी ते हळूच लपवून ठेवलं. पेन हरवलं म्हंटल्यावर त्याने जो काय गोंधळ घातला. मी पण त्याच्या जवळच होते. मी ते लपवलं असेल अशी कोणाला साधी शंकाही आली नाही. दुसर्‍या दिवशी तो जरा शांत झाला. पण दु:खीच. तिसर्‍या दिवशी जरा नॉर्मल. तोवर माझ्या लक्षात आलं की त्याचं पेन मी उघडपणे वापरूच शकणार नव्हते. शिवाय तो असा मलूल झाला होता की वाईटही वाटत होतं. पेन घेतल्याची टोचणीही होतीच. मग मी हळूच ते पेन त्यांच्या खिडकीच्या दाराखाली ठेवून दिलं. दोनेक तासांनी तो नाचत आला पेन सापडलं म्हणून.

 दुसरी-तिसरीपर्यंत आमची अगदी घट्ट मैत्री होती. पण तिसरीत काय झालं? मला एक मैत्रिण मिळाली, शाळेतली, पलीकडच्या गल्लीतली. मग काय आम्ही दोघी सोबतच. एकमेकींच्या घरी फेर्‍या सुरू! तिला दोन मोठ्या बहीणी होत्या आणि ती सराईतपणे अय्या, इश्श, असं मुलींसारखं काय काय करू शकायची, मला त्याची भूलच पडली.

 पुढे दीपूने वाडा सोडला. तरी आमचं जाणं येणं होतंच. मनमोकळ्या गप्पा व्हायच्या.
पुढे सगळ्यांचीच स्वत:ची घरं झाली. तो ग्रॅजुएट झाला आणि नोकरीलाच लागला. मी शिकतच होते, आला तेव्हा नोकरीतल्या मजा सांगायचा.
आमच्याकडे कधीही मुलांनी घरी यायचं नाही, मुलांशी गप्पा मारायच्या नाहीत, असं नव्हतं. जो कोण असेल त्याची घराशी मैत्री व्हायची. हा तर वाड्यातला मित्र होता.

आधी आधी पुण्याहून गेले की मी सगळ्यांकडे जाऊन यायचे. पुढे ते बंद झालं. अजूनही आईकडून बातम्या कळतात. पण गेल्या दहा-बारा वर्षात मी त्यांच्याकडे गेलेले नाही.

*****

त्याचा पत्ता मला ठाऊक आहे. घर मला माहीत आहे.
पण असं वाटतं जाऊन बोलणार तरी काय? तेच मुलांबाळंविषयी, नोकरी धंद्याविषयी. आणि हो, वाड्यातल्या जुन्या आठवणी निघतील. मग त्याच्या बायको, मुलांना किंवा माझ्या मुलांना वाड्यात कसं होतं ते सांगीतलं जाईल. वाड्यातल्या आठवणी आमच्या बालपणीच्या आठवणींचा अविभाज्य भाग आहेत. त्याने त्या कशा पाहिल्यात कोण जाणे. म्हणजे तो त्यात रमलेला असेल की नाही? सगळेच मोठे त्या आठवणीत रमतात असे नाही. ते कुरकुरे होत जातात किंवा अलिप्त. आपली घरं किती छोटी होती, किती अडचणीत राहायचो हेच तो सांगायला लागला तर? मला नाही चालायचं. मला ते नाहीच बोलायचं.

 दुसर्‍याने काय बोलावं याच्यावर नियंत्रण ठेवू पाहणारी बाई आहे की काय मी? :)
मग माझ्यासारख्या बाईने काय करावं? तेच मी करते.
मला त्याच्या घरी जायचं नाही.

**********

Friday, October 31, 2014

ज्योतीनंदा




माझे बाबा सगळ्या भांवंडांत लहान. त्यामुळे त्यांच्या मोठ्या बहीणीची नात ज्योतीनंदा माझ्या बरोबरीची.
लग्नाकार्यात, सुट्टीत भेट होईल तेव्हा आम्ही बरोबर असायचो.
तिच्याबद्दलची पहिली आठवण अशी आहे.....

माझ्या एका आतेभावाचं लग्न होतं. लग्नाला सगळे बस करून गेलेलो. मग आतेबहीणींबरोबर आम्ही नवरी पाहायला गेलो. तेव्हा ती होती, ज्योतीनंदा. आम्ही दोघीही पहिली-दुसरीत असू. त्या लग्नात आम्ही मिळून खेळलो. तेव्हा कधी नव्हे ते मला दोन नवीन कपडे शिवले होते. नाहीतर, घरात घालायचे दोन, बाहेर जायचा एक आणि एक गणवेश एव्हढेच चार/पाच झगे असायचे.  एकदम दोन म्हणजे चैनच! एक परकर पोलकं आणि एक झगा. मी अगदी खूष होते.
 आमची परीस्थिती बेताचीच होती, त्यांची तर आमच्याहूनही साधारण असेल.
तिने मागीतला म्हणून का तिच्याकडे नव्हता म्हणून आईने दुसर्‍या दिवशी माझा नवा झगा ज्योतीनंदाला घालायला दिला. मीही आनंदी माणसे जशी उदार होऊ शकतात तशी झालेले. लग्न झालं आमचा परतीचा प्रवास सुरू झाला, तरीही ती आपली माझा झगा घालूनच बसलेली. मी माझं परकर पोलकं बदलून साधासा फ्रॉक घालून बसले होते. मी आईला म्हणाले देखील ’ आई, ही अजून माझा झगा का देत नाहीये?’ आई म्हणाली, "गावी पोचलो की देईल." आणि झालं काय की ती आणि तिचे आई-बाबा गावी आलेच नाहीत, मधेच तिच्या आत्याचं गाव लागलं तिथे उतरून गेले. उतरताना काय म्हणणार?
 झालं! माझा नवाकोरा झगा गेलाच!
किती दिवस मला हळहळ वाटत राहिली.

पुढच्या वर्षी ती भेटली तेव्हाही मला माझा झगाच आठवत होता पण आई म्हणालेली आता काही बोलू नकोस, म्हणून मी शहाण्या मुलीसारखी गप्प बसलेले.

आणखी दोन-तीन वर्षांनी काय झालं? ज्योतीच्या धाकट्या मावशीचं म्हणजे माझ्या आतेबहीणीचं लग्न झालं. लग्नानंतर ती हैद्राबादला गेली होती, येताना ती ज्योतीसाठी खड्यांच्या, बर्‍यापैकी महाग अशा दोन बांगड्या घेऊन आली. आम्ही मांडवपरतनीला जाणार नव्हतो पण गेलो. माझ्या तिथे असण्याची आतेबहीणीला कल्पना नव्हती. तिने एकच जोड आणलेला, अंदाजाने. झालं काय की तो ज्योतीच्या हातात जात नव्हता. माझ्या हातात जाऊ शकला. मला खूप आवडलेला. सुंदरच होता तो बांगड्यांचा जोड! पण ताई म्हणाली म्हणून मी नको, नको असं केलं. शेवटी आग्रह करून आतेबहीणीने तो मला दिलाच.
 मी त्या बांगड्या पुढे चार वर्षे तरी घातल्या असतील.
त्या मला मिळाल्या याचं ज्योतीला काय वाटलं असेल कुणास ठाऊक? ती माझ्याजवळ काही बोलली नाही.

ज्योतीनंदा म्हंटलं की हे दोन प्रसंग मला आठवतातच.

तिचे बाबा थोडे विक्षिप्तच आहेत. आम्ही सातवीत होतो तेव्हाची गोष्ट. सुट्टीत गेलेलो असताना म्हणत होते, " चांगलं श्रीमंताचं स्थळ आलंय ज्योतीसाठी, तिचं लग्नच करतो." मला तेंव्हा शिंगं फुटायला लागलेली. मी त्यांच्याशी खूप भांडले. वेगवेगळे मुद्दे घेऊन भांडत होते. शेवटी शेवटी म्हणाले की मी पोलीसात कळवीन, कायद्याने बालविवाहाला बंदी आहे.’ ते खरं माझ्याशी भांडण्याची मजा घेत असणार, मला ते कळत होतं तरीही लहान वयात एकदाचं मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि मोकळं व्हायचं ही कल्पनादेखिल मला सहन होत नव्हती. विशेष म्हणजे मी जिच्यासाठी भांडतेय ती ज्योती भांडणात कुठेच नव्हती ती शांतच.

 ती शिकली दहावी/ बारावी ..... नुसती माझ्यासारखी शिकत नव्हती, त्याजोडीला घरकाम, स्वैपाक हे ही करायला लागलेली,
पुढे दोन चार महिने या मामाकडे, त्या मावशीकडे असं केवळ नवरा मिळेपर्यंत राहिली.

यथावकाश तिचं जमलं. मामा मावश्यांनी पुढाकार घेऊन लग्न लावून दिलं.
मी ME करत होते तोवर तर ती दोन मुलांची आई झालेली. संसारात रूळलेली.
नांदेडला गेले तर चुलतभावाला म्हणाले, " चल ज्योतीकडे जाऊन येऊ. " तेव्हा मी आवर्जून सगळ्या सगळ्यांकडे जात असे.
आमच्याकडे देशस्थात कसं आहे? नातेवाईकांचा भरपूर गोतवळा आणि गुंता! साधसं काही असलं तरी जेवायला ३०/४० लोक सहज बोलावतील. बहुतेक बाबतीत त्यांचे माझे विचार पटणारे नाहीत. पण ती सगळी माझ्याकडची माणसं आहेत आणि त्यांच्यात मला रस आहे.

हं. तर ज्योतीकडे गेले तर तिची मुलं, पुतणे आजूबाजूला. ही कायम साडीत. मोठीच वाटायला लागलेली.
तिचे विषय वेगळे माझे वेगळे. खरं म्हणजे तसे ते पूर्वीपासूनच होते. पण आता खूप अंतर पडलंय हे जाणवत होतं.

त्यानंतर कधी मी तिच्याकडे गेले नाही.
पुढे माझंही लग्न झालं, मुलंबाळं, मीही संसारात बुडून गेले.

दरम्यान कधीतरी भॆट, कधीतरी दिसणं, वरवरचं बोलणं बस्सं!

चार वर्षांपूर्वी एका लग्नाच्या निमित्ताने भेटलो.
निजामाबादला लग्न होतं, पुष्कळ बारा-चौदा तासांचा प्रवास होता.
सर्वांच्या मिळून भेंड्या, काहीतरी गप्पा, आठवणी निघत होत्या.
नंतर म्हणाली, " मी आता विद्याच्या शेजारी बसणार आहे."
मग आमच्या दोघींत गप्पा म्हणजे
इतकं औपचारीक बोलणं सुरू झालं.
जवळपास एकमेकींची काहीच माहिती नाही असंच होतं.

तिच्या मोठ्या मुलाला कॅन्सर झालेला, पहिल्या स्टेजलाच कळला, व्यवस्थित औषधोपचार केले आणि तो पूर्ण बरा झालाय आता काहीच धोका नाही हे कळलेलं.

तॊ विषय निघाला. म्हणाली आता अगदी छान आहे, पॉलीटेक्नीक करतोय.

मग त्या दिवसांमधलं सांगायला लागली.
मुलांचं असं कळलं. त्याच्यासाठी मुंबईच्या फेर्‍या, औषधोपचार, लाखभर रूपये खर्च येणार होता.
माझे तर हातपायच गळाले. एव्हढे पैसे कसे आणि कुठून उभे करू?
ह्यांना पण काही कळेना.
कोणीतरी सांगितलं, खासदारांना भेट.
अजूनही कोणी कोणी काय काय सांगितलेलं असेलच.
म्हणाली, " मला परक्या पुरूषांशी कधी बोलून माहित नाही." एकटी खासदारांना भेटायला गेली. (भेट मिळण्यासाठीही दोन, तीन फेर्‍या झाल्या असतील.) सोबत रिपोर्टस. " त्यांच्याशी कसं काय बोलले माहित नाही. देवाने बळ दिलं बघ."
मग त्यांनी सतराशे साठ गोष्टींची पूर्तता करायला सांगितली, त्यासाठी अर्ज करणं, नगरपालिकेत खेटे घालणं, सगळं केलं.
साधी सही कशी करायची ते या बाईला येत नव्हतं.
खासदार निधीतून पन्नास-साठ हजारांची मदत मिळाली. बाकीचे इकडून तिकडून उभे केले.
एकटीने मुंबईचा प्रवास, लोकलने फिरणं, तिथं राहणं, मुलाची काळजी, त्याची पथ्यं सांभाळणं, सगळं निभावलं.

ज्योती किती बदलली होती.
म्हणाले, "ज्योती, तू ग्रेट आहेस."

Friday, August 15, 2014

अस्वस्थता

आम्ही मुस्कान चं काम जाणून घेत होतो.
बाललैंगिक अत्याचारांची आकडेवारी भयंकर आहे.
आणि ते करणारी माणसे कुणी विकृत नाहीत, म्हणजे ते करणं ही विकृतीच आहे, पण ती माणसे सरसकट विकृत नसतात.
त्यांची कुठलीही ठळक ओळख नाही.
ती आजूबाजूची माणसं आहेत, संधी साधून ती हे करतात.
ती कुठल्याही जाती, धर्माची, वयाची, स्त्री किंवा पुरूष असू शकते.
’आपण आणि ते’ अशी वर्गवारी करता यावी अशी निकड भासत होती,
मुस्कान मधील मैत्रिण पुन्हा पुन्हा तसं नाही हे सांगत होती.

......

त्यामागच्या प्रमुख कारणांपैकी, एक आहे मुलांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन,
म्हणजे त्यांच्याकडे व्यक्ती असं न पाहता, मालकी हक्काची वस्तू समजणे, त्यांच्यावर विश्वास न ठेवणॆ,

सत्तेच्या उतरंडीत ती सर्वात खाली आहेत.

.......

आमचा छोटासा गट हे ऎकत बसला होता.
बोलता बोलता मैत्रिण म्हणाली, " ही आकडेवारी इतकी आहे की या आपल्या गटातही कुणाकुणाला या अत्याचाराला सामोरं जावं लागलं असेल. "
खरंच आहे.
....
विचार करता करता वाटलं.... अत्याचार करणार्‍यांचंही प्रमाण किती जास्त आहे.
.......
कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवावा , असा खात्रीचा मित्र मैत्रिणींचा गट!
......
या आपल्या गटातही कुणीकुणी अत्याचार करत असेल? हे असलं भलतं मनात आलं आणि मग अंधारून आलं.
काहीच सुचेनासं झालं.
.......
ती अस्वस्थता अजूनही गेली नाही.
........

Thursday, July 31, 2014

हे ही कधीतरी बोललं पाहिजे

दोन वर्षांपूर्वी लिहिलेला लेख

********

मी खूप हिंमत करून हे लिहित आहे.
मी शेवटपर्य़ंत लिहू शकीन असं वाटतंय.
सत्यमेव जयते चा दुसरा बाललैंगिक शोषणावरचा भाग पाहिला.
आणि लिहायचेच असे ठरवले आहे.
*******

मी पाच- सहा वर्षांची होते. वाड्यात सगळे मुलगे आणि मी एकटी मुलगी. सगळ्या घरांमधून फिरायचे, सगळ्यांची लाडकी. खूप बोलत असे. वाड्यातले नुकते लग्न झालेले, उमेदवार असलेले काका/ काकू मला खास गप्पा मारायला बोलवत.
आणि
.........................
त्यातलेच एक काका होते, तेव्हा काकू बाळंतपणासाठी माहेरी गेलेल्या होत्या. त्यांनी मला त्यांच्या खोलीत बोलावलं आणि दार लावून घेतलं. फारतर पाच मिनिटे मी त्यांच्या खोलीत असेन. जे काय त्यांनी केलं ते किळसवाणं होतं.
.................
नंतर
त्यांनी मला बांगड्यांच्या आकारातलं लोखंडी स्प्रिंग दिलं, ते फोर्बस कंपनीत होते, तिथल्या टाकाऊ मालातलं ते असायचं, वाड्यातल्या आम्हां मुलांना ते खेळणं फार आवडायचं, पूर्वीही त्यांनी मला दिलेलं होतं, मी त्यांना आणखी मिळालं तर आणा असं सांगीतलेलं.
.........
मी घरी आले, ते खेळणं कोपर्‍यात टाकून दिलं. घरात कोणाशीही काही बोलले नाही.
........
सहा वर्षांच्या एका छोट्या मुलीसाठी ही असली घाणेरडी गोष्ट ....... कुणाला न सांगता...... स्वत:च्या मनात पुरून ठेवणं...... खूप अवघड होतं...... ती एक बोलकी मुलगी होती..... काही खुट्ट वाजलं तरी वाडाभर जाऊन सांगायची......
तिने ते केलं..... कुणालाही काही सांगीतलं नाही..... तिला कळलंच नसणार, कसं सांगावं ते....
.......
आणखी चार दिवसांनी ....... त्यांनी अचानक मला उचलून त्यांच्या खोलीत नेलं...... मी ओरडले नाही.... पुन्हा तसेच.... पाच मिनिटांनी मला बाहेर सोडले आणि चाराणे माझ्या हातात ठेवले..... चॉकलेट घे म्हणून.......
................................
मी ते पैसे घट्ट मुठीत धरून घरी घेऊन आले................. माझ्या लाडक्या खिडकीत बसले................... आणि ते पैसे खिडकीतून मागच्या बोळीत टाकून दिले.
.........................
जे काय घडतंय त्याचं काय करायचं मला काहीच कळत नव्हतं.
....
आणखी दोन दिवसांनी असेल... मी खाली अंगणात खेळत होते, ते वरच्या मजल्यावर राहायचे ...... गॅलरीच्या कठड्याला टेकून त्यांनी मला ’ये ’ अशी हाताने खूण केली. मी जे पळत घरात जाऊन बसले. कोणीही कितीही बोलावलं तरी बाहेरच आले नाही. नाही मला खेळायचं आणि नाही मला बाहेर यायचं असंच सांगत राहिले........
.......
नळाजवळ आम्ही लावलेल्या गुलाबाशेजारी उभी असलेली ती सहा वर्षांची मुलगी.... छोटीशी.... फ्रॉक घातलेली..... आणि वर कठड्याला टेकून तिला ये म्हणणारा तिच्या गोष्टीतला राक्षस......
ते दोघे अजून माझ्या डोळ्यासमोर आहेत....
त्यानंतर जीव खाऊन ती मुलगी घरात पळाली... ते ही
.........................

पुन्हा असं काही झालं नाही. त्यांच्याबद्दल लोक, आईबाबा चांगलंच बोलायचे, "किती बिचारा सज्जन माणूस" असेच. ते कधी घरी आले तर मी पळून बाहेर जायची. काकू आल्यावरही मी शक्यतो त्यांच्या घरात जायचीच नाही. त्यांचं बाळ पाहायला आईबरोबर गेले तर आईचा पदर धरूनच बसले.
पुढे वर्षसहा महिन्यात ते वाडा सोडून दुसरीकडे राहायला गेले.

पुढे साताठ वर्षांनी ते अकाली गेले. सगळेच त्याबद्दल हळहळत होते.
मला इतकं बरं वाटलं.

.....................

पुढे कधीही असं काही घडलं नाही.
माझं बालपण याने काळवंडून गेलं नाही.
मी ते माझ्या मनात पुरून ठेवलं...... जणू दुसर्‍याच कुणा मुलीचा अनुभव असावा तसं.
सुरूवातीला याचा खूप त्रास झाला असेल. ते कळावं असं माझं वय नव्हतं.
मोठी होता होता, कधी कधी हे आठवलं की मला त्रास व्हायचा.
मोठी झाल्यावर यात माझा काहीच दोष नव्हता, मी मला कोसत बसले नाही.
तरीही ही खूप त्रासदायक आठवण होती.

....................

मी हे अजूनही आईबाबांशी बोलू शकलेले नाही.
मी त्यांना सांगीतलेलंच नाही.

.......................

लग्नानंतर मिलिन्दशी बोलावं, असं बरेचदा वाटून गेलेलं.......
मी शब्दच गोळा करू शकायचे नाही....

...........
आम्ही मॉन्सून वेडींग हा सिनेमा पाहायला गेलेलो. शेवटी शेवटी मी रडायला सुरूवात केली. मी वेड्यासारखी रडत होते. सिनेमा संपला. मी रडत होते.... आम्ही रस्त्यावरून चालत होतो..... मी रडत होते. मिलिन्दला कळेनाच मला काय झालंय ते...... मला वाटतं आम्ही हॉटेलात गेलो.... तिथेही मी रडत होते....... मला रडू आवरताच येत नव्हतं.
किती वर्षांनी त्या घटनेसाठी मी रडून घेतलं.
...................
घरी आल्यावर मी मिलिन्दला सांगीतलं....
इतक्या वर्षांनी..... पहिल्यांदा.... मी कुणाशीतरी बोलले.....
खूप मोकळं मोकळं वाटलं.....

..........
परवा शनिवारी.... सकाळी कोरीगडावर जाऊन आले..... संध्याकाळी/ रात्री आशाकडे छान जेवलो, मस्त गप्पा मारल्या. अख्खा दिवस छान गेलेला. रविवारी सकाळी घरी आले. पुन्हा थोड्यावेळाने झोपले....

अकराला मिलिन्दने उठवलं. ’तुला सत्यमेव जयते पाहायचंय ना?" उठले.... अख्खा एपिसोडभर रडतच होते.

मिलिन्द म्हणाला ," किती हिमतीनं सांगीतलं ना त्यांनी! "

वाटलं आता बोललंच पाहिजे......
तुम्हांला तरी सांगीतलं पाहिजे.
 
...................

Tuesday, July 15, 2014

अनिता

अनिता आमच्या हॉस्टेलवर महिनाभरासाठी आलेली. सुरूवातीला तिची आमची फारशी ओळख नव्हती.
ती उशीरापर्यंत झोपायची. मी कॉलेजला गेल्यावर कधीतरी तिच्या कामावर जायची. रात्री जेवायला नसायची. उशीराच यायची.

ती मिडी/ स्कर्ट असले आमच्यापेक्षा आधुनिक कपडे घालायची. उंच टाचांच्या सॅंडल्स वगैरे, कापलेले केस खांद्यापर्यंत रूळत असायचे.
उशीरा उठायची त्यामुळे दोन-तीन दिवसांनी कधीतरी आंघोळ, स्वच्छता कमीच पण सुगंध फवारून, हलका मेक अप करून तयार!
कुठेतरी रिसेप्शनीस्ट होती. खरं तिच्याकडे दोन - चारच ड्रेस होते पण अत्याधुनिक असे, दुरून महागडे वाटायचे पण नीट पाहिले तर तुळशी बागेतलेच.

आल्यानंतर दहा-बारा दिवसांनी बोलणे झाले असेल.

तिचे लग्न झालेले होते, बरेचदा ती छोटेसे नकली मंगळसूत्र घालायची. सासर शिरूरजवळच्या कुठल्याशा खेड्यातले होते. नवरा स्थानिक पुढार्‍याचा मुलगा होता. मी त्या पुढार्‍याचे नाव ऎकलेले नव्हते. हिला नोकरी करायचीच होती, म्हणून ती इथे राहात होती. मला तिचे कौतुक वाटले.

आणखी एका जरा सविस्तर भेटीत कळले की तिचे आंतरजातीय लग्न होते. ती ब्राह्मण तर नवरा मराठा. पळून जाऊन आळंदीत लग्न केले होते. मुलगा आईला पसंत नव्हता. बहुदा तिच्या कॉलेजमधेच होता. आई जुन्या पुण्यात कुठल्याशा पेठेत राहायची. वडील नव्हते, एक भाऊ आणि आई वाड्यात राहायचे. सासरकडच्या सगळ्यांना पसंत होती, तिकडे काही प्रश्न नव्हता. लवकरच पुण्यात घर घेऊन ती आणि तिचा नवरा असे दोघे इथेच राहणार होते.

एकदा कधीतरी आम्ही आपापल्या आयांबद्दल बोलत होतो, जरा मजेमजेचं तरी आपुलकीचं असं बोलणं चाललेलं.
अनिता म्हणाली, " माझी आई, आई नाही वैरीण आहे. मला आयुष्यभर तोंड दाखवू नकोस म्हणाली आहे. लग्नानंतर सहा महिन्यांनी एकदा भाऊ वाटेत भेटला म्हणून घरी गेले होते. बसले, जरा वेळाने तिला सांगितलं की तीन महिने झाले आहेत. चिडली. उठून माझ्या पोटावर लाथा मारल्या. "पाप आहे" म्हणत होती. त्याने माझं अ‍ॅबॉर्शन झालं. माझं बाळ पडून गेलं. मी तिचं कधीही तोंड पाहणार नाही. कधीही त्या घराचा उंबरठा ओलांडणार नाही. " आम्ही सुन्न झालो. तिही रडत नव्हती. बधीर झालेली.

दुपारी तिला भेटायला किंवा घेऊन जायला कोणीतरी नवर्‍याचा मित्र यायचा, आम्ही कधी त्याला बघितलं नव्हतं. पण तो शीळ घालायचा आणि ही जायची.
 नवर्‍याच्या मित्राबरोबर बाईकवरून जायला काहीच हरकत नव्हती पण त्याने शीळ का घालावी? नीट रितसर आत येऊन बोलावू का नये? असे आपले आम्हांला वाटायचे.
आम्ही तशा मागासलेल्याच होतो.

सासर कसं आहे? असं एकदा विचारत होते तर म्हणाली, "एकदा गेलेय, आठ दहा दिवस राहून आले आहे. सासू आणि नणंदही चांगलीच आहे. नणंद माझ्या एवढीच आहे. तिची मैत्रिण म्हणूनच गेले होते."
" का?"
"अजून गावी कोणाला सांगितलेलं नाही. स्थानिक निवडणुका आहेत, त्या झाल्या की सांगू असं सासर्‍यांनी ठरवलं आहे."
मी उडालेच.
" काय? ही फसवणूक आहे. तुला कळतंय का? तुमचं लग्न कायदेशीर आहे का? तुझ्याकडे काही पुरावा आहे? उद्या लग्न झालेलंच नाही म्हणाले तर? तुझा नवरा फिरला तर? सासरच्यांच्या दबावाखाली आला आणि लग्नच नाकारलं तर? आधी मॅरेज सर्टीफिकेट घेऊन ठेव. लग्नाचे फोटो तुझ्या ताब्यत ठेव. "
मी चिडलेले. मला कळेना, ही मुलगी मूर्ख तर नाही? मला कळतंय ते हिला कळतंय की नाही? मी कितीतरी वेळ तिच्याशी बोलत रहिलेले.
पुन्हा एकदोनदा ति्ला आठवण केली की याबद्दल नवर्‍याशी बोल म्हणून.
मी तिच्याकडे लक्ष द्यायला सुरूवात केली. बोलू, हिला थोडं शहाणं करू असं मला वाटत होतं.
एक दिवस अचानकच आमचा निरोप न घेता दुपारीच ती निघून गेली.
ठरलेला महिना आणि पुढे मला वाटतं दहा - बारा दिवस ती राहिली असेल.
आमच्याकडे कुणाकडेही पत्ता नव्हता. पुन्हा कधी दिसलीही नाही.

मधेच एक दिवस ती कुठे काम करायची, त्या ऑफीसची पार्टी होती, तिकडे खूप वेळ लागणार आणि इतक्या उशीरा आलेलं त्या हॉस्टेलवर चालायचं नाही. मग ती तिथेच राहीली, हॉटेलमधेच! हे आम्हां सगळ्या जणींना खटकलेलं.

आम्ही खरं काय हिची विचित्र गोष्ट म्हणत रहिलो. तिला नावं ठेवली. अर्थात आस्थेनं ऎकून घ्यायचो  पण मदतीचा हात पुढे केला नाही. तो करेकरेतो ती निघूनच गेली आणि आम्ही तिची आठवणही काढत राहिलो नाही.

ती परिस्थितीने कॉलगर्लचं काम करायला लागलेली का? कोण जाणे.
******

मी स्वत:च्या आणि स्त्रियांच्या हक्कांबद्दल जागरूक असले तरी लैंगिकतेच्या बाबतीत अक्षरश: काहीच विचार केलेला नव्हता.
"लैंगिक स्वातंत्र्य आणि माझ्या शरीरावर माझा हक्क" हे मी शिकले, लैंगिकतेचं राजकारण शिकले ती स्त्री अभ्यास केंद्रात.
तोवर बायका बायकांमधे लैंगिकतेमुळे केलं जाणारं विभाजन मला मान्यच असावं, मी काही विचारच केलेला नव्हता त्यावर.
आता मी सगळ्या स्त्रियांकडे समानतेने बघू शकते.

*******
कदाचित तेव्हा मी तिला काही मदत करू शकलेही नसते.
आता करू शकेन.

********

आपल्या मुलीने जातीबाहेर लग्न केलं, एवढं कारणंही आईचं मुलीवरचं प्रेम संपायला पुरतं. 
अशा आया असतात.
आई थोडी उदार झाली असती, तिला आपल्या मुलीवर थोडसं प्रेम करता आलं असतं तर...
एक अनिता कदाचित वाचली असती.
*******

Monday, June 30, 2014

शीला

शीला केरळातल्या पट्टनमतिट्टाहून आलेली. महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावातल्या इंजिनीअरींग कॉलेजमधून तिने BE केलं होतं. नंतर इथे पुण्यात नोकरी करत होती. आमच्या हॉस्टेलवर राहात होती.

साधी सरळ मुलगी! प्रेमात पडली होती. लग्न ठरलेलं. ते चार वर्षांनी करायचं हे ही ठरलेलं. तो मुलगा मुंबईत राहायचा. मुंबईपेक्षा एकट्या मुलीला राहायला पुणं सुरक्षित! म्हणून आईवडिलांनी वर्षभर पुण्यात राहून नोकरी करण्याला परवानगी दिली होती.

आता आई-बाबांचं ऎकायचं, नंतर नवर्‍याचं, मग संसार मुलं.... तिचं अगदी पक्कं होतं.

आमच्यापेक्षा तिचं जरा निराळं होतं. आमचं सार्‍याजणींचं भविष्य धुसर, अनिश्चित होतं. तिचं दृष्टीपथात. त्यापेक्षाही खरं प्रेमाने तिला वर उचललेलं.

तिच्या प्रेमकथेच्या खरं मजाच होत्या.

एक म्हणजे दोघंही पट्टनमतिट्टाच्या एकाच हॉस्पीटलमधे चार महिन्यांच्या अंतराने जन्मलेले.

दुसरं..

ही दोघं आणि आणखीही आठ-दहा जण असतील, इथे शिकायला आलेले. हा खरं तर तिच्या मैत्रिणीचा चांगला मित्र! तिघेही एकाच वर्गात. पण शीला त्याच्याशी फारसं बोलत नसे. दोघांचं कसं जमलं, हा तपशील मी विसरले आहे. पण दोघांचं नक्की ठरल्यावर त्यांनी घरी सांगायच्या आत, या दोघांना त्या छोट्या गावातल्या शीलाच्या एका दूरच्या काकांनी पाहिलं. तेच तिचे local guardian होते. योगायोगाने चारच दिवसांनी ते गावी, पट्टनमतिट्टाला जाणार होते. दोघी मैत्रिणी काळजीत पडल्या. ते काका घरी जाऊन हे नक्की सांगणार! मग घरी कसा गोंधळ माजेल, कदाचित फिसकटेल हे दिसायला लागलं. मग काकांच्या आधी आपणच घरी सांगावं हा विचार करून रिझर्वेशन नसताना तसाच प्रवास करत दोघी मैत्रिणी गावी गेल्या. शीला अशी अचानक कशी काय आली? आई-बाबांना कळेना.

हिने सांगितलं की ते काका उद्या-परवा येणार आहेत, त्यांनी मला एका मुलाबरोबर पाहिलं, ते येऊन काही सांगतील तर त्याच्या आत आपणच खुलासा करावा म्हणून आले आहे. आई-बाबा म्हणाले, " अगं, वेडी की काय तू? तेव्हढ्यासाठी आलीस? त्यांनी काहीही सांगितलं तरी आमचा काय आमच्या मुलीवर विश्वास नाही? आमची खात्री आहे. तू काहीही काळजी करू नकोस. " ........ झालं! इथवर गोष्ट आली की ख्यॅ! ख्यॅ! ख्यॅ! आम्ही नुसत्या हसायला लागायचो. मग काकांना जी शंका आली ती खरीच आहे....... वगैरे वगैरे सांगताना तिची उडालेली त्रेधातिरीपीट ऎकायला जाम मजा यायची.

एकाच जाती-पोटजातीतल्या आणि अनुरूप असणार्‍या दोघांच्या लग्नाला दोन्हीकडच्यांनीही पाठिंबा द्यावा यात नवल ते काय?

तिचं सगळं शिस्तीत चालायचं. सकाळी उठल्यावर प्रार्थना, झोपताना देवाचे आभार, वगैरे वगैरे. तिच्या आयुष्यात आलेल्या ’त्याच्या’ वर ती खूष होती आणि हे करणार्‍या देवाबद्दल कृतज्ञ!



आमच्या हॉस्टेलच्या शेजारी दर गुरूवारी सकाळी भजनी मंडळाच्या बायका जमून भजनं म्हणत. जो काही टिपेचा सूर लावीत! बस्स! मी म्हणायचे काय कटकट आहे! आणि माझ्या दोन मैत्रिणी नसरीन आणि शीला मला समजावीत असत की " असं म्हणू नये. देवाचं नाव आपोआप कानावर पडतं. " :)

नसरीन सारखीच शीला ही एकमेव ख्रिश्चन मैत्रिण!

तिचे बाबा तिकडे चर्चमधे फादर होते. म्हणजे तो हुद्दा की संबोधन कोण जाणे!

तिचे घरी आणि त्याला मुंबईला फोन करण्याचे दिवस ठरलेले होते. (तिचा पगार ती जपून वापरत असे.) मुंबईला फोन केला की आधी नणंदेशी किंवा सासूबाईंशी अदबीने बोलणं मग त्याच्याशी. तेव्हा सर्रास मोबाईल नव्हते, आम्ही सगळ्याच १/४ रेट झाल्यावर घरी फोन करत असू.

ते दोघे एकाआड एका रविवारी भेटत असत. बरेचदा लोणावळ्याला.  दोघांनांही ते बरे पडे.

एकदा काय निरोपात गडबड झाली माहित नाही पण ही लोणावळ्याला गेली आणि तो आलाच नाही. आम्ही कुठे कुठे भटकायला गेलेलो परत हॉस्टेलवर आलो तर ही पांघरूण घेऊन झोपलेली. कुणाशी काही बोलेना. रडतच असलेली. आम्हीही शांत बसलो. तेव्हा काय किंवा नंतर काय कधीही आम्ही या प्रसंगाची खिल्ली उडवली नाही.

एकदा कधीतरी लोकरीच्या विणकामाचा विषय निघाला, मी शिकवू शकेन म्हंटल्यावर दोघी- तिघीजणी जाऊन तुळशीबागेतून लोकर , सुया घेऊन आल्या. मी काहीतरी साधीशी विण शिकवली असेल. नसरीनने पण कुणासाठीतरी करायला घेतला. शीलाला आपण त्याच्यासाठी स्वेटर विणतोय हे इतकं भारी वाटत होतं. मला म्हणाली, "तुझं लग्न ठरलं की तुही एक छानसा विण. "

" मी? ह्या!"

" कशी गं तू? तुला काहीच नवर्‍यासाठी करायला नको आहे. त्याला किती छान वाटेल! विचार करून बघ. "

" मला वाटतं, ही अशी भेट मला मिळाली तर मला किती छान वाटेल! तुम्ही स्वत:ला छान वाटण्याचा जरा विचार करून बघा. " :)

त्या रविवारी तो यायचा होता. मुंबईहून पुण्याला. त्याला साडी नेसलेली आवडते म्हणून शीला एक साडी घेऊन आली होती. ती तिला नेसायची होती. इतक्या लगेच ब्लाऊज कसा शिवून मिळेल? मग काय सगळ्याच जणी सल्ले द्यायला तयार! रेडीमेड कुठे मिळेल? पासून काळा चालेल, पर्यंत. ती कॉटनची काळ्यावर डिझाईन असलेली साडी होती. मी म्हणाले, " तुला अगदी मॅंचिग हवा आहे ना? मग काय कर, तुझ्याकडे काळा ब्लाऊज आहेच ना, त्याच्या नुसत्या बाह्या बदल. साडीच्या आतल्या बाजूकडून बाह्या कापून घ्यायच्या आणि जोडायच्या, कोणीही हे पटकन करून देईल. "

"वा!" ती एकदम खूष झाली.

पण दोन दिवसांत हे करून देईल असा कोणी टेलर मिळाला नाही.

" विद्या, तूच दे ना करून. "

" बरं. " मीही उदारपणे म्हणाले.

रविवारी सगळ्याजणी कुठे कुठे गेलेल्या. आम्ही दोघीच होतो. तो दुपारी चारला यायचा होता.

मी उशीरा उठून सावकाश आवरून, पेपर वाचून, निवान्तच. तिने जुना ब्लाऊज उसवून ठेवलेला, आणि माझ्या मागे पुढे.

जेवायला दोघीच होतो. शेवटी ती म्हणाली, " विद्या, शिवून देणारेस की नाही?"

" देते की! कितीसा वेळ लागणारे!"

" जेवण झालं की दुसरं काहीही करू नकोस."

जेवणानंतर खरंच मी शिवायला घेतला.

मग माझ्याजवळ बसून त्याच्याबद्दल काय काय सांगायला लागली.

ती इतकी त्याच्या प्रेमात बुडालेली होती आणि इतकी सुंदर दिसत होती.

म्हणाली, " त्याला दुबईला जाऊन खूप पैसा कमवायचाय. दोन-चार वर्षच जाईन म्हणतो आहे. आमच्याकडे हे फार आहे. पुरूषमंडळी आखातात आणि बरेचदा बायका इकडॆ. लग्न झालं तरी आम्हांला एकत्र राहायला मिळणार की नाही कोण जाणे. "

ती काळजीतही होती आणि सुखातही.

मी नुसती ऎकत होते.

ती बोलत होती.

प्रेमामुळे माणसं कशी फुलून येतात, कशी तरंगायला लागतात हे मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिलं ते तेव्हा!

तिचाही स्वर इतका सलगीचा होता, इतका आतला होता.

नुसत्या मैत्रीने , स्नेहाने मी न्हाऊन निघत होते.



माणसाला काय बरं हवं असतं?

आतलं आतलं बोलता यावं असं एक माणूस!



शीलाही पत्त्यासगट कुठेतरी हरवून गेली.

पट्टनमतिट्टा ? की मुंबई? की दुबई?

कुठे आहेस तू?



स्वत:ला छान वाटावं याचा विचार करून बघितलास की नाही अजूनतरी?


********


Saturday, June 28, 2014

माझ्या सासूबाई

माझ्या सासूबाई - सुमती भिडे. आधीच्या सुधा आठवले.त्यांनी  मला कधीच प्रत्यक्ष पाहिलं नाही. कारण त्या आमच्या लग्नाच्या आधी काही वर्ष दृष्टीहीन झाल्या होत्या.
.........

लग्नाच्याबाबतीत निर्णय घेताना माझ्या मनावर ताण आला.
त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. हे गृहित धरुन मगच "हो" असा निर्णय घ्यायचा आणि एकदा "हो" असा निर्णय घेतल्यावर मग त्याचा व्यवस्थित स्विकार करायचा हे मी मला सांगत होते.

हो असं ठरलं.

माझ्या लग्नाच्या सर्व खरेदी साठी त्या आमच्याबरोबर आल्या. प्रत्येक खरेदीच्यावेळी त्यांचं असं मत होतं. अगदी डिझाईन, रंग इ... बाबत. त्यांच्या दोघी बहिणींच्या मदतीने त्यांनी संपूर्ण कार्य पार पाडलं.

आता माझा खरा कसोटीचा काळ चालू झाला.
मला स्वयंपाकाची सवय नव्हती. भाज्या फारशा येत नव्हत्या. पण आता ही आपलीच जबाबदारी आहे असं होतं त्यामुळे ताण होता. मी नोकरी करत होते. सकाळी नऊ वाजता जायचे ते संध्याकाळी सहा वाजता यायचे.

लग्नानंतर नोकरी चालू झाली. पहिल्या दिवशी सकाळचं करुन कामावर गेले. संध्याकाळी घरी आले तर सगळा स्वयंपाक तयार. अगदी कुकर सुध्दा. मला म्हणाल्या अगं माझा वेळ जात नाही कंटाळा येतो. मी करत जाईन संध्याकाळचं. तूही दमतेस. मला फक्त पोळ्या नाही जमत. लाटताना पोळपाट कुठं संपतो त्याचा अंदाज नाही येत. पोळ्या बाई करतील, बाकी मी करेन. त्यांनी ते ठरवूनच टाकलं होतं. 

हळूहळू जरा आमची एकमेकींशी ओळख झाल्यावर मला त्यांनी वेगवेगळ्या भाज्या शिकवायला सुरुवात केली. भाजी शिकून झाली की मला ती लिहून ठेवायला सांगायच्या. प्रमाण सुध्दा अचूक असायचं. त्यांचं माहेर नागपूरचं असल्याने पदार्थ पण चमचमीत असायचे. मला म्हणायच्या सगळ्या गोष्टी तू एकदा शिकून घे. मग आवडल्या तर कर. मग माझी एक पाककृतीची वही तयार झाली.
घराची स्वच्छता, आवराआवरी त्याच करायच्या. किराणा सामान संपत आलं की त्यांनी मनात यादी केलेलीच असायची. ती फक्त कागदावर उतरवायची मदत मी करायचे.

दिवाळी मधे मला म्हणाल्या आनंदला तू तेल लाव आणि तुला मी लावते. कदाचित स्पर्शातून त्यांना मला पाहिचं असेल.
दिवाळीत फराळाच्या गोष्टी करण्यासाठी त्यांची मदत होणार नव्हती. त्यामुळे त्यांनी मला स्पष्टपणे सांगून टाकलं, काहीही घरी करण्यात कष्ट करु नकोस. सरळ चितळ्यांकडून विकत आण. मला एकदम हलकच वाटलं.

उन्हाळाच्या सुट्टीत मला म्हणाल्या साखर आंब्याच्या कै-या आणून दे. मी त्यांना सामान आणून दिलं. एक दिवस कामावरुन घरी आले तर साखर आंबा तय्यार. असच लोणचं पण घातलं. 

आमची ओळख अजून विस्तारली. जवळीक वाढली. तशी त्यांनी मग मला संसाराच्या व्यवस्थापनाबाबत टीप्स द्यायला सुरुवात केली. गुंतवणूक, बचत याबाबत सल्ला दिला. मला माझं स्वत:च स्वतंत्र बचत खातं उघडायाल सांगितलं. म्हणाल्या तुझे तू स्वतंत्रपणे पैसे ह्यामधे ठेव. घरात खर्च करुन टाकू नकोस.

घरी एकटं बसून त्यांना कंटाळा यायचा. मग कधी कधी गावात बहिणीकडे जायच्या. एकट्य़ा जायच्या. मी सोडू का असं विचारल्यावर म्हणायच्या कशाला तुझा वेळ घालवते मला माहिती आहे रस्ता. एक दिवस मी त्यांच्या बरोबर गेले. तेव्हा बघितलं त्या सतत रिक्षावाल्यांशी बोलत होत्या. कुठल्या भागात आलो आहोत हे तपासत होत्या. शेवटपर्यंत त्यांनी अचूक ठिकाणं सांगितली. नगरला सुध्दा मोठ्या मुलाकडे त्या कधीकधी एकट्य़ाने प्रवास करुन जायच्या. 

टि व्ही वरच्या सिरीयल, बातम्या, इतर कार्यक्रम त्या आवडीने बघायच्या. हो बघायच्याच. मी घरी आले की कार्यक्रमाची सविस्तर माहिती द्यायच्या. 

त्यांना आता नातवंड येण्याकडे डोळे लागले होते. माझ्यावर त्यांच बारीक लक्ष असायचं. प्रत्येक महिन्यात पाळी येऊन गेली का ते विचारायच्या. मग हळूहळू कळलं की मला औषध - उपचाराची गरज आहे. दवाखान्याच्या वा-या, मनावरचा ताण हे सगळं सुरु झालं. त्यांना ते जाणवत होतं. एक दिवस मला म्हणाल्या, एक लक्षात घे मुलं झाली म्हणजे आकाशाला हात टेकले असं अजिबात नाही. मुलं झाली की संसार परिपूर्ण असं नसतं. शेवटी माणुसकी महत्वाची.
त्यानंतर त्यांनी मला कधीच त्याबाबतीत विचारलं नाही.
.............

त्यांचा संसार खूप खडतर झाला.
आनंदच्या जन्मानंतर डायबेटिस झाला. पण संसारच्या जबाबदारीमुळे कधीच त्याच्याकडे लक्ष दिलं गेलं नाही. आणि त्याचा परिणाम दृष्टी जाण्यापर्यंत झाला.

नव-याच्या व एका मुलाच्या अकाली निधनाने खचून न जाता त्यांनी त्यांच्या जबाबदा-या खंबीरपणे पार पाडल्या.

"त्या परावलंबी आहेत त्यामुळे आपल्याला त्यांना सांभाळावं लागणार आहे. " हे माझं मत पूर्ण चुकीचं ठरलं. मी मात्र छोट्य़ा छोट्य़ा गोष्टींसाठी त्यांच्यावर अवलंबून रहात असे.

खूप स्वाभिमानाने त्या जगल्या. त्यांना कोणाला सांभाळायची वेळ येऊ नये अशी त्यांची इच्छा होती. अचानक एक दिवस रात्री पाठ दुखीचा त्रास सुरु झाला आणि ह्र्दय विकाराच्या झटक्याने त्या सकाळी आम्हाला कायमच्या सोडून गेल्या.
.......

त्यांनी शिकवलेल्या भाज्या मी करते. स्वयंपाघरातील छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी सांगितल्याप्रमाणे पाळते. त्या आजही माझ्याबरोबर आहेतच.

Thursday, June 26, 2014

शकुंतलामावशी

   आम्ही वाडयातून आमच्या फ्लॅटमध्ये रहायला गेलो तेव्हा मी चार पाच वर्षांची असेन आणि माझा भाऊ वर्षादीड वर्षांचा.आईची बाळंतपणाची रजा जसजशी संपत आली तसा आम्हाला संभाळायचा प्रश्न पुढे उभा राहीला. कोणीतरी संभाळायला ठेऊ या म्हणून शोध सुरु झाला.कारण घरात आजोबा होते पण माझी आजी पॅरेलिसीसने अंथरुणात होती.आई बाबांना दोघांनाही नोकरी करणे भाग होते.कीर्लोस्करांच्या बंगल्यावर बाबा तेव्हा साहेबांचे पी.ए. म्हणून काम बघत होते.तेथे स्वयंपाकाला असणारा बाळू सोलापूरचा रहाणारा.त्याच्या ओळखीची एक बाई.नव-याने सोडून दिलेली.....शकुंतला नाव तिचं.तिला आमच्याकडे रहायला ठेवा असा बाळूचा आग्रह.तिची पण सोय होईल आणि मुलांनाही संभाळेल.अतिशय प्रामाणिक आहे.त्याच्यावर विश्वास ठेवून बाबांनी तिला पुण्याला आमच्याकडे बोलावून घेतले.
   शकुंतला बाई.काय म्हणायचे त्यांना ?  कोणत्या गावाच्या ? कोणाच्या कोण...कोणावर  तरी विश्वास ठेवून आमच्या घराचा आसरा मिळेल अश्या आशेने आमच्याकडे आल्या आणि आमच्यातल्याच एक झाल्या. एखादी आजी काय करेल इतक्या प्रेमाने तिने आम्हा दोघांना लहानाचे मोठे केलं.अतिशय शिस्तीच्या,प्रसंगी धाक दाखवून पण अतिशय प्रेमळ.आमच्या झोपायच्या,खाण्यापिण्याच्या वेळा अगदी चोख सांभाळणारी.तिच्या हातच्या पातळ तव्यावरच्या भाक-या आणि झणझणीत पिठलं ......त्याची चव आजूनही जिभेवर आहे.मला एकदा हुक्की आली.मला स्वयंपाक शिकायचा म्हणून...तिने मला पहील्यांदा भाकरी शिकवली तो दिवस आजही मनात ताजा आहे.पहील्या पहील्यांदा माझ्या हातून खूपच जाड भाकरी थापली जायची.त्याला चिरा पडायच्या,फुगायची पण नाही.पण तेथून ती भाकरी पातळ जमेपर्यंतचे तिचे शिकवणे आजही आठवते.जेव्हा जेव्हा आजही मी भाकरी करते तेव्हा तेव्हा एकही दिवस असा जात नाही की मावशींची आठवण येत नाही. रावण पिठलं...हे त्यांनीच मला शिकवलं .म्हणाल्या असा ठसका लागायला हवा तेव्हा जमलं खरं पिठलं.त्यांची वाक्य आजही कानात आहेत.
    आमची आजारपण,आमचे धडपडणे....एक ना अनेक उद्योग.आईने डोळे झाकून त्यांच्यावर सोपवून नोकरी केली.तेव्हा रजाही सारख्या मिळायच्या नाहीत.आणि रजा घ्यायची गरजही कधी वाटली नाही.इतक्या प्रामाणिक,विश्वासू आणि प्रेमळ होत्या त्या. स्वत:ची कामे स्वत: करणार आणि दुस-यासाठीही झिजणार.आमच्या घरातच त्यांनी त्यांचं म्हातारपण घालवलं .त्या ऎंशी वर्षाच्या असतील त्यांना गुदघेदुखीचा त्रास अनेक वर्षे होता.आणि शेवटी शेवटी तर त्यांना चालणेही अवघड होऊन बसलं.जमीनीवर खुरडत खुरडत चालायच्या त्यातच म्हातारपणामुळे डोळ्यांना दिसणं कमी झालं होतं.एक दिवस आम्हाला म्हणाल्या मला एखाद्या वृद्धाश्रमात ठेवा साहेब .आता मला होत नाही आणि तुम्ही माझं केलेलं मला आवडणार नाही.माझे शेवटचे जे काही दिवस राहीलेत ते मी तेथे काढेन.आम्ही सगळ्यांनीच त्या गोष्टीला नकार दिला.पण त्यांचा एकच हट्ट की तुम्ही माझं करायच नाही.या कल्पनेनेच मला आधीच मरण येईल.आई बाबांनी ऎकल नाही.त्याचा त्यांनी इतका धसका घेतला की त्या आजारी पडल्या आणि अंथरुणाला खिळल्या.अनेक दिवस औषधे चालू होती पण काही उपयोग झाला नाही.त्यांच्या गावी सोलापूरला त्यांचा भाचा होता त्याला बोलावून घ्या म्हणाल्या.तेव्हा पत्र पाठवून त्याला बोलावून घेतले.आमच्या हातून त्यांना सेवा करुन घ्यायची नव्हती.तो गावी त्यांना घेऊन गेला आणि दहा बारा दिवसातच त्या गेल्या.त्यांचा शेवट आमच्या घरातच व्हावा असे आम्हा प्रत्येकाला वाटत होते.पण ते घडले नाही.माझ्या घडण्याच्या काळातली आई बाबांच्या इतकीच महत्वाची व्यक्ती म्हणजे शकुंतला मावशी होत्या.
   माझ्या आयुष्यात अशी काही माणसे आहेत की ज्यांच्या नसण्याने मी अपूर्ण रहाते त्यापैकी एक शकुंतलामावशी....

Wednesday, June 25, 2014

आजी

आजी,
गेले दोन दिवस मी तुझं लिखाण वाचते आहे. तू लिहिलेला चारपाचशे पानांचा गठ्ठा तू गेल्यावर मी माझ्याकडे घेऊन आले. अधेमधे, थोडंथोडं वाचत होते. या दोनतीन दिवसात मात्र ते बरंचसं वाचून काढलं. या तुझ्या लिखाणावरची सर्वात आधीची तारीख २००५ सालातली दिसते आहे. शेवटच्या दोनतीन वर्षात एवढं सगळं लिहिलंयस. तुझं बारीक बारीक अक्षर, लिहिताना कागदावरच्या जागेचा पुरेपूर उपयोग करुन घेण्याची तुझी सवय हे सगळं माझ्या खूप खूप ओळखीचं आहे. वाचतानाही हे सगळं तुझ्या आवाजातच माझ्यापर्यंत पोचतं आहे. अगदी तुझ्या हावभावांसहित. तुझ्या बालपणीच्या, शाळेच्या, लग्नाच्या, वाफेगावच्या लोकांच्या, एवढंच नाही तर तुझ्यापर्यंत कुणाकुणाकडून तुझ्यापर्यंत पोचलेल्या तुझ्या जन्माआधीच्याही गोष्टी यात  आहेत. शंभरेक वर्षांचा कालपट माझ्यासमोर तुकड्यातुकड्याने उलगडतो आहे.
शाळकरी वयातली तू! आई-वडील, काका-काकू, आजी, सोवळी जिजाआत्या, भावंडं, चुलत भावंडं असं मोठं कुटुंब. तुझी आजी म्हणजे घरातलं सर्वात महत्वाचं माणूस. तिची नातवंडांवरची माया, पण त्याचवेळी ती तुझ्या आईला करीत असलेला सासुरवास, तुझी काकू आणि आई यांच्यात ती करत असलेला भेदभाव, तुझ्या आजोळच्या- ग्वाल्हेर, ब्रह्मावर्ताच्या- गोष्टी... आणि तुझ्या सख्ख्या मैत्रिणीबरोबरच्या- शरयू (बावडेकरच ना गं? आपण एकदा गेलो होतो त्यांच्याकडे) बरोबरच्या आठवणी वाचताना तर पाणीच आलं डोळ्यातून. तुम्ही शाळेच्या वाटेवरच्या कबरस्तानातून चिंचा गोळा करयचात आणि मारुतीच्या देवळात बसून खायचात :) भांडणं झाली की तू छोट्या माईच्या हाती शरयूला पाटीवर चिठ्ठी पाठवायचीस आणि तुमची भांडणं मिटवायचीस :) शाळेत जायच्या वाटेवर एकदा तू तुला त्रास देणार्‍या एका मुलाला बेदम मारलं होतंस. हे गुपित फक्त शरयूलाच सांगितलंस कारण घरी सांगितलं तर शाळाच बंद होण्याची धास्ती! तू शाळेत अगदी हुशार विद्यार्थिनी होतीस. सगळ्या विषयात पहिली येऊन महिन्याला बारा आणे शिष्यवृत्ती मिळवणारी! तुला खूप शिकायचं होतं. डॉक्टर व्हायचं होतं. तुझे काका सोलापुरातले सुविख्यात सर्जन. त्यांचा तुला पाठिंबा होता. त्यामुळेच तुला हायस्कूलचे शिक्षण घेता आले. तू तिथल्या सेवासदनात शिकत होतीस. घरी मात्र तुझ्या लग्नाचं बघत होते. तुझ्या आजीची शेवटची इच्छाच मुळी ’सुमतीचं लग्न वर्षाच्या आत करा’ अशी. त्यापुढे काकांचंही काही चाललं नाही. तुला शिकता आलं असतं तर तू सहजच डॉक्टर होऊ शकली असतीस. ती खंत तू तुझ्या संसाराच्या रामरगाड्यातून वेळ काढून होमिओपॅथीचा कोर्स करून पूर्ण केलीस का? बारा बाळंतपणं, आठ मुलं, त्यांची शिक्षणं, लग्नं, दुखणीखुपणी, पै-पाहुणे, दिरांच्या संसारांच्या जबाबदार्‍या, या सगळ्यातून वेळ काढलास तरी कधी? वाफेगावातले लोक किती विश्वासाने तुझ्याकडून औषध घेऊन जायचे. घरच्या गुरांच्या आजारपणात गुरांचे डॉक्टर वाफेगावला येऊ शकले नाहीत तेव्हा गुरांनाही होमिओपॅथीच्या गोळ्यांचा मोठा डोस देऊन बरं करणं म्हणजे मात्र कमाल होती हं :)
तू लिहिलंयस, ’आपल्याला शिकता आलं नाही तर किमान नवरा तरी खूप शिकलेला हवा, आपल्याला पडलेल्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर त्यानं पाच मिंटात द्यावं असं वाटायचं. पण तेही नाही घडलं.’ पण पुण्यात रहाता यावं ही इच्छा मात्र पूर्ण झाली.  (आजी पुण्यातून प्रसिद्ध होणारं ’आनंद’ मासिक वाचायची. त्यात येणार्‍या पुण्याच्या, तिथल्या सांस्कृतिक वातावरणाच्या माहितीमुळे तिची इच्छा होती की लग्नानंतर पुण्यात रहायला मिळावं)
माहेरी लाडाकोडात वाढलेली, खूप शिकायचं स्वप्न बघणारी तू, शिक्षण अर्धवट टाकून वाफेगावसारख्या आडगावी, भल्या थोरल्या वाड्यात, दुसरेपणाची बायको म्हणून आलीस तेव्हा काय वाटलं असेल तुला? लग्नानंतरच्या पहिल्या दिवशी, सगळ्या बायका आपापल्या नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवताहेत हे पाहिल्यावर दुसर्‍या दिवसापासून तू पुरुषांची जेवणं झाल्याबरोब्बर चपळाईने सगळ्यांची ताटं घासून टाकलीस आणि पुन्हा कधीही नवर्‍याच्या उष्ट्या ताटात जेवली नाहीस. मला तो प्रसंग वाचताना हसू आलं, पण खरंच, तुझ्यासारख्या बायकांसाठी किती कसरतीचं होतं ना त्या काळात स्वाभिमानाने जगणं? आजोबा सरळमार्गी, समजुतदार, भले होते, ही एक मोठीच जमेची बाब. नाहीतर तिथेही तुला लढत राहावं लागलं असतं. त्यांच्या नोकरीच्या निमित्ताने तुम्ही कुठेकुठे फिरलात आणि मग पुण्यात येऊन स्थिरावलात. तुझं ’आनंद’ मासिकातलं पुणं तुला मिळालं. छान वाटलं असेल ना तेव्हा? पुण्यात मुला-मुलींची शिक्षणं होऊन थोडी स्थिरता आल्यावर तुम्ही दोघांनी परत वाफेगावचं घर उघडलंत. पुढे कधीतरी बाबा तिथे आले, मग लग्नानंतर आई, मग मी, अभिजीत. माझी शाळा सुरु होईपर्यंतचा वाफेगावातला काळ अगदी धूसर आठवतो मला. पुढे आम्ही पंढरपूरला गेलो आणि मग वाफेगाव सुट्ट्यांपुरतं राहिलं. त्या घरातली तू जेव्हा डोळ्यासमोर येतेस, तेव्हा कधी चुलीवर दूध आटवत असतेस, म्हशीचं आंबोण करत असतेस, नऊवारी साडीच्या निर्‍या करुन ती गोलगोल फिरवून, तिची गाठ मारत असतेस, संध्याकाळी ओटीवर बसून सातच्या बातम्या ऐकत असतेस, मथणीपाशी उभं राहून ताक करत असतेस, आणि खूपदा रात्रीच्या वेळी उशाला बारीक कंदील ठेवून वाचता वाचता झोपी गेलेली असतेस. तुला कधी पोथ्या पुराणं वाचताना पाहिलं नाही. पण रोजच्या जगण्याशी जोडून घेणारं सगळं तुला वाचायला आवडायचं. वाफेगावच्या घरात दिवाळी अंकांच्या, मासिकांच्या, पुस्तकांच्या थप्प्याच असायच्या. रिकामा वेळ मिळाला की तू वाचत असायचीस. तुला कमी झोप पुरायची. मग रात्री जेव्हा कधी जाग यायची तेव्हा उशाला ठेवलेला कंदील मोठा करून तू वाचत बसायचीस. पुस्तकांएवढीच तुला माणसंही हवीशी असायची. वाफेगावच्या घरात सतत माणसांचा राबता असे. शेतातल्या कामांच्या, गाईगुरांच्या निमित्ताने कोणी येत, कोणी ताक, कोरड्यास मागायला येत, कोणाला औषध हवं असे, कोणी उगाचच टाईमपासला येत. तुझी तासातासाला चहाची फेरी व्हायची. जरा थांबलं की एखादा कपभर च्या त्यांनाही मिळे. रात्रीच्या वेळी तर झोपायला येणार्‍या मंडळींनी ओसरी भरून जाई.
मला तू सांगायचीस त्या गोष्टी आठवतात. तुझ्या गोष्टी म्हणजे बाबा-काका-आत्यांच्या लहानपणाचे मजेमजेचे प्रसंग, तुमच्या पुण्यातल्या घरी येणारे सगळे विचित्र पाहुणे, त्यांना तुम्ही ठेवलेली गंमतीदार नावं, चाळीतल्या गमती, तुझ्या लहानपणच्या आठवणी. ते सगळे प्रसंग पण तू केवढी खुलवून खुलवून सांगायचीस. पुन्हा प्रत्येकाच्या हुबेहूब नकलाही.
एका सुट्टीत आम्ही वाफेगावला आलो होतो आणि मला, शामूला आणि नाश्कूला तिथल्या मुलांसारखी फडक्यात भाकरी-भाजी बांधून शेतात न्यायची होती. तू खूप हसली होतीस पण आम्हाला तिघांना वांग्याचं भरीत आणि भाकरी फडक्यात बांधून दिली होतीस. आणि आपल्या घरच्या मांजरांची गंमत? मांजराच्या डोक्यावर तुपाचा थेंब टाकायचा. त्याला तुपाचा वास कुठून येतो ते कळतच नसे. मग ते आपल्याच डोक्यावर आहे हे कळल्यावर ते आपला पंजा डोक्यावरुन फिरवून पंजा चाटत बसे. आणि आपण सगळे त्याच्या पंजा चाटण्याची नक्कल करत हसत बसायचो.
आम्ही मोठे होत गेलो तसं आमचं वाफेगावला येणंही कमी होत गेलं. कॉलेजात असताना मी एकदा वाफेगावला आले होते. तेव्हा वाफेगावच्या बायकांबद्दल तू मला केवढं काय काय सांगितलं होतंस. समोरची रखमा, शकी-उशी, भामा, गोदाबाई, द्वारका, प्रत्येकीची वेगळी कथा. मी ते ऐकून हडबडून गेले होते. या सोसणार्‍या बायकांच्या कहाण्या तुझ्यापर्यंत पोचत होत्या कारण त्या बायकांना तुझ्याबद्दल विश्वास होता. तू त्यांच्या व्यथा ऐकून घ्यायचीस, जमेल तसा त्यांना मदतीचा हात द्यायचीस. रखमाला कित्येकदा घरी जेवायला द्यायचे नाहीत. ती आपल्या ओसरीवर झोपायला यायची. तू, आईनं कधी तिला उपाशीपोटी झोपू दिलं नाही.  विमलबाई तिच्या छोट्या मुलाला अफूची गोळी देऊन कामाला जायची, तिला तू परोपरीचं सांगून, मुलासाठी दुधाची सोय करून ते बंद करायला लावलं होतंस. हं, पण याचबरोबर तिथल्या तरूण मुलामुलींच्या मुक्त जगण्याच्या गोष्टीही तू सांगितल्या होत्यास....भन्नाट होत्या त्या :)
        धार्मिक रीतीरिवाज, मासिक पाळी अशा बाबतीत तर तुझे विचार बंडखोरच होते. तरूण मुलींनी उपासतापास अजिबात करु नयेत चांगलं खाऊनपिऊन असावं असं तू कितीजणींना सांगायचीस.  आजोबांच्या वर्षश्राद्धालाही कसले विधी वगैरे न करता एका विद्यार्थ्याला तू मदत करायचीस.
  आता तू नाहीस आणि वाफेगावचाही संबंध संपल्यातच जमा. तीन वर्षांपूर्वी तिथे गेले होते तेव्हा आपल्या घराच्या दगडमातीच्या ढिगार्‍यातून फिरून आले. मागच्या दारातला शेवगा आणि सायली सोडता काहीच शिल्लक नाही तिथे.
एकदा तू विचारलं होतंस नवरा कसा हवाय तुला? तेव्हा लग्नाबिग्नाचं काही डोक्यात नव्हतं माझ्या. मी काहीतरी उत्तर दिलं असेल. तू म्हणालीस, ’शिक्षण वगैरे काय गं, ते असणारच. आपल्याकडे लग्नाची मुलं बर्‍यापैकी सुस्थिरही असतात. पण हे थोडं कमीजास्त असलं तरी चालेल. तो माणूस म्हणून कसा आहे त्याची पारख व्हायला हवी, तो निर्व्यसनी आणि निरोगी असायला असावा हे मला फार महत्वाचं वाटतं.’
आमच्या लग्नाला नाही येऊ शकलीस तू. लग्नाआधी दहा दिवस वाफेगावला पाय घसरून पडल्याचं निमित्त झालं आणि मग हिंडणंफिरणंच थांबलं तुझं. हट्टी होतीस हं तू. आधीच आली असतीस पळसदेवला तर हे टळलंही असतं कदाचित. पण ऐकलं नाहीस. शेवटची तब्बल नऊ वर्षे तुला तशी काढावी लागली. पुस्तकं तर शेवटपर्यंत होतीच तुझ्याबरोबर. नंतर या लिखाणानंही तुला खूप सोबत केली असणार. तुझ्यासारख्या बाईसाठी ते परावलंबी आयुष्य जगणं किती जड असणार त्याची कल्पना आहे मला. तुझ्या लिखाणातूनही ते डोकावतंय अधूनमधून. त्याबरोबरच आतापर्य़ंत ऐकलेल्या अनेक कौटुंबिक गोष्टींमागची तुझी भूमिका, तुझी बाजूही कळते आहे. या सगळ्यातून माझ्या मनातली तुझी प्रतिमा अधिकच उजळत जाते आहे.
        या लिखाणाच्या माध्यमातून तू अजूनही माझ्याजवळ आहेस हे खूप छान आहे..

-अश्विनी

Sunday, June 15, 2014

नसरीन

मी पहिल्यांदा वसतिगृहात राहायला गेले आणि दुसर्‍याच दिवशी नसरीन गावाहून आली. कोकणात तिचं गाव होतं. तिला वसतिगृहात येऊन महिना होऊन गेला होता.

तिच्या वडिलांचा आणि भावांचा गावी काहीतरी व्यवसाय होता. पुण्यातल्या कुलकर्णी ब्रदर्स नावाच्या अप्पा बळवंत चौकातल्या दुकानाशी त्यांचे व्यवहार चालायचे. गावाहून तिने निरोप आणलेला होता तो द्यायला तिला अप्पा बळवंत चौकात जायचं होतं.

तिचं माझं जुजबी ओळखीचं बोलणं झालं. तिने विचारले, " येतेस का माझ्याबरोबर?" मलाही पुस्तकांची दुकाने असलेला हा चौक एकदा पाहायचाच होता. दोघी शोधत शोधत गेलो. तिच्याबरोबर मी पहिल्यांदा तिथे गेले आणि मग जातच राहिले. कितीतरी पुस्तकं मी रसिक साहित्य च्या लायब्ररीतून आणून वाचली. तो रस्ता माझा रोजचा पायाखालचा रस्ता झाला.



या आमच्या हॉस्टेलमधे बरेच कडक नियम होते, रात्री आठनंतर बाहेर थांबता यायचं नाही.

मग रात्रीचं जेवता जेवता आणि नंतरही आतच गप्पा चालायच्या.

नसरीन सरकारी नोकरीत होती आणि नोकरी अंतर्गतच कुठलासा नऊ-दहा महिन्यांचा कोर्स करायला पुण्यात आली होती.

उंची बेताची, सडपातळ, निमगोरी, कमरेपर्यंत एक वेणी आणि कायम दोन्ही खांद्यांवरून घेतलेली , व्यवस्थित पिना लावलेली ओढणी, अशी ती असायची.

आमच्याकडे बहुभाषिक मुली असल्याने मुख्यत: बोलणे हिंदीतून चालायचे. पण नसरीन अगदी शुद्ध मराठी बोलू शकायची.

माझ्या वर्गात पाचवी ते सातवी एक मुसलमान मुलगी होती, तिचं आडनाव शेख, आम्ही तिला आडनावानेच हाक मारायचो.

त्यानंतर कुणीही मुस्लिम मैत्रिण मला नव्हती, एक नसरीन वगळता.

औरंगाबादमधे, मुसलमान भाजीवाल्या, दुकानदार, कंडक्टर असा मुसलमानांशी काहीतरी संबंध यायचा.

इथे अजिबातच येत नाही.

दोन जगं वेगळी झालेली.

नसरीनच्या मोठ्या भावांची, मला वाटते एका मोठ्या बहीणीचंही लग्न झालेलं होतं. तिला चार-पाच छोटी भाचरं होती आणि त्यांची तिला आठवण यायची. दोन अडीच महिन्यांनी ती जायची तेव्हा इथून त्यांच्यासाठी काय काय छोटी खेळणी घेऊन जायची. तिला त्या लहानग्यांमधे राहण्याची, त्यांचं करण्याची सवय होती.

हळू हळू मला तिनं पंखांखाली घेतलं.

मी उशीरापर्यंत जागायचे आणि उशीरा उठायचे.

ती नऊला जाताना मला उठवून जायची. लोळत लोळत मी तिचं आवरणं, ओढणीला व्यवस्थित पिन लावणं, बघायचे. नऊ नंतर आमच्याकडे गरम पाणी आंघोळीला मिळायचं नाही. कधी कधी ती माझ्यासाठी पाणी आणून ठेवी आणि ते गार होण्याआत आंघोळ उरकायला सांगून जाई. यात माझ्या आंघोळीच्या काळजीपेक्षाही मिळू शकणारं बादलीभर गरम पाणी का सोडायचं? हा तिचा हिशोब असे. :) कारण आमच्या या हॉस्टेलवाल्या दोन्ही काकवा अतिशय खडूस होत्या आणि अत्यंत हिशेबी!

कधीतरी कॉलेजमधून आल्यावर पाहिलं तर माझं टेबल आवरून ठेवलेलं असे. मी म्हणे, " असू दे गं, मला पसारा चालतो."

एके दिवशी खोलीतल्या लहानशा मोरीच्या टाईल्स चकाचक घासून ठेवलेल्या.

मला म्हणाली, "ओळख. काय वेगळं दिसतंय?"

मला इतका वेळ लागला! :)

तर असले काय काय उद्योग करायला तिला आवडायचं.

कितीदातरी तिचा हात पाहून मी भविष्य सांगितलं असेल. अशी एक दोन पुस्तकं वाचून मी त्यातलं काय काय सांगू शकायचे. :)

" तुला ना नसरीन जुळी मुलं होणारेत! इथल्या रेषा बघ." मी असं सांगितल्यावर तिचे चकाकलेले डोळे मी पाहिले आहेत.

म्हणायची, ’तुला बारशाला नक्की बोलवीन."

आमच्या जुन्या हॉस्टेलमधे महिनाभरासाठीच एक मुलगी आलेली, अनिता! (तिच्यावरही कधीतरी लिहिन.)

तर ही अनिता दुपारी मी कॉलेजला गेलेले असताना , माझ्या कॉटवर बसून केस विंचरायची, कारण माझा पलंग खिडकीजवळ.

चार दिवसांनी माझं डोकं खाजायला लागलं. काही सुचेना.

आई माझ्या केसांची खूप काळजी घ्यायची. शाळेत असतानाही आईने कधी माझ्या डोक्यात उवा होऊ दिल्या नाहीत. रोज फणीने विचंरायची. एखादी बया आली असेल उडून तर लगेच काढली जायची.

इथे काय झालं? मला कळेना.

मग नसरीनने फणीने माझे केस विचंरले, उवा काढल्या. ते लायसील घ्यायला माझ्याबरोबर आली.

अगदी मोठ्या बहीणीसारखं, वर मला म्हणाली की भाच्यांच्या केसांचं मीच बघते.

या घ्यायला येण्यावरून आठवलं.

हॉस्टेलला आल्यावर मी सॅनिटरी नॅपकिन्स वापरायला सुरूवात केली, इथे ती कापडं धुणार कुठे? आणि वाळत कुठे घालणार? म्हणून.

ते मी औरंगाबादहून घेऊन यायची. आई मला आणून द्यायची. औषधांच्या दुकानात जाऊन दुकानदाराला ते मागायला मला खूपच लाज वाटायची.

एकदा इथे आणायची वेळ आली तेव्हा नसरीन माझ्याबरोबर आली आणि तिने घेऊन दिले.

वर मला ऎकवलं, "त्यात काय लाजायचंय?"

हळू हळू माझी भीड चेपली.

या जुन्या हॉस्टेलचं बांधकाम निघालं तेव्हा सुदैवानं आम्हा तिघीचौघींना जवळच एक चांगलं हॉस्टेल मिळालं.

इथे आमच्यावर बंधनं नव्हती. नाटक / सिनेमा पाहून मी बाराला परत येऊ शकायचे. डबाही बाहेरून लावता यायचा.

मग काय आम्ही सुटलोच! पण नसरीन नाही.

इथे भिंतीवरही काही लावलं तर चालायचं.

मग माझ्या भिंतीवर मी काही पोस्टर्स, काही कविता लावल्या. जी. एं च्या पत्रातलं एक वाक्य लिहिलं. NO buddy can go home once again , बाकी मुली खवळल्या. हे काय असलं लिहून ठेवलंय. आम्हांला वाचायला लागतंय वगैरे, नसरीन काही म्हणाली नाही, तिची भिंत आहे, तिला हवं ते करू देत.

मी त्याचा अर्थ काय आहे ते सांगितल्यावरही, मुलींना ते खटकायचंच.

नसरीनकडून मी नमाज पडायला शिकायचं ठरवलं आणि थोडंफार शिकलेही बहुदा.

एकही केस दिसू नये अशी काळजी घेऊन ओढणी कशी बांधायची ते आणि अजूनही थोडंफार काही तरी नियमांविषयी वगैरे असेल.

ती काही फार धार्मिक वगैरे नव्हती.

एकदा अशाच काहीतरी गप्पा चाललेल्या. मुलग्यांविषयी, लग्नाविषयी असेल.

मी नेहमी असायचे तशी जोशात कुठल्याही स्वरूपातील हुंडा घेणार्‍या मुलाशी मी लग्न करणार नाही, लग्नानंतर नाव बदलणार नाही, मला रजिस्टर मॅरेजच करायचंय. काय काय मुद्दे मांडून माझी बाजू पटवून देत असणार.

सगळ्यांसमोर नसरीन काही बोलली नाही.

नंतर मला एकटीला विचारलं, " तू बोलते आहेस हे खरंच की वाद घालण्यापुरतंच? "

मी म्हणाले, "खरंच."

" नाहीच मिळाला मनाजोगता मुलगा तर?"

" तर काय? नाही करणार लग्न."

" हे जमवता येईल?"

" हो. जमवीन. बघ तुला लग्नाला बोलवीन."

हे खरंच सोपं नव्हतं , हे आज कळतंय.

मग म्हणाली, "तुझ्या मनासारखं होऊ दे. विद्या, मलाही हुंडा घेणार्‍या, माझ्या नोकरीकडे पाहून लग्न करणार्‍या मुलाशी लग्न करायचं नाहीये. मलाही रजिस्टर लग्न करायला आवडेल, ते काही शक्य नाही. आपल्याला हवा तसा मुलगा कुठे शोधायचा? अम्मीने एक शोधलाय, हुंडा नकोय त्याला पण तो कधीतरी पितो, मला नाही चालायचं."

नसरीन कोर्स संपवून गावी गेली. त्यापूर्वी आठ दिवस तिची धाकटी बहीण आलेली, प्रचंड उत्साही आणि प्रचंड बडबडी!

तिने स्वत:चा स्वत: नवरा शोधलेला. नसरीन अजून लग्न करत नाही म्हणून थांबलेली......

.

नंतर नसरीनचं एक पत्र आलं होतं. देईन देईन म्हणता उत्तर द्यायचं राहून गेलं.

तिला लग्नाची पत्रिका पाठवली होती.

पुन्हा काहीच संपर्क नाही.

नसरीन, तुला शोधून काढायचंच म्हंटलं तर शोधू शकेनच.

पण जग तसं छोटं आहे. कधीतरी पुढ्यात उभी राहशील.

तेव्हा मला सांगशील की जुळ्या मुलांची नावं काय ठेवलीस ते!

त्यातल्या एकाचं मी ठेवणार होते! :)

 

 

Friday, May 30, 2014

छोट्या छोट्या गोष्टी - ५

आम्ही एका मिश्र गटात गप्पा मारत होतो. चर्चा चाललेली. नोकरी करणारी, वरच्या पदावर असणारी बायको पुरूषांना चालते का? असं काहीतरी चाललेलं.
 तिथे गप्पांमधे लग्न होऊन सहा-सात वर्षे झालेली एक मुलगी काय बोलली ते मला तुमच्यापर्यंत पोचवावसं वाटतं आहे.
ती म्हणाली, " मी एका पारंपारिक घरातून आले आहे. समानतेच्या, माझ्या हक्काच्या बर्‍याच गोष्टी मला नवर्‍याने शिकवल्या. मुलगी लहान दोन वर्षांची असताना, तिच्यासाठी नवरा पूर्णवेळ घरी होता. मुलीला छान सांभाळत होता, घरही सांभाळत होता. मी घरी आले की लगेच घर, मुलगी माझ्या ताब्यात, असं नव्हतं. रात्री उठायला लागलं तर, मुलीचं आजारपणही त्याने बघितलं. आता तो नोकरी करतोय आणि मी मुलगी, घर सांभाळते आहे."
 माझं सासर पुरोगामी विचारांचं आहे.
एकदा माझ्या नवर्‍याच्या मित्राच्या लग्नाच्या स्वागत-समारंभाला मी एकटीच सासरी गेलेले, मी आणि माझे सासरे समारंभाला गेलो. जेवण झाल्यावर सासरे म्हणाले, " मी निघतो, तुमच्या गप्पा चालू देत." मी नवर्‍याच्या मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा मारत बसले, पान वगैरे खायला गेलो. निघू असं म्हणून पाहिलं तर रात्रीचे दोन वाजलेले! मी घाबरले. नवर्‍याच्या मित्राला सोबत घेऊनच घरी आले. उद्या काय ते पाहू, असा विचार करून माझ्या खोलीत झोपायला गेले. तिथून मध्यरात्री नवर्‍याला फोन लावला आणि काय झालंय ते सांगितलं. "माझं चुकलं, गप्पांच्या नादात घड्याळाकडे लक्षच गेलं नाही." नवरा म्हणाला, "एव्हढं काय टेन्शन घेतेस? काही झालेलं नाही." ती म्हणाली , " मी काय सांगतेय ते त्याला कळतच नव्हतं.
 दुसर्‍या दिवशी काय कोसळणार? याची मला कल्पना आली. सासरी आलेले असताना, त्यात नवरा सोबत नसताना, खुशाल त्याच्या मित्रांबरोबर (फक्त एका मित्राची बायको होती.) रात्री दोनपर्यंत सुनेने गप्पा मारत बसावं. तेही बाहेर, आणि अपरात्री परत यावं. सगळंच गंभीर होतं. ती म्हणाली, " मी विचार केला की कोणी ओरडायच्या आत आपणच सॉरी म्हणून धार कमी करावी. चुकलेलं तर आहेच!"
 सकाळी उठल्यावर ती सासर्‍यांकडे गेली आणि त्यांना ’सॉरी’ म्हणाली. त्यांनी विचारलं, "सॉरी कशाबद्दल? माझ्या मुलाला या घरात जेवढे अधिकार आहेत, तेव्हढेच तुलाही आहेत. तो रात्री दोनपर्यंत गप्पा मारून घरी येऊ शकतो तर तू का नाही? हो, प्रश्न तुझ्या सुरक्षिततेचा आहे. तर या सगळ्या मुलांना मी लहानपणापासून ओळखतो, ते पोचवायला येणार, मग काळजी कसली?"
.........
अशीही काही घरं आहेत.....
अशीही काही माणसं असतात......
तुमच्यापर्यंत पोचावं म्हणून.....

(क्रमश:)

Saturday, March 15, 2014

देव - ८

माणसाला अजूनही निसर्गातली सगळी कोडी सुटलेली नाहीत , हे ही "देव" टिकून राहण्याचं महत्त्वाचं कारण आहे.
तसं बहुदा कधीही होणार नाही.

देवाची व्यवस्था ही हुकूमशाही व्यवस्था आहे.
माणसाचं स्वातंत्र्य गमावणारी आहे.

जन्मत: तुम्ही देव स्वीकारलेला आहे, असंच असतं,
नाकारायचा असेल तर विचारपूर्वक तो नाकारावा लागतो.
ते ही सहज नसतं.
समाजात देव ही कल्पना ऎच्छिक न राहता सक्तीची होते.


माझा माझा देव असं म्हणून प्रत्येकाचा देव वेगळा नाही. बहुसंख्यांचा मिळून एक देव आहे.
समाजाचे नियम, रितीभाती, योग्य-अयोग्य, नीती- अनीति देव ठरवतो.
’देव’ म्हणजे ’देव ज्यांच्या ताब्यात आहे ते मूठभर लोक’ हे ठरवतात.
आणि या व्यवस्थेत सत्ता त्यांच्याकडेच राहते.
ते जनसामान्यांना देवाजवळ पोहचू देत नाहीत.
ज्ञानेश्वरांनी संस्कृतमधली गीता प्राकृतात आणली, ही एक मोठी बंडखोरी होती.
ते ज्ञानही सामान्यांसाठी खुलं नव्हतं.

देव प्रत्येकासाठी एक चाकोरी आखून देतो,
ती तुमच्या जात, वय, लिंगानुसार असते.
देव प्रत्येकाची छोटी छोटी स्वातंत्र्येही काढून घेतो.
देव/ धर्म / धार्मिक / पारंपारिक असं ते मिळून पॅकेज आहे.
मी काही विशिष्ट दिवशी काय स्वैपाक करायचा? हे ठरलेलंच असतं.
( उदा, होळी - पुरणपोळी )
मी काही विशिष्ट दिवशी कुठले कपडे घालायचे ते आणखीच कुणीतरी ठरवतं.
(उदा. नवरात्रात ठरवले गेलेले कपड्यांचे रंग)
मी कुठले प्रवास करावेत?
( तीर्थयात्रा --- ठरलेल्या!)
समाजातील बहुसंख्यांना एक चाकोरी लागते हे मान्य करूनही,
लोकांच्या देवभोळेपणाचा फायदा उठवला जातो.
माणसा माणसात प्रतवार्‍या केल्या जातात. हे तर नक्कीच.

आस्तिक आहे, धार्मिक आहे, म्हणजे तो माणूस नैतिक आहे, असं समजणं चुकीचं आहे.
आणि नास्तिक माणूस नैतिक नाहीच, हे ही चुकीचं आहे.
धार्मिकता आणि नैतिकता या वेगवेगळ्या पायांवर उभ्या असतात, हे ठामपणे सांगण्याची गरज आहे.


********

Saturday, March 8, 2014

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो


स्वत:चं स्वातंत्र्य जपायचं. त्याविषयी काटेकोर, आग्रही राहायचं. सोपं नसतं.
स्वत:चं एक स्वतंत्र बेट करून नाहीच राहता येत.
तसं एक बेट असतंच म्हणा, प्रत्येकाच्या मनात.
तिथे कुठलं स्वातंत्र्य? तिथे तर आपली हुकूमशाहीच.
आपणच वसवलेलं गाव ते!
माझं गाव तर अस्ताव्यस्तच!
हवं तसं पसरलेलं.
स्वत:ला भेटायला इतरांना किती आवडतं कोण जाणे!
मला खूप आवडतं. दरवे्ळी एकटेपण म्हणाजे एकाकीपण नसतं.
स्वत:बरोबर मजा येते.

विषय चाललाय तो बाहेरच्या जगात स्वातंत्र्य जपण्याचा!
आपल्या समाजात अशी परिस्थिती आहे की लोक सहजच बाई म्हणून गृहित धरतात, मदत करायला येतात, डावलतात.
अशावेळी बरेचदा, एकतर दुर्लक्ष करणं शक्य असतं किंवा तिथल्या तिथे बोलून मोकळं होता येतं.
किंवा आवडलं नाही तरी सोडून देता येतं.
अवघड आहे ते नात्यात स्वातंत्र्य जपणं.
त्यांच्या प्रेमळपणाचं, त्यांच्या काळजीचं काय करायचं?
मी बाई असल्याने मी कुठेही असले तरी कळावं म्हणून मोबाईल हवाच, म्हणणारांचं काय करायचं?
ते आपले आप्त नव्हेतच का?
भावनांच्या बाबतीत इतकी गुंतागुंत असते.
सरळ तोडून टाकायचं म्हणजे कोरडेपणा!
आपल्याला न पटणार्‍या गोष्टी स्वीकारून नात्यातला ओलावा टिकवायचा?
शक्य होत नाही. मग आपलं असणं / आपण ’आपण’ असणं काय ते!
निजखूणच पुसायची?
मग कधी समजावून सांगायचं, कधी हट्टीपणा करायचा, कधी थोडी मुरड घालायची, असं करावं लागतं.

अगदी जवळच्या नात्यात स्वातंत्र्य कसं जपायचं?
तिथे तर हे ही कळत जातं की आपण वाटतो तितके सुसंगत नाही.
कधी कधी विसंबायचं असतं, कधी अधिकाराने आपणच निर्णय घेण्याचा हक्क घेतो, कधी सोपवावंसं होतं.
अशावेळी स्वातंत्र्याचं काय करायचं? त्यांच्याही आणि आपल्याही?
अशावेळी काटेकोर नियम नाहीच लावायचे.
तरी
स्वत्व गमवायचं नाही, स्वातंत्र्यही नाहीच.

जवळची आणि दूरचीही माणसं तर हवीतच.

तुमचं स्वातंत्र्य तुम्हांला जपता येवो, त्या मार्गावर सोबत लाभो, भावनांना वजा करण्याची वेळ न येवो.
शुभेच्छा!

आणि स्वत:च्या आतल्या जगात, तिथे स्वतंत्र असण्याची गरज आहेच हं!
गाभ्याशी स्वातंत्र्य असल्याशिवाय ते बाहेर कसं येणार?
ते लाभो.
शुभेच्छा!

Friday, February 28, 2014

देव - ७

माणसाच्या काही आदिम गरजा असणार,
अन्न, वस्त्र, निवार्‍याच्या पलीकडच्या, भावनिक गरजा...
प्रेम, भीती, भविष्याबद्दलची चिंता, म्रूत्यूबद्दलचे कुतूहल, मी कोण?, कुठून आलो? कुठे जाणार? असे मुलभूत प्रश्न,
जीवनातलं सातत्य, वंश पुढे चालू राहण्याची काळजी, सृष्टीच्या निर्मितीबद्दलचे कुतूहल....
या सगळ्यांची उत्तरे ’देव’ देतो, किंवा देव आहे.
देव ही कल्पना आयुष्याला एक स्थिरता देते.
म्हणूनच ती वर्षानुवर्षे, पिढ्यानपिढ्या माणसांच्या मनात घर करून राहिलेली आहे.

ज्या सगळ्या वेगवेगळ्या भीती माणसाला असतात,
मृत्यूची भीती असते, तर मृत्यूनंतर माणूस देवाकडे जातो, यात निश्चिंती आहे.
कधी मृत्यू येणार? देवाच्या मनात असेल तेव्हा.
भविष्याबद्दल चिंता? देव आहे चालवणारा... एव्हढेच काय तर देव बुद्धी देईल त्याप्रमाणे... देवाला आहे काळजी!

आत्मा एकच असून तो केवळ शरीरे / योनी बदलतो, ही हिंदू धर्मातली श्रद्धा,
जीवनातील सातत्य ......

मी गेल्यानंतर मुलाबाळांचं काय होईल?
किंबहुना माणसांचं काय होईल? माणूस जात टिकून राहिल ना?
तर राहणार आहे , हे आश्वासन देव देतो.

ही सृष्टी, जगातलं हे सारं अदभूत कसं निर्माण झालं असेल?
तर याचा निर्माता देव आहे, इतकं सोपं उत्तर देव ही कल्पना पुढ्यात ठेवते.

कुठलाही माणूस विचार करत गेला की मी कोण?, कुठून आलो? आणि कुठे जाणार? हे प्रश्न त्याला अस्वस्थ करणारच.
त्याचंही उत्तर देव देतो.

शरण जाणं, स्वत:ला कुणावर तरी सोपवणं हीसुद्धा माणसाची गरज असेल.

माणसाच्या वैयक्तिक गरजा जशा देव पूर्ण करतो
तशाच मानवी समूहाच्या काही गरजा आहेत
त्याही देव पूर्ण करतो.

समूहाची म्हणून एक नियमावली लागते, एक नैतिकता लागते,
त्यासाठी देव आहेच.
समूहाला एकत्र येण्यासाठी काही निमित्त लागतं.
तेही देव पुरवतो.

समुहासमोर कुणीतरी "रोल मॉडेल" असायला लागतं
देव ती भूमिका निभावतो.

समूहाला एक न्यायव्यवस्था लागते.
चांगलं वागण्याचा धाक आणि न वागल्यास शिक्षा,
हे दोन्हीही देव करतो.

*********
मग देवाची कल्पना स्विकारण्यात अडचण कसली आहे?

असं आहे की
देव स्वत: काहीही करत नाही.
तो त्याच्या भक्तांच्या / अनुयायांच्या ताब्यात आहे.
*********



Saturday, February 15, 2014

देव - ६

प्रेम हे सर्वव्यापी असतं.
बहुसंख्य हिंदी सिनेमे, हिंदी गाणी वर्षानुवर्षे एक " प्रेम " हा विषय धरूनच आहेत.
लोकप्रिय आहेत. लोकांच्या हृदयाला हात घालताहेत.
आपण कितीही नावं ठेवली तरी हिंदी सिनेमे लोकांच्या काही गरजा पूर्ण करतात, असं आहे,
म्हणूनच लोक ते पाहात असणार.
त्यातला महत्वाचा भाग हा आहे की कोणीतरी प्रेमाचं माणूस असणं, जिवाभावाचं कुणीतरी असणं,
प्रेम ही अशी गोष्ट आहे जी प्रत्येकाला आपल्या आयुष्यात हवी आहे.
कारण प्रेम ही एक मुलभूत भावना आहे, माणसाची गरज आहे.
आपल्यावर कुणीतरी प्रेम करावं, आपण आहोत तसं त्याच्याशी व्यक्त होता यावं, त्याने पोटाशी धरावं अशी आणि
आपण कुणावरतरी प्रेम करावं हीसुद्धा माणसाची गरज असते.

प्रत्येकालाच असं प्रेमाचं माणूस कुठून मिळणार?
प्रेमातल्या सोबत असणं, आधार असणं, जिवलग असणं,
या माणसाच्या गरजा " देव "  पूर्ण करतो.

माणूस हा कळपाने राहणारा, समाज निर्मून राहणारा प्राणी आहे.
त्याला सोबत लागते.
देवाची त्याला खात्रीची आणि कायमची सोबत मिळू शकते.
(देव या कल्पनेवर विश्वास ठेवता यायला हवा.)

मध्ययुगीन भक्तीपरंपरंपरेत, सूफी रचनांमधेही, देवाला प्रियकर मानलेलं आहे.

प्रेम माणसाला शुद्ध, निर्मळ, प्रामाणिक ....... अधिकाधिक चांगला माणूस बनवतं.
प्रेमात कसं आहे? स्वत:आधी दुसर्‍याचा विचार, त्याचं भलं, त्याग, त्याच्या सुखाची काळजी.
प्रेम ही माणूसपण उंचावणारी गोष्ट आहे.
माणसाचं सगळ्यात चांगलं रूप तो प्रेमात असतानाचं, प्रिय व्यक्तीसाठीचं आहे.

देव त्याच्यासाठी प्रिय व्यक्ती बनून येतो.

देव एकट्या, एकाकी माणसाला दुकटा करतो.
********

Friday, January 31, 2014

देव - ५



ज्यांच्या ज्यांच्या वैयक्तिक आयुष्यात देव आहे, असेल आणि तेव्हढ्यापुरताच तो असेल तर छानच आहे.
आयुष्याचं ओझं वाहतानाचा विसावा!
म्हणजे कागदावर देव छानच आहे आणि देवविषयक समजुतीही छान आहेत.
दु:खात, संकटात देव आहे बघणारा, तो सोबत आहे, तो भलंच करणार आहे या समजुती मानसिक बळ वाढवणार्‍या आहेत.
आपण नेकीने, चांगलं वागत असूनही अडचणींचे डोंगर उभे राहतात, दु:खच पदरी येतं, याची संगती कशी लावायची? मग देव, मागच्या जन्मीचं कर्म, कर्मविपाक सिद्धांत, ते मदतीला येतं,
जिथे जिथे बळ कमी पडतं तिथे तिथे देव उभा राहतो.
एकट्या / एकाकी माणसाची सोबत करतो.
माणसाच्या आयुष्यातल्या रिकाम्या जागा भरतो.
रिकामा वेळ भरून काढतो.
माणसांना मोडून पडू देत नाही
नम्रता, कृतज्ञता अशा कितीक चांगल्या भावना रूजवतो,
कलाकारांना प्रेरणा देतो.

असा देव किती छान आहे.

***********

मुळात देव ही मानवाचीच निर्मिती असल्याने,
माणूस देवाला ताब्यात घेतो.
मग तो घरोघरीचा , आपल्यापुरता खाजगी देव राहात नाही.
देवाच्या नावावर राजकारण सुरू होतं,
देवाचं व्यापारीकरण होतं,
लोकांच्या श्रद्धेच्या आणि भावनांच्या जोरावर बाजारपेठ उभी राहते.

***********

मग अशावेळी काय करायचं?
घरातला देव असू दे आणि समाजातला नको,
ही भूमिका दुटप्पी नाही का?
"देव" , देवविषयक श्रद्धा या केवळ तुमच्या खाजगी जीवनात असू देत,
असं म्हणणं खरोखरी प्रत्यक्षात येऊ शकतं का?
मुळात घरातला देवही ताब्यात घेतला जातोच ना?
मग घराचाही देव नाही, केवळ व्यक्तीचा चालेल, असं म्हणावं लागेल का?

**********

Wednesday, January 15, 2014

देव देव

आई - बाबा दोघेही अस्तिक. त्यांच्याशी बोलले.
दोघांच्याही घरी देवभोळं वातावरण. रोज घरी सोवळ्यात देवपूजा व्हायची तीर्थ घेणं मगच जेवायला बसायचं.
आजूबाजूचं सगळंच वातावरण असं होतं.
बाबा म्हणाले, " देवाविषयी शंका उपस्थित केली, असा एकही माणूस मी पाहिलेला नव्हता. या स्वरूपाची चर्चा ऎकली ती कॉलेजात गेल्यावर."

देव आणि कर्मकांडं यात फरक करता का?
तर म्हणाले, "नाही."
" एकदा प्रतिष्ठापना केल्यावर घरच्या देवाच्या मूर्तीत देवाचा अंश आहे असंच आम्हांला वाटतं. मग रोजची देवपूजा, देवाला आंघोळ घालणं असेल, वस्त्र नेसवणं असेल, ते केलंच पाहिजे असंच वाटतं."
" रोज संध्याकाळी देवासमोर दिवा, उदबत्ती लावली की आम्हांला प्रसन्न वाटतं."
देवाची भीती वाटत नाही पण काही प्रमाणात धाक आहे.
देव वरून पाहतो आहे, असं आहे.
आपण चांगलं वागावं, असं आहे.

आई म्हणाली, "आम्ही काही फार नवससायस करत नाही, क्वचित कधीतरी बोलते."
बाबा म्हणाले, " मीही क्वचित काहीतरी बोलतो, आणि करूनही टाकतो, कोणाला काही सांगत नाही."
देव आहे. देवाचा आधार वाटतो.
आई म्हणाली, " आपल्याला कधीतरी तो लागेल, त्याची गरज पडेल तेव्हा त्याला बोलायचं, मागायचं, असं नको, रोज त्याची आठवण काढली पाहिजे."

"देव काही कधी कुणाचं वाईट करत नाही."
" जर कुणाचं काही वाईट होत असेल तर ते मागच्या जन्मीचे भोग. या जन्मीतरी जास्तीत जास्त पुण्य जोडलं पाहिजे."
" देवाचं नामस्मरण, स्वाध्यय, जप या मनाला आनंद देणार्‍या गोष्टी आहेत."
कर्मकांडं झाली नाहीत तर रूखरूख वाटते पण तेव्हढ्यापुरती.
आम्ही १००% आस्तिक आहोत, देव आहे याबाबत तीळमात्रही शंका नाही.
तुम्ही त्याला देव म्हणा की शक्ती म्हणा, आहेच.
कुठल्याही धर्माचा, जातीचा असू देत, जगातला कुठलाही माणूस असू देत, त्याचा त्याचा एक देव असतो. कोणी कुठल्या झाडाला देव मानत असेल किंवा अजून कशाला पण देव मानतोच.

पूर्वजांनी काही विचार करून ठेवलेला आहे. त्यांना काही अनुभव आले असतील म्हणून त्यांनी लिहून ठेवलंय. आपण पाळावं.
तरी आम्ही जे पाहिलंय त्यामानाने दहा-वीस टक्केच पाळतो.

काही गोष्टींचं वळण पडलंय, सवय झालीय म्हणूनही करत राहतो असं आहे.
पाहात आलो तसं करत आलो आहोत हे ही खरं आहे.


*******

हिरो

  माझ्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे. क्लार्क. आपलं काम प्रामाणिकपणे करणारी. कधीही कुठल्या कामाचे वरून किंवा टेबलाखालून असे पैसे तिने घेतले ना...